सेल्युलॉईड डायरीज

१ जानेवारी, २०११

मागची दोन वर्ष ह्ट्टने पत्करलेल्या सिंगलडम मध्ये सरली पण इजा बिजा झाल्यानंतर तिसरं वर्ष तसंच एकट्याने काढायचं जिवावर आलंय. स्वत:साठीची स्पेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दांच्या चकचकाटला भुलुन चिकटलेली माणसंही शिळी झाली. ती पुढच्या पाच मिनीटात काय बोलनारेत याचा अंदाज लावता आला की संपलंच.तीच तीच ,माणसं त्यांचे तेच तेच बोलनं तेच तेच  याचा इतका कंटाळा आला की परिचित माणसांबरोबर अपरिचित ठिकाणी ३१ घालवला.तोंड दुखेपर्यंत बोलायचं आणि जेव्हा जबडा असहकार पुकारेल तेव्हा गप्प बसायचं याशिवाय काही चॉ‌ईस नसणार हे माहित असुन फ़ॉर अ चेंज अनोळखी ठिकाणी एकट्याने घालवायला नको म्हणून . मग बोलण्यातले ऑकवर्ड पॉझेस, घुटमळ यामुळे आमच्यामध्ये कायम ’मुझसे दोस्ती करोगे’ सिनेमा चालाय असं वाटणं हे आलंच. पण त्याला इलाज नसतो. प्रचंड किंमती मोजूनही मुली आपल्या प्रियकरांना चिकटून का असतात हे कालच्या एका रात्रीत मला लख्ख कळलं.

हे ’फ़क्त मित्र’ वाले मित्र फ़ार मजेदार असतात. बोलताना त्यांना आपण सगळंच बोलून जाणार नाही याची काळजी घ्यायची असते, बरंच लपवायचं असतं, मनात असतं एक पण सांगायचं वेगळं असतं. असं एकशे एकूणतीस गाळण्यांमधून येणारं पॉलिटीसा‌ईज्ड बोलणं..असं तुम्ही कितीही बोललात तरी ते संभाषण नसतं. काही मिनीटांनंतर ते ब्लाब्ला ब्ला.. ब्ला ब्ला.. ब्लाब्ला असंच ऐकू येतं.

१० जानेवारी, २०११

प्रत्येकाच्या आत एक किंचाळी असते.
असते नं?
हाय पीच, काळी चार, काळी सहा मधली?
किंचाळी हा खास स्त्रीलिंगी शब्द असावा. कारण "पुरुष किंचाळला" असं कानाला न खटकता कुठेही वाचल्याचं ऐकिवात नाही.
पण तो आपला विषय नाही.
असमाधान, अस्वस्थता- काही आल्याची, काही न आल्याची, काही कळल्याची, काही न कळल्याची, न कळवता आल्याची, न समजल्याची, हरल्याची, गमावल्याची. खूप राग  तुंबलेला असतो, खदखदत असतो, आत रटरटत असतो. कशाचा राग आलाय हे विचारता सांगता यायचं नाही, बोट ठेवून दाखवता यायचं नाही. भर दुपारी एस.टी मधून प्रवास करताना पोटातल्या द्रवाचं काय होत असेल तेच विचारांचं होत असावं कदाचित.

१२ जानेवारी, २०११

आ‌य् मीन पुस्तकं वाचायची-वाचली, दारू प्यायचिये-प्यायले, सिगरेटी ओढायच्यात-ओढल्या, प्रेमप्रकरणं -झाली, वैचारीक गोंधळ घालून झाले, शब्दांची मैथुनं, तात्विक बुडबुडे सगळं सगळं केलं पण एव्हढंही पुरेसं नाहीये बहुधा. आणखीही काहीतरी हवंय पण काय ते कळत नाही. छातीतून ते सावकाssश वर येत राहतं आणि घशाशी अडून बसतं. आपण त्याला उगाच आवंढा वगैरे म्हणतो-पण ते नक्की कये त्याचा जाम पत्ता लागत नाही.

आता मला सिगरेट नको, तिने कॅंसर होतो,दारु तर नकोच नको, तिने लिव्हर सिरॉसिस होतो, त्त्यामुळे मरायला होतं आणि मेलं की परमेश्वरी इच्छेनुसार हाच दळभद्री मनुषयजन्म घ्यावा लागणार. नकोच.


१५ जानेवारी, २०११

वा‌ईन, कविता, सिगरेटी, गझला, बिंज वॉकींग, बिंज टॉकींग ही सगळी त्या वेदनेला इम्युन होण्यासाठीची झकदम लफ़डी. तात्पुरत्या पेन-किलर्स. कारण वेदनेला सामोरं जायला आपण मुळी तयारच नसतो. आपली अगोदरच इतकी लागलेली असते. त्यामुळे तो शहाणपणाचा, उपरतीचा क्षण शक्यतो लांबवता कसा ये‌ईल हे बघण्याकडे आपला कल असतो. प्रोफ़ा‌ऊंड मिझरेबलनेस टेक्स यू ओव्हर. मी मिझरेबल का आहे हे विचारलं तर नेमकं नाही सांगता यायचं पण-आहे, हे खरं. काहीतरी आहे ज्याने हे असं उगीचच गळ्पटल्यासारखं , विझू विझू वाटतं.
हं!  काहीतरी.
चुकीच्या बसमध्ये चढून बरोबर ठिकाणी जायचा प्रयत्न करु तसं मला या ’काहीतरी’ बद्दल वाटतं. व्हेग पण प्लीझिंगली  कन्व्हिनियंट.

२५ जानेवारी, २०११

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी मी आमच्या सांगुळवाडीला एक प्रचंड मोठं कोळ्याचं जाळं पाहिलं होतं. त्यात एक पिक्चरमध्ये दाखवतात तसा, ज्याला पाहून पोरी खात्रीने किंचाळतात तसा क्लिशे कोळीसुद्धा होता. केसाळ, तपकिरी रंगाचा, अंगावर बोटबोटभर केस, हेकणा, उगाचच पायात पायात घालून चालायची सवय असलेला. एकदा काय झालं, त्याच्या जाळ्यात एक माशी अडकली. अडकली तर अडकली त्यात वर शहाणपणा करुन स्वत:ला सोडवून घ्यायची धडपड सुरु केली. कोणीही केली असती म्हणा पण त्याने झालं काय ती त्या जाळ्यात अशिकाधिक गुंतत गेली. तो कोळी तिच्यापासून पंचेचाळीस अंशाचा कोन करुन जाळ्याच्या टोकावर शांतपणे बसून तिची धडपड कौतुकाने पाहत होता. तो गुंता काही तिच्याकडून सुटेना तेव्हा तिची धडपड थंडावत गेली आणि मग ती स्वस्थ पडून राहिली जाळ्यात. मरण कधी आपल्यावर झडप घालतंय याची वाट बघत. माशीच्या सक्रियपणातलं आणि निष्क्रियपणातलं ग्लॅमर एव्हाना संपल्याने त्या हेकण्या कोळ्याने तिला गट्टम करुन टाकलं.
तो प्रसंग जशाच्या तसा तपशीलवार माझ्या आठवणीत जिवंत आहे. रामराया जन्मला ती टळटळीत मध्यान्हीची वेळ होती, शेताकडून घराकडे जायला एक दगडी चिरयांचा बोळ केला आहे. त्या बोळाच्या पलीकडून ये‌ऊन आंब्याची झाडांनी पार बोळावर कमान टाकलीये. त्यातल्या सर्वात खालच्या फ़ांदीला लागून हे जाळं होतं अर्धा पुरुष उंचीचं, वरवर पारदर्शक पण आंब्याच्या पानातून पडणारया कवडशांने कचकन चमकणारे तंतू, माशीच्या पंखांची फ़डफ़ड यावी इतकी निरव  शांतता आणि त्या माशीला आवाज असता ती कशाप्रकारे किंचाळली असती याचा तिच्या तडफ़डीवरुन अंदाज लावायचा व्यर्थ प्रयत्न करत हादरुन गेलेले मी.
त्या तडफ़डीचा अंदाज ती माशी झाल्याशिवाय लावता यायचा नाही. रोल्स बदलतात नंतर..पण् त्यामुळे तडफ़ड झाली होती हे सत्य तर बदलत नाही.

--

४ फ़ेब्रुवारी, २०११


आधीची डायरी वाचताना जाणवतंय की हे असं जगण्याकडे नुस्तं पाहणं मला ऍक्चु‌अल जगण्यापासून परावृत्त करतंय. जे आहे त्यापेक्षा जे नाही त्याचा विचार करायला भाग पाडतंय.


१२ फ़ेब्रुवारी, २०११


आज जो बरोबर असताना पॅंटच्या खिशात काहीतरी जाणवलं. चौपाटीवर गोळा केलेले शंख. कानाशी लावले तर मला समुद्राची गाज ऐकू आली. पण ते गोळा करताना माझ्याबरोबर कोण होतं? हे आठवू नये याचा मात्र प्रचंड धक्का बसला.

२७ फ़ेब्रुवारी, २०११

कधीकधी वाटतं पुरे झालं खमकं असणं, स्ट्रॉंग असणं. आताच्या आता इथे चुरगळून, चोळामोळा हो‌ऊन पडावं, अगदी शकलं शकलं व्हावीत आपली. मग कोणीतरी गोळा करुन घे‌ऊन जावं आपल्याला, निगुतीनं आपापल्या मनासारखं पूर्वपदाला आणावं, आपल्या वतीने निर्णय घ्यावेत..पण लाख वाटलं तरी ते मला कुठलं मान्य व्हायला? कशालातरी किंवा कोणालातरी सरेंडर होणं हा प्रकार मला जमेल तर शप्पथ. मन, शरीर कायम लढायच्या, बचावाच्या पवित्र्यात असतं आणि जाणिवा नेहमी टक्क जाग्या, एकदम अलर्ट. थकून थकून जायला होतं. आता हे सगळं अन-डू करायचं म्हणू, लाख विसरायचं म्हणू पण वर्षानुवर्षे  शरीराला, मनाला झालेली सवय कशी जाणार. सवयीने डावपेच लढवले जाणार, सवयीचे युक्तिवाद केले जाणार, तत्वांची भेंडोळी तोंडावर फ़ेकून तू यांत-तांत बसत नाहीस सांगून दूर लोटलं जाणार, दुसरयाला दुखावणार, आपल्याला दुखणार, सगळं रिफ़्लेक्सेस ने होणार. शिट! I really am a mess!

असं-तसं घडावं असं मला वाटत असतं पण मी ते घडू देत नाही.

--

३१ मार्च, २०११

ट्रेकहून आल्यावर सारं शरीर चाचपून बघताना आपल्याही नकळत झालेल्या जखमा, ओरखडे दिसतात. आधी ते जाणवत नाहीत पण् दृष्टीस पडले रे पडले की दुखायला सुरुवात होते.
आधी ती वेदना कुठे असते? आधी ते खरचटणं दुखत कसं नाही?

--

२ एप्रिल, २०११


मला कधीकधी असं अजबच फ़िलींग येतं की माझं शरीर, डोकं चालंय खरं पण ते मी चालवत नाहीये, ते आपलं आपो‌आपच चालतंय. मी सगळी शस्त्रं टाकून हातावर हात टाकून बसले तरी ते असंच चालत राहणारे. हताश फ़िलींग आहे खरी. मला थांबायचं असतं, कुठेतरी टेकायचं असतं, निदान पाच मिनीटं कोणताही विचार डोक्यात ये‌ऊ न देता पडायचं असतं.

विचारांचा अतिरेक झालेल्या दुखरया मनांकरता कोणतं मलम, औषध असतं का हो?

१२ एप्रिल, २०११

आपल्याला राग आला असेल, आपण असमाधानी असू, आपल्याला दु:ख, वैफ़ल्य असेलच तर काय करायचं काय अं?
विझू विझू डोळ्यांनी बद्द आवाजात ’इतनी शक्ती हमें देना दाता’ म्हणत राह्यचं की चॉकलेट्स चे बार मागून बार संपवत कुल्ले वाढवत एकामागून एक ’आत्मविश्वास’, ’पर्स्यूट ऑफ़ हॅप्पीनेस’ सारखे फ़ंडेबाज पिक्चर बघायचे ? की मग श्री श्री रविशंकरांचा ’Art of Living' चं डीप ब्रीदींग करायचं?
गहरी सांस अंदर...एक दो तीन चार...
गहरी सांस बाहर, एक दो तीन...
असं बावीस हजार चारशे चाळीस वेळा केलं की तुमच्या आठ्या नाहीशा होणार, तुमची पिंपल्स जाणार, तुमच्या मेंदूवर सुखाचा दाट तवंग पसरणार.

१४ एप्रिल, २०११

वॉट इफ़ मला जे आता मिलवावेसे वाटतेय त्याला वर्षा-दोन वर्षाने काही अर्थच उरलेलाच नसेल? त्यात मला वाटणारं थ्रिल नाहीसं झालेलं असेल?
१९व्या वर्षी एक एकतर्फ़ी प्रेम-प्रकरण, २२व्या वर्षी एक उडत-उडत , मग सव्वीसाव्या वर्षी लग्न करुन आज पार्टीला कोणते कपडे घालू, पार्टीला कोणता मेन्यू ठेवायचा? हे डिस्कस करत आयुष्य घालवायच्ं ही सुद्धा ऍंम्बिशन् असू शकते असं केतकी म्हणत् होती. तिच्या मते एव्हढं झालं म्हणजे साथा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्ण.
यांवर मी एव्हढंच म्हटलं, "या‌ईक्स्!"

२७ एप्रिल, २०११


पुनश्च निरगाठी आणि तेरु‌ओ.
गौरी हा प्रकार सर्वात जास्त करते. ग्रीसची झाडं इकडे आणून लावली, इकडली उपटली ती तिथं जपानात जा‌ऊन लावली. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ती ’सारीच’ चांगली वाढतात, फ़ोफ़ावतात. आपण मूळचे याच मातीतले आहोत असा आव आणत मूळच्या देशातून पार मुळापासून उपटून परक्या मातीत आणून रुजवलेलं एखादं-दुसरं झाड जगेल, पण सगळीच? काहींची मुळं हळवी असतात, काही मूळ मातीशी असलेली नाळ तोडून टाकू शकत नाहीत म्हणून कोमेजतात, या शक्यतांना अजिबातच जागा का असू नये?

२८ एप्रिल, २०११


रात्री मच्छर मारायची बॅट घे‌ऊन जागच्या जागी नाचत असताना विचार आला की साला, "एक मेंढरु होतं, ते जन्मापासून मरेपर्यंत धनगराकडेच राहिलं. ते कधीच हरवलं नाही.  लांडग्याने कधी चुकूनसुद्धा त्याच्याकडे नजर वाकडी करुन बघितलं नाही.ते खूप वर्ष जगलं आणि शेवटी नैसर्गिक मरण मेलं" अशा मेंढरावर कधी कथा का लिहीली नाही कुणी? असं घडत नाही का? घडतं. इतक्या मिडीयॉकर मेंढरावर कशी आणि काय लिहायची कथा म्हणून? कथा लिहीली जाण्यासाठी त्याला कुठल्यातरी लांडग्याने पळवायला हवं, त्याने आपल्या इवल्याशा मेंदूची करामत दाखवून स्वत:ची सुटका करुन घ्यायला हवी, धनगराची थोडीफ़ार धावपळ व्हायला हवी, तर कथेत काहीतरी पाणी घालता ये‌ईल ना?
तुमच्या आयुष्यातील नाट्याचा अभाव तुमचं आयुष्य सपक करुन टाकतो.

आपल्यावरही कोणीतरी लिहायला हवं असेल तर हातपाय हलवायला लागतील राव!

--

७ मे, २०११

मुराकामीचं ’काफ़्का ऑन द शो‌अर’ वाचतेय.
कदाचित शेवटचं पान संपायच्या आधी मी मरुनही जा‌ईन. याच्ं शेवटचं पान कुठेय्, कसं असेल हे न जाणून घेताच. मी मरुनच गेले तर तीही एक कथाच हो‌ईल नाही?-खूप रंगवत आणलेली पण शेवट हरवून गेलेली.

११ मे, २०११

मी किती हाय मेंटेंनंस मुलगी आहे हे आशूला पटलंसुद्धा होतं. का पटलं? त्यालाही कुठेतरी मनात माहीत होतं म्हणून की त्याच्या डोक्यातून माझा विचार कायमचा बाद करायचा या इर्षेने पेटलेल्या माझी कन्व्हिंसिंग पॉवर बाप म्हणून? कारण त्याने जास्तवेळ नेट लावून धरलाच नाही. तसा धरला असता तर माझा इगो सुखावला असता का? अर्थात! पण त्यानंतर बोलणं-चालणंही न होता पार बोलताही ये‌ऊ नये अशा ठिकाणी जा‌ऊन बसून त्याने माझा सूड उगवायचा तो उगवलाच. त्यावेळी आपण ताणून धरलं नसतं तर आज मी जशी आहे तशीच असते का? पण या ’जर-तर’ ला आता या क्षणी अर्थ नाही पण अर्थ असलेल्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं काही बंधनही नाहीये. अशा अर्थ-निरर्थकाची पाचशे सत्तावीस भेंडोळी माझ्या डोक्यात पडून आहेत-ज्याची कुणाची आहेत त्यांनी घे‌ऊन जा हो!

१३ मे, २०११

असं खूप वर्षांपासून चाल्लंय की मी जे बोलत असते तेच मला म्हणायचं नसतं बहुतेक वेळा. शब्द सापडत नाहीत कित्येकदा. जे सापडतात ते चुकीचे असतात. मला जे म्हणायचं असतं त्याच्या बरोब्बर उलटा अर्थ निघतो त्यातून. हे खरोखरीच डिप्रेसिंग आहे.

हे मला माहित नसेल का? असतं. पहिल्यांदाच कळतंय असं तरी आहे का? तर नाही. पण असंय की उलतसुलट विचार करणं, तो ही वारंवार- अंगवळणी पडून गेल्यासारखं झालंय.
मी माझ्यासाठी बनवलेला स्पेशल नरक आहे तो. कस्टममेड.

२६ मे, २०११


कुठल्यातरी एका बिंदूत प्रचंड रस असल्यासारखं डोळे खिळवून आंधळ्यासारखं बघत बसलं की रडं आवरता येतं.
मस्त! वारंवार वापरुन बघायला हवं.

२८ मे, २०११


आ‌ईला असं सला‌ईन वर ठेवलं होतं आणि मला अचानक चिकन सूप प्यावंसं वाटायला लागलं. आपली आ‌ई समोर बिछान्यावर कण्हतेय आणि आपल्या जिभेने अशी ल्हा ल्हा करावी याचं मला सखेद आश्चर्य वाटलं.
मोह कोणाला सुटलेत?
तुतानखामेन म्हणे वयाच्या अठराव्या वर्षी मेला. त्याचं तर किती काय काय भोगायचं राहिलं असेल. आज सत्ताविशीतही मी किती काय काय करायचं राहिलंय याची लंबी चौडी लिस्ट बनवतेय. मी उद्या फ़टकन मरुनच गेले तर नि:संशय ओल्ड मॉंक्च्या बॉटलवर, च्या फ़ा‌ऊंटन पेनवर, कॅननच्या एस.एल.आर कॅमेरयावर जाऊन बसेन.

--

५ जून, २०११


तुम्ही इतरांसारखे असता तेव्हा इतरांसारखेच वागता, इतरांसारखंच वागता तेव्हा इतरांसारखाच विचार करता.

६ जून, २०११


हे अशा-तशामुळे झालं, याचा अर्थ असा-तसा, त्यामुळे असं-तसंच असं बरंच काही..या असल्या विश्लेषणामुळे प्रश्न आणखी बिकट होत जातात के सोप्पे-हे मला अजून सांगता येत नाही.

११ जून, २०११

मी खूप सारया जणांना खूप खूप पत्रं लिहीली पण खरं सांगायचं झालं तर मी त्या पत्रांत काय लिहीलं होतं हेसुद्धा मला आठवत नाहिये- लिहीलं ते फ़ारच बेक्कार होतं का? अशी भीती वाटते मात्र.
कारण्-
मला खूप खूप काहीतरी म्हणायचं असतं आणि जे काही म्हणायचंय त्याचा काही अंशच मी शब्दात उतरवू शकते, माझा आवाकाच तेव्हढा आहे आणि मला ते पक्कं ठा‌ऊक आहे.

२६ जून, २०११


मुसळधार पा‌ऊस कोसळत असतो तेव्हा तुम्ही जगात एकटे एकटेच आहात असं का वाटत राहतं? डोंगरमाथ्या, गडकिल्ल्यांवर आपण असे अतृप्त आत्म्यासारखे तळमळत का असतो? पुढे काय पेक्षा काय झालं याची उजळणी का करतो?

३० जून, २०११


एक मुलगी होती.
एकदा काय झालं, नेहमीचेच परिचित वास, परिचित सूर याचा तिला इतका कंटाळा आला की एके दिवशी ती जंगलात निघून आली.
पण तिथल्या न माणसाळलेल्या झाडांना, पुराणवृक्षांना बुजूनच वावरत राहिली.
जंगलही तिच्या मागावर होतंच्.
वारयाला पलीकडे जायला तिच्या अंगावरुनच जायला लागत होतं. ती कुठल्या दिशेने चाल्लीये याची वर्दी पात्यांची लवलव जंगलालापर्यंत पोहोचवत होती.
पण बाहेरच्या जगापेक्षा हे जग तिला भावलं. पुढे जंगलालाही तिचा गंध परिचित झाला. तीही सरावली.
एखाद्या झाडाच्या घरट्यांअधली चिमणी थंडीत कुडकुडत स्वत:शीच काय् बोलत असते किंवा दूर् तिथे एक् चिंट्या रॉबिन झाडाच्या फ़ांदीशी किंवा हवेशी काय कुजबुजतो आहे हे तिला कळू लागलं.
ती जंगलकन्याच झाली.
चारी बाजूला इतकं सुंदर काय काय होतं की अतिसौंदर्याने तिची वाचा बसल्यासारखी झाली. बोलण्याची गरज मिटली.
हे सगळ्ं सौदर्य पि‌ऊन ताकायचं या निश्चयात वर्षं लोटली. सगळं न्याहाळत एके जागी बसून बसून तिचं लाकूड झालं. जंगलाला तिचा गंध ये‌ईनासा झाला. जंगल वेडपिसं झालं. त्याने सर्वांना त्या जंगलकन्येच्या शोधात पाठवलं.

तेव्हापासून् ती भित्री फ़ुलपाखरं सारखं कशाच्यातरी शोधातच असतात..
पक्षी मध्येच वेडा  कालवा करत् सुटतात.
ससे कायम् काहीतरी विचारणा करणारेत असं वाटतं.

ऐकली आहे का ही कथा? नसेल ऐकली-मी आत्ताच बनवली.

मला एक ससा दिसला होता मागे एकदा . असं नाही वाटत त्याला काहीतरी म्हणायचं असतं? तो नुसताच त्या भित्र्या , वाटोळ्या डोळ्यांनी आपल्याकडे बघत राहतो. आपण थांबून राहतो, ताटकळत रहतो की हा आता बोलेल , मग बोलेल, पण तो बोलत नाही. कुठेतरी धूम पळूनच जातो. मग आपण आपला मूर्खपणा, वाया गेलेला वेळ, "बोलला असता तर बरं!" असं संमिश्र काहीतरी वाटून घेत चालु पडतो. वाघ परवडले कधीकधी पण हे असले ससे नकोत.

--


१४ जुलै, २०११

मी सत्तूला बरंच लिहून पाठवलंय एव्हाना. आवडलेलं गाणं, टपोरल्या कैरयांबद्दल, पावसात गाळून आलेल्या प्रकाशाबद्दल, कुशंकबद्दल, माझ्यासाठी मेर्वानचा केक आणणारया पारशिणीबद्दल, गुलझारबद्दल, मीमॉबद्दल, तिला मी आवडते हे तिनं स्वत:शीच् पक्कं ठरवल्यानंतर तिनं कधीच न सोडलेल्या पिच्छ्याबद्दल.. मीमॉ मांडीत गुरगुटी मारुन झोपलेली असताना लिहीलेली कित्येक पत्रं आहेत.
त्याला कायकाय लिहून पाठवलंय हे मी पुन्हा पुन्हा वाचते आणि आपण प्रेमात पडल्यावर नव्याने किती भाबडे बनू शकतो याची जाणीव नव्याने होते.

--

७ ऑगस्ट, २०११

हं हं हं...

मौ मौ अंग तुझं
उन्हात सारखं जा‌ऊ नये
ट्रेक करु नै
तू हे करायचं नै
हे घालायचं नै
असं चालायचं नै
असं बघायचं नै
 हं हं हं
ला‌ईफ़ वाझ ला‌ईक अ ड्रे‌अरी स्लिपरी जेल
ला‌ईक अ मंडुक इन अ शॅबी मॉसी वेल

ही घे दोरी, घाल तुझ्या गळ्यात
नाच चल. ह्या‌ईक sss

हे गाणं माहित नसेलच. याला ’नातीगोती सॉंग’ म्हणतात किंवा ’मेन कोर्स’ सॉंग. तुमच्ं अफ़े‌अर/प्रकरण/रिलेशनशिप ऐन बहरात असताना हे सुचू शकतं. हे बद्द, मद्दड आवाजात गायलं तर जास्त भिडतं. आपापल्या आवडत्या गाण्यांच्या चालीवर कस्टमा‌ईजही करता येतं.

आपण नाचलोच...नाही का?
Warum ? का?
ती बंधनं अचानक हवीहवीशी वाटली होती. का नाही ती जोखडं तेव्हाच भिरकावून लावली?
Warum nisht? का नाही?


२१ ऑगस्ट, २०११

२१ व्या वर्षी मला धार्मिक बाबींकडे कल असलेले पुरुष आवडायचे, २३ व्या वर्षी नास्तिक, विक्षिप्त, लहरी तर २५ व्या वर्षी शांत, समजूतदार, सहनशील.
यला चॉ‌ईस बदलणं म्हणतात की मुळातच चॉ‌ईस नसणं म्हणतात?
मी सत्तूच्या प्रेमात पडले तेव्हा माझी मन्:स्थिती नक्कीच ठीक नसली पाहिजे.

२३ ऑगस्ट, २०११

आज अचानक हरक्युलीसने टायरोस साठी केलेलं नवल आठवलं.
हर्क्युलीजने परपोरा जातीच्या २००० गोगलगायी पाण्यात भिजवत ठेवून त्याच्या प्रेयसीसाठी-टायरोजसाठी, १ ग्रॅम जांभळा डाय मिळवला होता.
आमच्या नगाने अगदी व्हिव्हिडली लक्षात रहावी अशा झिंज्या ओढून केलेल्या मारामारया, अद्वातद्वा, भयानक टोचणारया शाब्दीक हाणामारया एव्हढंच दिलं.

--

१५ सप्टेंबर, २०११

खोलीभर पसरलेल्या उखीरवाखीर पसारयात बसून मी विचार करतेय की आपल्याला आता होतंय ते नक्की दु:खच आहे का की हायपर ऍंक्झायटीमुळे आलेला नंबनेस? आपल्यात नुकतंच कोणीतरी मोठं भोक पाडून गेलंय असं का वाटतंय मग?  काल जे काही घडलं त्यानंतर आपल्याला कसं वाटणं अपेक्षित आहे? झिनी म्हणत होती "ओह! इट मस्ट बी सो पेनफ़ुल फ़ॉर यू!"
पेन? वेदना? खरंच की. आपल्याला वेदना होत असणारच. कुठे? कुठे? घशात खूप काहीतरी दाटून  आलंय, थ्रोट इन्फ़ेक्शन नसावं, वेड्या पेशंट्स ना शॉक द्यायला नोड्स लावतात तिथे सगळं दुखरं दुखरं झालंय. विचार डोक्यात दाटसर वाटणासारखे घर्र घर्र करत फ़िरतायेत. त्याला वेदना म्हणतात?
विद (द पायमोड्या) ज्ञाने धातूपासून वेदना शब्द बनलाय , म्हणजे ज्ञान होणे,(हो हो, सातर्डेकर मास्तर, तुम्ही ग्रेट आहात, मग तर झालं?) कसलं घंटा ज्ञान मिळालं आपल्याला? काल दहा वाजून सात मिनीटांनी सत्तू दार आपटून गेला तेव्हापासून ते आता दुपारचे बारा वाजून पंचेचाळीस मिनीटं झाली तरी ज्ञानाचा एक कण मिळाल्याचं नुस्तं वाटत देखील नाही.
तो " जा गं! काही फ़रक नाही पडत मला. मी एकटाच खूप आनंदात आहे"
किंवा आपण असह्य तिडीकीने "बरं झालं पीडा गेली!"  असं एकमेकांना तळतळून बोललो तेव्हा?
तोच तो अश्मयुगीन झगडा.
मी कायम त्याचा विचार केला आणि तो मुळीसुद्धा माझा विचार करत नाही. अपण ज्या माणसांचा कायम विचार करतो ती माणसं आपला इन फ़ॅक्ट किती कमी विचार करतात. असं नेहमीच का होतं? फ़क्त माझ्याच बाबतीत होतं की खूप जणांच्या?
मला यावर कोणाशी तरी बोलायला हवंय. कोणाशी पण?

२२ सप्टेंबर, २०११

मी आरशातल्या मझ्याकडे न समजलेपणाने बघत असते आताशा. आता या आरशाकडे बघून स्वत:ची नव्याने ओळख करुन घेतली पाहिजे. ही मीच बरं. सत्तूशिवायची. माझ्यातून सत्तू वजा जाता उरतं काय? मी उणे सत्तू शून्य मुळीच नाही.
आपली प्रतिबिंब या आरशात अडकत असतील? ती प्रतिबिंब एकत्र करुन एखादी सीडी करता ये‌ईल का?
आणि हे सर्व नाटक नेमकं कितव्यांदा घडतंय बा‌ई? खड्ड्यात पडायची भारी हौस तुला.

--

१ ऑक्टोबर, २०११


नंतर नंतर तमाशे नकोत म्हणून खूप गोष्टी टाळल्याच आपण, चलता है म्हणत राह्यलो, मी हे केलं नाही तर बरंच अशी स्वत:ची समजूत घालायला शिकलो.  तो सांगतोय ते करण्यात आपलं भलंच आहे किंवा त्यातून काही चांगलंच निष्पन्न होणार आहे, आपल्याला ते आवडून घ्यावंच लागेल असं म्हणत आपलं केलंसुद्धा. या सीडीने सत्तू कसाकसा आणि कुठे चुकला हे पुराव्याने दाखवता आलं तर? त्याच्याकडेही मी कशी चुकले हे दाखवणारा आरसा असेल तर?

४ ऑक्टोबर, २०११


कायम सत्तूभोवती विणलेलं आयुष्य, त्यामुळे त्याच्या नसण्याने आयुष्याचा सेंट्रॉ‌ईड सटकल्यासारखा झालेला..
एकप्रकारचा व्हॉ‌ईड येतो मग. तो व्हॉ‌ईड आपण करीयर, पैसा, एस्थेटीक्सने भरायला बघतो कसाबसा.
आपल्याला हे असलं जे मनोमन नेमकं ठा‌ऊक असतं त्याचीच भीती सर्वात जास्त वाटते.
मग मी मनातल्या मनात मेंढ्या मोजायला सुरुवात करते.
एक मेंढी आली..कुंपणावरुन पलीकडे गेली
दुसरी आली..तिला सत्तूचा चेहरा होता
तिसरी आली..तिचे नाक लांबलचक, केस खरबरीत, वेडेवाकडे..सत्तूसारखेच
चौथी मेंढी आलीच नाही..आला तो सत्तूच.
श्शू SSSSSSS पुरे!
मेंढ्याज आर नॉट हेल्पिंग मी आ‌ऊट.

बा‌ई! एका पुरुषापायी असं पोचे आलेल्या बाटलीसारखं चुरमडत जाणं शोभतं का तुम्हाला?

८ऑक्टोबर, २०११


सत्तूला दाखवतेच आता..त्याला कसं दुखवू शकू हाच आयुष्याचा संदर्भ हो‌ऊन बसल्यासारखं झालेलं.
दु:ख दाबून शरीर सुजतं, चेहरा करपतो, काळाठिक्कर पडतो.
माझं तेच होणारेय बहुधा. म्हणून लिहीतेय.

१५ ऑक्टोबर, २०११

विसरायचंय विसरायचंय
पण कसं?

१६ ऑक्टोबर, २०११


प्रेम, लव्ह या कल्पनांवरचे आपले समज.व्याख्या आपण बनवतो तेव्हा त्या बहुतेक दुसरयाकडून बॉरो केलेल्या असतत आणि थोड्या वेळाने त्या खरंच आपल्याच आहेत असं वाटायला लागतं.

१८ ऑक्टोबर, २०११


आपण शेणा-मेणाचेच असतो मग उगाचच स्टीलचे असल्याचा आव का आणायचा?

१९ ऑक्टोबर, २०११

जंगली फ़ुलांना फ़ार टेम्टींग उ‌बदार, खारट वास असतो. त्या फ़ुलांना अश्रूंची फ़ुले म्हणतात, सत्तू म्हणायचा. असं काहीतरी बोलायला त्याला नेहमीच जमायचं हे ही नंतर कळलं.

--


१ नोव्हेंबर, २०११


एक क्षण समोरच्या करंजाच्या झाडाखाली सत्तू उभा असतो.त्याच्या कपाळावर आठ्या नसतात. अगदी शांत असतो.
तो काहीतरी बोलत का नाहीये?
फ़ार छान हसायचा तो. प्रत्यक्ष हसण्यालाही हसु फ़ुटेल असं हसणं होतं त्याचं. डोळ्यांच्या कडांपासून उमलत, वर्तुळांमधून त्याच्या चेहरायवर पसरत थेट आपल्या‌आत उमटणार्ं.
फ़क्त हसण्यावर नाती टिकत नाहेत दुर्दैवाने. सगळ्या सुंदर देहांमध्ये कढवलेलां तूप, लोणची, एकादशीची व्रतं, सोळा सोमवार, सत्संग, चिक फ़्लिक्स, भावुक् कादंबरया यांच्या रासायनिक् प्रक्रियेने तयार् होणारा आत्मा असतो.

आणि दुसरयाच क्षणी सत्तू नाहीसा झालेला असतो.

आज त्याच्या हसण्याचा आवाज फ़ुटला नाही, कल्पनेतही कानाभोवती फ़िरकला नाही-एकदाही नाही. मला कसं अगदी चुकचुकल्यासारख्ं झालं, त्याचवेळी सुटल्यासारखंसुद्धा.

२ नोव्हेंबर, २०११

मला काय हवंय हे मला फ़ार पहिल्यापसून माहीत होतं. नंतरच्या कटू भांडणामधूनही माझं ते भान, कधीच सुटलं नाही. आपण गृहीत काहीच धरायचं नाही कारण तसं धरलं तर त्यापुढची सगळी जबाबादारी आपल्यावरच पदते, हे खूप पहिल्यापासून माहित होतं, समजावून ठेवलं होतं स्वत्:ला. जे होतं तेव्हढंच असतं असं का मानू नये? जे नाहीये त्याच्या शोधात दूरदूर का जावं?

पण त्याची समजूत केव्हाच संपली. उरला तो फ़क्त हट्ट. मी त्याचे हट्ट् समजून घेत नाही असंच पटवत राहिला तो स्व्त:ला. त्याला हवं आहे, आपल्याला नको आहे, इतकाच काय तो केविलवाणा अर्थ उरला.

११ नोव्हेंबर, २०११

आपण समूहात गात असतो. आपली तंद्री लागते. पण अचानक भानावर् येतो तेव्हा इतरांपेक्षा पार वेगळ्याच ताल-सूर आणि लयीत गातोय असं लक्षात येतं आ‌अणि आपण चपापून सूर ऍडजस्ट करतो..
त्या‌आधी जी बह्र्मानंदी टाळी लागली तिचं काय होतं मग?
तर हे असले मोनोलॉग्ज होतात..
खुप् गोंगाटात कोणी सहज गा‌ऊन जावं तसे येणारे.
आणि मग लख्ख ऊन पडल्यासारखं वाटतं.


२० नोव्हेंबर, २०११

मी मोझार्ट नाही, मी थोरो सुद्धा नाही. या माणसांना समस्त प्राणीमात्रांच्या दु:खाचा पोत कळतो, मला माझ्या वेदनेला सामोरं जाता येत नाही. अवघड ठिकाणी झालेल्या गळवासारखं मी ते दु:ख जपत राहते, ठणका सहन करत राहते?
का??
वेदना मुरवत ठेवली की ती भिनते, एका गाफ़ील क्षणी आपला ताबा घेते.
वेळीच भिडलं नाही तर..

--

१ डिसेंबर, २०११


जेव्हा सगळं सुस्पष्ट असतं, लख्ख दिसत असतं, जाणवत असतं तेव्हा त्याच्याबद्दल एक ओळ लिहीता येत नाही पण तेच आठवणींमध्ये बदललं की त्याबद्दल खूप काही सुचायला लागतं, ते चक्क कागदावर उतरवताही येतं.

२८ डिसेंबर, २०११


प्रिया तेंडुलरच्या एका कथेत एक बा‌ई तिचं पोटात मेलेलं मूल मिरवत एक पूर्ण दिवस हिंडते. नसलेल्या मुलाचं कौतुक करुन घेते, त्याच्यापासून तिला धोका आहे हे माहित असून.
मला हा विषारी राग मिरवावासा वाटतो. आताही मी तेच करतेय, नाही का?
बट, इव्हेंच्यु‌अली, यू हॅव्ह गॉट टू ड्रेन इट. समहा‌ऊ, एनीहा‌ऊ.
ला‌ईक आय ऍम डूईंग इट ना‌ऊ.

३० डिसेंबर, २०११

Lebhaftigkeit म्हणजे जीवनोत्सुकता, passion for life
इतक्या लांबलचक्, कंटाळवाण्या वाटणारया शब्दाचा अर्थ् हा असा, मुद्द्याचा. पॅशन्? ती तर असलीच पाहिजे.
मग् काय् तर्!
उत्तिष्ठीत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत.

--

प्रत्येक येणारया वर्षी मागची डायरी वाचताना  निरुला त्यातलं खरं किती आणि बनवलंय किती हे तिचं तिलाच सांगता यायचं नाही.
पण ते इम्मटेरियल होतं.
ज्याच्या कुणाच्या हातात पडेल त्याला आपण कसले भारी आहोत हे वाटायलाच हवं एव्हढंच काय् ते तिला मनापासून वाटायचं आणि तसं वाटणारच याची तिला मनापासून खात्री होती.
ती त्यातच खूष होती.
तिच्या मित्रांना तसं वाटलं, मैत्रिणींना वाटलं, बॉयफ़्रेंडला वाटलं, मेंटर्सना वाटलं,वाचकांना वाटलं, मुलांना वाटलं, सुनानांही वाटलं.
तिची खोटी तिलाही काही काळाने खरीच वाटायला लागली.
लिहीलेला प्रसंग खरंच घडला की आपण तो कल्पनेत रचलाय् हे तिलाही छातीठोकपणी सांगता नसतं आलं.
ती खरी काय आहे हे कुणालाच मा‌हीत नव्हतं- अगदी शेवटपर्यंत..
ती सोडून.
कदाचित-तिलाही ते कधी माहित नव्हतंच..


 
Designed by Lena