नेमेचि येतो. . %@#!

सकाळी दचकून जाग आली तर मी कुठे आहे ते पहिल्यांदा लक्षात येईना.
मी गादीवरुन उठून चौरंगासमोर कधी येऊन बसले, माझ्यासमोर कॉन्स्टिट्यूशनचा ठोकळा का आहे, काहीच कळेना. मी अजूनही बेडरुममध्ये झोपलेय, त्या झोपेतल्या स्वप्नात मी चौरंगासमोर अभ्यास करते आहे, आणि मग त्या स्वप्नातल्या मला कॉन्स्टिट्युशन वाचता वाचता झोप लागलिये असं वाटायला लागलं. मग स्वप्नातल्या झोपेत तरी नीट झोपूयात म्हणून पुन्हा बेडरुममध्ये जाऊन झोपले.
सकाळी जाग आली तीच आठ्या भरलेल्या कपाळाने आणि दिवसातला पहिला विचार,"बोर बोर झालंय!"

त्यानंतर काही केलं नाही..करण्यासारखं काही नव्हतंच आणि असलं असतंच तरी काही करावंसं वाटलं नसतं. डोक्यात फ़टाफ़ट विचार येत होते. कुठलाही विचार दोन सेकंदांहून जास्त वेळ टिकत नव्हता. एक तासांपूर्वी स्वच्छ आंघोळ करुनही अस्वच्छ, पारोसं वा्टत होतं. सगळ्या अंगालाच कंटाळा लागलाय असं वाटत होतं.
या कंटाळ्यातून आलेल्या डेस्परेशनपायी  काल मी ’अपने दोस्तों को सुनाईये अपना मनपसंद गाना’ वाला एयरटेलचा कॉलसुद्धा मन लावून ऐकला.

पहिल्यापहिल्यांदा मला कंटाळा आलाय हे अमान्य करण्याचा मी प्रयत्न केला, नाही असं नाही.
त्यासाठी मी स्वत:लाच चॅलेंज दिलं - कंटाळ्याला किमान पाच वेगवेगळ्या भाषांमधले शब्द सांग.
दोन मिनीटं विचार करुन उत्तर आलं- उन्युई, तेदियो, नोय्या, लांगव्हिल्ह, तैकुत्सु, बोअरडम, आलस्यम. घे!
मला मल्टीलिंग्वल कंटाळ्याला फ़ाउल धरता येत नाही.त्याला सिरीयसली घ्यावंच लागतं.
येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये दर ९१ मिनीटांनी उसळणारा एक गरम पाण्याचा झरा आहे म्हणे! त्याला ’फ़ेथफ़ुल गिझर’ म्हणतात.
दर दीड-दोन महिन्यांनी उपटणारया माझ्या  सिरीयसली घेतल्या जाणारया कंटाळ्यासाठी मीसुद्धा एखादं विशेषण तयार करायच्या विचारात आहे.

बघू! अभ्यास करु, जाईल कंटाळा करत गव्हर्नर जनरल्स ची यादी मनातल्या मनात म्हणून बघितली. कॅनिंग-एल्गिन-लॉरेन्स-मायो-नॉर्थब्रुक (जमतंय जमतंय)-लिटन-रिपॉन-डफ़रीन.. .  . रिपॉन-डफ़रीन... .   नंतरचे कर्झन-मिंटो-हार्डींग्ज-चेम्सफ़र्ड आठवतायेत पण मधले कोणतरी दोन चचलेत . .रिपॉन-डफ़रीन... .
प्च! मी नाद सोडला. 
भूगोल उघडला तर ऍटलासमधले लोहमार्ग मला सुरवंटासारखे भासायला लागले आणि मी पुस्तक खाटकन मिटलं.
मग मी अभ्यास ठेवलाच.

मग काय करावं बरं म्हणत ’ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका हेहेहेहे हेहेहेहे’ हे गाणं आपल्या कॉलरट्यूनवर लावू की नको? हो तर का हो? नाही तर का नाही? यावर सिरीयसली विचार केला
पण तो दोन मिंटातच संपला.

’नक्षत्रांचे देणे’ काढलं. वाचलं
त्यावर उतारा म्हणून माझ्या कविता वाचल्या.
त्यानंतर माझा धिक्कार कसा केला जावा याबद्दलचा मसुदा मनातल्या मनात तयार केला.त्यावर पुढील कंटाळ्याच्या वेळी अंमलबजावणी केली जावी अशी डायरीत नोंद करुन ठेवली.
गूगलवरुन कंटाळ्यावरचे कोट्स शोधून काढले. त्यात बर्ट्रांड रसेल साहेब म्हणतात,
" मनुष्यजमातीमधली अर्ध्याहून  अधिक पापं ही कंटाळ्याच्या भीतीमधून केली गेली गेलेली असतात".
आता हे खरं की काय?
असं कुठलंतरी पाप करुन मी तुरुंगात गेले तर तुरुंगात वेळ घालवण्याकरता काय करावं ह्या विचारात पुढचा अर्धा तास बरा गेला.
नंतर पुन्हा ब्लॅंक!
मी एम्पीथ्री प्लेयर कानाला लावून बसले.
पण ज्या गाण्याने मागचा कंटाळा सुरु झाला होता ते गाणंच कानात वाजायला लागल्यावर योगायोगाचं हसूही येईना.

ओरिगामीचे कागद पुढ्यात ओढून ’पीगॅसस’ करायला घेतला पण अर्ध्यावरच मी हवा गेल्यासारखी पिळपिळीत झाले आणि ड्रॉवरमधल्या पूर्ण व्हायची वाट बघत पडून असलेल्या अकशे एकुणतीस कागदी मॉडेल्समध्ये आणखी एकाची भर पडली.
धाप्पकन खुर्चीत बसले.
पॅसिफ़िकच्या किनारयावर राहणारया माझ्या मित्राने मला पॅसिफ़िकबद्दल एकही ओळ लिहून का पाठवू नये याचा विचार करायला लागले.
मग कधीतरी तो विचार संपला.
थोडावेळ गबदूलपणे बसून राहिले.
मग टी.व्ही ऑन केला. खटॅक खटॅक बटणं दाबत मी सध्याचं ’इन व्होग’ गाणं ’भाग भाग डी.के.बोस’ वाजत असलेल्या चॅनेल वर आले.
पांडासारखा एकच डोळा लालकाळा असलेल्या इम्रानला आणि त्याच्या मागच्या शिमग्यातली सोंगं काढलेल्या पंटर्सना बघून करमणूक झाली खरी पण लागोपाठ वेगवेगळ्या चॅनेल्सवर तेच तेच गाणं ऐकल्यावर ते मला ’भाग भाग डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस’ ऐवजी’भाग भाग डी.के.’ बोस डी.के’.’बोस डी.के’.’बोस डी.के’(बोस डी.के. फ़ास्ट फ़ास्ट म्हणून पाहा) भाग’ असं ऐकू यायला लागलं.
मी वैतागून टीव्ही सुद्धा ऑफ़ केला

लोकं कंटाळा आला की डायरी लिहीतात म्हणे. मी पण लिहायचे.
पण प्रत्येक कंटाळ्यात डायरी लिहीताना पुढे केव्हातरी माझा कंटाळा डायरीत लिहीण्याला इम्यून झाला. मग मी लिहीणं सोडलं आणि डायरया वाचायचा सपाटा लावला. मग यथावकाश मला डायरया वाचायचाही कंटाळा आला.
मी डायरी उघडली. गेले दोन आठवडे ’असह्य डोकेदुखी’शिवाय नोंद नाहीये.
आता अचानक भूकंप होऊन मी डायरीसकट गाडले गेले तर शंभर शतकांनंतर झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या माझ्या या डायरीमधून सद्य समाजाच्या सांस्कृतिक, ऐहिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची कल्पना येऊ शकेल काय? त्याची कल्पना येण्यासाठी माझी डायरी महत्वाचा दस्तावेज ठरु शकेल काय? माझ्या डायरीत असलेल्या-
 ’चालायला लागलो की कुठेतरी पोहोचतोच आपण’,
आयुष्य ही एक ओव्हररेटेड संकल्पना आहे’,
हा एक प्रश्न आपल्या पोटात हजार प्रश्नांना वाढवतो’,
आणखीही काही हॉरीफ़िक नोंदींशिवाय टु-जी स्पेक्ट्रम, वंगारी मथाई, पाणीपुरीवाले याबद्दल लिहायला हवं अशी मेंटल नोट करुन ठेवली.

फ़ोन वाजला.
गळ्याला पटटा लावणारया, मास्टर ऊग्वे सारख्या दिसणारया (संदर्भासाठी पहा: कुंग फ़ू पॅंडा)  माझ्या दूरच्या आजोंबाचा कॉल होता. माझ्याशी लग्न करायला उत्सुक किमान पंध्रा शाह्याण्णव कुळी मराठा मुलांची नावं निर्विकार चेहरयाने ऐकली. त्या पाच मिनीटांच्या कॉलमध्ये मी शेकडो मूगाची पोती गिळली आणि ’रॉंग नंबर’ बोलून फ़ोन ठेवून दिला. परत फ़ोन नाही आला. आता बहुधा कधीच येणार नाही.
पाणी प्यायला किचनमध्ये गेले. तीनदा पाणी ओतलं, तीनदाही प्यायले नाही तरीसुद्धा पुढच्या वेळी पाणी ओतताना ग्लास रिकामा बघून खूप चक्रावले आणि नंतर भ्याले.

फ़ोनची डायरी उघडली. डो्ळे मिटून चार नंबंरांवर बोट ठेवलं,  कॉल लावले.
मस्त चाललं होतं त्यांचं.
एक जण गर्लफ़्रेंडबरोबर कॅफ़े कॉफ़ी डे मध्ये खिसा खाली करायला गेला होता. दुसरीला काहीतरी छान सुचलेलं लिहून काढत होती, उरलेले दोघं झोपले होते. मी अशी कंटाळ्यात लडबडलेली असताना ते तिथे आनंदात आहेत बघून तुफ़ान चीडचीड केली आणि भैरवीला "आय ऍम अ बिच! यू नो द्यॅट, डोण्ट यू!’ हे भरतवाक्य टाकलं आणि फ़ोन ठेवून दिला. त्यांच्यापैकी एकानेतरी उलटून मला फ़ोन करावा, ताडताड बोलावं असं वाटत होतं पण
नंतर कोणाचाही कॉल आला नाही.

एकदोघांना टुकार एसेमेस पाठवले. त्या टुकार एसेमेसवरच्या त्यांच्या स्मायलींचे पीक घेतल्यासारख्या वाटणारया त्याहूनही  टुकार प्रतिक्रिया वाचून मी कपाळ बडवून घेतलं.

हातात ऍपी फ़िजची बॉटल घेऊन घळाघळा रडत सेलिन डियॉनचं ’ऑल बाय मायसेल्फ़’ गायले. रडण्याचा भर ओसरल्यावर किमान चार लाईक्स मिळतील असे कोणते स्टेटस फ़ेसबुकवर टाकावे याचा विचार केला. त्यात पाच मिनीटं जरा बरी गेली. माझे ’रिलेशनशिप स्टेटस ’ सिंगल वरुन 'कमिटेड' वर बदलणार एव्हढ्यात चार थेंब पाऊस आल्याने लाईट्स गेले.

भर पावसात गाडी काढली, किल्ल्यात भटकायला गेले.  किल्ल्यात एकटीच भटकताना सिगरेटी फ़ुंकणारया पोरांच्या टोळक्याने आपल्याला कॉर्नर केलं तर कुठली किक एकाच वेळी दोघांना लोळवेल याचा भराभर विचार सुरु केला. त्याचवेळी खच्चून ओरडता यावे म्हणून घसा ्साफ़ केला, पण ह्या!  पाण्याला घोडा बिचकतो तसे एकट्या फ़िरायला येणारया पोरीला पाहून ती पोरं बिचकली आणि भलतीकडेच दूर निघून गेली.
मग मी तटावर बसून अथर्वशीर्ष म्हटलं. माझ्या आवाजाचाच कंटाळा आल्यावर थांबवलं.
अशा बालिश-किनरया आवाजाऐवजी जरा घोगरा-सेक्सी आवाज असता तर बरं असं वाटत राहिलं. माझ्यात आता आहे त्याऐवजी काय असतं तर बरं या विचारात अर्धा तास खरंच बरा गेला.
उद्यापासून कंपलसरी सलवार कमीज घालायचे आणि केस कमरेपर्यंत  वाढवायचे असा निश्चय करुन मी तट उतरले.
कंटाळलेल्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१. कंटाळा का येतो हे माहीत असलेले
२.कंटाळा कशाचा आलाय हे नेमकेपणाने माहीत असलेले
मी दुसरया वर्गात मोडते. मला तोचतोचपणाचा कंटाळा आहे.
दोन चार जागी कडमडुन-दीड लिटर पेट्रोल जाळून घरी परतताना तोचतो रस्ता घ्यायचाही कंटाळा आला.मग चुकीचा रस्त्याने घरी यायचा प्रयत्न केला. येताना मेडीकल स्टोअरमधून ’बजाज आलमंड ड्रॉप्स केश तेल ’ घेतलं.
पावसात ’इटर्नल सनशाईन ऑफ़ द स्पॉटलेस माइंड’ सारखं मन लख्ख बिख्ख होइल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. बहुधा त्यातलं ’Everybody gotta learn sometime' एव्हढंच बेथला मला शिकवायचं असावं. मघाच्या भयानक कंटाळ्यातही किल्ल्याच्या तटावरुन समुद्रात उडी टाकून जी्व-बीव देऊन कोस्ट्गार्डच्या पाठी नस्तं लफ़डं लावलं नाही ह्या देशाप्रती दाखवलेल्या जबाबदारीबद्दल स्वत:ची पाठ थोपटली.

एक २० रुपयाचं पूर्ण कुरकुरे खाल्लं, पापड तळुन खाल्ले, रम केक खाल्ला, लिम्का प्यायले. मग अचानक लक्षात आल्यासारखं घटाघट पा्णी प्यायले. आज दोन-चार पिंपल्स नक्की उगवणार. 

मग मी उगीच आजूबाजूला बघितलं, खांदे उचकले, आरशात पाहून तोंड वेडंवाकडं केलं. त्यानेही माझ्याकडे बघून खांदे उचकल्यावर आरशाला नाक लावून  "हे काय होतंय मला?" हे वरुन त्यालाच विचारलं. त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही.
मग काही करण्यासारखं उरलंच नाही.
गादीवर पडले अन पडल्या पडल्या झोप लागली.
.
.
आज मी खूपच बरी आहे.
पण आज-उद्या धौलपूर हाऊस मध्ये इंटरव्ह्यू ला ’कंटाळ्या’वर पाच मिनीटं बोलायला सांगीतली तर यातलं किती आणि काय काय बोलू शकेन हे मात्र सांगता येत नाहीये अजून.

**

वरचं सगळं एका पत्रात लिहून काढलं. मग ते कोणाला पाठवण्यात अर्थ नाही असं वाटून कालची तारीख घालून फ़ाईलला लावून ठेवलं.
लिहीलेल्या पण कधीच कुणालाच न पाठवलेल्या पत्रांची संख्या आता झाली २३.
Rungli Rungliot! (याचा संदर्भ देणार नाही, शोधून काढा).
 
Designed by Lena