’शब्द-पटा’च्या निमित्ताने..

शब्द-पट म्हणजे कोडं..
पूर्वीचं नमनाला घडाभर तेल घालणारं ’गप्पा-टप्पा-श्रद्धाशी’ हे नाव बदलून हे ठेवण्याचा हेतू मलाही फ़ारसा कळलेला नाही तर तुम्हाला काय सांगणार??
ब्लॉगचं नाव आटोपशीर असावं अशी सूचना मला बरयाच जणांनी केली.त्यामुळे ब्लॉगचं पुन्हा एकदा बारसं होणार हे तर नक्की होतं..
पण शब्द-तरंग...शब्द-वलय...श्रद्धाचा ब्लॉग किंवा विश्व कवितेचे या टाईपच्या नावांचा धसका कम तिटकारा...मग नाव ठेवावे तर काय ठेवावे???
पूर्वी राक्षसांचा प्राण नाही का पक्ष्याच्या डोळ्यात बिळ्यात असायचा तसा माझ्या ब्लॉगचा प्राण हा फ़क्त आणि फ़क्त शब्दांत आहे...त्यामुळे ’शब्द-पट’..
पण मग ’शब्द-पट’च का?
चित्रपट म्हणजे चित्रांच्या साहाय्याने, चित्रांच्या माध्यमातून पुढे सरकत असलेला पट किंवा कथा...चित्रपटाचा प्राण चित्रपटातली हलणारी चित्र!!
बोलपट म्हणजे केवळ बोलांच्या साहाय्याने एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचणारी कथा...बोलपटाचा प्राण त्यातली संवादांची फ़ेक!!
या आपल्यासमोर उलगडणारया पटांमधून (दृक श्राव्य) कोणत्या ना कोणत्यातरी माध्यमातून काही ना काही तरी आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं...आपल्या हद्याला भिडतं..
मी तो प्रयत्न शब्दांतून करू पाहातेय..
कधी कधी दुर्बोध कोडयागत असलेलं जगणं शब्दांच्या आणि कवितांच्या आधारे सुसह्य करू पाहातेय...
शब्द सहजासहजी मिळत गेले की आणखी एका निर्मितीचा आनंद...दु:ख किंवा गुदमरून टाकणारा आनंद ओकून टाकल्यावर येणारा हल्लखपणा आणि त्याच्या जोडीने येणारी ’पुढे काय?’ची बोच..
आणि नाहीच सापडले शब्द तर??
असह्य तगमग....बोलून दाखवता येत नाही, लिहून काढावे तर नीट मांडता येत नाही..
हा कोंडमारा कधी अनुभवला आहात???
मी अनुभवला आहे आणि मला त्याचे व्यसन जडले आहे..
कसाही जिवाला स्वस्थपणा तो नाहीच मिळत कारण शब्द असे सहजासहजी कोणालाच वश होत नाहीत..
कोडं सोडवताना माझं काय होतं माहीत्येय का???
कोडं सोप्पं असेल आणि एका फ़टक्यात सुटलं तर मला अतिशय आनंद होतोच पण त्याचबरोबर ’हे इतक्यातच सुटलं?” आणखी कठीण असतं तर मजा आली असती’ असे विचारही माझ्या मनात येतात..
आणि उलटपक्षी, तेच कोडं कठीण असेल आणि एखाद-दुसरा शब्द काही केल्या आठवत नसेल तर मला दिवसभर चैन पडत नाही...’माहीत तर होता का नाही आठवत शिंचा???’ हे माझं वाक्य दोन-तीनदा तरी पडतं.. पुढच्या आवृत्तीत उत्तर बघितले की’ हात्तिच्या...हे उत्तर होतं होय???मला कसं आठवलं नाही काय माहीत?’ही टोचणी...
म्हणजे कसं?
सुटलं तरी रिकामं वाटतं आणि नाही सुटलं तरी बेचैन वाटतं..
माझी अशी अवस्था कविता लिहीताना नेहमी होते...
सुलभ, साध्या-सोप्प्या निर्मितीचा निखळ आनंद मी कधीच घेऊ शकत नाही...
साध्या निर्मितीतून मी अधिक अवघड, अधिक आव्हानात्मक निर्मितीचा विचार करत राहते...
त्यापायी विचार करत राहते..स्वत:ला शिणवत राहते..
कोडी माझ्या आवडीची आणि मी ही काहीशी कोडयासारखी...म्हणून माझ्या कविताही ’शब्द-तरंग’ किंवा ’शब्दावली’ नाहीत. त्या आहेत ’शब्द-पट’..
कोडी सोडवण्यात मग्न श्रद्धाच्या...
तुम्हाला सुटतील असं वाटतंय???वाचून बघा..

1 comment:

रुचिरा said...

...कविता आणि लेख मस्त आहेत.

 
Designed by Lena