मोन्ती व्हाया लुई.

लुई आपला शो आटपून निघालाय. त्याला घरी जायला सबवेने जायला लागतं
इतर सबवे स्थानकांसारखं हे ही एक किंवा दुस-या कोणत्याही सबवे स्थानकासारखं नसलेलं.
काहीही, कसंही.
त्याला एका ठिकाणाहून दुसया ठिकाणी जाण्याकरिता असलेली जागाच म्हणायचं असेल तर त्याला कशासारखंतरी म्हणण्याचा किंवा कशासारखंतरी न म्हणण्याचा उगा का इतका खटाटोप?
तिथली एकमेकांना अजिबात न ओळखणारी, आपापल्या विश्वात रमलेली माणसं. सगळ्यांचे डोळे कशावरतरी खिळलेले. कोणाचे पेपरवर, कोणाचे शून्यात, कोणाचं डोळ्यासमोर दिसत नसलेल्या आणि महिन्याअखेर मुटकून बसवायच्या हिशेबावर.
आपल्या दोन हातांच्या परिघापलीकडे काय चालू आहे याची किती जणांना कल्पना असेल?
पण, या प्रत्येक माणसाची एक वेगळीच कहाणी असते.
लुईची आहे.
त्याच सबवेमध्ये सर्वांपासून  बेदखल असा एक व्हिओलिनिस्ता त्याच्या त्या रक्तचंदनी व्हायोलिनवर मोन्तीचं कम्पोझिशन वाजवतोय.
त्याचीची कहाणी असेलच.
आमेलीमध्ये हिरवा प्रकाश साकळलेल्या सबवे टनलमध्ये रेकॉर्ड वाजवणा-या, ढगासारखे पांढरे केस असलेल्या या बुढ्या बाबाची कहाणी काय होती?
मंत्राने भारल्यासारखं, एखाद्या भुतापाठोपाठ  त्याच्या गुहेकडे जावं तसं आमेलीच्या पाठोपाठ आपण गेलोच की नाही?
तिथे आपली सुटका नव्हती.
इथेही आपली सुटका नाही.
व्हित्तोरियो मोन्तीचं Czardas*
तल्लीन होऊन ते आर्त सूर आळवतोय आपला...
पहिले मंद्र लयीत सुरू झालेलं संगीत नंतर बेभान होत जातं,  पुन्हा मंद्र, पुन्हा द्रुत.
पहिले स्वरांवर आंदुळल्यासारखे झुलणारे आपण आपले श्वास गुदमरल्यासारखे सुरांच्या लाटांवर हिंदकळतोय आपले. पुन्हा स्थिर होऊन श्वास जागी येतोय तोच पुन्हा ती लाट येते.
अजून जरा शांतता असती, आपल्याला अजून गप्प बसता आलं असतं,  श्वास थांबवता आला असता तर, अजून काहीतरी समजलं असतं असं वाटतं.
लुईची अवस्था काही वेगळी नाही. कधी नव्हे तो त्याच्या घशात आवंढा येऊन अडकलाय, समोर दिसणारं जग जरासं आऊट ऑफ़ फ़ोकस झालंय.
त्याला संगीतातलं काही कळतं असा दावा नाही त्याचा. त्याची हंगेरीयन शेजारीण आणि जेन, त्याची बिट्टी पोर व्हायोलिनवर बार्तोक* वाजवत असतात तेव्हा तो आपला चकित होऊन उभा असतो, त्या सुरांमध्ये निथळत. अनंत हस्ते कमलावराने देता घेशील किती दो कराने सारख्या अवस्थेत. एरव्ही शब्दांवर प्रचंड हुकुमत असलेला लुई अशा वेळी काही बोलत नाही. तो ते सर्व आत शोषून घेतो स्पंजसारखं. मुरवत राहतो.
पण, हे व्हायोलिन फ़ार डेंजरस. काहीतरी तुटतंच आपल्याआतलं.
अगदी हुकमी.
नेमाने.
प्र-त्ये-क वे-ळी.
मग त्याच्या कपच्या गोळ्या करताना आपल्याला केव्हातरी मागे निखळलेल्या, रंग उडालेल्या कपच्या दिसत राहतात. ’ठेवून देऊयात, पुढे कधीतरी लावायला होईल’ असं म्हणत तुटलेली करंगळी जपून ठेवल्यासारख्या. कधीकधी उगीचच, कधीकधी मुद्दामहून, तर कधीकधी अजाणतेपणी.
यातून आपल्याला भर्र्कन सावरता येत नाही. दिवसच्या दिवस जातात त्या खिन्नतेमध्ये.
मेलॅन्कोलीमध्ये.
त्या व्हिओलिनिस्तासारखं स्थळ, काळ, विसरून बेभान होणं लुईच्या स्वभावात नाही.
इतक्यात प्लॅस्टीकच्या बाटल्या, डब्बे यांचा डोंगर अंगावर घेऊन एक जाडाभरडा, कळकट मनुष्य  सबवेमध्ये प्रवेशतो.
पाय-यांवरून उतरताना त्या प्लॅस्टीकचा कर्कश्य खडखडाट त्या शांत, म्लान वातावरणात कच्चकन रूततो, शांततेच्या चिरफ़ाळ्या उडतात.
त्याच्या नुसत्या चालण्यातही गोंगाट आहे.
त्या मग्न लोकांना आपल्या विश्वातून दचकून बाहेर यायला लावणारा गोंगाट.
आयरनी अशी आहे, की त्यांना  हा गोंगाट ऐकू आला; पण, इतकं आर्त, तळमळून वाजवलेलं संगीत त्यांच्या कानापर्यंत  पोहोचलंच नाही.
गोंगाट इतक्या लवकर लक्ष वेधून घेतो का?
तो प्लॅस्टीक मॅन चालता चालता एकदम थबकतो आणि आज आपण इथेच झोपायचं असा निश्चय केल्यासारखा एका ठिकाणी अचानक थबकून आपला बोजाबिस्तारा आणि तो प्लॅस्टीकचा पर्वत तिथेच धाप्पदिशी टाकून देतो आणि कपडे काढायला सुरुवात करतो.
दुर्लक्ष करता येईल असा मनुष्यच नाही तो.
आता लुईचं लक्ष कधी मोन्तीच्या त्या सुंदर रचनेवर तर कधी त्या सेल्युलॉईटचा ढिगारा अंगावर वागवणा-या त्या अर्धनग्न कळकट मनुष्यावर.
तो इथेही आहे, तिथेही आहे.
तो यातही आहे, त्यातही असणार आहे.
आता त्याला पर्याय नाही.
आता तो माणूस त्या महाकाय पसा-यातून कुठूनतरी पाण्याची एक बाटली पैदा करतो आणि त्या बाटलीतल्या पाण्याने भर सबवेमध्ये त्याची आंघोळ सुरू होते.
आंघोळ करताना पाणी त्याच्या पाठीवरच्या चरबीतून वाट काढत निघालंय आणि त्याच्या तोंडून सुखातिरेकाने बम्म, भुश्श असे आवाज निघतायेत, तर इथे त्याच्या त्या गोंगाटाने अजिबात विचलित न झालेल्या, स्वत:तच हरवलेल्या त्या व्हिओलिनिस्ताच्या कानशीलावरच्या शिरा ताणल्या गेल्यात, ओठ लहान मुलासारखे पुढे आलेत, कधीकधी वेदनेची एकच उभी आठी चमकून जाते कपाळावर.
ब्रह्मानंदी टाळी लागल्याची लक्षणं-दोघांचीही
तो माणूस अत्यंत बेढब आहे.
हे संगीत किती जीवघेणं आहे
लुई कधी इथे , कधी तिथे
बाटलीतला शेवटचा थेंब संपतो तेव्हा मोन्तीदेखील समेवर आलेला असतो.
त्या समेवर तो कळकट म्हातारा थुंकल्यासारखा हसतो. छद्मी, माथेफिरू हास्य. का? कोणावर? कशासाठी?
ही पण एक वेगळीच कहाणी.
त्या व्हिओलिनिस्ताला याचा पत्ताच नाही, तो चूर आहे त्याच्या जगात. तिथे तो सूर जगतो, सूर खातो, सूर पितो.
त्याने लुईच्या काळजात घर केलं तसं इतरांचं झालं नाही.
पण, त्या कळकट म्हाता-याने लुईसकट सगळ्यांच्या दिवसावर एक ओरखडा उमटवून ठेवला. खिळा काचेवर घासत नेल्यावर उठतो तसा. आता कित्येक दिवस त्याला विसरता येणार नाही.
लक्षात कोण राहणार?
स्मृती कोणाच्या बनणार?
स्मृतीत कोण राहणार?
लक्षात राहाणं, न राहाणं, काय लक्षात राहाणं ते पाहाणं इतकं महत्वाचं असतं का?
शेवटी आठवणीच तर असतात आपल्या सोबत, दुसरं काय उरणार असतं?
या जगातलं नाहीच असं वाटण्याइतकं काहीतरी अतीव सुंदर असं काहीतरी इतक्या कमी लोकांना का भिडतं?
का असुंदराचा आवाजच मुळात इतका मोठा असतो? की ते ब-याच जणांच्या लेखी असुंदर अशा अर्थाने जास्त लक्षवेधी असतं? हे जग अशाच ब-याच जणांच्या लेखी असुंदर म्हणून स्मृतीत राहणा-या गोष्टींच्या पायावर चाललंय का?
अशा वेळी व्हिओलिनिस्तासारख्या माणसांनी काय करायचं?
आपण त्यांचं काय करायचं?
त्यांचं काय होतं?
जे होतं तसं होणं योग्य आहे का?
त्यांना त्याची काही क्षिती असते अशातला भाग नाही,
पण तरीही-
अशा विचारात लुई जायला निघतो.
पण, आपण तिथेच रुतून बसतो. उलटसुलट विचारांच्या कर्दमात रुतल्यासारखे.
आता त्यातून बराच काळ निघणे नाही.
या मानवी आकाराच्या पोकळीचं करायचं तरी काय?

--

संदर्भ: लुई | सीझन २, भाग ६। सबवे/पामेला

2 comments:

Nikhil Patel said...

Apratim ..

Shraddha Bhowad said...

निखिल,
टू बी फ़्रॅंक, ही पोस्ट कोणाला कळेल ही शक्यताही वाटत नव्हती. लुई पाहिल्या आणि भिडल्याशिवाय ते शक्य होणार नाही असे प्रामाणिकपणे वाटलेलं आणि अजूनही वाटतं.
तू ’लुई’ पाहिला आहेस का? सर्वात महत्वाचं म्हणजे, हा एपिसोड पाहिला आहेस का?

-श्रद्धा

 
Designed by Lena