छोटुसा हिरवा राक्षस.

माझा नवरा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला आणि आता काय करावं हा प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा राहिला. मग मी एकटीच खिडकीजवळच्या खुर्चीत बसले आणि पडद्याच्या फटीतून बाहेरची बाग पाहू लागले. बागेकडे पाहात बसण्यामागे काही खास असं कारण नव्हतं. माझ्याकडे करायला तसंही काही कामच नव्हतंच; आणि, मी तशीच तिथे बागेकडे पाहात बसले तर, आता किंवा नंतर, किंवा कधीतरी मला काहीतरी करायला सुचेल असंही मला वाटत असावं. त्या बागेत पाहाव्यात अशा बऱ्याच गोष्टी होत्या, पण, बहुतेक वेळा मी त्या ओकच्या झाडाकडे पाहात बसलेली असायचे. ते माझं खास, अतिशय लाडकं झाड. मी अगदी लहान मुलगी असताना ते लावलं होतं आणि त्याला वाढताना, पसरताना पाहिलं होतं. ते झाड मला माझ्या अगदी जुन्या सवंगड्यासारखंच वाटायचं. डोक्यातल्या डोक्यात मी कायम त्या झाडाशी गप्पा मारत बसलेली असायचे.

मला वाटतं, त्या दिवशीदेखील मी त्या ओकच्या झाडाशी गप्पा मारत बसले होते. आम्ही कशाबद्दल गप्पा मारत होतो हे मला तितकंसं आठवत नाही, इतकंच काय तर मी नेमका किती वेळ त्या खिडकीजवळच्या खुर्चीत बसले होते हे देखील मला आठवत नाही, पण खूप वेळ निघून गेला असला पाहिजे. बागेकडे पाहात बसले म्हणजे वेळ कसा झरझर सरतो हे मला कळायचंच नाही. आपण इथे बसून भरपूर वेळ झालाय हे मला कळलं, तेव्हा अंधार पडायला लागला होता. आणि अचानक, मी तो आवाज ऐकला. कोणीतरी तोंडावर हात दाबून धरल्यासारखा, किंचीत घासल्यासारखा विचित्र आवाज. तो कुठल्यातरी दूरवरच्या जागेवरून आल्यासारखा  वाटत होता. पहिल्यांदा मला वाटलं, की तो आवाज माझ्या आतून, खूप खोलवरच्या जागेतूनच येतो आहे, मी जिला माझ्या‌आत खूप खोलवर दडवून ठेवलंय, ती मीच मला इशारावजा आवाज देत असल्याचा मला भास होतो आहे. मी माझा श्वास रोखून धरला आणि कान दे‌ऊन तो आवाज ऐकायला लागले. नाही, शंकाच नाही, तो आवाज माझ्याजवळ येत चालला होता- क्षणाक्षणाला अधिक निकट येत होता. तो आवाज काय होता, कसला होता याची मला कणभरही कल्पना नव्हती; पण त्या आवाजाने माझा थरकाप उडाला.

इतक्यात त्या ओकच्या झाडाच्या तळालगतची जमीन हळूहळू वर यायला लागली. एखादा दाट, जडसर द्राव पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडायची खटपट करत आहे आणि तो कोणत्याही क्षणी त्या फुगवट्यातून बाहेर पडेल असं त्याकडे पाहून वाटत होतं. मी माझा श्वास पुन्हा एकदा रोखून धरला. त्याचक्षणी जमीन दुभंगली आणि फुगवट्यावरची माती गळून पडली. त्यानंतर मला सर्वात पहिले काय दिसलं असेल तर धारदार नखं. माझी नजर त्यांवर खिळून राहिली होती, माझ्या हाताच्या मुठी वळल्या होत्या. मी स्वतःला बजावलं, की काहीतरी घडणार आहे खास, आणि ते जे काहीतरी आहे, त्याची सुरूवात झाली आहे. त्या नखांनी जमीन घट्ट पकडून धरली होती आणि त्या आधाराने त्या विवरातून बाहेर आला- एक छोटुसा हिरवा राक्षस.

त्या हिरव्या राक्षसाच्या पूर्ण शरीरावर हिरवी, लखलखती खवली होती. तो त्या विवरातून बाहेर आला आणि त्याने आपले अंग झडझडून हलवलं. त्या अंग झाडण्याने त्याच्या अंगावरची उरलीसुरली मातीही गळून पडली. त्याचं नाक लांबलचक होतं आणि थोडेसं गंमतीदारही वाटत होतं. त्याच्या नाकाचा हिरवा रंग शेंड्याकडे गर्द होत गेलेला होता. नाकाचं टोक अतिशय निमुळतं, मास्तर मार देतात त्या छडीच्या टोकासारखं होतं; पण, त्या राक्षसाचे डोळे - ते मात्र तंतोतंत मनुष्यासारखे होते. त्यांच्या एका झलकीनेच माझ्या मणक्यातून भयाची एक शिरशिरी गेली. त्या राक्षसाच्या डोळ्यांमध्ये चक्क भाव दिसत होते, अगदी तुमच्या-माझ्या डोळ्यांत दिसतात, तसेच.

त्यानंतर त्या राक्षसाने माझ्या घरालाच भेट द्यायला आला असल्यासारखा माझ्या घराकडे मोहरा वळवला. तो ठरवल्यासारखी धीमी पावले टाकत चालत होता. तो माझ्या दाराशी ये‌ऊन पोहोचला आणि त्याने आपल्या नाकाच्या निमुळत्या शेंड्याने दारावर टकटक करायला सुरूवात केली. त्या टकटकीचे प्रतिनिधी माझ्या रिकाम्या घरामध्ये निनादत राहिले. मी तिथं आहे हे त्या राक्षसाला समजू नये म्हणून मी मागच्या मागे आतल्या खोलीकडे पळाले. मी किंचाळूही शकत नव्हते. किंचाळून काही फायदा नव्हता; कारण, त्या परिसरात फक्त आमचंच घर होतं, आजूबाजूला वस्ती नव्हती आणि माझा नवरा रात्री उशीरापर्यंत घरी परतणार नव्हता. मला मागच्या दाराने पळता येत नव्हतं, कारण आमच्या घराला मागचं दारच नव्हतं. आमच्या त्या घराला केवळ एकच दार होतं आणि याक्षणी तो भयप्रद हिरवा राक्षस तेच दार ठोठावत होता. माझ्या श्वासांचाही आवाज हो‌ऊ नये याची मी खबरदारी घेत होते. मी घरात नाहीच आहे असं वाटावं इतकी शांतता होती. दारावर जे काही उभं आहे हे दार ठोठावून कंटाळेल आणि निघून जा‌ईल अशी भाबडी आशा मला वाटत होती; पण त्याने ठोठावणं काही सोडलं नाही. काही वेळानंतर ठोठावणं थांबलं आणि दाराच्या कुलूपाशी खटपट सुरू झाली. त्याला कुलूप उघडायला जरासेही कष्ट पडले नाहीत.  दार उघडलं गेलं आणि दाराची फट रूंदावत गेली. दाराच्या फटीतून ते लंबुडकं नाक आत आलं आणि थांबलं. बराच वेळपर्यंत ते नाक तसंच राहिलं, फणा काढलेल्या सापासारखं, आत काय चाललं आहे याचा कानोसा घेत असल्यासारखं. हे असं होणार आहे हे मला माहित असतं, तर मी दारापाशीच दबा धरून बसले असते आणि त्याचं ते लंबुडकं नाक कापून टाकलं असतं, माझ्या किचनमध्ये कितीतरी धारदार सुरे होते.

माझ्या डोक्यात हा विचार येतो न येतो तोच तो राक्षस दाराच्या फटीतून हसत आत आला. माझ्या डोक्यात काय चाललं आहे हे जणू त्याला कळलं असावं अशा तऱ्हेने हसत तो राक्षस बोलायला लागला. तो बोलताना तोतरत नव्हता, पण बोलायला शिकत असताना आपण शब्द घोटून घोटून वारंवार बोलतो तशा पद्धतीने तो काही शब्द वारंवार म्हणत होता. "त्याने काहीच झालं नसतं..नसत.. नल्ला." तो छोटुसा हिरवा राक्षस मला उद्देशून हे बोलत होता. "माझं नाक म्हणजे पालीच्या वळवळणाऱ्या शेपटीसारखं आहे. कापलं की पुन्हा वाढतं आणि पुन्हा वाढताना अधिकाधिक लांब आणि मजबूत होत जातं, काय समजलीस! जास्त लांब आणि जास्त मजबूत! त्यामुळे तुला जे करायचं होतं ते तर झालं नसतंच, आणि त्याच्या अगदी उलट हो‌ऊन बसलं असतं." आणि मग तो बराच वेळ गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यांसारखे आपले डोळे फिरवत बसला.

अरे बापरे! याला लोकांची मनंही वाचता येतात की काय? माझ्या डोक्यात विचार आला. मी काय विचार करते आहे हे कोणाला कळावं ही कल्पना मला नकोशी वाटली आणि ते या भयानक, विचित्र प्राण्याला कळणार असेल तर ते मला त्याहून नको होतं. मला दरदरून घाम फुटला होता. या राक्षसाला काय हवं होतं? त्याने माझ्याबरोबर काय करायचं ठरवलं होतं? तो मला खाणार होता का? का मला त्याच्यासोबत त्या विवरात, जमिनीच्या आत घे‌ऊन जाणार होता? त्या राक्षसाकडे पाहात असताना माझ्या डोक्यात इतके सारे विचार ये‌ऊन गेले. पण, त्याच्याकडे पाहूही नये इतकाही तो ओंगळ नव्हता ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणायची. त्या राक्षसाला छोटाले, गुलाबी हात होते आणि त्याच्या त्या खवलेदार शरीराला अचानक फुटले असावेत असे वाटणारे पाय होते. हातापायांची नखं लांबच्या लांब होती. मी त्यांच्याकडे पाहातच गेले तशी ती मला लोभस वाटायला लागली. आणि तो राक्षस मला कोणत्याही प्रकारची इजा करणार नव्हता हे एकदाचं मला कळून चुकलं.

"मुळीच नाही", तो राक्षस मान हलवत म्हणाला. त्याने जराही हालचाल केली की त्याची खवली एकमेकांवर आपटत होती आणि टेबलाला धक्का दिला की त्यावर दाटीवाटीने ठेवलेल्या कॉफी मग्जचा कसा खणखणता आवाज येतो तसा आवाज येत होता. "नाही, नाही, मी तुम्हाला अगदी जराशीही इजा पोहोचवणार नाहिये, जराशीही नाही, जराशीही नाही." म्हणजे माझं बरोबरच होतं, या राक्षसाला मी काय विचार करते आहे ते बरोब्बर कळत होतं.

"मॅडम.. मॅडम.. मॅडम.. तुम्हाला कळत नाही का कळत नाही का? मी इथे तुम्हाला मागणी घालायला आलो आहे." तो मला सांगत होता, "मी खूप खोल ..खोल.. खोल खोलवरून इथे आलोय. इथे वरपर्यंत येण्यासाठी मला किती खणायला लागलं. भयंकर होतं ते, भयंकर. मी खणत राहिलो.. खणत राहिलो, बघा नं, माझी नखं किती घाणेरडी झालीयेत. तुम्हाला इजाच पोहोचवायची असती, कोणतीही इजा, कसलीही इजा, तर मी हे सर्व का केलं असतं? मी तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यावर इतकं प्रेम करतो, की तुम्ही इथे असताना मी तिथे खूप खोल खोल.. खोल असावं हे मला सहनच झालं नाही. म्हणून मी जमिनीतून सरपटत, खुरडत तुमच्यापाशी आलो, मला यावंच लागलं.. यावंच लागलं. त्यांनी सर्वांनी मला थांबवायचा खूप प्रयत्न केला पण, मी आता त्यांचं काही ऐकणार नव्हतो. माझ्यासारख्या जीवाने तुम्हाला मागणी घालणं हे उद्धटपणाचं आहे आणि तुम्हाला गृहित धरतो आहे असं तुम्हाला वाटलं तर काय याचा विचारही मी केला नाही. त्यासाठी मला जे धैर्य दाखवायला लागलं.. दाखवायला लागलं त्याचा विचार करा. "

"पण, हे उद्धटपणाचंच आहे. तू सरळसरळ मला गृहित धरतो आहेस." मी मनातल्या मनात म्हटलं. "माझं प्रेम मिळवण्यासाठी येणारा आगा‌ऊ, क्षुद्र जीव कुठला!"

माझ्या डोक्यात हा विचार आला आणि त्या राक्षसाच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आणि त्यासरशी त्याच्या हिरव्या खवल्यांना जांभळी छटा आली. जसंकाही, त्याला काय वाटतं आहे हे तो त्यातून सांगू पाहात होता. त्याचं संपूर्ण शरीरही थोडंफार आक्रसल्यासारखं वाटत होते. मी हाताची घडी घालून त्याच्यात होणारे ते बदल पाहात होते. त्याच्या वाटण्यामध्ये बदल झाले, भावनांना धक्का बसला, की असं होत असावं हे मला कळलं. या राक्षसाचं शरीर खडबडीत होतं खरं; पण, त्याने आपलं हळुवार, ताज्या ताज्या मार्शमॅलोसारखे ह्रद्य या खडबडीतपणामागे लपवलेलं असावं याचा मला अंदाज आला. हा अंदाज खरा असेल, तर मी त्या राक्षसाविरूद्ध जिंकू शकत होते. मी तो प्रयत्न करून पाहायचं ठरवलं.

"तुला कळत नाही का, तू एक बेढब, कुरूप प्राणी आहेस." मी मनातल्या मनात माझ्याच्याने शक्य हो‌ईल तितक्या मोठ्या आवाजात ओरडले. मी मनातल्या मनातदेखील इतक्या तार स्वरात किंचाळले की, माझ्या ह्रदयाचाही थरकाप झाला. "तू एक क्षुद्र कुरूप राक्षस आहेस!" त्याच्या खवल्यांवरची जांभळी छटा अधिक गडद झाली. माझा सर्व संताप, तिरस्कार पि‌ऊन घेतल्यासारखे त्याचे डोळे विस्फारू लागले आणि पिकलेल्या हिरव्या अंजिरांसारखे दिसणारे त्याचे ते डोळे त्याच्या चेहऱ्याबाहेर ये‌ऊन डोकावायला लागले. त्याच्या डोळ्यांतून लालेलाल रसासारखे अश्रू वाहू लागले आणि जमिनीवर टपटपायला लागले.

आता मला त्या राक्षसाची अजिबात भीती वाटत नव्हती. मला त्या राक्षसासोबत ज्या ज्या काही अमानुष, क्रूर गोष्टी कराव्याशा वाटत होत्या, त्या सर्वांची चित्रं मी मनातल्या मनात रंगवली. मी मनातल्या मनात त्याला जाड वायर्सनी जड खुर्चीला बांधून ठेवलं आणि सु‌ई‌इतकी अग्रं असलेल्या प्लायर्सनी त्याच्या अंगावरची खवली एकेक करून मुळापासून उपटायला लागले. मी एका धारदार सुरीचं टोक तापवलं आणि ते पायाच्या लुसलुशीत गुलाबी कातडीवर खुपसत राहिले. एक सोल्डरींग आयर्न तापवून मी ती पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांमध्ये भोसकत राहिले. मी त्याचा छळ कसा करावा याच्या नवनवीन कल्पना मनातल्या मनात रंगवत होते आणि त्या गोष्टी त्याच्यासोबत प्रत्यक्षात घडत असाव्यात अशा रितीने तो राक्षस आचके देत होता, वेदनेने विव्हळत, गडाबडा लोळत होता, असह्य वेदनेने किंचाळत होता. त्याच्या डोळ्यातले रंगीत अश्रू पडून एव्हाना जमिनीवर थारोळं जमा झालं होतं. त्याच्या कानातून येणाऱ्या करड्या वाफांमधून येत गुलाबाचा वास येत होता. माझ्यावर स्थिरावलेले त्याचे व्याकूळ डोळे पुन्हा पुन्हा आर्जवं करत होते, "प्लीझ मॅडम, प्लीझ, मी तुमच्या पाया पडतो, असे भयंकर विचार करू नका." तो रडत होता. "माझ्या मनात तुमच्याविषयी कोणतेही दुष्ट विचार नाहीत, मी तुम्हाला काहीही इजा करणार नाही. मला तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेमच वाटतं.. प्रेमच वाटतं." पण, मला त्याचं काही‌एक ऐकायचं नव्हतं. मी माझ्या मनात म्हटलं, "मूर्ख बडबड करू नकोस. तू माझ्या बागेतल्या जमिनीतून बाहेर आलास, माझ्या परवानगीशिवाय दार उघडलंस. तू तितक्यावरच थांबला नाहीस तर, तू माझ्या घरातही शिरलास. मी तुला इथे बोलावलेलं नव्हतं; त्यामुळे मला काय वाटेल ते विचार करण्याचा अधिकार आहे."

आणि मी त्यानंतरही तेच करत राहिले.  मी त्या राक्षसाबद्दल जास्तीत जास्त भयंकर विचार करत गेले. मला माहित होत्या त्या प्रत्येक मशिन आणि हत्याराने मी त्याचं शरीर चिरत गेले. मनुष्याचा छळ करण्याकरिता वापरण्यात येणारी आणि त्याला वेदनेने गडाबडा लोळायला लावणारी कोणतीही पद्धत मी सोडली नाही. "पाहिलंस हिरव्या राक्षसा, बा‌ई काय असते याची तुला कल्पनाही नाहिये. मी तुझ्यासोबत काय काय करण्याचा विचार करू शकते याचा तू विचारही करू शकणार नाहीस." त्यानंतर लवकरच त्या राक्षसाचं शरीर धूसर व्हायला लागलं. त्याचं ते लांबलचक हिरवे नाक आक्रसून एखाद्या छोट्याशा अळी‌इतकं झालं. जमिनीवर वेदनेने आचके देत असताना त्या राक्षसाच्या ओठांची हालचाल झाली. मला शेवटचं काहीतरी सांगण्याकरिता तो ओठ हलवण्याचा प्रयत्न करत होता. तो काहीतरी सांगायचं विसरून गेला होता आणि त्याला मला ते सांगायचं होतं. पण, तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार त्या‌आधीच त्याच्या ओठांची हालचाल थांबली. तो हवेत विरत गेला आणि शेवटी दिसेनासा झाला. आता तो राक्षस संध्याकाळच्या एखाद्या फिकुटलेल्या सावलीसारखा दिसत होता. त्या राक्षसाचे व्याकुळ, रडून सुजलेले डोळे मात्र तसेच हवेत तरंगत होते.

"त्याने काहीएक होणार नाही." मी त्याला मनातल्या मनात म्हटलं. "तू माझ्याकडे वाटेल तितका वेळ आणि वाटेल तसा पाहू शकतोस. पाहा- पण, तू काहीही बोलू शकणार नाहीस, काहीही करू शकणार नाहीस. तुझं अस्तित्त्व संपलं आहे, खलास झालं आहे- पूर्णविराम. कळलं?" त्यानंतर ते डोळेही हवेत विरून गेले. आणि मग उरलं ते रिकामपण आणि रात्रीच्या काळोखाने उतू जाणारी खोली.

--
पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

3 comments:

v said...

पोरी,तुझ्या लिखाणात ‘दम’ आहे.मला तुझ्याशी बोलायला आवडेल.शक्य तर मेल कर.वृंदा मावशी

v said...

पोरी,तुझ्या लिखाणात ‘दम’ आहे.मला तुझ्याशी बोलायला आवडेल.शक्य तर मेल कर.वृंदा मावशी

Shraddha Bhowad said...

:) धन्यवाद वृंदा मावशी.
तुमचा मेल-आयडी कुठे दिसत नाही आहे. तुम्ही मला bhowad.shraddha@gmail.com वर मेल करू शकता.

 
Designed by Lena