मुक्त जालों माझेपणें.

आपल्याशिवाय जराही न करमणारे लोक आपल्याशिवाय राहायला शिकलेत, तुम्ही नसलात तरी त्यांना चालण्यासारखं आहे, नव्हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचं हद्दपार करून टाकलेय ही जाणीव फ़ार त्रासदायक असते. आणि ती थोबाडीत मारल्यासारखी अचानक होते तेव्हा पायाखालची जमीन सरकते..

पायाखालची जमीन सरकते ते आपण त्यांच्याशिवाय कसे जगणार या चिंतेने नव्हे तर कोणाला आपली लागलेली सवय तुटू शकते या नव्यानेच झालेल्या साक्षात्काराने आणि त्यापाठोपाठच्या आत्मवंचनेने. आपण त्यांना आधीन करून घ्यायला कुठे कुठे कमी पडलो की आपल्यावर ही वेळ आली याचा मागोवा घेत, जर-तर च्या भेंडोळ्यात गुरफ़टून श्रांत-क्लांत होऊन जातो, विचार करकरून डोकं फ़ुटायची वेळ येते.

अशी वेळ अनेकांवर येते तशीच एकदा माझ्यावरही आली.

अशा वेळी माणसं साधारणपणे स्वत:ला कामात गळ्यापर्यंत बुडवून घेतात किंवा चित्त थारयावर येईपर्यंत स्वत:ला कडीकुलपात बंदीस्त करतात. कामात बुडवून घेतलं तर ’अहं’ ला लागलेली ठेच मध्येच नागासारखी फ़णा काढून उभी राहायची मग त्यानंतरचे तासनतात सूडाच्या अभिनव कल्पना, त्या माणसावर वाया गेलेला वेळ, रिसोर्सेस यांच्या निरर्थक आणि वेळकाढू आकडेवारयांमध्ये मी रममाण व्हायचे. काम राहिलं बाजूला.
मग मी माणसं नाकारली, जगाशी संपर्क तोडला, स्वत:ला बंदीस्त करून घेतलं. तर मला पश्चातापाचे उमाळेच्या उमाळे यायला लागले. आता जर त्या व्यक्तीबरोबर असतो तर कसं आणि तसं या दिवास्वप्नांमध्ये मी रमायला लागले. आणि झाल्या प्रकाराबद्दल स्वत:ला दोषी करार देऊन झुरत गेले.

मग झाले तेव्हढे बस म्हणुन मी निसर्गाला शरण जायचे ठरवले. एका ग्रुपने काही गडकिल्ले ओळीने करायची मोहीम आखली होती, त्यात नाव नोंदवलं आणि निघून आले.

आता मी कुठल्यातरी गडावर आहे.
झाल्या गोष्टींचा पुन्हापुन्हा आढावा घेऊन मन:स्थिती चिघळते हे माहीत असूनही आपण तेच करतो. मी पण तेच करते आहे. आतापर्य़ंतचा बराच वेळ रेट्रोस्पेक्शन मध्ये घालवलाय; इतका, की आताही मी कुठल्या गडावर आहे ह्याची मला जराही कल्पना नाही. आताही ग्रुपला मागे सोडून एकटीच तटावर आले आहे. खाली सह्याद्रीच्या कुठल्याही घाटमाथ्यावरून दिसतं तसंच दृश्य आहे.

मावळतीचा प्रकाश सर्वदूर पसरला होता. खाली गावात पेरणी चालू असावी बहुतेक, बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण अस्पष्ट ऐकायला येत होती. सह्याद्री पर्वताच्या वळ्याच वळ्या नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरल्या होत्या. दोन रांगांमधून एक नदी लाजत, मुरकत गेली होती. खालचं गाव हिरव्या-काळ्या रंगात रंगवलेल्या बुद्धीबळाच्या पटासारखं दिसत होतं. पिंजलेल्या कापसासारखे दिसणारे विरळ ढग माथ्याशी रेंगाळले होते.हे सारं पाहून डोक्यातली बजबज कमी झाल्यासारखी वाटली. मी आता दरीत पाय सोडून तटावर बसते.

सूर्य मावळतीला आलेला आहे. बाहेरून उन्हातून आल्यावर पायावर थंड पाणी घेतल्यावर कसं वाटेल तशी शांतता मनात आहे.

मी बटव्यातून बचकभर दाणे काढते. संध्याकाळची वेळ असूनही ते खायला गर्दी केलेल्या पक्ष्यांकडे बघत बसते. तेवढ्यात एखादा चिंट्या मॅगपाय रॉबिन हाताशी सलगी करून जातो. त्या धिटाईने मी अवाक तर होतेच पण त्याच्या लालूस स्पर्शाने रडू येईल का काय असं वाटायला लागतं. दरीतल्या झुडुपांमध्ये एकच कुरुंदाचं झाड दिमाखात उभं असतं, बाजूला काकडशिंगी आपली लालसर जवान पानं मिरवीत असते. मावळतीची किरणं या सर्वांवर अशा काही कोनात पडलेली असतात की ती सर्व एखाद्या वेगळ्याच मितीत उभी असल्यासारखी वाटायला लागतात. मी आपली नजरबंदी झाल्यासारखी त्यांच्याकडे पाहात असते. मग आऊट ऑफ़ ब्लू, मला प्रश्न पडतो, ही झाडं, हे पर्वत, इथला वारयाचा वावर हे माझ्यासारख्या किती मेस्ड अप आयुष्यांचे साक्षीदार असतील?

मग तो शहाण्या उपरतीचा क्षण येतो.

माझ्यासारखे बरेच जण अमूर्त स्वरूपात त्या तटावर रेंगाळताना दिसायला लागतात. पूर्वी विझलेले डोळे, गमावलेला विश्वास, जहरी कडवटपणाने काठोकाठ भरलेले, पण.. आता जे खंबीर असतील, ताठ कण्याने वावरत असतील, नव्या उमेदीने चालायला लागली असतील, विश्वास टाकत असतील, विश्वासाला पात्र ठरत असतील, जगाच्या पाठीवर कुठेतरी ते असतीलच.

आताच्या या अंत पाहणारया क्षणांचा शेवट होणार आहे, दु:खाचा निचरा होऊन जाणार आहे, मग आपण नवी सुरुवात करणार असतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं पण, तोपर्यंतचा तो ’काही वेळ’ कुठलंही दृश्य डॅमेज न होऊन देता, श्रद्धा, विश्वास यांची तोडफ़ोड न होऊ न देता डोकं ताळ्यावर ठेऊन निभावणं गरजेचं असतं. नंतर हे क्षण आठवताना डंख होणार नाही असं नाही पण ते बाजूला सारता येईल. त्यातली निरर्थकता लक्षात येईल. यालाच कदाचित प्रगल्भ होणं म्हणत असावेत किंवा शहाणा स्वीकार! सुटकेचा आणि उपरतीचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण त्याच्यासाठी आपण तयार राहीलं पाहीजे. So, Keep looking for it. तेव्हा नाही सावरलात तर कधीच नाही. मग त्याच खातेरयात इफ़्स ऍन्ड बट्स ची उजळणी करत भोवंडत रहायचं.

आपण एकटे असलो तर काय झालं? त्या एकटेपणातही एकटं म्हणुन आपल्याबरोबर अनेकजण असतात हे मला उमगलं आणि..

मी सुटले.

10 comments:

Sneha Kulkarni said...

:) shevatapekshahi asali anishchitata maarat jaate kanakanane! tu saavarlis he vachun bara vatala. Show goes on na?

Shraddha Bhowad said...

स्नेहा
Show goes on, you like it or not.
फ़क्त तो तोंड वाकडं करून पुढे न्यायचाय की पुन्हा एकदा उत्साहात टणाटण उडया मारत, तो चॉईस आपला.
अनिश्चिततेचं बोलशील तर सगळा झोल तिथेच. एखाद्याने एखाद्याला डीच केलंय हे निश्चित असतं. पण डीच झालेल्याने कितीकाळ त्या EX नात्याला लोंबकळत राहायचं हे त्या त्या माणसावर अवलंबून म्हणून अनिश्चित.
The Less You Linger the sooner you get out the blue.

Ketaki Abhyankar said...

काय झालंय काय तुला? तुझे नेहमीचे आर्टिकल्स किती उत्साहाने भरलेले आहेत.. असा उदास वाटणारा लेख तुझ्या ब्लॉग वर कसातरीच वाटतोय.
नेहमीप्रमाणे लिहिलंय छानच. त्यात वाद नाही. तीच ओघवाती भाषा. पण हा जरासा सेंटी वाटणारा लेख मनाला हात घालून गेला.

Shraddha Bhowad said...

@केतकी,
काही नाही खास.
अधून मधून मला असं फ़ेफ़रं येतंच असतं. रुचीपालटाकरता असं भयानक सेंटी होत राहीलं की माझी तब्येत चांगली राहते बहुतेक.
:))))))))
जोक्स अपार्ट,
लेख उदास आहे हे खरं आहे, सेंटी आहे हे त्याहून खरं आहे, पण इलाज नाही; आहे हे असंच आहे.

Prasad said...

Hii..Just came here accidently
You know, I just had same feelings
that you have written for some days..
Especially first paragraph..
The feeling of being ignored from somebody who meant a lot to you is very hard to digest..
Relationships are very dynamic..
but any way,when going gets tough, only tough gets going.. :)
Masta lihites
Keep it up!

Saru said...

पहिली पोस्ट वाचली मग एकापाठोपाठ वाचतच गेले. या पोस्टबद्दल म्हणेन डिट्टो, मलाही कधीतरी असंच वाटलं होतं. पोस्ट आवडली हे याहून वेगळ्या शब्दात कसं सांगू?

Shraddha Bhowad said...

@प्रसाद,
मी कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं.
"You will know how tough you are when being tough is the only choice you have got" अशा आशयाचं.
तर सांगायचा मुद्दा हा की असे प्रसंग आपल्याला कणखर बनवतात, काय धरावं-काय सोडावं-आपल्यावर त्याचे काच कितपत उमटू द्यावेत हे शिकवतात, थोडक्यात-’मुक्त’ करतात.
तू या situationशी रिलेट करू शकलास याचा आनंद मानावा की तुलाही त्या agony मधून जायला लागलंय याचं दु:ख मानावं हे कळत नाहीये..तरीपण-
थॅंक्स.

Shraddha Bhowad said...

@सरू,
Thanks a tonne.
वाचत रहा, आवडलं तर कळवत रहा.

Unknown said...

could not agree more!

Unknown said...
This comment has been removed by the author.
 
Designed by Lena