मो.मोडॉनेय.

माझं आयुष्य या घडीला प्रचंड एकसुरी आहे. म्हणजे माझ्या आयुष्याला आवाज असता तर एकसुरात दळणा-या जात्याचा आवाजच आला असता..घर्र घर्र करुन!

काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात ’प्रियकर’ नावाचा विरंगुळा होता तेव्हा वेळ जरा बरा जायचा.
जोएलच्या शब्दांत सांगायचं झालं तर He was nice. Nice is good!
म्हणजे सगळं कसं कच्चकन दचकवायला लावणारं असायचं. दर दिवशी उठून काहीतरी नवीन कुडकूड. त्यामुळे एकसुरीपणाचा प्रश्नच नाही . प्रत्येक दिवशी  "त्याच्या टूथब्रशचा रंग लाल तर मी टूथब्रश निळा घे‌ऊ की लालच?" असे माय गॉड सो डिफिकल्ट डिसीजन्स घेताना दिवसांमागून दिवस कसे उलटायचे कळायचंच नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांना एकमेकांच्या सवयी लावून घेतल्या होत्या आणि मग आम्ही दोघे कित्ती कित्ती एकमेकांसारखे आहोत असं म्हणत उगीच भारी वाटून घेत बसलो होतो. आणि कसं असतं ही ’प्रियकर’ नावाची सा‌ईडकार आपल्या गाडीला असली की तिला जमेस धरुनच सगळ्या गोष्टीचा विचार होतो. मुलीचं आयुष्य ती त्या एका पुरुषाशी बांधून घेते, मग ती फक्त आणि फक्त त्याचा आनंद, दु:ख, वीकनेसे याबद्दलच्या स्ट्रॅटेजी बनवण्यात गढते. सोप्पं नाहिये काम आणि म्हणूनच एकसुरी नसलेलं.
आता सगळं हंबग वाटतं पण तेव्हा जात्यात असताना त्यात ल‌ई रस वाटायचा.
पण तेव्हाही हे माझ्या लक्षात न यावं की, मी आणि माझा तो प्रियकर, दोघेही आपापल्या आयुष्याच्या एकसुरीपणाला कंटाळलो होतो आणि बसलो होतो भाग देत एकमेकाच्या एकसुरीपणाला -बाकी शून्य ये‌ईपर्यंत!
बाकी शून्य कधी यायचीच नव्हती..ती नसतेच..
हौस फ़िटली, झालो बाजूला.
"मी काय तुला आज ओळखतो/ते होय?" असे डायल्वॉक एकमेकांवर टाकत.

मुळात ’ओळख’ म्हणजे काय?
मला एखाद्याचं नाव, त्याचा कौटुंबिक इतिहास, रक्तगट, त्याची सांप्रत प्रकरणं (निस्तरलेली त्यातच आली) हे सगळं ठा‌ऊक असेल तरी याचा अर्थ मी त्या माणसाला ओळखते असा हो‌ऊ शकतो का?
राखुंड्या पॉर्न बघतो, तेव्हा तो  कुठल्या मुलीचा विचार करत असतो हे मला ठा‌ऊक आहे म्हणून मी त्याला ओळखते असा त्याचा अर्थ होतो का?
केस मानेवर जिथे संपतात त्या भागाकडे नुसतं पाहून मला देव खूप दमलाय हे कळतं, म्हणजे मी त्याला ओळखते का?
याला तरी ’ओळख’ म्हणावं का?

माझं इथं काहीतरी बिनसलंय हे माझ्या मित्राला ४०० किलोमीटर्सवर बसून जाणवतं याचा अर्थ तो मला ओळखतो असा होतो का?
अंदाज करणं आणि ते हमखास खरे ठरणे-ह्याला काय म्हणतात मग?

’मी तुला ओळखते/तो’ हे विधान मला अतिशयोक्त आणि धाडसी वाटतं. हे वाक्य कोणी माझ्यावर फेकण्या‌आधीच  मी अशी रि‌ऍक्ट झालेली असते  की त्या व्यक्तीचे माझ्याविषयीचे सगळे तर्क-कुतर्क, अंदाज, आडाख्यांचे इमले धडाधड खाली आलेले असतात.
खरं सांगू का? आपण कोणाला ओळखत नाही आणि कोणीसुद्धा आपल्याला ओळखत नाही-आपल्याभोवतालच्या चार भिंतींना सोडून.
तर..
आदर्श ब्रेक-अप नव्हता तो. प्लॅन्ड नव्हता. ठरवल्यासारखं कॅफे कॉफी डे मध्ये भेटून एकमेकांच्या आवडीच्या कॉफी मागवून ’इट वूड  नेव्हर हॅव वर्क्ड," बोललो- असं काहीच झालं नाही.

माझ्या आयुष्यात इतरांसारखं काहीच का होत नसावं??
आता तो फ़क्त एक झकडम इतिहास आहे खरं..डायरीमधल्या काही नोंदीमधून जिवंत असलेला..

डायरी-

मी ’यू टर्न’ पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हा वाटलेलं की, ती रमा गोखले कसली भारी डायरी लिहिते. कातळाला फ़ुटलेला पाझर काय, पानगळ काय. वॉव! मला माझी डायरी आठवली. कातळ, पानगळ दूरदूरपर्यंत नाही. मी ४ लॅप जास्त मारले, आज मी जलालुद्दीन खिल्जी संपवला, अला‌ऊद्दीन सुरु केला अशा पाद-याफुसक्या नोंदीच जास्त, त्या पण नमनाला घडाभर तेल घालण्या-या! माझ्या डायरीत हे सुद्धा बघायला मिळतं-

"इतिहास’ हा माझा विषय असला तरी ती मानव्यशास्त्राची अत्यंत संदिग्ध अशी शाखा आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणजे लिखित पुराव्यांची चैन असली ते ’कितपत’ खरं आहे हे कळण्याचा काहीच मार्ग नसतो कारण अर्थात ते इतिहासकार आज जिवंत नाहीत. कोणत्यातरी इतिहासकाराने राजाची प्रशस्ती इतकी वारेमाप केलेली असते की तो वास्तवतेपासून अंमळ दूरच गेलेला असतो. (निकोलो कॉंटी विजयनगरचं वर्णन करताना), एखादा बर्नी सारखा इतिहासकार अकबराचा दुस्वास करायचा म्हणून खोट्यानाट्या गोष्टी घुसडण्यास मागेपुढे पाहत नाही. अल्बेरूनी आपल्या मायभूमीच्या अनुषंगाने भारताचं अवलोकन करतो त्यामुळे तो त्याच्या नजरेतून काही गोष्टी सुटतात. (भारतातली त्यावेळची गुलामगिरी) इ. त्यामुळे इतिहास वाकवू तसा वाकतो. सत्य किवा फॅक्टसना फारच सहजतेने डिस्टॉर्ट करता येतं. त्यामुळे दुर्दैवाने Authoritiesने प्रमाणित केलेल्या आणि तज्ञांनी प्रमाणित केलेल्या इतिहासाला प्रमाण मानून चालायला लागतं."


डायरी हा आपण कसले भारी आहोत याची लख्ख जाणीव करुन देणारा हा प्रकार आहे. हा हा!
पण नंतर वाटलं, आय वंडर, रमा गोखले माणसांबद्दल काही का लिहीत नाही?
हं...माणसं मुळातच कमी असली आणि शेयर करायला कोणी नसलं कीच डायरी लिहायचं सुचतं?
मग मी डायरी का लिहिते?
मला खूप बोलायला हवं असतं पण कुणाशी ते माहित नसतं. माणसं भरपूर असतात. त्यांच्याशी बोलणं पण भरपूर होतं. पण बोलून झाल्यानंतर कोणी कुणाचं ऐकून घेतलंय असं वाटत नाही. मी काहीतरी एक म्हणत असते आणि ऐकणारा काहीतरी दुसरंच ऐकत असतो. एखाद्या साध्या वाक्याला ’मला खरंच असं म्हणायचंय, त्यात "तू इतर कसले अर्थ बघू नकोस.." इत्यादी पुस्त्या जोडाव्या लागतात.
या पुस्त्यांचा मला कंटाळा असावा कदाचित- म्हणून मी डायरीत बोलते.
माझ्या समोरुन येणारी मुलगी कोणतं गाणं ऐकत असावी किंवा ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या एका पुरुषाला पाहून याने रात्री काय काय बरं केलं असेल? असे प्रश्न उगीचच पडणं, हे सग्गळं सग्गळं मी डायरीत लिहीते. मला हे प्रश्न का पडतात याची उत्तरं मला जाणून घ्यावीशी वाटतात. पण कधीकधी उत्तरं मिळालीच तर मुदलातले प्रश्नच विसरायला हो‌ऊ नयेत म्हणून डायरीत लिहून ठेवायचे.
म्हटलं ना, उत्तरंच कठीण असतात असं नसतं नसतं, प्रश्नही कठीण असतात ब-याचदा.

ये भेजा गार्डन है, और टे्न्शन माली है  - हेच खरं.
(रुपक अलंकाराला आणखी तेजस्वी भावंडं बहाल केल्याबद्दल, अमिताभ भट्टाचार्य, आपल्याला शिरसाष्टांग. श्रीयुत गुलजार यांचा ’गोली मार भेजे में’ चा मोड ऑन होता तेव्हा आपण त्यांच्याकडे क्रॅश कोर्स करत होतात काय?)

आपल्याला कुठलीही कल्पना सुचते तेव्हा ती नेमकी कुठे उगम पावलेली असते? म्हणजे ऍमेझॉन नदी ऍंडीज पर्वतरांगांमध्ये उगम पावते,आपण खातो ती तूरडाळ मराठवाडा-विदर्भातून येते तशी ही कल्पना कुठून येते? ’मन’ नावाच्या ऍनॉनिमस प्रदेशातून की मेंदुतुन?
मला जेव्हा काहीतरी सुचतं तेव्हा ते अमृतांजन चोळायच्या ठिकाणी उगम पावलेलं असतं. सोप्पंच करुन सांगायचं झालं तर वेड्या माणसांना शॉक्स देण्यासाठी म्हणून नोडस जिथे लावतात तिथे.
तिथे काहीतरी रटरटतंय हे जाणवतंसुद्धा.
मग ती कल्पना जसजशी बाळसं धरायला लागते तशी या कानशिलापासून ते त्या कानशिलापर्यंत गच्च बसते. उठता-बसता, लिहीता-वाचता तिची खदखद जाणवते. तिला नुकताच सॅंडपेपरने घासुन काढलेल्या लोखंडाचा कडवट, उग्र वास असतो. ती मग भिनते, तापासारखी मुरते, रात्रींमधून डोळ्यात ठसठसत राहते आणि मग पुढे केव्हातरी शब्दांमधून रुजून येते. तेव्हा ती नुकत्याच बनवलेल्या कवळ्या कवळ्या आरशासारखी वाटते. मग सुरु होतो तो सनातन झगडा-
आधी भाषा मग अर्थ की आधी अर्थ मग भाषा?
ह्या सनातन झगड्याच्या त्या दिवसांमध्ये माझ्या डायरीत हटकून नोंद असते ती -असह्य डोकेदुखीची.
कानशीलं थडाथड उडवणा-या या डोकेदुखीशी एकच नातं शक्य आहे ते म्हणजे स्वीकाराचं. तिला माझ्या आयुष्यात सामा्वून घेतलं तरच जगणं शक्य आहे.
मला जर अजिबातच व्यक्त व्हायला जमलं नाही तर माझं काय हो‌ईल? कदाचित माझी विचारशक्ती चुरमडत जा‌ईल, तिला सतरांदा आपटलेल्या भांड्यासारखे पोचे येतील.यथावकाश काहीतरी थातुरमातुर खरडलं जा‌ईलच पण त्याला जरतारी शब्दांची सूज आलेली असेल.

माझ्या कल्पनांचं किंवा विचारांचं असं सेप्टीक हो‌ऊ नये, त्या कायम भळभळत राहाव्यात. हे दरवेळी काहीतरी नवं सुचणं, लिहावंसं वाटणं यात दमणूक झाली तरी !

बरेच सुटे धागे असल्यावर त्यांची गुंतवळ न हो‌ऊ देता, त्यात पाय न फसवता ते एकत्र करुन त्याचा सुंदर गोफ करुन घ्यावा आणि त्यात आपण झोके घेत रहावं..असंच काहीतरी .

मो.मोडॉफ़.

द रेड स्टुडियो.

आठवणी म्हणजे प्रत्येक सेकंदाला पंचवीस फ़्रेम्स अशा गतीने पळणारा पिक्चर नसतो. आठवणी या कोलाजसारख्या असतात. तुकड्यांतुकड्यांनी असणारया. आपलं गतायुष्य त्यांत ब्लो बाय ब्लो दिसत राहतं.
एखादं खूप जुनं पत्र पुन्ह्यांदा वाचलं की डोक्यात उमटणारं उत्तर आपण पहिल्यांदा दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळं असतं. तसंच कुठलीही आठवण कितीही वेळा पाहिली तरी प्रत्येक वेळी वेगळीच भासणार.
आठवणी या ’इंटरप्रीटेशन्स’ असतात, रेकॉर्ड्स नाही.

विशीतल्या आठवणींची सुरुवात होते तेव्हापासून ३ गोष्टी एकत्रच आठवतात.
ती मुलगी, जयदेव आणि त्याची ती खोली.
ती मुलगी आज-आताही आहे,कॉंप्युटरसमोर समोर बसून टा‌ईपरायटर बडवते आहे, तिने माझे कपडे घातले आहेत आणी तिचं नाव ’मी’ आहे.
जयदेव हा माझ्यासारखाच माणूस आहे-जो रंग बघू शकतो, रंग ऐकू शकतो, त्यांना स्पर्शू शकतो.

डोक्यावर खूप सारे वाकडेतिकडे केस असणारया, थंडीवारं काहीही असू देत तिथं-नेहमी स्टॅड कॉलरचे शर्ट घालणारया, कपाळावर आडव्या आठ्या असणारया, कानात अत्तराचे फ़ाये ठेवणारया या ग्रे रंगाच्या माणसाबद्दल मला नेहमीच अपार कुतूहल वाटत आलेलं आहे.

जयदेवच्या या रंगबिरंगी , रंगवेड्या व्यक्तिमत्वाचे त्याचे डोळे हा ही एक खास भाग होते. एकच रंग त्याला मुळी मान्य नसावाच कारण त्याच्या डोळ्यांची बुब्बुळं सारखी नव्हती. एक होतं काळंभोर आणि दुसरं होतं-कोणीतरी जपूSSन मधाचा एकच थेंब सोडल्यासारखं. खूप मुरलेला जुना मध. त्या मधाळ गोलात एक स्निग्ध काळा ठिपका (जो हसताना मिस्कील बारीक व्हायचा)आणि त्याभोवती आपण लहानपणी सूर्याभोवती काढायचो तशा बारीक रेषा. आणि यावर कहर म्हणजे दोन्ही बुब्बुळांभोवती असलेलं करडं रिंगण.
अलेक्झांडरचे डोळे पण म्हणे असेच रंगबिरंगी होते. डिकॉरस-वेगळी बुब्बुळवाला.
मी जेव्हा त्याला पहिल्याप्रथम पाहिलं होतं तेव्हापासून पुढे खूप काळपर्यंत त्याच्या बहुरंगी डोळ्याबद्दलच्या न संपणारया आश्चर्यात बुडून गेले होते ती अगदी परवा-परवापर्यंत. एके दिवशी त्याच्या खणामध्ये उचकापाचक करताना मिळालेल्या खूप जुन्या फ़ोटोंमधल्या एका स्त्री च्या डोळ्यात माझं आश्चर्य मिटून गेलं.
त्याच्या आ‌ईचा फ़ोटो होता तो.
त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला जास्त माहीत नाही.
तो मला भेटला तेव्हाच जन्मला असावा असं मला कायम वाटत आलंय कारण त्या‌आधीचं तो कधीच काही बोलला नाही.
त्याचे बाबा एक प्रतिथयश डॉक्टर असले तरी ते देवचे बाबा हे पचवणं मला खूप काळपर्यंत अवघड गेलं होतं. माणूस एकदम सज्जन पण एकसुरी आयुष्य असलेला, प्रोसीजर, रुल्स वर भक्ती असलेला-अगदी देवला जशा माणसाचा लगेच कंटाळा येत असे तसा,
बीजगणितातल्या शेवटी उत्तर येणार आहे हे माहित असलेल्या एखाद्या लांबलचक कंटाळवाण्या गणितासारखा..

त्याच्या त्या खोलीत जायचा योग लवकरच आला. ती खोलीही तशीच होती-जयदेवसारखी.
टवटवीत लाल  रंगाच्या भिंती असलेल्या अर्धवर्तुळाकार खोलीत समोरच्या (एकमेव) सपाट भिंतीला टेकून असलेलं शिसवी टेबल- त्या टेवलावर काचेच्या गोल बरणीत आपल्या पोटात रंगबिरगी जग वागवणारया चार-पाचशे गोट्या होत्या. त्यातली एकही दुसरीसारखी नव्हती हे नंतर त्यानेच मला सांगितलेलं. आणि मागच्या भिंतीवर बरोबर मध्ये घोस्टमधल्या डेमी मूरचं भलंमोठं ब्लॅक ऍंड व्हा‌ईट पोस्टर होतं, बाकी सगळी भिंत मोकळी होती. काळीभोर किनार असलेला पुरुषभर उंचीचा आरसा भिंतीच्या कडेला आरामात टेकून उभा होता. बाकी सारया खोलीत अपेक्षेप्रमाणेच शेकडो गोष्टी गळ्यात गळे घालून होत्या. अर्धवट चितारलेली पानं इथे तिथे पडली होती. लाकडाच्या अगदीच तकलादू (त्यानेच बनवलेल्या) रॅकमधून पुस्तकं खच्चून भरली होती त्यामुळे ते मरणासन्न स्थितीत होतं, उजव्या कोपरयात स्टिरीयो होता. एक तुटकं खोड कुठूनतरी आणून टाकलं होतं बसायला म्हणून, आता ते खोलीतच उगवलं असावं इतकं नैसर्गिक वाटत होतं, सगळीकडे रंगांची गिजबिज होती. एकंदर सगळाच अवर्णनीय देखावा होता आणि ह्या सगळ्या उखीर वाखीर पसारयात खोलीच्या बरोबर मधभागी एका लाकडी ईझलवर लटकलेला कॅन्व्हास होता, पांढरयाशुभ्र कॅन्व्हासच्या कानावर हाताला लागेल इतका गडद लाल रंग असलेले कार्नेशनचे फ़ूल होतं.
स्टिरीयोवर कुठलंतरी गाणं धमाधम वाजत होतं, केहरव्याच्या ठेक्यावर ढोल दुमदुमत होता.
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

त्याच्या त्या खोलीला इतर खोल्यांसारख्या या कोपरयात एक तर दुसरी दुसरया कोपरयात-अशा सिमीट्रीकल दोनच खिडक्या नव्हत्या. बुटक्या खोलीच्या त्या भिंतींना वरच्या डाव्या-उजव्या कोपरयात दोन छोटे कोनाडे होते-बायोस्कोपसारखे.
कापूस पिंजून ठेवून द्यावा तसा एकच लंबुळका ढग नेहमी आकाशात ठेवून दिल्यासारखा असायचा तो डाव्या खिडकीतून दिसायचा. तर उजव्या खिडकीतून त्या खोलीच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या रेन-ट्रीचे झुबकेदार गुलाबी गेंद दिसायचे.  ते झाडंही मोठं उतल्यामातल्यासारखंच फ़ुलं फ़ुलवायचं. आज जास्त तर उद्या त्याहून जास्त. त्या रेन ट्री मधून सकाळचा प्रकाश खोलीत झिरपत असायचा. तो प्रकाश, त्या प्रकाशात खोलीतल्या प्रत्येक वस्तुला प्राप्त झालेली वेगळीच मिती, त्या सेपिया वातावरणात त्याची चित्रं वाकवाकून गोळा करत असलेले मी, त्या अधमुरया प्रकाशात उजळलेली कृष्ण्धवल डेमी हे सगळं डोक्यात जसंच्या तसं फ़्रीझ हो‌ऊन बसलेले आहे. आजही ते गाणं आणि त्या ओळी ऐकल्या की मी जयदेवच्या त्या अजब खोलीत जा‌ऊन पोहोचते.

त्याच्या खोलीला एक अतिविशिष्ठ वास होता. खोलीत शिरलं रे शिरलं की भक्ककन नाकपुड्यांमध्ये घु्सायचा.हं! सूssक्ष्म जाणवणारा घामाचा कडवट दर्प, उजवीकडून -वरच्या खिडकीकडून- रेन-ट्रीच्या नखरेल फ़ुलांचा मिरमिरवणारा वास, पुस्तकांचा वास,  त्यात मिसळलेला त्याच्या एकशे एकूणतीस अत्तरांचा वास, कॅन्व्हासवरुन येणारा त्याच्या रंगांचा नशा आणणारा गंध, मूडमध्ये असेल तर आणलेल्या वा‌ईन आणि पिझ्झाचा वास, रेड पाप्रिकाचा ठसकवणारा वास, हम्म, आणखी आणखी...तो-मी जिथून कुठून आलो होतो-तिथून आपल्याबरोबर आणलेला सोनसळी उन्हाचा!

त्याच्या कॅन्व्हासवर सेट केलेला एक आर्क लॅंप ओळंबून "बघू तरी काय चाललंय ते!" करत देवची चित्रं बघतोय असं मला नेहमी वाटायचं. पूर्ण खोलीभर तुकड्यातुकड्यांच्या मोझेक टाईल्स होत्या. छपराला टांगलेल्या कितीतरी बबल लॅंप्सच्या प्रकाशात रात्री त्या चमचम करत असायच्या. मी कधीतरी सहज चाळा म्हणून ते लॅंप्स मोजूयात म्हटलं तर तब्बल वीस भरले.
त्यानंतच्या एका वर्षी त्या खोलीत माझी म्हणून खास अशी एक डोलणारी खुर्ची आली.
त्याची चित्रं उमटत असताना समोरच्या डोलणारया खुर्चीवर गबदूलपणे बसून तो सांगतो ते ऐकत राहणं हा माझ्या आवडीचा भाग होता.

"रंग हे व्हिज्यु‌अल परसेप्शन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं. कठीण करुनच सांगायचं झालं तर दृश्य प्रकाश तुमच्या डोळ्यापर्यंत किती आणि कसा पोहोचतो यावर तुम्हाला रंग कसा दिसतो हे अवलंबून. रंग केवळ ते तसे असतात म्हणून नसतात, तर  आपण ते तसे पाहतो म्हणून असतात. रंगाधळ्याला आपण पाहतो तो रंग आपल्याला दिसतोय तसाच दिसेल असं नाही. कळतंय का काही?"

यावर मी फ़क्त बाहुलीसारखी डिंगडॉंग मान हलवली होती.
त्याच्या त्या अर्धवर्तुळाकार खोलीत बसून त्याने मला किती किती काय काय समजावून सांगीतलेलं आहे,

"तुला सांगू का? मला रंग आहेत तसे कधीच आठवत नाहीत. मला मातिसचे रंग वस्तू म्हणून आठवतात, व्हिन्सेंट्चे रंग वातावरण निर्मितीसाठी ,आठव -आर्ल्स, सेझॉ दृश्यातून साकार होतो तर दलाल, मुळगावकरांचे रंग व्यक्ती म्हणून आठवतात"

"कोणत्याही गोष्टीशी रंगाचं, स्पर्शाच,वासाचं नातं जोडता येतं. जिला आपलीशी करायची आहे तिच्या अंतरंगात जायचा प्रयत्न कर, तिचा गंध , टेक्स्चर अनुभव, तिच्या रंगाचा डोळ्यांना सराव हो‌ऊ देत. कशी होणार नाही ती आपलीशी?"

त्यानंतरच्या एका वर्षी सगळ्या भिंती आम्ही हाताच्या रंगबिरंगी ठशांनी रंगवून काढल्या-डेमीची भिंत सोडून अर्थात.
ती भिंत शेवट्पर्यंत तशीच कुंवार राहिली आहे.
त्यानंतरची कितीतरी वर्षं मी तिथे जात होते, इथे तिथे पडलेली चित्रं मी उचलून ठेवत होते, त्यावर तारखा टाकत होते- त्याने काढलेल्याच्या नव्हे तर मला सापडलेल्याच्या.
छान जाडजूड फ़ा‌ईल तयार झाली होती त्याची.
कितीतरी वर्षं..
कशी चुटकीसारखी निघून गेलीत...या गोष्टीला.
त्याने हात पसरुन दिमाखदार स्वॉन डाईव्ह घेतली होती- आठव्या मजल्यावरुन, त्यालाही.
आकाशातून तारा असाच निखळतो म्हणतात. मी तोवेळपर्यंत पाहिला नव्हता, अजून पाहण्याची हिंमत झाली नाही.

एरव्ही कोणी कोणाला आयुष्यभर पुरणार नसतंच पण त्या त्या व्यक्तीचं जाणंही मनात कुठेतरी आतात मान्य असतं.-केलं जातं.
हे असलं जाणं कोणी कसं आणि का मान्य करायचं?

ती स्वप्नं असतात माहितेय का ज्यात आपल्याला काहीच बोलता येत नसतं. एका पातळ मेम्ब्रेनपलीकडून पलीकडच्या जगात काय घडतंय हे नुसतंच हताशपणे पहात बसण्यापलीकडे आपल्याला त्या स्वप्नांमध्ये स्कोप नसतो. त्या स्वप्नांमध्ये देवचं मरण मी किमान शंभरवेळा पाहिलं होतं, पुन्हा-पुन्हा.
इक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी
जाते जाते तुमने आवाज तो दी होगी
हर वक्त यहींहै गम, उस वक्त कहा थे हम
कहा तुम चले गये
सारखं गाणं मला अधिक पॅरानॉईक बनवत गेलं. टॉर्चर करण्यासाठी सुया आणि थंबस्क्रू यांची गरज नसतेच हे मला पटवत राहिलं.

पण आता तसं नाही.

आता देवची आठवण झाली की डोक्यात मागे कुठेतरी झिणझिण्या येतात खूप . आता त्याचा चेहरा आठवायचा म्हटला तरी अंधुकच आठवतोय. कॅन्व्हासवरुन दिसणारे डोळेच आठवतात फ़क्त-अगदी कालच पाहिल्यासारखे. कारण बरयाच वेळा मी त्याला तसंच पाहिलंय-कॅन्व्हासच्या पलीकडे. आता या डोळ्यांवरुन ठिपके ठिपके जोडून लहानपणी चंपक मध्ये आपण ते ससे, हरणं पूर्ण करायचो , तसं ठिपके जोडून त्याचं चित्र पूर्ण करता ये‌ईलही मला. पण मग हे सारं इतकं धूसर असताना तब्बल सहा वर्षांनंतर ती खोली बारीकसारीक तपशिलासकट आठवायचं कारण काय?

लोकं मरतात मग त्यांच्या इतक्याशा लहानसहान, रहस्यमय विचित्र गोष्टी आपल्या आठवणींचा भाग कसा बनतात?
त्यांच्या तशाच आठवणी मागे का राहतात?
का ते तशाच आठवणी सोडून जातात?

मला कधीच काही ’म्हणायच’ नसतं, तरी मी बडबड करते, ती का? माझ्या आयुष्यातले ’व्हॉ‌ईड्स’ भरुन काढण्याकरता?
आपण आपल्याच आयुष्याच्या निखळलेल्या कपच्या/तुकडे एकत्र सांधण्याकरता लिहीतो का?
या प्रश्नांचं उत्तर मला मिळतंच असं नाही. मिळतंय असं वाटलं तरी मी ते पुन्हापुन्हा विसरुन जाते कारण या प्रश्नांचं मला हवं असलेलं उत्तर दर दिवशी बदलत जातं.

हे आपल्या आठवणींसारखंच. नाही का?
 
Designed by Lena