लॉर्का.

होला! कोमो एस्ता?

कोणतीही नवी गोष्ट शिकताना त्या गोष्टीचं वेड असणं आवश्यक असतं.
स्पॅनिश भाषा आणि स्पॅनिश कवितांबद्दलचं माझं वेड खूप मागे ट्रेस करत गेलं तर ते गौरीच्या अणूपाशी येऊन थांबतं. शोध शोध शोधला तरी अणूचा बोर्हेज काही मला मिळेना पण बोर्हेजला शोधताना मला सापडला लॉर्का.

फ़ेडरिको गार्सिया लॉर्का.
कोणत्याही कलंदर कलाकाराची असते तशी वादळी लाईफ़स्टाईल.प्रसिद्ध चित्रकार साल्वाडोर दालीचा बॉयफ़्रेंड म्हणून ओळखल्या जाणारया लॉर्काला त्याचा स्वत:चा आवाज सापडायला वेळ लागला. प्रामुख्याने विरह, तुटलेपण, लैंगिक जाणिवा, समलिंगी संबंधांवर आपल्या कविता- नाटकांमधून भाष्य करणारया लॉर्काच्या लिखाणाला जिवंतपणी मिळाली नाही तितकी ओळख त्याच्या मृत्यूनंतर मिळाली. स्पॅनिश सिव्हील वॉर मधल्या त्याच्या हत्येनंतर लॉर्काच्या कविता झोतात आल्या.


"..माझ्या माथ्यावर चंद्राचं अमरत्व आहे,
मी झोपू इच्छितो एक क्षणभर,
एखादा तास, एक रात्र किंवा एक आठवडा, एखाद वर्ष
किंवा कदाचित एक शतकभर..
मी खूप थकून गेलोय.."

असं म्हणणारा लॉर्का कवितांमध्ये हळवा हळवा होऊन जातो. स्पेनमध्ये अराजक माजलेलं असताना त्याने लिहीलेली The Fable and Round of the Three Friends मधली ही कविता लॉर्काला खूप ठळकपणे आपल्यासमोर उभा करते.
--



तुमच्यात
एखाद्या कवीला
ठार करायची
काय पद्धत आहे?

झण्णकन छाताडातच गोळी घालता का?
ज्यातल्या
दडपलेल्या इच्छा आणि न संपणारया भयाने त्याला बंदीवान करुन ठेवलंय
तुम्ही नियम, कायदे आणि फ़ाकडू सैन्याने त्याला करु पाहाताय
त्याहून अंमळ जास्तच वेळ.

का मग थेट डोक्यातच गोळी घालता
जिथे
कधीकाळी मुक्तपणे गुणगुणलेल्या गीतांची भुते,
"आमच्याकडे बघा हो कोणीतरी!" घुसमटत आक्रोशणारया, व्यक्त व्हायला धडपडणारया जाणीवांचा
बुजबुजाट आहे नुसता

कसं? अशीच पद्धत आहे नं?

" आता हे लिहीता लिहीता कळलंय मी कधीचाच ठार झालोय
ते मात्र मला शोधत राहिले मी जिवंत असताना असलो असतो अशा ठिकाणी
कॅफ़े, चर्च, स्मशानांमध्ये...
..पण त्यांना काही मी सापडलो नाही.
कमालेय, त्यांना मी कधीच सापडलो नाही?
हं! खरंय,
त्यांना मी कधीच सापडलो नाही"

-लॉर्का

--
बोर्हेज नाही तर नाही पण लॉर्का ओळखीचा झाला. पुढचे काही दिवस छान जाणार!
आदिओस!

8 comments:

Samved said...

mastch...

arti said...

kavita mastch aahe

Shraddha Bhowad said...

संवेद, आरती,

तुम्ही लोकं वाचताय, तुमच्यापर्यंत कविता पोहोचतेय-बस्स, आणखी काय हवंय? सगळा खेळ त्यासाठीच मांडलाय.

Nivedita Barve said...

Beautiful poetry! Thanks for writing about Lorca :)

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

निवेदिता,

थॅंक्स!
तुला इतक्या वर्षांनी ब्लॉगवर पाहून मला बेबलॉश्कीसारखी शेपटी फ़लकारुन मियॉव करण्याचा मोह होतोय.
लवकरच बोर्हेज आणि नेरुदा पण आणेन ब्लॉगवर. वाचत राहा वेळ मिळेल तशी. तुझ्यासारख्या ब्लॉगरकडून कमेंट मिळाली की पुढे लिहीत राहायचा उत्साह अंमळ जास्तच वाढतो.

Unknown said...

कमालेय, त्यांना मी कधीच सापडलो नाही?
कमालीचं सुंदर!!

Unknown said...

कमालेय, त्यांना मी कधीच सापडलो नाही?
कमालीचं सुंदर!!

 
Designed by Lena