आम्ही गडकरी!

"सकाळी साडे-चारला तयार रहावे" असा हाय-कमांडचा आदेश आल्यापसून जराशी उत्सुकता होतीच पण सकाळी सॅम्या आणि राखुंड्या आपापल्या जांभया आवरीत मलाच विचारायला लागले "कुठे जायचे?" करून, तेव्हा तर ती आणखीनच वाढली. असा प्लॅन कुणाला आधीच नाही सांगीतला की आपले महत्व वाढते असे वाटते का काय या माकडाला? असू देत बुवा.. पाचच मिनीटात पहाटेच्या शांततेला चरे पाडत आपली बायको दामटवत के.डी हजर झाला. कुठल्यातरी चांगल्या स्वप्नातून उठून यायला लागलं असलं पाहिजे त्याला, आपण काहीतरी गौप्यस्फ़ोट करणार आहोत हे देखील विसरला तो. गाडी माझ्याकडे देऊन स्वप्न कंटीन्यू करत तो पिलीयनवर खुशाल पेंगायला लागला तेव्हा गाडी सुरु करत अजून सुषुम्नावस्थेत असलेल्या के.डी ला विचारले,"कुठे घ्यायची हे सांगणार आहेस की..."
"मळवलीला घे-लोहगडला जायचेय"
"जी हुजुर"..
गाडी माझ्या हातात मिळाल्यावर तो नारायणपेठेला १८० चकरा मार म्हणाला असता तरी मी मारल्या असत्या.

के.डी ची बॉक्सर पळवणं हा माझ्या आवडीचा भाग आहे. सॅम्या आणि राखुंड्या पल्सार वर होते. ही गाडी मला कधी झेपली नाही. मला खालून वरपर्यंत मोजून काढलं तरी मी ५-३ च्या पुढे नाही जाणार. टांग मारून मी पल्सारवर बसले जरी तरी पल्सारवर वाळत टाकल्यासारखी दिसते. चला...अशी लोंबकळत एखादवेळेस चालवलीच मी ती गाडी...पेलायला नको? मरू देत...मी त्या प्रकरणाच्या वाटेला जातच नाही. ’Definitely Male' आहे? हो बाबा...असू देत..

तर..गावातून बाहेर पडलं की जरा निवांत रस्ता मिळाला की गाडी ८० पर्यंत दामटायची.एखाद्या रीबॉकच्या जोड्याला किंवा टॉमी हिफ़्लीजरच्या जॅकेटला मागे टाकायचे. मग ते पोरगं चेकाळून मला गाठणार आणि मी गाडी चालवतेय हे लक्षात आल्यावर "साल्या! एका पोरीने पळवले तुला!" हे त्याच्या पाठीवर लटकलेल्याचे उद्गार तर नेहमीचेच! आजही मला नेहमीपेक्षा बरेच कॅचेस मिळाल्यावर त्याची बायको आज मी नेहमीपेक्षा बराच वेळ पिदववतेय हे के.डी. च्या लक्षात आले आणि तो जरा ’जे’ व्हायला लागला. मग कामशेत पुढे गाडी त्याच्याकडे दिली. तोपर्यंत किती वाजले होते ठाऊक नाही पण माझ्या पोटात कपभर चहा आणि बिस्कीटे वाजले होते. मागच्यावेळी भोर ला खाल्लेली लालभडक तर्रीवाली मिसळ आठवली. आई गं! पहिल्याच घासात तिने मला चांगलाच इंगा दाखवला होता. मी पण ती हट्टाने संपवून तिचे आफ़्टर-एफ़ेक्ट्स म्हणून दोन्ही गालांवर पिळ्पल्स मिरवत हिंडले होते. रामनाथच्या पण तोंडात मारेल अशा जहाल मिसळीचे इफ़ेक्टस कुठे भलतीकडेच दिसण्यापेक्षा असे दिसलेले कधीही बरे...नाही का? तर..एवढ्या पहाटे कोणी कुत्रं सुद्धा रस्त्यावर नव्हतं, हॉटेल्स उघडी असण्याची शक्यताच सोडून द्यायची. मग एका साखरझोपेत असलेया टपरीवाल्याला बाबापुता करत ऊठवले आणि चहा करायला लावला. चार बिस्कीटांच्या पुडयांचा फ़न्ना केला तेव्हा कुठे माणसात आल्यासारखं वाटलं. आणि मग भरल्या पोटाने पिलीयन वर बसून आवडीचा उद्योग सुरु केला, अखंड बडबड!

आज ’आवाजतोड’ खेळायचे ठरले. चिठ्ठया टाकून एका गाडीने एक गाणे/पद्य आणि दुसरया गाडीने दुसरे घ्यायचे आणि जोरजोरात सुरु व्हायचे. जी पार्टी त्या वाढत्या आवाजात आपले गाणे विसरून दुसरया पार्टीचे गाणे म्हणायला लगेल ती हरली. (कानात बोटं घालायची परवानगी नाही). या वेळी आम्हाला आलेलं ’भीमरूपी’ आणि राखुंड्याला ’गणपतीस्तोत्र'! सॅम्याने ’न च विघ्नं भयं तस्य’ करता करता ’वाढता वाढता वाढे’शी कधी फ़ुगडी घालायला सुरुवात केली हे त्याचे त्यालाच कळले नाही. माझ्यासारखा बुलंद आवाज असताना आमची सरशी होणार हे तर उघडच!(शिवमहिम्न आलं की मात्र माझी दांडी उडते). आम्ही गाडी थेट लोहगडाच्या पायथ्याशी न्यायची ठरवली आणि मनात ईश्वराचे स्मरण करत अशक्य कच्च्या रस्त्यावरुन हाणली गाडी. सकाळी सकाळीच के.डी. कशाने पिसाळला होता काय ठाऊक?? माझ्या डोक्याएवढ्या मोठ्या मोठ्या दगडांवरून गाडी हाणत होता. गाडी वेगवेगळ्या कोनांमधून अंगात आल्यासारखी गंमत गंमत करत चालली होती. माझी मागे बसून जाम तंतरली होती. मी जर मागच्या मागे बदाककन पडले असते तर निदान ३ आठवडे पाय वर करून पडावं लागलं असतं खास!घरून चपला पडल्या त्या वेगळ्याच.

आमचे मोठे आवाज, त्यात हसण्यात डायरेक्ट साताच्या वरचेच मजले! त्यामुळे आम्ही आलो की लोकं ’ते आले...ते आले..ते आले बरं का...!’ अशाच आविर्भावात आम्हाला बघतच राहतात. यावेळीही काही वेगळं नाहीच घडलं. तसं पाहायला गेलो तर आम्ही आहोतच चार नमुने!

ढुंगणावर ’ली’चा पॅच, पायात ऍडीडासचे जोडे आणि शर्टात ’वेस्ट्साईड’ शिवाय बात नाही असा थाट, "हर फ़िक्र को धुवे में" करत दु:ख, काळज्यांना श्शूss करण्यासाठी फ़काफ़का सिगरेट्स ओढणारा तो राखुंड्या! के.डी...बीयरचे आत्यंतिक प्रेम पोटाच्या वळणदार ’ट’ मधून झळकत असलेले. कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले आणि हातात खाटकाची सुरी दिली तर ’पिशी मावशी आणि तिची भुतावळ ’ तत्सम नाटकामध्ये बच्चेकंपनीला घाबरवण्यासाठी कामी येणारा मनुष्य! सॅम्या त्यातल्या त्यात शहाणे कोकरू. त्याचा तो शर्टाच्या वरच्या बटणापाशी हनुवटी खोचून घडीघडी अंतर्मुख टिंब टिंब.. का कायसे होण्याचा तापदायक प्रकार सोडला तर शहाणुलं बाळ आहे ते. आणि शेवटी ’मी’..! खांद्यावर शर्टचे आढे पडलेय, त्याची गुडघ्याखाली येणारी दोन टोकं पोटापाशी आवळून बांधली आहेत असा अवतार. त्यामुळे मी मौजे पारलई मुकाम पोस्ट वाडे-बुद्रुक वरून तडकाफ़डकी ट्रान्सफ़र होऊन नेसत्या वस्त्रांशिवाय लोहगडावर रीपोर्टींग करायला आलेय असे कोणाला वाटले तर त्यात त्याची काहीही चूक नाही.

गडावर अजून वर्दळ चालू व्हायची होती. आमच्याही आधी गडावर येऊन पोहोचलेला ’सह्यमित्र’चा एक निकॉन डी-८० पालथा पडून ’कलरफ़ूल ग्रासहॉपर’चा फ़ोटो घेत होता.(असं त्यानेच मला नंतर सांगीतलं). ’रंगीत टोळ’ म्हणायला काही हरकत नव्ह्ती. पण एका गालाला माती लागलेल्या अवतारात तो भलताच गोड दिसत होता..त्यामुळे छोड दिया.

आमच्यातला के.डी. लोहगडावर अनेक वेळा नाचून बागडून गेलेला. त्यामुळे त्याला गड पाठ. तो झोपेत चालत जरी गेला असता तरी अलगड विंचूकाटा माचीवर जाऊन पोहोचला असता. मग काय जिवंत झरेच बघ, आवाज कसा घुमतोय हे बघायला घसा ताणूनच काय ओरड..क्यॅयच्या क्यॅय चालले होते. १२ वाजेपर्यंत आम्ही काहीही न खाता-पिता इकडेच चढ, त्याच बोळकांडयातून घूस असे प्रकार करत होतो. डोक्यावर सूर्य आग ओकायला लागला होता, पिण्याचे पाणी संपले होते आणि त्यात हा मंबाजी आम्हाला वाट्टेल तसा पिदवत होता. आम्ही त्याच्या मागे पाय ओढत चाललो होतो. के.डी वर काय वर्षानुवर्षे किटण चढलेले..त्यामुळे त्याला कवचकुंडले मिळाल्यासारखीच. पण आम्ही मात्र करपत होतो. माझ्या पोटात खाडखूड सुरु झाली होती. विंचुकाट्यावर जाऊन खायचं हा के.डी चा आग्रह होता( तिकडे काय पंगत बसणार होती? सातयेडं नायतर..) पण भूक लागल्यावर मी दोन पावलं जरी चालले तरी हवा गेल्यासारखी पिळपिळीत होते हे या बाबाजीला कुठे सांगणार? त्यामुळे त्याच्या बॅगेतल्या बिस्कीटच्या पुड्यासाठी मी ’बाजा लव्ह (लव्हस पण नाही) उर्मी’ चितारलेल्या कातळाखाली बैठा सत्याग्रह सुरु केला. आणि मारी टोपी..

मी तिथे अशी फ़तकल मारून बसलेली असताना नेमका कोण येऊन टपकावा? झुल्फ़ी??? दिवाळीच्या आधी नारायण पेठेत हा छानदार मिशी आणि खांद्यापर्यंत केस असलेला पल्सार-डी.टी.एस वाला दिसलेला. हा परत नारायण पेठेत दिसेल म्हणून बंदुक्षणी चहावाल्यांच्या लोखंडी बेंचला पोक आणलेलं मी. अशा मुलाने मला असा मांडा ठोकून भूक भूक करताना पहावं? या तिघा नालायकांचं हसणं उकळत होतं. ते पण महा इब्लिस कार्टं! मला त्या कातळाखाली अस खुडूक करून बसलेलं पाहून तो फ़टाका फ़ुटावा तसा हसला आणि आपल्या ग्रुपबरोबर निघून गेला..तेच मिशीत हसणे. मला ’प्रिय’ची सडकून आठवण आली.त्याला हे मी जेव्हा सांगेन तेव्हा तो याहून किलर स्माईल देऊन माझा खुर्दा करणार नक्की. उंची, मिशी आणि बुलेट ही माझी ३ ऑब्सेशन्स. आणि हीच माझा एक दिवस घात करतील ही शरीची शापवाणी आमच्या अख्ख्या मित्रमंडळात फ़ेमस आहे. पण तिच्याकडे कोण लक्ष देतेय? ती चिचुंद्री आहे.

अशा रितीने मी माझी पोटपूजा उरकून घेतल्यावर आली ती सुप्रसिद्ध विंचुकाटा माची आणि तिच्या सुरुवातीलाच असणारा तो फ़ेफ़रे आणणारा रॉक-पॅच. हे तिघं खारीसारखे सुर्रकन उतरून माझी मजा बघायला पायथ्याशी उभे राहिले. आमची सुरुवात तर चांगलीच झाली पण मध्यावर आल्यावर हरे रामा हरे कृष्णा..! बोटं ठेवता येतील एवढ्या जागेत एक पाय रोवून दुसरा ठेवू तर कुठे या विवंचनेत मी मधल्या मध्ये लोंबकळत पडले होते.आणि हे खाली पाद्रीबाबाच्या मख्खपणे उभे. मी तोल जाऊन पडले असते तर मला उठवायचे कष्टही न घेता ही लोकं ’टुझी माला डया येटे...आमेन" म्हणून सर्व मिळून सहा पायांवर चालती होतील असं वाटायला लागलं. शेवटी एकदाचं माझं सुखरूपपणे लँडींग झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एक रेबॅन पण "स्स..हा!" म्हणून सुस्कारल्याचं बघितलं मी! रॉकपॅच उतरत असले म्हणून काय झालं?? आमचं लक्ष असतं म्हटलं!. माझ्या मागून रॉकपॅच उतरताना मुलींचे ’ मॅडी मला भिती वाटते’, ’राज, मी पडणारेय ...आऊछ!’ असे चित्कार उठत होते...काही विचारू नका.मी मुलीसारखी ट्रीटमेंट ना कधी मागितली ना या लोकांनी मला कधी दिली..फ़ार फ़ार तर त्यांच्यासारख्या अनुभवी ट्रेकर्समध्ये लिंबू टिंबू म्हणून थोडा पेशंस ठेवतात झाले!

विंचुकाटा माचीवर आल्यावर सॅम्याला जोर चढला. फ़ोटो-बिटो ही सॅम्याची खास कुरणं. इकडेच वळ, तिकडेच बघ, अशीच वाक असं करून आम्हाला यथेच्छ त्रास देऊन झाला. दिवाळीत बाटलीतून चुकून सुटलेल्या रॉकेटसारखा सॅम्या त्या पूर्ण माचीभर सैरावैरा पळत होता ते त्याच्याकडे उगीच पापण्यांची पिटपिटकरत बघत असलेल्या पिवळ्या स्कार्फ़साठी हे न समजायला आम्ही कय अगदीच ’हे’ नव्हतो.. फ़ोटो-बिटो काढून झाले आणि आम्ही एक २-रूम किचन गुहा गाठली. पथारी पसरली.तिकडे दर्ग्यावर पोरांनी ’आहुम आहुम’ वर धिंगाणा चालवलेला असताना आम्ही मात्र तिथल्या गुहेत बसून झाकीर ऐकत होतो.पळापळीचे सार्थक म्हणतात ते हेच असावे कदाचित!

मी तर आहेच विचित्र पण माझे मित्र पण माझ्यासारखेच. जगाच्या भाषेत ज्यांना ’weirdos’ म्हणतात आणि माझ्या भाषेत ’टोळभैरव!’(पुन्हा टोळ?? आह! निकॉन डी८०) प्रत्येकजण हसून साजरं करत असला तरी प्रत्येकाला काहीनाकाही दु:ख आहेच आणि आमच्यापैकी प्रत्येकाला ते माहीत आहे.

राखुंड्याचं F.M (Fluid Mechanics) सुटत नाहीये, के.डी ला प्रेसवरचे मशीन त्रास देतेय प्लस त्याच्या लग्नाचं घाटतेय, सॅमीला केतकी उर्फ़ केटी खापिटलीने डीच केलेय. माझा mp3 खराब झालाय, ’The Hindu’चा रेट वाढलाय , माझा भारताचा नकाशा कितीही प्रयत्न केला तरी कडबोळीसारखाच येतो..माझ्या दु:खाची कारणे हजार! आणि प्रवास हा दु:खावर हमखास उतारा असतो. त्यामुळे सगळ्यांच्या दु:खाचा म.सा.वि. एका लिमीटपुढे गेला की एखाद्या रविवारी जमायचे आणि वाट फ़ुटेल तिथे गाड्या सोडायच्या. लागेल तो गड पकडायचा आणि घ्यायचा चढायला हा उपक्रम!

माझे कालच ’भ.’शी जोरदार भांडण झालेय, ’प्रिय’ ’आऊट ऑफ़ टाऊन’ आणि ’आऊट ऑफ़ रेंज’ आहे, उद्या सॅमीच्या नव्या प्रेमभंगाचे सुतक पाळायला लागणारेय दिसतेय, राखुंड्याचा आत्ताच फ़ोन आला.. वाईट्ट्ट वैतागला होता तो. म्हणाला "मने, Let's go to Rajgad". मला काय?? चला.

"तुतानखामेन...!"

Comment allez vous?
कसे आहात??
माझा मुक्काम तब्बल एका वर्षाकरता पुण्यात आहे. रानडेमध्ये फ़्रेंचला प्रवेश घेतल्यापासून माझ्या अंगात फ़्रेंच आलंय. त्यामुळे बघावं तेव्हा मी आपली फ़्रेंचमध्ये घुमत असलेली असते. जमेल तिथे फ़्रेंच ची ठिगळं लावत ’प्रिय’ला ’टोचन’ देण्याचा अभिनव उपक्रम! असो..
’प्रिय’चंच शहर म्हटल्यावर मी ’प्रिय’च्या घरी पडीक असणार हे ओघानेच आलं. माझ्या रुमवर ’रेफ़्युजी कँप’ असल्यागत उगीच पाठ टेकवायला जायचं नाहीतर अभ्यास, खाणं-पिणं, मस्ती मारणं सगळं ’प्रिय’च्या घरी. आणि ’प्रिय’च्या घरी मी काय भूत आहे याची पुरेपूर कल्पना असल्याने (सुदैवाने!) मी मजेत असले तरी ते देखील मजेत असतात.
तर..
’प्रिय’ने घरी एक कासव आणलंय.
दोन पेरांएवढं बिटुकलं कासव. ऑलिव्ह ग्रीन रंगाची शंकू आकाराची पाठ, त्यावर फ़िकट काळ्या रंगाची मोझेक नक्षी, पूर्ण पाठीला ह्ट्टाने दिल्यासारखी वाटणारी लेमन-शिफ़ॉन कलरची आऊट-लाईन, त्याच रंगाचं कपाळ आणि जबडा, पाठीच्या दर्शनी भागावर बोंबलाच्या काट्यासारखी लाल-काळी नक्षी, काळ्याशार अंगावर मेझ कलरच्या तारा आणि इवल्याशा नखुल्या! अतिशय देखणं रुपडं. साहजिकच त्याचं नामकरण माझ्यातर्फ़े झालं.
तर झालं काय, त्यादिवशी क्लासमध्ये सरांनी आम्हाला इजिप्शियन फ़ारो्ह आणि पिरॅमिड्सचं आंबोण चारले आणि मी रवंथ करतच घरी आले. त्यातून हे नामकरणाचे झेंगट गळ्यात पडले. नस्तं लफ़डं सालं. मी कासवाला बघितले आणि त्याची ती शंकूसारखी पाठ बघून मला उचकी लागल्यासारखा ’तुतानखामेन’ आठवला आणि मी कानकुर्री दिली, "तुतानखामेन...!" आपलं राजेशाही नाव ऐकून तुतानखामेन कवचात हातपाय-मान ओढून घेऊन घोरायला पण लागला.
मी कसलं जबराट नाव ठेवलंय या आनंदात मला स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला उसंत पण मिळाली नाही कारण ’कसलं भंगार नाव ठेवलंयस’ करत ’प्रिय’ माझ्यामागे कटकट करत बसला. काका-काकूंना तर कळलंच नाही दोन दिवस काय नाव ठेवलंय ते. दोन दिवस पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेत होते बिचारे! नंतर ’तुत्या’ काय, ’आमेन’ काय, ’खामेन’ काय..कायच्या काय चालू होतं. ’प्रिय’च्या जिभेला टोक काढताना आणि सगळ्यांच्या जिभेला बसलेल्या गाठी सोडवताना तुतानखामेन साईझने २ अंगुळे अजून वाढला.
’तुतानखामेन’ फ़्फ़ार फ़्फ़ार क्युटी आहे. पहिले पहिले नुसता खात तरी असायचा नाहीतर झोपत तरी असायचा. अधूनमधून ’ह्हॉय्य सांबा..’ च्या आविर्भावात टॅंकमधली झाडं उपटायचा निष्फ़ळ प्रयत्न करत असायचा. जसा रुळला तसा त्याच्या उद्योगांचा पसारा आणि व्याप वाढला. आताशा टॅंकच्या काचेत स्वत:चे रुपडे न्याहाळत, उगाचच माना वेळावत बराच वेळ त्याचा खेळ चाललेला असतो. कधी सरळ पोहायचा कंटाळा आला तर बॅकस्ट्रोकही मारतो. ऑक्सिजनच्या बुडबुड्यांनी हेलकावे बसले तरी हट्टाने तिथेच जातो. उलटापालटा होऊन एकदा बाहेर आला की ’जितं मया’ करत आपला पराक्रम कोणी बघितला काय हे टेचात बघतो. सकाळी मी आणि तो एकदमच उन्हात बसतो. ’प्रिय’च्या घरातल्या गालिच्यावर ’चाली-चाली ’करतो. मग तो टॅंकमध्ये झोपायला जातो आणि मी क्लासमध्ये! (अभ्यास करायला!). मी आले की माझ्याबरोबर झाडामागे लपून ’कूsक कूsक ’करत बसतो. काका-काकूंना अजून माझ्या ’एक्स्ट्रा-ह्युमन सग्या-सोयरयांबद्दल माहित नसल्याने ते नुसतेच हवालदिल होऊन बघत बसतात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी व्यवस्थित देत असल्याने माझं वरचं कनेक्शन गंडलंय का काय? हे पण कळायला त्यांच्यापुढे मार्ग नसतो.
’प्रिय’च्या घरी गेले आणि हा झोपलेला असला की मी फ़ार फ़ारतर १० मिनीटं कळ काढते आणि नंतर त्याच्या पाठीवर कॅरम शॉट ठेऊन देते. यावर हा कवचातून मान बाहेर काढून’ कोण आलं ते?’ या आविर्भावात मॅक्स जडावलेले डोळे कष्टाने उघडून पहिले बघेल.(रविवारी कोंबडीच्या पायाचं हिरवं सूप स्टार्टरला घेऊन नंतर ४-५ पोळ्या रस्स्याबरोबर हाणल्या की दुपारी माझे डोळे कसे होतील? तसे जडावलेले.)मी असेन तर आरामात पोहत पहिले वर येईल, १०००० वेळा मान वाकडी करून माझ्याकडे बघेल, मी मीच आहे अशी एकदाची खात्री पटली की खूण म्हणून जोरजोरात चळवळ करेल. बोट दिले तर पुढच्या दोन पायात पकडेल. ’प्रिय’ एकदा त्याला असा उठवायचा प्रयत्न केला होता तेव्हा परत झोपून घेऊन तुतानखामेनने त्याचा साफ़ कचरा केला होता.
माझा कैवार त्याला फ़ार बुवा! ’प्रिय’ ने जीव खाऊन पकड चिमटा काढला की ’एय ...पोरीशी काय मारामारी करतोस?हिंमत असेल तर....’ च्या आवेशात टँकच्या काचेवर फ़ताफ़ता पाय मारत बसतो. ’प्रिय’ विरुद्ध ’मी’ या लढ्यात माझी बाजू घेणारा एकमेव जिवंत प्राणी तो हाच.. तुतानखामेन!
टॅंक्मधलं ऑक्सिजनचं ते नळकांडं त्याचा हॉटस्पॉट आहे. भल्या सकाळी त्याला त्यावर पुल-अप्स मारताना बघणे आणि त्याच पाइपवर टांग मारून झोपा काढताना बघणं हा आता माझा अतिप्रिय विरंगुळा बनला आहे.
’प्रिय’शी त्याची काय खुन्नस आहे माहित नाही पण आजतागायत तुतानखामेनने त्याचा पोपट केलाय. मला शिट्टी वाजवता येत नाही. उगीचच इकडून तिकडे गेले वारे टाईप शिट्टी वाजवली तरी तुतानखामेन वर येतो.’प्रिय’ला मात्र तो जाम दाद देत नाही.एकीकडे चुटकी वाजवली की दुसरीकडेच जातो.टँकमध्ये लाटा काय तयार होतील अशी शिट्टी वाजवली तरी ढिम्म एकाच जागी बसून राहतो.’मंदुडं सालं!’ असं करवादून ’प्रिय’ कंटाळून चालता झाला की तुतानखामेन मान झटकत मजेशीर एक्स्प्रेशन देतो.
कधीकधी मात्र जाम लहरीपणा करतो. खात नाही, पोहत नाही. झाडाचा आडोसा घेऊन पुढचे दोन पाय डोळ्यांवर घेऊन स्वस्थ पडून राहतो...दिवसेंदिवस! त्याचे आवडते लाल रंगाचे फ़िश-फ़ूडचे लाल दाणे, कोथिंबीर टाकली तरी त्याचा मूड सुधरत नाही. कुठं दुखतंय खुपतंय...तर ते ही कळत नाही. मला एकतर कासवाची भाषा पण येत नाही. त्याचं असं वागणं जीवाला लागून राहतं. माझा मूड बूटात गेलेला पाहून मग ’प्रिय’ कुठूनतरी एक व्हेट पैदा करतो. सगळे सोपस्कार होऊन तासाभरात तुतानखामेनने एक लॅप मारला की माझा सुधारलेला मूड बघून ’प्रिय’चा जीव भांडयात पडतो.
दोन महिन्यात तुतानखामेन एक इंच तरी वाढला असेल. वाढ्त्या वयाबरोबर त्याचे ’मी भी सजीला कुछ कम नाही ’म्हणत नखरे सुरु झालेत. एवढ्या लहान वयात हे उद्योग तर हा मोठेपणी काय करेल? असा प्रश्न मी हटकून ’प्रिय’ ला विचारते तेव्हा तो अस्पष्ट ’ढवळ्याशेजारी..’ असं काहीतरी बोलल्याचं ऐकू येतं पण ते मी सवयीने कानाआड करते.
वाढ होत असताना कासवाची कातडीही सापाने कात टाकल्यासारखी उलून निघते.तुतानखामेन मजेत सन-बाथ घेत फ़ेस-पॅक काढल्यासारखी कातडी पील-ऑफ़ करत बसलेला असतो. निकॉन घेऊन हवा करणारया ’प्रिय’च्या एखाद्या मित्राला ’तू भी क्या याद करेगा’ म्हणत पोझ-बिझ देत असतो.या सर्वामध्ये माझ्याकडे डोळे मिचकावून बघायला मात्र विसरत नाही.
माझ्या एक्स्ट्रा-ह्युमन सग्या सोयरयांची संख्या आता मोजण्यापलीकडे गेलीये. पुण्यात तर माणसांना माणसांशी सोंड सोडून बोलल्याशिवाय राहता येत नसल्याने मी या जगाच्या दृष्टीने मुक्या प्राण्यांशीच मैत्री केलीये. ’तुतानखामेन’ हे त्यातलं मजेशीर पर्व. ’प्रिय’ला काही तुतानखामेनचा सांभाळ जमत नाहीये. सारखा वसवस करत असतो. त्याला नाही झेपलं तर मीच तुतानखामेनला दत्तक घेणारेय. बघूयात!

माझी सुपरवायझरगिरी!

वर्षभर केलेला अभ्यास उत्तरपत्रिकेवर लिहीत असताना समोर उगीचच हवा करत बसलेला ’सुपरवायझर’ हा प्राणी मी अनेकवेळा बघितला. पण हा रोल मला करायला लागेल अशी सुतराम कल्पना मला तेव्हा नसली पाहिजे. बॉयफ़्रेंडबरोबर त्याची उगाचच पाचकळ बडबड करणारी बहीण कशी गळ्यात पाडून घ्यावी लागते तशीच आर्थिक स्वावलंबनासाठी पत्करलेल्या या नोकरीबरोबर हे सुपरवायझरगिरीचंही झेंगट माझ्या गळ्यात पडलं.

मे-जून हे आम्हा इंजिनीयरींगवाल्यांचे परीक्षांचे दिवस. बाकीचे जग जेव्हा सुट्टीवर असतं तेव्हा आम्ही पेपर वाटत तरी असतो किंवा तपासत तरी असतो.मुलांना शिकवणं हा एक इंट्रेस्टींग पार्ट तरी असतो पण पोरं पेपर कशी लिहीतात हे तीन तास नुसतं बघत बसायचं किती कंटाळवाणं काम असेल?पण वर्षाकाठी दोनदा एरंडेल प्यायला लागल्यासारखं वर्षात दोनदा कामाचा हा कंटाळवाणा भाग उरकावाच लागतो.

मला डयुटी मिळाली आणि मी उत्तरपत्रिकांचं बंडल घेऊन वर्गावर पोहोचले तरी वर्ग उघडलेला नसला की माझं टाळकं सरकतं.फ़ोनवरून माझी आणि खालच्या मजल्यांवरची गरमागरमी झाल्यावर मंद हालचाली करत एक शिपाई कुठूनतरी उगवतो आणि माझ्यावर कोटी कोटी उपकार केल्याच्या आविर्भावात मला वर्ग उघडून देतो.तोपर्यंत बाहेरच्या कॉरीडॉरमध्ये मुलांनी माज घातलेला असतो.एवढी सारी मुलं असतात पण अभ्यास पूर्ण झालाय आणि वर्ग उघडल्या उघडल्या आत येऊन शांतपणे बसलाय असा एकही मुलगा माझ्या या कॉलेजातल्या दोन वर्षातल्या कारकीर्दीत मला बघायला मिळालेला नाही. शेवटच्या सेकंदापर्यंत रिव्हीजन पूर्ण न व्हायला ही मुलं पूर्ण टर्मभर काय वडे वळत असतात की काय कोण जाणे?त्यांची वर्गात येण्याची लक्षणं दिसत नाही म्हटल्यावर आपल्यालाच सूत्रं हातात घेऊन त्यांना हल्या हल्या करत वर्गात घुसवावे लागते.त्यांना पेपर वाटणे, पेपरचे नंबर चुकीचे असतील तर ते परत घेऊन नवीन आणायला त्या सदम शिपायाला बाबापुता करून खाली पाठवणे, रोल नंबर कसे भरावेत याच्या सूचना देणे, हॉलतिकीट विसरल्याने रडून हलकल्लोळ घालणारया मुलीला शांत करणं, हॉलतिकीटाची नक्कल आणायला तिला खाली पाठवणं, कोणाकडे मोबाईल्स, कॅलक्युलेटर्सची कव्हरं नाहीत ना हे पाहणं,मुलांच्या वेंधळेपणाला सुगीचे दिवस आल्यासारखे बरयाच जणांनी रोल नंबर्स चुकीचे भरलेले असतात त्यांना दंड भरायला लावणे, तो दंड शिपायाकडे देऊन त्याची पावती बनवायला त्याला खाली पाठवणे ही कामं मला अवघ्या दहा मिनीटात आटपायची असतात.हे सगळे सोपस्कार आटपेपर्यंत मी बारा घरची धुणीभांडी केल्यासारखी थकून जाते.तोपर्यंत प्रश्नपत्रिका येतात आणि बेल वाजल्या वाजल्या पेपर हातात मिळेपर्यंत पळ अन पळ युगासारख्या भासणारया त्या पोरांना अजिबात निराश न करता ३० सेकंदांमध्ये त्या वाटायच्या असतात. कधी प्रश्नपत्रिका कमी पडतात, कधी चुकीच्या ब्रांचच्या प्रश्नपत्रिका येतात. मुलांची गडबड, त्यांचे प्रश्न, शंका निस्तरायच्या असतात.एव्हाना त्या सगळ्यांची उस्तवार करता करता मला मुलाबाळांच्या गराडयात बसलेल्या टेंपररी जिवतीसारख फ़ील यायला लागलेला असतो!मला इकडेतिकडे पळवून मुलांचं समाधान झालं की मुलं आपापल्या पेपर्सकडे वळतात आणि मी हुश्श करते. आता निदान ४५ मिनीट्स तरी ’मिस, सप्लीमेंट!’ ची आरोळी येईपर्यंत पोरांचा काही त्रास होणार नसतो.तोपर्यंत आमचे चीफ़ कंडक्टर आणि सिनीयर सुपरवायझर येऊन मुलांना त्याच त्याच धमक्या देऊन जातात. नाटकात जास्त स्कोप नसला की कसे तेच तेच संवाद पुन्हा पुन्हा येत जातात?चुकीच्या पात्राने नको तेव्हा एंट्री मारली की समोरचं पात्र कसं लोंबकळत "ऊमम न्य़ूम." करत राहतं?तशी काहीशी माझी अवस्था ह्या लोकांनी एंट्री मारल्यावर होऊन जाते. त्यांचं धमकी-सत्र पुरं होईपर्यंत काय करावं हे न सुचून मी उगाचच दीड पायावर झुलत बसलेले असते. एकदा का ही लोकं येऊन गेली की मी निवांत आपला पर्यवेक्षक-रिपोर्ट भरायला बसते.

इंजिनीयरींगच्या असाईनमेंटस लिहिल्यावर मान मोडून छापावं लागेल असा कुठलाही जॉब घ्यायचा नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. Now, Here I am! प्रत्येक ब्रांचचे ६ असे रिपोर्ट भरताना ’कुठल्या खातेरयात येऊन पडले मी?’ असा विचार येऊन भ्या करून टाळा दाखवत रडत बसावेसे वाटते.त्या हिडीस पिवळसर रंगाच्या शीट्स, कार्बनपेपरने काळेकुट्ट झालेले हात बघून माझाच मला उबग यायला लागतो.

एकदा का हे रिपोर्ट्स बनवून संपले की मी वर्गात गस्त घालायला मोकळी होते.ती पोरं बिचारी पेपर लिहीत असतात.त्यांना आमच्या’ मला तुझा इरादा माहित्येय हो..पण मी तो काही तडीस जाऊन देणार नाही’ या टाईपच्या ट्फ़ लुक्सशी काहीच घेणेदेणे नसते. दु:खद अपवाद अर्थात असतात.गस्त घातली काय किंवा त्यांच्यासमोर रामा डान्स केला काय,एकच गोष्ट असते.

माझ्यासमोर ४० मुलं पेपर लिहीत असतात आणि ४० जणांच्या ४० वेगवेगळ्या तर्हा असतात. कोणी हवेत हातवारे करून आकृती आठवत असतं, कोणाचा लिहीता लिहीता ओठांचा चंबू झालेला असतो, कोणी उत्तर आठवत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला असतो,तर कोणी पेपरकडे बघत ’शक’ शी साधर्म्य असणारा ’फ़’ने सुरु होणारा शब्द बारंवार उच्चारत असतो.कोणी सुटलेली ढेरी त्यामानाने छोट्या बेंचशी adjust करत असतं, कोणी दर दोन मिनीटांनी आपले पेन झाडत असतो, कोणी सारखा घाम पुसत असतो तर कोणी बॅक-अप म्हणून आणलेल्या बादलीभर पेनांची चाळवाचळव करत असतो.कोणी पठ्ठया अर्धा तास उशिरा उगवून वर माझेच पेन पेपर सोडवायला मागतो.शर्टाची वरची बटणे उघडी सोडून आपल्या केसाळ छातीचे प्रदर्शन करणारया मेकॅनिकलच्या पोराने मिकी माऊसचे लाल-पिवळे चित्र असलेली कंपास-बॉक्स आणलेली असते.ती ही डबल-डेकर!या सगळ्या वल्लींकडे बघून मला हसण्याचे उमाळ्यावर उमाळे येत असतात.मला हसताना पाहून आपली सुपरवायझर येडी आहे.बघावं तेव्हा हसत बसलेली असते म्हणून ती पोरंही एकमेकांकडे बघून खांदे उचकत असतात.

सुपरवायझर्स ना मिळणारया सोयी हा आमच्या कॉलेजमध्ये फ़ार दुर्लक्षित प्रकार आहे. आमचे पाय आम्हाला मिळणारया डयुटीबरोबर भाडयाने दिलेले आहेत आणि त्यांचं भाडं पुरतं वसूल करायचंय या आवेशात ही मंडळी आम्हाला ट्रीट करत असतात. तीन तास त्या खोलीत आम्ही गस्त घालत उभं रहावं, अजिबातच बसून नये अशा काहीशा अचाट अपेक्षा आमच्याकडून केल्या जातात.सुपरवायझरला बसायला खुर्ची नसते. मी ती भांडून मिळवते.प्रत्येक सुपरविजनपाठी मला ४० रुपये मिळतात. म्हणजे त्या वर्गात हजर असणारया प्रत्येक मुलापाठी १ किंवा सव्वा रुपया...दक्षिणेसारखा! ४० रुपयात काय आम्ही शहीद व्हावं असं यांना वाटतं की काय कोण जाणे?

सुपरवायझरला चहा मिळतो. How Lovely is that!पण दुपारच्या सेशनच्या डयुटीमध्ये म्हणजे ३ ते ६ मध्ये चहा ची गरज ही साडेचार-पाच ला असते. तर या लोकांचा चहा ३ला मी पेपर वाटले नाहीत की ३-०५ ला हजर असतो.How Inconveniently Efficient!

दीड तासाने मग येतो रिलीव्हर आणि त्या कोंडवाडयातून ’फ़क्त १० मिनीट’ अशी तंबी देऊन सुटका होते.’परसाकडे’ वगैरे लागली असेल तर ते सगळे आटपून काहीतरी च्याऊम्याऊ तोंडात कोंबून वर्गाकडे धाव घ्यावी लागते कारण ११ व्या मिनीटाला तुम्हाला शिव्यांचे धनी व्हायला लागते.वर्गात दाखल होईपर्यंत विद्यार्थ्यांनी पुरवण्या मागण्याचा सपाटा सुरु केलेला असतो.माझ्या मजल्यावरच्या त्या हतप्रभ, हतवीर्य शिपायांनी पुरवण्या आणेपर्यंत मुलांनी मला त्राही भगवान करून सोडलेले असते. पण कुठेही आवाज नसतो. यावेळी पास-आऊट होणारी बॅच आणि माझ्या वयामध्ये फ़क्त तीन बर्षाचा फ़रक आहे तरीही मुलं मला फ़ाट्यावर मारून न जुमानता हवं ते का करत नाहीत? सिरीयसली का घेतात? हा माझ्या कलीग्सचा शोधाचा आणि जलसीचा भाग आहे.मला नजरेची आणि आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे. त्यामुळे जरा कुठे संशयास्पद हालचाल झाली की नजरेने जरब बसवता येते. आणि आवाज वाढला की सातपट आवाज लावून झापलं की फ़रक पडलाच पाहिजे.मुलं पुरवण्यांवर पुरवण्या मागत असतात, मी तोल न ढळू देता ती मागणी बाहेरच्या शिपायाकडे फ़ॉरवर्ड करत असते. मुलांनी मागे-पुढे बघत उत्तरं टॅली करण्याचा प्रयत्नं सुरु केलेला असतो,तो हाणून पाडायचा असतो.डोके गमावलेल्या मुरारबाजींसारखी मी एकटीच सगळ्यांना तोंड देत उभी असते.आणि मग होते पेपर संपायला दहा मिनीट्स उरले हे सांगणारी बेल. आता शेवटचे दहा मिनीट्स तरी माझ्याकडे कोणीही पुरवणी मागणार नसते.पण माझी कामं कधी संपतच नाहीत. प्रत्येकाला पेपर लिहिण्याच्या समाधीतून बाहेर काढून पुरवणी बांधायला लावणे, पुरवण्यांचा आकडा लिहायला लावणे हे करवून घ्यायला लागते.आणि पेपर संपल्याची बेल होते. प्रत्येकाकडून पेपर जवळजवळ हिसकावून घेऊन ते मोजेपर्यंत वर्गात कुजबूज सुरु झालेली असते. क्वचित वेळी पेपर राहिला म्हणून एखादी रडत असते. उत्तर काय आलं म्हणूण एखाद्या स्कॉलर मुलाला सगळीकडून प्रश्नांचा भडीमार होत असतो, आपल्याला अचानक डिमांड आलेला पाहून तो भाव खात असतो, आपल्याला ४० मार्क तर मिळणार ह्याची खात्री पटल्याने एखादा मुलगा आनंदलेला असतो.किती संमिश्र भाव!मुलांचं भवितव्य असं हातात घेऊन जाताना वर्गात शेवटची नजर फ़िरते आणि खिडकीजवळच्या बेंचवर जिभेचे टोक नाकाला लावून पेपर लिहीणरी ३ वर्षापूर्वीची मीच मला दिसायला लागते.

मी ह्या नोकरीत कधीही रमले नाही. अशी नोकरी हे माझे ध्येयही नाही. पण काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतात तशी ही नोकरी. पुरेसं आर्थिक पाठबळ घेऊन आता मी ही नोकरी सोडणार आहे आणि अभ्यासाला दिल्लीला पळणार आहे. ह्या वेळची सुपरवायझरगिरी ही शेवटची म्हणून उल्लेखनीय, बाकी काही नाही.हातून घडलेली काही मुलं आणि नॉस्टॅल्जियाचे काही क्षण, एवढीच यातून कमाई!

रतिमग्न!

आमच्याकडे नुकताच केबलचं कनेक्शन घेतलं.
लहानपणापासूनच नॅशनलवरचे प्रोग्राम्स बघत वाढलेल्या आम्हाला खाट-खाट बटणं दाबत चॅनेल सर्फ़िंग करणं जामच मानवलं. आणि त्यातून आम्ही ’असली तसली’ चॅनेल्स बघणारयांतले नसल्याने डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफ़िक, ऍनिमल प्लॅनेट गेला बाजार कार्टून नेटवर्क अशी आलटून पालटून वर्णी असते.
मला दोन भावंडं. दोघांच्या तीन त~हा. कोणाला एक काहीतरी बघायचं असतं तेव्हा दुसरा काहीतरी वेगळंच बघायचं म्हणून तंटायला लागतो.
मी या भानगडीत सहसा पडत नाही.
परवा घरी कोणीच नव्हतं त्यामुळे रिमोटचा ताबा पूर्णपणे माझ्याकडे होता.

सर्वात पहिले अर्थात टॉम ऍंड जेरी! एक तास हसून हसून गुळी झाल्यावर डिस्कव्हरी लावलं.त्यावर सापांबदल डॉक्युमेंटरी होती. डिस्कव्हरीचे हे कॅमेरामन्स कुठे लपून बसतात काही कळत नाही पण त्यांनी आपल्या कॅमेरात अत्यंत विरळा, मनमुक्त सर्प-शृंगार पकडला होता.

रहस्यमय संगीताच्या सलामीवर दोन तीन झुडुपं असलेल्या रखरखीत भागात लिंबासारखी पिलळीधम्मक कांती असलेले दोन साप अचानक कुठूनतरी उगवले आणि एकमेकांना समांतर सरपटत कॅमेरयाच्या दिशेने यायला लागले. अधून मधून एकमेकांच्या अंगाला निसटता स्पर्श करत होते. कधी नुसती कुरवाळत होते, आलिंगन देत होते आणि नवलाची गोष्ट अशी की हे असं अंगाला अंग घासणं, कुरवाळणं ही त्या सापांची प्रणयचेष्टा आहे हे माझ्यापर्यंत स्वच्छ पोहोचत होतं.

हळूहळू त्यांच्यातलं अंतर कमी कमी व्हायला लागलं आणि मागे अरेबियन नाईटसच्या काळातला फ़ील देणारं संगीत एकदम धूसर धूसर होत गेलं.त्या सापांच्या हालचाली आता अर्धनिद्रितावस्थेत व्हाव्या तशा होऊ लागल्या.आता त्या दोन सापांनी एकमेकांना मिठी मारणं सुरु केलं. एकमेकांच्या शरीराचे रबरी विळखे एकमेकांना पडत होते, सुटत होते.विळखा सैल होतोय तर कधी करकचून एकमेकांना पिळून काढतोय.विळखा सुटतोय, सैल होतोय.सुटतोय, सैल होतोय.मधूनच एखादा साप उंच फ़डा काढत होता. पण हा फ़डा नेहमीसारखा आक्रमक नव्हता वाटत.त्याच्यात मदनाची मस्ती शिगोशिग भरलेली होती.त्यांच्या प्रत्येक हालचालीत उन्माद होता.खोलवर रुतून बसलेल्या दोन आठवणी असाव्यात आणि त्यांना एकमेकांपासून विलग करता येऊच नये अशा आठवणींसारखे ते धुंद साप एकमेकांपासून विलग करता येऊच नये इतक्या आवेगाने एकमेकांना बिलगत होते. तो आवेग, तो विखार, तो उन्माद शेवटी अशा एका उत्कर्ष-बिंदुला जाऊन पोहोचला की दोघांनी एकमेकाला करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी गाढ होती की त्या दोघा सर्पांचा मिळून एक सर्प झाला..इतका एकजीव. अनावर आवेगाने मोहरत तो काही काळ शेपटीवर उंचच उंच उभा राहिला आणि मग जमिनीवर कोसळत गडाबडा लोळायला लागला. त्या दोन्ही शेपट्या ताठरून वलवळत राहिल्या, ताठरत राहिल्या, झटके देत राहिल्या.

हा मनमोकळा शृंगार एकाच वेळी भयप्रद पण त्याच वेळी मंत्रमुग्ध करणारा होता.५-१० मिनीटांचाच काय तो विलक्षण थरार!पण खिळवून ठेवणारा.

माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीच्या शृंगाराच्या कल्पना या सगळ्या पुस्तकी असतात. थोडासा तळागाळातल्या लोकांशी संवाद असल्याने चाळीच्या एका खोलीत आई-वडीलांचा शृंगार नजरेस पडल्याने आयुष्य उध्वस्त झाल्याची उदाहरणं ऐकलेली, पाहीलेली आणि वाचलेली! अगदी लहानपणी आई घाईघाईत बदलून टाकलेल्या कुठल्यातरी एका चॅनेलवरचा काहीएक सेकंदांपुरता नजरेस पडलेला रेप जळत्या रेषांनी कोरला गेलेला.त्यामुळे ’शृंगार’ पाहणं ही अत्यंत स्फ़ोटक वस्तू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.मग तो माणसांचा असो वा प्राण्यांचा. दोघांमधली जवळीक हा अत्यंत खाजगी विषय असून तो पॉर्न किंवा ब्ल्यू फ़िल्म मधून चव्हाट्यावर आणणारयांचा मला राग आहे. आणि अशा फ़िल्मस पाहणारयांची, रस्त्यावरच्या कुत्र्यांचं झोंबणं मन लावून बघणारयांची मानसिकताही मला समजू शकत नाही.पण मी हा शॄंगार पाहिला.आणि काहीतरी अनैतिक बघितल्याची भावना नाही झाली. त्यांच्याबरोबरीने त्यांच्या थरारात मी बुडून गेले होते. कानशिलं सरसरून तापली होती. खुर्चीच्या हातांमध्ये हात गच्च रुतले होते.

माझ्या ओळखीतल्या अनेक आस्तिक किंवा गुरु केलेल्या लोकांकडून हा शृंगार पाहणं वर्ज्य असल्याचं आणि तो पाहणारयांना प्रायश्चित घ्यायला लागल्याच्या अनेक सुरस कथा मी ऐकल्या आहेत.मी हे ही ऐकलेय की हा शृंगार पाहायला मिळणं ही गोष्ट फ़ार विरळा!आणि आता एकदा पाहिल्यावर कोणाला बघायला मिळाल्यास चुकवू नये असाच.

मी खजुराहोची शिल्प जाणतेपणी पाहिलेली आहेत. त्या शिल्पांची ’नर-मादी मधला सेक्स’ अशी संभावना कोणीच करणार नाही.ती जोडपी एकमेकांत इतकी गुंगून गेलेली वाटतात, एकाच वेळी उन्मादक आणि काव्यमय की त्यांना ’रतिमग्न’ हा शब्दच चपखल बसतो!

त्या दोन सापांच्या मिलनाला सर्प-शृंगार हेही नाव देता आलं असतं पण..

मी..स्वप्नं आणि..ऑडीटी..!

"आज मला एक स्वप्न पडलं..त्यात ना..."
मला बाई दुसरयांची स्वप्नं ऐकायची जाम हौस..
आणि माझी ही किर्ती दिगंतात पसरली असल्यामुळे कुणाला काही विचित्र स्वप्न पडलं की तो "माऊ...You gotta hear this man!" म्हणत माझ्याकडे आलाच पाहिजे..
सगळ्यांचे पॅटर्न्स बहुधा सारखेच...
स्वप्नात कोणी मरतं तर कोणाला कोणीतरी दिसतो..कोणाचे विवाहबाह्य संबंध होतात (स्वप्नांमध्ये बरं का!)...तर कोणाला धनलाभ होतो...
तोचतोचपणा..
पण मला जशी स्वप्नं पडतात किंवा मी ज्या प्रकारची स्वप्नं पाहते तशी पाहणारं मला आजतागायत कोणीही भेटलेलं नाही..
आता ’प्रिय’चे उदाहरण घेऊ..
माझं अकलेचं डिपार्टमेंट कुठेतरी डागडुजीला दिलंय आणि ते माझ्यावतीने लीजवर दिल्यासारखा चालवतोय अशा आविर्भावात तो वावरतो..
त्यामुळे तो माझं कुठलंही बोलणं मनावर घेत नाही..जे घ्यायला हवं ते सुद्धा!
कधीकधी फ़ार वाटतं की आमच्यामधले हे वयाचे, प्रगल्भतेचे अंतर पार करून मी झटक्यात त्याच्या बरोबरीने यावं म्हणजे ऍटलीस्ट तो मला सिरीयसली तरी घेईल..
मी ३ वर्षांनी मोठी आणि (होपफ़ुली) मॅच्युअर होईन तेव्हा तोही तेवढ्याच चढत्या भाजणीत प्रगल्भ झालेला असणार...त्यामुळे ही परिस्थिती बदलणं संभव आहे असे मला वाटत नाही...
पण..
स्वप्नांमध्ये हे सहज शक्य असतं..
मी चेहरा लांब करून काहीतरी निर्वाणीचे बोलतेय आणि ’प्रिय’ ते अजिबात न हसता गंंभीरपणे ऐकून घेतोय..
मी त्याला ’हुंब कुठला’ म्हणते आणि मला जीव काढील असा चिमटा बसत नाही...
माझे जे काही वाईल्ड इमॅजिनेशन असेल..म्हणजे कानाची पाळी दुसरया कोणीतरी चावल्यानंतर नक्की काय होते?..वगैरे वगैरे.. ते ’प्रिय’च्या दाट भुवयांच्या वरच्या आणि खालच्या (डोळे आणि आठया) कुठल्याच गोष्टीला न जुमानता सांगते आणि त्यावर त्याचे कुचकट "कुठे शिकलात हे आपण?" ऐकायला मिळत नाही..
आहाहाहा...काय पण विशफ़ुल थिंकींग!
वास्तवात या गोष्टी किती अशक्यप्राय आहेत याची मला पुरेपूर कल्पना आहे..त्यामुळे माझ्या या इच्छा मी माझ्या स्वप्नांमध्ये पुरया करून घेते..
तर ही झाली बेसिक ओळख...
माझ्या स्वप्नांची महती इथवरच नाही संपत..
माझ्या स्वप्नांची वैशिष्ट्ये खालीलप्रकारे:
(१) मला स्वप्ने नुसतीच पडत नाहीत तर मला ती ’पाडताही’ येतात..
(२) रात्री ज्या विषयाचा विचार करत झोपेन त्या विषयाची स्वप्ने मला हटकून पडतात..
(३) सकाळी उठल्यानंतर मला ती तंतोतंत आठवतात..
(४) माझी स्वप्ने ३-D आणि इस्टमन-कलरमध्ये असतात..
(५) माझ्या स्वप्नांमध्ये परदेशातलं निसर्गसौंदर्य, सीन-सीनरी, कॉस्च्युम्स, साऊंड इफ़ेस्ट्स खच्चून भरलेले असतात..म्हणजे नुसतंच ब्लॅक बॅकग्राऊंडवर व्हाईट स्वप्न पडतंय (किंवा व्हाईटवर ब्लॅक), घासलेल्या रेकॉर्डसारखा किंवा बिघडलेल्या रेडीयो सारखा हिणकस आवाज येतोय असं मुळीच होत नाही..
(६) आता पडत असलेल्या स्वप्नात मी झोपलेले असून त्या स्वप्नातल्या झोपेत मला आणखी एक स्वप्न पडते आहे...मग त्या स्वप्नात आणखी एक स्वप्न ...अशी स्वप्नांची गुंतागुंत असूनही प्रत्येक स्वप्नात मी नक्की काय केलं हे मला नीट सांगता येतं...
वगैरे वगैरे वगैरे...
मला दिवसा कधीच झोप लागत नाही त्यामुळे रात्रीचा तो ७ तास झोपेचा काळ अगदी शो-टाईम असतो..
तुकडयातुकडयाने दिसणारया या स्वप्नांमध्ये मी आय.ए.एस ऑफ़िसर होऊन कुठेसं चांगलं काम करतेय..लोकं मला दुवा देतायेत..अशा आशयाचं स्वप्न हटकून असतं...जे आज ना उद्या सत्यात येणारच आहे..पण इतर तुकडयांमध्ये अतर्क्य तरीही मजेदार असं बरंच काही दिसतं..
म्हणजे मी अशी मांडा ठोकून, दूधात सर्फ़ एक्सेल घालून ढवळत बसलेय...त्यातून एक मोठा बुडबुडा निघतोय..मी त्या बुडबुडयात बसून मी थेट पुण्यात येऊन पोहोचते..सदाशिव पेठेतल्या ’प्रिय’च्या घरावर त्या बुडबुडयाला ब्रेक मारून ’प्रिय’ला फ़ोन लावते...
आणि माझ्याशी बोलताना तो एक्झॅक्टली किती वेळा डोळे कपाळात नेतो हे मोजून काढते..
???
कशाचाही कशाला संबंध नसतो आणि मी अचानक उडायला बिडायला लागून पुण्याला जाऊन पोहोचते..
किंवा मी गरूडाच्या नाकाला मन लावून सँड-पेपर घासतेय..आणि घासून झाल्यावर ’मी कसली जबरदस्त आहे’ अशा आविर्भावात मान वाकडी करकरून पाहतेय..
किंवा चिवित्रतेचा परमावधी... मागं पिसं लावलेल्या कोंबडीसारखा ’प्रिय’पाय उडवत नाचतोय..आणि त्यावर मी लाहीसारखी उडत खिदळतेय..
?
?
.
.
माझी स्वप्नं म्हणजे ’वसुधैव कुटुंबकम’चा आदर्श नमुना आहेत..ज्यांना कशाचे म्हणता वावडे नाही..
माझ्या स्वप्नांमध्ये बिल्डींगमध्ये शेपटी फ़िस्कारत फ़िरणारया काशीबाई, अभिषेक बच्चन, ’फ़ाईंडींग नेमो’ मधला नेमो, टॉम हँक्स, कुबड्या खवीस, किरण बेदी, सिंबा, मॉली आणि सॅम, तात्या विंचू, बालभारतीमधले अजबराव, श्यामची आई ...सगळे मिळून अगदी गुण्यागोविंदाने नांदत असतात..
म्हणजे स्वप्नातल्या स्टोरीपेक्षा साईड कास्टींग तगडी...
यातली नॉन-मराठी, अभारतीय पात्रं माझ्या स्वप्नांमध्ये एकदम फ़र्ड मराठी बोलतात..
माझ्या स्वप्नांमध्ये पाहुणे मंडळी सुद्धा चक्कर मारून जातात..म्हनजे कधीमधी रजनीकांत तर कधी टी.एन. शेषन...कधी झुंपा लाहिरी तर कधी गौरी देशपांडे...
नेमक्या सणाच्या दिवशीच बक्षिसीसाठी कचरा काढायचे केवळ नाटक करणारा बिल्डींगमधला कचरेवाला सुद्धा कधीमधी दिसतो..
कधीकधी रंगीत फ़ुलाफ़ुलांचा फ़्रॉक घातलेली तान्हुली ’प्रिय’च्या पोटावर पालथी पडून तोंडाने वेगवेगळे आवाज काढताना दिसते तर कधी तिच्याशी लाडेलाडे गिबरीश बोलणारा ’प्रिय’ दिसतो..
माझ्या स्वप्नांमध्ये माझे तिथे काहीही चाललेले असो मॉली आणि सॅमनी "I love you!","Ditto!"चं पालुपद लावलेलं असतं तर नीमोने काशीबाई आणि कुबडया खवीस बरोबर पकडापकडीचा डाव मांडलेला असतो..किरण बेदी तात्या विंचूला झाड-झाड झाडत असतात तर काशीबाई आणि सिंबा दोघेही मिळून अजबरावांवर उचकलेले असतात..
थोडक्यात सगळ्यांनी मिळून माझ्या स्वप्नामध्ये माज घातलेला असतो...
.
.
.
३ वर्षांपूर्वी माझ्या स्वप्नांना ’इतकी’ डायमेन्शन्स नव्हती..
इंजिनीअरींगच्या वर्षांमध्ये तर मी स्वप्नात माझी राहून गेलेली असाईनमेंट लिहून काढायचे आणि सकाळी उठून तिला तशीच अर्धवट पाहून दुप्पट थकून जायचे..
स्वप्नं तशीच रंगीत ...पण सगळी डल..
आता’ घोस्ट’मधल्या मॉलीसारखी मीही रात्र रात्र जागून( म्हणजे स्वप्नातल्या रात्रीत जागून) चित्रविचित्र आकाराची भांडी बनवते...’घोस्ट’मधल्या भांडी बनवण्याच्या प्रसंगानंतरच्या आफ़्टर-इफ़ेक्ट्सकट!
माझ्या स्वप्नांमध्ये जे रंग आहेत किंवा थोडंफ़ार वैविध्य आहे..फ़्रेशनेस आहे तो ’प्रिय’मुळे आहे...
मला ’ट्रॅजिक’ स्वप्नं कधीही पडत नाहीत..ते केवळ मी सदैव आनंदी असल्यामुळेच हे मी त्या स्वप्नांमध्येही विसरत नाही...
त्यामुळे माझी झोप ही ’प्रिय’ला ’चितळे’च्या काजू-कतलीचा १ किलोचा डब्बा देऊनच संपते...दररोज..
आणि या ’अशा’ स्वप्नांमुळे मी मलाच ऑड वाटायला लागते...
मला भेटलेल्या १० माणसांपैकी किमान दोघांना माझ्यासारखी स्वप्नं पडत असती तर एकवेळ ठिक होतं..
पण आजपावेतो कोणीही नाही भेटलेलं असं..
असो..माझं जगच छोटं असलं पाहिजे..
मग मला कुठे तरी वाचलेलं "मनात का आले, स्वैर स्वप्न काही..चित्त कोठे जाई-भटकाया" अशा आशयाचं काहीसं आठवतं..
बेदम हसायलाच येतं..

बडी देर भई..!

परवा आनंदी आणि सुब्रतोचा ब्रेक-अप झाला...ऑफ़ीशियली!!
२ वर्षापासूनचं लळत-लोंबत पडलेलं प्रकरण संपलं एकदाचं..आणि मला जी पाचर ठोकली गेली होती ती ही निघाली एकदाची!!
बेसिकली तिच्याहून परस्पर भिन्न अशा सुब्रतोमध्ये तिला काय आवडले कुणास ठाऊक???
म्हणजे त्याचे वाडगाभर भात आणि बरोबर माछेर जॉल फ़न्ना करणारे तोंड पाहून कोणाला काही रोमॅंटीक वाटण्याची सुतराम शक्यता नाही असे मला ठामपणे वाटायचे...पण या बयेला ते क्युट वाटले..
पाच पाच वाट्या दह्या खात ’मोई मिष्टी दोही’ आळवताना त्याचे डोळे लुकलुकायचे ते आवडायचे म्हणे तिला...मी म्हटले घंटा...!
आणखी काय बोलणार???
वेडाचार चालला होता दोन वर्षे..
सुब्रतो, मी, आनंदी आणि विशू ही आमची चौकडी बंगाली वर्गांमधली...
सुब्रतो आम्हाला बंगाली शिकवायला होता.
तसा तो साधारणच होता..टिपीकल बंगाली!!!
वंग पृथांनी...आयांनी..मावशांनी अतिशय लाडावून ठेवलेला पुरुष...ढेरी बाहेर आलेला..
पण त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी अतिशय विसंगत होते त्याचे डोळे..
काळेभोर...निर्व्याज तरीही कशाचा ठाव न लागू देणारे...बरंच काही होतं त्या डोळ्यांमध्ये..
गुरुदेवांच्या कविता त्याला मुखोद्गत होत्या...त्या बोलून दाखवताना त्याचे डोळे असे काही लक्खन तेजाळून उठायचे..
आनंदीला तो आनोंदी म्हणायचा...
विशू जाम वैतागायचा..म्हणायचा..."फ़ोफ़्शा...आणखी एकदा म्हणत तिला आनोंदी...नाही चार-पाच बुक्क्यांची नोंद तुझ्या दोंदीवर केली तर बघ.."
त्यावेळी हसून गुळी व्हायची..तो ही विशूच्या शालजोडीवर काही न कळून पोट गदगदवून हसायचा.
आमच्यात पहिला ताण आला ते आनंदीने ती सुब्रतोच्या प्रेमात पडलीये हे आमच्याकडे जाहीर केलं तेव्हापासून..आम्ही मुळासकट हादरलो...
कुठे आनंदी आणि कुठे सुब्रतो...दोन टोकाची माणसं..
आनंदीसारखी प्रगल्भ आणि स्मार्ट मुलगी गीतांजली पाठ असणं आणि काळेभोर डोळे एवढी पुंजी असलेल्या माणसाच्या प्रेमात पडू शकते हा एक नवीनच साक्षात्कार आम्हाला झाला..
ऑफ़ ऑल द पीपल इन द वर्ल्ड...सुब्रतो???
काय म्हणणार??
आता नातं कधीतरी तुटणारच आहे म्हणून जीव लावायचाच नाही ही लॉजिक कुठल्या हजामाचं आहे??
कुठल्याच हजामाचं नाही...कारण ते सुब्रतोचं मत होतं....
त्याचा म्हणे अशा नात्यांवर विश्वास नव्ह्ता..कुठलंही नातं काहीतरी मोटीव्हनेच जोडलेलं असतं असा त्याचा ठाम विश्वास होता..आणि या कार्टीला तेच ’तीव्र असे काही जीवघेणे’ वाटलं...
ती आपली त्याच्यात वेडीवाकडी गुंतत गेली..
मी बदलायला लावेन त्याला...असं आम्हाला ठणकाऊन सांगत!
वर्षानुवर्षे मनाशी धरून ठेवलेले समज असे थोडीच ना दूर करता येतात वेडे??
म्हटलं ठिक आहे..
सुब्रतो आणि आनंदीचं काही जमण्यासारखं नाही हे आम्हाला आमच्या पहिल्या मीट मध्येच कळले..
’कोबे सिझलर्स’ मध्ये सुब्रतोने पूर्ण टेबलवर सांडवलेलं उष्टं...तोंडाने येणारा मच्याक मच्याक आवाज..तोंडातला पुरता घास न संपवता तोंडातली शितं उडवत बोलणारा सुब्रतो जाम गिळगिळीत वाटला होता...टिप-टॉप महाराणीसारख्या राहणारया आनंदीपुढे तर फ़ारच...
पण सुब्रतो मुळे ओशाळून येवढुश्शी झालेली आनंदी आम्हाला बिलकुल ओळखीची नव्हती...
हे तिनं कसंतरी पचवून घेतलं असावं..
तिला त्याच्यात नेमकं काय आवडलं हेच तिला डिफ़ाईन करता येत नसावं असं बरयाच वेळा वाटायचं..
तिला एका इंपल्समध्ये काहीतरी आवडून गेलं असावं कदाचित...पण ते ’काहीतरी’ नंतर तिला कधीच सापडलं नाही..
तिने ते शोधायचा खूप प्रयत्न केला...नंतर सरधोपट मार्ग स्वीकारला..
रोमॅंटीक बोलणं तर सोडाच त्याला साधं आनंदी खुलेल असंही बोलता यायचं नाही..
आता असतात अशी माणसं...त्यात काही गैर नाही..पण नेमका तसाच मनुष्य अतिशय रसिक, रोमॅंटीक अशा आनंदीला मिळावा???अह...तो तिने पसंत करावा???
त्याला कधी फ़रक पडायचाच नव्हता पण तिचं चुरमडत जाणं आम्ही दिवसांगणिक पाहत होतो...तिचा आऊट झालेला चेहरा बघून कधी कधी माझं तोंड शिवशिवायचं..पोटात तुटायचं..पण विशूने नेहमी अडवून धरलं..."शी शूड लर्न हर ओन लेसन.."
"मी असाच आहे तुला माहीत होतं..""
"मी नव्हतं सांगीतलं माझ्यावर प्रेम कर म्हणून..आय वॉर्नड यू बीफ़ोर"
"मला एकटं रहायची सवय झालीये आनंदी...माझी मनाची तयारी तीच आहे...व्हाय डू यू वेस्ट युअर टाईम ऍंड माईन टू?"
अशा प्रकारची वाक्यं त्याच्या बोलण्यात वारंवार यायला लागली.
तिला त्याच्यात जे काही आवडले त्यासाठी तिने मनापासून सर्वकाही केले..शेवटी ती एक मनस्वी मुलगी होती...
पण परतून त्याच्याकडून काहीच आले नाही तेव्हा मात्र ती शहाणी झाली..
दोन वर्षाच्या दु:स्वप्नातून एकदाची पडली बाहेर...तिच्याबरोबर मी पण!
आनंदीसारख्या बरयाच मुली असतात ज्या इंपल्सवर जगतात..त्या इंपल्सशी इमान राखत आयुष्यभर झगडत राहतात...त्यांची अर्धी शक्ती जाते झगडण्यात आणि अर्धी स्वत:ला वेडं होण्यापासून वाचवण्यात...
आनंदीसारख्या फ़ार कमी नशिबवान मुली असतात ज्यांना ह्या प्रकारात राम नाही हे तुलनेत फ़ार लवकर कळतं..
मलाही कधीकधी असं वाटतं की हे इंपल्सवर जगणं बिगणं हा शुद्ध येड**पणा आहे...
"मला इंपल्सवर जगणारी माणसं आवडतात" माय बट्ट...!
असं बोलणारा मनुष्य केवळ व.पुं.च्या कथेत भेटतो...आणि हे किती पुस्तकी आहे हे प्रकर्षाने तेव्हाच जाणवतं..
कारण जेव्हा आपल्यासमोर आनंदीसारखं, स्वत:सारखं जितंजागतं उदाहरण असतं तेव्हा ह्या गोष्टी हवा वाटतात..
"मला वाटलं ते मी केलं...मला त्याचे रिग्रेट्स नाहीत...उद्या मी मनाविरुद्ध जगले असं नको वाटायला" हा डायलॉग ’जब वी मेट’ मध्ये कसला भारी वाटतो ना?
रील लाईफ़ सोडून रियल मध्ये आलं की oh please...give me a break!
स्वत:ला सतत तपासत राहिलं पाहिजे...निर्णय जोखून पाहिले पाहिजेत..
क्षणिक उर्मीत मोठे निर्णय घ्यावेसे वाटले..किती अवास्तव आहेत याचा विचार केला पाहिजे..
नाहीतर..
देर भई..बडी देर भई..!

अगं अगं बशी...!!

दर शनिवारी मी बशीत बसून मुंबैला येते..
आजवर मी अनेक प्रकारच्या बशींमधून प्रवास केला..एस.टी(लाल डब्बा म्हटलं तर हल्ली एस.टी वाल्याना राग येतो असं ऐकलं!!), एशियाड, सेमी-डीलक्स, स्लीपर कोच, व्हिडीयो कोच, ए.सी, नॉन -एसी ....यू नेम इट!
पण दर शनिवारी घडणारा ’शिवनेरी’चा प्रवास मला मनापासून आवडतो..!!
एरव्ही एशियाड स्टॅंड्च्या बाहेर रिक्शाने उतरलं की रिक्शावाल्याशी हुज्जत घालून होत नाही तोवरच नीता ट्रॅव्ह्लस, मेट्रो बस, स्वप्नदर्शन तत्सम नावाच्या बसकंपन्यांचे एजंन्ट्स अंगावर चाल करून येतात..पण ती नामुष्की माझ्यावर सहसा येत नाही कारण माझं तिकीट ’प्रिय’ने आधीच रिझर्व्ह केलेलं असतं आणि तो मला गाडीने सोडायला आलेला असतो..
’प्रिय’ची प्रचंड बोंब ठोकत येणारी चेतक, पिलीयनवर त्याहून जास्त कलकलाट करणारी मी आणि मी काय बोलतेय यातलं एक अक्षर जरी कळलेलं नसलं तरी दर २ मिनीटाला मुंडी हलवणारा ’प्रिय’ अशी आमची वरात एशियाड स्टॅंड वर आली की "कोण आलं ते??" अशा आविर्भावात स्टँडवरच्या निम्म्या नजरा आमच्याकडे कुतुहलाने वळतात..
आणि..
घनघोर गवतात एखादी छोटीशी मुळी उगवावी तशी मी ’प्रिय’च्या मागून अवतरलेली पाहून बरयाच जणांच्या चेहरयावर हसू फ़ुटतं..
एवढंच पुरेसं नाही तर त्या दोन बाय दोन अंगुळे साईझच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात मग्न असलेला पेप्सीकोलाच्या साईझचा माणूसही आमच्याकडे नजर टाकून घेतो...
बसमध्ये चार तास निवांत मिळतात म्हणून मी करायला कामाची जंत्रीच आणलेली असते...त्यामध्ये राहून गेलेले वाचन, कवितांचे ड्राफ़्ट्स सुरेख उतरवून काढणे..’आज तू कसा चुकलास??’ हे १२ साईझचा एसेमेस लिहून ’प्रिय’ला पाठवणे अशी वरीच कामे येतात...
वाचनात पु.ल, चि.विं वगैरे असेल तर मी माझं नेहमीचं होहो हुई करत खिदळखोबरीसारखी खिदळते (तोंडावर हात ठेवून लाजरं हसणं बिसणं बात आमच्यात नाही)..त्यामुळे बसमध्ये काहीतरी विनोदी वाचायचा माझा बेत आहे हे ’प्रिय’च्या लक्षात आलं की तो ’आमेन!’(माझ्या सहप्रवाशांसाठी) म्हणूनच मला बसमध्ये पाठवतो...
तिकीट घेऊन शिवनेरीत शिरत नाही तोच लक्षात येतं की झाडून सगळ्यांची नाकं ऑलरेडी कपाळावर गेलेली आहेत..
उजवीकडे ’I Suffer From CRS (Cant Remember Shit!)' तत्सम अर्थाचा शर्ट घातलेली बोजी...डावीकडे टाईम्स लावून लावून वाचणारा बोजा...टिपीकल पब्लिक...
अरे यांना कोणीतरी असांगा रे...शिवनेरीत मराठीचे वावडे नाही म्हणून!!!
कोणाच्याही हातात संध्यानंद, सामना तर म्हणतच नाही मी पण गेलाबाजार सकाळही दिसत नाही..
शिवनेरीच्या एसी मध्ये आल्यवार टाईमपासच्या कल्पना पण ’शीतकटबंधीय’ होतात की कय कोण जाणे???
मी पुढच्या वेळी ’द फ़ाऊंटनहेड’ वाचायला आणणार आहे.. आणि केवळ हातातलं पुस्तक हिंग्लीश आहे म्हणून आपण आहोत त्यापेक्षा जगाला कितपत वेगळे दिसू शकतो हे बघणार आहे...
माझ्या जागेपाशी येऊन ’प्रिय’ च्या उर्ध्व लागलेल्या डोळ्यांची तमा न बाळगता मी माझ्या शेजारयाला न्याहाळून घेते...आणि मगच आपल्या सीट्वर जाऊन बसते..
शिवनेरीची सीट ही माझ्याकरता एक डोकेदुखी आहे...
सीटवर मागे डोके ठेवायच्या जागी सतत डोकं ठेवून पडलेला एक काळा डागवाला खळगा असतो..
कधी पूर्ण रिकाम्या शिवनेरीत जाऊन बघा...सगळ्या सीट्स काळा मळवट भरलेल्या निळ्या बायांप्रमाणे दिसतात...
पण हे प्रकरण फ़क्त दिसण्यापुरतं बरंय...कारण भडभडून येण्याइतपत फ़्लेवरचा वास या मळवटांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे शक्यतो त्या काळ्या मळवटापासून ६ इंच खाली डोकं ठेवून त्याखाली आपलं धड ऍडजस्ट करून उरलेल्या जागेत पाय ठेवू म्हटले तर ठेवावेत तरी कुठे?? या विवंचनेत ’पोझिशन’ ऍडजस्ट करेपर्यंत औंध येतं..
आजपावेतो माझ्या शेजारी कोणीही बेबी/बाबी लोकं आलेली नाहीत नेहमी आलीत ती बाबा/बाप्पू लोक...
बाबा आला की सामान ठेवण्याच्या बहाण्याने आपल्या बाजूची स्त्रीलिंगी वस्तू कशी आहे हे डोळ्याच्या कोपरयातून बघून घेतो...
डुईपासून सुरुवात करताना माझ्या बॉयकटपाशीच त्याचा उत्साह निम्मा झालेला असतो अणि पायातल्या कॅन्हासच्या शूजपाशी शक्तिपात..!
त्यामुळेच माझ्या शेजारचे बाबा लोक निव्वळ झोपा काढत असावेत बहुतेक!!!
पण मी?
मला असले डोळ्याचे व्यायाम बिलकुल जमत नाहीत..
मायला...ताकाला जाऊन भांडं लपवायचंच कशाला म्हणते मी...
मी त्याला सीध्ध्धा न्याहाळून घेते...
बरा वाटला तर ’प्रिय’ ला फ़ोन करून पकवायला आयताच एक विषय ...नाही बरा...Who Cares???
माझ्याबाजूला आलेला बाबा ’खूबसुरती बाहरी नही, अन्धरूनी होती है’ अशा टाईपचा उदारमतवादी जरी असेल तरी औंधपर्यंत माझे ऍक्रोबॅटस बघून शरणचिट्ठी देतो आणि सरळ झोपी जातो...
"कसली खसखस चालवलेये कार्टीने??डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!!!"हे सायलंट...मनातल्या मनात..!!
छान स्थिरस्थावर होऊन मी माझ्या आवडीचं काही करायला घेतेय तोच तो फ़ुड-मॉल येतो..आणि पुण्यात सगळ्या दुकान-हॉटेलांचा हरताळ असल्यासारखं सगळं पब्लिक ते भयंकर महागडं खाणं खायला बाहेर पळतं...
आता मै और मेरी तनहाई???
अहं..
बसमधल्या एकांताचा फ़ायदा घ्यायला एखददुसरं जोडपं रेंगाळलेलं असतंच..
दोन सीट मधल्या फ़टीतून मला सग्गळं दिसत असतं...पण त्यांना मी तिथे आहे याची जाम खबर लगत नाही..
पण माझा मूड बूटात असेल तर अचानक त्यांच्यापुढे उगवून त्यांची गाळण उडवण्याचं धक्कातंत्र जरूर अवलंबते..
मग हडबडलेला मुलगा मुलीला म्हणतो..."चल...लेट्स ईट आऊट!!"
ऑमॉला सग्गळं ठाऊक्काय...लब्बॉड..!!!Lets eat out म्हणे....
१० मिनीटाने सगळे परतले की त्या काचबंद शिवनेरीत भयंकर दर्प दरवळायला लागलेला असतो...
माझ्यावर सूड उगवायचा म्हणून माझा शेजारी फ़ुडमॉलवरच्या फ़ोडणीच्या पातेल्यात जाऊन बसल्यासारखा घमघमत असतो...मागच्या सीट्वाल्याने तोंडाची गिरणी चालू केलेली असते आणि गिरनीतून मच्याक मच्याक आवाज यायला सुरुवात झालेली असते...
माझं डोकं अचानक खूप भणभणायला लागतं..
त्यामुळे घाट येईस्तो मी डोक्यावर शाल ओढून घेऊन, कानात ’टेंपरेचर’ फ़ुल ऑन ठेऊन गपचिप पडून राहते...
थोडया वेळाने एसीच्या थंड वारयाने तो वास ’बसला’ की मी डोकं बाहेर काढून पुन्हा पोझिशन, चुळबुळ इ. च्या मागे लागते...
"कसली खुड्बुड चालवलेये कार्टीने??डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!!!"यावेळी मात्र चेहरयावर हिंसक भाव!!!
अशारितीने पनवेल येता येता पुस्तकाची २० पाने वाचून होतात न होतात तोच आलेल्या ढेकरामुळे आज फ़ुडमॉलवाल्याने पावभाजीत चमचाभर बटर जास्तच दिलं हे ड्रायव्हरच्या लक्षात येतं आणि त्या आनंदात तो आम्हा सगळ्यांना कंपल्सरी ’यफ़.यम’ ऐकायला लावतो...शिंची कट्कट...!!
आता हातातलं पुस्तक गुमान आत ठेवायचं आणि बाहेरची गंमत (?) बघत बसायचं...
पण त्यातही नंतर गंमत वाटायला लागते...
खारघरचा फ़्लाय-ओव्हर ओलांडेपर्यंत बसमध्ये उठा-उठा सकळीक झालेलं असतं...
माझ्या सीट वर अनैसर्गिक स्वस्थता बघून बाजूचं पब्लिक अंधारात हातोहात बदललं की काय हे डोळे फ़ाड्फ़ाडून बघायचा प्रयत्न माझा शेजारी करत असतो...
पण तेवढ्यात चुनाभट्टी येतं आणि चुनाभट्टी आल्यावर नेहमी लागणारं हिमेशचं ’हरी आऊम..हरी आउम...हरी ओआऊऊम’ लागतं आणि मी ’खिक’ करून दात काढते....
फ़ुस्स...आपल्याबाजूची पार्टी तीच आहे ,काही अंधारात बदलली बिदलली नाहीये हे शेजारयाच्या लक्षात येतं..आणि तो लक्षात येण्याइतका हिरमुसुन बळंच पलीकडच्या खिडकीतून बाहेर पाहायला लागतो...गेला टिपरीत!!
सायन च्या ट्रॅफ़िक्मध्ये कारमधल्या, बसमधल्या छोट्या पोरांना चिडवत, डोळे काढून घाबरवत वेळ जरा बरा जातो..
मग येतंच दादर..
दादरला आल्यावर मात्र पुण्याच्या हवेने सुस्त झालेली, ’प्रिय’च्या लाडांनी हुळहुळी झालेली माझ्यातली मुंबईकरीण खाडकन जागी होते...आणि कशीही करून ८-५६ मिळालीच पाहिजे..जय महाराष्ट्र!!! अशी बोंब ठोकत रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावते..
शिवनेरीतून उतरते ते पुढच्या शनिवारी भेटण्याच्या वायद्यानेच!!!
’शिवनेरी’ही मग मोठ्याने भूश्श आवाज काढत मला ’सीया!’ म्हणते..

अपरिहार्य कारणास्तव...

२९ तारखेला वर्ग सुरु करण्याआधी सर एकच वाक्य बोलले...
"तुम्ही पास होणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला एव्हाना कळलं असेल.."
यु.पी.एस.सी च्या तयारी वर्गातली आम्ही पन्नास एक मुलं-मुली सुन्न बसलो होतो...
करकरे सर, कामते सर यांच्या मृत्युच्या धक्क्यातून आम्ही अजून सावरलेलो नव्हतो..
आपल्याला पोस्ट मिळाल्यावर आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचाच विचार त्या वर्गातला बहुधा प्रत्येकजण करत होता..
’टॉक लेस..ऍक्ट मोअर’ हे ब्रीदवाक्य असणारे आम्ही २ मिनीटे श्रद्धांजली वाहून अभ्यासाला सुरुवात करतो...
जे घडतंय त्याला आपण बदलवू शकत नसू तर त्याबाबतीत वाचाळायची काहीही गरज नाही...हा घालून दिलेला नियम आम्ही तंतोतंत पाळतो..
पण त्याने विचार करणं थोडीच बंद होतं...???
काही उमटणं थोडीच कमी होतं..??
गेलेली माणसं परत थोडीच येतात..???
मनाचा धडा करून कणकण मरत जगणं थोडीच कमी होतं???
लॉलीपॉप सारखी हातात एके-४७ नाचवत एक भिकारचोट कसाब येतो...बंदुकीची एक अंदाधुंद फ़ैर झाडतो...एक बुलेट आपल्या दिशेने येते...बास्स...
जस्ट लाईक दॅट..काही सेकंदाचा अवधी आणि ब्लॅक-आऊट..
आपणही त्या जागी असलो असतो या विचाराने मन थरकापतं..
मरण इतकं स्वस्त असतं..???
विचाराने भोवंडायला होतं, आणि मग कोणालातरी विचारलं जातं...
हे असं का???त्यांच्याबाबतीतच का???
याच्यावर मला त्याहून होपलेस उत्तरं मिळतात..
"आपल्या हातात काय आहे...आपण काय करणार त्याला??"
"झालं ते घडून गेलं..त्यांची वेळ आली होती असं समजायचं आणि यापुढे सजग राहायचं"
"शो मस्ट गो ऑन"
म्हणजे हे सगळं असंच घडायचं होतं...त्या लोकांना जायचंच होतं..??
आपली वेळ आली नव्हती बहुधा..म्हणून वाचलो..
किती सोयिस्कर स्पष्टीकरण...! का मनाची घातलेली समजूत???
मग त्या कर्त्याकरवित्याला अशीच मेहेरनजर ठेवायला सांगून पुढच्याच क्षणापासून निर्विकार होऊन जीवन कंठायचं...
हे इतकं सोप्पं असतं???
नियतीनुसार असंच घडणार होतं तर नियती,प्राक्तन वगैरे वर विश्वास ठेवणारयांना असं नाही वाटलं के नियती जरा जास्तच पार्शालिटी करतेय??
एका धक्क्यातून सावरतो नाही आहोत तर कुचकटपणे दुसरा धक्का देतेय..??
असे आणखी किती धक्के पचवायचे आहेत कुणास ठाऊक??
आणि असं काही घडलं की मग ज्वलंत वगैरे कवितांना अगदी सुगीचे दिवस येतात..
याच काळात मी एका ब्लॉगवर अकलेचे तारे तोडलेले पाहिले...
लेखक म्हणतो.."बरं झालं...हेमंत करकरेंना गोळी लागली...त्यामुळे आता पोलिसांना अद्ययावत बुलेट्प्रुफ़ जॅकेट्स मिळतील.."
मला अगदीच मान्य आहे की लेखकाने ते भावनेच्या भरात लिहीलं होतं पण इतकं बेजबाबदार विधान करण्याचा आपल्याला कितीसा हक्क पोहोचतो???
आपण फ़ील्ड वर होतो..??? नाही...
अतिरेक्यांशी आपण लढलो??? नाही...
पुरेसं संरक्षणही नसताना आतल्या ओलिसांसाठी स्वत:चे कुटुंब, आयुष्य ऐरणीवर ठेवून आपण जीवाची बाजी लावली?? नाही...
आपण टॅक्स भरला किंवा ह्या देशाचा नागरीक असल्याची किमान कर्तव्ये केली की वाट्टेल ते बडबडायचा अधिकार मिळतो की काय कोण जाणे???
हा काय कुठला यज्ञ वगैरे आहे का???आधी बळी द्या मग मी तुम्हाला बुलेटप्रूफ़ जॅकेट्स देतो..
आणि त्या होमकुंडात मग करकरे सर, कामते सरांसारख्या ऑफ़िसर्सचा बळी द्यायचा...
आणि आपण काय करतो???फ़क्त चर्चा करतो..
चर्चा करून तोंड दुखले की चॅनेलवरच्या लाईव्ह टेलिकास्टला मुंगळ्यासारखे चिकटून बसतो..
आणि याबाबत छेडले की म्हणतो.."आपण काय करणार?"
आपण ज्या सिस्टीमला कोसतोय...जिच्या नावाने आता ठो ठो बोंबलतोय..त्या सिस्टीमचा एक भाग होऊन बदल घडवून आणायची किती लोकांची तयारी आहे???
पोलिसांना बुलेटप्रूफ़ जॅकेटसही न पुरवता त्यांना एके-४७चा सामना करायला लावणारया मठ्ठ, कोडग्या सरकारला धडा कोण शिकवणारेय??
भ्रष्ट, किडलेल्या नोकरशाहीला बदलवण्याची जबाबदारी कोणाची??
अर्थातच आपली...
जनतेची..तरुण आणि तरुणींची...
पण आपण ते करणार नाही...
आपल्याला काय ..छोटीशी गाजरंही पुरेशी असतात...
कालच पेट्रोल आणि डीझेल चे भाव कमी केले...पुढल्या दोन महिन्यात सोयी-सुविधांचा पाऊस पडेल...मग आपण त्यापायी २६/११, लोकल बॉम्बिंग सगळं सगळं विसरून जाऊ..
आपण कसं मरावं हे सरकार ठरवत आलं होतं आणि यापुढेही सरकारच ठरवेल..
एखाद्या वेश्येला गिर्हाईकाने नुसता हात लावायचा का आणखी काय करायचं हे तिचा दलाल ठरवतो ना...अगदी तसंच..
जुलैच्या बॉंम्बस्फ़ोटांमध्ये दोन दिवस डोळ्याचं पाणी खळलं नव्हतं..
खैरलांजीचा एफ़.आय.आर वाचताना कानात दडे बसले होते...हातापायांना कंप सुटला होता..
नुसतं काहीतरी वाटतं आपल्याला...दोन टिपं गाळतो आपण.. चुकचुकतो.. हळहळतो..मग तीच कहाणी मागच्या पानावरून पुढे चालू...
पण..
जे घडलं ते पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्यास आपण लायक आहोत का??हे पहावं आधी..
नसलो तर या परिस्थितीत कशाही आणि कोणत्याही प्रकारे बदल घडवण्याची ताकद प्रथम आपल्यात निर्माण करावी..
पण नुसतं संवेदनशील होऊन काय फ़ायदा???
आणि प्लीज..
झाले खुट्ट की केली कविता...झालं खुट्ट की लिहिलं झणझणीत...असं केलं की आपण भारी संवेदनशील असं वाटतं का लोकांना..???
बरं..आपल्याच्याने काही होत नसेल तर जे करतायेत त्यांनातरी ते करू द्यावं...
ताज आणि ओबेरॉयच्या परिसरात फ़ायरींग चालू असताना लोक पिक्चरचं शूटींग पाहायला जमावीत तशी जमली होती...हॉटेल मधून एखादी फ़ैर झाडली गेली की मूर्खासारखी खिदळत आणि टाळ्या वाजवत होती..
कसाबचा एखादा भाऊ तिकडे टपकला असता तर किती कॅजुअल्टी झाली असती हे या बिनडोक लोकांना का कळत नाही???
जिकडे जमायला नको तिकडे ही माणसे बरोबर जमतात...
जमली तर जमली..जे करायला नको ते करतात...
मग अशा मूर्ख लोकांचे फ़ोटो घेऊन त्या फ़ोटोच्या ढुंगणाखाली ’मुंबईकरांचे स्पिरीट’ लिहून वर्तमानपत्रे आपला खप वाढवतात..
निष्कर्ष काय???फ़क्त नोकरशाही आणि सरकारच नाही...तर लोकांची कोडगी मानसिकताही बदलवण्याची गरज आहे..
अशा मूर्ख लोकांवर राज्य करणं राज्यकर्त्यांच्या हातचा मळ का नाही असणार???
हे खूप फ़िल्मीस्टिक वाटेल...पण ’रंग दे बसंती’ मध्ये नेमक्या प्रश्नावर बोट ठेवलं गेलं होतं..
करण, अस्लम च्या पात्रांमधून "जिस दिन ग्रॅज्युएशन हुआ..मै तो कट लूंगा अमेरिका...मेरा यहा कुछ होनेवाला नही.." म्हणणारया आजच्या तरूण पिढीची मानसिकता दाखवली गेली होती..
"कोई भी देश बेहतर नहीं होता...उसे बेहतर बनाना पडता है" म्हणणारा फ़्लाईट लेफ़्टनंट अजय असाच एक आशेचा किरण..
आपल्या सुरक्षित जगांमध्ये राहून ..एखाद्या गोष्टीवर लिहून अथवा बोलून बदल घडवता येतो हा समज साफ़ चुकीचा आहे..
आणि बदल घडवण्याची जिद्द न बाळगणं हा अक्षम्य गुन्हा...!!
(टाईमपास साठी जे पब्लिक अशा विषयांना हात घालतं त्यांनी माफ़ करावं..ही ऊरस्फ़ोड तुमच्याकरता नाही..)
२६ ला जे काही झालं त्यावर लिहायचं नाही...कितीही वाटलं तरी...हे ठरवलं होतं...आतपर्यंत पाळलंही..
पण आज माझ्याच मागच्या पोस्टस वाचताना मला खूप थिल्लर..चीप वाटायला लागले...
मी...माझ्याभोवती विणून घेतलेले एक जग...माझी ध्येयं...माझा अभ्यास...’प्रिय’...किती कोझी...किती उबदार..!!
हे जपलेलं जग किती सहज तडकणारं आहे याची जाणीव झाली..
ह्या विषयावर आतापर्यंत लिहिल्या/वाचल्या गेलेल्या काही अपरिपक्व लिखाणाने संताप संताप झाला..
म्हणून..

नार्सिसस आणि न संपणारी प्रश्नावळ...!

फ़ार फ़ार वर्षापूर्वी ’नार्सिसस’ नावाचा एक खूप देखणा तरूण होता..
’एको’ नावाच्या प्रतिध्वनीच्या देवतेचे प्रेम झिडकारल्यामुळे ’नेमेसिस’ हया सूडाच्या दे्वतेने त्याला स्वत:च्या प्रतिबिंबवर प्रेम करायला लावलं...
तळ्यातल्या पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबावर प्रेम करत नार्सिसस झुरुन झुरुन मरण पावला..
तो मेल्यानंतर ते गोडया पाण्याचं तळं रडून रडून खारट झालं..
कोणीतरी त्याला विचारलं की तू नार्सिसस गेल्यामुळे रडत आहेस का?
त्यावर तळ्याने विचारलं..."कोण नार्सिसस???"
"इथे रोज एक तरूण यायचा...त्याच्या डोळ्यात मला माझं सौंदर्य दिसायचं...हल्ली तो येत नाही म्हणून मी दु:खात चूर आहे"

स्वत:वर प्रेम करणारं, एखाद्या गोष्टीकडे आपल्या दृष्टीकोनातून बघणारं तळं हे सर्व चराचरांचं प्रतिनिधीत्व करतं...
’स्व’, ’मी’, ’माझं’ अनादीअनंतकालापासून चालत आलेले असताना ’अहं’चा त्याग करा...’मी’ पणा सोडा हेच आपल्यावर का बिंबवलं जातं???
ज्या नार्सिससमुळे ’स्वत:वरच्या आत्यंतिक प्रेमाला’ ’नार्सिसिझम’ म्हटले जाते त्या नार्सिससची संभावना वेड्यात का केली गेली???
स्वत:वर प्रेम करणं आपल्याकडे एवढं निषिद्ध का मानलं गेलेय??
"सर्वी सर्व सुख / अहं तेचि दुःख " असे म्हणत ’अहं’ला ’कोपच्यात’ का घेतलं जातं???
’स्व’,’अहं’ इतका का वाईट असतो?
दुसरयासाठी त्याग करा...लोक डोक्यावर घेऊन नाचतील..
आपल्यासाठी जगा..पटत नाहीत त्या गोष्टींना ’नाही’ म्हणा...बघा कसे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोसतील..
’मी’, ’माझे’ म्हणून जगायला ’सहजीवन’नामक कुठल्याही गोतावळ्यात जागा नसतेच का???
का त्याला तिलांजली देऊनच या झमेल्यात पडावं लागतं???
का एकापेक्षा जास्त टाळकी एकत्र नांदायला लागली की ’अहं’ व्हॉईड होतो?
’आपण’ ’आपल्याकरता’ करत स्वत:ला विसरणं अपेक्षित असतं???
आणि जेव्हा हे माझ्याकडून होणं अपेक्षित आहे तेव्हा ते समोरच्यालाही तेव्हढेच ऍप्लिकेबल असणार नाही का???
मग तरीही माणसं असमाधानी, दु:खी का असतात???
नो वंडर..समोरच्या माणसाचा उबग येत असेल इतकं सारं करत असताना...

दोघांच्या परस्परविरोधी गरजा किंवा तत्वं क्लॅश होतात तेव्हा कुणी माघार घ्यायची हे कोण ठरवतं???कुणी मागे हटायचं हा निर्णय कोण घेतो??
एखादा मागे हटलाच तर पुढेही त्यालाच माघार घ्यायला लागणार नाही कशावरून???
किंबहुना पुढे पुढे त्याच्याकडून तेच एक्स्पेक्ट केले जाणार नाही कशावरून???
कारण एक लीनियंट झाला की दुसरा डॉमिनंट होणार हा तर निसर्गनियमच आहे..
हे सगळं नैसर्गिकरित्या होत असेल, instincts ने होत असेल...तर एक्झॅक्टली कुठली भावना ठेवून होतं???
मागच्या वेळी हिनं काहीही न बोलता जमवून घेतलं तर आत्ता आपण घेऊयात असं???
आणि ते मनाविरुद्ध असेल तरी???
म्हणजे मागच्या वेळी मी काहीतरी मनाविरुद्ध केलं होतं तर याचा वचपा कधीतरी का होईना निघालाच पाहिजे...
मागची ऍडजस्टमेंट हातची ठेवायची..आणि हातचे मिळवत राहायचे..समोरच्याने त्याचं अकाऊंट बरोबरीत आणेपर्यंत..
आणि अथपासून इतिपर्यन्त आपण तडजोडी करत राहिलो तर...

म्हणजे हे तर मर्जिनाच्या गोष्टीसारखं झालं..
तो थेरडा शिंपी दारावर फ़ुली मारून ठेवतो तेव्हा त्याला मॅड करण्याकरता मर्जिना सगळ्याच दारावर फ़ुल्ल्या मारून ठेवते..
आत्यंतिक प्रेमापायी एखाद्या गोष्टीला मुरड घालून बघा...की मग ’अजून काय नको’ ची जंत्री तयार असेल..
हे थोडयाफ़ार फ़रकाने सगळ्याच नात्यांमध्ये घडतं नाही??

लहानपणी ’डब्बा ऐसपैस’ खेळताना सगळे माझ्यावर राज्य द्यायचे...
मी सर्वात लहान...त्यातून जाडजूड..त्यामुळे मला काही कुणाला आऊट करता यायचंच नाही...मग खेळ खूप वेळ सुरु राहायचा...
मी जीव खाऊन पळत राहायचे आणि सगळे त्या दृश्याला enjoy करत असायचे...!
कुणाला राज्य घ्यायचा कंटाळा आला की दिलेच मला राज्य...
मला त्या सगळ्यांबरोबर राहायला आवडायचं म्हणून मनाविरुद्ध मी ही राज्य घ्यायचे...
सतत राज्य घ्यायचा मलाही कंटाळा आला एकेदिवशी...मी राज्य घ्यायला ’ना’ म्हटले..
तेव्हा त्यांनी मला ’लिंबू-टिंबू’ म्हणून बाहेर बसवले...
पुन्हा खेळात घेतलेच नाही...
.
.
.
नाती-गोती, संसार, सहजीवन हे काहीसं मला या ’डब्बा ऐसपैस’ सारखंच वाटतं...
कायम आपल्याला राज्य घ्यायला लागतं...समोरच्याने एखादी गोष्ट ’कर..!’ म्हटली की त्यात आपलं भलंच आहे किंवा त्यातून काही चंगलंच निष्पन्न होणार आहे, आपल्याला ते आवडून घ्यावंच लागेल अशी मनाची समजूत घालून ती करावी लागते..
सहजीवनाचा डोलारा असा कोणातरी एकाच्या इच्छे-गरजेच्या मढ्यावर उभा असतो???
कोणातरी एकाचा कोंडमारा ही सहजीवनाची नांदी असते???

एखाद्याचा स्वभाव एखाद्याला आवडला तर त्याचं खाताना आवाज करणं, बिनदिक्कत दुसरयाचे टॉवेल वापरणं...किंवा एखादीचा बोलताना सतत मीच कशी खरी हे जतवत राहणं, शब्दाशब्दाला गैरसमज करून घेणं हे समोरच्या त्याने/तिने अंगवळणी पाडून घ्यायचं...की हे चूकच आहे त्याला सांगून त्याला/तिला बदलायला लावायचं?
बरं...समोरचे तो/ती ज्या गोष्टींना चूक म्हणतात त्या गोष्टी त्या/तिच्यासाठी ’चूक’ की ’बरोबर’ या कॅटॅगिरीमध्ये पण न बसण्याइतकी नालायक असतील तर???
त्यांच्या दृष्टीने हे ’चलता है’ सदरात मोडत असेल आणि स्वत:च्या या गोष्टी वाईट आहेत हेच मुळात त्यांना पटत नसेल तर??
आपल्या या गोष्टींनी दुसरयाला असह्य त्रास होतो हे त्यांच्या खिजगणतीतही नसेल तर???
ह्या छोट्या गोष्टी असतीलही कदाचित पण त्याने बिलीव्ह मी.. खूप फ़रक पडतो...
प्रत्येक माणसाचे आपण कसे याबद्दलचे ठाम समज असतातच जे दुसरयाच्या दृष्टीने चूक असू शकतात..
मग असेच राहायचे की याला बदलवायचे यावरचा अडेलतट्टूपणा कायम राहिला तर दोघे एकत्र काय राहणार..घंटा???

कोणाचं काय चूक, काय बरोबर हेच बोंबलायला कळत नाही..
कळलं तर समोरच्याला कळतंय का नाही याची कल्पना नाही..
नाही कळलं तर त्याच्यापर्यन्त पोहोचवावं कसं???हे सुचत नाही...
कळणार कसं??
प्रत्येकजण आपापल्या परीने जस्टीफ़ाईड असतो की...’नार्सिसस’च्या गोष्टीतल्या तळ्यासारखा..
विभक्त का एकत्रित कुटुंब??अरेंज का लव्ह मॅरेज???प्लेटॉनिक का लव्ह ऍट फ़र्स्ट साईट??का लिव्ह-इन???ह्या फ़ार दूरच्या गोष्टी आहेत राव..
नंतर शिमगाच होणार असतो..
त्यापेक्षा आपल्यापुरता एक सोल्युशन शोधून काढावं आणी गप्प बसावं...
कोणाबरोबर राहणंच नको...!!

एक्स्ट्रा-हयुमन सगे-सोयरे..!!

"मला ट्रकभरून मित्रमैत्रिणी आहेत.." असं काल कुणीतरी मला म्हटलं..
सो??? व्हॉट्स द बिग डील??
या सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही आहे..त्याच्याशी माझी मैत्री आहे..
माझ्या लेखी म्हणाल तर कुठली गोष्ट निर्जीव अशी नसतेच..प्रयत्न केला तर प्रत्येक गोष्टीशी संवाद घडतो...
म्हणजे थोडक्यात काय तर मी "भूता परस्परे पडो...मैत्र जीवाचे" च्याही वरताण आहे..
घराच्या गॅलरीतून एक सुरुचं झाड दिसतं..त्या झाडावर रोज सकाळी एक बुलबुल पक्ष्याचं जोडपं येऊन बसतं..पहिले नर येऊन बसतो...मादीला उशीरा येण्याची सवय असावी (universal प्रॉब्लेम!!)
मग थोडया वेळाने ती येते आणि त्याच्या शेजारी येऊन न बसता वरच्या फ़ांदीवर जाऊन बसते...
मग नर एक शीळ घालतो...ती बहुधा "हाय डार्लिंग!!" किंवा "हाय मेरी बुलबुल..!!" अशा अर्थी असावी...कारण या शीळेनंतर मादी टुण्णकन उडी मारून त्याच्या शेजारी येऊन लाडाने गालावर गाल घासते...
तेवढ्यात त्यांच्यावर कोणाची तरी नजर आहे हे त्यांना जाणवते आणि त्यांच्या नजरा माझ्या दिशेने वळतात..
"बघ बघ कशी भोचकपणे बघतेय..तुला सांगते..माझ्या exबरोबर यायचे तेव्हा पण असंच..."
अच्छा...तो कुर्रेबाज तुरेवाला हिचा ex होता तर! आणि हा करंट आहे वाटते...लगे रहो!
"...मला तर बाई वीट आला...या माणसांच्या जगात प्रायव्हसी म्हणून काही चीज असावी की नाही??This is so irritating...हनी...कुठलातरी दुसरा वेन्यू बघ...else..i shall ditch you"
दोघेही रागारागाने माझ्याकडे बघत कुचूकुचू बोलत असतात...आणि थोडया वेळानंतर माझ्या अखंड पहारयाखाली चाललेली date संपवून वेगवेगळ्या दिशांना उडून जातात..
हा कार्यक्रम रोज सकाळी चालतो..त्यांना आमच्या सोसायटी इतकी निवांत जागा मिळत नसावी आणि मला त्यांच्या शिव्या खाताना दिवसेंदिवस जास्त मजा येत असावी..
पण काही पण म्हणा..हे दोघे दिसले नाहीत की मलाच चुकचुकल्यासारखं वाटतं..
सकाळी आठ साडे-आठ ला हे प्रणयाराधन पाहिल्यावर मी कॉलेजला निघते..हिरवट !!
पार्किंगमधून स्कूटी काढताना पवार काकूंचा मिठू मला "उच्ची...क्रॉय..!" म्हणून फ़र्मास डोळा मारतो..
दोनदा क्रॉय म्हणजे.."उच्ची..डाळ आणून दे की जरा कच्ची.." अशा अर्थी डिमांड...
मी त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय असं सात्विक संतापाने पवार काकू मला सांगत असतात...पण दिवसाच्या सुरुवातीला इतक्या सुंदर अभिवादनाकरता मी पवार काकूंनाही सहन करु शकते...!
दुसरया कोणाशीही न बोलणारा मिठू माझ्याशीच का बोलतो...हट्ट माझ्याकडेच का करतो हे काही मला अजून उमजलेले नाही...मी त्याला दर आठवडा मिरची,डाळ आणि पेरूचा नैवैद्य दाखवते म्हणून?? की त्याला ’रघुपती राघव राजाराम’ म्हणायला लावत नाही म्हणून..??काही कल्पना नाही...पण त्याची माझी दोस्ती २ वर्षांपासूनची आहे...
एस.टी स्टॅंडवरची राज्य परिवाहन मंडळाची बस मला मिशा फ़ेंदारून हसणारया ’प्रिय’ सारखी वाटते..ती मला जोरात हॉर्न देऊन "काय?कसं काय? बरंय ना??" विचारते.."हो...मी बरीये..तुम्ही ??"असे विचारल्यावर कधी जोरात "भूश्श...." असा धूर सोडून अपचन झाल्याचे सांगते तर कधी नुसतीच "बराय" अशा अर्थी छानदार हसते..
काल जरा जास्तच थकल्यासारखी वाटली...I hope all is well..
माझे असे सगेसोयरे जागोजागी पसरलेले आहेत...
मग येताजाताना माना डोलवून हॅलो बोलणारी फ़ुले असोत..
मी झुरळ आहे अशा अर्थी माझ्याकडे कटाक्ष टाकून नाक उडवून दिमाखात जाणारा ’अशोक लीलॅंड’चा ट्रक असो..
"भ्याss" असा आवाज काढत चाललेले उद्यान एक्स्प्रेसचे चिडखोर इंजिन असो...
किंवा "व्हॉटेवर!!"(K3Gवाल्या ’पू" च्या ऍक्सेंटमध्ये) म्हणत स्टेशनमध्ये ठुमकत आलेली चर्चगेट लोकल असो...
आमच्या बागेत एक मांजरी आहे..तिला मी ’काशीबाई’ हाक मारते...एरवी इकडेतिकडे बॅंडीट क्वीनसारखी फ़िस्कारत फ़िरणारी काशीबाई त्यादिवशी सोसायटीच्या भिंतीपाशी खुडुक करून बसली होती..मी जाऊन म्हटले तिला,
"काय काशीबाई, आजकाल भेट नाही आपली.."
"oh..ppplllsss...dont bother!"
"का हो काय झालं?"
"you are not gonna believe this!..गल्लीत काही उंदीर खाणारे बोके आलेत..how downmarket...!!काल त्यातल्या एकाने मला गाठून विचारलं."आती क्या पारनाका???"...How dare he??मी म्हटले त्याला की हा सुसंस्कृत मांजरींचा एरीया आहे म्हणून..आणि.."
अजूनही ती आठवण ताजी असल्यासारखी ती शहारली...
"त्याने माझा गळाच पकडलान..that rascal..मी सांगते तुम्हाला..त्यांना हुसकवून लावलं पाहिजे..."
तेवढ्यात जीवन, प्राण, अजित, गुलशन ग्रोव्हर कोणाचाही चेहरा डकवला तरी त्याहून अधिक खूंखार दिसणारा बोका गल्लीच्या कोपरयावर दिसला आणि आतापर्यन्त हुसकवण्याच्या गप्पा मारणारया काशीबाईंनी शेपूट घालून धूम ठोकली..
"अवो ताई..."
च्यायला... बोक्याचा आवाज अर्जुन रामपालसारखा होता..
"काय म्हणत होती हो आमची बिंदू??"
बिंदू???direct??
"काहीतरी बोलली असेल आपल्याविरुद्ध...आयची आन घेऊन सांगतो ताई म्या काही बी वंगाळ नाही केलं..टॉमीबाबाची कसम( टॉम ऍंड जेरी मधला)...बाईच्या जातीने मर्यादेत असावं एवढंच म्हनलं आपण.."
हे असं...
एक प्रसंग आठवतो मला...आम्ही २००१ला जपानला गेलो असताना तिथल्या क्योटोच्या अक्वारियमला भेट दिली होती..पूर्णपणे पाण्याखाली असलेल्या अक्वारियमध्ये सगळ्या प्रकारचे जलचर आहेत असे म्हटले जाते...
कासवांच्या सेक्शनमधून फ़िरत असताना एक स्टार इंडीयन कासवाने "ओये बांगडू...इधर क्या करता तुम मॅन???" असे विचारून त्याच्या आधीच झोपेत असलेल्या मुलाला उठवून "मीट माय सनी बॉय" म्हणत त्याची ओळख करून दिली होती..
दररोज पिस्ता बिस्कीट लागणारया खारूटलीला मी एकदा मारी बिस्कीट दिले...ते तिने खाल्ले तर नाहीच पण दुसरया दिवशी माझ्या डोक्यावर पठ्ठीने झाडावरून अंबाडी फ़ेकून मारली..मी ही तिच्याकडे वर बघून मूठ झाडली..
बस्स...आमचा फ़ुगा एवढ्यानेच गेला..दुसरया दिवशी मारी दिली ती चुपचाप घेतली...
ह्या सगळ्या सवंगडयांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे unconditional प्रेम किंवा दोस्ती..
कोणाचा ego दुखावला जाण्याची भानगड नाही..भावना मारणे नाही...अपेक्षाभंग नाही...मला उगाच तर कोणीच रडवत नाही..
कोणापेक्षाही कणभर जास्तच लळा मला या लोकांचा आहे..
ज्या गुलमोहराने मला दोन छोटया चिंग्या ponytails मध्ये पाहिलं त्या गुलमोहराला सोसायटीच्या *** लोकांनी कापून काढलं त्यादिवशी मी कोणीतरी आपलं गेल्यासारखी घळाघळा रडले होते..
समोरच्या बागेतल्या केळी प्रसवत होत्या तेव्हा मला रात्रभर झोप लागली नव्हती...
कधीही कोणाचीही सोबत नको वाटली...down वाटलं...दुखावलं गेल्यासारखं वाटलं की मी यांच्याबरोबर थोडा वेळ घालवते..बिचारे मान वाकडी करून माझं बोलणं ऐकत असतात..
त्यांच्याकडून मला सल्ला लाख मिळत नसेल पण काहीतरी सलणारं वाहून गेल्यासारखं वाटतं..हलकं वाटतं..
मला मांजरींशी बोलतना पाहून माझी आई मला ’चक्रम’ म्हणते...बरं तिला हे माहीत नाही मी एवढ्या सारया लोकांशी बोलते..नाहीतर ती मला ’जिवाचा घोर’ पण म्हणायला लागेल..
असो..
असे हे माझे एक्स्ट्रा-हयुमन सगे-सोयरे..
जे ना माझ्याबरोबर शेयरींग केल्याबद्दल क्रेडिट मागतात...ना मी दुसरया कोणाबरोबर जास्त वेळ घालवला की फ़ुगतात...
आजचं पोस्ट हे फ़क्त त्यांची ओळख करून देण्याकरता..सगळ्यांना कळवून देण्याकरता...की ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत.
जियो!!!

स्टॅग्नेशन अर्थात तुंबा..!

एक महिनापूर्वीचा असाच एक कंटाळवाणा रविवार..
सकाळी उठल्या उठल्या ’प्रिय’ने sms केलेली एक कविता inboxमध्ये माझी वाट बघत होती..
त्या रविवारी त्याने पाडगांवकरांना धारेवर धरले होते..
"इतके आलो जवळ जवळ, की जवळपणाचे झाले बंधन!
छेडणार जर होतो आपण गीत नवे तर..
हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर"
माझी काय सणकली कुणास ठाऊक??मी उलट-टपाली फ़ोन मारला..
"पाडगावकरांना कसे कळले असेल की जवळीकीने नेहमी बंधनंच वाढतात?"
"कारण एक..मंगेश पाडगावकर म्हणजे तू नाहीस आणि कारण दोन..तुला नसली तरी नात्यांची पोच त्यांना होती.."
"पोच माय फ़ूट...नाती-बिती सगळं झूट असतं...सगळ्या नुसत्या पायातल्या बेडया.."
"देवाने तोंड दिलंय आणि शब्द जोडून वाक्य तयार करण्याची अक्कल दिलीये म्हणजे वाट्टेल तसे तोंड सोडावे असा अर्थ होत नाही.."
"मग काय...खोटं आहे का ते??नाती म्हणजे कारणं मागण्याचं पर्मनंट लायसेन्स...तू हे का केलं????असंच का केलं???सांगता आलं नाही का???आम्ही काय मेलो होतो??तुला शिंगं फ़ुटलीयेत..तू जास्त शहाणी झालीयेस...कमवायला लागलीस तर जास्त अक्कल आली का???तू हे...तू ते..."
"तुझे घरचे तुला इतकं चांगलं ओळखतात हे माहीतच नव्हतं मला.."
"पॉइंट मला ओळखण्याचा नाहीये...शिंचा नुसता त्रास असतात ही नाती...जन्माला कुठे यावं हा चॉईस आपला नाही...भरीस भर जन्माला आल्यावर कसं जगावं हाही चॉईस आपला नाही...आपल्यावर आपण सोडून इतरांचे हक्कच फ़ार...’माझं’,’मला’ म्हणून काही करता येण्यासारखं नसावंच का??नात्याचा वास्ता देऊन हवं तसं अडवा...जाणार कुठे??कुठलीही गोष्ट करताना आपल्याला कारणं न द्यावं लागण्याचं सुख कसं असतं काय माहीत???तू पण तसाच.."
"मी???"
"तर काय???
भरधाव सुटलेली ’नातीगोती एक्स्प्रेस’ आता ’प्रिय मुर्दाबाद’च्या फ़ॅमिलीयर ट्रॅकला लागलेली असते..
"तू केस एवढे बारीक का कापतेस????तू गाणी ऐकताना जोरजोरात मान का हलवतेस???तू बोलण्यात वेळ का घालवतेस???तू इतका खर्च का करतेस???तू एकाच पायात ऍंक्लेट का घालतेस??"
’प्रिय’ म्हणजे बुरसटलेपणाची हद्द आहे...मी मोठया बीड्सचा नेकलेस घातला तर मला ’पोळ्याचा बैल’ म्हणतो.. मी केप्री घालून गेले तर टांगेवाली म्हणतो..आता मी काय भाग्यश्रीसारखी पोटावर जीन्स चढवून इथे तिथे फ़िरू काय???आणि केप्री वर ऍंक्लेट कसलं रावस दिसतं हे ’प्रिय’सारख्या ’डार्क ब्राऊन पॅंट वर फ़ेंट ब्राऊन शर्ट ’ किंवा ’ब्लॅक पॅंट वर व्हाईट शर्ट’वाल्याला काय कळणार?? आपल्याला ’फ़ॅशन’ किंवा ’ड्रेस सेन्स’ या विषयाचा गंध ही नसताना मताच्या पिंका टाकायची जाम वाईट खोड आहे त्याला...बोलूनचालून पुणेकरच तो!
"तुला फ़क्त एवढंच लक्षात राहतं??"
"नाही..पण या गोष्टीत लक्षात न राहण्याइतकं कमी पोटेंशियल नाहीये...मी कुठलीही गोष्ट केली आणि ती तुम्ही लोकांनी माझ्या निर्णयाला मान देऊन आहे तशी स्वीकारली..काहीही मतप्रदर्शन न करता..जे मी इन फ़ॅक्ट कधी मागितलेलंच नसतं..असं कधी तरी झालंय का??एक गोष्ट सांग..वाट्टेल ते हरेन.."
"ठिक आहे..तुझ्या मनासारखं होऊ देत यापुढे.."
अर्र्र..स्क्रिप्ट्मध्ये हा डायलॉग नसायला हवा होता..माझ्या या शेरेबाजीवर ’प्रिय’ने मला शांत सुरात तोच कसा बरोबर आहे हे ठासून सांगणं आणि संभाषणाची सांगता ’मला बहुतेक बुरखा घालून चालावं लागणार तुझ्याबरोबर" या माझ्या पाचकळ कमेंटने होणं अपेक्षित होतं...पण ’प्रिय’ यापुढे मला कधीही कशावरही टोकणार नाही या कल्पनेचा आनंद इतका अवर्णनातीत होता की मी बोलून गेले..
"खर्रच...??"
समोरून खाडकन फ़ोन ठेवला गेला...
मारायला गेलो सिक्सर आणि झालो त्रिफ़ळाचित असेच काहीसं झालं होतं बहुतेक...
’प्रिय’ असले शाब्दिक यॉर्कर्स माझ्यावर वापरत नाही पण आज बहुतेक त्याला वाईट वाटलं असावं..तेवढ्यात मोबाईल कोकलला..’प्रिय’चा sms...
"एकटं तर एकटं..तसं जगून बघ..त्यातच रमलीस तर मात्र पुन्हा येऊ नकोस.."
ह्याच काय अर्थ घ्यायचा माणसाने???
मी फ़ोन लावला तर एअरटेलची ऑपरेटर कानात बोंबलली..
Switched Off!
भडकून "जा तेल लावत.."असा व्हॉईस मेसेज सोडला...
एअरटेलमध्ये ’व्हॉइस मेसेज’ हेच प्रकरण फ़क्त बरंय...बाकी सगळा आनंदीआनंद आहे..!
ठिक आहे बच्चमजी...तू म्हणतोस तसंच होईल...एका माणसाला कारणं देण्याकरता घसा नाही फ़ोडावा लागणार मला...What A Relief!
नंतरचे काही दिवस ठिक गेले...
’ठिक’ कारण खुट्ट झाले तर फ़ोन करून कळवायला ’प्रिय’ नव्हता...पण त्याचबरोबर दर दुसरया वाक्याला येऊन टोचणारी त्याची टिप्पणी नव्हती..नंतर होणारा बखेडा नव्हता...
पण हे काही दिवसच...
अंगावरचा शर्ट ओला झाला की काहीवेळाने त्याच्या ओल्या असण्याची सवय होऊन जाते...तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं..(’प्रिय....ओला शर्ट??? मी कसली रोमॅंटीक आहे)
’प्रिय’चं असं नसणं मला असं इकडून तिकडून क्षणाक्षणाला टोचायला लागलं...
डिपार्टमेंट मधली पॉलिटीक्स हाताळताना ’प्रिय’चे गुरुमंत्र आठवायचे...फ़ोनवर सॅमीबरोबर उगाचच चिल्लरबाजी करताना समोर पडलेला हिस्टरीचा न संपलेला धडा बघून ’प्रिय’च्या वक्र झालेल्या भुवया डोळ्यासमोर यायच्या..पायरयांवरून मजेत फ़ताक फ़ताक पाय उडवत चालताना "लेक्चरर आहेस तू...जरा माणसात चाल.."असं कानात घुमायला लागायचं..मीटींगमध्ये HODच्या चेहरयाच्या जागी अक्कडबाज मिशा असलेला ’प्रिय’दिसायला लागायचा..
ओकेजनली ’तुझे याद करके ब्ला ब्ला ब्ला’ अशा अर्थाची टुकार, भुक्कड गाणी ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागायचे..
’प्रिय’च्या नसण्याने मी पुरती वाया गेलेय याची १००% खात्री मला पटली...
हा बाप्पू पण फ़ोन स्विच ऑफ़ करून बसला होता..त्याच्या घरी फ़ोन करणे मला पटत नव्हते..
बोलतो तो...तो बोलणार नाही तर कोण??आपण पण त्याच्या सगळ्याच गोष्टी थोडी ना ऐकतो...शेवटी जे करायचेय ते आपल्याला वाटेल तसेच करतो ना??? मग एवढं तोडून बोलायची काही गरज नव्हती..
नाती कोणाला चुकलीयेत...नाती अशी न तशी म्हणून ’प्रिय’शी वितंडवाद करून फ़ुकट दोघांच्याही डोक्याला ताप..इतकी उपरती मला झाली..
कुठली अवदसा आठवली आणि नाती-गोती विषय काढून ’प्रिय’शी बोलले असं वाटायला लागलं..
१ महिना सगळी गिल्ट, सगळी confessions, सगळे साक्षात्कार असे तुंबवून ठेवले होते..
स्वत:वरच धुमसत रागाने रेपो, रिव्हर्स रेपो आणि स्टॅग्नंट इंडियन इकॉनॉमीशी झटापट करताना एके दिवशी ’प्रिय’चा फ़ोन आला..स्वत:हून..
दगडामुळे अडून राहिलेलं पाणी वाहतं झालं की पाण्याला कसं वाटेल???
स्टॅग्नंट इंडीयन इकॉनॉमी प्रदीर्घ वेळानंतर ऍक्टीव झाल्यावर कसं वाटेल??
तसंच बरंचसं मला वाटलं १ महिन्यांनंतर ’प्रिय’शी बोलताना..
यापुढे मात्र कानाला खडा...
Never Have Such स्टॅग्नेशन अर्थात तुंबा..!

नॉस्टॅल्जिया के खातिर!

एका आठवडयापासून संवेद, कोहम, संवादिनी आदी ’दादा’मंडळींनी चालवलेला ’खो-खो’ उपक्रम नेमाने वाचतेय..हे दादा लोक जाम पार्टी-पार्टी करतात राव!
’खो-खो’मध्ये ’खो’ मिळायचे सोडाच पण आपण साधे लिंबू-टिंबू पण नाही आहोत हे पाहून मला जाम फ़णकारा आला बुवा!
असू देत...बडे लोग...बडे लोग!!!
अर्थात कशाचा कशाला काही संबंध नाही...माझं आपलं उगाचच...पण हा ’खो-खो’ माझ्या या पोस्टला कारणीभूत आहे हे नक्की!
जुन्या आठवणी...दुसरं काय असणार???
झप्पकन मागे जायला झालं...Cut to मला कविता करण्याचा आणि वाचण्याचा चस्का लागला होता त्या काळात...
प्रत्येक पानाला चमकदार पानाफ़ुलांची वेलबुट्टी..फ़ाऊंटन-पेनने सुबक अक्षरात लिहीलेल्या कविता...पन्नास एक कविता झाल्या की रेशमाच्या धाग्याने गाठीचे टाके घालून तो सेट पेटीत ठेवून द्यायचा..असे एकूण तीन सेट्स...दीडशे कविता..
आल्यागेल्यासमोर आईने अभिमानाने मिरवावं असं अत्यंत देखणं काम..
अज्ञातवासात दोन वर्षे काढल्यावर एका आठवडयापूर्वी ’खो-खो’चे निमित्त झाले आणि वहीला बघण्याचा योग आला...
ज्या कविता माझ्याकडे नाहीत त्या लिहून काढाव्यात हा उद्देश..
भरून आलं च्यायला नकळत..फ़ुलपाखरी दिवस..अल्लड वय..काही हळवं वाचलं की टचकन भरणारे डोळे...अनंत सामंतांच्या ’मितवा’च्या प्रेमात पडायचं वय!
मी लिहीलेल्या कविता प्रकाशित पण करणार होते मी...पण नंतर राहूनच गेलं...
’खो-खो’ मध्ये आतापर्यंत लिहिलेल्या बहुतेक सगळ्या कविता माझ्या या वहीत आहेत..
पण..
दोन कविता माझ्या अत्यंत आवडत्या आहेत पण त्या आतापर्यंत मला कुठेही दिसल्या नाहीत किंवा मी मिस केल्या असतील..मला इव्हन आंतरजालावर पण कुठेही संदर्भ मिळाला नाही..
इतक्या सुंदर कविता अपरिचित राहाव्यात..मला नाही पटले..
म्हणून चोंबडेगिरीच म्हणा हवं तर...करून त्या कविता इथे देण्याचा मोह नाही आवरला...

समोर कॅन्व्हास कोरा, पुढ्यात रंग....
मी उत्सुक तिच्याकडे पाहत...
तिला मी तिचे मन रंगवायला सांगितले आहे...

वाटते... आता ब्रश उचलण्याइतकाही
धीर असणार नाही तिला
ती माखत राहील रंगच रंग
विस्तारत नेईल तो रिकामा चौकोन सगळा...

रंगावर रंग... तुडुंब
जुन्या भेटीचे ते सगळे कोवळे
थरावर थर थरथरणारे...ते कोवळे...ते सोनेरी पिवळे
झिम्म काजळधारेतून लुकलुकणारे ते उजाळे....
रक्तातून धावणारे ते लाल निळे...

तिने उचलला एक हिरवा तो समुद्रतळाचा केला
आणि फ़क्त एक लहानसा ठिपका दिला
ठिपका वेडावाकडा पण जिवंत कमालीचा..
वाटले हा एकच एक आता पसरेल सर्वभर
मी एकाग्र पाहत राहिलो अवकाश त्याचा...

नंतर मात्र काहीच काढले नाही तिने...
नुसतीच हासली ...म्हणाली....
" हा तू ! बाकी सारे कधीच मिटले...
एवढेच होते मनभर झालेले...!"

-अरूणा ढेरे

निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे,
कारण
तीच आहे जन्मदात्री, सारया भविष्याची
मातीशी ईमान सांगणारे युवकांचे तांडे
प्रेरणांच्या तरफ़ांवर उद्याची क्षितीज उजळवीत
अन ओसपणाचे कोसच्या कोस तुडवीत
जेव्हा निघतील दाही दिशांनी
दरयाखोरयांमध्ये आपले नि:श्वास उतरवीत
तेव्हा ही धरित्री होईल
सुजलाम सुफ़लाम मंगलदायिनी

-बाबा आमटे

आता वही पेटीत परत जाणार नाही हे नक्की!
’खो-खो’ तर नाही..लंगडी घालून घेतली झालं..
सगळ्यांना ’आवट’ केले नाही मी???

स्पायकर...ती..आणि मानसिक द्वंद्व..!

”स्पायकर’च्या शोरूमवर तिने तिरकी नजर टाकली..
हुश्श..अजून तिकडेच आहे..
डिसप्ले विंडोमध्ये त्या टकल्या पुतळ्यावर लावलेले बाह्या वर दुमडण्यासाठी स्ट्राईप्स असलेले जांभळे शर्ट तिला मनापासून आवडले होते..
कामावरून येताना रोज शोरूमवर नजर टाकायची आणि शर्ट गेलेलं नाहीये हे पाहिलं की साई सुट्ट्यो!
गेले तीन दिवस तिचा हाच खेळ अव्याहत सुरु होता..
आज मात्र काही करून शर्ट घ्यायचेच अशा निश्चयाने ती आत शिरली..
११६०??
अर्र्र...
एखाद्या शर्टची किंमत एवढी का असावी??ती पण नेमकी मला आवडलेल्या शर्टाची???
ती प्रचंड हिरमुसली...
११६० चं एक शर्ट तर ११६० मध्ये कुर्ता-सलवार-स्ट्रोल ’मिक्स ऍंड मॅच’ चे सेटस किती???..’ज्ञानोत्सव’मध्ये पुस्तकांचं प्रदर्शन भरलेय...किती पुस्तके येतील..??
ताबडतोब डोक्यात त्रैराशिक मांडलं गेलं..
अतिशय अनिच्छेने शर्ट परत काऊंटरवर ठेवून ती दुकानाच्या बाहेर आली..
मोठ्ठा श्वास घेऊन ती घराच्या दिशेने चालायला लागली..
पाच आकडी पगार घेणारया तिला खरं ते शर्ट विकत घेणं अशक्य नव्हतंच मुळी..
यावेळी तिच्या वॉलेटमध्ये २ हजाराच्याही वर कॅश होती..
मग..??
ती एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलगी होती..
एकाच वस्तूवर एकाच वेळी हजार रुपये उधळणे तिला कधीच जमले नव्हतं..
तिला ते कधी शिकवलं गेलेलंच नव्हतं...
आई-वडीलांनी काडी-काडी जोडून उभा केलेला संसार तिने पाहिला होता..
पै-पै जोडून आईने तिला शिकवलेले तिने पाहिले होते..
आणि हजार काय थोडीथोडकी रक्कम आहे???
हजारचे फ़क्त ’एक’ कॅजुअल शर्ट???नाही..घेतले नाही हे बरोबरच केले मी..कॅजुअल्स मी फ़क्त वीक-एन्डसना घालणार..ते पण कधी कधीच...आणि घरी राशीवारी सुंदर कुर्ताज,जीन्स,सुंदर सुंदर ऍक्सेसरीज पडलेल्या असताना मला काय गरज आणखी एका कॅजुअल शर्टची??
गरज नसेल तर उधळपट्टी करू नये...हे तिच्या मनावर बिंबलं होतं...आणि तिला पटतही होतं...
पण..
काय होईल मी फ़क्त याच वेळी ’फ़क्त आवडलं म्हणून’ ते शर्ट विकत घेतलं तर???
अशक्य नाही आपल्याला ते...
च्यायला..किती वेळ ह्या मिडलक्लास मेंटॅलिटीने आपल्या ईच्छा मारत राहणार??
’सातच्या आत घरात’ मधलं "तुमच्या इनर्स जितक्या किंमतीला असतात ना..त्यात आम्हाला एक ड्रेस बसवावा लागतो...ओढणीसकट" हा डायलॉग ऐकून एकेकाळी तिला भडभडून आले होतं..
पण..
आता परिस्थिती वेगळी आहे...
पांढरपेशा वर्गात मोडणारे आपण अजूनही ..एक काय ते कॅज्युअल शर्ट घेताना विचार करतो?
नेहमीच असं होतं...आपल्याला आवडणारी गोष्ट खूप महाग म्हणून घ्यायचं टाळलं आपण..
च्यायला आपल्या आवडी-निवडीपण नेमक्या जहागिरदारासारख्या..
पण यावेळी नाही..
शर्ट घ्यायचा निर्णय पक्का झाल्यावरही रात्रभर तिला पूर्वी कोणत्या ईच्छा मारल्या हेच पुन्हा पुन्हा आठवत राहिले..
साऊथ-एक्स्पोमध्ये आवडलेली २५००ची हस्तिदंती पेटी...आपल्याकडे चांदीची पेटी ऑलरेडी आहे म्हणून घेतली नाही..
पण त्या २५०० मध्ये आपण जर्मनचा कोर्स केला..
रॅडोचे घडयाळ आवडले होते..पाच हजाराचे..ती आवड ९००च्या सायझरवर परतवली...आणि २५००चे सुंदर सुंदर कुर्ता सेटस शिवले जे अजूनही सगळ्यांच्या असूयेचा विषय आहेत..
असू देत...
कमी किंमतीत जास्त युटीलिटी...मोटो जरा बाजूला ठेवूयात आपण..
काय करावं???
काहीतरी मनाशी ठरवून ती शांत झोपून गेली...
दुसरया दिवशी स्पायकरच्या पायरया चढताना तिच्या चेहरयावर आदल्या रात्रीच्या द्वंद्वाचा जरही लवलेश नव्हता..
काऊंटरवर विचारणा केली तर काऊंटरपलीकडून उत्तर आले...
"ईट गॉट सोल्ड..मॅम.."
"ओह...इट्स ऑलराईट.."
बाहेर पडल्यावर ती जराशी हसली...ती ऍक्चुअली आनंदली होती..
जो होता है ऑलवेज अच्छे के लिये होता है...
तिला मोकळंढाकळं वाटलं...
शर्ट घेतलं असतं आपण तरी आठवडाभर नुसती टोचणी लागून राहिली असती...
हे खूप बराय...
या हजार रुपयात खूप सारी पुस्तकं घ्यायची ठरवून ती आनंदाने घरची वाट चालू लागली..

सामंत..ओ.हेनरी..आणि माझी हॅल्युसिनेशन्स!!!

लख्ख सूर्यप्रकाशात न्हायलेली स्टडी-रूम अचानक पिच-ब्लॅक होते..आणि मला कुठल्यातरी गर्त्यात सापडल्यासारखे भोवंडायला होते..
वारयाने पडदा उडतोय आणि ७ फ़ूट लांब उभी असताना माझ्या गळ्याभोवती अंमळ घट्टच आवळला जातोय (पडदा फ़क्त ३ फ़ूटच लांब असताना?)..
स्लायडींगच्या आडून मला कोणीतरी डोकावून बघते आहे आणि माझी पाठ वळली रे वळली की ते व्हॉssव करून माझ्या अंगावर येणार आहे..
मला अपचनाचा अजिबातच प्रॉब्लेम नसताना मला सकाळपासून असे भास का होत असावेत??
नो...रियली...
स्टडीमध्ये मी अगदी लाडाने एक सुगरणीचे घरटे लावलेय..त्या घरटयामधून कोणीतरी मुंडी बाहेर काढून ’खिक’ करून खिदळल्याचाही भास झाला मला...
हो...ते भास होते हे नक्की...कारण नंतर ते घरटे मी उलटे-पालटे करून पाहिले तर त्यातून कोणीही बदाक्‌कन कोणीही बाहेर पडले नाही..
Am i going nuts???
Am I HALUCINATING???
दिवसभर माझे हेच उद्योग चालले होते..स्लायडींगच्या मागे दोनदोनदा वाकूनच काय बघ...खिडकीच्या मागे कोणी उभे असेल तर त्याच्या तोंडावर आपटावी म्हणून थाडकन खिडकी उघड..
कधी नव्हे ते सगळे पडदे धुवायला काढून आईचे करवादणे ऐकून घेतले..
शेवटी घरातला असा एकही कोपरा उरला नाही जिकडे मला काही suspicious दिसत नाहीये तेव्हा घराबाहेर पडले..
स्कूटी काढली आणि किक मारली तर ऍक्सलरेटर गर्रकन फ़िरला..
माझे पाय हवेत ..आणि माझ्यासकट स्कूटी १५ फ़ूटापर्यन्त स्किड झाली...
एरवी हे खूप नॉर्मल वाटले असते पण मला मागून कोणीतरी डेफ़िनेटली ढकलले होते..
च्यामारी...कोण ते बघायला गेले तर बिल्डींगमधली सर्वात creepy म्हातारी माझ्याकडे बघून दात विचकत होती...
माझी फ़ातरली...(फ़ाटली+तंतरली)!
रस्ताभर मला सारखं वाटत होतं की सारे माझ्याकडे बळंच टक लावून पाहतायेत..
माझ्याकडे बघून नेहमी हसून हात हलवणारया पोलिसाने सुद्धा आज माझ्याकडे भोकराएवढे डोळे करून वटारून पाहिले..
मला सारखे वाटत होते की गाडी एका बाजूला कलणार आणि डिव्हायडर वर आपटून आपले डोके टरबूजासारखे फ़ुटणार..
माझा बॅलन्स सुटणार आणि मी बाजूच्या दुथडी भरून वाहणारया नाल्यात (’प्रिय’च्या भाषेत ’चहाचं आधण’) जाऊन पडणार..
हे ही नसे थोडके तर स्पीडोमीटरवर एक चतुर येऊन बसला..तो पण च्यामारी बाहेर लोंबणारे डोळे माझ्याकडे लावून बसला...
मी कितीही शूssक केले तरी जाईना..
अचानक मला का target केलेय सगळ्यांनी??
नॉर्मली..चतुर फ़ार भित्रे असतात पण हा चतुर माझा हात निसटता लागला तरी तिकडेच बसून होता..
तेवढ्यात पवार-काकूंच्या पोपटाने पिंजरयाबाहेर मुंडके काढून "भास होतात क्रॉय..??..क्रॉय क्रॉय.."म्हणत फ़र्मास डोळा घातला..
आता मात्र हद्द झाली..
माझी एव्हाना भितीने बोबडी वळायाला सुरुवात झाली होती..
सगळे उपाय हरल्यावर ’बाहेरची’ बाधा झालेला कसा भगताला शरण जातो तसं मी ’प्रिय’ला शरण गेले..
माझ्या अपेक्षेप्रमाणे ’प्रिय’ने मला "काल रात्री काय हाणलेस??" हा प्रश्न न विचारता काहीतरी वेगळेच विचारले...
"काल रात्री काय केले होतेस??"
"काल रात्री मी अम्माच्या (Aka अरूणिमा) घरी होते..आणि तिकडे.."
"तिकडे???"
"ओह येस..."
काल अरूणिमाच्या घरी अरूणिमा आणि माझी पैज लागली होती..पैज जिंकणारयाला अनंत सामंतांचं ’अश्वत्थ’ मिळणार होतं..
४५० रुपये आयते वाचणार म्हणून आधीच वाचलेली पुस्तके पुन्हा वाचण्यात काहीच हरकत नव्हती...फ़क्त ती रात्री वाचल्याने काही फ़रक पडेलसे वाटले नाही मला...
पुस्तकं पण एक से एक होती...
नारायण धारपांचं ’दस्त’, ब्रॅम स्टोकरचं ’ड्रॅकुला’ आणि सर्वात कळस विल्यम ब्लॅटीचं ’द एक्झॉर्सिस्ट’..आणि ती याच क्रमाने वाचायची होती..
’द एक्झॉर्सिस्ट’ दिवसा वाचताना माझी बोबडी वळली होती तर मध्यरात्री माझी काय फ़ाफ़लली असेल??
पण नाही...’अश्वत्थ’साठी काहीही...
९ ते २ मध्ये पुस्तकं खाऊन झाल्यावर पैज जिंकले ही गोष्ट अलाहिदा...चुपचाप जाऊन झोपायचे की नाही??
नाही...किडे कोण करणार??? त्यातून अस्मादिकांच्या अंगात रेहमानी किडा...
अडीच ते चार ’द रिंग’ बघितला..आणि सव्वाचारला आम्ही ढाराढूर पंढरपूर झालो...
"अरे वा...इतके पराक्रम केल्यावर तू हॅल्युसिनेट करणार नाहीतर काय?? ती अम्मा चक्रम आहे झालं..पण तुझी बुद्धी शेण खायला गेली काय गं??"
"असो..असो..पुन्हयांदा नाही होणार.."
’प्रिय’च्या शिव्या खाण्यापेक्षा कबूल करून टाकणे कधीही चांगले..
बरोबर...काल रात्री ’हॉररचा ओव्हरडोस’ झाल्यावर मला भास होणे किती साहजिक होते..
मी हुश्श केले..मग एक आयडीया येऊन मी खाली पवार-काकूंच्या घरी गेले..
पोपटाच्या पिंजरयासमोर जाऊन पोपटाला विचारले..
"माझी चेष्टा करतोस क्रॉय???...क्रॉय..क्रॉय.."
पोपट काहीच बोलला नाही..काय बोलणार???
"ह्यॅट.."म्हणत पोपटाची यथेच्छ हेटाई केली आणि फ़ोन वाजला..
’ए...फ़ोन क्यू नही उठाती बे??’..ची कर्णकर्कश्श रिंगटोन कोकलली...अम्माचा फ़ोन..
तिच्या ’खास’ आवाजात रेकॉर्ड करून घेतलेली ही रिंगटोन...हा फ़ोन ठेवला की ही बदलायची अशी मनाशी नोंद करत मी फ़ोन उचलला..
"अबे सुन ना..."(हॅलो बिलो म्हणायची काही पद्धत नाही बरं अम्माकडे)
"तेरेकोही सुन रही तेरेसे बात करनेसे पहले..तेरे गलेमें कौनसा ऍंप्लिफ़ायर बिठाया ये तो वेंकटगिरीही जाने.."
"हे हे हे"
वेंकटगिरी उर्फ़ वेंकी(B.E Electronics,Indian Air Force) हा अरुणिमाचा उर्फ़ अम्माचा बॉयफ़्रेंड!
"ओ.के...well,girl... नेक्स्ट टाईम तू आयेगी तो तू ’फ़्रॅंकेस्टाईन' पढेगी अगर तुझे मेरा पूरा ’ओ.हेनरी’ का कलेक्शन चाहीये...रखती मै.."
अहाहा...काय पण टेम्पेटेशन!
To Be Or Not To Be...Is that a question???
नॉट ऍट ऑल..I am going for it..
तुम्ही काय केले असतेत??

डेक्कन एक्स्प्रेसमधली ’बंबी’..!

’बंबी’..
ती म्हणजे एक सुरस अशी कथा होती..
आईवेगळ्या ’बंबी’ हरणाच्या कथेवरून तिच्या पप्पाने तिला हे नाव दिले होते...ती पण आईवेगळी होती म्हणून..
पप्पाने हाक मारली की बळंच हरणासारख्या दुडक्या मारत जायचा उद्योग तिने अगदी २०व्या वर्षापर्यंत अव्याहत चालू ठेवला होता..
पप्पा तिला मयंककडे देऊन आईला भेटायला निघून गेला..
दुडक्या उडया मारणं संपलं पण वारा प्यायलेल्या वासरागत हुंदडणं अजून सुरू होतं..
आज ती मयंकबरोबर मुंबईला जाणार होती..
सकाळी सकाळी तिच्याकडे टक्क डोळे उघडून बघणारया फ़ुलांना हॅलो करत ती पोर्चमध्ये आली..
बर्गंडी रंगाच्या होंडा सिटीवरून तिने हळूवार हात फ़िरवला..
ही शेड मिळेपर्य़न्त बंबीने मयूला त्राही भगवान करून सोडले होते..
एकतर मयंक घेणार होता स्कॉर्पियो..
"ट्रक घे त्यापेक्षा...काय ते धूड????अरे..टूरीस्ट कंपनी खोलणार आहेस का??गाडी कशी असावी??कमनीय..घाटदार..."
आणि दुसरया दिवशी पोर्चमध्ये होंडा सिटी उभी...
”शी...काळा रंग???"
"मग??"मयंक एकदम धसकला..
बंबी आता फ़ॉर शुअर गाडीवर इंद्रधनुष्य चितारून मागणार इतपत त्याने मनाची तयारी करून घेतली..
"मला बर्गंडी रंग दे लावून गाडीला"
"बसलाय माझा नाना..बर्गंडी रंग लावून द्यायला...तुझं काहीतरी तर्कटच असतं हा बंबी..."
"तू तर शोधायच्या आधीच हाय खालीस मयू??"
रात्रभर डोक्याशी भुणभुण लावून घेण्यापेक्षा मयूने शरणचिठ्ठी दिली आणि दुसरया दिवशी बंबी आणि गाडी दोघांना डिझायनर कडे नेऊन सोडले..
मग तो रंग मिळेपर्यन्त बंबीने डिझायनरचे डोके खाल्ले होते...
अशी सुरस पार्श्वभूमी असणारी ही होंडा सिटी बंबीला मनापासून प्रिय होती...
बेसिकली मयंककडून ह्ट्ट करून घेतलेली कुठलीही गोष्ट तिला सारखीच प्रिय होती..
बंबी काचेला नाक लावून बाहेर बघत असते..
मखमली रस्ते, त्यावरून सुळ्ळकन पळणारी मोटार, आजूबाजूला दाट झाडी...बंबीला टाळ्या पिटाव्याशा वाटत होत्या..पण मयंकला दात काढायला कारण मिळालं असतं उगीच!
"हुं.." नाकाचा शेंडा उडवत ती उगीचच फ़णकारली..
"मयंक....गाडीच्या टपावर बसून प्रवास करायला काय मज्जा येईल ना?"
"मला एक गोष्ट सांग बंबी...इतक्या भन्नाट कल्पना तुला येतात कुठून??...च्यायला तुला बघून मला जाम कॉंप्लेक्स येतो.."
"मागच्या वेळी तुला डिक्कीत बसून प्रवास करायचा होता...तू केलास पण.. i just shudder to think whether i would have done the same if i felt so..एक्स्प्रेस हाय-वे वर त्या दिवशी सगळ्यांना फ़ुकट करमणूक मिळाली..तू खरंच मॅडचॅप आहेस गं...गप्प बस इकडे"
"बरं..टपावर बसून प्रवास करायचा नाही इज एक्वल टू टपरीवर चहा प्यायचा नाही इज एक्वल टू गाडीला मागे टाकल्यावर त्यांना ट्वीक ट्वीक करायचे नाही इज इक्वल टू.."
बंबीने बे कं बे च्या आवेशात म्हणायला सुरुवात केली..
"पाठांतर चांगलंय तुझं.."
एकमेकांवर हसत, मजेत ती दोघं चालली होती..
"मयू...डायलॉग मारू??"
"मारा...मी नाही बोललो तर मुकाट बसशील तर ती तू कसली...बोला.."
"ही ही...मरण यावं ते असंच...ही ही...बर्गंडी रंगाच्या होंडा सिटीत बसलेल्या मयंक नावाच्या सर्वात भित्र्या प्राण्याच्या बाजूला बसून यावं...ही ही ही"
आणि जीभ बाहेर काढून मेल्याचं नाटक करत ती मागे सीटवर रेलली...
"बास्स...भावना व्यवस्थित पोहोचल्या..उठा आता"
पण बंबी उठत नाही..
"बंबी...चेष्टा पुरे...उठ..!"
.
.
.
.
.
.
’अगं ए..उठ...कल्याण येतंय!"
अंगावर कोणीतरी वस्सकन ओरडले तेव्हा तिला जाग आली..
तापट चेहरा, लालबुंद डोळे...
"अरे मयू..तुला काय झालं??"ती अर्धवट झोपेत विचारती झाली..
"चला आता..नाटकं पुरेत...वैतागवाडी नुसती"
आणि बघता बघता तिला ओळख पटली...अरे..हे तर आपले अर्धांग!
डेक्कन एक्स्प्रेसचा कलकलाट..जड बॅगने भरून आलेले खांदे...सगळ्यांच्या घामाचा दर्प हवेत पसरलेला..अर्ध शर्ट आत,बनियन बाहेर डोकावतोय अशा अवतारातला साक्षात नवरा समोर..
ती लख्ख जागी झाली..
बंबी आणि मयूला "सी यू नेक्स्ट टाईम" म्हणत अलवार तिने मनाच्या सांदीकपारीत बंदीस्त केलं..
पटकन विटक्या साडीचा पदर खोचला..भरभरीत केसांचा बुचडा बांधला आणि किरकिरणारया पोराला कडेवर घेतले..
आणि तोंडभर हसून म्हणाली..."चला.."
बाजूला सिग्नल लागलेल्या डेक्कन क्वीनला ट्वीक ट्वीक करायचा मोह गिळून डेक्कन एक्स्प्रेसमधली बंबी गर्दीतून वाट काढू लागली..

प्रिय ’प्रिय’ला...

प्रिय,
कालपासून ’तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’ मी किती वेळा ऐकलं असेल?
पुन्हा पुन्हा नव्याने ऐकताना त्या गाण्यातल्या नायक/नायिकेसारखं बळंच हसायच्या प्रयत्नात पुन्हा एकदा धो धो रडून घेतलं..
कधी बाथरूममध्ये, कधी लॅबमध्ये, कधी रिक्षात..घरी आल्यावर उशीत तोंड खुपसून..तर कधी चादर डोक्यावर ओढून घेऊन मूठ तोंडावर दाबत..
मी कधी दु:खात असले, वैतागात असले, चिडचिड करत असले की तुझा फ़ोन हटकून यायचा...मला आश्चर्य वाटायचे तुला कसे कळते??विचारीन विचारीन करत राहूनच गेलं ते..
अशी कशी मी वेंधळी??
माझ्यासारखा तू ही दु:खी होतास...(कोण दु:खी नसतं म्हणा?)..तुझ्या दु:खांचे स्वरूप पण काहीसे माझ्यासारखेच..
माझा स्वभाव व्यक्त होण्याचा तर तुझा नेहमीच neutral..
राग आला, उदास वाटले की तुला फ़ोन करून तासनतास बडबड करणे हा माझा हक्क मानायला लागले मी पुढे पुढे..
मी कित्येक वर्षापासून शोधात असलेला ’लॉकवाला अल्बम’ मला मिळाला त्या आनंदात एकदा तू महत्वाच्या कामात असताना मी तुला फ़ोन केलेला...आठवते??
तुझ्या कामात व्यत्यय आणतेय याची मी कधीही पत्रास ठेवली नाही..
कारण यात काही चूक आहे असे तू मला कधीच जाणवू दिले नाहीस..
नेहमी माझी बडबड शांतपणे ऐकून घेतलीस, जरूर वाटल्यास सल्ला पण दिलास..प्रसंगी माझी तिरसटासारखी बोलणी हसून सहन करत!
तू माझ्यासाठी नेहमीच एक हक्काचे स्थान राहिलास..
पण..
तू मात्र तुझी सुख-दु:खे क्वचितच बोलून दाखवलीस माझ्यापुढे..तुझे राग-लोभ मला कळलेच नाहीत मला कधी..
का ’मी..माझे’ करता करता राहूनच गेले हे ही??
मी तुझा जरासाही विचार केला नाही ना कधी??
माझ्यापेक्षा त्या देवबाप्पाला जास्त वेळ देतोस म्हणून त्या देवबाप्पाचा पण रागराग केला..
मला माझ्यापुढे कधीच काही दिसले नाही..
परवा नेहमीसारखा हसून का बोलत नाहीयेस म्हणून बेफ़ाम कटकट केली तेव्हा मला तू नाईलाजाने सांगीतलेस की तू हॉस्पिटलमध्ये आहेस..
शरीरच साथ देत नव्हते तेव्हाच तू असमर्थता दर्शवलीस..नाहीतर ते पण सांगीतले नसतेस...निभवून नेले असतेस..
गेल्या दोन दिवसात तुझ्या नसण्याने मला बरेच साक्षात्कार झाले..
तू एक हाडामांसाचा माणूस आहेस हे मला विसरायला झाले होते..
सतत स्वत:ला आनंदी ठेवत असलास तरी तुला काही दु:खे, वेदना असू शकतात हे विसरायला झाले होते..
तू मला काही सांगणे इष्ट समजले नाहीस हा माझा पराभवच समजायचा का मी??
परवाच्या कटकटीनंतर mp3 playerने मला हे गाणं ’सुनवलं’...
ह्याच गाण्याने कोसतेय स्वत:ला..
"आखोंमें नमी...हसी लबोंपर..
क्या हाल है..क्या बता रहे हो?..
क्या गम जिसको छुपा रहे हो??"
...
क्या गम जिसको छुपा रहे हो??"
i should have asked this to you long ago..
...
असो....लवकर बरा हो..माझ्या सगळ्या चुका सुधरायच्या आहेत..
तुझीच..
माऊ

"एकला चालो रे..."

"म.टा. ला वाचलंस का?’मिथक’वाले तेंडुलकर नाट्य महोत्सव साजरा करणार आहेत..जायचं का?"
"अरे वा..तुझे आवडते लेखक ना ते??नाही गं..मला यायला जमणार नाही...एकदोन कामं उरकायची आहेत.."
"म्हणजे झालं...यावेळीही एक चांगला कार्यक्रम मी मिस करणार.."
मला ना हे कुणी सोबत असण्याची इतकी सवय होऊन गेलीये की कुठे एकटं जायला नको वाटतं..
जन्माला आले ती एकटी..तेही नाईलाज होता म्हणून कदाचित..
त्यानंतर मला प्रत्येक वेळी सोबत मिळाली..ती आजतागायत..
मित्र-मैत्रिणी भरपूर..त्यामुळे कुठे एकटं जायचा सवाल नाही...
पण ग्रॅज्युएशन नंतर सगळे भसाभसा सर्व दिशांना पांगले..आणि मला कंपनी मिळायची मारामार झाली...
म्हणजे जायचं असतं खूप ठिकाणी पण सोबत नसल्यामुळे राहून गेलं असं माझ्याबाबतीत बहुतेक वेळा झालं..
कालांतराने मी एकटी जायला शिकले..त्यातून नव्या ओळखी झाल्या..
मग अगदी देवाने पाठवल्यासारखा ’प्रिय’ भेटला...आणि दैवयोगाने त्याचे आणि माझे बहुतेक सगळे 'interests' सारखे..
त्यामुळे मी कुठे जायचा घाट घालायचा आनि ’प्रिय’ने ’हो’ म्हणायचं...असं अंगवळणी पडलं होतं..
पण..मला एक्झॅक्ट ठाऊक नाही कधी..पण तो माझ्याबरोबर यायला ’नाही’ म्हणाला..
तेव्हा ’असेल काहीतरी काम..नंतर कधीतरी जाऊ..’म्हणत मीही एकटं जायचं टाळलं होतं...
पण आज लागोपाठ दुसरयांदा???
माझ्या फ़ोनवरच्या प्रदीर्घ शांततेचा ’जाता येणार नाही म्हणून फ़ुगून बसली आहे’ असा सोयिस्कर (आणि अत्यंत अचूक) असा अर्थ लावून ’प्रिय’ मला समजावणीच्या सुरात म्हणाला..
"मी ’नाही’ म्हणणार आणि तू नाही जाणार..असं किती वेळा करणार तू??असे प्रोग्राम्स वारंवार होत नाहीत..आणि दुसरयाची सोबत वगैरे ज्या गोष्टी आपल्या कह्यापलीकडच्या आहेत त्यावर अवलंबून का रहा??एकटं जाऊन तर बघ...मजा येईल तुला.."
खरंच...असे कार्यक्रम वारंवार होत नसतात...आणि मला मनापासून या कार्यक्रमाला जायचेच होते..
आणि म्हणूनच ’प्रिय’चा सल्ला शिरसावंद्य मानून मी एकटी तेंडुलकर नाट्य महोत्सवासाठी यशवंत नाट्य मंदिरात दाखल झाले..
११चे नाटक आणि १०.३० वाजले तरी नाट्य मंदिरात शुकशुकाट होता..
भरमसाठ दाढी वाढलेला कुर्ताधारी बुवा, ज्या ’नियतीच्या बैलाला..’ नाटकाला मी आले होते त्या नाटकाचे pre-reading करणारी एक मध्यमवयीन बाई आणि मी, अशी आम्ही इन मीन तीन माणसे होतो..
त्या बाईच्या हातातले ’नियतीच्या बैलाला..’बघून तर मला जाम कॉम्प्लेक्सच यायला लागला..
माझ्या बॅगेत याक्षणाला एरीक सीगलचे ’लव्ह स्टोरी’ होते..
मला अचानक खूप थिल्लर वगैरे वाटायला लागलं..
एकतर माझ्याबरोबर बोलायला कोणी नाही आणि आहेत ती दोघं Good As Nothing...
ही दोन भुतं तर मी एक हडळ..असा मनातल्या मनात जोक पण करून बघितला..पण मलाही हसू आले नाही तेव्हा Self-Amusement चा नाद सोडला..
मी गप्पा उकरूनही काढल्या असत्या पण प्रतिसाद शून्य असेल तर काय घ्या??म्हणून मी थोडा वेळ बाहेर भटकायला गेले...
माझं रुपारेल कॉलेज एकदा डोळाभर पाहून घेतलं..लेमोनेडची तहान भागवून एकदाची पुन्हा त्या भुताटकीत आले..
बट इट वॉज नो मोर भुताटकी..
चांगली सत्तर एक माणसे जमली होती प्रयोगाला..
हिरवळ...हिरवळ...
शिट! इकडेही आमचे नशीब फ़ुटके..
त्या सर्व गर्दीत एक पाच फ़ूट आठ इंच मरून शर्ट, एक हळदी कलर कुर्ता आणि एक स्पायकर पँट एवढीच ’हिरवळ’ होती..
इनॉर्बिटला जायच्या त्या वाट चुकून यशवंत आल्यासारख्या वाटणारया तीन नवतरूणी माझ्या शबनम बॅगेकडे, माझ्या डिझायनर सॅंडल्सकडे बघून कुचूकुचू बोलत होत्या..
मी त्या गर्दीत घुसले..
नाट्यगृहाच्या परिसरात ’नाटक’ सोडून इतर विषयावर बोलायला बंदी असल्यासारखा त्यातला प्रत्येक माणूस चेहरा लांब करून गप्पा मारत होता..
मी अर्धी नाटकं ’प्रिय’बरोबर बघितली..पण नाटक सुरु होण्याच्या आधी नाट्यविषयक चर्चा. प्रायोगिक रंगभूमी असल्या गप्पा मारण्याचे धाडस नाही केले कधी..
आमच्या गप्पा म्हणजे..राज ठाकरेने भाषणात कुठल्या शिव्या वापरल्या??? किंवा तहसीलदार कचेरीतली अफ़रातफ़र किंवा तू माझ्याहून मूर्ख कसा??? अशा टाईपच्या...थोडक्यात ’नाटक’ सोडून काहीही..
एका ग्रुपजवळ थांबून मी ती लोक कशावर चर्चा करतायेत हे ऐकायचा प्रयत्न केला..
हरे राम..
कोण कशावर बोलतोय?? आपण बोलतोय त्याचा समोरच्याला संदर्भ लागतोय लागतोय का??याचा अजिबात मुलाहिजा राखायचा नाही असा निश्चय करून आल्यासारखी माणसं वाचाळत होती..
अर्थात याने समोरच्याला काही फ़रक पडत नव्हता कारण तो पण तशाच निश्चयाने बोलत होता...
एकच वाक्य ती मंडळी वेगवेगळ्या भाषेत रेकॉर्ड अडकल्यासारखी पुन्हा पुन्हा बोलत होती तरी बोंबलायला कोणाला पत्ताच नव्हता..
मध्येच मला एका बायकांच्या ग्रुपला ’तेंडुलकरांच्या नाटकांमधले वेश्यांचे स्थान काय हो??" असं विचारून फ़ेफ़रं आणण्याची जबरदस्त उबळ आली..पण मी ह्र्दयावर दगड ठेऊन ती आवरली..
साकल्याने, इत्यंभूत, मेन-स्ट्रीम...शब्द तर परिसरात तण माजावे तसे माजले होते...
ते तण बाजूला करत मी दरवाजापाशी आले आणि आम्हाला आत सोडण्यात आले..
आतला एसीचा सुखद गारवा अंगावर घेत बसले होते तेवढ्यात माझ्या बाजूच्या सीट वर स्थानापन्न झाला तो पा.फ़ू.आ.इं.म.श..(पाच फ़ूट आठ इंच मरून शर्ट)..
आहाहा!!...नाटकाचा वेळ काही वाईट जाणार नव्हता तर...
मी ताबडतोब ’प्रिय’ला केला की माझ्याबाजूला पा.फ़ू.आ.इं.म.श बसला आहे..
बस आता चरफ़डत..माझ्याबरोबर नाटकाला येत नाही काय??..
’मिथक’वाल्यांचे नमस्कार-चमत्कार झाले...आणि नाटक सुरु झाले..
मी ’नियतीच्या बैलाला..’आधी कधी वाचले नव्हते पण तेंडुलकरांचे नाटक..त्यामुळे ते भारी सिरीयस असेल यात तिळमात्रही संदेह नव्हता...
पण माफ़क विनोद होता...
पहिल्या विनोदाच्या वेळी मी आपलं नेहमीचं सातमजली हो..हो..हो करून हसले..
आणि माझं हसणं विरत असताना मला बाजूने ’खिक’ ऐकू आलं..
मला धक्काच बसला..
ते ’खिक’ ’पा.फ़ू.आ.इं.म.श’चे होते..
प्रत्येक विनोदाला माझे ’हो..हो’ आणि त्याचे ’खिक खिक’..
पहिला धक्का ओसरला आणि मी ते ’खिक’ एंजॉय करायला सुरुवात केली..
त्याच्या अदमासे सहा फ़ुटी देहाला न शोभणारे ते ’खिक’ ऐकत मी प्रत्येक वेळी नव्याने खिदळत होते..
इंटरवलमध्ये त्या नवतरूणी येऊन ’तुम्ही ही बॅग कुठून घेतली हो?’ विचारून गेल्या...एक मावशी येऊन "Beta..Where did you have your hair-cut?" अशी चौकशी करून गेल्या..माझ्या पुढच्या काकांनी "तू सेम माझ्या पुतणीसारखी हसतेस!" म्हणून कॉंप्लीमेंटस (?) दिल्या.....पा.फ़ू.आ.इं.म.श माझ्याच कॉलेजचा एक्स-स्टुडंट निघाला..
मी जेव्हा कोणाच्या सोबतीने कोठे जाते तेव्हा माझ्या बाजूला कोण बसलंय, कोण काय बोलतोय, कोण आपल्याकडे बघून कुजबुजतोय..या गोष्टींकडे माझे लक्षच नसते...किंबहुना त्यांच्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही...
पण आज तरणोपाय नसल्यामुळे या गोष्टी मी बघितल्या..अनुभवल्या..आणि माझ्या लक्षात आलं की ’प्रिय’ मला ’मजा वाटेल तुला’ असं का म्हणाला होता ते...
’प्रिय’ बरोबर असताना किंवा दुसरं कोणीही बरोबर असताना भोवतालच्या जगाशी नातं तोडून घ्यायची एक विचित्र खोड मला लागली होती..
’प्रिय’ आणि मी असा विचित्र कोष मी माझ्याभोवती बनवून घेतला होता..
आणि त्यामुळे भोवतालच्या लोकांना नोटीस करणं, ती लोकं आपल्याला कुतुहलाने बघतायेत, आपल्या ’प्रेझेंटेबल’ अवताराबद्दल काही लोकांच्या नजरेत कौतुक आहे ..हे सारं बघणं...अनोळखी माणसांशी संवाद साधणं...It was long forgotten..!
वेल..’प्रिय’ knew it..त्याला नेहमीच सगळं माहीत असतं...
आणि मी पूर्णतया विसरायच्या आधी माझ्या हे ध्यानात आणून देणं ’प्रिय’ला गरजेचं वाटलं..
आणि म्हणूनच तो मला ’नाही’ बोलला होता...
मी मला झालेला साक्षात्कार ’प्रिय’ला बोलून दाखवला तेव्हा तो नेहमीसारखंच समजूतदार हसला..मिशीतल्या मिशीत!
तो तर नेहमी म्हणतो..थोरामोठयांची वचने नेहमी लक्षात ठेवावीत..
रविंद्रबाबूंनी उचितच म्हटलेय आणि मी करंटी उगीचच त्याच्याकडे काणाडोळा करत होते..
"एकला चालो रे..."

एका रात्रीच्या फ़ुलपाखराची कहाणी..!

’योरोईदो’ गावात कोळ्यांच्या वस्तीत राहणारी एक छोटीशी मुलगी..
चियो साकामातो.
आपल्याकडे दोन शेंडया घालणारी चिऊ असेल तशीच ही निळसर राखी रंगाचे डोळे असलेली जपानी चियो..
घरात अठराविश्वे दारिद्रय, आई बोन-कॅन्सरने आजारी, पहिल्या कुटुंबाच्या आकस्मिक निधनाने अकाले म्हातारे झालेले वडील, पोटाखेरीज आणखीनही भुका जागृत झालेली मोठी बहीण-सात्सू..
अशा हलाखीत आपली चियो काय करते?
काहीच नाही..
करण्यासारखं काही नसतंच तिच्याकडे..
असं झालं तर काय होईल आणि तसं झालं तर कसं? अशा कल्पनेच्या भरारया मारत, दिवास्वप्नं रंगवत चियो एकेक दिवस ढकलत असते..
अशातच..
योरोईदोचे असामी ’तानाका सान’यांची ’मेहेरनजर’होते आणि चियोची रवानगी सात्सूसकट ’गियोन’ परगण्यातल्या नित्ता ओकियात होते..

नित्ता ओकिया हे एक ’गेशा हाऊस’ आहे..

थोडक्यात तानाकांनी सात्सू आणि चियोला श्रीमती नित्तांना विकलेलं आहे..
चियो अधिक सुंदर असल्यामुळे तिला नित्ता ओकियात ठेऊन घेतात आणि सात्सूची रवानगी भलत्याच कुठल्यातरी परगण्यातल्या कमी दर्जाच्या ओकियात (जोरोऊया) होते..
अशा बहिणीच्या ताटातूटीपासून सुरु होते चियो नावाच्या ’होऊ घातलेल्या’ गेशेची कहाणी..
आर्थर गोल्डन यांनी उधृत केलेली चियो उर्फ़ नित्ता सायुरीची ’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’!

****

दिवसाढवळ्या जे घडतं त्याचा रात्री बंद दरवाजाआड घडणारया गोष्टीशी सुतराम संबंध नसतो या जपानी लोकांच्या ठाम समजुतीवर गेशांचे अस्तित्व पूर्वापार टिकून राहिले आहे..

’वेश्या’ आणि ’गेशा’ या दोन्ही अभिसारीकाच पण वेश्या ह्या गेशांपेक्षा खालच्या दर्जाच्या असतात..
गेशा होण्याकरता गायन, वादन, नृत्य, सरबराईचे यथासांग शिक्षण घ्यावे लागते..
शिवाय घरंदाज गेशा या कुठल्याही पुरुषाला एका रात्रीपुरता आपले शरीर वापरू देत नाहीत..एखाद्या पुरुषाकडून सोयी-सुविधा आणि योग्य मोबदला मिळत असेल तर वर्षानुवर्षे संबंध ठेवणे त्या पसंत करतात..नाहीतर ’दान्ना’ शोधतात..
’दान्ना’ म्हनजे असा पुरुष जो एखाद्या गेशेला आयुष्यभर ठेऊन घ्यायला तयार आहे..तिचा सगळा खर्च उचलायला तयार आहे.
असा दान्ना मिळणं म्हणजे गेशेचं सुखनिधानच जणू काही..
गेशा लग्न करत नाहीत पण आपल्या दान्नाची आयुष्यभर संगत-सोबत करतात, त्यांचं मन रिझवतात..

****

तर....
पम्पकीन नावाच्या एका समवयीन मुलीबरोबर चियोचं गेशा ट्रेनिंग सुरु होतं..
चियो एक नामांकीत गेशा होणार हे उघड असल्याने नित्ता ओकियातली एकमेव लावण्यखणी गेशा ’हात्सुमोमो’ तिचा रागराग करते, तिचं खच्चीकरण करते, तिला शक्य तितक्या अडचणीत आणायला बघते..
चियो आपल्या बहिणीचा शोध घेऊन तिच्याबरोबर पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करते...
तिच्या या गुस्ताखीमुळे श्रीमती नित्ता तिचं गेशा ट्रेनिंग बंद करतात..आणि तिला मोलकरणीसारखं राबवून घेतात..
अशाच एका हताश क्षणाला चियोला ’चेयरमन’ भेटतो..चियो पहिल्या भेटीतच त्याच्याकडे ओढली जाते आणि चेयरमनपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून ती तिच्या गेशा होण्याकडे पाहायला लागते..
चित्रपटसृष्टीत जसा गॉडफ़ादर तशी गेशा व्यवसायात शिकाऊ गेशेला योग्य ’मोठी बहीण’ मिळणे आवश्य़क असते कारण तीच आपल्या ’कॉन्टॅक्ट्स’ना आपल्या लहान बहिणीची ओळख करून देऊन तिच्यावर कृपानजर ठेवायला सांगते..
चियोच्या सुदैवाने मामेहा नावाची नामांकीत गेशा तिला मोठी बहीण म्हणून मिळते आणि चियो या शिकाऊ गेशेचं नामकरण ’सायुरी’ असं होतं..
तिथून मग चियो उर्फ़ सायुरी कधीच मागे वळून पाहत नाही..
’गेशा’ म्हणून तिची कारकीर्द सुरु होते ती तिचं इप्सित साध्य केल्यावरच थांबते...चेयरमनला ’दान्ना’ करून घेतल्यावरच!

****

पूर्वी परयांना शाप असायचे म्हणून त्या भूतलावर जन्म घ्यायच्या..आणि मुक्तीची वाट बघत भूतलावरच थांबायच्या...
या परीला केवळ रात्रीच भिरभिरणारं फ़ुलपाखरू बनून राहण्याचा शाप होता की काय कोण जाणे?..
’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’ ही मला अशाच एका उ:शाप नसलेल्या परीची कथा वाटली..
पूर्वी ’ओशीन’ वाटली होती तशीच..
गेशांनी आपलं जीवन कुणासमोर उघडं करू नये हा पूर्वापार पाळला गेलेला संकेत आहे जो नित्ता सायुरींनी पण पाळला..
त्यांची ही कथा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आली..
भरपूर वादविवाद झडले...आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडला..पण त्यामुळे केवळ रात्रीच बहरणारे एक निराळंच जग आपल्यासमोर आलं..
गेशांचा ’मिझुआबे’..’मिझुआबे’साठी कुमारी गेशांवर लावलेल्या चढत्या भाजणीतल्या बोली यासारख्या तिडीक आणणारया कथा जगासमोर आल्या..
’गेशा-संस्कृती’ जगासमोर आली जी आजपावेतो जाणिवपूर्वक पडदाशीन ठेवण्यात आली होती..
जपानमध्ये आजही गेशा-संस्कृती आहे..
पण ही माणसं अस्तित्वातच नाहीत अशा भ्रमात जगणारया प्रत्येक माणसाला सायुरींनी सत्याची जाणीव करून दिली..
त्यांची प्रातिनिधिक कहाणी मांडून..
’द मेमॉयर्स ऑफ़ अ गेशा’- एका रात्रीच्या फ़ुलपाखराची कहाणी!

आनंदाचे डोही..

परवा बरयाच दिवसांनी ’प्रिय’ची भेट झाली..
आला तो हातात काहीसं लपवूनच..
’प्रिय’ने मला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी आणावं म्हणजे अघटीतच...
नाहीतर सरप्राईझेस, गिफ़्ट्स, चॉकोलेट्स, कुठेतरी लपून बसून मागून "भ्वॉक" करणे, बॉक्समागून बॉक्स खोलायला लावून आतल्या गिफ़्ट्साठी ’प्रिय’ला रडकुंडीला आणणं हा प्रांत माझ्याकडे आहे..(हे सर्व करताना स्थळ-काळ-वेळ यांचा अजिबात विधिनिषेध नाही)
"आपले स्वागत असो.." असे म्हणून त्याने मागून निशीगंधाच्या डहाळ्यांचा मोठ्ठाच्या मोठ्ठा गुच्छ काढला..
"तुला आवडतो म्हणून.."
सकाळी ९ वाजता त्याने कुठल्या फ़्लोरिस्टाकडून निशीगंध मिळवला होता कोण जाणे?
"थॅंक्स रे..खरंच सुंदर आहेत.."
यावर भरून पावल्यासारखा ’प्रिय’ हसला..
मला ठरवताच येईना..
’प्रिय’ला भेटायला गेले ती सकाळ अधिक सुंदर का तो निशिगंध सुंदर का ’प्रिय’चं आतबाहेर शुभ्र हास्य अधिक सुंदर..?
त्या क्षणी मी खूप आनंदात होते..
इतकी आनंदात की मी अतिशय पॉवरफ़ुल असा ’पेट्रोनास’ तयार करून डिमेंटर्सची झुंडच्या झुंड परतवून लावली असती..(हॅरी पॉटर न वाचलेले वाचक...क्षमस्व!)
आपल्याला एवढा आनंद झाल्याला किती दिवस झाले??
वर्षे तर खासच नाहीत..
परवापरवा पर्यंत कात्रजच्या बागेत पिसारा फ़ुलवून मनमुक्त नाचणारा मोर बघून मी अशीच हरखून गेले होते..
त्यावेळी ’प्रिय’ त्या मोराच्या पिंजरयातील लांडोरी दुसरया पिंजरयातल्या पिसारा अजिबातच न फ़ुलवलेल्या मोराला ’लाईन’ का देत होत्या??याच्या ऍनालिसीस मध्ये गढला होता)
जगात माझ्याइतकं आनंदी कोणीच असू शकत नाही..असं मला कधी वाटलं??
का वाटलंच नाही कधी??
वेल, वाटलं...खूप खूप वेळा वाटलं..

---------------

आता या क्षणी उपांत्य विशारदचा सराव करताना केलेली ढोर मेहनत आठवतेय, घोटवून घेतलेला ’धमार’ आठवतोय..
त्यावेळचा आमचा सराव पाच पाच तास तबलजी आणि पेटीवाले यांच्या सोबतीने चालायचा...
’धमार’ मधली ततकारची बाँट करताना आमची जाम फ़े-फ़े उडायची...विशेषत: दृत लयीत..
दीड किलोचे घुंगरू प्रत्येक पायात घालून ही बाँट करताना आमच्या पायाचे खरंच तुकडे पडायचे..
अशाच एका सरावाच्या वेळी तबलजींनी लय अतिदृत केली..आणि मी सोडून बाकी सगळ्यांनी शरणचिठ्ठी स्वीकारली..
तो अतिदृतमधल्या बाँट्चा गोवर्धन पेलून मी समेवर आले तेव्हा तबलजींच्या ’क्या बात है..!’ या प्रशस्तिपत्रकामुळे मला अस्मान ठेंगणे झाले होते..

---------------

इंजिनीयरींगचे दिवस..
कोणाच्या थ्रो-बॉलच्या सर्विसच्या प्रेमात पड, कोणाच्या अक्षराच्या प्रेमात पड असे प्रकार चालू असताना रेखा भारद्वाजने गायलेलं ’तेरे इश्क में’ ऐकण्यात आलं...आणि मी थरारून गेले ..
"बादल धुने, मौसम बुने
सदिया गिनी, लम्हें चुने
लम्हें चुने, मौसम बुने
कुछ गर्म थे, कुछ गुनगुने
तेर इश्क में..कब दिन गया...कब शब गयी.."
ऐकलं आणि वाटलं...च्यायला...असं काहीतरी भव्यदिव्य आपलं प्रेम असलं पाहिजे..
’प्रिय’ला भेटले आणि ’दिल सुफ़ी ये था’ची सुरावट मनात फ़िरून पूर्ण झाली..
सगळ्यांना सगळंच मिळतं असं थोडीच असतं...?
पण ज्यांना ईप्सित मिळतं अशा थोडक्या लोकांपैकी मी एक होते ही काय कमी आनंदाची गोष्ट आहे??

---------------

इयत्ता आठवी...
महाजन सर इंटरमिडीएट एक्झामची तयारी करून घेत असत..
माझं बाकी सगळं ओ.के. होतं पण ’स्मरणचित्राच्या’ नावाने शंख होता..
मला मुळी माणसं काढताच यायची नाहीत..
मी अशीच रडकुंडीला येऊन मी कागदावर चितारलेल्या ’होपलेस’ माणसांना(?) पाहत होते...
तेव्हा महाजन सरांनी मला एखाद्या पाककृतीसारखा माणूस ’बनवायला’ शिकवला होता...
मी पहिला ’बांधेसुद’ माणूस काढला तेव्हा हर्षातिरेकाने आरोळीच ठोकली होती..
(ता.क:मी इंटरमिडीएट पास झाले)

---------------

इयत्ता दुसरी
शाळेत गोकुळाष्टमी साजरी व्हायची होती..आणि अस्मादिकांना श्रीकृष्णजन्माची कथा सांगायची होती..
आयुष्यातलं पहिलं-वाहिलं वक्तृत्व..ते पण तो चनिया-चोलीचा मला न पेलणारा बोंगा सावरत, नाकात खाज आणणारी ती खोटी नथनी सांभाळत, डोक्यावरून सारखी ओघळणारी ती तिपेडी बिंदी चाचपडत करायचं म्हणजे..
आई नाही का मला इंजेक्शन घेताना नेहमी सांगायची..."बस्स एक मिनीट....झालंच.."
तसं मी स्वत:ला समजावत माझी भाषण-एक्स्प्रेस भरधाव सोडली..
कथा संपल्यानंतर धापा टाकत थांबले तेव्हा कळले की सगळ्यांना कथा आवडलेली आहे आणि मुख्य म्हणजे ती सगळ्यांना कळली आहे (सुदैवाने!)
तेव्हा आईच्या डोळ्यातलं कौतुक पाहून मला असाच काहीसा वर्णनातीत आनंद झाला होता..

---------------

असे बरेच आनंद आहेत...
टोकियोचे मेडल, ’मेरा कुछ सामान’ पहिल्यांदा ऐकलं तो क्षण, पहिली कविता, बोर्डात येणे, भांडून मिळवलेले हक्क, पहिली स्वकष्टाची कमाई, ’प्रिय’ला चर्चेत भारी पडले तो क्षण, एट्सेट्रा...एट्सेट्रा...
लहानपणीचे माझे आनंद कदाचित आजच्या या घडीला क्षुल्लक वाटतील...
पण आजही ते क्षण काळाच्या सीमा न बाळगता मला तसेच्या तसे आठवतायेत..
पुढे वय वाढलं, जाणिवांचा विस्तार वाढला आणि मग अशा अवर्णनीय आनंदाच्या व्याख्या बदलायला लागल्या..
पूर्वी मला आनंद झाला की मी दोन्ही मुठी अशा हवेत नाचवत ’येsss’ करून ओरडायचे..
नंतर नंतर माझ्या आनंदाला बॅकग्राऊंड म्युझिक आलं..
रंग आणि गंध आला..
हल्ली हल्ली मला आनंद झाला की मोझार्टच्या झाडून सगळ्या सिंफ़नीज एकाचवेळी मनात वाजायला लागतात..नाहीतर आशा-ताईंचं लाडीक ’आज मैं खुश हू...की तुम ही बोलो मै हु खुश क्यु?"...ऐकायला यायला लागतं..
माझा आनंद हा ’निळ्याशार’ कलरचा असतो..आनंद झाला की मला या रंगासारखंच cool, calm आणि compose वाटायला लागतं..
माझ्या आनंदाला अष्टगंधाचा वास येतो...’प्रिय’च्या शर्टाला नेहमी येतो तसा..!

---------------

अशाच आपल्यामध्ये बिलकुल न मावणारया ,आपल्याला फ़ोडून बाहेर येईल की काय? असे वाटणारया आनंदाला शब्दात कसं वर्णायचं असतं??
प्रश्नाचं उत्तर मिळेचना तेव्हा ’प्रिय’ला विचारलं..नेहमीसारखंच..
तो म्हणतो शब्द अपुरे पडत असतील तर तुकोबांना शरण जावं..
आणि मला जाणवलं...माझ्या आनंदाचं वर्णन तुकोबा किती यथार्थ शब्दात करून गेलेत..
ते म्हणतात...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदचे..!

इतके अचूक शब्द सापडलेत की तोच निळाशार आनंद मला पुन्हा एकदा झालाय..
आताही मला बीथोवनची सातवी सिंफ़नी ऐकायला येतेय..
असा आहे मला नेहमी होणारा रंग-गंध वाला, audible आनंद!
आनंदाचे रंग-गंध-आवाज बदलतील कदाचित...पण आनंदाची व्याप्ती या शब्दांपलीकडे कधीच जाणार नाही...
तुकोबांच्या चरणी आपले दंडवत!

क्षण तो क्षणात गेला...हातचा सुटोनि..!

मला एकटं पाडणारे क्षण माझ्यापासून माझ्या प्रियजनांचा सहवासही हिरावून घेतात...
आज तर ’प्रिय’सुद्धा मला म्हणाला..
"तू सारया जगाचा राग माझ्यावर काढतेस..घडीघडी अस्वस्थ व्हायला तुला होतं काय??"
चक्क ’प्रिय’ने मला हे म्हणावं???
मला वाटायचं ’प्रिय’ला कळू शकेल..ज्यांना उत्तरं नाहीत असेच प्रश्न मला नेहमी का पडतात ते???
क्षणोक्षणी माझ्यावर कोणती बेचैनी गारूड करते ती..
जिवाला स्वस्थता का मिळत नाही ते??
पण आज त्यानेच पांढरा बावटा दाखवल्यावर माझं अवसानच गळलं..
माझं एकटेपण कोणी समजून घेऊ शकत नाही हेच खरं..
मी घराबाहेर पडले..
आमच्या घरापासून फ़क्त १० मिनीटाच्या अंतरावर समुद्र आहे..
समुद्र आणि त्याला अर्धचंद्राकारात वेढून टाकणारी सुरूची बाग!
समुद्राची गाज अगदी दुरुनही ऐकायला येत होती..भरतीचा समुद्र वेड लागल्यागत गर्जत होता..
समुद्राचं रोंरावतं, गर्जना करणारं भरतीचं रूपच मला आवडतं...ओहोटीच्या वेळचा समुद्र एखाद्या हतप्रभ वीरासारखा वाटतो..
एरवी एकतर पायाला गुदगुल्या करणारया लाटांना अनुभवत मी किनारयावरच घोटाभर पाण्यात उभी असते किंवा वेगवेगळ्या कलाबतू असणारे शंख-शिंपले तरी गोळा करत असते..
पण आज माझ्या मनात काही वेगळंच असावं..
त्या शंख-शिंपल्यांकडे ढुंकूनही न बघता, माझ्या आजूबाजूने तुरूतुरू धावणारया चिंबोरयांची अजिबात दखल न घेत मी भस्सकन पाण्यात पाय टाकले..
आणि सरळ आत आत जायला सुरुवात केली...
माझा सर्व राग आज मी माझ्या सर्वात आवडत्या समुद्रावर काढणार असते...
मला पडणारे सर्वच्या सर्व प्रश्न घशाच्या तारा ताणून,किंचाळून त्याला विचारणार असते..
फ़ताक फ़ताक पाणी उडवत मी लाटांमधून रागारागात वाट काढायला सुरुवात केली..
पायाखाली एखादा शिंपला हुळहुळत होता...
मी सरकत्या वाळूवर पाय भक्कम रोवत हळूहळू पुढे सरकत होते..
लाटांशी झगडून थकलेल्या पायांनी असहकार पुकारल्यानंतर मी थांबले..
एव्हाना कंबरभर पाण्यात मी आले होते..
खालची वाळू मला तोंडघशी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती..
आणि मी तिच्या प्रयत्नांना तसूभरही दाद न देता छद्मीपणे हसत तोल सावरत उभी होते..
आणि अचानक मला ती दिसली..
मला जणू काही धडाच शिकवायच्या इराद्याने सर्व प्रवाही जलकणांची अमोघ शक्ती आपल्यात एकवटून माझ्या दिशेने झंझावातासारखी येणारी ती लाट..
मी तिच्याकडे पापणी लवमात्र न हलवता फ़क्त पाहत होते...तिकडून पळून माघारी किनारयाकडे जावं...असा विचार माझ्या मनाला शिवलासुद्धा नाही..
इन फ़ॅक्ट..माझ्या संवेदनाच नष्ट झालेल्या होत्या..
तिच्यात आणि माझ्यात फ़क्त एका फ़ुटाचं अंतर राहिलं आणि..
पोटात कसं तळापासून ढवळून आलं..
जमिनीपासून पाय सुटतील का काय? असंच वाटायला लागलं..
आतापर्यंत वाळूत उद्दामपणे ताठ उभे असलेले माझे पाय लटलट कापायला लागले..
ती लाटेची भिंत माझ्यासमोर उभी ठाकण्याआधी एक क्षण माझ्यावर भीतीने पगडा केला..
क्षणागणिक तिचे माझ्या जवळ येणे पाहताना माझ्या डोळ्याच्या बाहुल्या पार उर्ध्व लागल्यासारख्या झाल्या..
लाट आ वासून माझ्यावर झेप घातली आणि मी माझे डोळे गच्च मिटून घेतले..
तो एक क्षण माझ्या डोळ्यासमोर आई आणि ’प्रिय’चे चेहरे तरळून गेले..
आणि..
संपलंच आता सारं! असं वाटेपर्यंत लाट मला ओलांडून पार झालेली होती..
क्षणभरात..
मी चिंब निथळत उभी होते..
तिची मस्ती, तिची रग माझ्या अंगाअंगाला स्पर्शून गेलीली होती..
माझ्याही नकळत माझ्या छातीचे ठोके वाढलेले होते..
माझ्या तोंडून एक दोन मिनीट्स एक शब्द फ़ुटायला तयार नव्हता..
केसा-कपाळावरचं खारट पाणी निपटत रोखून धरलेला श्वास सोडून मागे बघितले तर ...
तीच लाट मला वाकुल्या दाखवत किनारयाशी गुजगोष्टी करत होती..
त्या एका क्षणापुरता माझं भान सुटलेलं होतं..
त्या क्षणाला मी न्याय देऊ शकलेले नव्हते..
माझ्या सर्व संवेदना एकवटून मी तो क्षण जगू शकले नव्हते...
काही सेकंदापुरता भेटलेल्या मृत्युला नीट आकळून घेऊ शकले नव्ह्ते..
पुन्हा एकदा पराभूत मी..
घरी आले तर एव्हाना माझ्या मोबाईल वर चिंतातुर ’प्रिय’चे ४० मिस्ड कॉल पडले होते..
मी त्याला फ़ोन लावला आणि जे घडले ते सगळे त्याला सांगितले..
"तू ना....खरंच...मला वाटलंच होतं तू तडमडायला समुद्रावर जाशील.."
"..."
"सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत असा अट्टाहास का असतो तुझा??...प्रत्येक क्षण असा सगळाच्या सगळा उलगडून तुझ्यासमोर आला पाहिजे ही तुझी अपेक्षाच अचाट आहे.."
".."
"काही गोष्टी गूढगहिरया असतात...असीम असतात..अज्ञात असतात..अफ़ाट असतात...त्यांचे अफ़ाट अस्तित्व मान्य करण्यातच शहाणपण असतो...आजच्या लाटेने तुला काय शिकवलं??"
".."
"मी सांगतो ना...त्या क्षणी ताळ्यावर राहून तुला मृत्यू अनुभवायचा होता..आला अनुभव??क्षण तो क्षणात गेला...हातचा सुटोनि.."
".."
"आला क्षण अनुभवावा...!’अनुभवावा’..’जोखू नये’...!त्याला कळून, आकलून, पारखून घेण्याची जिद्द बाळगू नये..प्रसंगी त्यात वाहावत जावं...
".."
"हे आहे हे असंच असतं गं...आपल्या जिवाला त्रास करून घेण्याने किंवा ’कसं कळत नाही बघतेच मी’ म्हणून आकांडतांडव करण्याने त्याचं असं असण्यात बदल होणार नसतो..हे सर्व आपल्या आवाक्याबाहेरचं आहे गं..आणि तू हे एकदा मान्य केलंस ना...की बघ तुला कशी स्वस्थता लाभेल.."
"खरंच लाभेल??"
"माझ्यावर विश्वास ठेव.."
’प्रिय’वर विश्वास नाही ठेवणार तर कोणावर??
जो सुटला तो क्षण आपला नव्हताच मुळी किंवा तो कळून घ्यायची आपली लायकीच नव्हती असं स्वत:ला समजावण्याने खरंच जिवाला शांतता मिळते??
बघितलं पाहिजे..

एक ’इंटरप्रीटेड’ कहाणी..!!

एक होते आटपाट नगर...
आटपाट नगराची होती एक राजकुमारी...
आता ही राजकुमारी कोण याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू नका...
ही राजकुमारी कुणीही असू शकते...तुमची शेजारीण, तुमची सेक्रेटरी, तुमची टीम-मेट, सखी कुणीही..खुद्द तुमची बायको सुद्धा..
भावी ’मी’ असण्याची शक्यता??ह्म्म...थोडीफ़ार..
पण नसण्याचेही चान्सेस नाकारता येत नाहीत...
बरं...
तर आटपाट नगराची राजकुमारी आणि मांडलिक राजाचा अतिशय लाघवी पुत्र यांची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्ण होते तेव्हापासून आपली कहाणी सुरू होते..
थोडक्यात प्यार के बीच में कांटे, मुलीच्या बापाचा थयथयाट, दोन्ही साईडच्या आयांचा अश्रुपात, खानदान की इज्जत असे काहीही ’वंगाळ’ प्रकार न होता ती दोघं सुखेनैव नांदू लागतात..
साधारण वीस एक वर्षानंतरचा प्रसंग..
राजा नुकताच राज-दरबार आटपून आलेला आहे...आणि राणी-कक्षात अस्वस्थपणे येरझारया घालतो आहे..
राणी कुठुनतरी दमून भागून येते...तिला बसायचीही फ़ुरसतही न देता राजा पुसता होतो..
"कुठे होतीस एवढा वेळ??"
"तुला सांगूनच तर गेले होते...माझे साक्षरता वर्ग असतात या वेळात..आज तर शिबीरही होतं..फ़ार छान झालं...१०० योजने परिसरात आपल्याइतकं साक्षर राज्य नाही माहीत्येय तुला?"
"आणि काय गं? साक्षरता वर्ग चालवायचे तर हा खादीचा कळकट्ट झब्बा कशाला घालायला हवा???आणि ही शबनम???तुम्हा सोशल-वर्कर्सचा हा ड्रेस कोड आहे वाटते??"
"सारकास्टीक टोनची गरज नाही..बाहेर वैशाखवणव्यात तू हे चिलखत घालून हिंडतोस तेव्हा एका शब्दाने बोलते का मी?"
"त्यात बोलण्यासारखे काय आहे?एखाद्या राजाला शोभतील अशीच वस्त्रे परीधान करतो मी.."
"दॅट्स इट...या वर्गांच्या, शिबीरांच्या निमित्ताने मला गावागावातून हिंडायला लागते...कपडे मळतात...म्हणून असे मळखाऊ कपडे घालते मी..आपल्या कामाला साजेसे कपडे घालावेत"
"काय अवतार झालाय तुझा...चेहरयाची पार रया गेलीये..कशी छान केतकीसारखी कांती होती.."
"आता माझा कळवळा?अशी होते तेव्हा माझ्याकडे बघायला फ़ुरसत नव्हती तुला..तेव्हा तर जसा काय २४ तास पिंगाच घालायचास माझ्याभोवती..?"
"मला राज्याचा कारभार करायचा होता.."
"अहा रे राजा...राज्याचा प्रतिपालक याचबरोबर एका स्त्रीचा नवरा, मुलांचा बाप म्हणून काही कर्तव्ये होती...त्यांचे काय झाले मग?"
"सगळे तर आहे तुमच्याकडे...कपडालत्ता, दास-दासी, जायला यायला रथ-घोडे.."
"होल्ड इट...हे सर्व माझ्याकडे ऑलरेडी होतं..माझ्या बाबांचं...किंबहुना...आता जे काही आहे ते पण त्यांचेच.....यात ’तुझे’ असे काय आहे??"
"राणीसाहेब.."
"आवाज चढवू नकोस..सत्य झोंबलं का तुला? बाबांनंतर सारा कारभार मी चालवणार होते...तुझ्या सोबतीने...तर तू स्वत:ला राज्याभिषेक करून मोकळा!..आणि माझी जागा? राणीवशातल्या एका भोग्य स्त्रीची...जिला कपडे चढवून मिरवायला न्या...आणि वाटल्यास तेच उतरवून भोगा..असं कोपरयात ढकललं गेल्यावर मग म्हटलं ..चला, संसार करून बघुयात..तोच आजवर चोख केला..."
"हो..म्हणूनच नवरा घरी आल्यावर बायको घरी नसते.."
"एक बायकोचं फ़क्त तेवढच कर्तव्य असतं का रे?मला कीव करावीशी वाटते तुझी..आणि फ़क्त फ़िजीकल प्रेझेन्स एवढाच Criteria असेल तर माझ्या,मुलांच्या आजारपणात, त्यांच्या ऍडमिशन्सच्या वेळी, त्यांना काही अडलं-खुपलं धीर द्यायला तू कधी होतास??"
"ते मला काही माहीत नाही..मला उद्यापासून तू राजवाडयावर हवीस...मला हवी तेव्हा...मला लागशील तेव्हा.."
"आणि तू...तू असणार आहेस मला लागेल तेव्हा...मला गरज पडेल तेव्हा..?"
"मला तेव्हढा वेळ नाही..मला राज्य......"
"अहा रे पुरूष..दुसरयाकडून बरयाच सारया अपेक्षा करायच्या आणि आपल्यावर ती वेळ आली की शेपूट घालून पळायचं...मला आता हे काही जमणार नाही..मला माझी दिशा सापडलेली आहे..आणि त्यासाठी मला तुझी मर्जी सांभाळण्याची बिलकुल गरज नाही..आणि स्वत:चं विश्व उभारण्याइतकं कॅलिबर माझ्याकडे निश्चितच आहे"
"म्हणजे माझ्याकडे कॅलिबर नाहीये असं म्हणायचय का तुला?"
"मला असं काही म्हणायचं नव्हतं..तुझ्या कॅलिबरची मुळी गोष्टच निघाली नव्हती.."
"या वयात हे धंदे...मुलांना काय वाटेल?"
"मुलं जाणती आहेत..आणि मी जे काही करते त्याबद्दल त्यांना ऊरभर अभिमान आहे.."
"त्यांनाही फ़ितवलयंस वाटतं?"
"हे तू त्यांनाच जाऊन विचारशील तर बरं..त्यानिमित्ताने मुलांना भेटशील..."
"तुझा निर्णय झालाय तर?"
"इतका ठाम...की याआधी हे मला कसे सुचले नाही असं वाटतं आता..."
इतकं बोलून ती वळली..एक मोठ्ठा श्वास घेतला..
स्वातंत्र्याचा!
कहाणी तीच...पात्रही तीच...फ़क्त त्यांची ओळख बदलली..
’ओळख’या शब्दाशी प्रथम ओळख झाल्यानंतची स्त्री देखील बदलली...
स्त्री खरया अर्थाने मुक्त झाली...
इथं तुम्ही या कथेला सोयीनुसार ’इंटरप्रीट’ करू शकता...स्त्रीची ओळख तीच ठेऊन..अर्थात!
राजाच्या जागी येऊ शकतो...एखादा कॉर्पोरेट इंटरप्रुनर...किंवा एखादा प्रतिथयश वकील...किंवा कोणीही!
राज्य बळकावून स्वत: गादीवर बसणे या सिच्युएशन चा अर्थ..बायकोला काम सोडायला लावून घरी बसवणे...
वाटली तर साधीसुधी पण इंटरप्रीट करता आली तर वास्तवदर्शी..भलेही आटपाट नगरातली का असेना!
'Woman Emancipation' च्या नावाने बोंबाबोंब करणारया माणसांना हा राईचा पर्वत वाटण्याची शक्यता जिच्यात..
अशी ही आटपाट नगरातल्या राजाराणीची ’इंटरप्रीटेड’ कहाणी..!

तिरक्या...एली..आणि कालचा पाऊस..!!

तीर्थकर भयंकर अस्वस्थ होता..
दोन दिवस एलीचा पत्ता नव्हता...फ़ोन out of range लागत होता...
आज सकाळपासून एअरटेल ऑपरेटरची तीच तीच बकवास ऐकून तो अगदी कंटाळून गेला होता...
आहे कुठे ही पोरगी???मला सांगून जात नाही असं तर कधीच होत नाही..
सकाळपासून आभाळ नुसतं भरून आलं होतं...सोसाट्याचा वारा सुटला होता...
पहिलाच पाऊस मुसळधार पडणार अशीच चिन्ह होती...
ह्या पोरीला नक्कीच या सोसाट्याच्या वारयात adventures करायची हुक्की आली असणार...
मागच्या वेळी सोसाट्याच्या वादळात ’डयुक्स नोज’ पाहायला गेली होती कार्टी..
पुन्हा एकदा फ़ोन लावायला रिसीव्हर उचलणार इतक्यात फ़ोन वाजायला लागला..
तीर्थकर भूत पाहावं तसं फ़ोनकडे बघत राहिला..
फ़ोनवरून विचारणा झाली..
"तिरक्या...??"
तीर्थकरला अशा अतरंगी नावाने हाकारणारी फ़क्त एकच व्यक्ती आहे....
एली...
एरवी तीर्थकरला आपल्या नावाचा ऊरभर ठासून अभिमान आहे..पण एलीसमोर कोणाची बोलायची टाप आहे???
जगासाठी तो तीर्थकर पण एलीसाठी तो तिरक्या..!
"तिरक्या...मी खाली रिसेप्शनला उभी आहे...लवकर निघ.."
"अग पण एली..."
"कोणालाही मार...आजारी पाड...मला सांगू नकोस...i want you downstairs in 5 minutes from now.."
एली भन्नाट आहे...तिच्या नावासारखीच...
तिचं नाव एलिझाबेथ...चारचौघींसारखी अल्पना, पर्णिका किंवा कुठलीतरी कपर्दिका अशी नावं न ठेवता तिच्या वडीलांनी तिचं नाव एलिझाबेथ ठेवलेलं..
आणि वडीलांनी ठेवलेलं म्हणून तिला अंमळ जास्तच प्रिय..
तीर्थकरला एलीची नेहमीच चिंता वाटे...म्हणजे तिच्या मुलगी असण्याची नव्हे..तर तिच्या टोकाच्या मनस्वीपणाची..मनाला त्या त्या क्षणी जे वाटेल ते बेधडक करण्याची..
थोडीशी बेपर्वा, थोडीशी उध्दट असली तरी मनाने स्वच्छ होती, अरागस होती...
आणि म्हणूनच तीर्थकरचा तिच्यावर जीव होता..
एली आणि तीर्थकर आज पाच वर्षे मित्र होते....एली मित्रापेक्षाही बरेच काही होती तीर्थकरसाठी..
फ़क्त तीर्थकरसाठी....
एलीला काही सांगायची सोयच नव्हती...
"तिरक्या..जाम सेंटी मारतोय आज? ड्रॉप इट नाऊ..."असं म्हणून उडवून लावलं तर???
आपण तिच्यासमोर झुरळ आहोत हे ती सिद्ध करून दाखवेलही...
म्हणून आजवर तिरक्या गप्प होता...
मनात एका फ़ोनसरशी येऊन गेलेल्या विचारांना हाकून लावत, बॉससमोर खुद्द त्यालाही पटणार नाहीत अशी चलनं फ़ाडून तीर्थकर खाली आला...
एलीसाठी काहीही...
"पेट्रोल ची टाकी फ़ुल्ल कर...आपण बाहेर चाललो आहोत...."
"एली...तुझा पत्ता काय??तू होतीस कुठे...?"
"तिरक्या...कळेलच ना सगळं??थोडा वेळ कळ नाही काढू शकत???
तीर्थकर गप्प...
"ठिकाय...चल"
तीर्थकर एली सांगेल तशी गाडी चालवत राहिला...जवळजवळ एक दीड तासाच्या प्रवासानंतर एक आडवाटेचे गाव लागले...
पुढे सरळसोट छोटी पाऊलवाट होती...पण मध्येच त्या पाऊलवाटेने लाजून मुरका मारावा अस तिला एक फ़ाटा फ़ुटला होता...आणि..
त्या फ़ाट्याच्या बरोबर शेवटी एक बंगलीवजा घर होते...एलीने तीर्थकरला गाडी तिकडे घ्यायला सांगीतली...
बंगली तशी टुमदार...पण बंगलीच्या बाजूला दिमाखात उभं असलेलं एक झाड तीर्थकरच्या नजरेत भरलं..
एली बंगल्याचं फ़ाटक उघडून आत शिरली...तीर्थकरने नेमप्लेट पाहिली...
ते एलीच्या वडीलांचं घर होतं...
एलीनं त्याच डौलदार झाडाच्या खाली बसून घेतलं एलीनं त्याच डौलदार झाडाच्या खाली बसून घेतलं होतं...
तीर्थकर काय करावं हे न कळून तसाच उभा राहिला....पण तेवढ्यात सुरू झालेल्या पावसाने त्यालाही त्या झाडाखाली हलवलं...
एलीला पाऊस भयंकर प्रिय...
पावसात तुम्हाला छत्र्या लागतात कशाला रे???असा प्रश्न ती हटकून तिरक्याला विचारी...
पण एलीच्या जगात सर्व काही शक्य असल्याने आर्ग्युमेंटला मुळीच जागा नसायची..
एरवी पहिल्या पावसात वारा प्यायलेल्या वासरासारखी उंडारणारी एली त्या पावसाकडे बघत फ़क्त बसून होती...
एलीच्या मनात काय आहे?
पाऊस संपेपर्यंत एली-तिरक्या झाडाखाली बसून होते..
एली पावसाकडे बघत होती...तर तिरक्या एलीकडे...
नेहमी बेसुमार बडबड करणारया एलीचे स्वस्थचित्त आणि जाणते रूप तिरक्या प्रथमच पाहत होता..
"एली..???"
एलीने तिरक्याला झाडाखाली उभे केले आणि कशाचीतरी वाट पाहत डोळे मिटून फ़क्त उभी राहिली..
एवढ्यात वारयाची एक लहर आली...आणि...
डोक्यावरचं झाड पानाफ़ुलावरचं पाणी ओळंबत त्यांच्यावर बरसलं..
आणि ऑफ़िसमधून निघाल्यापासून आत्तापर्यंत गप्प गप्प असलेली एली बोलू लागली..
"माझ्या लहानपणी मी आणि डॅड इथेच या झाडाखाली बसत असू..माझ्या आणि डॅडच्या बरयाचश्या आठवणी या झाडाशी निगडीत आहेत..हे...’पावसाचे झाड’ आहे.."
पावसाचे झाड????
तिरक्या विस्मयचकीत होऊन ऐकत होता..
"पहिला पाऊस आम्ही याच झाडाच्या अंगाखांद्यावरून अंगावर घेत असू..after dad passed away मी कध्धी कध्धी या झाडाकडे फ़िरकले नाही...पण...तुझ्याबरोबर असताना i felt i dont miss my dad anymore...सो, एकवार पुन्हा तुझ्याबरोबर या इथे यावेसे वाटले...दोन दिवस मी इथेच होते...जगापासून दूर, तुझ्यापासून दूर....i never felt so vacant.."
एली भरून आलेल्या आवाजात पुटपुटत राहिली..
नेहमीच मनाचा कौल मानत आलेल्या एलीच्या भावनांच्या सच्चेपणाबाबत तिरक्याला काही संदेहच नव्हता...
असं असेल तर मग....
"एली....अम.....मला काही विचारायचे होते.."
"हुं.."
"अं...तुला मी...म्हणजे तू माझ्याशी..."
तिरक्या शब्दाशब्दाला ठेचकाळत होता..
आतापर्यंत मुसमुसत असलेली एली आपल्या रडवेल्या नाकाच्या नाकपुडया आणखी फ़ेंदारत फ़िस्कारली...
"dont spoil the moment you MCP...."
तिरक्या अवाक..
"yes...i do want to marry you...what took you so long???"
मग सगळं काही उमजून आल्यासारखा तिरक्या हसायला लागला....अगदी पावसाच्या झाडासारखा..
दोन बोटे बंदुकीसारखी रोखून एलीला म्हणाला.."गुन्हा कबूल???"
डोळ्यातलं पाणी निपटत एव्हाना एलीने तिचं टिपीकल खट्याळ हसायला सुरुवात केलेली असते...
"कबूल कबूल.."
मग प्रत्यक्ष हसण्यालाही हसू फ़ुटावं असं आसमंतात भरून राहिलं...
त्या दोघांना खळाळ हसताना पाहून पावसाचं झाडही पुन्हा एकवार अंगभर गदगदलं...त्या दोघांना झिम्माड भिजवून आपल्या मस्तीत डोलायला लागलं...
कालच्या पावसाने तिरक्याला एली दिली...
एलीला तिचं पावसाचं झाड दिलं...
पावसाच्या झाडाला नवा दोस्त दिला...
सर्वांना सर्व काही दिलं....
कालच्या पावसाने तुम्हाला काय दिलं??

हाय काय..नाय काय...!!

आज बरयाच दिवसांनी हे वाक्य येऊन टोचलं..
"तू अशी नव्हतीस.."
मनात नसतानाही मला हसू आले..
माणसं तोंड लांब करून असे डायलॉग मारायला लागली की मला मनापासून हसू येतं.. आजही आलं...
च्यायला...मी कशी नव्हते आणि आता कशी आहे..हे आता कोणीतरी दुसरं मला सांगणार...
म्हणजे अर्थात ’त्याच्या सोयीचं’ पेक्षा ’त्याची गैरसोय’ होण्यासारखं मी काय वागले हे मला पुन्हा पुन्हा सांगितलं जाणार..उदाहरणांनी पटवून दिले जाणार..
साहजिकच आहे..
’अ’ आणि ’ब’ भेटले..’अ’ काही परिस्थितींमध्ये कसा वागतो, कसा रिऍक्ट होतो हे ’ब’ बघत आलेला आहे...मग ’ब’ काही आडाखे बांधतो, ’अ’ एखाद्या परिस्थितीत कसा वागेल याचे ठोकताळे त्याला जमू शकतात...आणि ते बरयाच वेळा खरे ठरतात सुद्धा...पण एखादा दिवस असा उजाडतो...की तशीच परिस्थिती उदभवल्यावर ’अ’ हा ’ब’ च्या ठोकताळ्यात बिलकूल न बसणारं वागतो...असं एकदा झालं, दोनदा झालं की ’ब’ बिथरतो...आणि मग उदगारतो...
’तू अशी तर नव्हतीस..’
एखादा माणूस विश्वासार्ह आहे...हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो???
तो माणूस कसा वागू शकतो आणि कसा नाही हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो तेव्हाच ना???
म्हणजे एखाद्याबद्दल गृहितकं मांडायची...आणि प्रत्येक वेळी तो आपल्या अंदाजाप्रमाणेच वागला की ’जितं मया’ करत स्वत:चीच पाठ थोपटून घ्यायची...आपण त्याला किती ओळखतो याबद्दल फ़ुशारत ’अगदी विश्वासू माणूस बरं का!’ असं लेबल त्याला चिकटवून द्यायचं....
unpredictable माणसं विश्वासू नसतात??
माणूस एका कॅलिडोस्कोपसारखा आहे हे माझ्या मराठीच्या बाई नेहमी घोकायच्या...
मला तेव्हा ’कॅलिडोस्कोप’ हा शब्द खूप आवडायचा...तेव्हा तर कळतंही नव्हतं की हे ’कॅलिडोस्कोप’ काय प्रकार आहे ते...
आता कळतय..आयुष्य स्वच्छंद, विविधरंगी बनवायचा प्रयत्न चाललाय.. जे खरं वाटतं, जे पटतं, जे अत:प्रेरणेने वाटतं तेच करावं ह्याचा प्रयत्न चाललाय तर ही विश्वासर्हतेची बंधने येतात...
म्हणजे कायम दुसरयाच्या विश्वासाला पात्र होण्याकरता स्वत:ला चौकटीत अडकवून घ्यायचे???
मी असा वागलो तर काय????मग तसंच वागावं म्हणजे काम होईल....गैरसमज होणार नाहीत...
कायम या प्रश्नांची उत्तर देत घेत कृत्रिम जगत राहायचं...
का???
आणि कशासाठी???
याला ’जगणं’ म्हणतात???
आपण असंच चौकटीत वागत राहिलो तर एके दिवशी त्रिकोण,वर्तुळासारखी आपल्यावर पण प्रमेयं बनतील....
"अमुक तमुक परिस्थिती आहे..असे ठोकताळे आहेत...तर याची परिस्थितीजन्य वागणूक सांगा.."
म्हणजे ’माणूस-एक कॅलिडोस्कोप’ निबंध लिहून बोर्डात यायचं..आणि नंतर..कॅलिडोस्कोप विसरून फ़क्त ’स्कोप’ शोधायचा...
’कॅलिडोस्कोप’ आणि ’स्कोप’...
हाय काय आणि नाय काय...!!

’च्यकच्यकाटा’नंतरची लव्हस्टोरी..!!

पश्चिम रेल्वेच्या त्या ’च्यक च्यक च्यकच्यकाटा’नंतर नाटकाचा फ़्लॉप-शो न होऊ देत अशी परमेश्वराची करूणा भाकत आम्ही प्रबोधनकार नाट्यसंकुलात दाखल झालो...
तिथेही भारतीय वेळेने निराशा केली नाही...
४-३० चं नाटक ४-५० ला सुरु झालं...
पहिली २-३ मिनीट्स निखिल रत्नपारखीचे संवाद ऐकूच येत नव्हते...तांत्रिक गडबड असावी बहुतेक...नंतर सर्व सुरळीत चालू झाले...
नाटक नवखं असल्यामुळे की काय दोन प्रवेशाच्या मध्ये जो रंगमंच व्यवस्थेसाठी ब्लॅक-आऊट होतो तो या नाटकात नव्हताच मुळी...
मंद निळ्या प्रकाशात माणसं येऊन काय काय कुठे ठेवत होती ..हे सगळं लख्ख कळत होतं...
जरा खटकण्याजोगीच बाब होती...पण नाटक इतके फ़ंडू आहे की या सर्वांकडे काणाडोळा केला तरी हरकत नसावी..
कोणत्यातरी कॉस्मेटीक कंपनीत मॅनेजर पदाला असणारया ’निनाद भागवत’ नामक एका बॅचेलर तरूणाची आणि एका Advertising एजन्सीची मालकीण असणारया स्मिता जोशी नामक एका तिशीच्या तरूणीची ही कथा...
पूर्ण कथानक निनाद, स्मिता आणि त्या दोघांचे 'Alter Egos' ज्यांना आपण अंतर्मने म्हणू शकतो अशा चौकडीभोवती फ़िरते..
निनादच्या कंपनीच्या जाहीरातीची कंत्राटं स्मिताची कंपनी घेत असते..या तद्दन प्रोफ़ेशनल नात्यामधून निनाद तिच्याकडे ओढला जातो..तिला पटवण्याकरता आणि नंतर घायकुतीला येऊन तिला प्रोपोज करण्यासाठी तो नाना शक्कली लढवतो...आणि त्याला अपेक्षित नसलेल्या पद्धतीने स्मिताच्या वागण्यामुळे प्रत्येक वेळेस तोंडघशी पडतो..
या सर्व नाट्यमय प्रसंगात दोघांचीही मने (आनंद इंगळे आणि मुक्ता बर्वे)त्यांच्या आसपास वावरत असतात..जे काही चाललेय ते कधी त्रयथपणे पाहतात तर कधी हस्तक्षेपही करतात..
पण...
स्मिताला पटवण्याच्या आणखी एका प्लॅनचा बोरया वाजल्यानंतर दोघांचीही मने एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग स्मिता-निनादला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात..
मग आहे थोडासा अट्टाहास,संशय आणि भविष्याचा अतिविचार यातून उद्भवणारा भावनिक हलकल्लोळ आणि गोड शेवट...अर्थातच..!!!
किरण पोत्रेकरांनी हेच नाटक पूर्वी मंगेश कदम,सारिका निलाटकर,मीरा वेलणकर, आणि हृषिकेष जोशी या कलाकारांना बरोबर घेऊन केले होते..
पण आताची स्टारकास्ट तगडी आहे आणि फ़्रेश पण वाटते..
निखिल रत्नपारखीच्या मनाचं काम आनंद इंगळेने करणे म्हणजे जरा ’भव्य’ अल्टर इगोचा फ़ील येतो....आणि स्मिताच्या साईडने तेच काम मुक्ता बर्वेने करणं म्हणजे 'zipped' इफ़ेक्ट वाटतो!!
दोघांची मनं एकमेकांच्या प्रेमात पडेपर्यन्त शृजा-मुक्ता आणि निखिल-आनंद याची वेशभूषा सारखी दाखवली आहे जेणेकरून ते याच माणसांचे ’ आहेत याची प्रचिती यावी..
पण दोघांची मने आपल्या मुख्य व्यक्तिमत्वाच्या अपरोक्ष एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा मात्र त्यांची वेशभूषा वेगळी दाखवली आहे ज्यामुळे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व ध्यानात येतं..
’नितीन’नामक पात्राने तर ज्याम भाव खाल्लाये...स्मिताचा मित्र असणारं हे पात्र रंगमंचावर कधीच येत नाही पण त्याचा अदृश्य वावर स्मिता आणि निनाद यांच्यामध्ये कायम असतो...निनाद तर याच्यावर इतका खार खाऊन असतो की त्यानंतर तो प्रत्येक ’क्षुल्लक’ माणसाला नितीन म्हणून हाक मारणे सुरु करतो..
रंगमंच योजना..अशोक पत्कींचं संगीत ..सगळ्याच बाजू उजव्या आहेत...सर्वात उजवी बाजू अभिनयाची..
अख्खं नाटक निखिल रत्नपारखीने खाल्लय..नि:संशय!!
अतिशय गोंडस चेहरा आणि भोकरासारखे डोळे असणारया इतक्या क्युट माणसाला कोणतीही मुलगी नाकारूच शकत नाही याची खात्री प्रेक्षकाला पटल्यामुळे की काय शेवट आधीपासूनच माहित असतो..
निनादची ’प्लॅनिंग’वरची भक्ती, प्लॅन बाराच्या भावात गेलेला पाहून पडलेला चेहरा,शब्दांच्या कोलांट्याउडया मारताना बेरकी असल्याचा आणलेला आविर्भाव, स्मिताशी बोलताना मुद्द्यावर येताना होणारी प्रचंड घालमेल..निखिल सहीसही दाखवतो..आणि म्हणूनच स्मिता नंतर म्हणते त्याप्रमाणे त्याच्या खोटेपणाने, थापा मारण्याने राग येत नाही उलट गम्मतच वाटते..आणि म्हणूनच आपल्यालाही ते आवडून जाते...
कोणी ’कथा-सरिता’ मधली ’व्यंकूची शिकवणी’ ही कथा बघितली आहे का???
त्यातल्या व्यंकूच्या मास्तराचे काम करणारा निखिल रत्नपारखी असाच 'Lovable' वाटला होता..
दारू पिऊन ’टुन्न’ होऊन बोलण्याच्या प्रसंगात तर प्रचंड धमाल आहे..पण ती नाटकातच बघण्यात मजा आहे..
आनंद इंगळे ’माकडाच्या हाती शॅंपेन’ मधून उचलून ’लव्हस्टोरी’मध्ये घातल्यासारखा वाटतो...
तीच विनोदाची ढब...तशीच बॉडी लॅंग्वेज...तेच टाळ्या मिळवून जाणारं शेळपट हसू...हशा खेचणारा तोच आक्रस्ताळेपणा...
कंटाळा येत नाही पण आनंद इंगळेसारख्या खूप सारे पोटेन्शियल असणारया अभिनेत्याने त्याच त्याच भूमिका सारख्या सारख्या केल्या तर कंटाळा नक्कीच येईल..
शृजा प्रभुदेसाईचं काम मी प्रथमच पाहतेय...फ़टकळ, नाचरी, थोडीशी चक्रम स्मिता तिने व्यवस्थित उभी केलीये..तिच्या तोंडी असलेली एका स्त्रीसाठी मल्टीपल नवरे ही फ़िलॉसॉफ़ी ऐकून पुराणमतवाद्यांना झीट येण्याची शक्यता नाकारता येत नाही...तब्येतीने घेतल्यास ते एवढे हानीकारक नाही..
मुक्ता बर्वे...मला वाटले होते तेवढा हा तगडा रोल नाहीये...
मुक्ता बर्वेचा वावर नेहमीप्रमाणेच सहज आहे...मुक्त आहे...ती दिसलीये पण छान!!
पण तिच्यातली आणि आनंद इंगळे मधली जवळीक, घट्ट मिठी प्रेक्षकाला कितपत पचेल कुणास ठाऊक??
तसं पाहिलं तर मुक्ता बर्वे आणि आनंद इंगळे ह्यांना ’कपल’ म्हणून पाहणे मला जरा पचलेच नाही पण ठिकाय...
नाटक पाहताना माझ्या शेजारच्या आज्जी आजोबांना कोपरयाने ढोसत होत्या...त्यावरून नाटक नावालाच किती जागतेय याचा प्रत्यय यावा..
अशी ही थोडीशी दृश्य..थोडीशी अदृश्य...थोडी कॉमन...थोडीशी अनकॉमन लव्हस्टोरी!!!
’सुयोग’ प्रकाशित.. डॉ. विवेक बेले लिखित.. किरण पोत्रेकर दिग्दर्शित दोन अंकी धमाल नाटक ’लव्हस्टोरी’!!!

च्यक च्यक..च्यकच्यकाट!!

कुठलीतरी सुट्टी आणि प्रबोधनकारला लागणारा एखादा फ़ंडू नाटकाचा प्रयोग मी आणि आई सहसा चुकवत नाही..
त्यातून 'लव्हस्टोरी' या नव्या नाटकाचा प्रयोग आणि आम्हा दोघींची favorite मुक्ता बर्वे त्यात असल्यावर प्रयोग चुकवायचा काही चान्सच नव्हता...पण...
वसई ते बोरीवली हे अंतर पार करायचे म्हणजे पश्चिम रेल्वेचा प्रवास हा ’मस्ट’!!
हा प्रवास वसईहून करण्यापेक्षा वसई-पापडी-नायगाव रूटने केलेला कधीही चांगला म्हणून आम्ही ३-४०च्या दरम्यान नायगाव स्टेशन ला पोहोचलो..
नायगाव...
माझं सर्वात आवडतं स्टेशन...जिथे ना वर्दळ असते ना कलकलाट...भातुकलीच्या खेळात शोभून दिसेल असं स्टेशन...
गावातल्या एखाद्या नव्या नवरीला ’काय पाटलीणबाई’ म्हटल्यावर ती कशी लाजेल तसा नायगाव स्वत:ला ’स्टेशन’ म्हणवून घेताना लाजत असेल कदाचित...
गाडया नेहमीप्रमाणेच उशीराने धावत होत्या...म्हणजे आमचं time element चुकणार नव्हतं ..आम्हाला हवी असलेलीच बरयाच वेळापूर्वीची गाडी आम्हाला उशीराच्या कारणाने मिळणार होती..
आम्हावर उपकार करत असल्यासारखी ठुमकत ठुमकत गाडी आली एकदाची...
नेहमीप्रमाणेच ती माझ्याकडे बघत खट्याळ हसलीसुद्धा...ती आईकडे बघून पण हसली का???हे बघायला मी आईकडे साभिप्राय पाहिलं...आणि आईने मला ’चक्रम आहे पोरगी झालं..." चा उर्ध्व लागल्यासारखे डोळे फ़िरवून टिपीकल लुक दिला..
राज्य परिवाहन मंडळाची एस.टी मला मिशा फ़ेंदारून हसणारया ’प्रिय’सारखी वाटते..पण मी ते आईला सांगत नाही..
गाडी सुरु झाली...
तेवढ्यात पुलाच्या बाजूने एक बाई जीव खाऊन गाडी पकडायला धावत असलेली दिसली..
आज १ मे...आज तर कोणाला कामावर पण जायचे नसेल...मग ही बया भूतलावरची शेवटची गाडी असल्यासारखी स्प्रिंट का मारत्येय??? मला काही कळेचना..
मग इकडून तिकडून सगळीकडून डोकावणारया नानाविध शंकांना शूत!! करून हाकून लावलं आणि तिला 'DDLJ'च्या शाहरुखसारखा हात देऊन गाडीत चढवलं..
"आपली ढाप्पण सांभाळा आधी...हात देतेय!!"
आईची शेरेबाजी ऐकू आलीच पण मी तिकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले..
मी हात देऊन फ़ूटबोर्डवर चढवलेली ती गासंडी अजूनही भात्यासारखी फ़ुसफ़ुसत होती...
"शादी में जाना था.."
च्यामारी..मग लग्न काय हिचे होते धावत गाडी पकडून वेळेवर पोहोचायला???
"नेक्स्ट ट्रेन से चली जाती..जम्प करनेकी क्या जरूरत हय??"
माझं भयंकर फ़्रस्ट्रेट करणारं हिंदी मी शक्य तितक्या सुसह्य 'format'मध्ये वापरत विचारते...
ती गप्प...
तिलाही पटलं असावं बहुतेक..
ही मुंबईकरांच एकाय...
आलेली संधी आणि समोर उभे असलेली ट्रेन कधीच सोडत नाहीत..
आणि गम्मतीचा भाग म्हणजे घाईत असलेल्या सगळ्यांना नेहमी आपल्या समोरून सुटणारी ट्रेनच पकडायची असते..
तर...
मला उतरायचे होते बोरीवलीला आणि मी चढले विरूद्ध दिशेने..
त्यामुळे जसजसे स्टेशन जाईल तसं मी पुढे सरकून घेत होते..
केवळ ५ बाय १२ फ़ूटाच्या त्या कॉरीडॉरमध्ये आम्ही जवळपास ५० जणी जीव मुठीत धरून आणि १० इंच लांबीच्या फ़ूटबोर्डवर १० एक जणी जीव चिमटीत घेऊन उभ्या होत्या..
भयंकर गर्दी होती...
एकाचवेळी एवढी सगळी माणसे जातात तरी कुठे आणि मरायला मुंबईतली सगळी लग्नं शिंची आजच का असावीत??? हा विचार करता करता मी हात पकडायला केलेल्या कडयांवरच्या दहा एक हातांपैकी माझा हात कुठचा ते हात हलवून बघायचा प्रयत्न करत होते...
शेवटपर्यन्त काही कळलंच नाही...
कारण त्यावेळी माझं अनुकरण सगळ्याच जणी करत होत्या...
आता एवढ्या हलणारया हातांपैकी माझा हात शोधायचा म्हणजे..
त्या नादात माझे आधीच बारीक असलेले केस मागचीच्या नाकावर घासले गेले...तिकडून च्यक...
माझा चश्मा डोळ्याशी ४० अंशाचा कोन करून लोंबायला लागला तो नीट करू म्हटले तर माझं कोपर बाजूचीला लागलं...तिकडूनही च्यक...
मी शेवटी नादच सोडला...
तेवढ्यात दुसरया बाजूने खडया आवाजातले बंबैय्या हिंदी ऐकू आले..
आमच्या मातुश्रीच...शंकाच नाही...
तोफ़खाना सुरू झाला होता..
नंतर विचारले असता आई करवादली..."अगं..नुसता निसटता स्पर्श झाला तरी ती च्यक करत होती.आता कोणी तिचा विनयभंग करत होते का???लेडीज डब्बा तर होता.."
आता एवढी जहाल चिरफ़ाड माझी आईच करू जाणे..
पण चूक कोणाचीच नव्हती..
लेडीजचा सेकंड क्लासचा डब्बा म्हणजे असाच पालींचा च्यकच्यकाट असतो..
शेकडो लोकांचे उच्छवास डब्ब्यात भरलेले...कोणाची अखंड पिरपिर चालू आहे...कुणीकडे कोणाची तार स्वरात भांडण चालू आहेत..
अशा वातावरणात आपल्याही नकळत आपलीही चिडचिड सुरु होते..
डब्ब्यात हळदी-कुंकू, संक्रांत वगैरे कौतुकं सगळी डब्ब्याच्या आतल्या भागात चालतात...लवकरच्या स्टेशनला उतरायचे म्हणून दाटीवाटीने दारात उभे असलेल्यांचं जगच वेगळं..
थोडक्यात काय...ते सुपात असतात तर आम्ही जात्यात!!!
अशा कुबट प्रवासात सुखद आठवणी कुठल्या असायला??
असतात तर अशाच..
"नको ही बजबजपुरी!!"..असं वाटायला लावायल्या...
बाय द वे....
लालूंनी सकाळी ८-४५ चर्चगेट लोकलने प्रवास केलाय का???
मला वाटते त्याने बरेच प्रश्न सुटतील...
लालू सुखरूप चर्चगेटला उतरले तर मुंबईकरांचे...
नाही उतरले तर..
देशाचे!!

एक ’होपलेस’ प्रश्न आणि ’प्रिय’..

परमेश्वराने कायम एकमेकांमधून निसटणारे नट-बोल्ट्स बसवलेल्या मेंदूची रचना केलेले काही विरळा नग बनवले आहेत..आणि मी त्यातला एक जातिवंत वाण आहे..
असं ’प्रिय’ म्हणतो...’मी’ नाही...
काहीही आगापिछा नसलेले कुठले प्रश्न कधी माझ्या डोक्यात येतील आणि त्यासाठी मी ’प्रिय’चे किती डोकं खाईन याला काहीच सीमा नसते...
’प्रिय’ मला ’छळवाद आहे नुसता’ असं म्हणतो कधीकधी... प्रेमाने...well, i think so..मला exactly माहीत नाही..
कारण या सर्व शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी हक्काचा हातात सापडतो त