’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

--

घड्याळातल्या चिमणीने 10वेळा बाहेर ये‌ऊन चिवचिव केली तशी अनू-मनूने बाथरूममध्ये धाव घेतली. चमकदार लाल-निळया टूथब्रशवर चमचमती टूथपेस्ट घे‌ऊन श्रद्धाने शिकवल्याप्रमाणे अप अँड डा‌ऊन, रा‌ऊंड अँड रा‌ऊंड करत दात स्वच्छ घासले. श्रद्धा यायला अवकाश होता तोवर थोडीशी पेस्ट खा‌ऊन घेतली आणि त्यावर चुळा भरून तोंडातून पाण्याचे बुडबुडे काढण्याचे चमत्कार केले. एरव्ही त्यांनी पाण्यात अजून खेळ केला असता पण बरोबर साडेदहाला श्रद्धा बेडरूममध्ये येणार होती आणि आजपासून ती त्यांना प्रत्येक रात्री एक गोष्ट सांगणार होती. त्यामुळे अनू-मनूने पाण्यातला चाळा थांबवला, तोंड कोरडं केलं, आपले सारखे सारखे इवलेसे नायटी घातले. दोघी पलंगावर उड्या मारून आपल्या जागी बसल्या. बाबा आज तरी झोपेत कॉटवरून पडू देत नको अशी प्रार्थना दोघींनीही गॉड ऑलमायटीकडे केली आणि आपल्या दुलया अंगावर घे‌ऊन त्या श्रद्धा येण्याची वाट पाहू लागल्या.

बरोबर साडेदहाला श्रद्धा आत आली तशी अनू-मनू टक्क जाग्या आहेत आणि आपण त्यांना गोष्ट सांगणार आहोत याची श्रद्धाला आठवण झाली. श्रद्धा नुकताच एक लेख आटपून आली होती, त्या व्यापात तिला पोरींना कोणती गोष्ट सांगावी हे ठरवायचंही सुचलं नव्हतं. पण आज सुटका करून घेता येणार नव्हती.

"तर अनू-मनूला आज गोष्ट सांगायची आहे नैका?"

उत्तरादाखल अनू-मनूने दुलया गळ्यापर्यंत ओढून मजेत माना हलवल्या.

"तर मग त्यांना कोणती गोष्ट ऐकायची आहे? ससा-कासवाची की राजकुमारीची?"

"ह्यॅट!" इति मनू. उठून बसत- "बाबाने आम्हाला त्या सगळ्या (ळ्या वर हात खांद्याच्याही पलीकडे ताणले जातात)गोष्टी सांगीतल्या आहेत."

"तू आम्हाला ’इन्टेलिजण्ट’ गोष्ट सांग." मनूपेक्षा अवघं एक मिनीट मोठी असलेल्या अनूची ’इन्टेलिजण्ट’ बोलताना भंबेरी उडते खरी पण ते ती टेचात निभावते. "बाबा म्हणाला की श्रद्धा तुम्हाला ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी सांगेल."

दोघीही आता मांडी घालून, मुठी हनुवटीवर ठेवून ऐकण्याच्या तयारीत

"असं म्हणाला का बाबा?" (मनात- बाबाच्या नानाची..) "बरं. मग ऐका तर.."

"नंदीपूर नावाचं एक गाव असतं. नंदीपूर गावातलं शंकराचं मंदीर आणि त्यापुढचा मोठ्ठा नंदी खूप प्रसिद्ध असतो. (मनूचे समोरचे दोन दात पडलेले आहेत. त्या खिंडारातून जीभ लावत ती हळूच ’प्रसिद्ध’ म्हणून पाहते हे श्रद्धा डोळ्याच्या कडेतून पाहते.) त्या शंकराच्या मंदीराच्या आवारात आपल्या अनू-मनूसारखी दोन मोठी आवळी-जावळी आंब्याची झाडं असतात."

"पण मी मनूपेक्षा मोठी हाये." अनू आवर्जून सांगते

"हो, माहितेय. ती आंब्याची झाडं असतात कीनै म्हणून त्यापैकी एकाचं नाव असतं रांबा आणि दुस-याचं नाव असतं सांबा"

दोन्हीही पोरी तोंडावर हात ठेवून खुसखुसतात.

"तर अनू-मनूपैकी कोण होणार रांबा-सांबा?"

"मी रांबा होणार." एका क्षणाचाही विलंब न लावता अनू अंथरूणावर उठून उभी राहते. हात डोक्यावर घे‌ऊन झाड असण्याची भूमिका करत उभी राहते. चंद्र-तारे वागवणारा नायटी घालून उभा असलेला तो फारच गोड रांबा आहे असं श्रद्धाला फार वाटतं.

"मग मी सांबा." मनूला फारसा काही चॉ‌ईस उरलेला नाहीये त्यामुळे ती हिरमुसली झालेली आहे. तिला रांबा व्हायचं होतं हे स्पष्ट कळतंय. पण ती यावर तोडगा काढते. "..आणि सांबाला गोष्ट ऐकताना श्रद्धाच्या मांडीवर बसायला मिळणार, होकीनै?"

यावर रांबा गडबडतो. पण आता उशीर झालेला आहे. सांबा उडी टाकून श्रद्धाच्या मांड़ीवर स्थानापन्न झालेला आहे.

"तर.." गोष्ट एकदाची सुरू होते.

"रांबा सांबा जुळे भा‌ऊ असले तरी त्यांच्यात खूप मोठा फरक असतो. रांबा नेहमी खरे बोलत असतो आणि सांबा नेहमीच खोटं बोलत असतो."

"य्ये.. मी नेहमीच खरे बोलते.." रांबा हात उंचावलेल्या पोझिशनमध्येच दीड पायावर नाचत गोल-गोल फिरायला लागतो. यावर प्रतिक्रिया म्हणून सांबा मान वर करून श्रद्धाकडे पाहते आणि श्रद्धा सांबाकडे. दोघीही डोळे फिरवून पुन्हा रांबाकडे पाहतात.

रांबा-नृत्य थांबतं तोपर्यंत गोष्ट कशी प्रोसीड करावी याबद्दल श्रद्धाचा थोडा विचार करून झालेला आहे.

"रांबा-सांबाचे स्वभाव पूर्ण गावाला ठा‌ऊक असतात. शंकराच्या मंदीरात लहान मुलं खेळायला जात असत आणि लपाछुपीचा खेळ खेळत असत. ज्याच्यावर राज्य असायचं तो रांबालाच पहिले विचारत असे. "अरे ए रांबा, गोपू कुठे लपला आहे रे?" रांबा सत्यवचनी. तो सरळ सांगून टाकायचा. "गोपू नं? तो बघ माझ्या उजव्या बाजूच्या बेचक्यात लपला आहे." मग गोपूला राज्य घ्यायला लागायचं. तो रडवेल्या चेहऱयाने लपण्याच्या जागेतून बाहेर यायचा. त्याचा रडका चेहरा पाहून रांबाला खूप वा‌ईट वाटायचं, मग तो त्याला एक गोल-गरगरीत, रसाळ आंबा द्यायचा."

"आंबा?" दोन्ही पोरींचे डोळे पैशा‌एव्हढे गोल गरगरीत झाले आहेत. आंबेखा‌ऊ बापावर गेलेल्या पोरी.

"तर सांबाची गतच वेगळी. रांबा नेहमी मुलांना आंबे कुठे आहेत, कुठल्या बेचक्यात आंबे जास्त लागले आहेत हे सांगे. पण सांबा? छे! आंबे असायचे एकीकडेच पण सांबाच्या खोटं बोलण्यामुळे मुलं चढायची भलतीकडेच. त्याच्या फांद्यावर पतंग अडकायचा तेव्हा तो रांबावर अडकला आहे असं खुश्शाल सांगायचा. मग मुलं रांबावर चढून शोध-शोध शोधायची आणि पतंग मिळत नाही म्हणून रडकुंडीला यायची. त्यावर सांबा खो-खो हसायचा."

"दुष्ट सांबा-" मनू ऊर्फ रांबा फिस्कारते. सांबाची मान खाली.

"मग?"-अनू

"मग रांबाला विचारल्यावर तोच खरंखरं काय ते सांगायचा आणि मुलं सांबावर चढून पतंग शोधून काढायची. पण गावातल्या सर्वांना ते आपले वाटायचे त्यामुळे त्यांचे स्वभावही गावकऱयांनी आपलेसे करून घेतले होते. अनू नाकात बोटं घालते हे बाबा कसं चालवून घेतो तसंच."

अनूचं नाकातलं बोट मुकाट निघतं. अनू निरूत्तर झालेली पाहून सांबा खूष.

"एके रात्री काय होतं की दोन माणसं घोड्यावर दौडत गावात येतात आणि त्यांच्या दृष्टीस पडतो सांबा. ती माणसे घोड्याच्या जीनला लावलेल्या थैल्या सोडवतात आणि त्या सांबाच्या फांद्यांमध्ये लपवून ठेवतात."

"पांडवांनी शमीवर त्यांची टूल्स ठेवलेली तशी.." अनूची ’इन्टेलिजण्ट’ भर

"हो, तशीच. थैल्या लपवून झाल्यावर ते सांबावर केवळ त्यांनाच कळेल अशी खूण करून ठेवतात आणि आले तसे घोड्यावर बसून दौडत पुढे निघून जातात."

"मग काय होतं?" (याशिवाय जगातली कोणती गोष्ट पुढे गेली आहे?)

"त्यानंतर अजून काही लोकं घोड्यावर बसून त्याच जागी येतात. त्यांनी अंधारात दिसू नये म्हणून काळे कपडे घातलेले असतात, तोंडावरूनही काळे फडके ओढून घेतलेले असते. आधी तिथून गेलेल्या लोकांनी थैल्यांमध्ये लपवलेला खजिना रांबा-सांबापैकी एकावर लपून ठेवलेला आहे असा त्यांचा अंदाज असतो."

"ते चोर असतात का?"- अनू

"कशावरून गं?"

"नाही, बाबाच्या गोष्टीतले चोर पण नेहमी काळे कपडे घालतात."

"हं. (जे जनरलायझेशन होतंय करत श्रद्धा त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही) मग ते पहिले रांबाच्या समोर येतात. थैल्या रांबावर लपवून ठेवल्या आहेत का याची विचारणा करतात. पण रांबावर थैल्या नसतातच मुळी.. त्यामुळे रांबा खरंखरं काय ते सांगतो. तो म्हणतो," थैल्या माझ्याकडे नाहीत.""

"पण ते काही त्या गावात राहणारे नसतात. त्यांना रांबा-सांबाची खासियत माहित नसते. त्यामुळे रांबा खरं तेच सांगतोय यावर त्या काळ्या डगलेवाल्यांचा विश्वास बसत नाही. मग ते काय करतात, तर कु-हाडी, कोयते आणतात आणि रांबाला डोक्यापासून पायापर्यंत सोलून काढतात. एकही फांदी तोडायची ठेवत नाही."

मनू मटकन खाली बसते. सांबा श्रद्धाच्या मांडीवरून उठून रांबाला धीर द्यायला तिच्या बाजूला जा‌ऊन बसतो. दोघींनाही रांबाबद्दल हळहळ वाटते आहे.

"पण त्यांना काही थैल्या मिळत नाहीत. मग ते सांबासमोर येतात. बाजूच्या विव्हळत असलेल्या रांबाची अवस्था सांबा अस्वस्थ हो‌ऊन पाहात असतो."

""आता तू बोल. थैल्या तुझ्यावरच आहेत ना?" ते सांबाला विचारतात"

"थैल्या आहेत सांबावरच पण, सांबा सवयीने खोटंच बोलतो, "नाही, थैल्या माझ्याकडे नाहीत.""

"डगलेवाले गोंधळतात.पण रांबाची गत पाहता सांबा खोटे बोलायला धजावणार नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे ते लोक थैल्या आपल्याबरोबर घे‌ऊन गेले असावेत असे त्यांना वाटायला लागते. त्यामुळे सांबावर वेळ खर्च करण्या‌ऐवजी त्यांचा पाठलाग करावा आणि फैल्या हस्तगत कराव्यात असे त्यांचे ठरते. आणि ते सांबावर थैल्या शोधायचे सोडून घोड्यावर बसून पुढे निघून जातात."

"रांबा खरं बोलूनही जखमी होतो आणि सांबा खोटं बोलूनही वाचतो. दी एण्ड"

श्रद्धा उठते, दोघींची अंथरूण सारखी करून गुड ना‌इट करून जायला लागते.
अनू-मनू अजून गोंधळलेल्या आहेत.

"झाली गोष्ट?"

"हो, झाली की."

"अगं, पण गोष्टीचं मॉरल काय आहे? बाबा म्हणतो की ’ट्रूथ इझ द ग्रेटेस्ट व्हर्च्यू’. पण रांबाचं बघ नं कसं झालं."

"आणि सांबा.. तो तर वारंवार खोटं बोलूनही वाचला." सांबा झालेल्या मनूच्या शब्दातही अविश्वास  आहे.

"मग खरं बोलायचं की खोटं?" अनूचा प्रश्न

"तुम्ही विचार करा आणि उद्या मला सांगा. ओके? आता झोपा."

श्रद्धा दिवा घालवते आणि बाहेर जायला निघते

"मनू, मला आता कळलं, ज्या गोष्टीचं मॉरल सांगता येत नाही तीच ’इन्टेलिजण्ट’ गोष्ट असते", अनू मनूच्या कानात कुजबुजते.

श्रद्धा हसते. खुद्द तिलाही त्या गोष्टीचं नेमकं मॉरल कुठे ठा‌ऊक असतं? परिस्थिती बदलली असती तर गोष्टीचा प्लॉट बदलला असता हे तिला माहित असतं. चोरांनी पहिले सांबाला कफ्रण्ट केलं असतं तर रांबाची जी गत झाली आहे तीच सांबाची झाली असती का? रांबा वाचला असता का? सगळे जर-तरचे प्रश्न. हे मुलींना कसं आणि कशाप्रकारे सांगणार. दैव, नियती वगैरे झकडम गोष्टी या दोन फूट उंचीच्या चिमण्यांना काय सांगणार.

नेहमी खोटं बोलणं वा‌ईटच पण परिस्थिती पाहून, जीव वाचवण्याकरिता खोटं बोललं तर त्यात काही वावगं नाही हा परिस्थितीने शिकवलेला धडा मुलींना नीतीमत्तेचा पाठ म्हणून कसा शिकवायचा आणि शिकवलाच तर त्यालाच ’इन्टेलिजण्ट’ गोष्ट म्हणायची का हे त्यांच्या बाबालाच विचारू म्हणून ती अनू-मनूच्या खोलीतून बाहेर पडते आणि आपल्यामागे दरवाजा हळूच लावून घेते.

दार बंद होतं तशी अनू-मनूने मिटून घेतलेले डोळे उघडतात.

त्या रात्री अनू-मनू, अनू-मनूचा बाबा आणि श्रद्धा सगळेच्या सगळे श्रद्धाच्या ’इन्टेलिजण्ट’ गोष्टीचा विचार करत टक्क जागे असतात.

17 comments:

Meghana Bhuskute said...

अं.... ऑलमोस्ट चांगली झालीय गोष्ट. पण काही काही ठिकाणी मुखवटा सरकला असं वाटतंय. उदाहरणार्थ - मी ’मटकन’ असा शब्द नसता वापरला. किंवा अनूच्या तोंडी तो निष्कर्ष अगदीच लेखकू वाटतोय. किंवा ’श्रद्धा हसते..’च्या पुढचा प्यारा उग्गाच अतिस्पष्टीकरणार्थ नवनीत गाइडछाप आहे.
पण या प्रकारचं अजून लिही तू. वेगळीच गंमत येईल, जर... इत्यादी. :)

Nil Arte said...

अगं बाई कसली वेड्यासारखी गोड गोष्ट लिहिलियेस तू आणि शेवटी अर्थातच प्रोफाउन्ड वगैरे!
अनू-मनू ना आख्ख्याच्या आख्ख्या खाऊन टाकव्याश्या वाटतात :)

शेवटी मला उगीचच आमच्या इकडचा ऐंशी टक्के तुटत कसाबसा वाचलेला गुलमोहर आणि तुझ्या कडचं साफ झोपवलेलं फणस (का अजून काही ) आठवत राहतं.

Shraddha Bhowad said...

मेघना,
:)
पॉईंट टेकन!

Shraddha Bhowad said...

निलेश,

:)

प्रत्येक चांगल्या, आनंदी गोष्टीला दुखरी, हळवी किनार असतेच नैका?

आपलं फ़ाऊंडेशनच त्यावर आहे म्हटल्यावर ते न आठवलं तरच नवल आहे म्हणते मी. आणि १०० टक्के आनंदी कथा कशा असतात बुवा?

Vidya Bhutkar said...

Very nice start. Looking forward to read further. I could relate to 'Shraddha' as a mom while imagining my daughter's expressions. :) Maybe I should start this with her. :D
Keep writing.
Vidya.

Chaitanya Joshi said...

छान! आवडली :) :)

Shraddha Bhowad said...

विद्या,
तुला मुलगी आहे? झक्क!
मला एका अटेम्पमध्ये दोन-दोन मुली मिळ्णं म्हणजे दिवाळीतल्या बोनॅन्झासारखं वाटतं.:)

Shraddha Bhowad said...

चैतन्य जोशी,

आभारी आहे. :)

तृप्ती said...

पहिली गोष्ट आवडली. इंटेलिजन्ट गोष्ट वाटते खरंच. श्रद्धा ह्सते..वाला आणि त्यानंतरचा पॅरा अगदीच रसभंग करतो आहे. ते वाचकांवर सोडायला हरकत नव्हती.

दुसरी गोष्ट नॉट सो इन्टेलिजन्ट वाटली. बाकी सगळी गोष्ट साध्या सरळ भाषेत लिहिल्यावर मधेच तो अलंकारीक शेव शब्द भसकन घुसल्यासारखा वाटतो आहे. त्याचा अर्थ चूक/बरोबर काहीही असला तरी.

बाकी, वाचकांच्या प्रतिसादांवरून तू डिक्टेट होत नसशील अशी आशा :)

Shraddha Bhowad said...

तृप्ती,
नाही, तेव्हढं बाकी माझ्यासोबत कधीच होत नाही.

पण प्रतिक्रियांचा आदर आहे, आनंदही आहे, कधीकधी गंभीरपणे विचारही होतो.

प्राची कुलकर्णी said...

गोष्ट छान आहे. आवडली.
काही ठिकाणी रांबा-सांबा आणि अनू-मनू मध्ये जरा घोळ झाला आहे.
अनू रांबा असते ना? एके ठिकाणी 'मनू उर्फ रांबा' असा उल्लेख आला आहे.
अजून वाचायला आवडेल.

प्राची कुलकर्णी said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

प्राची,

थॅंक यू व्हेरी मच!
<<अनू रांबा असते ना?
ही कथा अनू-मनूने ऐकली असती तर हा प्रश्न अनू-मनूने नक्कीच विचारला असता. :)

Yasmine said...

Shraddha, well done!

Shraddha Bhowad said...

थॅंक्स मॅम,
मीन्स अ लॉट टू मी! :)

Yasmine said...

Arre, Shraddha, tu tar majhi favourite Marathi lekhika honyachya margavar ahes.

Shraddha Bhowad said...

Aww! (हा ध्वनी मराठीत का कोणास ठाऊक पण नेमका लिहिता येत नाही! :D )

 
Designed by Lena