पण..’गुजा-भावजी’ कोण???

पूर्ण दिवसाचा इस्कोट झाला होता...
WDCच्या सर्टिफ़िकेट्सचं काम,सेमिनार्स,सबमिशन्स,"मॅम, एक क्वेरी थी.."करत पुरता श्वासही न घेऊ देणारे विद्यार्थी...सगळ्यांना पुरी पडण्याचा प्रयत्न करून मी अगदी कावून गेले होते...
यावेळी ’प्रिय’चा फ़ोन आला तर काय बहार येईल...
बोलाफ़ुलाची गाठ पडावी म्हणतात ना तसेच काहीसे झाले आणि ’करीब’ची ’चोरी चोरी जब..’ची ती टिपीकल शीळ वाजायला सुरूवात झाली..
ही खास ’प्रिय’साठीची रिंगटोन!!
फ़ोन उचलल्या उचलल्या ’प्रिय’ अगदी विरळा ऐकायला मिळणारा उत्तेजित आवाज आला..
"मने,भारी पुस्तक आहे.."
’प्रिय’ तोंडदेखले compliments कधीच देत नाही..
पण ’प्रिय’ने मी विचारल्याशिवाय एखादं पुस्तक आवडलं की नाही हे मला सांगावं...??
हे म्हणजे too much झालं..
म्हणजे या बापूला खरंच आवडलं असणार...
काही दिवसांपूर्वी मी ’प्रिय’ला ’पडघवली’ वाचायला दिलं होतं...गो.नी.दांडेकरांचे...
पण याचं एवढ्यात वाचून झालं???
कारण मी वाचायला बसल्यावर एका बैठकीत पुस्तक खाते आणि हा एक पुस्तक वाचायला किमान आठवडा लावतो..सलग वाचून त्याचं डोकं भणभणायला लागतं म्हणे..
मग आज हे असं ’इप्रित’ कसं काय घडलं???
मी त्याला तसं विचारलंही...आणि यावर तो तिकडे मिशीतल्या मिशीत हसला असावा अशी दाट शंका मला आली..
तो असं काही विनाकारण हसला की त्याच्या डोक्यात काहीतरी घोळत असलं पाहिजे याची कुणकुण मला लागते...
मी काही मुद्दामून विचारलं नाही ..काही वेळानंतर तो मला सांगणारच होता..
"मन्या,आपण म्हणजे कुठल्यातरी मराठी निर्मात्याने ’पडघवली’ वर पिक्चर काढला तर काय मस्त होईल ना???"
’प्रिय’ला अशा मस्त मूडमध्ये बोलताना ऐकणं म्हणजे पर्वणी असते..नाहीतर...एरवी..
त्याला क्षणाचीही उसंत घेऊ न देता नानाविध विषयावर माझी बडबड अखंड चालू असते..(’प्रिय’शी बोलताना विषयाची वानवा मला कधीच भासत नाही)
नंतर केव्हातरी मला आठवतं की त्याच्याकडून काहीच उत्तर नाही..
पहिले पहिले हुंकार...’असं का?’.."बरं बरं"....हे तरी ऐकायला येत होतं पण आता ते ही नाही..
फ़ोन मध्येच कट झाला की काय आणि याला सगळं पुन्हा सांगायला लागणार की काय या भीतीने अंतर्यामी धास्तावून मी निर्वाणीचा हॅलो टाकते..
"हॅलो????’
"अगं बोल ना....मी ऐकतोय!"
हे असं..
असा माणूस आज स्वत:हून विषय काढून बोलतोय..हा मणिकांचन योग हातातून मी बरा जाऊ देईन!!
"हॅलो...मी काय बोलतोय???ऐकतेयेस ना???"
"हं....."(हे आपलं उगीच....मनात मात्र.."बोल की लवकर!")
पण माझ्या एकाक्षरी उत्तराची तमा आज ’प्रिय’ बाळगत नाही किंबहुना त्याच्याकडे त्याचे लक्षच नाहीए..काही मनाशी योजून ’प्रिय’ बोलायला लागला की काहीसं माझ्यासारखंच बोलतो...अव्याहत!
"मी म्हणतोय...’पडघवली’ची स्टारकास्ट काय असू शकेल जर पिक्चर काढला तर???"
असा ’क्रिएटिव्ह’ प्रश्न त्याच्याकडून बिलकूल अपेक्षित नाही..पण मी टोकत नाही..
"अंबू-वहिनी साठी कोणती actress सूट होईल??"
बास्स..त्यानंतर दुतर्फ़ी फ़ैरी झडत गेल्या..माझा कंटाळा कुठल्याकुठे गुडुप्प झाला...
काहीवेळा त्याला माझी निवड ’पुचाट’ वाटायची तर काही वेळा मला त्याची निवड ’बोराड’ वाटायची..एकदातर मी वैतागून म्हटलेसुद्धा,"राहू दे, मीच करते तो रोल"...
यावर रावणासारखं गडागडा हसून त्याने,"तोंड बघ....तुला शूर्पणखेचा रोल देईन फ़ार फ़ारतर.." असेही म्हटल्याचे स्मरते..पण मी ते सोयिस्कररित्या कानाआड केले..
अशारितीने बराच वेळ खल करून, सव्यापसव्य करून आमची ’स्टारकास्ट’ तयार झाली ती अशी होती..
चित्रपट:पडघवली
मूळ कथा:"पडघवली’-गो.नी.दांडेकर
प्रमुख भूमिका:
अंबू-मृणाल कुलकर्णी
विष्णू-अतुल कुलकर्णी
व्यंकू-उदय टिकेकर
आत्येसासूबाई-स्मिता तळवळकर
गणू-उमेश कामत
गुजाभावजी-?????
बनी-अमृता सुभाष
गेंगाण्या-राहुल सोलापूरकर
रंग्या किल्लेदार-अविनाश नारकर
शारदा-वर्षा उसगावकर
कुशात्या-भारती आचरेकर

अंबू-वहिनी हे ’पडघवली’ मधलं अत्यंत सोशिक, भल्या-बुरयाची चाड असणारं, सगळ्यांना आधार वाटावं असं पात्र आहे...
’मृणाल कुलकर्णी’शिवाय दुसरं कुठलंही नाव माझ्या डोळ्यासमोर नाही आलं..’प्रिय’ला ही ते पटलं...
’गणू-भावजी’ च्या कॅरॅक्टर साठी कुठला actor सूट होईल???या विषयाच्या निमित्ताने का होईना....आमचे बहुधा पहिल्यांदाच एकमत झाले असावे...’उमेश कामत’च्या नावावर आम्ही एकमताने शिक्कामोर्तब केले..
व्यंकूच्या भूमिकेसाठी उदय टिकेकर आणि अनंत जोग अशी दोन नावं समोर आली पण त्यातल्यात्यात उदय टिकेकर तरूण असल्यामुळे त्यांचा नंबर लागला..
रंग्या किल्लेदारच्या भुमिकेसाठी ’पैज लग्नाची’मधली भूमिका केलेला अविनाश नार्वेकरच आला...जितेंद्र जोशी पण फ़िट्ट बसला असता पण अविनाश नारकरचं नाव फ़ायनल झालं!
कुशात्या च्या भूमिकेसाठी मात्र आमचे दुमत झाले..माझे म्हणणे होते ’ज्योती सुभाष’ आणि ’प्रिय’चे म्हणणे ’भारती आचरेकर’...आणि त्याचे बरोबरही होते..’ज्योती सुभाष’ मायाळू आज्जी वाटतात...’पडघवली’ मधल्या कुशात्यासारख्या खमक्या वाटत नाहीत..पण दोघांचही एकमत या गोष्टीवर झालं की आज भक्ती बर्वे हयात असत्या तर कुशात्याच्या भूमिकेसाठी दुसरया कोणाचा विचार करावा लागलाच नसता....पण...
गुजाभावजी हे एकच पात्र असं उरलं की त्यासाठी काहीकेल्या कोणाचं नाव डोळ्यासमोर येईच ना...
’पडघवली’मधला गुजा म्हणजे कृतांतकाळ,शीघ्रकोपी,महाकाय शरीर असलेला पण लोण्याहून मृदू मन असलेला एक विक्षिप्त माणूस आहे...
आता एवढे सगळे ’गुण’ कुठल्या अभिनेत्यामध्ये असायला???
नाना पाटेकर विक्षिप्त आहे, मायाळू पण वाटेल एकवेळ....पण महाकाय शरीर तो कुठून आणि कसा आणणार???
सयाजी शिंदे आनि शरद पोंक्षे ही नावे पण डोक्यात आली पण ती आल्याआल्या विरूनही गेली....
अशारितीने..
अर्ध्या एक तासानंतर लख्ख फ़्रेश होऊन मी फ़ोन ठेवला...
’प्रिय’च्या उत्साहाची लागण मलाही झाली होती..
’प्रिय’ आणि मी तसे पाहिले तर अत्यंत विरुद्ध टोकांची माणसे आहोत..
’मराठी सिनेमा’ हा त्याच्या जिव्हाळयाचा विषय तर मी हॉलीवूडची चाहती..
मी गौरी देशपांडेंची चाहती तर तो अशा ’हेवी’ वाचनापासून दूर!!(त्याला बडबडगीतं आवडतात)..
मी म्हणजे कशी ..कोणाशी प्रथम बोलतानाही इतक्या मोकळ्याढाकळ्या अंदाजात आणि इतके सारे बोलणार की समोरचा बाचकून जावा आणि हा...
पहिल्यापहिल्यांदा तर याला तोंडातून शब्द काढण्याकरता कोणी टॅक्स आकारत असावं की काय???अशीच शंका मला आली होती..
याच्याशी बोलताना मी सर्व बाजूंनी उघडी पडत राहते आणि हा मात्र आपला कुठल्यातरी दिपस्तंभासारखा तटस्थ!!
’तू भडाभडा बोलून का टाकत नाहीस??"हा प्रश्न मला त्याला हज्जारदा विचारावसं वाटला...पण पुढच्या क्षणी आपलं ह्याचे उत्तर आपल्याला मिळणार नाही हे ही कळलं...स्मितहास्य करून (थोडक्यात मला वेडयात काढून) हा प्रश्न डावलला जाणार हे मला अनुभवाने कळून चुकलेय..

पण ’पडघवली’च विषय घेऊन का होईना उत्साहाने फ़सफ़सलेला ’प्रिय’ मला पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला...
’पडघवली’ पिक्चर बनेल न बनेल..स्टारकास्ट ही असेल न असेल...मला त्याच्याशी काय घेणं-देणं असावं..????
या विरळया अनुभवाबद्दल ’पडघवली’ची मी ऋणी राहीन...
पण शेवटी प्रश्न उरतोच...

गुजाभावजी कोण????

9 comments:

Unknown said...

हे.. मस्त लेख!! आयडीआ भारी आहे! लिहीलाय पण छान.. !
मी पण विचार करत बसले की असा कोणी नट आहे का? एक आठवला.. वादळवाट मधले अण्णा?? नाव नाही आठवते त्या नटाचे.. पण सुट होईल.. :)
लिहीत रहा.. ओघवतं लिहीतेस तू.. बाकीचे पण पोस्ट्स मस्त !

Abhijit Bathe said...

मागच्या लेखाची सुरुवात आवडली होती - हा लेख आख्खाच्या आख्खा आवडला.
काही लोकांकडे भरपूर काही सांगण्यासारखं असतं पण त्यांना ते नीट सांगता येत नाही. ज्यांना सांगत येतं - ते बधीरसारखे पांगळे विचार पाडत रहातात.
तुला चांगलं लिहु शकतेस - Keep it up.

आणि तुझ्या ’प्रिय’ ला ’अभिनंदन’ सांग! (आता त्याला ’उत्खनन’ दे वाचायला! :)) पण ते देशपांडेंचं आहे कि नाही याबद्दल माझं कन्फ्युजन आहे).

Nandan said...

lekh aavadala, shraddha. Guja bhavajincha varNan vachoon mazya dokyat pratham Vikram Gokhalencha naav aala. What say?

Jaswandi said...

mastch! जेव्हा मी ’पडघवली’ वाचलं होतं, माझ्या डोक्यातही मृणाल कुलकर्णीच होती. even मी तांबडफुटी साठीही तेव्हा मृणाल कुलकर्णी मनात धरुनच वाचत होते.

बाकी स्टारकास्ट सही आहे!
मस्तच लिहितेस!

Shraddha Bhowad said...

अभिजित...
धन्यवाद!
उत्खनन गौरी देशपांडेंचेच आहे...आणि हा प्रयोग मी करून पाहिलाय...
’उत्खनन’ ज्या दिवशी ’प्रिय’च्या हातात दिलं त्याच्या दुसरयाच दिवशी माझ्या हातात पडलं...न वाचता..
मणि त्याच्या डोक्यात गेलीये ती आजतागायत..
श्रद्धा..’शब्द-पट’वाली

Shraddha Bhowad said...

भाग्यश्री...वादळवाट मधले ’अण्णा’ म्हणजे उदय सबनीस....
नंदन,भाग्यश्री...पडघवली मधला ’गुजा’ हा ’विष्णू’चा भाऊ आहे...म्हणजे अतुल कुलकर्णीचा भाऊ वाटेल असा अभिनेता हवा...
हा...जर कथेत फ़ेरफ़ार केले आणि समहाऊ गुजाला पोक्त दाखवले तर उदय सबनीस, विक्रम गोखले, शिवाजी साटम..असे बरेच ऑप्शन्स आपल्याकडे आहेत..
पडघवलीच्या कास्टींगमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद...
श्रद्धा..’शब्द-पट’वाली

Prashant said...

I liked blogs of Abhijit bathe,tulip,Jaswandi and now new name is added and its U.I have added ur blog in my favorites list, so it says all.

I think its hard to write "Simple"...but I think its easy for u.

Good Luck....!

Ketaki Abhyankar said...

हा गुजा, विष्णू चा लहान भाउ आहे मला आठवतय त्याप्रमाणे. त्यामुळे तरुण अभिनेता हवा, आणि तब्येत बिब्येत पण दणका हवी. जोगवा पहिल्यापासून उपेन्द्र लिमये आवडायला लागलाय मला. त्याची मिशी साफ केली तर कदाचित गुजा म्हणून चालेल. किंवा मग स्वप्निल जोशी. तो त्याच्या कृष्णाच्या इमेज मधून बाहेर पडून चांगला बापाय गाडी झालाय

Shraddha Bhowad said...

मला पटतंय गुजाभावजी तरूण हवा. उ.लि. बुटका आहे गं. आणि स्व. जो. अजून पोर वाटतो शिवाय त्याचा ’नाजूक’ प्रकारात मोडणारा चेहरा. सो, खूप ऍडजस्ट करूनसुद्धा ( :) ) ते गुजाभावजी म्हणून मला पटले नाहीत.

 
Designed by Lena