एक ’होपलेस’ प्रश्न आणि ’प्रिय’..

परमेश्वराने कायम एकमेकांमधून निसटणारे नट-बोल्ट्स बसवलेल्या मेंदूची रचना केलेले काही विरळा नग बनवले आहेत..आणि मी त्यातला एक जातिवंत वाण आहे..
असं ’प्रिय’ म्हणतो...’मी’ नाही...
काहीही आगापिछा नसलेले कुठले प्रश्न कधी माझ्या डोक्यात येतील आणि त्यासाठी मी ’प्रिय’चे किती डोकं खाईन याला काहीच सीमा नसते...
’प्रिय’ मला ’छळवाद आहे नुसता’ असं म्हणतो कधीकधी... प्रेमाने...well, i think so..मला exactly माहीत नाही..
कारण या सर्व शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी हक्काचा हातात सापडतो तो ’प्रिय’...
काल अशाच एका प्रश्नाच्या hangoverमध्ये होते तेवढ्यात मोबाईल वर ’करीब’ची टिपीकल शीळ वाजू लागली...
माझ्या मेंदूला खाज सुटलीये हे ’प्रिय’ला कसं कळतं काय माहीत???टेलीपथी असावी बहुतेक...
आपणाहून डोक्याला त्रास करून घ्यायला तो येत असेल तर मी ’ना’ का म्हणावं???
त्याला हॅलो ही बोलायची सवड न देता मी माझा प्रश्न भिरकावते...
"उद्या माझा मृत्यू झाला तर कसं वाटेल तुला???"
पलीकडून पहिल्यांदा सुस्कारा...मग थंड आवाजात विचारणा..
"हे काय नवीन खूळ काढलेस आज तू??"
"सांग ना..उद्या मी पटकन मरूनच गेले तर काय करशील तू? रडशील??? कुढशील??? माझ्या पार्थिवाचे दर्शन तरी घ्यायला येशील ना तू???"
पार्थिव???
असं अगदी काही senti बोलायचे झाले की मी कोणालाच ऐकत नाही...
’माझं पार्थिव’ हा शब्द्प्रयोग ऐकताना मला आताच इतकी गंमत वाटतेय तर त्यावेळी ’प्रिय’ला हसू दडवायला किती कष्ट पडले असतील???
असो..
"सुटशील ना तू???त्रास गेला डोक्याचा करत..???"
निमिषर्धाचाही विलंब न करता पलीकडून उत्तर आले..
"खरंय ते"..
बस्स...मी धाय मोकलून रडायलाच लागले..
"मला माहीतच होतं ते...आता तुझ्या तोंडून ऐकलं इतकंच.."
’प्रिय’ करायला गेला एक आणि झाले भलतेच...
कुठून झक मारली आणि मस्करी केली असे झाले त्याला..
’प्रिय’ रोखठोक आहे...अरे, पण कोणत्या व्यक्तीसमोर किती स्पष्ट बोलावं याचेही काही एटीकेट्स असतात..माझ्यासमोर मलाच "तू गेलीस म्हणजे त्रास जाईल डोक्याचा!" असं म्हणणं म्हणजे हद्द झाली..
आता तू आणि तुझा स्पष्टवक्तेपणा...जा तेल लावत...
आमच्यामध्ये जवळजवळ पाच मिनीटांची प्रदीर्घ शांतता असते...
आता मात्र प्रिय हतबल होतो...
आता तो ठेवणीमधलं अस्त्र उपसतो...प्रिय गायला सुरुवात करतो..
आणि ही मात्रा मला लागू पडते..
पाळण्यातलं तान्हुलं कसं कोणी गाणं गायला लागलं की कसं बोळकं खुलवून हसतं???तशी माझ्या रडण्याची जागा आता अनावर झालेल्या हसण्याने घेतलेली असते..
म्हणजे त्याच्या आवाजात ती ’हम दिल दे चुके सनम’मधल्या अजय सारखी सच्चाई असेलही कदाचित पण त्याने गाण्यास सुरुवात केली की मला हसूच फ़ुटते आणि ते काही केल्या आवरत नाही..
त्या हसण्यामध्ये त्याचा आवाज मरायला ऐकलाय कोणी???
इतक्या दुरुनही मला त्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा झालेला असणार याची पुरेपूर कल्पना होती...
’प्रिय’ला गायला बियला आवडत नाही..
म्हणजे गाताना आपला आवाज ओल्या लाकडावर रंधा मारल्यासारखा येतो याची त्याला पुरेपूर जाणीव आहे म्हणून की काय कोण जाणे???
पण..
स्वत:च्या मनाविरुद्ध केवळ माझ्याकरता केलेली छोटीशीही गोष्ट मला पुरे असते..
"मी कधी कधी खूप मूर्खासारखी बोलते नं?"
रडक्या नाकाने होणारा ’सूं सूं" होणारा आवाज शक्य तितका आवरायचा प्रयत्न करत मी बोलते..
मला फ़ार कमी वेळा असं काही बोलायचं सुचतं..
मी पुन्हा बोलती झालेली बघून पलीकडून मोठ्ठा नि:श्वास सुटतो..
"नाही गं वेडे..असं कोण बोलतं???"
या मधाळ वाक्यानंतर पलीकडून अत्यंत निर्मम आवाजात माझी हजामत सुरु होते..
"पहिली गोष्ट...तू कधी कधी नाही तर बहुतेक वेळा मूर्खासारखंच बोलतेस..
दुसरी गोष्ट..तू मूर्खासारख्या विचारलेल्या प्रश्नावर मी पण काहीतरी मूर्खासारखंच बरळेन असा सोयिस्कर समज करून घेतेस...
तिसरी गोष्ट..तुला विनोद कळत नाहीत आणि ..
चौथी गोष्ट...या तीन गोष्टींच्या एकत्रित घडण्याने जो काही वितंडवाद व्हायचा असतो त्याची मला आता सवय झाली आहे.."
प्रियचं मला असं हसण्यावारी घेणं मला जरा झोंबतंच...
"ते काहीही असो...जर माझ्या जाण्याने...."
माझं वाक्य मध्येच तोडत ’प्रिय’ खेकसतो...
"तुझं ते दळण थांबव आधी...तू काही इतक्यात मरत नाहीस आणि असा बावळटासारखा प्रश्न पुढे कधी डोक्यात उपटला तर हे वाक्य लक्षात ठेवायचं...
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ll
अकस्मात तोही पुढे जात आहे ll
रामदास स्वामी नाव ऐकून आहेस का??"
"तू मला काय मूर्ख समजतोस का रे??"
"मला माहीत आहे तुला माहीतेय ते...पण नुसतं ठाऊक असून काय कामाचं...???त्यांचे हे ११ शब्द ध्यानात ठेवले असते तर इतका hopeless प्रश्न ’तू’ मला विचारलाच नसता...बोल.."मरे एक..""
आणि मग ’रमण नमन कर"च्या चालीवर माझ्याकडून हे वाक्यं वदवून घेण्याचा उपक्रम पार पाडला गेला..
’प्रिय’ची ही स्टाईल मला भारी आवडते...
’प्रिय’ दासबोध, ज्ञानेश्वरीमधले दाखले असे casually देतो...
त्यामुळे मी भारंभार वाक्यं वापरून त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बहुधा एका वाक्यात किंवा कुठलातरी दाखला देऊनच संपतं..
मी किती तोंडाची वाफ़ दवडते??? ह्याचं percentage काढायला की काय कोण जाणे??जगन्नियंत्याने ’प्रिय’ची योजना करून ठेवली असावी असे मला नेहमी वाटते..
याही वेळेस माझ्या खूप तावातावाने वादावादी होण्याची अपेक्षा असलेल्या प्रश्नाचे तीनतेरा वाजलेले असतात..’प्रिय’च्या एका वाक्याने..
आता आमचे general बोलणे सुरु झालेले असते...
३ मिनीटांनी पुन्हा माझा प्रश्न येऊन ’प्रिय’ला टोचतो..
"ए सांग ना...मी गेल्यावर..."
पुढे काही विचारावे लागतच नाही..
फ़ोन कट झालेला असतो..

मै लाख जतन कर हारी..!!!

काल माझ्या PC मधलं माझं Folder ’लावत’ बसले होते..
म्हणजे काय आहे...महीनाभरात जो काही data मिळवून dump केला त्याला सुसंगतरित्या लावायचं काम मी शुक्रवारी करते...week-endला..
Load-sheddingमुळे गेलेली वीज ८-३० पर्यन्त परत येते...९.१५पर्यन्त कुठलातरी पिक्चर बघत किंवा एखादं पुस्तक चाळत जेवण आणि नंतर या आवराआवरीस सुरुवात...
या dataमध्ये बहुतेककरून खूप सारी इ-बुक्स, कुठल्या ना कुठल्या pdf फ़ाइल्स , किंवा download केलेली गाणी असतात..
माझ्या बहिणाबाईपण या dumpingमध्ये आपली मौलिक भर टाकत असतात..
अशी ही माझी उपसाउपशी म्हणजे बरयाचवेळा ’डोंगर पोखरून उंदीर’ असते..म्हणजे सगळं संगतवार लावल्याचं समाधान याखेरीज काही हाती लागत नाही..
यावेळी मात्र असं व्हायचं नव्हतं..
यावेळे माझ्या हाती लागलं 'Fuzon' आणि त्यातलं नितांतसुंदर ’मोरा सैय्या’...

जिचा पती परदेशी निघून गेला आहे आणि शंकाग्रस्त झाल्याने जिचं मन मुळी कश्शाकश्शात लागत नाहीये अशा ’प्रोषितपतिका’ नायिकेचं वर्णन करणारी ही बंदीश कम ठुमरी...’खमाज’ रागात गायलेली...
’खमाज’...दिवसाच्या ’पाचव्या’ म्हणजेच रात्रीच्या ’पहिल्या’ प्रहरात गायला जाणारा राग!
तिन्हीसांज, संधिकाल, आणि थोडीबहुत रात्र या समयाला कवेत घेणारा रात्रीचा पहिला प्रहर..
ज्या प्रहरात मन उगाचच काळवंडून जाते...भयशंकीत होते....आठवणींचा चकवा पुन्हा पुन्हा फ़ेर धरत नाचायला लागतो...कुणाच्यातरी आठवणीत शरीरातला अणू-रेणू बंड करून उठतो...अशा कातरवेळी गायला जाणारा हा राग...
अशा रागात आणि ’तीनताल’ उर्फ़ ’त्रिताला’त बसवलेली ही बंदीश!!!

सावन बीतो जाये पे हरवा
मन मेरा घबराये
(सर्वांना तजेलदार करणारा श्रावण आता सरत आला....
पण माझं मन मात्र शंकीत आहे..)

ऐसो गये परदेस पिया तुम
चैन हमें नहीं आये
(तू असा परदेशी निघून गेलेला..
जिवाला स्वस्थता अशी नाहीच...)

मोरा सैय्या मोह से बोले ना
मोरा सैय्या मोह से बोले ना
(कारण...
माझा प्रियतम माझ्याशी बोलायला नाहीये इथे...)

मै लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी
(काय काय नाही केलं पण सारं व्यर्थ...
सगळं काही करून हरले पण तुझी आठवण काही सरत नाही...)

मोरा सैय्या मोह से बोले ना
मोरा सैय्या मोह से बोले ना
(कारण...
माझा प्रियतम माझ्याशी बोलायला नाहीये इथे...)

तुम जो नहीं तो ऐसे पिया हम
जैसे सुना आंगना..
(तू नाहीस तर मी अशी
जशी भरल्या घरात एखादं भकास अंगण!!!)

नैन तेहारी राह निहारे
नैन तेहारी राह निहारे
नैनन को तरसाओ ना..
(तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसले रे...
त्यांना आणखी व्याकूळ नको करूस... )

मै लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी
(काय काय नाही केलं पण सारं व्यर्थ...
सगळं काही करून हरले पण तुझी आठवण काही सरत नाही...)

प्यार तुम्हे कितना करते है
तुम ये समज नहीं पाओगे
(तुझ्यावर किती प्रेम आहे माझे
जे तुला काही केल्या कळायचे नाही..)

जब हम ना होंगे तो पे हरवा
बोलो क्या तब आओगे??
(अरे प्रिया सांग की...
मी नसेन इथे
तेव्हा का येणार आहेस??)

मै लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी
(काय काय नाही केलं पण सारं व्यर्थ...
सगळं काही करून हरले पण तुझी आठवण काही सरत नाही...)

मोरा सैय्या मोह से बोले ना
मोरा सैय्या मोह से बोले ना
(कारण...
माझा प्रियतम माझ्याशी बोलायला नाहीये इथे...)

पहिल्याच ओळीत ’हरवा’ हे संबोधन...
या उत्तर भारतीय भाषेचं हेच लेणं आहे..आपल्याकडे ’प्रिय’, ’प्रियतम’ आणि त्यांच्याकडे ’मनवा’, ’मितवा’, ’हरवा’..
च्यायला...नुसत्या उच्चारानेच लडीवाळ वाटतं...
याउलट ’प्रिय’ बोलताना हातचं राखून ठेवल्यासारखं वाटतं...
ही विरहीणीची कैफ़ीयत आहे हे तर उघडच अहे पण ती पुरुषाच्या आवाजात ऐकताना कसली अवीट गोड वाटते!!!
हीच जर एखाद्या स्त्री गायिकेनं गायली असती तर खूप 'Obvious' वाटत राहीलं असतं ..नाही???
केवळ हेच गाणं नाही तर हा प्रत्यय आपल्याला कैलाश च्या ’तेरी दिवानी’ आणि नुसरत फ़तेह अली खान यांच्या ’पिया रे’ मधून पण आलेला आहेच की!
स्त्रीत्वाचे वेगवेगळे आविष्कार पुरुषाच्या आवाजात ऐकायला मिळाले तर अधिक परिणामकारकरित्या पोहोचतात हा माझा अनुभव आहे..

आता थोडंसं या गाण्याच्या जनकांबद्दल!!

'Fuzon' इति 'Fusion' हा पाकीस्तानी बॅंड आहे...इम्रान,शालेम आणि शफ़कत या त्रिकूटाचा..
ही मंडळी पूर्वीय संगीत आणि पाश्चिमात्य वाद्यं यांचं म्हणजेच मेळ घालण्यात रस दाखवतात..
शालेम स्ट्रिंग गिटार वाजवतो..इम्रान keyboardवर आहे तर शफ़कत हा गायक आहे...
आईशप्पथ तुम्हाला सांगते..गाणं ऐकताना मला फ़क्त guitarचा आवाज ओळखू आला..बाकी मध्येच आपल्या दक्षिणेकडे वाजवतात तसा मडक्यावरचा आवाज आला...मध्येच ड्रम ऐकू येत होता..
पण..
या सर्व percussionsचा (तालवाद्यांचा) परिणाम साधायचं काम इम्रानचा keyboard करतोय म्हटल्यावर मी आश्चर्याने ’आ’च वासला!
इम्रान ने keyboardवर काय मज्जा मज्जा केलीये हे अनुभवण्याकरता तरी तुम्ही ’मोरा सैया’ ऐकाच...
राहता राहिले ’मोरा सैया’चं शक्तिस्थान...शफ़कत चा आवाज..
शफ़कत अमानत अली खान...
पटियाला घराण्याचे उस्ताद अमानत अली खान यांचे सुपुत्र..
तुम्ही Hydrabad Blues 2 बघितलाय का???त्यात हे गाणं होतं..माझा तो पिक्चर काही कारणाने बघायचा राहून गेला पण या गाण्याच्या निमित्ताने मी तो बघून घेणार आहे
याच शफ़कतने ’कभी अलविदा ना केहना’मधलं ’मितवा’ पण गायलय..आठवलं का???
स्त्रीला गाण्यातून उभी करण्यात भले भले कमी पडले तर हा कालचा बच्चा काय दिवे लावणार???असंच वाटतं...पण..
शफ़कतने हे आव्हान पूर्ण ताकदीनिशी पेललंय..
’मोरा सैया’ मधल्या ’मो’ वर इतकी लाडीक लकेर आहे की आपल्याही नकळत आपल्याला गुदगुल्या होतात...
’बोले ना’ वर तर इतक्या हरकती घेतल्यात की बास्स..आमची काहीही हरकत नाही असंच म्हणावंस वाटतं...
गुणगुणायलाही कठीण असं हे गाणं शफ़कत अगदी लीलया गातो...
तर...
गिटारच्या प्रत्येक झणत्काराबरोबर अधिकाधिक गहिरं आणि प्रकटशील होत जाणारं हे गाणं...’मोरा सैया’...
ज्यांना ’संगीत’ आवडतं अशा कानसेनांसाठी एक पर्वणी...!!!

(ताजा कलम:
’प्रिय’ला नाही आवडलं.. bore आहे म्हणाला..
वास्तविक चूक माझीच आहे...
ढिनचॅक आणि ढॅटढॅण गाणी आवडणारया ’प्रिय’ला मी ’मोरा सैय्या’ ऐकवायला गेले...)

पण..’गुजा-भावजी’ कोण???

पूर्ण दिवसाचा इस्कोट झाला होता...
WDCच्या सर्टिफ़िकेट्सचं काम,सेमिनार्स,सबमिशन्स,"मॅम, एक क्वेरी थी.."करत पुरता श्वासही न घेऊ देणारे विद्यार्थी...सगळ्यांना पुरी पडण्याचा प्रयत्न करून मी अगदी कावून गेले होते...
यावेळी ’प्रिय’चा फ़ोन आला तर काय बहार येईल...
बोलाफ़ुलाची गाठ पडावी म्हणतात ना तसेच काहीसे झाले आणि ’करीब’ची ’चोरी चोरी जब..’ची ती टिपीकल शीळ वाजायला सुरूवात झाली..
ही खास ’प्रिय’साठीची रिंगटोन!!
फ़ोन उचलल्या उचलल्या ’प्रिय’ अगदी विरळा ऐकायला मिळणारा उत्तेजित आवाज आला..
"मने,भारी पुस्तक आहे.."
’प्रिय’ तोंडदेखले compliments कधीच देत नाही..
पण ’प्रिय’ने मी विचारल्याशिवाय एखादं पुस्तक आवडलं की नाही हे मला सांगावं...??
हे म्हणजे too much झालं..
म्हणजे या बापूला खरंच आवडलं असणार...
काही दिवसांपूर्वी मी ’प्रिय’ला ’पडघवली’ वाचायला दिलं होतं...गो.नी.दांडेकरांचे...
पण याचं एवढ्यात वाचून झालं???
कारण मी वाचायला बसल्यावर एका बैठकीत पुस्तक खाते आणि हा एक पुस्तक वाचायला किमान आठवडा लावतो..सलग वाचून त्याचं डोकं भणभणायला लागतं म्हणे..
मग आज हे असं ’इप्रित’ कसं काय घडलं???
मी त्याला तसं विचारलंही...आणि यावर तो तिकडे मिशीतल्या मिशीत हसला असावा अशी दाट शंका मला आली..
तो असं काही विनाकारण हसला की त्याच्या डोक्यात काहीतरी घोळत असलं पाहिजे याची कुणकुण मला लागते...
मी काही मुद्दामून विचारलं नाही ..काही वेळानंतर तो मला सांगणारच होता..
"मन्या,आपण म्हणजे कुठल्यातरी मराठी निर्मात्याने ’पडघवली’ वर पिक्चर काढला तर काय मस्त होईल ना???"
’प्रिय’ला अशा मस्त मूडमध्ये बोलताना ऐकणं म्हणजे पर्वणी असते..नाहीतर...एरवी..
त्याला क्षणाचीही उसंत घेऊ न देता नानाविध विषयावर माझी बडबड अखंड चालू असते..(’प्रिय’शी बोलताना विषयाची वानवा मला कधीच भासत नाही)
नंतर केव्हातरी मला आठवतं की त्याच्याकडून काहीच उत्तर नाही..
पहिले पहिले हुंकार...’असं का?’.."बरं बरं"....हे तरी ऐकायला येत होतं पण आता ते ही नाही..
फ़ोन मध्येच कट झाला की काय आणि याला सगळं पुन्हा सांगायला लागणार की काय या भीतीने अंतर्यामी धास्तावून मी निर्वाणीचा हॅलो टाकते..
"हॅलो????’
"अगं बोल ना....मी ऐकतोय!"
हे असं..
असा माणूस आज स्वत:हून विषय काढून बोलतोय..हा मणिकांचन योग हातातून मी बरा जाऊ देईन!!
"हॅलो...मी काय बोलतोय???ऐकतेयेस ना???"
"हं....."(हे आपलं उगीच....मनात मात्र.."बोल की लवकर!")
पण माझ्या एकाक्षरी उत्तराची तमा आज ’प्रिय’ बाळगत नाही किंबहुना त्याच्याकडे त्याचे लक्षच नाहीए..काही मनाशी योजून ’प्रिय’ बोलायला लागला की काहीसं माझ्यासारखंच बोलतो...अव्याहत!
"मी म्हणतोय...’पडघवली’ची स्टारकास्ट काय असू शकेल जर पिक्चर काढला तर???"
असा ’क्रिएटिव्ह’ प्रश्न त्याच्याकडून बिलकूल अपेक्षित नाही..पण मी टोकत नाही..
"अंबू-वहिनी साठी कोणती actress सूट होईल??"
बास्स..त्यानंतर दुतर्फ़ी फ़ैरी झडत गेल्या..माझा कंटाळा कुठल्याकुठे गुडुप्प झाला...
काहीवेळा त्याला माझी निवड ’पुचाट’ वाटायची तर काही वेळा मला त्याची निवड ’बोराड’ वाटायची..एकदातर मी वैतागून म्हटलेसुद्धा,"राहू दे, मीच करते तो रोल"...
यावर रावणासारखं गडागडा हसून त्याने,"तोंड बघ....तुला शूर्पणखेचा रोल देईन फ़ार फ़ारतर.." असेही म्हटल्याचे स्मरते..पण मी ते सोयिस्कररित्या कानाआड केले..
अशारितीने बराच वेळ खल करून, सव्यापसव्य करून आमची ’स्टारकास्ट’ तयार झाली ती अशी होती..
चित्रपट:पडघवली
मूळ कथा:"पडघवली’-गो.नी.दांडेकर
प्रमुख भूमिका:
अंबू-मृणाल कुलकर्णी
विष्णू-अतुल कुलकर्णी
व्यंकू-उदय टिकेकर
आत्येसासूबाई-स्मिता तळवळकर
गणू-उमेश कामत
गुजाभावजी-?????
बनी-अमृता सुभाष
गेंगाण्या-राहुल सोलापूरकर
रंग्या किल्लेदार-अविनाश नारकर
शारदा-वर्षा उसगावकर
कुशात्या-भारती आचरेकर

अंबू-वहिनी हे ’पडघवली’ मधलं अत्यंत सोशिक, भल्या-बुरयाची चाड असणारं, सगळ्यांना आधार वाटावं असं पात्र आहे...
’मृणाल कुलकर्णी’शिवाय दुसरं कुठलंही नाव माझ्या डोळ्यासमोर नाही आलं..’प्रिय’ला ही ते पटलं...
’गणू-भावजी’ च्या कॅरॅक्टर साठी कुठला actor सूट होईल???या विषयाच्या निमित्ताने का होईना....आमचे बहुधा पहिल्यांदाच एकमत झाले असावे...’उमेश कामत’च्या नावावर आम्ही एकमताने शिक्कामोर्तब केले..
व्यंकूच्या भूमिकेसाठी उदय टिकेकर आणि अनंत जोग अशी दोन नावं समोर आली पण त्यातल्यात्यात उदय टिकेकर तरूण असल्यामुळे त्यांचा नंबर लागला..
रंग्या किल्लेदारच्या भुमिकेसाठी ’पैज लग्नाची’मधली भूमिका केलेला अविनाश नार्वेकरच आला...जितेंद्र जोशी पण फ़िट्ट बसला असता पण अविनाश नारकरचं नाव फ़ायनल झालं!
कुशात्या च्या भूमिकेसाठी मात्र आमचे दुमत झाले..माझे म्हणणे होते ’ज्योती सुभाष’ आणि ’प्रिय’चे म्हणणे ’भारती आचरेकर’...आणि त्याचे बरोबरही होते..’ज्योती सुभाष’ मायाळू आज्जी वाटतात...’पडघवली’ मधल्या कुशात्यासारख्या खमक्या वाटत नाहीत..पण दोघांचही एकमत या गोष्टीवर झालं की आज भक्ती बर्वे हयात असत्या तर कुशात्याच्या भूमिकेसाठी दुसरया कोणाचा विचार करावा लागलाच नसता....पण...
गुजाभावजी हे एकच पात्र असं उरलं की त्यासाठी काहीकेल्या कोणाचं नाव डोळ्यासमोर येईच ना...
’पडघवली’मधला गुजा म्हणजे कृतांतकाळ,शीघ्रकोपी,महाकाय शरीर असलेला पण लोण्याहून मृदू मन असलेला एक विक्षिप्त माणूस आहे...
आता एवढे सगळे ’गुण’ कुठल्या अभिनेत्यामध्ये असायला???
नाना पाटेकर विक्षिप्त आहे, मायाळू पण वाटेल एकवेळ....पण महाकाय शरीर तो कुठून आणि कसा आणणार???
सयाजी शिंदे आनि शरद पोंक्षे ही नावे पण डोक्यात आली पण ती आल्याआल्या विरूनही गेली....
अशारितीने..
अर्ध्या एक तासानंतर लख्ख फ़्रेश होऊन मी फ़ोन ठेवला...
’प्रिय’च्या उत्साहाची लागण मलाही झाली होती..
’प्रिय’ आणि मी तसे पाहिले तर अत्यंत विरुद्ध टोकांची माणसे आहोत..
’मराठी सिनेमा’ हा त्याच्या जिव्हाळयाचा विषय तर मी हॉलीवूडची चाहती..
मी गौरी देशपांडेंची चाहती तर तो अशा ’हेवी’ वाचनापासून दूर!!(त्याला बडबडगीतं आवडतात)..
मी म्हणजे कशी ..कोणाशी प्रथम बोलतानाही इतक्या मोकळ्याढाकळ्या अंदाजात आणि इतके सारे बोलणार की समोरचा बाचकून जावा आणि हा...
पहिल्यापहिल्यांदा तर याला तोंडातून शब्द काढण्याकरता कोणी टॅक्स आकारत असावं की काय???अशीच शंका मला आली होती..
याच्याशी बोलताना मी सर्व बाजूंनी उघडी पडत राहते आणि हा मात्र आपला कुठल्यातरी दिपस्तंभासारखा तटस्थ!!
’तू भडाभडा बोलून का टाकत नाहीस??"हा प्रश्न मला त्याला हज्जारदा विचारावसं वाटला...पण पुढच्या क्षणी आपलं ह्याचे उत्तर आपल्याला मिळणार नाही हे ही कळलं...स्मितहास्य करून (थोडक्यात मला वेडयात काढून) हा प्रश्न डावलला जाणार हे मला अनुभवाने कळून चुकलेय..

पण ’पडघवली’च विषय घेऊन का होईना उत्साहाने फ़सफ़सलेला ’प्रिय’ मला पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला...
’पडघवली’ पिक्चर बनेल न बनेल..स्टारकास्ट ही असेल न असेल...मला त्याच्याशी काय घेणं-देणं असावं..????
या विरळया अनुभवाबद्दल ’पडघवली’ची मी ऋणी राहीन...
पण शेवटी प्रश्न उरतोच...

गुजाभावजी कोण????

प्रेम..तुमचं माझ्यासारखं?? कभ्भी नहीं..

सकाळी कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा पकडली..
जनरली रिक्षा पकडताना मी मागचा डेक बोंबलत नाहीये ना??याची खात्री करूनच बसते..
कारण दिवसाची सुरुवात मला ’अनुनासिक’ आवाजातल्या गाण्यांनी किंवा ’काला कौवा’ सारख्या थिल्लर गाण्यांनी बिलकुल करायची नसते..
पण आज चॉईस नव्हता...उशीर झाला होता..
आणि माझ्या दुर्दैवाने कुठल्यातरी ऊरूसाला निघाल्यासारखे सगळे रिक्षात भरभरून जात होते..आणि माझ्यासमोर उभी राहायची ती रिक्षा कुठेतरी भलतीकडेच जाणारी असायची..
एखादी रिकामी सीट असलेली रिक्षा मी सोडून बाकी सगळ्यांच्या नशिबात का???असा वायफ़ळ विचार करत मी उभी होते..
तेवढ्यात एक रिकामी सीट असलेली रिक्षा माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि अहो आश्चर्यम!!! ती स्टेशनला जाणारीच निघाली..
रिक्षा चालू होऊन २ मिनीटे होतात न होतात रिक्षावाल्याने डेक लावला आणि कुठले गाणे लागले असेल????
जस्ट इमॅजिन..

चाहत नदिया
चाहत सागर
चाहत धरती
चाहत अंबर

चाहत राधा
चाहत गिरिधर...

मी बसल्याजागी भंजाळून गेले...
गीतकार काही ऐकायलाच तयार नाही???
महालक्ष्मी लॉटरीचा लॉट लागल्यागत गीतकाराने उपमा,उत्प्रेक्षांना हाताशी धरून अगदी हलकल्लोळ घातला होता..
म्हणजे चाहत धरती,अंबर वगैरे ठीक आहे पण
’चाहत गंगा,चाहत जमुना’????
काय संबंध???
कशाचा कशाला संबंध नव्हता खरंतर...
गीतकाराचा शब्दांशी नाही...शब्दांचा अर्थाशी नाही...ऐकणारयाचा गाण्याशी नाही...गाण्याचा श्रवणीयतेशी नाही..
शंकरपाळ्या पाडल्यासारख्या उपमा ’पाडल्या’ होत्या..
’चाहत’ शब्दाला किती स्वस्त करून टाकलं???
प्रेम खरंच शब्दात पकडता येते का????
’प्रेम’ या विषयात मी तज्ञ आहे अशातली बाब नाही पण..
माझ्यामते प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे समर्पणवृत्ती ही झाली मॉंटेसरी लेव्हल..
हे असल्याशिवाय ज्युनियर के.जी. त प्रवेश नाही....मॅट्रिक्युलेशनची स्वप्नेच सोडा..

प्रेम म्हणजे काल-अपरोक्ष दिवसागणिक नवा होत जाणारा संवाद..
कधीकधी एकमेकांबद्दल वाटणारा असह्य तिटकारा,ह्या तिटकारयातून एकमेकांबद्दलची द्विगुणित होणारी ओढ..
’अहं’ ला दिलेली मूठमाती, याउलट कधीकधी जाणवूही न देता जपला गेलेला अहंकार..
आपल्या उणीवांवर मात करून दुसरयाला सुखात ठेवायची केलेली धडपड..
आपल्याही नकळत मान्य करून टाकलेले दोष..
प्रत्येक अडचणीच्या वेळी आवर्जून घ्यावासा वाटलेला सल्ला, लपवून ठेवावीशी न वाटणारी गोष्ट..
गळ्याशी येणारे कढ आवरत कंठलेले संघर्षाचे क्षण..
’आपण हे एकदाचं संपवून का टाकत नाही???’या भोज्ज्याला शिवून आलेली दोघं..
निग्रहाने राखलेलं अंतर, संयम..
आणि कालांतराने..
एकमेकांच्या अपूर्णत्वातच पूर्णत्व असल्याचा होत असलेला साक्षात्कार...
ही हरेक गोष्ट येते..

ह्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख असलेलं एकतरी गाणं आहे का???
नसलंच तर कधी बनेल???
आकर्षक वेष्टनात बांधलेली वस्तू टिकाऊच असेल याबद्दल कोणी खात्री द्यावी???
मखमली, रंगबिरंगी शब्दांनी रंगवलेल्या या गाण्यांमधल्या प्रेमाचा रंग कधी उडेल याचीही guarantee कोणी द्यावी???

म्हणूनच..
जमेल तसे प्रेम करत राहावे...
जमेल तशी त्याची व्याप्ती शोधत राहावी..
तोपर्यंत ’चाहत ना होती..कुछ भी ना होता’ सारख्या पाटया टाकत राहाव्या..
’चाहत पुजा
चाहत दर्शन’
ऐकून हताश न होता ’असं का?...असेल बुवा’ करत हसून निभवावं...
आणि पाडगावकरांना edit करून म्हणावं..
प्रेम म्हणजे same का कधी असतं???
एकाचं दुसरयासारखं कधीच नसतं..
आमच्यासारखं तुमचं नसलं तरी...
आमच्यासाठी ते एकदम ’युनिक’ असतं..

डोरीस डे आणि..’के सेरा सेरा..’!!

आताशी डोरीस डे च्या ’के सेरा सेरा’ ने गारूड केलेय...
आल्फ़्रेड हिचकॉकच्या ’The Man Who Knew Too Much’ चित्रपटातलं डोरीसने गाऊन अजरामर केलेलं गाणं...जवळजवळ साठीच्या दशकातलं..

’के सेरा सेरा...
व्हॉट विल बी, विल बी...
द फ़्युचर इज नॉट अवर्स टू सी..
भविष्यात काय होणार आहे ह्याचा अंदाज लावणे तर आपल्या हाती नाही...
बघुयात..
जे होईल ते चांगल्याकरताच होईल’

’काय व्हायचे ते होऊ देत...जे होईल ते बघू...’ असे उदगार आपण शक्यतो सगळे प्रयत्न हरल्यावर पुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची कल्पना नसल्यावर काढतो... म्हणजेच निर्वाणीच्या किंवा आणीबाणीच्या वेळी..ह्यात कमालीची हतप्रभता जाणवत राहते..
’अरे छोड यार...जो भी होगा देखा जायेगा!!!" ही झाली बेदरकार वृत्ती...
’हा ’आज’ आपला..आजचा क्षण न क्षण जगून घ्या’ ही झाली कलंदर वृत्ती..
वरील तिन्ही परिस्थितींमध्ये ’अज्ञात असलेले भविष्य’ हा समान धागा आहे..पण ऐकताना हेच वेगळे वाटू शकते...प्रकट होण्याची किंवा react होण्याची पद्धत वेगवेगळा अर्थ दर्शवू शकते
पण ही पठ्ठी असं काही गाऊन गेलीये की ज्ञात-अज्ञात, दैवाचा फ़ेरा अशा जडबंबाळ शब्दांचा मारा न होता ऐकणारयापर्यन्त जे काही पोहोचवायचे आहे ते अचूक पोहोचते..
त्यात न त्रागा आहे, न हतबलता...

कडवट सूर तर मुळीच नाही...
अतिशय कणीदार आवाजात डोरीस गात राहते..

’के सेरा सेरा...
व्हॉट विल बी, विल बी...
भविष्यात काय होणार आहे ह्याचा अंदाज लावणे तर आपल्या हाती नाही...
बघुयात..
जे होईल ते चांगल्याकरताच होईल’

डोरीसच्या डोरीसच्या आवाजाची मोहिनी म्हणा किंवा लिव्हींगस्टन आणि इव्हान्स या जोडगोळीचं शब्दांवरचं अद्भुत सामर्थ्य असेल कदाचित....’के सेरा सेरा’ हे बेदरकार किंवा कलंदर न वाटता जे अज्ञात आहे...जे मानवी प्रयत्नांच्या पलीकडचं आहे...किंबहुना ज्यावर माणसाची मर्जी चालत नाही अशा दैवी शक्तीला केलेला कुर्निसात वाटतो...
जे विराट आहे, अजोड आहे त्यासमोर झुकायची नम्रता जाणवते...
त्या दैवी शक्तीचे निर्णय आपल्या भल्याकरताच आहेत..ते विनातक्रार मान्य करण्याची तयारी जाणवते...
त्यात ’आपण दैवाला मानत नाही’ अशी फ़ुशारकी नाही...आणि स्वसामर्थ्याविषयी फ़ुकाचा अहंकार तर मुळीच नाही..

’के सेरा सेरा’चं अनुकरण बॉलीवूडमध्येही झालं..
’के सेरा सेरा’ ही कॅचलाईन घेऊन ’पुकार’ मधलं ’के सरा सरा’ रचण्याचा मोह मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तरसारख्या दिग्गजांनाही आवरला नाही..
मला वाटते ’गदर’ मध्येही हेच गाणे अमिषाची आई(लिलेट दुबे) लहान अमिषाला ऐकवताना दाखवलेय..
भारत-पाकिस्तान फ़ाळणीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीमध्ये आई मुलीला ’के सेरा सेरा’ची दीक्षा देत असते...

आता जो मोह भल्या भल्यांना नाही आवरला तो मला कसा आवरेल बरं...??
’के सेरा सेरा’ चा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न मी करून पाहिला...
तितक्याच ताकदीने नाही मांडू शकले तरी काय झाले..त्यातला गर्भितार्थ पोहोचवता आला तरी भरून पावले..

जेव्हा होते मी लहानशी मुलगी..
मी विचारले माझ्या आईला..मी कशी होईन???
मी सुंदर असेन का अपरंपार श्रीमंत???
त्यावर आई बोलली..
’के सेरा सेरा..
जे व्हायचेय ते होईल..
भविष्य आपल्या दृष्टीपलीकडचे आहे बेटा..
के सेरा सेरा..
जे व्हायचेय ते होईल’

तरूणपणी मी प्रेमात पडले..
तेव्हा प्रियकराला येणारया आयुष्याबद्दल विचारले,
"दिवस जातील तशी होत राहील का पखरण इंद्रधनूची??"
त्यावर प्रियकर म्हणाला,
’के सेरा सेरा..
जे व्हायचेय ते होईल..
भविष्य आपल्या दृष्टीपलीकडचे आहे राणी..
के सेरा सेरा..
जे व्हायचेय ते होईल’

आता मला माझी मुलं आहेत..
ती ही मला ती कशी होणार हे विचारतात..
ती देखणी होतील की अपरंपार श्रीमंत???
मी त्यांना हळुवारपणे सांगते..
’के सेरा सेरा..
जे व्हायचेय ते होईल..
भविष्य आपल्या दृष्टीपलीकडचे आहे लाडक्यांनो..
के सेरा सेरा..
जे व्हायचेय ते होईल’
-डोरीस डे

’के सेरा सेरा’ ऐकण्याकरता या लिंकवर क्लिक करा...
http://www.youtube.com/watch?v=XjX7k2QoRX8

पुणे..पत्ररथ पक्षीण..आणि बदल!!

काल माझी पुणे वारी होती!!
पहाटेचे ४-३०...रस्त्यावर शुकशुकाट (obviously!!)...कानाला mp3 player ..आणि पहाटेच्या नीरव शांततेत माझ्या कानात झिरपत असलेले आशाचे ’ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे..’
क्या बात है!!!
माझा mp3 player पण बाप माणूस आहे..मला हवी तेव्हा हवी तीच गाणी लावतो..
मागे एकदा भर पावसात खंडाळ्याच्या घाटात त्याने माझे मन कसे काय माहीत??अचूक ओळखून सुखविंदर चे ’चल चल’ लावले होते..पावसाच्या ताडनाबरोबर अधिकाधिक गहिरे होत जाणारे गाणे..
आह..!!मी विषयाला सोडून भरकटले..as usual..
मुंबईत विरळा मिळणारी शांतता पीत एकटीच चालत मी बस पकडायला एस.टी डेपोत येऊन पोहोचले...आणि हरे राम...
काय स्वप्नवत वातावरण होते तिथे..!!!
अंधाराला छेदण्याचा निष्फ़ळ प्रयत्न करणारे ऍरॅगॉन लॅम्प्स,...डोळ्यावरची झोप आवरत मोठयामोठयाने जांभया देणारे कंडक्टर्स, ड्रायव्हर्स...एस.टी कॅंटीनमध्ये नुकताच लाथ घालून उठवलेला, दातही न घासता बटाट्याची साले काढायला बसलेला पोरगा..अपुरया झोपेचा राग काढण्यासाठी की काय कोण जाणे..एकमेकाशी तार स्वरात कचाकचा भांडत असलेले कंट्रोलर आणि ड्रायव्हर्स...
humph...किती डिप्रेसींग!!
या आळसटलेल्या आणि पारोश्या वातावरणाला स्पेशल इफ़ेक्ट देण्यासाठी वरच्या हॉस्टेल मधून तोंडात ब्रश आणि पेस्ट तोंडात घोळवत आलेली माणसे..
या वातावरणात स्काय ब्लू कलरचा लिनेनचा कुर्ता,नेव्ही ब्लू जीन्स,खांदयाला सुबक अशी शबनम आणि यार्डली रोझचा सभोवताली दरवळत असलेला गंध..अशा extra-fresh अवतारात मी तिथे अवतीर्ण झाल्यावर एकच धमाल उडाली..
"५-१७ च्या ट्रेन साठी बस कुठली आहे?"
माझा हा प्रश्न त्या गोंधळात ऐकूच गेला नाही..मग मात्र माझे अस्तित्व जाणवून सगळे एकदम चिडीचुप्प आणि स्तब्ध..
एक कंडक्टर मात्र अजून भांडणाच्या मूडमध्ये..
’ए गप्प की रे!! किती ठो ठो बोंबलतोस??? हा...बोला तुम्ही मॅडम..."
पुन्हा विचारणा..
मग माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी ४ मंडळी हिरीरीने सरसावतात..
"काही प्रॉब्लेम नाही.."
"४.५५ ची गाडी आहे..येईलच ५ मिनीट्स मध्ये"
"थांबा... हितंच लागेल"
मग अंमळ मोठयानेच चाललेल्या एस.टी परिवाहन मंडळ कसे वक्तशीर आहे..आताशी सर्व मंडळी प्रवासाकरता एस.टी चा वापरच कसा करतात..याबाबत चाललेली चर्चा ऐकू येत होत्या..
मी हसले..
काही वेळापूर्वी आळसतलेली मंडळी आता हुशारली होती..
बदल कोणाला नको असतो???
जर त्याच त्याच गोष्टी रोज रोज व्हायला लागल्या तर आपण त्याला ’रूटीन’ म्हणतो..
ही मंडळी तर कुठलाही बदल न होता हे रूटीन कंठत असतात..सकाळी ४.३० ला त्यांना असा कुठला बदल बघायला मिळणार???
सांगायची गोष्ट अशी की...मागच्या त्या भांडणांच्या आवाजात माझा आवाज मला अगदी मंजुळ वाटला..
मंजुळ म्हणजे कसा??
हा...
वसंतोत्सवात कर्ण आवाजाचा वेध घेत असताना जी पत्ररथ पक्षीण चिवचिवली होती ना...तिचा आवाज जसा इमॅजिन करू तसा..
पत्ररथ पक्षीण???आता मला वाहयात हसायला यायला लागते..
अरे...वेळ काय???मला सुचतेय काय???पत्ररथ पक्षीण म्हणे..
हा काल केलेल्या अभ्यासाचा परीणाम असावा बहुधा...
शंकाच नाही..आता मलाच बदल हवाय!!!
 
Designed by Lena