आनंदाचे डोही..

परवा बरयाच दिवसांनी ’प्रिय’ची भेट झाली..
आला तो हातात काहीसं लपवूनच..
’प्रिय’ने मला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी आणावं म्हणजे अघटीतच...
नाहीतर सरप्राईझेस, गिफ़्ट्स, चॉकोलेट्स, कुठेतरी लपून बसून मागून "भ्वॉक" करणे, बॉक्समागून बॉक्स खोलायला लावून आतल्या गिफ़्ट्साठी ’प्रिय’ला रडकुंडीला आणणं हा प्रांत माझ्याकडे आहे..(हे सर्व करताना स्थळ-काळ-वेळ यांचा अजिबात विधिनिषेध नाही)
"आपले स्वागत असो.." असे म्हणून त्याने मागून निशीगंधाच्या डहाळ्यांचा मोठ्ठाच्या मोठ्ठा गुच्छ काढला..
"तुला आवडतो म्हणून.."
सकाळी ९ वाजता त्याने कुठल्या फ़्लोरिस्टाकडून निशीगंध मिळवला होता कोण जाणे?
"थॅंक्स रे..खरंच सुंदर आहेत.."
यावर भरून पावल्यासारखा ’प्रिय’ हसला..
मला ठरवताच येईना..
’प्रिय’ला भेटायला गेले ती सकाळ अधिक सुंदर का तो निशिगंध सुंदर का ’प्रिय’चं आतबाहेर शुभ्र हास्य अधिक सुंदर..?
त्या क्षणी मी खूप आनंदात होते..
इतकी आनंदात की मी अतिशय पॉवरफ़ुल असा ’पेट्रोनास’ तयार करून डिमेंटर्सची झुंडच्या झुंड परतवून लावली असती..(हॅरी पॉटर न वाचलेले वाचक...क्षमस्व!)
आपल्याला एवढा आनंद झाल्याला किती दिवस झाले??
वर्षे तर खासच नाहीत..
परवापरवा पर्यंत कात्रजच्या बागेत पिसारा फ़ुलवून मनमुक्त नाचणारा मोर बघून मी अशीच हरखून गेले होते..
त्यावेळी ’प्रिय’ त्या मोराच्या पिंजरयातील लांडोरी दुसरया पिंजरयातल्या पिसारा अजिबातच न फ़ुलवलेल्या मोराला ’लाईन’ का देत होत्या??याच्या ऍनालिसीस मध्ये गढला होता)
जगात माझ्याइतकं आनंदी कोणीच असू शकत नाही..असं मला कधी वाटलं??
का वाटलंच नाही कधी??
वेल, वाटलं...खूप खूप वेळा वाटलं..

---------------

आता या क्षणी उपांत्य विशारदचा सराव करताना केलेली ढोर मेहनत आठवतेय, घोटवून घेतलेला ’धमार’ आठवतोय..
त्यावेळचा आमचा सराव पाच पाच तास तबलजी आणि पेटीवाले यांच्या सोबतीने चालायचा...
’धमार’ मधली ततकारची बाँट करताना आमची जाम फ़े-फ़े उडायची...विशेषत: दृत लयीत..
दीड किलोचे घुंगरू प्रत्येक पायात घालून ही बाँट करताना आमच्या पायाचे खरंच तुकडे पडायचे..
अशाच एका सरावाच्या वेळी तबलजींनी लय अतिदृत केली..आणि मी सोडून बाकी सगळ्यांनी शरणचिठ्ठी स्वीकारली..
तो अतिदृतमधल्या बाँट्चा गोवर्धन पेलून मी समेवर आले तेव्हा तबलजींच्या ’क्या बात है..!’ या प्रशस्तिपत्रकामुळे मला अस्मान ठेंगणे झाले होते..

---------------

इंजिनीयरींगचे दिवस..
कोणाच्या थ्रो-बॉलच्या सर्विसच्या प्रेमात पड, कोणाच्या अक्षराच्या प्रेमात पड असे प्रकार चालू असताना रेखा भारद्वाजने गायलेलं ’तेरे इश्क में’ ऐकण्यात आलं...आणि मी थरारून गेले ..
"बादल धुने, मौसम बुने
सदिया गिनी, लम्हें चुने
लम्हें चुने, मौसम बुने
कुछ गर्म थे, कुछ गुनगुने
तेर इश्क में..कब दिन गया...कब शब गयी.."
ऐकलं आणि वाटलं...च्यायला...असं काहीतरी भव्यदिव्य आपलं प्रेम असलं पाहिजे..
’प्रिय’ला भेटले आणि ’दिल सुफ़ी ये था’ची सुरावट मनात फ़िरून पूर्ण झाली..
सगळ्यांना सगळंच मिळतं असं थोडीच असतं...?
पण ज्यांना ईप्सित मिळतं अशा थोडक्या लोकांपैकी मी एक होते ही काय कमी आनंदाची गोष्ट आहे??

---------------

इयत्ता आठवी...
महाजन सर इंटरमिडीएट एक्झामची तयारी करून घेत असत..
माझं बाकी सगळं ओ.के. होतं पण ’स्मरणचित्राच्या’ नावाने शंख होता..
मला मुळी माणसं काढताच यायची नाहीत..
मी अशीच रडकुंडीला येऊन मी कागदावर चितारलेल्या ’होपलेस’ माणसांना(?) पाहत होते...
तेव्हा महाजन सरांनी मला एखाद्या पाककृतीसारखा माणूस ’बनवायला’ शिकवला होता...
मी पहिला ’बांधेसुद’ माणूस काढला तेव्हा हर्षातिरेकाने आरोळीच ठोकली होती..
(ता.क:मी इंटरमिडीएट पास झाले)

---------------

इयत्ता दुसरी
शाळेत गोकुळाष्टमी साजरी व्हायची होती..आणि अस्मादिकांना श्रीकृष्णजन्माची कथा सांगायची होती..
आयुष्यातलं पहिलं-वाहिलं वक्तृत्व..ते पण तो चनिया-चोलीचा मला न पेलणारा बोंगा सावरत, नाकात खाज आणणारी ती खोटी नथनी सांभाळत, डोक्यावरून सारखी ओघळणारी ती तिपेडी बिंदी चाचपडत करायचं म्हणजे..
आई नाही का मला इंजेक्शन घेताना नेहमी सांगायची..."बस्स एक मिनीट....झालंच.."
तसं मी स्वत:ला समजावत माझी भाषण-एक्स्प्रेस भरधाव सोडली..
कथा संपल्यानंतर धापा टाकत थांबले तेव्हा कळले की सगळ्यांना कथा आवडलेली आहे आणि मुख्य म्हणजे ती सगळ्यांना कळली आहे (सुदैवाने!)
तेव्हा आईच्या डोळ्यातलं कौतुक पाहून मला असाच काहीसा वर्णनातीत आनंद झाला होता..

---------------

असे बरेच आनंद आहेत...
टोकियोचे मेडल, ’मेरा कुछ सामान’ पहिल्यांदा ऐकलं तो क्षण, पहिली कविता, बोर्डात येणे, भांडून मिळवलेले हक्क, पहिली स्वकष्टाची कमाई, ’प्रिय’ला चर्चेत भारी पडले तो क्षण, एट्सेट्रा...एट्सेट्रा...
लहानपणीचे माझे आनंद कदाचित आजच्या या घडीला क्षुल्लक वाटतील...
पण आजही ते क्षण काळाच्या सीमा न बाळगता मला तसेच्या तसे आठवतायेत..
पुढे वय वाढलं, जाणिवांचा विस्तार वाढला आणि मग अशा अवर्णनीय आनंदाच्या व्याख्या बदलायला लागल्या..
पूर्वी मला आनंद झाला की मी दोन्ही मुठी अशा हवेत नाचवत ’येsss’ करून ओरडायचे..
नंतर नंतर माझ्या आनंदाला बॅकग्राऊंड म्युझिक आलं..
रंग आणि गंध आला..
हल्ली हल्ली मला आनंद झाला की मोझार्टच्या झाडून सगळ्या सिंफ़नीज एकाचवेळी मनात वाजायला लागतात..नाहीतर आशा-ताईंचं लाडीक ’आज मैं खुश हू...की तुम ही बोलो मै हु खुश क्यु?"...ऐकायला यायला लागतं..
माझा आनंद हा ’निळ्याशार’ कलरचा असतो..आनंद झाला की मला या रंगासारखंच cool, calm आणि compose वाटायला लागतं..
माझ्या आनंदाला अष्टगंधाचा वास येतो...’प्रिय’च्या शर्टाला नेहमी येतो तसा..!

---------------

अशाच आपल्यामध्ये बिलकुल न मावणारया ,आपल्याला फ़ोडून बाहेर येईल की काय? असे वाटणारया आनंदाला शब्दात कसं वर्णायचं असतं??
प्रश्नाचं उत्तर मिळेचना तेव्हा ’प्रिय’ला विचारलं..नेहमीसारखंच..
तो म्हणतो शब्द अपुरे पडत असतील तर तुकोबांना शरण जावं..
आणि मला जाणवलं...माझ्या आनंदाचं वर्णन तुकोबा किती यथार्थ शब्दात करून गेलेत..
ते म्हणतात...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदचे..!

इतके अचूक शब्द सापडलेत की तोच निळाशार आनंद मला पुन्हा एकदा झालाय..
आताही मला बीथोवनची सातवी सिंफ़नी ऐकायला येतेय..
असा आहे मला नेहमी होणारा रंग-गंध वाला, audible आनंद!
आनंदाचे रंग-गंध-आवाज बदलतील कदाचित...पण आनंदाची व्याप्ती या शब्दांपलीकडे कधीच जाणार नाही...
तुकोबांच्या चरणी आपले दंडवत!

10 comments:

Dhananjay said...

Good post!

Abhijit Bathe said...

पोस्ट चांगलं आहे, पण विधिनि्षेध न बाळगता (बहुतेक) तुझं धडामधुडुम उड्या मारणं जास्त आवडलं.

Unknown said...

post changla aahech... kahi vaad naihye tyat... pan rahun rahun 1 vichar manat yeto.. bagh tula patato ka?
Anandala Ashtgandhacha vaas samju shakto pan.. Priy chya shairtala....?? jara pachat nai he vaky....
kay g tuza PRIY, kuthe devlat pujari vagare aahe ka?
mi aata bhlatach aagaupana kartoy... raag manu nako haaannn pls........!

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

वेल..
आनंदाला अष्टगंधाचा वास येऊ शकतो तर �प्रिय�च्या शर्टाला का नाही??
पुजारी वगैरे नाहीये तो..
तुम्हाला जर �प्रिय�सारखी व्यक्ती लाभली असेल आणि तुम्ही जर माझ्यासारखे असता तर तुम्हीही त्याला अशाच त्याच्याभोवती दरवळणारया गंधाने इमॅजिन केले असते..
प्रत्येक माणसाची गोष्ट वेगळी...गुंतण्याची intensity वेगळी..
त्यामुळे तुम्हाला ते वाक्य न पचणे खूप साहजिक आहे..
होतं असं..
श्रद्धा...�शब्द-पट�वाली

Meghana Bhuskute said...

आनंदाला अष्टगंधाचा वास. आणि तोही त्याच्या शर्टाला नेहमी येतो तसा? जबरा लिहितेस तू!

सखी said...

सुंदर गं!! तुझ्यसारख्या अशा धडामधुडुम कल्पना माझ्या तोंडूनही निघतात ब-याचदा आणि माझ्या मैत्रिणी म्हणतात...बस्स सुटलीयेस फ़ुल्ल टू!! :)
लिहिते व्हा....

Dk said...

Aah he vachlch nvht ki g mi... mastch lihilys ekdam :)

Nil Arte said...

माझे पण असे मोमेंटस आहेत ....त्यांना मी 'मोहरा' बोलतो ...आणि मूड आला की पेटीतून काढून निरखत बसतो...आणि खुश होतो... अंकल स्क्रूज सारखा :)

एक "जॉय ऑफ बीइंग" पण प्रकार असतो माहितेय तुला ...म्हणजे खूप काही मोठं बाहेरचं रीझन नसताना असंच आपल्याला happy वाटतं!

"जॉयोलॉजी" म्हणून एक चक्क शास्त्र आहे ...सही ना ??

Shraddha Bhowad said...

जॉयॉलॉजी??
Never heard of it.
कुठून शोधून काढतोस तू हे सगळं? मला आता दिवसेंदिवस खात्री पटत चालली आहे की तू आयटीमध्ये वाया चालला आहेस. शप्पथ.

 
Designed by Lena