न न..?

दुनिया अणूच्या एका सर्व बाजूंनी बंद असलेल्या, ज्यावर "लीव्ह होप बीहाईंद, ऑल हू एण्टर हीयर" लिहीलंय अशा फ़ाईलकडे बोट दाखवून म्हणते," मी बघू का?"
अणू चटकन ’हो’ म्हणत नाही. थोड्या वेळाने म्हणतो,"मनाची तयारी असेल तर बघ."
"म्हणजे काय? कसली तयारी?"
"आपल्यासारख्यांच्या आयुष्यात कधी न येणारया आणि आलीच तर ज्यांच्याकडे आपण डोळेझाक करायला शिकलोय त्या माणसांची चित्रं आहेत ती. तुरुंगातली माणसं, फ़ुटपाथवरचे भिकारी, अपंग, कुणाला नको असलेली म्हातारीकोतारी अशांची चित्रं आहेत ती"
दुनिया सुस्कारा सोडून म्हणते, "अणू, मी अनेक वेळा डोळे मिटून घेतले आहेत हे खरंय; पण जगात ते नाहीतच, अशी स्वत:ची समजूत घालण्याइतकी मी मूर्खपण नाही, आणि मठ्ठ पण नाही"
--

हे आपल्या सगळ्यांना लागू होतं अशी माझी समजूत.
-------

दहशतवादाची व्याख्या:
कोणत्यातरी धार्मिक, राजकीय, तात्विक हेतु साध्य करण्यासाठी, भीती पसरवण्याकरता हिंसक कारवाया करणे.
नक्षलवादी यात कुठे बसतो?
धार्मिक हेतु: काहीच नाही.
राजकीय: नाहीच नाही. स्वतंत्र बोडोलॅंड, खलिस्तान सारखी त्यांची वेगळ्या प्रदेशाची मागणी नाही.
तात्विक: त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तात्विक बैठक वगैरे ऐश त्यांना कशी परवडेल?
मग गेली दोन वर्ष बरयाच वेळा बातम्यांत राहिलेले, आपले विद्यमान पंतप्रधान ज्यांना ’Biggest Internal threat' असं संबोधतात, असे हे नक्षलवादी कोण आहेत? हा ’नक्षलवाद’ काय आहे? हे ’वाद’ वाले elements नेहमीच उर्वरीत समाजापेक्षा वेगळे, पीडीत असल्याचा दावा करतात. नक्षलवाद्यांचं वेगळेपण कशात आहे?

काही सत्यं: माहीत असलेली-नसलेली.
CRPFच्या जवानांवर झालेले हल्ले, नक्षलवाद्यांनी भूसुरुंग उडवून दिल्यामुळे झालेले जखमी-बळी, जंगलांचा आडोसा घेऊन लढण्यायची नक्षलांची guerrilla tactics मुळे प्रकाशझोतात आलेल्या दांतेवाडा, लालगढ, दंडकारण्य भागाची काही विदारक सत्य माहीत आहेत का? Here they are:
दांतेवाडा हा जिल्हा गेली दोन दशकं भारतामधल्या सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षं झाली पण या भागात शाळा तर सोडा, रस्ते-आरोग्यविषयक सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीत. या विभागाविषयीच्या इतक्या टोकाच्या अनास्थेमुळे इथे बालमृत्यू-दर खूप आहे-universally acclaimed अविकसित सहारन देशापेक्षा कितीतरी अधिक. ’गरिबी हटाओ’ योजनेखाली किती योजना आजवर बनल्या, त्याचे फ़ायदेही देशातल्या अनेक भगात दिसून आले पण पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम, NREGA, इंदिरा आवास योजना यासारख्या मूलभूत योजनांचा लाभही या लोकांना आजवर मिळालेला नाही. अठरा विश्वे दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव आणि याच्या वरताण लॅंड-माफ़ियांची शिरजोरी, बेघर झाल्यामुळे करावी लागणारी वणवण, भूक यांची भर पडली. हीच परिस्थिती थोड्याफ़ार फ़रकाने नक्षलग्रस्त भागातील प्रत्येक गावाला लागू आहे.

आपण सकाळी घराबाहेर निघताना काहीतरी खाऊन निघतो. बाहेरही खातो. पोटात भूक असली की डोक्यात कलकल सुरु होते, चिडचिड होते. पण पोटात काही घातलं की डोकं आपोआप ताळ्यावर येतं. मी स्वत: पोटात भूक असताना अजिबात अभ्यास करु शकत नाही.या माणसांना तर एक वेळचं मिळायची भ्रांत आहे.
पोटातली भूक माणसाला पशू बनवू शकते, वाटेल ते करायला भाग पाडू शकते, दुसरयाचा जीव घ्यायला सुद्धा. हे कटू असले तरी सत्य आहे. It might sound too cliche, पण हिंसा करणं हे जर पाप असेल तर दुसरयाला उपाशी मरायला सोडून देणे हे देखील पापच आहे आणि त्यांच्या उपासमारीस कारणीभूत होणे हे देखील.
कधी विचार केला आहात? की नक्षल चळवळ मुंबई-पुणे-बंगलुरु-दिल्ली सारख्या शहरी भागात नाही तर झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, महाराष्ट्राच्या च्या दुर्गम भागात, जिथे गरीबातले गरीब लोकं राहतात अशा ठिकाणीच का जोरात आहे?

नक्षलवादयांना आजच्या घडीला ’हिंसाप्रिय’ अशी प्रसिद्धी देण्यात आलेली आहे.आणि त्यात तथ्य आहेच, नाकारून चालणार नाही. पण आरोपीच्या कठड्यात उभं करताना त्यांनी किती सोसलं आहे याचाही विचार व्हायला हवा. आपल्याच देशांच्या नागरीकांवर ते असं का करतायेत? याचा साधा विचारही न करता CRPFचे जवान घातले जातात, असं का? याचा विचारही व्हायला हवाय. हिंसा समर्थनीय मुळीच नाही आणि हिंसेने प्रश्न सुटत नाही, चिघळतात. पण एकाने गोळी घातली म्हणून दुसरयाने ती हसत हसत झेलावी हे सांगायला गांधींइतका समर्थ नेताही आता नाही आणि त्याच्यासाठी ती हसत हसत झेलणारे समर्थकही आता नाहीत. आता आहे ते फ़क्त स्ट्राईक आणि काऊंटर-स्ट्राईक! निषेधाचे, हक्क मिळवण्याचे याहूनही कमी रक्तलांछीत, अहिंसक प्रकार असतात, अलबत! दशकानुदशकं पिचलेली, असंतोषाने धगधगत असलेला हा आदिवासी आणखी किती काळ शांततापूर्ण मार्गाने निदर्शनं करेल, उपोषण्ण करेल, मोर्चा काढेल? आणि त्याकडे सरकारचे लक्ष जाईल? गेली ५० वर्ष नाही गेलं, आज काय जाणार? कदाचित सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता याखेरीज दुसरा मार्ग त्यांना मिळाला नसेल. पण नक्षलवाद्यांच्या उदाहरणावरुन मागण्या मान्य करण्यासाठी ’उचला शस्त्रं, मारा त्यांन” असाच मार्ग अवलंबण्याचा नवीन पायंडा पडला तर ते घातक आहे. आजच्या घडीला प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचं उत्तर शोधणं आणि त्यावर उपाययोजना करणं हाच पर्याय सरकारकडे शिल्लक आहे. किंबहुना सरकारने तेच करणे अपेक्षित आहे.
या समस्येला ’कायदा आणि सुव्यवस्थे’चा प्रश्न म्हणून बघणं ही सरकारची आणखी एक घोडचूक. मला एक कळत नाही, परिस्थिती इतकी चिघळेपर्यंत सरकार काय करत होतं? ’चालतंय तर चालू द्यात’ म्हणत नजरेआड केलेला प्रश्न आता अक्राळविक्राळ रुप धारण करुन पुढ्यात दत्त म्हणून उभा राहिल्यावर सरकारने त्यांना दडपायचा प्रयत्न करणं म्हणजे चोर तो चोर, वर शिरजोर सारखी गत झाली. ही चळवळ अर्भकावस्थेत असताना त्या लोकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना झाल्या असत्या तर कदाचित आज ही वेळ आली नसती.CRPF च्या जवानांना नक्षलांना मारण्याच्या ऑर्डर्स असतात. ते फ़क्त ऑर्डर्स जाणतात. मग का? कशाला? याबद्दल विचार करण्याची मुभा त्यांना नसते. आपलंच सरकार आपल्यावर गोळ्या घालतंय म्हटल्यावर नक्षलवादी त्यांना गोळ्या घालतातच. कोणाच्याही गोळीने कोणीही मरो, मरतो एक भारतीयच. कोणीही जन्मताच नक्षल नसतो, तो बनतो, परिस्थितीने बनवला जातो. त्याआधी तो सामान्यच असतो.

नक्षलवादाची राजकीय पार्श्वभूमी:
नक्षलवादी चळवळीचं नाव ’नक्षलवादी चळवळ’ का आहे?
पश्चिम बंगालमधल्या ’नक्षलबारी’ गावात चारु मजुमदार आणि कनू सन्याल या तरुणांनी शेतकरयांचा उठाव घडवून आणला होता जो या नक्षलवादी चळवळीचा पाया मानला जातो, त्या ’नक्षलबारी’ गावावरून या चळवळीचे नाव ’नक्षलवादी’ असे पडले. कार्ल मार्क्स, फ़्रेडरीक एंगल्स प्रभृतींच्या समाजवादी विचारसरणीने ६०’च्या दशकात अनेक तरूणांवर गारुड केले. चारु आणि कनू ही त्यातले. नक्षलबारीच्या आदिवासी शेतकारयांच्या समस्यांना तोंड फ़ोडण्याकरता त्यांनी जोरदार उठाव केला होता. त्याच काळात Communist Party of India (CPI) हा पक्ष स्थापन झाला. पुढे या चळवळीने हिंसक स्वरुप घेतलं आणि ’War can only be abolished through wars and in order to get rid of the gun, it is necessary to take up the gun’ या माओ’च्या विचारांचा पगडा असलेल्या चारूच्या नेतृत्वाविषयी शंका उत्पन्न झाली. पक्षात दुफ़ळी माजून सत्यनारायण सिंहच्या नेतृत्वाखाली AICCCR स्थापन केली. मग या पक्षात अनेक विचारप्रवाह निर्माण होऊन नंतर CPI ( Marxist-Leninist) उदयास आली. सरकार थंड पडले असेल तर त्यांना कानठळ्या बसायलाच हव्या, सशस्त्र क्रांतीशिवाय बदल नाही अशा विचारसरणीचे PWG आणि MCI हे घटक चळवळीला येऊन मिळाले. मग त्यांनी एकत्र येऊन CPI(Maoist) स्थापन केला. CPI(Maoist) चळवळीच्या मुख्य प्रवाहात आल्यावर नक्षलवाद्यांच्या आतापर्यंतच्या छुप्या कारवायांना उघड आणि हिंसक स्वरूप आले. ’ह्जार ख्वाहीशें ऐसी’ मध्ये दाखवलेले या आदिवासी लोकांत जाऊन काम करणारे तरुण एव्हढंच या नक्षलवादी चळवळीचं स्वरूप नाही राहिलेलं. आज त्यांच्यकडे रॉकेट-लॉंचर्स आलियेत. सरकार या प्रश्नाचं उत्तर काढायला जितका वेळ लावेल तेव्हढं ते नक्षलवाद्यांचा विश्वास गमावणार आणि याचा फ़ायदा भारतातील आणि भारताबाहेरील फ़ुटीरतावादी घटक घेणार आहेत.

नक्षलवादी आणि सरकार यांच्या लढईत भरडला जातोय तो मात्र सामान्य माणूस., नक्षलवादी त्याला पोलिसांचा खबरया समजून मारतात तर पोलिस नक्षलवाद्यांशी संधान असल्याच्या आरोपावरुन आत घेतात.डॉ.विनायक सेन यांच्या बाबतीत वेगळं काय झालं?मानवाधिकार कार्यकर्ते असलेले डॉ. विनायक सेन यांची सहानुभूती नक्षलवाद्यांना आहे. तब्बल दोन वर्षे नक्षल कारवायांमध्ये भाग घेतल्याच्या अरोपावरून त्यांना डांबून ठेवलं होतं.पण जनतेच्या आंदोलनं आणि प्रक्षोभ यांच्या दबावाखाली सोडावं लागलं. अजूनही त्यांचा नक्षलवाद्यांशीच नाही तर ISI शी संधान आहे हे सिद्ध करायचा सरकारचा खुळचट प्रयत्न अद्याप चालू आहे.

का?
आदिवासींची चळवळ चालवणारे तरुण -तरुणी सुशिक्षित तर काही उच्चशिक्षित आहेत. जागतिक मंदीनंतर नक्षलवाद्यांना जाऊन मिळालेले बहुतेक तरुण तरुणी हे डॉक्टर आणि इंजिनीअर आहेत. नक्षल चळवळीचे जनक चारु अणि कनू हे ही विज्ञान शाखेचे पदवीधर होते. याच वर्षी पकडला गेलेला कोबाद घंदी हा लंडनहून शिकून आलेला सी.ए आहे. बांद्रा उच्चमध्यमवर्गीय पारशी घरात वाढलेला, सेंट झेविअर मध्ये शिकलेला हा तरूण स्वखुशीने नक्षल चळवळीला का वाहून घेतो? कोडेश्वर राव ( M.Tech), कमला सोनटक्के (M.A), मिलिंद तेलतुंबडे( IT Engineer), आणि असे कित्येक अनेक. करीयरीझ्म च्या रॅट रेस मध्ये सहज तरून जाऊ शकतील असे हे तरुण या चळ्वळीत का उतरले? बंडखोरीबद्दलच अनाम आकर्षण त्यांना भुरळ घालतं? का हे अविचारी धाडस आहे? की आपली संपन्न घरं आणि सभोवतालचं दैन्य यातला विरोधाभास त्यांना सहन झाला नाही? जागतिक मंदीनंतर या मुलांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. आत्मविश्वासाची जागा नैराश्याने घेतली. या नैराश्यातून बाहेर येण्याकरता शॉर्टकट्स शोधले गेले. careerism ची वाट चोखाळणारी ही मुलं अशारितीने स्वयंस्फ़ूर्तीने indivisual heroism कडे वळली. आपण ’काहीतरी’ करतोय यापेक्षा ’कोणासाठी तरी’ काहीतरी करतोय या कल्पनेने त्यांना भुरळ पडली नसती तरच नवल. अर्थात नक्षलवाद्यांमध्ये राहून आपापल्या घरांकडे परतलेली मुलं सुद्धा आहेत. काहींनी नंतर परदेशी शिक्षणाकरता जाणं पसंत केलं. पलायनवाद असा काय आणि तसा काय-त्या काळात अशारितीने दिसून आला.

नक्षलवाद: आज आहे तसा, कारणीभूत घटक.
नक्षलवादी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेली झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा ही राज्यं खनिजसंपन्न, नैसगिक साधनसंपत्ती मुबलक असलेली अशी आहेत. साहजिकच आहे, मोठे मोठे खाणमालक, उद्योगपती तिथे कारखाने काढण्यास उत्सुक असतात. सरकारही त्यातून होणारया उलाढालीकडे लक्ष ठेवून त्यांना ते करु देते पण त्यातून उद्भवणारया प्रश्नांकडे पूर्णतया दुर्लक्ष करुन. औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगतीच्या नावाखाली पुर्वापार तिथे राहात असलेल्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार सरकार आताआतापर्यंत करत होतं. तिथली लोक विस्थापित झाली, सरकारने त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष पुरवले नाही. नक्षलग्रस्त भागांमध्ये ५० अधिक आदिवासी जाती-जमाती आहेत. संथाल, मुंडा, पहारिया, कोरवा, गोंड, अभुज मारिया, माडिया गोंड हे त्यातलेच काही. आदिवासी हे निसर्गाला देव मानतात, झाडांची पूजा करतात. आपल्या देशात आता विरळाच बघायला मिळणारा घनदाट जंगलांचा पट्टा याच आदिवासींमुळे टिकून आहे. पण खाण-माफ़िया येतात, बेसुमार वृक्षतोड करतात. उद्योगपती येतात, नद्यांचं पाणी दूषित करतात, हवा काजळवून टाकतात. अवाजवी वृक्षतोड आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी यामुळे या आदिवासींचे पिढीजात कलाकारीचे व्यवसाय, शेतीव्यवसाय बंद झाले. रोजगार सुटला. एका ठिकाणाहून हाकलवल्यानंतर दुसरया ठिकाणी जावं तर हपापलेलं सरकार तिथे दुसरा प्रोजेक्ट जाहीर करतं. आणि मग हे आदिवासी पुन्हा बेघर होतात. सुरु झालेल्या कारखान्यांमध्ये काम देऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न सरकार सोडवू शकत होतं. पण असं फ़ारच थोड्या प्रमाणावर झालं. आणइ झालं त्यातही कंत्राटी कामं, कमी रोजगारावर राबराब राबवून घेणं, असह्य पिळवणुक , याला वाचा कोडणारयांचे सर्रास पडलेले खून, आदिवासी कामगार स्त्रियांवर बलात्कार अशा अनेक भयानक घटनांना मानवाधिकार संघटनांनी वाचा फ़ोडलेली आहे. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत गेली. त्यांच्या प्रश्नांकडे ना कोणी लक्ष पुरवले ना मिडीयाने दखल घेतली. सरकारने तर कायम बघ्याची भूमिका घेतली. जिथे पिळवणुकीची, हिंसेची पार्श्वभूमी आहे तिथे बंडाला तोंड फ़ुटतेच, इतिहास साक्ष आहे. पण फ़रक एव्हढाच त्यावेळी ही पिळवणुक परकीयांकडून झाली आणि आता आपल्याच माणसांकडून. आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली आणि काहीतरी करणं भाग पडलं तेव्हा त्यांच्या समस्यांचं निराकारण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. आदिवासींमधूनच भरती केलेल्या तरुणांना घेऊन ’Salwa Jadum’ ची स्थापना केली. आदिवासींमध्ये फ़ूट पाडून नक्षलवादास आळ घालण्याचा प्रयत्न केला. हा वार खूपच कमरेखालचा होता. त्यामुळे नक्षलवादी खूपच बिथरले. नंतर नंतर ’ Salwa Jadum’ मध्ये झालेल्या छोट्य़ा मुलांच्या सैनिकपदी नेमणुका, महिला कॅडेट्स वर बलात्कार असे गुन्हे प्रकाशात आल्यावर सरकारला ’Salwa Jadum' चा पाठिंबा काढून घेणे भाग पडले.
आदिवासी लोकांसाठी आपल्या संविधानात खरंतर खूप तरतुदी आहेत पण त्या प्रत्यक्षात आलेल्या दिसत नाहीत. १९९६ मधल्या ’पेसा’ कायद्याने काही करक पडला असता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी या लोकांचं दैनंदिन जीवन थोडंतरी सुखकर करु शकणारा हा ’पेसा’ कायदा अद्यापही कागदावरच आहे.

नक्षलवाद इतका हिंसक होण्याला मिडीयाही कारणीभूत आहेच. ’पत्रकार’ हा ’एन्टर्टेनर’ झाला आणि लोक- त्यांचे प्रश्न यांना फ़ारच कमी लक्ष मिळू लागलं. नक्षलवाद्यांना हे कळून चुकले आहे की राष्ट्रीय स्तरावर आपल्या समस्या नेऊन पोहोचवण्याकरता वृत्तपत्रं आणि बातम्यांचे मथळे काबीज करणं आवश्यक आहे. ’सेन्सेशनल’ बातम्यांचेच मथळे बनतात हे सत्य त्यांनी पचवून घेतलं. तुरुंगातून पळ काढणं, माणसांना ओलीस ठेवणं, खंडणी मागणं, वनाधिकारयाला पळवून नेणं आणि नाट्यमयरित्या त्याची सुटका करणं ही सगळी मुख्य बातम्या काबीज करायची धडपड आहे. आणि त्यात थोडं फ़ार तथ्य आहेच तसं म्हट्लं तर. कारण २००९ मध्ये लालगढ ला झालेल्या हिंसाचारानंतरच ’नक्षलवाद’ नावाचं प्रकरण आहे हे सर्वसामान्य भारतीय जनतेला कळलं. नाहीतर आधी ठाऊक होतं?
ही लोकं अशीच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत अनुल्लेखित राहिली असती तर?

आपली बेरोजगारी, उपासमार, वणवण याला सरकार काही दाद देत नाही असं बघून त्यांनी त्यांचा मार्ग शोधला- खंडणी गोळा करणे. Mining Mafiaवर नक्षलवाद्यांचा दात असला तरी एकाही कारखान्यावर हल्ला झालेला दिसत नाहीये, कॉंट्रॅक्टर काहीही अडचण न होता जगतायेत. कारण सरळ आहे, ते नक्षलवाद्यांना protection money देतात. मध्य-प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तर म्हणतात की तिथे पोस्टींग झालेल्या प्रत्येक सरकारी अधिकारयाला आपल्या पगाराचा काही हिस्सा नक्षलवाद्यांना द्यावा लागतो.

आशादायक चित्र:
आपल्या महेश भागवत (IPS) यांनी आंध्रप्रदेशमधलं नक्षलग्रस्त गाव ’गंगापूर’ पूर्णपणे नक्षलमुक्त केलं. ना त्यांनी नक्षलवाद्यांपेक्षा आधुनिक शस्त्रं वापरली, ना त्यांची कोंडी करुन त्यांना वेचून वेचून ठार केलं. या समस्येच्या मुळांशी जायची गरज आहे हे त्यांनी जाणले. आणि ती आहेत गरीबी, बेरोजगारी, आवश्यक सोयीसुविधांचा अभाव.त्यांनी त्या गावात आणि आसपासच्या गावांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, रस्ते बांधले, लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. बास्स! लोकांच्या किमान अपेक्षा असतात. तुम्ही आम्हाला राजवाडाच बांधून द्या किंवा पाच आकडी पगारच द्या अशी त्यांची अपेक्षा कधीच नव्हती. भागवतांनी फ़क्त त्या दिशेने पावलं टाकली. गावकरयांनी स्वत: नक्षलवाद्यांना विरोध करायला सुरुवात केली, ”नक्षलवाद्यांना गावबंदी’च्या पाट्या गावोगाव झळकू लागल्या. नक्षलवादी शरण आले, काहींना गावकर्यांनी भाग पाडले. भागवतांना पुढाकार घेऊन त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलली. याच धरतीवर आंध्र सरकारने लोकाभिमुख प्रकल्प राबवून , आदिवासींच्या समस्या समजून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न चालवलाय, त्यामुळे नक्षलांच्या कारवाया बरयाच आटोक्यात आहेत. भागवत आणि आंध्र सरकार जे काही गावांत शक्य करून दाखवतात ते इतर गावांत, जिल्ह्यात, राज्यांत करणं खरंच एव्हढं कठीण आहे?

नक्षलांचं पुनर्वसन हा ही कळीचा मुद्दा आहे. नुकताच सरकारने नक्षलग्रस्त भगात विकासविषयक कामासाठी ४०० कोटीची मदत जाहीर केली. त्याआधी ३४ जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्रे उघडून औद्योगिक प्रशिक्षण देण्याचा मनसुबा जाहीर केला. आता हे मनसुबे फ़क्त मनसुबेच न राहता प्रत्यक्षात किती लवकर आणले जातात यावरच पुढछे चित्र अवलंबून आहे. ’मुक्ता’मध्ये मक्या म्हणतो तसं ’मारी बिस्कीट’वाली ट्रीक सरकारने बदलण्याची गरज आहे.

--

इथे नक्षलवाद्यांचं कुठल्याही उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नाही. पण नक्षलवादी म्हणजे ज्यांना खून-खराबा करण्यात, सरकारी मालमत्तेची नासधूस करण्यात आनंद होतोय, ज्यांना अक्कल नाही, कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या त्या कळसूत्री बाहुल्या आहेत असा जो काही समज सरकार्धार्जिण्या लोकांनी पसरवून दिला आहे तो किती असत्य आहे हे दाखवून द्यायचा प्रयत्न आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. आणि एक बाजू पुन्हापुन्हा ऐकवली गेली असेल तर दुसरी बाजूही असेलच हे कसं विसरता येईल? ती कोण ऐकणार? या चळवळीचे हिंसक स्वरूप उल्लेखनीय नाही आणि पुन्हा एकदा, समर्थनीय नाही. आपले आदरणीय पंतप्रधान त्यांना ’कोल्ड ब्लडेड मर्डरर ’ठरवून मोकळे झाले. हे आहे हे असं का आहे? उगीचच आहे का? या प्रश्नांच्या मुळापाशी कोणी गेलेले दिसत नाहीत. नक्षलवादाच्या या चळवळीत नंतर माओवादी, त्रूणमूल कॉंग्रेस ही भेसळ नंतर झाली. पण त्यांना चळवळीतून वेगळं करून चळवळीच्या मुळाशी काय आहे हा विचार करून त्या दिशेने देशाच्या नेत्यांना सुधारणा करता येत नसेल, ’आमी नाही ज्यॅ!’ असा आडमुठा
पवित्रा घ्यायचाच असेल तर मग राह्यलंच, नाही का?

ट्रेन एकामागोमाग एक उशिरा आल्या की सामान्य चाकरमानी ट्रेन्स बंद पाडतात, मालमत्तेची नासधूस करतात, एकेक तास बस आल्या नाहीत की लोकांचा जमाव एस.टी स्टॅंड जाळतो, याला आपण संतापाचा कडेलोट होणं असं म्हणतो. आपली सहानुभूती त्यांच्या बाजूने असते. ५० वर्षं पिचत असलेल्या आपल्यासारख्याच माणसांना संताप येण्याचा पण हक्क नाही असं आपण म्हणत असू तर ते कितीसं योग्य आहे. या चळवळीचं हिंसक रुप, राजकीय खेळ्या-स्वार्थ यावर बरेच तर्क-कुतर्क लढवले जाऊ शकतात, चर्चांच्या फ़ैरी झाडल्या जाऊ शकतात, आजही होतंय, उद्याही चर्वितचर्वण होईलच. पण या सगळ्यांच्या मुळापाशी जो सामान्य माणूस आहे त्याला विसरता कामा नये. शेवटी लोकशाही ही लोकांनी लोकांकरताच चालवायची असते.

लांजीगढच्या डोंग्रिया कोंढ आदिवासीच्या हितरक्षणासाठी वेदांतचा नियामगिरी पर्वतरांगांमधल्या बॉक्साईटच्या खाणींचा प्रस्ताव नाकारण्यात आला. अशाच कारणाकरता ’पॉस्को’चा स्टील प्रकल्प थांबवला. औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगती होतानाच लोकांचाही विचार होऊ लागलाय ही सुचिन्हे आहेत! हा विचार फ़ार्फ़ार वर्षांपूर्वी झारखंड, छत्तीसगढ मध्ये झाला असता तर? आज चित्र खूप वेगळे असते.

सरकारवरचा , प्रस्थापितांवरचा विश्वास उडालेली , वेगवेगळ्या मत-प्रवाहांच्या भोवरयात सापडून वाट भटकलेली आपल्याचसारखी , आपल्याच देशातली माणसं आहेत. ’तू माझी माणसं मारलीस, मी तुझी मारतो’ असा खाक्या उपयोगाचा नाही हे सरकारला एव्हाना पटलेलं आहे. त्यांच्या वाटाघाटींच्या तयारीवरून तरी हेच दिसतंय. आता नक्षलांनी सुद्धा हिंसा, संताप सग्गळं बाजूला ठेवून फ़क्त एकदाच सरकारवर विश्वास ठेवावा. आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवाव्यात.ही समस्या बोलून, वाटाघाटी करुन सोडवावी. असं झालं तर ’न’ केवळ नक्षलवादाचा न राहता नवनिर्माणाचाही होऊ शकेल.

26 comments:

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

sachebadh kahitari pratikriya kay dyaychee hyala..aswasth vatala vachun, evdha matra khar, pan khar sangu, nustya vanzotya aswasthatecha kantala aalay ... fotos varun motorcycle diaries athavla..

sharayu said...

चोरट्या खाणी चालविणाऱ्यानी आपल्या बेकायदा धंद्यांच्या रक्षणासाठी जे खाजगी सैन्य उभारले त्याला नंतर नक्षलवादी हे नाव कम्युनिष्टानी दिले. या सैन्याच्या आधाराने कम्युनिस्टानी पश्र्चिम बंगालमध्ये सत्ता मिळविली त्याची ही परतफेड होती. यामुळे नक्षलवाद ही राजकीय चळवळ असल्याचा आभास निर्माण करता आला.

aDi said...

@श्रद्धा:
योग्य शब्दात मांडलंय...
मी या विषयावर अभ्यासाशिवाय चर्चा करू पाहणा-यांना येथे पाठवायची व्यवस्था करतोय!

Shraddha Bhowad said...

अनुश्री,
एखाद्या घटनेच्या दोन्ही बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न हा ही आपल्यातच एक चांगलं योगदान असतं. कोणी सांगावं? उद्या यातली काही माहीती तू कोणाशी बोलताना बोलून जाशील आणि ती व्यक्ती खरंच या बाबतीत काहीतरी करू शकणारी,ऑथॉरिटी आणि रिसोर्सेस असणारी निघेल. थोडका का होईना..बदलाची अपेक्षा बाळगता येईल. आताच काहीतरी कळलं आणि आपण सक्रीय चळवळीत उतरलो, एन.जी.ओ बरोबर नक्षलग्रस्त भागात गेलो, असं होत नसतं गं. उगाच काहीतरी वाटून घेऊ नकोस. अस्वस्थ होण्याइतका संवेदनशीलता, भल्या-बुरयाची चाड तुझ्यात बाकी आहे, हे पण पुरेय.

Shraddha Bhowad said...

शरयू,
तुझ्या पहिल्या वाक्याचा संदर्भ ’सलवा जेडुम’ शी आहे. नक्षलवादाशी नाही. एखाद्या चळवळीने पूर्ण देशातलं वातावरण तापतं तेव्हा त्याचा फ़ायदा राजकीय स्वार्थासाठी केला गेला नाही तरच नवल. आणि तसा केला गेला तर नवल वाटावं एव्हढे भाबडे आपणही नाही आहोत. पण त्याने आदिवासी, atrocities, सरकारचं एव्हढ्या वर्षाचं दुर्लक्ष हा सगळा सेट-अप आहे असं तुला म्हणायचं आहे का?

Shraddha Bhowad said...

aDi,
का नाही? जरूर.
त्यातल्या सगळ्यांचीच विधानं बिनबुडाची असतील असं नसेलच ना? कोणाचंतरी कोणतंतरी विधान ’साधार’ असेलच आणि त्यातून नवं काही कळेल. याबद्दलचे उलटसुलट विचार आतपर्यंत फ़क्त ऐकून आहे, आता प्रत्यक्ष वाचायला मिळतील.

Bhagyalaxmi said...

Hey,

I am a regular reader of your blog.I`ve tried to see your e-mail ID but, wasn`t available. May be this comment is not regarding to your post still there was an urge to convey something, 'You really write well with sound reasoning and creativity.I really appreciate your efforts.'
All the best to your journey:)

Good Wishes,
Bhagyalaxmi.

Shraddha Bhowad said...

Bhagyalaxmi commented:
Hey,

I am a regular reader of your blog.I`ve tried to see your e-mail ID but, wasn`t available. May be this comment is not regarding to your post still there was an urge to convey something, 'You really write well with sound reasoning and creativity.I really appreciate your efforts.'
All the best to your journey:)

Good Wishes,
Bhagyalaxmi.

Shraddha Bhowad said...

Bhagyalaxmi,
Your comment is not visible somehow. I think blogger.com screwed up or something like it. I have filled that lacuna in my profile, you can see it.
I feel ecstatic when readers such as yourself read, comment and compliment. It gives me a renewed enthusiasm and put me in a frenzy mood; which most of the time, has given out some good posts till now. Keep reading, keep commenting, criticizing or more, now that you have my e-mail id. :)))
Thanks.

भानस said...

उगाचच लिहायचं म्हणून लिहीलेले नाही हे. विचारप्रक्रिया सुरू होणे हे महत्वाचे... ती होते. :)

आपण काही बदल करू शकतो का यात हा प्रश्न लगेच समोर उभा ठाकतोच... अनुश्रीला दिलेले उत्तर त्याचे काहीसे निराकरण करते.

तरीही कोणी सोसलं आहे म्हणून हा दहशतवादी पंथ जस्टिफाय होऊ शकत नाहीच हेही खरेच. मात्र पोटाची आग माणसाकडून काहीही करवून घेऊ शकते. राजकारण्यांनी स्वस्वार्थाकरीता आजवर अनेक बाळं पोसली त्यातलीच काही मग आवरेना झाली तेव्हां दहशतवादी शिक्का मारुन झुंजवायला सोडली. शेवटी मारतो तोही आपलाच आणि मेला तोही आपलाच. :(

Shraddha Bhowad said...

@भानस,
मला जे म्हणायचंय, ते जसं आणि जेव्हढं पोहोचायचचंय तेव्हढं तुमच्यापर्यंत पोहोचलंय हे तुम्ही माझ्यापर्यंत सहा वाक्यात खूप छान पोहोचवलंत. मात्र ’दहशतवादी’ हा शब्द मात्र कचकन दाताखाली आल्यासारखा वाटला. मी एव्हढ्याच करता दहशतवादाची इतिहासमान्य आणि राजमान्य व्याख्या दिली आहे. पण ’दहशत पसरवतात ते दहशतवादी’ या अर्थाने तुम्हाला ते म्हणायचं होतं हे कळतंय.पण काही ’संबोधनं’ अशी कॅज्युअली न वापरली तरंच बरं असं माझं वैयक्तिक मत.

हातून खून घडून,बालसुधारगॄहात पाठवलेल्या एखाद्या मुलाला प्रत्येकानेच बोट दाख-दाखवून ’तू खूनी आहेस’,’तू अट्ट्ल खूनी आहेस हेच सांगीतलं, तर त्याच्याकडून सुधारण्याची अपेक्षा तर करता येणारच नाही, त्याच्या या कृतीमागचं कारण जाणून न घेता लोकांचा त्याच्याकडॆ बघायची नजर बदलेल, पूर्वग्रहदूषित होईल आणि कदाचित त्याला मिळायचा तो न्याय, संधी मिळणार नाही.

आपण एखादं संबोधन वापरतो, ते जरी निर्हेतुकपणे तोंडातून निघून गेलं असेल तरी त्याचा समोरच्यावर, एखाद्या समूहावर स्फ़ोटक परीणाम होऊ शकतो.बिनबापाच्या लहान पोराला सगळ्यांनीच ’अक्करमाशा’ म्हणून हिणवावं तसं.

शब्दांचा वापर काळजीपूर्वक व्हावा एव्हढीच इच्छा यातून.

Unknown said...

हे वाचलं आणि थोडा चिंतीत झालो.
इतकं सारं सरळसोट नाही. वंचना हे एक कारण आहेच. पण त्यापलीकडे? फसवी मांडणी. आज ज्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात ही मंडळी उभी राहू पाहतात, त्यांच्या कल्पनेतील त्यांची अर्थव्यवस्था तीच आहे. मालक वेगळा इतकाच काय तो फरक. ज्या नैसर्गीक साधनस्रोतांच्या आधारे हा आवाज उठला, त्या साधनस्रोताचं ते सत्तेवर आल्यावर काय जतन करणार आहेत? त्यांच्या कल्पनेतील विकासही कोणता?
त्यांचा मुकाबला केला पाहिजे, त्यांच्यापासून त्यांच्या अंतिम अनुयायांना वगळून. पण अशी मांडणी तुम्ही करत नाही.
हा ब्लॉग वाचला जातोय म्हणून हे आवर्जून येऊन लिहिलं. हे लिहितोय ते तुम्हाला माझं मत कळावं यासाठीच.

Shraddha Bhowad said...

संतापक (?)
<<आज ज्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात ही मंडळी उभी राहू पाहतात, त्यांच्या कल्पनेतील त्यांची अर्थव्यवस्था तीच आहे
<<त्यांच्या कल्पनेतील विकासही कोणता?
आश्चर्य आहे, ’त्यांच्या’ कल्पनेतला विकास कोणता, अर्थवयवस्था कोणती हे ही तुम्ही मला कल्पना करुनच सांगताय. आणि तुमच्या विचारावर जो चष्मा चढवाल तशीच तुम्हाला परिस्थिती दिसत राहणार. तुम्ही जो राजकीय चष्मा चढवून ठेवला आहे त्यामुळे तुमच्या डोक्यात अशा कल्पना येणं साहजिक आहे.
<<त्यांचा मुकाबला केला पाहिजे, त्यांच्यापासून त्यांच्या अंतिम अनुयायांना वगळून. पण अशी मांडणी तुम्ही करत नाही.
मी अशी मांडणी करत नाही कारण मी रंगबदलू राजकीय मुखपत्र चालवत नाही.
आणि संतापक, तुम्ही पोस्ट नीट वाचलेलं दिसत नाहीये. विरोधासाठी तुम्हाला विरोध करायचा आहे हे सरळच आहे.
"नक्षलवादाच्या या चळवळीत नंतर माओवादी, त्रूणमूल कॉंग्रेस ही भेसळ नंतर झाली. पण त्यांना चळवळीतून वेगळं करून चळवळीच्या मुळाशी काय आहे हा विचार करून त्या दिशेने देशाच्या नेत्यांना सुधारणा करता येत नसेल, ’आमी नाही ज्यॅ!’ असा आडमुठा
पवित्रा घ्यायचाच असेल तर मग राह्यलंच, नाही का?" तुम्हाला हे वाक्य दिसलं नाही की सोयिस्करपणे काणाडोळा केलाय?
<<त्या साधनसंपत्तीचं ते सत्तेवर आल्यावर कय करणार आहेत?
त्यांना त्याचं काहीतरी करायची संधी तर मिळू द्यात.संधी मिळाली की बघूयात ना. पण नंतर ते काहीतरी करतील ह्याबद्द्ल पण तुमच्या काहीतरी पॅरॅनॉईक विजन्समुळे तुम्ही त्यांना कल्पनेत पण संधी देत नाही आहात. आणि मी सगळीकडे संधीच्या च गोष्टी करते आहे. आता संकुचित कोण ? मी का तुम्ही?
आणखी एक-
नक्षलग्रस्त भागात त्यांना (आदिवासींना-त्यांच्या थ्रू राजकीय स्वार्थ साधू पाहणारयांचं नाही म्हणतेय) राजकीय हेतुच साध्य करायचे असते तर कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आलं असतं. पण पश्चिम बंगाल वगळ्ता तसं कुठेच दिसत नाहीये. झारखंड मध्ये भाजप होते ज्यांना सरकारप्रणित सलवा जेडूम चा पाठींबा होता.
आणि मी हे वगळून लिहीले आहे कारण मला कुठेतरी मुळाशी असलेल्या सामान्य माणसाबद्दल बोलतेय, ज्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही.
राजकीय हेतु, स्वार्थ, प्रेताच्या टाळूवरचे लोणी कसे खावे? याबद्दलच्या टिप्स आणि ट्रिक्स यासाठी माझा ब्लॉग नाही. मी लोकशाहीची समर्थक आहे. अर्थव्यवस्था कोणतीही असो, सगळ्यांना संधी मिळून चालवता येते यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत महेश भागवत सारखे अधिकारी आहेत तोपर्यंत तो टिकून राहील.

Unknown said...

>>संतापक (?)
हो. हेच नाव आहे. ते एक विडंबन आहे. पण तो मुद्दा अलाहीदा.
>>आश्चर्य आहे, ’त्यांच्या’ कल्पनेतला विकास कोणता, अर्थवयवस्था कोणती हे ही तुम्ही मला कल्पना करुनच सांगताय.
नाही. कल्पना करण्याची गरज नाही. माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी त्याविषयीची त्यांची मॉडेल्स चांगल्यापैकी मांडून ठेवली आहेत. त्या मॉडेलमध्येही खाणी होणारच आहेत. त्या मॉ़डेलमध्येही धरणं होणारच. ती तिथंच होतील जिथं आत्ता हे परिघीय समुदाय आहेत. फरक इतकाच की, ती करणारे मालक या माओवाद्यांचे सरकार असेल. असो. :)
>>आणि तुमच्या विचारावर जो चष्मा चढवाल तशीच तुम्हाला परिस्थिती दिसत राहणार. तुम्ही जो राजकीय चष्मा चढवून ठेवला आहे त्यामुळे तुमच्या डोक्यात अशा कल्पना येणं साहजिक आहे.
धन्यवाद. तपासून घेईन.
>>कारण मी रंगबदलू राजकीय मुखपत्र चालवत नाही.
मी तुमच्याविषयी तशी कल्पना केलेलीच नाही (आणि मीही मुखपत्र चालवत नाही).
>>आणि संतापक, तुम्ही पोस्ट नीट वाचलेलं दिसत नाहीये. विरोधासाठी तुम्हाला विरोध करायचा आहे हे सरळच आहे.
>>"नक्षलवादाच्या या चळवळीत नंतर माओवादी, त्रूणमूल कॉंग्रेस ही भेसळ नंतर झाली. पण त्यांना चळवळीतून वेगळं करून चळवळीच्या मुळाशी काय आहे हा विचार करून त्या दिशेने देशाच्या नेत्यांना सुधारणा करता येत नसेल, ’आमी नाही ज्यॅ!’ असा आडमुठा पवित्रा घ्यायचाच असेल तर मग राह्यलंच, नाही का?" तुम्हाला हे वाक्य दिसलं नाही की सोयिस्करपणे काणाडोळा केलाय?
वाचलं आहे. विरोधासाठी विरोध वगैरे काही नाही. माझा 'अनुयायी वेगळे आणि मुखंड वेगळे' हा मुद्दा याच्याशी समकक्ष वाटत असला तरी भिन्न आहे. असो.
>>तुमच्या काहीतरी पॅरॅनॉईक विजन्समुळे तुम्ही त्यांना कल्पनेत पण संधी देत नाही आहात.
माझ्या व्हिजन्स तपासून घेईन. 'त्यांच्या'संदर्भातील कल्पनेविषयी वर मी लिहिलं आहे.
>>आणि मी सगळीकडे संधीच्या च गोष्टी करते आहे. आता संकुचित कोण ? मी का तुम्ही?
संकुचित हा शब्द का आला हे कळत नाही. असो.
>>नक्षलग्रस्त भागात त्यांना (आदिवासींना-त्यांच्या थ्रू राजकीय स्वार्थ साधू पाहणारयांचं नाही म्हणतेय) राजकीय हेतुच साध्य करायचे असते तर कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आलं असतं. पण पश्चिम बंगाल वगळ्ता तसं कुठेच दिसत नाहीये. झारखंड मध्ये भाजप होते ज्यांना सरकारप्रणित सलवा जेडूम चा पाठींबा होता.
परत एक दोन-चारदा त्या भागात फिरून येतो आणि मग बोलतो. :)
>>राजकीय हेतु, स्वार्थ, प्रेताच्या टाळूवरचे लोणी कसे खावे? याबद्दलच्या टिप्स आणि ट्रिक्स यासाठी माझा ब्लॉग नाही. मी लोकशाहीची समर्थक आहे.
मान्य. म्हणून तर मी माझी पोस्ट इथं मॉडरेशनशिवाय टाकू शकलो. एरवी ते शक्य नव्हतं.
>>अर्थव्यवस्था कोणतीही असो, सगळ्यांना संधी मिळून चालवता येते यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत महेश भागवत सारखे अधिकारी आहेत तोपर्यंत तो टिकून राहील.
तुमच्या मतांचा आदर आहे.

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.
Samved said...

श्रद्धा, कदाचित नक्षलवादाची मुळं उदात्त असतीलही, पण आजच्या स्वरुपात, खंडणीखोर, हुकुमशाह, क्रुर अशीच त्यांची वृत्ती दिसते. लोकांसाठी, लोकांकडून वगैरे असं त्या चळवळीच स्वरुप मुळीच उरलेलं नाही. आपण उगाच शहरी उबेत भलभल्ती आदर्श स्वप्नं बघतो, तसं काही नसतं असं माझं वैयक्तिक मत. पोलीस आणि सिस्टीम तितकंच सडकं आहे, नो डाऊट. पण हे काळे म्हणून ते गोरे हे चुकीचं.
कुठलीही सिस्टीम मास स्केलवर आदर्शवादाच्या रस्त्याने चालु शकत नाही हा माझा उदास निष्कर्ष.

Shraddha Bhowad said...

बदल हा प्रत्येक गोष्टीचा स्थायिभाव आहे. कोणतीही गोष्ट मूळ स्वरुपात होती तशी राहतच नाही, मग या नियमाला ही चळवळ अपवाद कशी ठरावी?

मी हे मान्य करतेच आहे की अनेक मतप्रवाह या चळवळीला येऊन मिळाल्यावर चळवळीचे मूळ स्वरुप होते तसे राहिलेले नाही, त्याची भ्रष्ट नक्कल आहे. पण त्याचा विचार नाहीच चाललेला इथे संवेद. सरकारचं दुर्लक्ष झालं ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे, सरकारही ते मान्य करतं. मग ही समस्या अंकुरावस्थेत असतानाच खुडली गेली असती तर आज या थराला गोष्टी आल्या असत्या का?

विचार असा आहे, की या सगळ्या आवरणाखाली जे सामान्य लोकं आहेत, मधल्यामध्ये ती भरडली जातायेत. तू असं केलंस काय?आता मी शिकवतोच तुला. या खाक्यामध्ये हा तळाचा मनुष्य विसरला जातोय.

पोलिस , सिस्टीम सडकी-एकदम अमान्य. जोपर्यंत एकही आदर्श अधिकारी पोलिसदलात उरणार नाही तोपर्यंत पोलिस, सिस्टीमला ऍटलीस्ट मी तरी सडकं म्हणणार. लोकं काम कळकळीने काम करतायेत आणि त्या कामात मोडता आणल्याचं अजून निदर्शनास आलेलं नाहीये. एखादा प्रॉब्लेम हाताबाहेर गेला की पोलिस-सिस्टीम ला कोसायचा हा फ़ार जुना फ़ंडा आहे.

नक्षलवादाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नाहीये हे मी अगोदरच म्हटले आहे. दोन्ही बाजूंच्या सत्यांना पुढे आणायचा छोटासा प्रयत्न म्हण हवं तर. एखाद्या गोष्टीला राजकीय रंग चढतो आहेसे पाहून प्रत्येक जणच तोंड सोडतो. आणि मग मुख्य मुद्दे बाजूलाच राहून वेगळ्याच गोष्टी चघळल्या जातात.

निराश होऊन कसं चालेल? कुणीतरी ती ज्योत पुढे न्यावीच लागते. याच न्यायाने आम्ही सिस्टीम मास स्केल वर आदर्शवादाच्या रस्त्यावरुन न्यायचे स्वप्न जरुर बाळगतो.

अवधूत डोंगरे said...
This comment has been removed by the author.
A Spectator said...
This comment has been removed by the author.
Gayatri said...

(१/२)
श्रद्धा, मुद्देसूद आणि ओघवत्या भाषेमुळे लेख वाचताना त्यावर विचार करणं सोपं झालं - धन्यवाद! लेखामध्ये तू मांडलेली सत्यं वादातीत आहेत, पण काही निष्कर्ष घाईत मांडले गेल्यासारखं वाटलं.
१. "नक्षलवाद्यांना राजकीय हेतू नाहीच नाही": जी चळवळ , प्रस्थापित उच्चवर्गीयांची मक्तेदारी असलेल्या कॉंग्रेसप्रणित राजकारणाला शह देण्याकरता निर्माण झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचा ’जहाल गट’ म्हणून फुटून वेगळी झाली, माओवादी साम्यवादी "पक्ष" जिला धार्जिणा आहे, आणि आता तर माओवादी आणि नक्षलवादी हे शब्द समानार्थी म्हणून प्रसारमाध्यमांत वापरले जातात, जिची ’राजकीय पार्श्वभूमी’ तू इतक्या विस्तृतपणे मांडली आहेस त्या चळवळीला राजकीय हेतू नाही?
या निष्कर्षाचं कारण म्हणून तू ’वेगळ्या प्रदेशाची त्यांची मागणी नाही’ असं म्हटलं आहेस. मला वाटतं या वस्तुस्थितीवरून फक्त "नक्षलवादी हे फुटीरतावादी नाहीत" इतकंच म्हणता येईल, त्यांना राजकीय हेतू नाही असं नव्हे. समाजातील पीडित भूमिपुत्रांना मुख्य राजकीय प्रवाहात ठोस प्रतिनिधित्व मिळावं हा उघड राजकीय हेतू आहे त्यांचा, आणि (मार्ग नव्हे, पण) हा हेतू अतिशय रास्त वाटतो मला.
२. "नक्षलवाद्यांना तात्त्विक हेतू नाही" : इथे तर argumentum ad misericordiam (appeal to pity) झालंय. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक ’चोरी करणे पाप आहे’ ही तात्त्विक बैठक असल्यामुळेच टोळ्या बनवून धनिकवणिकांच्या दुकानांवर दरोडे घालत नाहीत असं म्हटलं, तर ते पूर्णत: चूक असेल का? ’समाजात न्याय्य समानता असली पाहिजे, शोषितांनी शोषण सहन करता कामा नये, आणि यथाशक्य मार्गांनी शोषकांविरुद्ध झगडून आपले अधिकार प्रस्थापित केले पाहिजेत’ हे उत्तम तात्त्विक हेतू नक्षलवाद्यांकडे आहेत. या तात्त्विक हेतूंमुळेच, खाऊनपिऊन सुखी असलेल्या लोकांना पीडित भागांमध्ये जाऊन या चळवळीत सामील होऊन दोन वेळची उपासमार सहन करण्याचं बळ मिळत असावं असाही प्रतिवाद करता येईल.

"ज्या अधिकार्‍यांनी सामान्य आदिवासींची प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे, त्यांनाही नक्षलवाद्यांना खंडणी द्यावी लागते" ही वस्तुस्थिती असेल, तर नक्षलवाद्यांची दहशत कुठवर पोचली आहे आणि त्यांच्या हेतूंचं स्वरूप खरोखर किती उग्र आहे ते लक्षात येतं. मग नक्षलवादी दहशतवादी आहेत की नाहीत? वर प्रतिक्रियांमध्ये तू या शब्दाच्या वापराला ठाम विरोध दर्शवला आहेस. तुझाच लेख वाचून मला तर वाटलं की या प्रश्नात "सरकारी (पोलीस खाते) आणि सरकारच्या पाठिंब्याने निर्माण झालेल्या (सलवा जुदुम) यंत्रणा (अ) " आणि "नक्षलवादी (ब) " हे दोन्ही दहशतवादी आहेत - कारण या सार्‍यांकडे हिंसक कारवाया करायला , दहशत पसरवायला शस्त्रं आहेत. दहशतवादी नसलेले दोनच गट: एक,तिथे खाणकाम, जंगलतोड, उद्योगधंदे उभे करणारे धनार्थी लोक(क) आणि दोन, शोषित भूमिपुत्र आदिवासी-शेतकरी-कामकरी(ड).
"ब" चा दहशतवाद "ड" चा फायदा व्हावा म्हणून. "अ" चा उघड दहशतवाद "ड" चा फायदा व्हावा म्हणून, आणि छुपा दहशतवाद "क" चा फायदा व्हावा म्हणून. चतुर "क" हा आपल्या फायद्यासाठी "ब" ला खंडणी देतो. अंतिम निकाल: "क" चा नेहमी विजय होत राहतो, अ आणि ब चा कधी कधी विजय होतो, आणि ड चा नेहमीच पराजय होतो.
तुझ्या लेखाचा रोख (तुला अभिप्रेत नसेल, पण) प्रथमदर्शनी असा दिसतो: ’ब’ चा दहशतवाद बिचारेपणातून उपजलेला आहे आणि ’अ’ चा दहशतवाद दूरदृष्टीच्या अभावामुळे , अनास्थेमुळे आणि आप्पलपोटेपणामुळे उपजलेला आहे, म्हणून ’ब’ हा "खरा" दहशतवादी नाही, आणि ’अ’ ने दहशतवाद सोडून देऊन दूरदृष्टी, सामंजस्य, आस्था आणि नि:स्वार्थीपणा दाखवला पाहिजे. I do concur with the sentiments behind your point, yet I am disturbed by the (what I perceive to be) unjust treatment towards the two kinds of disruptive elements at play here. जर लेबलं लावायचाच मुद्दा असेल तर ती दोन्ही पक्षांना समान तत्त्वांवर लावली गेली पाहिजेत.
पण या लेबलं लावायच्या मुद्याच्या पलीकडे, तू शेवटच्या काही परिच्छेदांमध्ये मांडलेला तुझ्या लेखामागचा हेतू - ’दुसरी बाजू’ ऐकवायचा, प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा, भरडल्या जाणार्‍या सामान्य माणसाची दखल घेण्याचा - आणि मुख्यत: , चित्र आशादायक आहे, असू शकतं या विश्वासाचा मुख्य मुद्दा ’अतिचशय’ पटला. मी वर मतभेदाचे मुद्दे मांडलेत त्यांचं मुख्य कारण म्हणजे, तुझा हा हेतू त्या अतार्किक / तर्कदुष्ट विधानांमुळे झाकोळला जातो आहे, आणि तू ’दोन्ही बाजू’ मांडायचा प्रयत्न केला असूनही तू नक्षलवाद-धार्जिणी आहेस असं वाटतंय लेखाच्या सुरुवातीच्या भागात - आणि तुझा हेतू साध्य करायचा असेल तर लेख वाचणार्‍याला असं नये वाटता कामा, असं मनापासून वाटलं मला.

Gayatri said...
This comment has been removed by the author.
Gayatri said...
This comment has been removed by the author.
Gayatri said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

हं,
माझा लेखातला एकूणच अभिनिवेश ’नक्षल-धार्जिणा’ वाटतो आहे ह्याची कल्पना मलाअ मिळालेल्या कमेंट्स वरुन आली होती आणि तू तर एकदम खिळाच ठोकून टाकलास. :))

<<समाजातील पीडित भूमिपुत्रांना मुख्य राजकीय प्रवाहात ठोस प्रतिनिधित्व मिळावं हा उघड राजकीय हेतू आहे त्यांचा
नक्षलवाद्यांना इथपर्यंत् येऊ दिलं तरच् हे शक्य् आहे ना. सरकार् तर् त्यांना स्वत:चे हेतू असू शकतात् हे ही कन्सिडर् करत् नाहीये.
अगं, असं कधीच् झालेलं नाहीये.
पश्चिम बंगाल् आणि केरळ् इथे कम्युनिस्टांच्ं सरकार् सोडलं तर् बघ् ना. छत्तीसगढ्- भाजपा, झारखंड्-भाजपा, ओरिसा-बिजू जनता दल्-भाजपाचंच् अपत्य, आंध्र प्रदेश्-कॉंग्रेस्, कर्नाटका-भाजपा, महाराष्ट्र-कॉंग्रेस्
कॉंग्रेस् त्यांना दडपायचा प्रयत्न् करतेय् तर भाजपाचा उघड उघडच् ’सलवा जेडूम’ला पर्यायाने खाणमालकांना पाठींना आहे. कुठे आहे मुख्य प्रवाहातलं प्रतिनिधित्व्?
विचार् करायचा मुद्दा असा आहे गायत्री की खरंच् त्यांना प्रतिनिधित्व् मिळवायचं असतं तर् ते जंगलात् लपून का लढले असते? त्यांनी उपोषण्ं केली असती, मोर्चे काढले असते. मग आपोआपच् एखाद्या संधीसाधू पक्षाने त्यांना संधी दिली असती.
तू प्लीज् जरा माओवादी वेगळे आणि जंगलात् लपून लढणारे प्रस्थापितांवर् चिडलेले नक्षलवादी असा वेगळा विचार् करुन् बघ् ना.
--
"नक्षलवाद्यांना तात्त्विक हेतू नाही"
इथे मात्र् सॉलिड् गोंधळ् आहे.
नक्षलवाद्यांना तात्विक् हेतू नाही असं म्हणताना ’आपाल्या मागण्या मान्य् करवून घेण्याकरता सरकार् उलथवूनच् टाकलं पाहिजे वगैरे" तत्व् त्यांच्याकडे नाहीत् , आताच्या सरकारने त्यांच्यासाठी काही करावं, त्यांना त्यांचे न्याय्य् अधिकार् मिळाले तरी पुरे, असं म्हणायचे होते मला. पण् आय् गेस्, इट्स् टू लेट्. बाण् सुटलेला आहे.

बाकी काहीही असो, आशावाद् तुझ्यापर्य्ंत् पोहोचलाय्, पटलाय्, त्याबद्दल् तू निराशेचा सूर् काढलेला नाहीयेस् हे खूपच म्हणजे खूपच आवडले आणि मला तुझी विचार करायची पद्धतही आवडली. काही वाक्यं माझा मूळ हेतू झाकोळतायेत हे पण काही ठिकाणी पटलं.
तू दिलेला लेख वाचला. कायच्या काय पटला. के.एस.सुब्रमणियन हे अनुभवी अधिकारी आहेत. त्यांनी खूप पाहिलं आहे, अनुभवलं आहे आणि तेच त्यांच्या लिखाणात रिफ़्लेक्ट झालंय. निर्दोष विचारपद्धती ही अनुभवांची देणगी आहे असं मला वाटतं. जेव्हा त्यांच्या पात्रतेपर्यंत पोहोचेन तेव्हा इतकं निर्दोष लिहू शकेन अशी आशा बाळगायला हरकत नाही.

Ashish Phadnis said...

श्रद्धा तु इतक्या काळापूर्वी लिहीलेली ही पोस्ट अजूनही सुसंगत आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले..त्याचवेळी तुझे विचार वाचून कुठेतरी मनाच्या कोपर्यात ठेऊन दिले होते. कालच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा प्रतिक्रियांचा पाऊस पडला तेव्हा ते आठवलं...नक्की कधी लिहीले होतेस ते आठवत नव्हते त्यामुळे आख्खा ब्लॉग चाळून काढला...बरेच काय काय वाचनीय सापडले त्याची नोंद करून ठेवलीये...सावकाशीने त्यावर प्रतिसाद देईनच..पण आत्ता विषय ताजा आहे तर तुझ्या पोस्टची लिंक माझ्या फेसबुक प्रोफाईलवर तुला न विचारता दिली आहे. लोकांना दुसरी बाजू कळावी हा हेतू होता. तरी राग नसावा...

 
Designed by Lena