एर्बसचं देणं.

पहिल्यांदा, सर्वत्र अंधारच अंधार होता.
हळूहळू वस्तू आपापले आकार धारण करायला लागल्या. काळोखाचा बुरखा हळु हळू उठायला लागला.
अशोकला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं ती अजून परतली नव्हती. तो सुस्कारला.
टळतही नाही मेली कायमची!
जेव्हा पहावं तेव्हा आपली मागे मागे मागे मागे
त्याने अंग झडझडवून आळस दिला आणि ओली सकाळ नाकात भरुन घेतली.
सकाळची दूधवाले, कामकाजवाले यांची वर्दळ सुरु होण्यापूर्वीची नेहमीची शांतता आहे.
त्याने आजूबाजूला नजर टाकली. बाहेरची झाडं फ़ुलं फ़ुलवण्यात, त्यापलीकडची त्याहून जास्त फ़ुलं फ़ुलवण्यात मग्न होती.
हिरवं रहावं का पिवळं याबद्दल गवताचा निर्णय होत नसावा बहुतेक. द्विधेत होतं बिचारं कधीपासून.
काल सूर्य आणायला गेलेली पाखरं त्याला घेऊन परतली होती.

तिच्या येण्याची चाहूल लागली तसा अशोक सावध झाला. आक्रसला.
आली.
आली.
आssली.
ती आली तशी त्याच्या मनात घृणेचा फ़ुत्कार उमटला.
कोणी किती बेढब असावं? काय तो रंग-हिणकस काळाकुट्ट, त्यात सगळ्या रेषा, काना, मात्रा लपून जातायेत. उरतोय तो फ़क्त एक गर्द रंग, नकोनकोसा.
त्याच्या मनात चाललेल्या या विचारांबद्दल अगदीच अनभिज्ञ असल्याप्रमाणे ती सावकाश आली आणि त्याच्या पायापाशी विसावली.

अशोकला काहीतरी जुनं दुखणं होतं. आठवणीत जेव्हढं मागे जाता येईल तिथपासून त्याचे सारे व्यवहार उभ्यानेच होत. पाठीचा कणा वाकवून बसणं मुळी त्याला जमतच नसे. इतरांइतकी आकलनशक्ती त्याला नव्हती. त्याच्या सुख-दु:खाच्या कल्पना अगदीच सरधोपट होत्या. इकडे तिकडे जाणंही नव्हतं. एकाच ठिकाणी असं आयुष्य काढलं म्हणजे लवकर म्हातारं व्हायला होतं. त्याचं वयही त्याला अंदाजानेच सांगता आलं असतं. आणि ह्या सर्व आठव्णी जितक्या जुन्या तितकाच जुना हिचा पाठलाग आहे.
हे देखील तितकंच सनातन दुखणं.
ही आपल्याला नेमकी केव्हा येऊन चिकटली? आपल्याला काहीच कसं आठवू नये?

त्या दोघांत एका शब्दाचंही संभाषण होत नसे. तिचा वावर हेच तिचं असणं. ते असणंही मोठं विचित्र! हात लांब करुन पोहोचावं तर तिला स्पर्श करता येउ नये पण आणखी थोडा प्रयत्न केला तर पोहोचता येइल एवढ्या परिघातलं तिचं रेंगाळणं. तिचा दरारा, दहशत! त्या दोघांमध्ये माजून राहिलेली बर्फ़ाळ शांतता.

वर्षानुवर्षे, दशकानुदशके चाललेला हा क्रम होता. तिच्या सोबतीला हा, ह्याच्या सोबतीला ती. रात्री कुणीकडे तरी जायची-तेव्हाही कुणाच्या तरी मागावरच असावी टवळी, अशोकला वाटे.
पण सकाळी फ़िरुन आहेच इथे. आपल्या भोवतीभोवती.

तिच्या आत आणखीनही कितीतरी ’ती’ आहेत आणि दिवसेगणिक त्या ’तीं’ मध्ये भर पडत चाल्लिये असं त्याला चमत्कारीकरित्या वाटायचं.

कधी कधी अशोकला वाटायचं आपल्याला ती समजत नाही फ़ारशी. पण न समजताही समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे का? तिलाही आपण समजायला नको का? का नकोच?

तिची सवयही होऊन गेली असती त्याला पण एके दिवशी ते घडलं-
त्या दिवशी एक गर्द निळं फ़ुलपाखरु कुठूनतरी तरंगत आलं. मोठं राजस, गोजिरवाणं. पंखांची हळूवाssर उघडमिट करत तिच्यावर विसावलं.
तर तिच्या काळ्याठिक्कर काळ्यात ते ही काळंच दिसायला लागलं. जणू काही त्याला तिचं काळं लागलं होतं.
त्याला ते काहीतरी प्रचंड अभद्र वाटलं.
हिच्याआत, हिच्यामध्ये काही निकोप वाढूच शकणार नाही, हिच्या भोवतालीही काही निकोप असूच शकणार नाही-त्याला वाटलं.
एकाएकी तो असहाय्य , निस्त्राण झाला.
त्याला दु:ख सापडलं होतं. खूप खूप मोठं दु:ख.
आपण जन्मभर लोढण्यासारखं काहीतरी गुमान, मुकाट्याने वागवत आलो. ते का वागवलं याचं कारण सांगता येऊ नये, नव्हे तर  ते दूरही सारता येऊ नये, चमत्का्रीक हताशता यावी याचं दु:ख!

तेव्हापासून तो हिच्यापासून पिच्छा सोडवण्याच्या मागे होता.
पण आपण ज्याचा ध्यास घेतो ते सहज थोडीच मिळतं? जबर किंमती मोजायला लागतातच त्यासाठी.

विचार करता करता अचानक एके दिवशी अशोकला त्याचं उत्तर मिळालंच.
हे आपल्याला आधी का सुचू नये असं त्याला वाटलं नाही मात्र.  कारण त्याला ते कधीपासूनच माहित होतं फ़क्त ते स्वीकारण्याची तयारी नव्हती. निर्णय होत नसल्याने त्या असलेल्या उत्तराला नवनव्या प्रश्नांनी भागून बघणं चाललं होतं.

दिवसामागून दिवस जात राहिले.
ती येत राहिली, जात राहिली, अशोकभोवती आपला कोष विणत राहिली, तो आणखीनच गुरफ़टत राहिला.
फ़ारसं काही म्हणणं नव्हतं त्याचं- तिचं असणं हीच आपल्यालेखी आपली ओळख ठरु नये असं त्याला वाटे इतपतच.
आपल्याला जे नेमकं ठाऊक असतं त्याचीच भीती जास्त वाटते..नाही?
आणि..
एका वादळी रात्री अशोकचा झोक गेला आणि तो दाण्णकन आपटला.
ब्लॅक आउट.
.
.
अखेर तिचा पिच्छा सुटलाच.

--

पक्ष्यांच्या वेड्या कालव्याने सोसायटीमधल्या सगळ्यांना जाग आली तेव्हा आडवा पडलेला अशोक सगळ्यांना दिसला.

--

एखाद्याला एखाद्या क्षणी मरावंसं का वाटतं हे कधी दुसरयाला कळत असतं का? त्याचं त्यालाही कळत नसावं नंतर. म्हणूनच आपला ध्यास आपल्यापाशीच असू द्यावा असं म्हणतात..

"ते बघा सावलीशिवायचं झाड!" असं म्हणवून घ्यायचा अशोकचा ध्यास शेवटी पुरा झाला नाही तो नाहीच.

21 comments:

Saru said...

भन्नाट!
Twist in the tail हा खरंच Twist in the tale सारखा वाटला. मतितार्थाला जागलाही.
पण शीर्षक काही कळलं नाही. एर्बसचं देणं म्हणजे?

Shraddha Bhowad said...

सारिका,
थॅंक्स!
एर्बस हा ग्रीक पुराणांमधला अंधार आणि सावल्यांचा देव आहे. Rest is self-explained.

तृप्ती said...

he faar bhaaree lihilas.

malaa 'surya aaNaayalaa gelelee paakhara' faar aavaDalee.

mastach.

Shraddha Bhowad said...

तृप्ती,
लिहीताना मला फ़ारच ट्विस्टेड वाटलं होतं. पीळ घातलेल्या दोरखंडासारखं. पण तुला भारी वाटलं हे वाचून मला म्यॅडसारखा आनंद झालाय. :) लिहीणं कसंही असलं तरी मला लंपूसारखाच आनंद होतो मस्त-मस्त कमेंट्स वाचून.

Parag said...

Ekdum Mast.....awesome!!!
Title pan awadla.....

Sandeep said...

मस्तच कथा. मला ’तळहाताएवढ्या गोष्टी’ ही कल्पना फ़ार भन्नाट वाटली.
तुझा ब्लॉग वाचताना मला नेहमीच काहीतरी नवीन कळल्यासारखं वाटतं. आता हा कोण एर्बस, त्यातला एर्र सुद्धा माहित नव्हता. :) ठिकाय, यापुढे लक्षात राहिल. तुझ्या लिखाणातले संदर्भ नाही कळले तर विचारतोच तुला.
बाय द वे, तुला ब्रांकुशी ऐकून ठाऊक आहे का? मला उगाचच होप वाटतेय तुला माहित असेल अशी.
असंच सुंदर लिहीत रहा.

Shraddha Bhowad said...

पराग,
थॅंक्स!
तुला टायटल १००% कळलं असणार वाचल्याक्षणी. हा माझा आपला अंदाज. तुझ्या अकिलीज आणि अडीस्यूसवरुन वाटलं.
तू कमेंटवरची कमेंट वाचतोस की नाही याची कल्पना नाही पण वाचत असशील तर मुराकामीचं ’काफ़्का ऑन द शोअर’ मिळवून वाच. वाचलं असशील तर मी ते इथे रेफ़र का करतेय हे समजलं असेलच.
त्यात मुराकामीने जे केलंय ते रोलिंगबाईंना करता आलं असतं तर व्होल्डेमॉर्ट, हॉर्क्रक्सेस आणि डेथली हॅलोजना आणखी एक वेगळीच मिती मिळाली असती असं माझं वैयक्तिक मत.
वाचून सांग.

Shraddha Bhowad said...

संदीप,
थॅंक्स!
आणि खरं सांगायचं झालं तर मलासुद्धा माझ्या कल्पना भारी वाटतात कधीकधी. :)
ऑफ़कोर्स ब्रांकुशीबद्दल ऐकलंय. ब्रांकुशी आणि त्याचा तो ’बर्ड इन फ़्लाईट’. पण अर्थातच त्याच्या शिल्पामुळे मला तो माहित नव्हता आधी. आपल्या सदानंद रेगेंमुळे माहित झाला. त्यांचा ’ब्रांकुशीचा पक्षी’ नावाचा एक महान कवितासंग्रह आहे, त्यात ही कविता आहे

आपल्या कानाचे
पडदे ओरबाडीत
तो गेला एक थोट्याकडे
नि म्हणाला: आता बस
त्या पियानोवर.
पियानोच्या पोटात होता
ब्रांकुशीचा पक्षी
त्यानं सूर सूर सारे
पंखात भरले
नि घेतलं एक
सूर्यस्वी उड्डाण
त्रिमितीच्या बुरुजावरुन..

’सूर्यस्वी उड्डाण’ ही कसली भन्नाट कल्पना आहे, नाही? मी दोन्ही रेग्यांची (पुशि आणि सदानंद) जबरदस्त फ़्यॅन आहे. यांच्या कविता वाचायच्या असतील तर ’त्या’ कविता वर जा.

पण ब्रांकुशी इथे आठवायचं काय कारण?

Shraddha Bhowad said...

संदीप,
वरची ’त्या’ कविता ची लिंक सपशेल गंडलिये. ब्लॉग ऍड्रेस www.tyaa-kavitaa.blogspot.com असा आहे.

Parag said...

:) Nahi, title mala comments vachunach kalala.Greek mythology madhe khup sarya gosthi ahet...ani Erebus paryant ajun paryant me pohochalo navhto. 'kafka on the shore' nakki vachel.
BTW, Do I see a frustrated HP Fan here :) Rollingbai varcha "Deathly hollows" cha raag ajun gela nahi watata :P

Shraddha Bhowad said...

ग्रीक पुराणं खरंच खूप मोठा विषय आहे. माझ्याकडे माझ्या आजोबांची खूप जुनी एस.व्ही. सोहोनींची डिक्शनरी आहे. तिच्या मागच्या पानांवर ग्रीक हिरो-हिरॉईन्स-देवी-देवता यांच्याबद्दल माहिती होती. मला त्यात भयानक रस वाटला.मग पुढे वाचनात अपरिहार्यपणे होमर-इलियडची फ़ेज आली तेव्हा खूप काही कळत गेलं.
रोलिंगबाईंबद्दल म्हणशील तर-
:)ऊप्स! caught me there!
टेल्स ऑफ़ बीडल द बार्ड पासूनच ती पुस्तकाची छानशी घडी घालून ठेवणार आहे याचा अंदाज आला होताच. पण ठिकेय. लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये आपण आपलं पाणी घालायचा प्रयत्न करायला लागलो की चिडचिड व्हायचीच असं वाटून गप्प बसले झालं. आणि तसंही सिरीयस ब्लॅक, डॉबी, पेन्सिव्ह, हनीड्युक्स, निंबस २०००, डायगॉन ऍली, रुम ऑफ़ रिक्वायरमेंट अशा अगणित गोष्टींकरता तिला मी कधीच माफ़ केलं होतं. आपला दात नाही तिच्यावर.

Sandeep said...

इथे आठवण्याचं खास असं कारण नाही. तुझ्या कालिब आणि गिरमिट मध्ये ऍबस्ट्रॅक्ट चा उल्लेख आहे. ब्रांकुशी म्हणतो "There are idiots who define my work as abstract; yet what they call abstract is what is most realistic. What is real is not the appearance, but the idea, the essence of things."
तू लिहीलेलं वाचताना मला खूपवेळा यात तथ्य आहे असं वाटत राहतं. तू लिहीतेस त्यात किती सत्य आणि तथ्य यांवर काथ्याकूट करण्यापेक्षाही जे लिहीतेस त्याच्या गाभ्यापर्यंत जाणं सर्वात आधी वाचणारयापर्यंत पोहोचतं. तुझं लिखाण मला याकरताच आवडलं:)

Nil Arte said...

यो श्रद्धोवस्की... मस्तच! ...आणि सोहोनींची डिक्शनरी टू गुड होती ......ग्रीक गोष्टी आणि पानापाना वर इटकुली चित्र!
माझी २६ जुलै च्या पुरात विरघळून गेली...परत मिळते का बघायला पाहिजे.

Shraddha Bhowad said...

’सप ऑंब्रे? ग्रासियास!
त्या डिक्शनरीने मला आज आत्ताआत्तापर्यंत कधीही दगा दिलेला नाही. चित्रांबद्दलच सांगायचं झालं तर मला ’पी’ मधली पार्स्निप आणि पार्स्लीची चित्रं आवडायची.
अगदी आठवण आलीच तर घेऊन जा माझ्याकडून.

Nil Arte said...

होम्बरे वरून मला "ऑफस्प्रिंग" चा Ixnay on the Hombre " अल्बम आठवला :
http://en.wikipedia.org/wiki/Ixnay_on_the_Hombre

मला band ची आणि अल्बमची नावं जमवायला फार आवडतात खूप क्लेव्हर असतात:

"Death Cab for Cutie"
"Bullet for my Valentine"
"One night Band"
"Godsmack"

इ. इ.

Shraddha Bhowad said...

अल्बम्स आणि बॅंड च्या नावांबद्दल मला एव्हढी माहिती नाही पण मी ऐकलेल्यापैकी बॉब डिलन चं ’सॅड आईड ले्डी ऑफ़ द लोलॅंड्स’ हे गाणं आहे त्या अल्बम चं नाव आहे ’ब्लॉंड ऑन ब्लॉंड’. मला तरी हे तेव्हा तुझ्या भाषेत खूप क्लेव्हर वाटलं होतं. :P
आणि सिरीयसली त्याचं ’The Times They Are A-Changin' हे ही आवडलं होतं.

Unknown said...

bhannat khrach khup chan ....!

shailesh said...

छान आणि वेगळं लिखाण आहे.. थोडस गुढते कडे .. मनाच्या अस्वस्थते कडे झुकणार.. थोडी झलक .. नारायण धारपांची होती..

Shraddha Bhowad said...

@मन माझे..

थॅंक्स.

@शैलेश जोशी,

खूप आभार.
नारायण धारप हे गूढ-भय कथांमधले बाप मनुष्य होते. माझ्या लिखाणात त्यांची झलक दिसणे ही मोठी कॉंप्लिमेंट आहे. थॅंक्स!

Mandar Gadre said...

हे लिहून जिंकलंयस! :)भारी.

Shraddha Bhowad said...

गद्रेभौ, तुम्ही नेहमी कमेंट देत जा राव, फ़ॅंटा प्यायलानंतर टाळू्च्या इथे कसला सुखद शॉट बसतो तसं होतं. तुझ्या ’प्रिय’वरच्या कमेंटने गुदगुल्या झाल्या होत्या त्या अजून आठवतायेत.

 
Designed by Lena