क्षण तो क्षणात गेला...हातचा सुटोनि..!

मला एकटं पाडणारे क्षण माझ्यापासून माझ्या प्रियजनांचा सहवासही हिरावून घेतात...
आज तर ’प्रिय’सुद्धा मला म्हणाला..
"तू सारया जगाचा राग माझ्यावर काढतेस..घडीघडी अस्वस्थ व्हायला तुला होतं काय??"
चक्क ’प्रिय’ने मला हे म्हणावं???
मला वाटायचं ’प्रिय’ला कळू शकेल..ज्यांना उत्तरं नाहीत असेच प्रश्न मला नेहमी का पडतात ते???
क्षणोक्षणी माझ्यावर कोणती बेचैनी गारूड करते ती..
जिवाला स्वस्थता का मिळत नाही ते??
पण आज त्यानेच पांढरा बावटा दाखवल्यावर माझं अवसानच गळलं..
माझं एकटेपण कोणी समजून घेऊ शकत नाही हेच खरं..
मी घराबाहेर पडले..
आमच्या घरापासून फ़क्त १० मिनीटाच्या अंतरावर समुद्र आहे..
समुद्र आणि त्याला अर्धचंद्राकारात वेढून टाकणारी सुरूची बाग!
समुद्राची गाज अगदी दुरुनही ऐकायला येत होती..भरतीचा समुद्र वेड लागल्यागत गर्जत होता..
समुद्राचं रोंरावतं, गर्जना करणारं भरतीचं रूपच मला आवडतं...ओहोटीच्या वेळचा समुद्र एखाद्या हतप्रभ वीरासारखा वाटतो..
एरवी एकतर पायाला गुदगुल्या करणारया लाटांना अनुभवत मी किनारयावरच घोटाभर पाण्यात उभी असते किंवा वेगवेगळ्या कलाबतू असणारे शंख-शिंपले तरी गोळा करत असते..
पण आज माझ्या मनात काही वेगळंच असावं..
त्या शंख-शिंपल्यांकडे ढुंकूनही न बघता, माझ्या आजूबाजूने तुरूतुरू धावणारया चिंबोरयांची अजिबात दखल न घेत मी भस्सकन पाण्यात पाय टाकले..
आणि सरळ आत आत जायला सुरुवात केली...
माझा सर्व राग आज मी माझ्या सर्वात आवडत्या समुद्रावर काढणार असते...
मला पडणारे सर्वच्या सर्व प्रश्न घशाच्या तारा ताणून,किंचाळून त्याला विचारणार असते..
फ़ताक फ़ताक पाणी उडवत मी लाटांमधून रागारागात वाट काढायला सुरुवात केली..
पायाखाली एखादा शिंपला हुळहुळत होता...
मी सरकत्या वाळूवर पाय भक्कम रोवत हळूहळू पुढे सरकत होते..
लाटांशी झगडून थकलेल्या पायांनी असहकार पुकारल्यानंतर मी थांबले..
एव्हाना कंबरभर पाण्यात मी आले होते..
खालची वाळू मला तोंडघशी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती..
आणि मी तिच्या प्रयत्नांना तसूभरही दाद न देता छद्मीपणे हसत तोल सावरत उभी होते..
आणि अचानक मला ती दिसली..
मला जणू काही धडाच शिकवायच्या इराद्याने सर्व प्रवाही जलकणांची अमोघ शक्ती आपल्यात एकवटून माझ्या दिशेने झंझावातासारखी येणारी ती लाट..
मी तिच्याकडे पापणी लवमात्र न हलवता फ़क्त पाहत होते...तिकडून पळून माघारी किनारयाकडे जावं...असा विचार माझ्या मनाला शिवलासुद्धा नाही..
इन फ़ॅक्ट..माझ्या संवेदनाच नष्ट झालेल्या होत्या..
तिच्यात आणि माझ्यात फ़क्त एका फ़ुटाचं अंतर राहिलं आणि..
पोटात कसं तळापासून ढवळून आलं..
जमिनीपासून पाय सुटतील का काय? असंच वाटायला लागलं..
आतापर्यंत वाळूत उद्दामपणे ताठ उभे असलेले माझे पाय लटलट कापायला लागले..
ती लाटेची भिंत माझ्यासमोर उभी ठाकण्याआधी एक क्षण माझ्यावर भीतीने पगडा केला..
क्षणागणिक तिचे माझ्या जवळ येणे पाहताना माझ्या डोळ्याच्या बाहुल्या पार उर्ध्व लागल्यासारख्या झाल्या..
लाट आ वासून माझ्यावर झेप घातली आणि मी माझे डोळे गच्च मिटून घेतले..
तो एक क्षण माझ्या डोळ्यासमोर आई आणि ’प्रिय’चे चेहरे तरळून गेले..
आणि..
संपलंच आता सारं! असं वाटेपर्यंत लाट मला ओलांडून पार झालेली होती..
क्षणभरात..
मी चिंब निथळत उभी होते..
तिची मस्ती, तिची रग माझ्या अंगाअंगाला स्पर्शून गेलीली होती..
माझ्याही नकळत माझ्या छातीचे ठोके वाढलेले होते..
माझ्या तोंडून एक दोन मिनीट्स एक शब्द फ़ुटायला तयार नव्हता..
केसा-कपाळावरचं खारट पाणी निपटत रोखून धरलेला श्वास सोडून मागे बघितले तर ...
तीच लाट मला वाकुल्या दाखवत किनारयाशी गुजगोष्टी करत होती..
त्या एका क्षणापुरता माझं भान सुटलेलं होतं..
त्या क्षणाला मी न्याय देऊ शकलेले नव्हते..
माझ्या सर्व संवेदना एकवटून मी तो क्षण जगू शकले नव्हते...
काही सेकंदापुरता भेटलेल्या मृत्युला नीट आकळून घेऊ शकले नव्ह्ते..
पुन्हा एकदा पराभूत मी..
घरी आले तर एव्हाना माझ्या मोबाईल वर चिंतातुर ’प्रिय’चे ४० मिस्ड कॉल पडले होते..
मी त्याला फ़ोन लावला आणि जे घडले ते सगळे त्याला सांगितले..
"तू ना....खरंच...मला वाटलंच होतं तू तडमडायला समुद्रावर जाशील.."
"..."
"सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत असा अट्टाहास का असतो तुझा??...प्रत्येक क्षण असा सगळाच्या सगळा उलगडून तुझ्यासमोर आला पाहिजे ही तुझी अपेक्षाच अचाट आहे.."
".."
"काही गोष्टी गूढगहिरया असतात...असीम असतात..अज्ञात असतात..अफ़ाट असतात...त्यांचे अफ़ाट अस्तित्व मान्य करण्यातच शहाणपण असतो...आजच्या लाटेने तुला काय शिकवलं??"
".."
"मी सांगतो ना...त्या क्षणी ताळ्यावर राहून तुला मृत्यू अनुभवायचा होता..आला अनुभव??क्षण तो क्षणात गेला...हातचा सुटोनि.."
".."
"आला क्षण अनुभवावा...!’अनुभवावा’..’जोखू नये’...!त्याला कळून, आकलून, पारखून घेण्याची जिद्द बाळगू नये..प्रसंगी त्यात वाहावत जावं...
".."
"हे आहे हे असंच असतं गं...आपल्या जिवाला त्रास करून घेण्याने किंवा ’कसं कळत नाही बघतेच मी’ म्हणून आकांडतांडव करण्याने त्याचं असं असण्यात बदल होणार नसतो..हे सर्व आपल्या आवाक्याबाहेरचं आहे गं..आणि तू हे एकदा मान्य केलंस ना...की बघ तुला कशी स्वस्थता लाभेल.."
"खरंच लाभेल??"
"माझ्यावर विश्वास ठेव.."
’प्रिय’वर विश्वास नाही ठेवणार तर कोणावर??
जो सुटला तो क्षण आपला नव्हताच मुळी किंवा तो कळून घ्यायची आपली लायकीच नव्हती असं स्वत:ला समजावण्याने खरंच जिवाला शांतता मिळते??
बघितलं पाहिजे..

10 comments:

HAREKRISHNAJI said...

बऱ्याच वेळा आपल्याला काय हवय, आपल्या मनात काय चाललयं हे दुसऱ्याला ठावुक असणार असे आपण गॄहीत धरुन जातो, पण हे गृहीतक तितकसं बरोबर नसते.

मस्तच लिहीलय.

Shirish Jambhorkar said...

Actually कधी कधी आपल्याला यातच समाधान वाटत की आपल्याला कोणी समजून घेऊ शकत नाही ..
मनाला यामध्ये सुध्डा सुखावणारी एक अनुभूती असते ... आणि ती अनुभूती आपल्याला आवडायला लागली ... की सर्वात जवळच्या व्यक्तिबद्दलहि शंका निर्माण व्हयायला लागतात...
शक्यतो... अशावेळी गरज असते ती एकन्ताचि नव्हे तर ... तर दुसर्यासोबत त्याच्या भाषेमध्ये संवाद साधण्याची... प्रिय तुला जेव्हडे समजू शकतो तेव्हडे कदाचित एखाद्या point of Time ला तुही नाही समजू शकणार ...
पण त्याचा त्रागा तुही समजून घेतलास तर त्यालाही कदाचित वाटेल ... अणूत्तरीत प्रश्नांचीही उत्तरे असतात ...

Shraddha Bhowad said...

आपण कोडयासारखे आहोत या विचाराने माणूस सुखावतो?
दुखतंय खरं...पण कुठं दुखतंय कळतच नाही...अशा phaseला तुम्ही सुखावणारी अनुभूती म्हणता??
I Hope Not..
एक क्षण मान्य केले की मला अशा वेळी ’प्रिय’शी त्याच्या भाषेत संवाद साधायला होता...
पण जी व्यक्ती आपल्याला इतकी thoroughly ओळखते त्या व्यक्तीने चारचौघांसारखा सूर काढल्यावर तो संवाद राहणारच नाही...त्या बोलण्याला ’पाटया टाकल्या’ असे बोलता येईल फ़ारतर..
ज्या आपण अनोळखी माणसांबरोबर बोलताना टाकतो तशा...
प्रश्न फ़क्त अशा अवघडलेल्या क्षणी सावरून घेण्याचा होता..
’प्रिय’बद्दल शंका कधीच नव्हती...आणि त्याच्यावर कुठलेही दोषारोप नाहीत..
पण..
पण जी गोष्ट अनुभवाने शिकायला मिळाली ती ’प्रिय’ने कितीही डोकेफ़ोड करून मला समजवायचा प्रयत्न केला असता तरी मला मान्य झालीच नसती..
सगळ्या प्रश्न २१ अपेक्षित सारखे ’प्रिय’तर मला सोडवून देऊ शकत नाही ना??
काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे आपणच मिळवावी लागतात..आपणहून!!

Shirish Jambhorkar said...

" ’अ’ आणि ’ब’ भेटले..’अ’ काही परिस्थितींमध्ये कसा वागतो, कसा रिऍक्ट होतो हे ’ब’ बघत आलेला आहे...मग ’ब’ काही आडाखे बांधतो, ’अ’ एखाद्या परिस्थितीत कसा वागेल याचे ठोकताळे त्याला जमू शकतात...आणि ते बरयाच वेळा खरे ठरतात सुद्धा...पण एखादा दिवस असा उजाडतो...की तशीच परिस्थिती उदभवल्यावर ’अ’ हा ’ब’ च्या ठोकताळ्यात बिलकूल न बसणारं वागतो...असं एकदा झालं, दोनदा झालं की ’ब’ बिथरतो...आणि मग उदगारतो...
’तू अशी तर नव्हतीस..’ "

हे प्रिय ला कधीच लागू होणार नाही का ?
की तो तुला ओळखतो म्हणून कधीतरी चार चौघांसारखे वागण्याचे स्वातंत्र्‍य गमावून बसला ?

---
आपण कोडयासारखे आहोत या विचाराने माणूस सुखावतो?
हो खर आहे ... मी वेगळा आहे .. मी वेगळी आहे ह्या विचारणे माणूस नक्की सुखावतो .. नाहीतर ... तुही कधी म्हणालिस नसतीस ...

" सगळ्यांना पडे माझी भूल..
मी एक वेडे रानफ़ूल... "


दुखतंय खरं...पण कुठं दुखतंय कळतच नाही...अशा phaseला तुम्ही सुखावणारी अनुभूती म्हणता??

दुखतेय हे ठीक आहे .. पण ज्यावेळी पर्याय समोर नसतात .. त्यावेळी माणूस शोधायचा तरी प्रयत्न करतो ... आणि तीच ती सुखवणारी अनुभूती असते ... Its a kind of neglecting the world feeling ...

Shraddha Bhowad said...

दुसरयाच्या वागण्याने दु:खी होणं...आणि दुसरयाच्या वागण्याला आपल असं असणं कारणीभूत असल्याने दु:खी होणं या परस्परविरोधी गोष्टी आहेत..
इथे कोणाचंही स्वातंत्र्य वगैरे घेण्याच्या गोष्टी चालू नाहीयेत..ना मी ’प्रिय’ने मला ज्या वेळेस मला गरज होती त्यावेळी त्याने धुतकारलं असं म्हणायचंय..
उलट त्याच्या अशा react होण्याने मी स्वत:हून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला...
नाही सापडली तेव्हा पुन्हा त्यालाच फ़ोन केला..
’प्रिय’ला बोलण्याचा अधिकार आहे...तसे तो बोलला...त्याला कंटाळा आलाही असेल कदाचित...मान्य!!
त्याची ही space मला मान्य असल्याने मी नेहमीसारखीच वागले...अनुभव घेऊनही उत्तरं सापडली नाहीत तेव्हा पुन्हा त्यालाच फ़ोन लावला...
कारण माणूस impulse मध्ये react होतो हे मला 100% मान्य आहे..
तुम्ही बोलता आणि मी सांगीतली आहे ती ती ’अ’ आणि ’ब’ ची थियरी केव्हा लागू झाली असती??
जेव्हा ’प्रिय’ चारचौघांसारखा झाल्यावर (मग ते exceptionally का असेना) मी त्याच्याशी संबंध तोडते ...किंवा ’माझं’ म्हणून ज्या गोष्टी आहेत ते त्याला सांगायच्या नाकारते...
थोडक्यात त्याच्यावर अविश्वास दाखवते तेव्हा...

Shraddha Bhowad said...

एखाद्यानं एखाद्या वागण्यावर रिऍक्ट होणं..आणि आपली रिऍक्शन त्याच्यावर अन्यायकारकरित्या imply करणं, प्रसंगानुरुप बदलणारया प्रतिक्रियांमुळे अविश्वासू ठरवून मोकळे होणे.. यावर ’अ’ आणि ’ब’ थियरी आधारलेली आहे..
आणि इथे ’प्रिय’ने अशा रिऍक्ट होण्यावर मी त्याला ’ब्रुट्स..यू टू!’ किंवा ’तू पण त्यातलाच!’, ’विश्वास टाकण्याच्या लायक नाहीयेस तू..!’, ’चुकले मी...तुझ्याबरोबर सगळं शेयर केलं’..अशी वाक्यं फ़ेकल्याचं दिसत नाहीये...
’प्रिय’चं आणि माझं नातं अबाधित आहे...
त्यामुळे ’प्रिय’ होण्याचं स्वातंत्र्य गमावून बसला हा मुद्दा फ़ारच गौण आहे..
राहता राहिली बात...’सगळ्यांना पडे माझी भूल...’ची!
हे वाक्य माझ्या साधं आणि ’वेगळं’ असण्याशी निगडीत आहे...’
कोडयासारख्या असलेल्या स्वभावाशी निगडीत नाही..
त्यामुळेच ’रानफ़ूल’ हा उल्लेख आला आहे...
मला अतर्क्य स्वभावाची प्रौढी मिरवायची असती तर मी स्वत:ला काहीतरी वेगळं म्हणजे मी एक शब्दपट...मी एक कोडं...असं काहीतरी म्हणवून घेतलं असतं..
रस्त्याच्या कडेला पण उमलणारया रानफ़ूलाची उपमा कशाला लावून घेतली असती?
अशा स्वभावाने कोणी भुलत नाही हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही..

Shirish Jambhorkar said...

If you dont mind then only I will write further ( Next comment )...
नाहीतर आपली ही चर्चा अशीच चालू राहील जोपर्यंत 1 जण Convince होत नाही ... किंवा दुसरा बंद कर म्हणत नाही ...

आणि हो " इथे कोणाचंही स्वातंत्र्य वगैरे घेण्याच्या गोष्टी चालू नाहीयेत.. " तुझ्या ह्या वाक़याचा मी काढलेला अर्थ ...
"मी विषय सोडून भरकटत आहे किंवा मी नको त्या गोष्टींची चर्चा करत आहे "

आणि माझे मत ... " मी जे दिसले ते का होत आहे असा विचार करत होतो .. म्हणून जे वाटले ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला "

अजुन एक ...

"मला वाटायचं ’प्रिय’ला कळू शकेल..ज्यांना उत्तरं नाहीत असेच प्रश्न मला नेहमी का पडतात ते???
क्षणोक्षणी माझ्यावर कोणती बेचैनी गारूड करते ती.."


त्याला कळत ... फक्त त्यावेळी नसेल कळाल ...
आणि कधीही कुणाच्या शकण्यावर संशय नसावा .. प्रत्येक गोष्ट परिस्थिती सापेक्ष असते !

Shraddha Bhowad said...

परिस्थितीला, वाक्याला, उद्गाराला, हावभावांना interpret करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते..
आता माझ्या या गोष्टीत जर 'प्रिय'च्या react होण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं वगैरे येण्याचा काही प्रश्नच नव्हता तर मी तसंच सांगणार ना??
ह्याचा तुम्ही काढलेला अर्थ मला बिलकुल अपेक्षित नव्हता..
जे गोष्टीत नाहीच आहे त्याबद्दल बोलले गेल्यावर माझी प्रतिक्रिया ही अशीच असणार होती...
तुम्हाला माहित्येय?? भेटलेल्या अनेक माणसांमधून आपल्याला होणारी, आपल्याला समजून घेणारी फ़क्त एकच व्यक्ती असते..बाकी सगळा गोतावळा म्हणजे उखीर-वाखीर पसारा असतो..
एखाद्या किचकट स्वभावाच्या माणसाला अशी समजून घेणारी व्यक्ती भेटली की तो अशा व्यक्तीशी कायम कृतज्ञ असतो..कारण आपले अवघडलेले क्षण ही व्यक्ती सावरून घेईल असा त्यांना दुर्दम्य विश्वास असतो...
पुढे कधी जर त्या व्यक्तीने आपल्याला समजून घेण्यात असमर्थता दाखवली तर आपण आपल्या किचकट स्वभावाला म्हणजे पर्यायाने स्वतःलाच दोषी ठरवतो..आपल्याला स्वतःचाच राग येतो...
त्या व्यक्तीचा नाही...
'प्रिय' तर कायमचं श्रद्धास्थान आहे..पण तो माणूस आहे ही गोष्ट मी कशी विसरेन???
म्हणूनच 'प्रिय' ने अशी असमर्थता दाखवल्यावर मला त्याचा नाही तर माझा राग जास्त आला...
मी ही अशी का आहे??थोडीशी अधिक सुलभपणे समजणारी का नाही??हे प्रश्न मी 'माझ्या'वरच्या रागाने समुद्राला विचारणार होते..
या सर्व घटना घडल्या...यात 'प्रिय' ला दोषी कुठेही ठरवले गेलेले नाही..
तुम्हाला react होण्याचा अधिकार आहे कारण ब्लॉग हे विचार सार्वजनिकरित्या मांडण्याचं साधन आहे..
त्यामुळे तुम्हाला काय वाटले हे निःशंक कळवत चला..

Meghana Bhuskute said...

असल्या शांततेपेक्षा मला तर माझी अस्वस्थताच प्यार असेल बुवा. पण अखेर प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, उत्तरं वेगळी आणि तडजोडी अजूनच वेगळ्या. कुणास ठाऊक.
पण एक मात्र आहे - आपण एकतर मैदानात असतो, नाहीतर प्रेक्षकांत असतो. प्रत्येकच क्षणात. याची धुंदी त्यात नाही, आणि त्याची झिंग यात. दोन्ही गोष्टी हातात याव्या म्हणून तर तडफडत नाहीयेस ना तू?
गॉड, तू मस्त लिहितेयस!

Dk said...

ti laat ajunhee mee imagine karu shktoy ithe! phaarch sahiii zaaley he post :)

 
Designed by Lena