कैखुश्रु दुबाश मार्ग.

’इ.स.पूर्व ५३० मध्ये पर्शियाचा अखमनोशिय सम्राट कैखुश्रु याने हिंदुकुश पर्वत ओलांडून गांधार व कांबोज प्रदेशांतील लोकांकडून खंडणी वसूल केली होती.’

कामा हॉलचा पत्ता विचारत मी पहिल्यांदा त्या रस्त्यावरुन गेले तेव्हा त्याच्या ’कैखुश्रु दुबाश मार्ग, फ़ोर्ट, ४०० ००१’ मधल्या ’कैखुश्रु’ नावापाशी उचकी लागल्यासारखी अडकले होते. त्यावर सव्यापसव्य करून कैखुश्रु हे नक्की काय प्रकरण आहे?? याचा शोध घेण्यासाठी मी थेट पुराणैतिहासिक काळात डोकावून आले. त्यावरून कळलेली माहिती वरीलप्रमाणे.
आता ही कैखुश्रु दुबाश असामी कोण आहे? हे तर माहीत नाही, त्याचा शोधही मी घेतला नाही, पण या काहीशा विचित्र नावामुळे हा रस्ता कायम लक्षात राहिला.

’काळा घोडा’ भागातला हा रस्ता मी पाहिलेल्या अतिशय सुंदर रस्त्यांपैकी एक आहे.

रस्त्याच्या सुरुवातीला डाव्या बाजूला रिदम हा‌ऊसची देखणी इमारत, उजव्या बाजूला जहांगिर आर्ट गॅलरी, मॅक्स म्युलर भवन, नजर पोहोचेल तिथपर्यंत दोन्ही बाजूने रस्त्यावर कमान टाकणारी झाडं, देखणं ऍम्फी थेटर, समोर कलकत्ता एम्पोरियम, कॉपर चिमनी, बाजूला शायना एन. सीचं बुटीक, पुढे मोठ्ठं स्पा सेंटर, पुढे एक चिमुकलं चर्च, झाडांच्या गर्दीतून डोकावणारे कळस, चर्चमधून बाहेर पडणारी गोरी-देखणी माणसं, रस्त्याच्या शेवटाला लायन गेट, डाव्या बाजूने कामा हॉल तर उजव्या बाजूने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, त्यावरचा तो ग्रेट हॉर्नबिल, पुढे पोलिस मुख्यालय आणि गेट वे ऑफ़ इंडिया.

प्रचंड शांतता आणि बराचसा निर्मनुष्य भाग!

रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायम चिरनिद्रेत असल्यासारख्या वाटणारया आलिशान गाडया कायम उभ्या असतात. या रस्त्यावरून माणसं केवळ गाड्यांनीच फ़िरतात, त्यामुळे माणसांचे पाय या रस्त्याला क्वचितच लागतात.
कोणी फ़ेफ़रं ये‌ऊन टाच घासत मेला तरी कोणाला कळणार नाही इतकी सामसूम.
एखादं जहागिरदाराचं कार्ट हायबुझा दामटत जायचं किंवा एखाद्या उमरावाची पोरगी बेबी फ़ोर्ड शिकायला यायची तेव्हा धुरळा उडायचा, पाला-पाचोळा सैरावैरा धावायचा.. त्या रस्त्यावर हालचाल फ़क्त तेव्हढीच.
एव्ह्ढीही हालचाल झालेली त्या रस्त्याला बघवत नसावी, कारण असा धुरळा उडून गेल्यानंतर पाचच मिनीटांनी शंकर-काका हजर व्हायचा.
त्या रस्त्यावर माझ्याशी नातं आहे वाटणारया दोनच गोष्टी..
रस्ता कायम चकचकीत ठेवायचं असिधाराव्रत घेतलेला शंकर जांभरे आणि महापलिकेची ’इथे कचरा टाकू नये’ ची मराठी पाटी! बस्स!

या रस्त्यावर झाडांची एव्हढी गच्च दाटी आहे की सूर्याचे किरणही धडपडत खाली आलेसे वाटतात, आणि मग पानांच्या जाळ्यांमधून रस्त्यावर चमकदार मोझेकची नक्षी उठते.
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूप झाडं आहेत, सगळी ओळखीची.
पण हे ओळखीचे पिंपळ, गुलमोहर, फ़णस या रस्त्यावर मात्र माझं नाव आर्टोकार्पस हेटेरोफायलस किंवा डेलोनिक्स रेजिया किंवा फ़ायकस रेलिजि‌ओसा आहे पण ही दुष्ट कार्टी मला जाणूनबुजून पिंपळ/फ़णस म्हणतेय अशा आविर्भावात उभे.
आमच्या गावचा पिंपळ जरासा वारा सुटला तरी शीळ वाजवतो, पण हा पिंपळ...छे!
सगळी झाडं कायम राम..लक्ष्मण ...सीता खेळत असल्यासारखी स्तब्ध!
इकडे वारा वाजत नाही, तर पडतो. आजूबाजूला वादळ का चालेना तिथे, इथल्या झाडांची पानं मंद सळसळच करणार. तेव्हढीच आणि तितकीच.
या सळसळीच्या वरचं आणि खालचं ऑक्टेव्ह मी अपवाद म्हणून सुद्धा कधी ऐकलेलं नाही.
रिदम हा‌ऊसच्या दारातला सोनमोहोर मात्र फ़ार खट्याळ आहे. मी आले की माझ्या डोक्यावर भसाभसा फ़ुलं ओतायची आणि मी ती कामा हॉल ये‌ईपर्यंत डोक्यातून उपसत रहायची, जवळजवळ एक वर्ष हा उद्योग हो‌ऊन बसला होता. सदा गंभीर आजीच्या पुढ्यात अखंड नाचरी छोटी पोर किलबिलत असावी त्याप्रमाणे कायम स्थितप्रज्ञपणे आडव्या असणारया रस्त्याच्या सुरुवातीलाच हा सोनमोहोर चवरया ढाळत हसतमुख उभा आहे.

पण या रस्त्यावरची ही सामसूम रस्त्या’वरच्या’ गोंगाटाने व्यवस्थित भरुन निघते. बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जवळ असल्याने पक्ष्यांना ’अप-डा‌ऊन’ करायला सोप्पं जात असावं बहुतेक, कारण बरेच देखणे आणि दुर्मिळ पक्षी या झाडांवर ’Rental’ने राहतायेत. कुठे पोपटांमध्ये जोड्यांसाठी भांडाभांड चालू आहे, कुठे फ़ांद्यांची बेचकी घरट्यांसाठी कोणी वापरायची यावर मारामारी सुरु आहे, या सगळ्या गोंगाटाच्या वर गळा काढून दयाळ गाणं गातोय, टुणटुण उड्या मारत साळुंक्यांचा ’अलीगडी लप्पीयो’चा डाव रंगात आलाय, कुठे ढेरपोट्या चिमण्या पिंपळावर उच्छाद घालतायेत, या गदारोळात आपण काहून मागे राह्यचे म्हणून कावळे कोकलत असतात, असंख्य बारीक मुरकुटे हवेत उडत असतात...हीsss धमाल चालू असते.
ती देखणी पाखरं या धुश्मचक्रीत आपली पिसं गाळायची. ती गोळा करायचा नाद लागला होता मला त्या काळात.

हा रस्ता मला कायम फ़ोटोसाठी सज्ज वाटतो. फ़ूटपाथवर झोपलेला भिकारी नाही, फ़ेरीवाले नाहीत, शेंबूड ओढत येणारी पोरं नाहीत..सगळं परफ़ेक्ट!!
पण या परफ़ेक्टपणापायी हा रस्ता कमालीचा एककल्ली वाटतो.
दादरचा गोखले रोड, बोरीवलीचा एस.व्ही.रोड, पुण्याचा लक्ष्मी रोड कसे आजूबाजूला पोरं, सुना, नातवंडं-पतवंडांच्या गराडयात बसलेल्या गरत्या बा‌ईसारखे वाटतात..हा रस्ता अतिश्रीमंत घटस्फ़ोटीत बा‌ईसारखा वाटतो.

अजूनही मला ऍम्फी थेटरच्या पायरयांवर बसून काढलेले तास आठवतात. मनाने मी केव्हाच समोरच्या ’कॉपर चिमनी’त जा‌ऊन पोहोचलेले असायचे. तिथला मंद प्रकाश, वेटर्सची आदबशीर लगबग, चमचा-पेल्यांचा नाजूक किणकिणाट मला बाहेर बसूनही ऐकायला यायचा. पारश्यांच्या त्या पोर्सेलीनसारखी कांती असणारया मुली, त्यांचे हात तोंडावर घे‌ऊन किणकिण हसणे, तृप्ती ओसंडून चालल्यासारखी त्यांची सुस्त, जडावलेली चाल बघून मी किती जंगली आहे ह्याची जाणीव दर दिवशी नव्याने व्हायची. एकदा बाजूला येऊन बसलेल्या हिप्पीने ’लायटर’ची विचारणा केल्यावर त्याला ’नाही’ म्हणताना भयंकर ओशाळल्यासारखे झाले होते मला. त्या आठवणीने अजूनही तोंड कडू होतं.
याच पायरयांवर ’फ़िल्दी रिच’ व्हायचं ठरवलं होतं मी. ’कॉपर चिमनी’त जेवायला कचकावून पैसे मोजायला लागतात असा माझा त्यावेळचा समज.
समोरच्या खांबाची सावली पायात घुटमळायला लागली की मी निघायचे.
कामा हॉलला मी दररोज ६-३० पर्यंत पोहोचायचे. त्याचवेळेस लायन गेटला विरुद्ध दिशेने नेव्ही ऑफ़िसर्सची बस यायची. त्यातल्या एकाशी तर हसून मान डोलवेपर्यंत ओळख झाली होती. कुणास ठा‌ऊक मैत्रीही झाली असती पण..
माझा क्लास अर्ध्यावरच सुटला आणि ही ओळखही तेवढ्यावरच थांबली.
त्या रस्त्यावर निदान माझ्याबाबतीत तरी सगळ्या गोष्टी अशाच अर्धवट हजामत केल्यासारख्या झाल्या. याच काळात गाणी अर्धवट ऐकून सोडून द्यायची घाणेरडी सवय मला लागली होती. माझं दीर्घकाळ टिकून राहिलेलं (एकमेव) एकतर्फ़ी प्रेम-प्रकरण पण ऍम्फी थेटरच्या पायरयांवरच संपलं.

आज या गोष्टींना तब्बल आठ वर्षं उलटून गेलीत पण अजूनही ’कैखुश्रु दुबाश मार्ग’ म्हट्ला की मला पिसं गोळा करायला इकडेतिकडे धावणारी, पायरयांवर खुरमांडी घालून दात-ओठ खात mp3ची बटनं खटॅक-खटॅक दाबत बसलेली ८ वर्षांपूर्वीची मीच आठवते.. त्यावेळच्या इच्छांना आज संदर्भ उरलेला नाही, मला त्या आज मिडीयॉकर वाटतात, तपशीलही फ़ार धूसर झालेत. तेव्हाचा भाबडेपणाही नाही राहिलेला आता. पण मनाच्या सांदीकपारीत कुठेतरी या रस्त्याची आठवण तग धरून आहे. नाहीतर ८ वर्षांपूर्वी माझ्यासाठी पीलक पक्ष्याने गाळलेलं रेशमी पीस मी आताही डायरीत् खूण म्हणून जपून का ठेवलं असतं?

6 comments:

sudeepmirza said...

uh!
u make me nostalgic...
i had spent hours wandering around that road...

Meghana Bhuskute said...

अधाश्यासारखं वाचलं, मग निवांत चघळत वाचलं. शेवटी न राहवून परत वाचलं. तरी आवडलंच.
वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्या कडा धुसर होत होत एकमेकांत मिसळत गेल्यात, असा काहीतरी फील येतो आहे, तुझ्या या लिहिण्याच्या स्टाईलमुळे.
मस्तच.

Shraddha Bhowad said...

@ Sudeep,
You did now?
I had serious doubts if anyone has ever 'heard' of this road. And here you are. I am so glad.

@मेघना,
या कानापासून त्या कानापर्यंत मोठ्ठं स्माईल. तुझी कमेंट वाचल्यावरची माझी पहिली प्रतिक्रिया.

Hemant said...

सुन्दर खुपच मस्त लिहिलय

Saru said...

तुझी पोस्ट वाचून मी तिथे खास जाऊन आले. पोस्ट वाचल्यावर जसा डोळ्यासमोर उभा राहिला तसाच आहे रस्ता. ग्रेट आहेस बाई.

Shraddha Bhowad said...

@हेमंत
:))
धन्यवाद

@सरू
??(आ वासायचा प्रयत्न करत असलेला स्मायली)
रस्ता बिस्ता बघायला गेली होतीस- तूच ग्रेट आहेस. तुझी ही कमेंट वाचून मी सामंतांच्या ’ऑक्टोबर एन्ड’मधलं ’फ़्रेंच रोल्स’ खरंच तिथे आहे का? हे पाहायला पुस्तक वाचायच्या दुसरयाच दिवशी जाऊन बघून आले होते आणि त्यावेळी कसलं ग्रेट वाटलं होतं - त्याची आठवण झाली.

 
Designed by Lena