द रेड स्टुडियो.

आठवणी म्हणजे प्रत्येक सेकंदाला पंचवीस फ़्रेम्स अशा गतीने पळणारा पिक्चर नसतो. आठवणी या कोलाजसारख्या असतात. तुकड्यांतुकड्यांनी असणारया. आपलं गतायुष्य त्यांत ब्लो बाय ब्लो दिसत राहतं.
एखादं खूप जुनं पत्र पुन्ह्यांदा वाचलं की डोक्यात उमटणारं उत्तर आपण पहिल्यांदा दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळं असतं. तसंच कुठलीही आठवण कितीही वेळा पाहिली तरी प्रत्येक वेळी वेगळीच भासणार.
आठवणी या ’इंटरप्रीटेशन्स’ असतात, रेकॉर्ड्स नाही.

विशीतल्या आठवणींची सुरुवात होते तेव्हापासून ३ गोष्टी एकत्रच आठवतात.
ती मुलगी, जयदेव आणि त्याची ती खोली.
ती मुलगी आज-आताही आहे,कॉंप्युटरसमोर समोर बसून टा‌ईपरायटर बडवते आहे, तिने माझे कपडे घातले आहेत आणी तिचं नाव ’मी’ आहे.
जयदेव हा माझ्यासारखाच माणूस आहे-जो रंग बघू शकतो, रंग ऐकू शकतो, त्यांना स्पर्शू शकतो.

डोक्यावर खूप सारे वाकडेतिकडे केस असणारया, थंडीवारं काहीही असू देत तिथं-नेहमी स्टॅड कॉलरचे शर्ट घालणारया, कपाळावर आडव्या आठ्या असणारया, कानात अत्तराचे फ़ाये ठेवणारया या ग्रे रंगाच्या माणसाबद्दल मला नेहमीच अपार कुतूहल वाटत आलेलं आहे.

जयदेवच्या या रंगबिरंगी , रंगवेड्या व्यक्तिमत्वाचे त्याचे डोळे हा ही एक खास भाग होते. एकच रंग त्याला मुळी मान्य नसावाच कारण त्याच्या डोळ्यांची बुब्बुळं सारखी नव्हती. एक होतं काळंभोर आणि दुसरं होतं-कोणीतरी जपूSSन मधाचा एकच थेंब सोडल्यासारखं. खूप मुरलेला जुना मध. त्या मधाळ गोलात एक स्निग्ध काळा ठिपका (जो हसताना मिस्कील बारीक व्हायचा)आणि त्याभोवती आपण लहानपणी सूर्याभोवती काढायचो तशा बारीक रेषा. आणि यावर कहर म्हणजे दोन्ही बुब्बुळांभोवती असलेलं करडं रिंगण.
अलेक्झांडरचे डोळे पण म्हणे असेच रंगबिरंगी होते. डिकॉरस-वेगळी बुब्बुळवाला.
मी जेव्हा त्याला पहिल्याप्रथम पाहिलं होतं तेव्हापासून पुढे खूप काळपर्यंत त्याच्या बहुरंगी डोळ्याबद्दलच्या न संपणारया आश्चर्यात बुडून गेले होते ती अगदी परवा-परवापर्यंत. एके दिवशी त्याच्या खणामध्ये उचकापाचक करताना मिळालेल्या खूप जुन्या फ़ोटोंमधल्या एका स्त्री च्या डोळ्यात माझं आश्चर्य मिटून गेलं.
त्याच्या आ‌ईचा फ़ोटो होता तो.
त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला जास्त माहीत नाही.
तो मला भेटला तेव्हाच जन्मला असावा असं मला कायम वाटत आलंय कारण त्या‌आधीचं तो कधीच काही बोलला नाही.
त्याचे बाबा एक प्रतिथयश डॉक्टर असले तरी ते देवचे बाबा हे पचवणं मला खूप काळपर्यंत अवघड गेलं होतं. माणूस एकदम सज्जन पण एकसुरी आयुष्य असलेला, प्रोसीजर, रुल्स वर भक्ती असलेला-अगदी देवला जशा माणसाचा लगेच कंटाळा येत असे तसा,
बीजगणितातल्या शेवटी उत्तर येणार आहे हे माहित असलेल्या एखाद्या लांबलचक कंटाळवाण्या गणितासारखा..

त्याच्या त्या खोलीत जायचा योग लवकरच आला. ती खोलीही तशीच होती-जयदेवसारखी.
टवटवीत लाल  रंगाच्या भिंती असलेल्या अर्धवर्तुळाकार खोलीत समोरच्या (एकमेव) सपाट भिंतीला टेकून असलेलं शिसवी टेबल- त्या टेवलावर काचेच्या गोल बरणीत आपल्या पोटात रंगबिरगी जग वागवणारया चार-पाचशे गोट्या होत्या. त्यातली एकही दुसरीसारखी नव्हती हे नंतर त्यानेच मला सांगितलेलं. आणि मागच्या भिंतीवर बरोबर मध्ये घोस्टमधल्या डेमी मूरचं भलंमोठं ब्लॅक ऍंड व्हा‌ईट पोस्टर होतं, बाकी सगळी भिंत मोकळी होती. काळीभोर किनार असलेला पुरुषभर उंचीचा आरसा भिंतीच्या कडेला आरामात टेकून उभा होता. बाकी सारया खोलीत अपेक्षेप्रमाणेच शेकडो गोष्टी गळ्यात गळे घालून होत्या. अर्धवट चितारलेली पानं इथे तिथे पडली होती. लाकडाच्या अगदीच तकलादू (त्यानेच बनवलेल्या) रॅकमधून पुस्तकं खच्चून भरली होती त्यामुळे ते मरणासन्न स्थितीत होतं, उजव्या कोपरयात स्टिरीयो होता. एक तुटकं खोड कुठूनतरी आणून टाकलं होतं बसायला म्हणून, आता ते खोलीतच उगवलं असावं इतकं नैसर्गिक वाटत होतं, सगळीकडे रंगांची गिजबिज होती. एकंदर सगळाच अवर्णनीय देखावा होता आणि ह्या सगळ्या उखीर वाखीर पसारयात खोलीच्या बरोबर मधभागी एका लाकडी ईझलवर लटकलेला कॅन्व्हास होता, पांढरयाशुभ्र कॅन्व्हासच्या कानावर हाताला लागेल इतका गडद लाल रंग असलेले कार्नेशनचे फ़ूल होतं.
स्टिरीयोवर कुठलंतरी गाणं धमाधम वाजत होतं, केहरव्याच्या ठेक्यावर ढोल दुमदुमत होता.
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

त्याच्या त्या खोलीला इतर खोल्यांसारख्या या कोपरयात एक तर दुसरी दुसरया कोपरयात-अशा सिमीट्रीकल दोनच खिडक्या नव्हत्या. बुटक्या खोलीच्या त्या भिंतींना वरच्या डाव्या-उजव्या कोपरयात दोन छोटे कोनाडे होते-बायोस्कोपसारखे.
कापूस पिंजून ठेवून द्यावा तसा एकच लंबुळका ढग नेहमी आकाशात ठेवून दिल्यासारखा असायचा तो डाव्या खिडकीतून दिसायचा. तर उजव्या खिडकीतून त्या खोलीच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या रेन-ट्रीचे झुबकेदार गुलाबी गेंद दिसायचे.  ते झाडंही मोठं उतल्यामातल्यासारखंच फ़ुलं फ़ुलवायचं. आज जास्त तर उद्या त्याहून जास्त. त्या रेन ट्री मधून सकाळचा प्रकाश खोलीत झिरपत असायचा. तो प्रकाश, त्या प्रकाशात खोलीतल्या प्रत्येक वस्तुला प्राप्त झालेली वेगळीच मिती, त्या सेपिया वातावरणात त्याची चित्रं वाकवाकून गोळा करत असलेले मी, त्या अधमुरया प्रकाशात उजळलेली कृष्ण्धवल डेमी हे सगळं डोक्यात जसंच्या तसं फ़्रीझ हो‌ऊन बसलेले आहे. आजही ते गाणं आणि त्या ओळी ऐकल्या की मी जयदेवच्या त्या अजब खोलीत जा‌ऊन पोहोचते.

त्याच्या खोलीला एक अतिविशिष्ठ वास होता. खोलीत शिरलं रे शिरलं की भक्ककन नाकपुड्यांमध्ये घु्सायचा.हं! सूssक्ष्म जाणवणारा घामाचा कडवट दर्प, उजवीकडून -वरच्या खिडकीकडून- रेन-ट्रीच्या नखरेल फ़ुलांचा मिरमिरवणारा वास, पुस्तकांचा वास,  त्यात मिसळलेला त्याच्या एकशे एकूणतीस अत्तरांचा वास, कॅन्व्हासवरुन येणारा त्याच्या रंगांचा नशा आणणारा गंध, मूडमध्ये असेल तर आणलेल्या वा‌ईन आणि पिझ्झाचा वास, रेड पाप्रिकाचा ठसकवणारा वास, हम्म, आणखी आणखी...तो-मी जिथून कुठून आलो होतो-तिथून आपल्याबरोबर आणलेला सोनसळी उन्हाचा!

त्याच्या कॅन्व्हासवर सेट केलेला एक आर्क लॅंप ओळंबून "बघू तरी काय चाललंय ते!" करत देवची चित्रं बघतोय असं मला नेहमी वाटायचं. पूर्ण खोलीभर तुकड्यातुकड्यांच्या मोझेक टाईल्स होत्या. छपराला टांगलेल्या कितीतरी बबल लॅंप्सच्या प्रकाशात रात्री त्या चमचम करत असायच्या. मी कधीतरी सहज चाळा म्हणून ते लॅंप्स मोजूयात म्हटलं तर तब्बल वीस भरले.
त्यानंतच्या एका वर्षी त्या खोलीत माझी म्हणून खास अशी एक डोलणारी खुर्ची आली.
त्याची चित्रं उमटत असताना समोरच्या डोलणारया खुर्चीवर गबदूलपणे बसून तो सांगतो ते ऐकत राहणं हा माझ्या आवडीचा भाग होता.

"रंग हे व्हिज्यु‌अल परसेप्शन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं. कठीण करुनच सांगायचं झालं तर दृश्य प्रकाश तुमच्या डोळ्यापर्यंत किती आणि कसा पोहोचतो यावर तुम्हाला रंग कसा दिसतो हे अवलंबून. रंग केवळ ते तसे असतात म्हणून नसतात, तर  आपण ते तसे पाहतो म्हणून असतात. रंगाधळ्याला आपण पाहतो तो रंग आपल्याला दिसतोय तसाच दिसेल असं नाही. कळतंय का काही?"

यावर मी फ़क्त बाहुलीसारखी डिंगडॉंग मान हलवली होती.
त्याच्या त्या अर्धवर्तुळाकार खोलीत बसून त्याने मला किती किती काय काय समजावून सांगीतलेलं आहे,

"तुला सांगू का? मला रंग आहेत तसे कधीच आठवत नाहीत. मला मातिसचे रंग वस्तू म्हणून आठवतात, व्हिन्सेंट्चे रंग वातावरण निर्मितीसाठी ,आठव -आर्ल्स, सेझॉ दृश्यातून साकार होतो तर दलाल, मुळगावकरांचे रंग व्यक्ती म्हणून आठवतात"

"कोणत्याही गोष्टीशी रंगाचं, स्पर्शाच,वासाचं नातं जोडता येतं. जिला आपलीशी करायची आहे तिच्या अंतरंगात जायचा प्रयत्न कर, तिचा गंध , टेक्स्चर अनुभव, तिच्या रंगाचा डोळ्यांना सराव हो‌ऊ देत. कशी होणार नाही ती आपलीशी?"

त्यानंतरच्या एका वर्षी सगळ्या भिंती आम्ही हाताच्या रंगबिरंगी ठशांनी रंगवून काढल्या-डेमीची भिंत सोडून अर्थात.
ती भिंत शेवट्पर्यंत तशीच कुंवार राहिली आहे.
त्यानंतरची कितीतरी वर्षं मी तिथे जात होते, इथे तिथे पडलेली चित्रं मी उचलून ठेवत होते, त्यावर तारखा टाकत होते- त्याने काढलेल्याच्या नव्हे तर मला सापडलेल्याच्या.
छान जाडजूड फ़ा‌ईल तयार झाली होती त्याची.
कितीतरी वर्षं..
कशी चुटकीसारखी निघून गेलीत...या गोष्टीला.
त्याने हात पसरुन दिमाखदार स्वॉन डाईव्ह घेतली होती- आठव्या मजल्यावरुन, त्यालाही.
आकाशातून तारा असाच निखळतो म्हणतात. मी तोवेळपर्यंत पाहिला नव्हता, अजून पाहण्याची हिंमत झाली नाही.

एरव्ही कोणी कोणाला आयुष्यभर पुरणार नसतंच पण त्या त्या व्यक्तीचं जाणंही मनात कुठेतरी आतात मान्य असतं.-केलं जातं.
हे असलं जाणं कोणी कसं आणि का मान्य करायचं?

ती स्वप्नं असतात माहितेय का ज्यात आपल्याला काहीच बोलता येत नसतं. एका पातळ मेम्ब्रेनपलीकडून पलीकडच्या जगात काय घडतंय हे नुसतंच हताशपणे पहात बसण्यापलीकडे आपल्याला त्या स्वप्नांमध्ये स्कोप नसतो. त्या स्वप्नांमध्ये देवचं मरण मी किमान शंभरवेळा पाहिलं होतं, पुन्हा-पुन्हा.
इक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी
जाते जाते तुमने आवाज तो दी होगी
हर वक्त यहींहै गम, उस वक्त कहा थे हम
कहा तुम चले गये
सारखं गाणं मला अधिक पॅरानॉईक बनवत गेलं. टॉर्चर करण्यासाठी सुया आणि थंबस्क्रू यांची गरज नसतेच हे मला पटवत राहिलं.

पण आता तसं नाही.

आता देवची आठवण झाली की डोक्यात मागे कुठेतरी झिणझिण्या येतात खूप . आता त्याचा चेहरा आठवायचा म्हटला तरी अंधुकच आठवतोय. कॅन्व्हासवरुन दिसणारे डोळेच आठवतात फ़क्त-अगदी कालच पाहिल्यासारखे. कारण बरयाच वेळा मी त्याला तसंच पाहिलंय-कॅन्व्हासच्या पलीकडे. आता या डोळ्यांवरुन ठिपके ठिपके जोडून लहानपणी चंपक मध्ये आपण ते ससे, हरणं पूर्ण करायचो , तसं ठिपके जोडून त्याचं चित्र पूर्ण करता ये‌ईलही मला. पण मग हे सारं इतकं धूसर असताना तब्बल सहा वर्षांनंतर ती खोली बारीकसारीक तपशिलासकट आठवायचं कारण काय?

लोकं मरतात मग त्यांच्या इतक्याशा लहानसहान, रहस्यमय विचित्र गोष्टी आपल्या आठवणींचा भाग कसा बनतात?
त्यांच्या तशाच आठवणी मागे का राहतात?
का ते तशाच आठवणी सोडून जातात?

मला कधीच काही ’म्हणायच’ नसतं, तरी मी बडबड करते, ती का? माझ्या आयुष्यातले ’व्हॉ‌ईड्स’ भरुन काढण्याकरता?
आपण आपल्याच आयुष्याच्या निखळलेल्या कपच्या/तुकडे एकत्र सांधण्याकरता लिहीतो का?
या प्रश्नांचं उत्तर मला मिळतंच असं नाही. मिळतंय असं वाटलं तरी मी ते पुन्हापुन्हा विसरुन जाते कारण या प्रश्नांचं मला हवं असलेलं उत्तर दर दिवशी बदलत जातं.

हे आपल्या आठवणींसारखंच. नाही का?

21 comments:

Sandeep said...

अजून एकदा अजून एकदा करत माहित नाही कितव्यांदा वाचतोय ते.

Nil Arte said...
This comment has been removed by the author.
Nil Arte said...

यो श्रद्ध्स,
आवडलंच!

मला पण असं स्टुडीओ अपार्टमेंट खूप खूप वर्षांपासून हवंय,
अनंत सामंतांच्या गोष्टींत पण असतं बरेचदा!

त्यात हव्यात २ रोमन रिंग्स आणि...
एक पुल-अप्स चा बार ज्यात गुढगे अडकवून लटकता येईल वाघळासारखं.

आणि एक सतरंजीचा कपडा असलेली आरामखुर्ची...(कुठे मिळेल काही क्लू??)
ह्यात बसून स्कॉच पिता येईल एकटेपणात मिसळून...
घोट घोट...
हेवन!

-नील (उर्फ गरीबोन्का विशाल: "ऑक्टोबर" एंड मधला)

Shraddha Bhowad said...

निलेश,
थॅंक्स!
जसा विश्वनाथ एक आणि एकच आहे, जशी मणि एक आणि एकच आहे, दिमित्री एक आणि एकच आहे, जसा ऑर्फ़ीयस एक आणि एकच आहे तसा विशाल फ़क्त आणि फ़क्त एकच आहे आणि तो म्हणजे ’ऑक्टोबर एण्ड’ वाला. दुसरे कोणी असतील तर मला माहित नाही, असतील तर त्यांना मी काऊंट करत नाही. त्यामु्ळे ते ’ऑक्टोबर एण्ड’ न लिहीताही कोण विशाल ते मला नीटच कळलं असतं.

बाकी स्कॉच ही एकट्याने प्यायची गोष्ट आहे ह्याबाबतीत दुमत अजिबातच नाही. फ़रक फ़क्त एव्हढाच आहे की माझ्याकडे पट्ट्यापट्ट्यांची सतरंजीवाली आरामखुर्ची आहे (मरुन आणि क्रीम), तुझ्याकडे ती नाही. :P आधी सोहोनींची डिक्शनरी, आता ही खुर्ची, you better start counting.

Shraddha Bhowad said...

संदीप,
"समजतंय!" असं म्हणायचं का मी?

Meghana Bhuskute said...

दिसायला सुंदर इत्यादी पोस्ट आहे हे. आर्टिस्टिक, दुःखी, धक्का देणारं, शांताबाई म्हणतात तसं सप्पकन सुरी फिरवणारं वगैरे... ते सगळं ठीक आहे. खरी मजा येते ती त्यातल्या अलिप्त, जवळ-जवळ कोरड्या, तुटक निरीक्षणांनी. मजा हा फारच निर्दय शब्द झाला. पण तुझं पोस्ट तरी कुठे मोठं सदय आहे?
वेडी आहेस तू. परिपूर्ण.
आपण कशासाठी लिहितो हा प्रश्न अनेक वेळा पडलाय मला. पण ही अशी उत्तरं? दर दिवशी बदलणारी उत्तरं?
मी हे लिहिलं असतं ना - मी तत्काळ सुखानं लेखनसंन्यास घेतला असता.
मत्सर मत्सर वाटतोय मला.

aativas said...

काही प्रश्नांना उत्तर नसतात .. म्हणून ते प्रश्न जास्त अर्थगर्भ बनतात .. त्याच हे आणखी एक उदाहरण.

Shraddha Bhowad said...

मेघना,
हो, प्रागैतिहासिक काळातली हाडकं, खापरया, नाणी वगैरे ज्या तटस्थ नजरेने बघू आणि दुसरयांसाठी त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त वर्णनपर लिहायचा प्रयत्न करु तसंच काहीसं हे झालंय.

मी अभिजित(बाठे)च्या पोस्टवर त्याला एक मेल लिहीली होती ती नंतर त्याने पब्लिश केली वगैरे की "माणसाची राग-लोभ-प्रेम-द्वेष-मत्सर वयपरत्वे किंवा बरीच वर्षं उलटल्यावर तेव्हढेच आणि तसेच राहतात का? का कालांतराने त्याचे रंग उडतात, त्याची तीव्रता कमी होते? तसं असेल तर ते पक्के असताना आपल्याला नेमकं काय वाटायचं हे आपण आता इतक्या छातीठोकपणे कसं सांगू शकतो? रुटीनची, दिवसेंदिवस तेचतेचते करुन बुद्धीला ग्लानी येते असं म्हणतात, त्यात नॉस्टॅल्जिया कसा काय परवडू शकतो?"
तुला नाही असं वाटत कधी?
एखादा क्षण आपण फ़िरुन पुन्हा तेवढ्याच इन्टेन्सिटीने जगू शकतो का? त्याच्याबद्दल तेव्हा काय वाटलेलं हे आता लिहू शकू का? मला शंकाच वाटते.
मला हे आताचे क्षण सुद्धा खूप पेरीशेबल वाटतात. हे आताच भोगले नाहीत तर पुढे त्याचा चोथाच आठवणार. रस शोषून घेतलेला. मग त्यांच्याबद्दल पुढे काही लिहायचं म्हटलं की ते असंच तटस्थ काहीतरी असणारेय.

मी मला आवडलेलं बरंच कायकाय लिहून काढत असते पण मागच्या नोंदी पाहताना कित्येकदा असं होतं की काही नोंदी मला मिडीयॉकर वाटतात. त्या तेव्हा का भिडलेल्या ते आत्ता नाही सांगता येत. 'भाबडेपणा’ हे एक कारण असू शकतं असं वाटतं पण आपला आताचा भाबडेपणा हा गतवर्षींपेक्षा आटलेलाच का असतो? हे पण मला कधी न सुटलेलं कोडं. सो, भाबडेपणा इझ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जगून घेतलेली वर्षं. असो. पण त्या नोंदी तेव्हा भिडलेल्या खरं- हे सत्य ही एक बारीकसा जीव असणारी लिंक असते त्या काळाशी. मग त्या लिंकमधली धुगधुगी जपायचा आपण प्रयत्न करतो. कोणी फ़ेसबुकवर फ़ोटो टाकतो, कोणी कोणाला बरयाच वर्षांनी ठरवून भेटतं वगैरे, माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी लिहीते, drain it all out या motto ने. बरंबिरं वाटतं, तुलना केली आणि आता आपलं तेव्हापेक्षा चांगलं वगैरे चाललेलं असेल तर हायसं वगैरेचा बोनसच एकदम.

माझं पोस्ट सदय बिलकुलच नाही. ’अमेरिका’ नावाच्या एका पिक्चर मध्ये एक मुलगी म्हणते "मी स्वत:ला टॉर्चर करते कारण तो माझा माझ्याशी संवाद साधण्याचं माध्यम आहे." तसंच काहीसं. इथे माझ्याबरोबर दुसरयालाही तसं होत असेल तर ते कोलॅटरल डॅमेज.

कृतककोपाने, मजेत, काळजीने, निव्वळ awe मध्ये-कसंही-कोणीतरी मला वेडी आहेस तू (तेही परिपूर्ण) म्हटल्याला जमाना झालाय- खरंच. मला सेंटी बनवलंस. :)

Shraddha Bhowad said...

आतिवास,
सोला आने सच बात.
मला खरंतर बरयाच वेळा असं वाटतं की आपण उगाचच उत्तरांच्या पाठी पडलेलो असतो. फ़क्त उत्तरंच कठीण असतात असं नव्हे तर प्रश्नही तेव्हढेच कठीण असतात.

बाय द वे, तुम्ही म्हणालात, "हे आणखी एक उदाहरण" म्हणून. याआधीचं कुठलं?

Meghana Bhuskute said...

नाहीच जगता येत गेलेला क्षण त्याच इण्टेन्सिटीनी.
लिहिणं हा कदाचित त्या अनुभवाच्या तीव्रतेच्या जास्तीत जास्त जवळ पोचायचा प्रयत्न असतो (केविलवाणा?! डिपेण्ड्स. :)).
आणि जर थेट तिथवर कधीच पोचता येणार नाहीय, तर मग तटस्थताच का नाही? म्हणूनच आवडलं असेल हे पोस्ट मला.
पण सगळ्यात जास्त भेदक वाटला तो शेवटचा भाग. हा सगळा पसारा म्हणजे नक्की काय आहे? उत्तर शोधण्यात तर मजा आहेच, पण या प्रश्नाचं उत्तर रोज नव्यानं शोधावं लागणारेय, कारण शोधणारे आपण रोज नवे असणार आहोत, हे किती थरारक आहे! मला एकदम सगळं ’खाली डोकं वर पाय’ दिसायला लागलं. म्हणून इतकी अनावर दाद. :)
बाकी वेडी तर तू आहेसच. पण ते तुला ठाऊक असणारच, नै का?

Samved said...

मी मंदीरात नाही
मी गुरुद्वारात नाही
मी मस्जिदीतही नाही
--तिथे वेडगळ राहतात
मी माझ्यात राहातो
.....
अश्या अर्थाची बुल्लेशहाची कविता आहे.
गेले काही पोस्ट वाचून तुझं तुझ्यात राहाणं सुरु आहे असं वाटतय. मस्त असतं !

Shraddha Bhowad said...

संवेद,

कठोपनिषदामध्ये एक ऋचा आहे.

यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह
मृत्यो: समृत्यूमाप्नोति य दुह नानेव पश्यति

जे इथं आहे, तिथंही आहे, आणि जे तिथं आहे, ते इथंही आहे, म्हणजेच सृष्टीतील वस्तू वि्भिन्न जरी दिसत असल्या, तरी त्या सगळ्या एक आहेत. हे एकतत्व आकलन होणं म्हनजेच मुक्ती. हे चरचर म्हणजे एकच प्राणतत्व.

मी आपल्यातच जगते हे खरं. पण आपल्यातच जगणं म्हणजे सर्वांकरता/ सर्वांच्या वतीने/ सर्वांच्या वाट्याचं जगणं हे ही तेव्हढंच खरं. ते आपल्यापेक्षा वेगळं नसतंच खरंतर.

आणि ही जाणीव खरंच मस्त असते.

Nil Arte said...

श्रद्धा , मेघनाला प्लीज सांग कि "श्रद्धा मत्सर क्लब" मी ऑलरेडी स्थापन केलाय ...
ती मेंबर होऊ शकते वाटल्यास अध्यक्ष सुद्धा, पण खजीनदार मात्र मी राहणार. (अफरातफरी च्या शुद्ध हेतूने).


-नील आर्ते
-हंगामी अध्यक्ष + तहहयात खजीनदार: श्र. म. क्ल.

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

निलेश,
तुला आधी माझा राग यायचा (संदर्भासाठी पहा: जॉन, हृतिक आणि श्रद्धा), आता बोलतोयेस की मत्सर वाटतोय. आणखी काय काय ते क्लियर होऊन जाऊ देत एकदाचं. मग त्या क्लबात नेमक्या कुठल्या अजेंड्यावर काम करायचंय हे ठरवता येईल. ते एकदाचं ठरलं की मला पण येता येईल. मला पी.ओ चं काम आवडेल. माझा मत्सर वाटणारयांना गोळा करत हिंडते, मग तुम्ही सगळे माझ्या नावाने शिमगा करायला मोकळे, कसं?
आणि अफ़रातफ़र (ती सुद्धा शुद्ध हेतूने) कसली करतोयेस बाप्पा?

Mandar Gadre said...

खूप सुंदर, खूप प्रवाही लिखाण! फार, फार आवडलं. सलाम - त्या ’देव’ ला, आणि त्या आठवणी अलगद टिपून आमच्यापुढे ठेवणा-या तुलाही :)

Mandar Gadre said...

खूप सुंदर, खूप प्रवाही लिखाण! फार, फार आवडलं. सलाम - त्या ’देव’ ला, आणि त्या आठवणी अलगद टिपून आमच्यापुढे ठेवणा-या तुलाही :)

Shraddha Bhowad said...

गद्रेभौ, तुम्ही नेहमी कमेंट देत जा राव, फ़ॅंटा प्यायलानंतर टाळू्च्या इथे कसला सुखद शॉट बसतो तसं होतं. तुझ्या ’प्रिय’वरच्या कमेंटने गुदगुल्या झाल्या होत्या त्या अजून आठवतायेत. :)

Unknown said...

Sundar lihites shraddha!
Mi tuzi fan zale aahe !

Unknown said...

Sanskrit cha tuza khup abhyaas aahe!

Shraddha Bhowad said...

उज्ज्वला,
:)
थॅंक्स मैत्रिणी!
बाकी मी दहावी, बारावी मेरीट, संस्कृतमध्ये ९९ मार्क्स वगैरे जॉनरची पोरगी आहे.
भाषेचा अभ्यास वगैरे व्यवस्थित आहे, मी सध्या लिंग्विस्टीक्स मध्येच काम करतेय. पण संस्कृतचा अभ्यास खूप आहे हे निरीक्षण कशावरुन?

 
Designed by Lena