कालिब

आपण एखादं चित्र कसं बघतो?
कोणी चित्रं कशी बघावीत?
मी चित्र कशी बघते?
चित्र बघताना आपण वाचताना करतो तशी चित्राच्या डाव्या कोपरयाकडून सुरुवात करते. मग चित्राच्या फ़्रेमवरुन माझी नजर मजेत फ़िरुन येते. चित्राचा आकार मनात भरला की पुन्हा डावा कोपरा पकडते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते. मग त्यातल्या रेषा, कोन, भौमितिक आकार..
एव्हढं झालं की त्या दृश्य चित्राचा आणि माझा संबंध संपतो आणि सुरु होतो माझा आणि माझ्या डोक्यात उमटलेल्या चित्राचा संवाद.
मग नंतर चित्रकार काय सांगू पाहतोय? काय लपवतोय? त्याला जे सांगायचेय तेच मला कळलंय का? जर असं नसेल तर त्याला काय सांगायचं असेल बरं? इत्यादी प्रश्नांचा काथ्याकूट.
पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय होईल?
चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करुन कॉन्सेंट्रीक सर्कल्स मध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरुन खाली चित्र बघत येंण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर?
दुसरया पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल?
छे!
दुसरया पद्धतीने मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं तेव्हढं चित्र कळेल?
न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करुन ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एव्हढंच.
मग अनेक पद्धतींनी चित्र पाहिल्यावरही डोक्यात उमटणारं चित्र एकच असेल तर मी तीच पद्धत का वापरते?
सवयीचा भाग- कदाचित?
किंवा सेफ़ प्ले.
तसंच लिखाणाचं पण असतं..नाही?
तुम्ही विषय घेऊन हेतुपुरस्पर लिहा किंवा मनात येईल ते काडीचाही विधिनिषेध न बाळगता धडाधड लिहीत सुटा-तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचायचं तसंच पोहोचता.
मग विषयाचे बंधन तरी कशाला बाळगा?
म्हणून कालिब.

जसं हरिदास म्हणतो,"वैचारीक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही. आपण तोच तोच विचार केला तर तेच तेच करत राहू"
पचायला कठीण फ़ंडा आहे पण मला हरिदास आवडत असल्याने त्याच फ़ंडे प्लंजर मारुन का होईना मी गळ्याखाली उतरवण्याचा प्रयत्न करते.
च्यायला.
मला आवडणारया सर्व पात्रांची नावं चार अक्षरी का असावीत?
हरिदास
विश्वनाथ
भगीरथ
सॉलोमन
सॅटियागो
जगदीश
तीर्थकर
अकिलीज
.
.
.
नाही.
पण असंच काही नाही.
मला तीन अक्षरी नावं असलेली पात्रंही आवडतात.
दयाल
अर्णव
विशाल
रायन
दिमित्री
ऍलन
माधव
.
.
.
आता हे अति होतंय!
मला आवडणारया काही पात्रांची नावं दोन अक्षरी सुद्धा आहेत.
विसू
बापू
गणू
हॅरी
रॉन
डॉबी
पण यातल्या विसू, बापू, गणू चं नाव गणपती, विश्वेश अशी तीन-चार अक्षरीसुद्धा असू शकतील.
आवरा आता!

मी गेली चार वर्ष डायरी लिहीतेय (रोजनिशी नाही!). म्हणजे लक्षात ठेवावं असं काही घडलं, कशाच्यातरी अनुषंगाने काही्तरी ग्रेट वाचण्यात आलं तर ते तारीखवार टिपून ठेवते.
मागच्या आठवड्यात गम्मत म्हणून त्या चाळत होते.
कधीतरी कुठंतरी वाचण्यात आलं असेल की ’सॅम्युअल पेपिस’ सांकेतिक लिपीत डायरी लिहायचा.
झाsssलं.
मी उत्साहात तीन-चार पानं अगम्य लिपीत लिहून काढलेली दिसतायेत. पण त्या कोडची की कुठे लिहून ठेवलिये हे आता आठवत नाहीये. उत्साहात ती पण सांकेतिक ठिकाणी लिहून ठेवलेली नसली म्हणजे मिळवलं.
असंच मजेत वाचताना मी एका नोंदीपाशी थबकले.

२०-०१-२००६


"प्रत्येक नात्याचा अर्थ लावू पाहू नये. जग फ़क्त शरीरसंबंधांनी, चालीरितींनी जोडलेली नाती जाणतं. जसं आई, वडील, पती. पण काही नाती केवळ जाणिवांची असतात, मनांची असतात. अशा नात्यांना जगाने नाव दिलेलं नाही. ती केवळ मनानेच ओळखायची. असूनही नसणारी , नसूनही असणारी! या नात्याचे कितीही पापुद्रे काढून गाभ्यापर्यंत जाऊ पाहिलं तरी तो गाभा तुला गवसणार नाही. कळतंय का तुला? कदाचित सूर्याला पाहून फ़ुलणारया सूर्यफ़ुलालाच तो अर्थ कळेल. जे केवळ फ़ुलणं जाणतं आणि फ़ुलणं जपतं"

Gosh!
हे वाक्य ’लिहून’ काढण्याइतपत मी भाबडी होते? त्यावेळी असं कुठलं पापुद्रे काढावंसं वाटणारं नातं ON होतं?
ओह येस्स!
आपल्या प्रोफ़ेसरच्या प्रेमात पडायचा गाढवपणा बरयाच कॉलेजकन्यका करतात.
मी ही केला होता.
हे पापुद्रे, सूर्यफ़ुलं त्यातूनच आलीयेत.
पण मग माझ्या लक्षात येतं की ही आठवण, याच्याशी निगडीत प्रसंग आपल्या आठवणींमध्ये अजूनही तपशिलवार जिवंत आहेत. गोठवलेले आहेत. कदाचित मरेपर्यंत माझी सोबत करणार आहेत.
मग डायरीतल्या त्या पानाची आवश्यकता संपते.
टर्र र्र र्र..
ते पान टरकाऊन मी त्याचं रॉकेट करते. बसल्या जागेवरून बाहेर भिरकावते.
भेंssडी..समोरच्या गुलमोहराच्या बेचक्यात जाऊन अडकलं.
त्या ’अडकेश’ ला पाहून ’माझ्या डायरीचं भूत’ असं पोस्टचं फ़ंडू टायटल डोक्यात येतं आणि मी वेळ न दवडता ते लिहून काढते.
डायरीतल्या अशा बरयाच पानांची गरज आता मला नाही भासणार.

अ श क्य पा ऊ स..
आणि एव्हढा बदाबद कोसळूनही आकाश अजून पोटात पाऊस वाढवतंच आहे.
बेचक्यात अडकलेल्या त्या पानाचा पार लगदा होऊन गेलाय.
गेल्या महिन्यात आमच्या सोसायटीच्या हरामखोरांनी कापून काढलेल्या सुरुच्या झाडाची दुखरी, बोडकी खोडं ओळीने उभी आहेत. त्यातल्या सर्वात जवळच्या बुडख्यातला चकचकीत लालसर रंग अजून नाही गेलेला. म्हणजे अजून तग धरून आहे बेटं.
येतील.
यांनाही धुमारे येतील.

आषाढालाss पाणकळाss
सृष्टी लाssवssण्याssचा मळा
दु:ख भिर्कावूssन शब्द
येती माssहेरपणाला


शब्दांना सासुरवास?? I know what you mean.
मला हल्ली या गाण्याने पिसं लागलीयेत.
ळाss वर तब्येतीत ढुम्म करुन सम दिली तर एकमेकांच्या मानेत मान खुपसून बसलेल्या कबुतरांचं जोडपं फ़डफ़डफ़डफ़ड करत निघून गेलं.
रूटीनच्या बाहेर काढून कोणाला काही करायला लावलं की दिन अच्छा जाता हय म्हणे!
आता जाईल.

हल्ली मला वारंवार एकच स्वप्न पडतं.
मी एका लांबलचक बोगद्यातून चाललिये.रादर तरंगतेय. अर्ध्यात आल्यानंतर बोगदा दोन्ही बाजूंनी बंद होतो. आणि कोणीतरी घुसळून काढल्यासारखा अंधार खदखदायला लागतो. आणि जेलीसारखा थबथबत माझ्या अंगावर पडून मला वाळवीसारखा खाऊन टाकतो..
मी रोज खच्चून बोंबलत जागी होते.
सॅमी जेन्कीन्स सारखी माझीही त्या त्याच अनुभवाला तीच तीच रिऍक्शन का असते?
अनुभव (मग तो स्वप्नात का असेना!) जुना झाल्यावर रिऍक्शनची तीव्रता पण कमी कमी होत जाणे अपेक्षित आहे...तरी?
मला वाटतं, माझ्या स्वप्नात मला डिमेंशिया झालेला असावा.

कधीकधी मला खूप थ्रिलिंग गोष्टी कराव्याशा वाटतात.
म्हणजे फ़ेक नावाने एक फ़ेक ब्लॉग काढावा. त्यावर लोकांना उचकवणारं काय काय लिहावं. अनॉनिमस कमेंट्स ऑन ठेवून पब्लिकला मला शिव्या घालायला प्रवृत्त करावं. मग मी उलटून त्यांना दुप्पट शिव्या घालाव्यात. मग त्या तुंबळ युद्धाच्या कहाण्या सगळीकडे पसरून ब्लॉग-हिट्स वाढाव्यात वगैरे वगैरे.
पण मी तसं करत नाही.
मला ते झेपणारच नाही.
एकतर मी अजिबात खोटं बोलत नाही.
म्हणजे खोटं बोलावं की बोलू नये असा चॉईस असतो असं नाही पण मी बाय चॉईस सुद्धा खरंच बोलते.
पाहायला तर बनवाबनवी करणारे मॅनिप्युलेशनचे बाप पाहिलेले आहेत. पण त्यांची भंबेरी, कोलांट्याउडया पाहून आपण हरिश्चंद्राची कितवीतरी अवलाद आहोत याचं बरंच वाटतं.
असो.

एका देवळाच्या बाहेर लिहीलेलं असतं,
"आपण देवावर विश्वास का ठेवला पाहिजे?"
"कारण जगात असेही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं गूगल देऊ शकत नाही"
हा हा हा!
माझी एक मैत्रीण अशीच गूगलभक्त आहे.
"I broke up. How to get back to him."
किंवा
"What men like"
किंवा
"I fought with my parents. What to do to patch up with them without saying 'I am sorry!?"
तिला अशा प्रकारची सर्चेस मारताना मी या या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
तर..
तिला तिच्या कितव्यातरी ब्रेक-अप नंतर आत्महत्या करायची होती आणि पहिल्यांदाच गूगलने तिला निराश केलं होतं कारण तिला धडाक्याने ’स्टाईल’मध्ये मरायचं होतं.
मला आपलं ’रेखाने शिळा उपमा खाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता’. एव्हढंच काय ते या विषयातलं ’स्टायलिश’ ठाऊक.
सर्वसाधारण असे बरेच पर्याय मी सुचवले. उदा. सायनाईड, पंख्याला लटकणे वगैरे. पण तिला आत्महत्या करताना वेदना झालेल्या नको होत्या.
चेहरा विदृप झालेला नको होता.
इत्या्दी बरेच ऍस्टेरीक मार्क्स तिच्या ’आत्महत्या’ या विषयावर होते. थोडक्यात तिला फ़ाईव्ह स्टार आत्महत्या हवी होती.
ऑबव्हियसली तिने आत्महत्या केली नाही. खरं म्हणजे तिला करता आली नाही.
कारण स्वच्छ होतं- तिला जगायचं होतं.
किंवा तिला तिच्याभोवती असलेल्या इतर प्रेमांची जाणीव झाली.
खरंच.
आयुष्यभर कोणाचं ना कोणाचंतरी प्रेम आपल्यासभोवती असतं. पण आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, जे नाही त्याच्या शोधात दूर-दूरवर जातो.
नचिकेत नाही का? समीरचं, आप्तांचं भोवती उबदार शालीसारखं लपेटलेलं प्रेम सोडून मृत्यूला शोधत त्या विहीरी्त जातो?
जायते यस्मात च, लीयते यस्मिन इति जल:
ज्यातून जन्म घेतो आणि ज्यात लय पावतो ते पंचमहाभूत म्हणजे पाणी..
आपण एखादी गोष्ट नाकारतो.
ती नाकारण्याचा निर्णय घेणं खूप सोप्पं.
पण तो अंमलात आणण्यासाठी लागणारी आयुष्याची उलथापालथ करण्यासाठीची श्रद्धा, विश्वास आपल्याकडे आहे का? याचाही विचार झाला पाहिजे.
माझ्याकडे आहे??
तर हो!
आहे!

कधीकधी आपण एखादी कविता वाचतो त्यातल्या एक-दोन ओळी खूपच आवडून जातात.
गुलजार, गालिब हे तर irresistible!
मग त्या ओळींचा उल्लेख कुठल्यातरी पोस्टमध्ये कधीतरी करायचाच असं आपण ठरवतो.
पण नुसतंच - "मला हे आवडलं-देत आहे" असं लिहीलं तर लै बोराड वाटतं. त्याला साजेशी सिच्युएशन असेल तर त्या ओळींना वेगळाच रंग चढतो.
नसेलच सिच्युएशन तर आपण कधीकधी ती ’बनवतो’. आणि नाहीच बनवता आली तर वैतागून स्वस्थ बसतो.
दिवसांमागून दिवस जातात.
आपली चिडचिड चिडचिड होत राहते.
माझीही नाही आता अशीच चिडचिड होतेय?
मला एलियट्ची ही कविता कधीची ब्लॉगवर लिहायचिये पण बोंबलायला सिच्युएशनच नाही.

"आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना
मागचा रस्ता लाटांनी रुंदावलेला बघताना
तुम्ही म्हणणार नाही की हा
टाकला मागे मी माझा भूतकाळ
आणि हा मी सामोरा भविष्याला"

अरे! पण सिच्युएशन नसल्याचं भांडवल करून मी सिच्युएशन निर्माण केलीच की नाही?
वा!

मी संध्याकाळची फ़िरायला जाते तेव्हा दोन मध्यमवयीन माणसं पिंपळाच्या पारावर बसून बुद्धीबळ खेळत असतात.
ती लोकं एकाच प्रकारच्या चाली खेळतात, त्यांचा खेळही नेहमी एकाच प्रकारे संपतो. ’स्टेल-मेट’ने.
त्यांच्या लक्षात येतं का नाही? हे तर मला माहीत नाही.
नसावं बहुतेक!
पण उत्साहाने प्यादी मांडून तोच तोच खेळ खेळण्यातल्या त्यांच्या उत्साहाची लागण मलाही होते आणि मी ही ताटकळत चांगले तीन चार गेम्स त्यांच्या तोंडाकडे टकमक बघत उभी असते.
आपलं काय वेगळं असतं नाहीतरी?
काल केलं तेच आज.
आज केलं तेच उद्या.
त्यांनी केलं म्हणून मी.
मी केलं म्हणून तू.
सवयीने आपणही चाकोरीतच फ़िरतोय ना?
असं फ़िरत राहायचं आणि पोकळी वगैरे जाणवलीच कधी तर त्यात कविता, ब्लॉग, सिगरेट्स, गझल कोंबून बसवायची.
फ़ाजलींनी कसलं ग्रेट लिहून ठेवलंय याबाबतीत.

"रात के बाद नये दिन की सहेर आयेगी
दिन नहीं बदलेंगे, तारीख बदल जायेगी"

------

अगदीच ब्रशने मन मानेल तसे फ़टकारे मारलेल्या चित्रासारखं झालंय का लिखाण?
बट माईंड यू, त्यालाही ’ऍबस्ट्रॅक्ट’ म्हणतात.
खालून, वरुन, उलट, सुलट
कसंही पहा.
आहे तसंच दिसणार!

आणि
येस्स्स!
कालिब म्हणजे ’काहीही’ लिहून घूयात.
हे वाचून ’काहीही बरं का!’ असं वाटलं तर हेतु सफ़ल!

25 comments:

BinaryBandya™ said...

कालिब ...
मस्त लिहलय ...
सुंदर रस्त्यावर एक अप्रतिम राईड घेऊन आल्यासारखे वाटले ...

Ketaki Abhyankar said...

श्रद्धा, खूप छान लिहिलंय. abstract लिहिणंच कितीतरी अवघड वाटतं बरेचदा. नेहमीच सरळ साधे सरधोपट लिहिण्यात काय मजा नाय. मस्त जमलंय हे कालिब. :)

स्पेशली
"ळा ssss वर तब्येतीत ......फडफडफडफड करत निघून गेलं" हे वाक्य तर अप्रतिम.

Anonymous said...

कालिब..एकदम जबरा....
नुसता वाचत गेलो...तुमच्या कल्पनाप्रवाहात वाहावत गेलो..खरच जे काहीही लिहल आहे ते एकदम भन्नाट ....

Smit Gade said...

Atayant Manmurad zalay

sanket said...

एकदम भन्नाट कालिब आहे.. काहीही लिहतांना बरेच काही लिहून गेलात!!

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

e solid ga..maja ali !

Saru said...

इतकं मनासून लिहीलं आहेस की त्याला विशेषणं द्यायला नको वाटतंय.
खरंच जियो!

Shraddha Bhowad said...

@बी.बी
पोस्ट वाचून तुझ्यासारख्या भटक्याला रस्त्यावर राईड घेऊन आल्यासारखं वाटणं म्हणजे admirationची हद्द आहे ह्याची मला कल्पना आहे. थॅन्क्स!
@केतकी
हा हा हा!
तू अगदी कल्पना वगैरे करुन बघितलं असशील म्हणून ते वाक्य आवडलं असेल तुला.

Shraddha Bhowad said...

@ दवबिंदू,स्मित,
धन्यवाद!
@संकेत,
हेतु साध्य!
@अनुश्री,
’पोस्ट वाचताना मजा आली’ ही कमेंट येणं खूप मोठ्ठं सुख आहे.
Thanks!
@सरू,
:)))

Yogesh said...

कालिब...रच्याक पोस्ट झाली आहे....प्रचंड आवडली.

Suhas Diwakar Zele said...

वाह कालिब वाह...मस्त लिहलय..
आज हा ब्लॉग देवेन (दवबिंदूमूळे) सापडला, वाचून काढतो बाकी पोस्ट :)

Anonymous said...

श्रद्धा मस्त पोस्ट... नेहेमीच्या तूझ्या स्टाईलची.... शब्दांचे खेळ अप्रतिम!! खिळवणारे....

कालिब सहीच झालयं....

Shraddha Bhowad said...

@मनमौजी,
रच्याक??? एकदम फ़ंडू शब्द.
@सुहास,
Thanks आणि देवेनला पण!
@सहजच
धन्यवाद!

Sandeep said...

tooooooo gooood.
I have read Kaalib so many times till this moment that I don't think you actually wrote 'kaahihi'.
Seriously!

Jaswandi said...

अगं बाई, किती भारी!! २-३दा वगैरे वाचलीये आणि अजुन परत वाचणारे मी ही पोस्ट.. आवडल्ये जाम मला!

Shraddha Bhowad said...

@सॅडी
तुला ते कळलं, माझा पोस्टमागचा हेतू साध्य!

@जास्वंदी,
मला खात्री होती की तू कधी ही पोस्ट वाचलीस तर तुला मनापासून आवडेल.मस्करी नाही.
तुझी ती ’प्रेमकथा’ पोस्ट का डिस्कार्ड केलीस न कळे.

Meghana Bhuskute said...

मस्तय! थोर एट्सेट्रा नाही, पण मस्तय. फ्रेश वाटलं एकदम. :)

Shraddha Bhowad said...

मेघना,
उभं आयुष्य घालवावं तेव्हा कुठे बरं लिहीलं जातं.’थोर एट्सेस्ट्रा तर बहोत दूर की बात हैl
आणि स्वत:बद्दल तशा काही भ्रामक कल्पनाही नाहीयेत.
मनापासून लिहीत जावं.बहुतेक वेळा होतंच चांगलं, नाही झालंच तर अनुभव होतोच अक्कलखाती जमा.
लिहीताना मला मस्त वाटलं, तुला वाचताना तसंच वाटलं हेच खूप आहे.

Dk said...

’काहीही’ ह्या सदरात मोडणारे हे नक्कीच नव्हे! भारीच आहे. घाईत चाळलंय आता परत वाचेन म्हणतो निवांत :)

Dk said...

mail id detes ka jara?

भानस said...

कालिब झिंदाबाद! तू लिहीत गेलीस... मी शब्दप्रवाहात डुंबत गेले. जियो!

Unique Poet ! said...

बाssप लिहीलंय .......
मीमराठी वरून उडत इथे आलो..........
झोप उडाली.................
जबरा ब्लॉग (खरं तर... लेखिका) सापडल्याचा आनंद मानू , की..
आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचाय .. याची खूणगाठ मनाशी नव्याने बांधू ....
काहीही असो आम्ही खूश आहोत.......................
सदिच्छा ! :)

लोभ असावा
समीर पु.नाईक

Kiran said...

'Ashadhala Pankala' he kuthal gan ahe? details deshil ka? ya char olich far avdlyat mala.

Shraddha Bhowad said...

’मुक्ता’ पिक्चर आठवतोय का तुला? जब्बार पटेलांचा? त्यात आहे.
आपल्या ना.धों. महानोरांनी लिहीलंय.

BsHrI said...

apratim aahe kaalib........

 
Designed by Lena