बॉं व्होयाज

आजचा दिवस रोजच्यासारखाच होता.

दिशाही त्याच होत्या.
सूर्य चुकून पूर्वेला उगवलाय असं नव्हतं.
माझी उंची गेल्या दिवसा-आठवड्या-महिन्या-वर्षाइतकीच म्हणजे पाच फ़ूट दोनशे एकूणऐंशी इंचच होती.
कशातही काहीही फ़रक नव्हता.
एकाच मिश्रणातून सारख्या वड्या पाडाव्यात तसा आजचा दिवसही तोचतोचतो, अगदी तस्साच होता.

सकाळच्याच लोकलची जुळी बहिण हलतडुलत दादर स्टेशनवर थांबायच्या आधीच दहा सेकंद आधी उडी मारुन इथं जाऊ का तिथं आणि इथं बसू का तिथं चं इन्जिनीयस डिसीजन मेकींग आटपलं. तेवढ्यात बाहेरच्या वेगवेगळ्या आकाराच्या, वजनाच्या, वासांच्या बायांचा लोंढा अंगावर चाल करुन आलाच.
आज मी शिताफ़ीने त्या लाटण्याच्या साईझच्या गुजराथीणीला टाळलंय.
’कुछ कुछ होता है’ मध्ये साना साईद गेली होती तशीच ही काल बंदुकीच्या गोळीसारखी  भक्ककन  डोक्यात गेली होती. पार कान किटेस्तो मला चावत बसली होती.
वाईट नव्हती ती पण दुसरया दिवशी माझ्याबरोबर हसली असती,
मग तिसरया दिवशी तिने माझ्याकरता जागा वगैरे पकडून ठेवली असती
आणि नंतर नंतर तिच्या घरी ढोकळा, उंधियो खायला बोलावलं असतं...
काल गाडीतून उतरताना एवढ्या शक्यता डोळ्यासमोर आल्या की मला क्षणभर भीतीच वाटली.
आपण एखाद्या वेळी नेमकं कुठे असणार आहोत हे कोणी गृहीत धरुन चालावं म्हणजे भयंकरच नाही का?

आज माझ्या आजूबाजूला परिचायचीच मंडळी आहेत.
कुरकुरीत क्रॅक्जॅकसारखी कांजीवरम, तिच्या बाजूची ग्रे रंगाची अत्यंत स्फ़ोटक वस्तू, माझ्या सीटवरची कायम आतून थंड असणारया पण बाहेरुन  घाम येणारया बाटल्यांमधली पेयं पिणारी पोरगी, पलीकडच्या विंडो सीटवरची बाई ;जी मला पहिल्यापासून निळ्या रंगाची वाटते-निळा म्हणजे  काटेभवरीच्या फ़ुलासारखा निळा, कुठलं गाणं ते- ’निले निले अंबर पर’ मधला निळा..आणि माझ्याकडचे निळे अचानक संपलेत.
तर इत्यादी मंडळी.

ट्रेनमध्ये प्रत्येक जण आपल्याचकडे चोरून बघतोय  असं चमत्कारीक फ़िलींग येतं.
आणि हे माझ्यासकट सगळ्यांनाच वाटत असल्यामुळे जो पहावा तो आपला एकमेकांची नजर चुकवत बसलेला नाहीतर गळे, खांदे चाचपत बसलेला असतो.
कधीकधी कोणातरी वाटतं ओळखीचं पण आतमध्ये जाम काही हलत नही.
आताही माझ्या डाव्या खांद्यापासून पंचेचाळीस अंशातली मुलगी माझ्याकडे गेली दहा मिनीटं बघतेय हे मला तिच्याकडे न बघता जाणवतंय. हे वरच्या बघण्यातलं बघणं नाही तर ऍक्चुअल ’बघणं’.
मी तिला ओळखत नाही म्हणजे ऍटलीस्ट मला तरी असं वाटतंय.
ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल?
ती गाणी ऐकतेय..कुठलं?
कुठलं गाणं ऐकताना ती आपल्याबद्दल विचार करतेय याबद्दल मला जबर कुतूहल वाटलं.
आपल्या मनात चाललेले विचार म्हणजे आपण असू तर दुसरयाच्या मनात आपल्याविषयी येणारे विचार म्हणजे सुद्धा आपणच का?

मला व्यक्तिश: विंडो सीट आवडते. ट्रेनच्या सुसाट वेगात पुढे जाताना खिडकीत बसलेल्या आपल्या सावलीचा ठसा मागे पडणारया प्रत्येक जागी उमटलेला आहे ही जाणीव मला वसई-दादर परिसरात ओम्निप्रेझेंट असल्याचा फ़ील देते.माझी सावली हे स्वत:ला सावली नसलेलं आक्रित असल्याने तिला (म्हणजे माझ्या सावलीला!) काय वाटत असेल याची मला कल्पना नाही.

कधीतरी माझ्या सीटच्या आजूबाजूला चिल्लीपिल्ली असतात, त्यातली काही एखाददुसरे दात विचकत तोंडभरुन हसत असतात, उरलेली कसल्यातरी अनामिक आनंदाने असह्य थयथयत असतात. त्यांच्याशी "इची पिची पिची पू" असं बरंच काही बोलणं अपेक्षित असतं पण मी काही बोललेच आणि ते पोरगं चेकाळून विंडो सीटवर हक्क सांगायला लागलं तर काय घ्या! असा विचार करुन मी खिडकीपासून जाम हलत नाही. विंडो सीट साठी या पोरांची चेहरयावरचं कान ते कान टांगलेलं हसू आपल्या थोबाडावर भिरकावण्याची ट्रीक तर फ़ार जुनी. पण मी ही या खेळातली मुरलेली गडी असल्याने ’हल्ल! च्यक! करत पेंढा भरलेल्या पॅंडासारखी आपली बसूनच राहते.

माझ्यासाठी संपूर्ण निरुपयोगी असलेल्या अंगठ्या, कानातली विकायला आलेली आपल्या प्रत्येकासाठी वेगळ्या असलेल्या आवाजात खेकसतेय. माझ्यासमोरची हातावर ’भागवान’ गोंदवलेली बाई हातातली गवार कात्रीने कराकरा कापतेय. मी प्रचंड हाय मेंटेनंस आणि कंट्रोल फ़्रीक मुलगी असल्याने माझं तिथे बरोब्बर लक्ष जातं कारण ती ते चुकीच्या पद्धतीने करतेय.
आज गवार काय? काल हिच्याकडे फ़्लॉवर होता,
परवा  हिने पालकच्या अख्ख्या जुडीची मुंडी मुरगळली होती
आणि त्याच्याही आदल्या दिवशी मला वाटते फ़्लॉवरच होता. नाही, बहुधा लाल माठ- नाही, बरोबर, फ़्लॉवरच होता, तिच्याशेजारी बसणारया समस्त भारतीय नारीधर्माचा अर्क असणारया बाईने तिला फ़्लॉवरवर मौलिक टिप्स दिल्या होत्या-आता आठवलं..
गेल्या महिन्याभराच्या प्रवासाच्या डिटेल्समध्ये एव्हढाच काय तो भाजीपाल्याएव्हढा फ़रक!

पण मला त्याचं एव्हढं काही वाटत नाही कारण-
विकलांगच्या आणि आमच्या डब्ब्यामध्ये फ़क्त काही बार्सचा अडसर आहे. तिथे एक छानदार हसू असलेला आणि रंगबिरंगी बुब्बुळं असलेला मुलगा रोज माझ्या गाडीला असतो.  त्याचं एक बुब्बुळ काळं तर दुसरं कोणीतरी जपून मधाचा थेंब डोळ्यात सोडावा तसं आहे. त्याला ’हेट्रोक्रोमिया’ म्हणतात जे मला नंतर गुगलल्यावर कळलं.
अलेक्झांडरचीही (द ग्रेट वाला) बुब्बुळं अशीच रंगीबिरंगी होती म्हणून त्याला ’डिकॉरस’ म्हणायचे-दोन बुब्बुळंवाला. म्हणून याला मी ’D’ नाव दिलंय.
हा विकलांगमध्ये का प्रवास करत असावा? याबद्दलच्या न संपणारया कुतूहलात मी तब्बल आठवडाभर बुडालेले. बघावं तेव्हा  मी आपली सतत त्याला नजरेने चाचपत असलेली, चालतोय तर मस्त, कुठे प्लॅस्टर वगैरे पण नाही- मग?
मग नंतर कधीतरी त्याच्यावर डोकं शिणवणं बंद केलं. मात्र त्याचा आवाज कसा असेल याबद्दल मात्र मी मनातल्या मनात वेगवेगळ्या ऑडियो फ़ाईल्स तयार के्ल्या होत्या.
मला हे पुरुषांच्या आवाजाचं फ़ार आहे.
व्यक्तीचं नाव सर्वात पहिल्यांदा आपल्या मनात त्याचा आवाज उमटवतं आणि त्यामुळेच त्याच्याशी दुसरं कुठलं नातं जुळो न जुळो-आवाजाचं नक्कीच जुळतं ह्यावर माझी अतोनात श्रद्धा आहे.
’D'ला खर्ज सुट होईल असं मला मनोमन वाटत होतं पण त्याचा आवाज बॉयिश असला तरी माझं काही म्हणणं नव्हतं (काय म्हणणं असणार? मूर्ख कुठली!)
तर असं.
अशी अर्थपूर्ण-निरर्थक विचारांची भेंडोळी उलगडत माझा प्रवास चालतो.

रोजच्या प्रवासात आताशी विचारांचे पॅटर्नसु्द्धा ठरुनच गेलेत.
विचारांमध्ये वेळ मात्र  बरा जातो पण त्या विचारांची आकसत आकसत जरदाळूच्या टणक बी सारखं होण्याची आणि मग प्रवासभर खडखडत बसण्याची क्रियाही तेव्हढीच सेल्फ़-टॉर्चरिंग.
कुठल्या ठिकाणी बसल्यावर कुणाचे विचार किती एक्स्टेंट पर्यंत यावेत हे ही मग ठरल्यासारखं होऊन गेलंय.
दारात उभं राहिलं की मला ’थोरो’ आठवतो, दुर्गाबाई आठवतात, ’वाल्डन’ आठवतं, त्यात म्हटलेलं , "To be awake is to alive" आठवतं.
 मी ’सॉर्ट ऑफ़ अलाईव्ह’ आहे,
आणि त्याची फ़ळं एखाद्या मुक्या मारासारखे मला मुकाट्याने सहन करणारे मित्रमैत्रिणी भोगतायेत.
लांबलचक पसरलेल्या रुळांमध्ये उगाचच मग आतापर्यंत जगलेलं आणि जगून घ्यायचं राहिलेलं आयुष्य दिसत राहतं.
दारात नसलो तर मात्र हे करताना आभाळाचा एक तुकडा, निदान चिंधी तरी दिसत रहावी अशा रितीने बसायचं म्हणजे आपण कधीतरी इथून बाहेर पडणार आहोत ह्या आशेत धुगधुगी राहते. असं झालं नाहीच तर ट्रॅप झाल्यासारखं वाटतं, इथून कधीच सुटका नाही आपली असं येडटाक डिप्रेशन येतं

शरीरात वाढत असलेल्या किडनीस्टोनसारखं हे रुटीन आपल्या शरीरात निरुपद्रवी वाढत राहतं, आपली मुळं पसरत राहतं, मुरतं, भिनत राहतं. कानातली गाणी, हातातली पुस्तकं आणि डायरीतल्या नोंदी दिवसेगणिक अधिकाधिक ट्रॅजिक होत जातात.

आजही सगळं नेहमीसारखंच, नेहमीच्या लयीत घडत होतं. डब्बा प्रत्येक स्टेशनावर गळत होता, रिफ़ील होत होता तेवढ्यात अंधेरी स्टेशन आलं. कितीतरी माणसं प्लॅटफ़ॉर्मवर सांडली, त्याच्या कितीतरी पटीत स्पंजने पाणी शोषावं तशी शोषली गेली आणि तेवढ्यात-
प्लॅटफ़ॉर्मवरच्या गर्दीला त्रासल्यासारखं राजहंसी रंगाचं एक फ़ुलपाखरु डब्यात शिरलं, थकलेल्या, कावलेल्या एकमेकींमध्ये खोचलेल्या बायांवरुन आपल्या विलंबीत लयीत लहरत लहरत माझ्या दिशेने आलं  आणि आपल्या पंखांची सावकाssश उघडमिट करत हॅंडलबारवर विसावलं आणि त्या बारवरच उगवून आलं असावं इतकं नैसर्गिक वाटायला लागलं.आणि असल्या जीवघेण्या गर्दीतल्या त्याच्या या स्टंटबाजीमुळे चरकलेल्या माझा आतापर्यंत रोखून धरलेला श्वास फ़ुस्सकन सुटला.
फ़ुलपाखरांमधलं नर-मादी काही नाही ओळखता येत मला पण मी त्याला बघितल्या बघितल्या त्याचं नाव ठरवलं-बबष्का.
रशियन मध्ये बबष्का म्हणजे लिटील सोल-चिमणा जीव
सावलीचं लोढणं नाही म्हणूनच तर फ़ुलपाखरांना हे असं तरंगता येत असावं का? असावं. कारण आयुष्यभर  माणसांना जमिनीशी जखडून ठेवणारया कोण? तर या आकार उकार बदलून पाळतीवर असणारया, सतत पायात घोटाळणारया सावल्याच.
मी त्याला म्हटलं,
"अरे बबष्का, तुझ्या पलीकडच्या त्या ’D'ला कुणाला तरी हाक मारायला सांग ना, त्याचा आवाज ऐकायचाय"
बबष्काने आपले डोळ्याच्याही पुढे येणारे लंबुळके ऍंटेने मजेदार हलवले आणि म्हटले,
"मी त्याच्या नाकावर जाऊन बसू का? तो कोकलेल कितीतरी मस्त"
मी प्रचंड टरकले, बबष्का भलतंच अग्रेसिव्ह होतं. मी घाईघाई म्हटलं
"नाही नाही, फ़क्त हाक मारायला सांग-तेव्हढं पुरेय"
त्याने त्याच्या त्या ऍंटेना वरखाली केल्या, त्याचा अर्थ मी ’हो’ किंवा’ बघतो’ असा घेतला.
मला त्या लोभस फ़ुलपाखराशी वरीलप्रमाणे संवाद व्हावासा वाटला, माझ्या मनात तो प्रसंग घडलाही पण-फ़ुलपाखराला तर बोलता येत नाही. बबष्काला येतं-पण फ़क्त माझ्या मनात.
नाही तर नाही ,उलट त्यामुळे त्याच्याजवळ बोललेलं माझं हे सीक्रेट सुरक्षित राहील कारण त्याला ते कोणाला बोलून दाखवता येणारच नाही. मला खजिल होऊनही बरं वाटलं.
अचानक गाडीला जोरात गचका बसला आणि सगळ्या बायांचे हात एकत्रितपणे बारवर गेले आणि बबष्का उडून
’D'च्या डब्ब्यात गेलं. तिकडे ते गेलं काय, त्याच्या सीट वर वसून पंख हलवत नखरे केले काय-अचानक तो उठला आणि बार्सपाशी आला. बबष्का त्याच्याही मनात बोललं की काय?? बोंबला!

मला वाटलं आता तो बोलणार. आठवड्या-आठवड्यांपासून मनात रंगवलेला प्रसंग प्रत्यक्षात घडेल याची मला अचानक खूप भीती वाटली.
मग मघापासून जे झुंपा लाहिरीचं पुस्तक वाचायचं फ़क्त नाटक करत त्याला न्याहाळत बसले होते त्या पुस्तकाकडे त्याने तर्जनी  रोखली, मग वाचतोय असा अभिनय केला आणि मग अंगठा आणि तर्जनी जुळवून छानची खूण केली.
ऍ?
आम्हा दोघांमध्ये फ़क्त बार्स असताना हा असा डंबशेराड्स का खेळतोय?
आणि मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली-
तो खाणाखुणा करत होता कारण  तो मूक होता.
हैला! आता काय? मला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं.
तो त्याच्या त्या अबोलीतून मला काही सांगू पाहत होता, संवादासाठी जागा तयार करत होता आणि मी "मी जे बोलते ते माझ्या मेंदूत पहिले वाजतं आणि मला नंतर अर्थबोध होतो, याचं नेमकं कसं असेल?" असं काहीतरी हुशार, चतुर वाटत चिंता करत बसले होते.
मग मी माझ्याकडल्या वहीवर मोठ्याला अक्षरात ’येस! आय नो’ लिहीलं आणि याच पद्धतीने पुढचा बराच वेळ आम्ही झुंपाच्या अवतीभोवतीचं बोलत(?) राहिलो.(सात-आठ वाक्यं-चार त्याची, चार माझी)
मी माझ्याशी विचार करतानासुद्धा मनातल्या मनात बोलत असते, हा मनातल्या मनात तरी बोलू शकत असेल का? हा त्यानंतरचा अपरिहार्य विचार.
पुढे त्याचं स्टेशन आलं-तो उतरला
त्याच्यापुढे माझं स्टेशन-मी ही उतरणार. खिडकीच्या गजांचा पारोसा वास आणि दिवसाच्या शेवटी तोंडात जमा झालेली कडू तुरट चव घोळवत..नेहमीसारखीच.

दिवस काल-परवा-तेरवासारखाच.
पण बबष्का आणि ’D'च्या अबोलीतल्या बोलीमुळे वेगळा वाटायला लागलेला.
एकाच रंगाच्या दोन फ़टकारयांमध्ये, वेगवेगळ्या रितीने जोर देऊन बोललेला एकच शब्द- यात जाणवेल न जाणवेल असा फ़रक असतो.
हे मे बी तसलंच काहीतरी असावं.
नॉट बॅड ! हं?
"अशाच काही एखाद्यासाठी
निमूट सोसावे सारे
सहज लाभे एखादे फ़ूल
तेवढे वासाला पुरे!"  टाईप?

14 comments:

Meghana Bhuskute said...

खल्लास. फार चांगल्या अर्थानं सराईतपणे सुटलेत शब्द या पोस्टमधे. आपल्याच नादात. आत्ममग्न आणि सुसाट.
आय मिस लोकल्स...

Unique Poet ! said...

तुझी उंची वाचली आणि लगेच डोक्यात गणितं सुरू झाली... एक फूट = १२ इंच म्हणजे २७९/१२ =२३.२५ सेमी म्हणजे जवळ जवळ २३ फूट आणि ३ इंच.... हं.. कदाचित लिहीताना गडबड झाली.... २७९ सेमी लिहायचे असेल असे म्हंटले तरी ९ फूट १५ सेमी होते.....आणि + आधी पाच फूट लिहीलेत ...थोडक्यात बरीच उंच आहेस की तू....! :)

आपल्या मनात चाललेले विचार म्हणजे आपण असू तर दुसरयाच्या मनात आपल्याविषयी येणारे विचार म्हणजे सुद्धा आपणच का?>>>>> + १

पोरगं चेकाळून विंडो सीटवर हक्क सांगायला लागलं तर काय घ्या!>>>> या बाबतीत अगदी सहमत !

व्यक्तीचं नाव सर्वात पहिल्यांदा आपल्या मनात त्याचा आवाज उमटवतं आणि त्यामुळेच त्याच्याशी दुसरं कुठलं नातं जुळो न जुळो-आवाजाचं नक्कीच जुळतं ह्यावर माझी अतोनात श्रद्धा आहे
>>> हे करेक्ट आहे !

D" अबोल निघेल असे.... नव्हते वाटले....!
आमच्या कडे येणारा एक जण एकदम डोळ्यासमोर उमटला.... त्याच्या त्या खाणाखूणांसकट........


बबष्का.... भारी.... रशियन भाषेशी आपला काही संबंध नाही तसा पण त्या भाषेतील शब्द ... खूप सही आहेत.

छान लिहीलेस....आवडले !

Shraddha Bhowad said...

मेघना,
शुअर यू डू.
२००२ नंतर मी आत्ता कुठे नियमीत peak hours मध्ये लोकल्सचा प्रवास करतेय तेव्हा मला साक्षात्कार होतोय की आय मिस्ड लोकल्स टू.

Shraddha Bhowad said...

समीर,
D" अबोल निघेल असे.... नव्हते वाटले....!
बास्स, वाचकाला असं वाटणं एव्हढंच हवं होतं मला.
बबष्का शब्द ऐकला असशील-बबुच्का वगैरे करुन-आठवत नसेल तुला. छोट्या मुलींना सर्रास म्हणतात आपल्याकडे.
प्रतिसादावरुन कळतंय तू किती ’मायबोली सीझन्ड’ झालायेस ते!

Abhijit Bathe said...

छान.

Samved said...

सुंदर नैसर्गिक फ्लो आलाय पोस्टला. It's a gift. एकूण तुला "काही तरी वाटून घेण्याची" सवय आहे तर!!

Shraddha Bhowad said...

अभिजित, थॅंक्स!

संवेद,
हो, मला बहुतेक वेळा बरंच काही वाटत असते, मी वाटून घेत असते, बरंच काही असं घडतं की ते मला उगीचच्या उगीच वाटायला लावणारं असतं इत्यादी इत्यादी.
वेळ बरा जातो त्यामध्ये. नंतर रिऍलिटी दाण्णकन येऊन आदळली तरी कंप्यारिटव्हली कमी त्रास होतो असा माझा अनुभव आहे.

तृप्ती said...

khUp surekh posT. meghanAlA 100% anumodan. paravA vAchale hote. aj punhA vAchale. masta !!!

Shraddha Bhowad said...

थॅंक्स तृप्ती! :)

do said...

कित्ती दिवसांनी वाचला तुझा ब्लॉग मी.. खूपच मिसलेलं दिसतंय. ट्रेनमध्ये हे येवढे भारी भारी विचार येणं हे अफलातून आहे. येता जाता ( क्वचित) बसायला मिळतंय :) ये लम्हा फिलहाल जी ले ने दो असं म्हणत आमचा प्रवास असतो सध्या. पण विचार दुसरेच कायम भरकटलेले! अन् हातात पुस्तकं.

_/\_

Anonymous said...

chhaan, babushkabaddal vachalyavar "You've got mail" madhle subwaymadhun pravas karun hat vikat ghyayla janare fulpakharu athavale.

Shraddha Bhowad said...

@अर्चना,
हो, अगं आठवायलाच हवं. मलाही आठवलेलं. फ़क्त ते ब्लूमिंगडेल्स मध्ये जातं आणि माझंवालं विरार लोकल मधून काय माहिती कुठे ते?

Nil Arte said...

तगडूस !!!

Nil Arte said...
This comment has been removed by the author.
 
Designed by Lena