जांभळ्या रंगाचा माणूस.


’पिवळा’ म्हटला की मुठीत दाबलेला स्पंज उघडल्यासारखं वाटतं, सातारयाकडच्या भाजलेल्या रव्यासारखा वास असणारया सोनसळी उन्हाचा गंध येतो आणि मनभर होतो तो व्हॅन गॉगच्या ’आर्लसचा’ झगझगीतपणा, त्याची सूर्यफ़ुलं आणि कासच्या पठारावर लांबच लांब माळावर बिनघोर पसरलेल्या स्मिथिया-सोनकीचा रंग"

खूप वर्षामागच्या गोष्टी कालच ऐकल्यात इतक्या सहजतेने आठवतात तेव्हा गुलजारपासून सुटका नाही.
"मांझी से आती हु‌ई हंसी और आवाज बहोत दूर नहीं लगी
ऐसे ही लगा आवाज अभी तक बीती नहीं.."
’प्रिय’पासून तर सुटका तेव्हाही नव्हती, आजही नाही.

.
.
"असं मला बघता ये‌ईल?"
"का नाही? बघूयात करून. डोळे मिट"
मी डोळे मिटले.
"आता मी काही शब्द उच्चारेन ते ऐकल्या ऐकल्या पहिल्यांदा मनात काय येतं ते मला सांगायचं"
डिंगडॉंग!
"निळा"
".."
मी ब्लॅंक. काळ्याकुट्ट गचपणाखेरीज मला काही दिसले नाही की मनात काही आले नाही.
"अरे! काही येत नाही रे!"
"प्रयत्न कर ये‌ईल. थांब, असं कर., स्वत:शीच एकदा म्हणून पहा. म्हण निळा, निsळा, निळाss"
काहीही मनात येण्या‌ऐवजी मला दूरवरुन सावकाsश चाललेल्या ट्रकचा आवाज, थोडु‌याच अंतरावर मातीतून निसटून घरंगळत खाली गडगडत गेलेल्या दगडाचा आवाज, पायापाशी ये‌ऊन फ़ुटलेल्या लाटेचा चुबुक करुन येणारा आवाज असे अनेक बारीकसारीक आवाज ऐकू येत राहिले पण डोळ्यासमोर अद्याप अंधारच होता. नक्की काय घडायला हवंय याचीही कल्पना नसल्याने मी हैराण हैराण हो‌ऊन गेले. लाल रंगाची झाक ये‌ऊ लागलेल्या त्या गडद अंधाराला पाहून माझे डोळे थकले पण तोंडाने निळ्याचा घोष चालूच. मग मध्ये केव्हातरी सगळे आवाज मिटून गेले, आजूबाजूचं सगळं काही पुसून टाकल्यासारखं झालं आणि ..मग चमत्कार झाला.
कपाळाचा सेंट्रॉ‌ईड जिथे असतो तिथे मला काहीतरी जाणवायला लागलं. निळा म्हटलं की कानात काहीतरी खळखळल्यासारखं वाटलं, तोंडात मिंटचा गारवा आला.
फ़ारच जबरदस्त फ़ीलींग होतं ते.
मग तो खेळ मला तीन तास पुरला.
हिरवा”म्हटला की कानात एक लाडीक लकेर ऐकू येते, मंदमंद सुगंध येतो-बहुधा वाळ्याचा हे जाणवून मी थक्क झाले. .
करडा” म्हटला की उकळणारा चहा प्यायल्यावर भाजतं त्या ठिकाणी टाळूला खडवडीत वाटतं, आकारहीन, पसरट सावल्या स्वत:चंच विडंबन करत नाचताना दिसतात..
तांबडा” म्हटल्यावर दाबून ठेवलेलं काहीतरी दुप्पट वेगाने उसळी मारुन वर यावं , एखाद्या उंचावरुन पडलेल्या बशीने भेलकांडत भेलकांडत कर्कश्य आवाज करत स्वस्थ व्हावं असं वाटतं..
पांढरा”म्हटल्यावर फ़ळ्यावरुन खडू घासत नेताना भुरभुरत खाली येणारे खडूचे कण आठवतात, कुरकुरीत ट्रेसपेपर कानापाशी करकरतो, शुभ्र कळ्यांचा तलम स्पर्श मुठीत जाणवतो..
असे वेगवेगळे अनुभव घेताना मी हरखून गेले.
"शायद कोहरे में हाथ बढाये तो छू ही ले उसे!"
--

खूप खूप वर्षांपूर्वी ’प्रिय’चं बोट धरून मी या रंगांच्या दुनियेत पहिलं पा‌ऊल टाकलं.
आणि मग त्यानंतर मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीशी मी रंगांची, स्पर्शाची, मनातून कधीही न पुसली जाणारी नाती जोडली.
एखादा अनुभव आठवणीत कन्व्हर्ट होताना रंग, गंध, नादासहीत हो‌ऊ लागला.
माणूस दोन कान, एक नाक, दोन डोळे घे‌ऊन जन्माला आलेला असतो तसाच आपल्याबरोबर स्वत:चा असा एक खास कोवळा रंग घे‌ऊन आलेला असतो.
माझी आ‌ई ही माझी आ‌ई म्हणूनच जन्माला आली असावी असं मला कायम वाटत आलंय कारण ती माझी आ‌ई होण्या‌आधीचं सगळं माहीत असलं तरी त्यातलं काही मनात उमटत नाही. ’आ‌ई’ म्हटलं की आपसूकच आठवतो ’सनशा‌ईन येलो’ आणि त्यासरशी नरम दुल‌ई लपेटून घेतल्यासारखं उबदाSSर वाटतं.
माझा मित्र जयदेवचं नाव घेतलं की आठवतो टवटवीत ’लाल’ रंग, वारीतला जयघोष, दुमदुमणारा धुमाळी आणि ओल्ड मॉंकचा ठसकवणारा गंध.
किती नवल!
या रंगांचा आणि माणसांच्या काळं, गोरं , करडं असण्याशी संबंध नाही.
विशिष्ठ अशा रंगांशी त्यांची नाळ आपण त्यांना भेटल्याक्षणी जुळलेली असते, कालपरत्वे ती आणखी दृढ होत जाते एव्हढंच!
पण इतकी व्यवधानं असतात, माणसांचा गराडा असतो, अगणित आवाज, वास, हवे/नकोसे स्पर्श यांची गिजबिज असते की कधीकधी आपल्याला त्या रंगाचा जाम पत्ता लागत नाही. या गोंगाटाकडे जरा दुर्लक्ष करून पाहिलं तर आपसूकच दिसतात हे रंग.
हा प्रदेश तसा अनोळखी नाही पण आडबाजूचा खरं. आपलं आपणच जायचं म्हटलं तर चकवा लागायचीच शक्यता जास्त. हात धरुन तिथवर पोहोचवणारा कोणीतरी भेटायला हवा.

माझ्याबरोबर ’प्रिय’ होता.
--

काळ पुढे पुढे निघून गेला आणि त्या काळातल्या माझ्या आणि ’प्रिय’च्या रिकाम्या जागा तशाच राहून गेल्या.
त्या रिकाम्या जागा त्यांच्या रंग, गंध, नादासहीत आहेत आत कुठेतरी- तपशीलवार गोठवलेल्या.
काल काहीतरी निमित्त झालं आणि त्या आठवणींवरचं कुलूप निघालं.
आणि मग इतकी वर्षं न केलेली एक गोष्ट केली.
धीर करुन मनात ’प्रिय’चं नाव घेतलं.
वाट्लं की सहन नाही होणार इतके अगणित रंग आपल्यातच अनावर कोसळत राहतील..पण नाही..
’प्रिय’ च्या नावासरशी डोक्यात रंगबिरंगी भडक चुनड्या घातलेल्या काठेवाडी स्त्रियांनी "
सावन लाग्यो भादवो जी.." म्हणत
एकसुरात धरलेला फ़ेर उमटला..
वारयाच्या एका झुळुकीसरशी एकलय हलणारी जिरॅनियमची शेतं आठवली..
मिरमिरवणारा गंध असलेल्या तुळशीच्या जांभळ्या मंजिरयांचे घोस नाकापाशी उलगडत गेल्यासारखे वाटले..
आपला जांभळा पुष्पसंभार मिरवत एखाददुसरया वाटसरुवर कृपाकटाक्ष टाकल्यासारखा फ़ुलं ढाळणारा बापटांचा जॅकरॅडा आठवला,
जिथे तिथे उघड उघड
फ़िरुन फ़िरुन असणारा!
.
माझ्या मनातल्या ’प्रिय’ला एक निश्चित रंग आल्याचं पाहून नवल वाटलं. आणि पुढच्याच क्षणी ’प्रिय’शी संबंधित कुठल्याही गोष्टीचं नवल वाटावं याचं नवल वाटलं.
तर-
’प्रिय’, बाबा रे! विचारलसंच कधी तर मी सांगू शकेन की-
तू एक जांभळ्या रंगाचा माणूस आहेस.
.
.
आणि कधीतरी, केव्हातरी तुझ्या मनातला माझा रंग कोणता हे सांगण्याचं जमव बुवा!
तुम्हालाही बघा सांगता आला तर!

9 comments:

Rahul-brain with beauty said...

ultimate rainbow post , unfolding colours

Meghana Bhuskute said...

यावर काहीही लिहिलं तरी बटबटीतच वाटेल...

फार सुरेख.

Samved said...

मजा येतायेता थांबवुन टाकलस...असं का केलंस? It was just growing on me and ended up suddenly

Anushree Vartak. अनुश्री वर्तक said...

masta ga..baharan baharan...kuni tari ekda mhanala mala ki swapna black and white astaat...ani hasnyacha aawaj yet rahila mag khup vel...mazi swapna hasat hoti :)

tula kiti sundar swapna padat astil na :)

Sneha Kulkarni said...

Mast lihila aahes...maansa tyanchya rangasakat bhetatat he nakkich!

Shraddha Bhowad said...

सगळे लोक्स,
थँक यू!

संवेद,
<<It was just growing on me and ended up suddenly
माझंही लिहीताना असंच झालं.संपवून टाकलं. कोणी आपला ताबा घ्यायला नको-मनात नसताना.

अनुश्री,
mazi swapna hasat hoti :)
हे काहीतरी और दिसतंय.
माझ्या स्वप्नांबद्दल काहीही न बोललेलं बरंय. त्यांचा पंचनामा ऑलरेडी करुन झालाय अगोदर. सुंदरचं माहीत नाही पण कशाला कशाचा मेळ लागत नाही अशी काsssहीही स्वप्नं पडतात मला.

Shraddha Bhowad said...

कमेंट्स वाचणारे लोक्स,
या पोस्टवरच्या आणखी मजेदार गप्पा, चर्चा वाचण्याकरता इथे जा:
http://www.maayboli.com/node/24620

BinaryBandya™ said...

अप्रतिम रंगांची उधळण ..

Unique Poet ! said...

लेख वाचताना मी ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट असल्याचे वाटत होते...... नंतर नंतर .... शेकडो रंगीत फवारे उडताहेत... माझ्यावर ...... असं वाटायला लागले.. किती तरी रंगीत आठवणी... इतस्तत: डोळ्यासमोरून फिरकायला लागल्या...... जांभळ्या रंगाची शाईच हट्टाने वापरायचो शाळेमध्ये..... माझे अक्षर सुंदर कधीही नव्हते.....माझ्या निबंधवह्या वेगळ्या दिसायच्या कायम.... जांभळ्या.... लाल म्हंटले की " तो लाल दिसतोय ना तो मंगळ "
" रक्ताचा रंग लाल..." मी ८/९ वर्षाचा होतो... तेंव्हा अंमळनेरला जाताना बसमधून पाहिलेला... उगवणारा लालचूटूक तांबडा सुर्य.......हिरवा.... चांदवडला..... चंद्रेश्वराच्या डोंगरावरून.... पाहीलेले .. आजूबाजूचे सगळे डोंगर हिरवाईने भरलेले आठवतात....... निळा..... सारडा कन्या विद्यामंदीर चा युनिफॉर्म निळ्या रंगाचा होता...माझा जाण्या येण्याचा रस्ता .सारडावरूनच होता.... आमचा .... पेठे विद्यालयाचा पांढरा-खाकी ........ ती एकदा चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून कॉलेजला आली होती... काय...काय वाटले होते....... आजही माझा आईस्क्रिम फ्लेवर चॉकलेटच आहे..... .. असो....

रंगबिरंगी झाली आहे पोस्ट ! अप्रतिम ...!
आणि आभार रंगीतसंगीत आठवणी करिता.... ;)

 
Designed by Lena