’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

सर्र्पटर्र्कर्रर्र
.
.
टर्र्पसर्र्कर्रर्र

श्रद्धा कपडे वाळत घालायची दांडी दोरीने वरखाली करून पाहात होती. तिला त्या एकंदर प्रकाराचाच प्रचंड अचंबा वाटत होता. कायकाय शोध लागतात एकेक. आपल्यावेळी हे असलं कधी नव्हतं काही. लहानपणी ती आणि निरू स्टुलावर उभं राहून दो-यांवर कपडे वाळत घालायचे ते तिला आठवलं.

दीड वाजला तरी तिचे कपडे वाळत घालून झाले नव्हते. सकाळी उठायला उशीर झाला होता. अलार्मरावांनी देखील डुलक्या काढायला आजचाच दिवस निवडला होता. त्यातच अनू-मनूचा बाबा त्यांच्या सहलीच्या परमिशन फ़ॉर्मवर सही करायला विसरला होता. फ़ॉर्मवर बाबाचीच सही हवी म्हणून अनू हटून बसली होती, त्याकरता ती बाईंचा ओरडाही खायला तयार होती. या सगळ्या ड्राम्यामध्ये रिक्षावाले काका हॉर्न वाजवून कंटाळून निघून गेले, मग तिला त्या दोघींना शाळेत सोडायला जायला लागलं. अनू हुप्प होती, ती हुप्प म्हणून मनू मिझरेबल दिसत होती. दिवस ऑलरेडी केराच्या टोपलीत जाणार असं दिसत होतं.

घरी पोहेचेतो आठ वाजले. आल्याआल्याच पवार काकूंनी कामाच्या बाई येणार नाहीत अशी वर्दी दिली. "पर्फ़ेक्ट!" श्रद्धाने मनात म्हटलं. आता कपडे, भांडी, जेवण या तिन्हीही आघाड्या तिलाच बघायच्या होत्या. तिने लिहीण्याचा विचार मनातून काढून टाकला. काल संध्याकाळी बीचवर जाऊन वाळूने माखलेले कपडे बाथरूममध्ये तिची वाट पाहात होते, ते तिने शेवटावर ढकलले आणि जेवण, भांडी, मग कपडे अशी प्रायोरिटी लिस्ट ठरवून घेतली.

सगळं आटपेस्तो दीड वाजत आले होते. मध्ये पवार काकू श्रद्धाची तारांबळ कशी उडालिये हे पाहायला आल्या होत्या, त्यांच्याकडून तिने पपई कापून घेतला. पण मनूला चौकोनी तुकडे आवडतात, तर अनूला पूर्णच्या पूर्ण बोटी- हे ती त्यांना सांगायला विसरली. ग्रेट! आता वाडगाभर चौकोनी पपई पाहून अनूचा मूड आणखी बूटात जाणार.

पण पपई खाताना अनूला ते लक्षातही आलं होतं असं दिसलं नाही. आज ती नको तितकी शांत होती, लक्ष कुठेतरी भलतीकडेच होतं. अनूची अखंड बडबड बंद आहे असं फ़क्त एकदा झालं होतं. एकदा रात्रीचं फ़िरायला म्हणून बाहेर पडलो होतो. तेव्हा, नियॉन्सच्या प्रकाशातली आपली सावली आपल्यापेक्षा फ़ास्ट पळते म्हणून तिला हरवण्यासाठी अनू तिच्याहून वेगाने पळत सुटली होती आणि नाक फ़ोडून घेतलं होतं. "तुम्ही मला थांबवलं का नाहीत? " म्हणून आम्हाला ती सायलण्ट ट्रीट्मेण्ट. पण आज आत्ता याबद्दल विचार करायला वेळ नव्हता. अजून कपडे व्हायचे होते.

"मी तुला मदत करू का?"
मागून किन-या आवाजात पृच्छा झाली.
श्रद्धा गालातल्या गालात हसली.
"या सखूताई, त्या वरच्या दांडीवरचा नॅपकिन हात लांब करून जरा सरळ करता का? माझा हातच पोहोचत नाहीये. तुमचा पोहोचतो का बघा जरा!"
"खुक्क"
मनू खुदकन नाही, तर खुक्ककन हसायची.
"बोला खुक्करसिंग, काय काम होतं? होमवर्क झालं?"
मनूने मान डोलावली.
"मग?"
थोडीशी घुटमळ आणि अम्म..उम्म नंतर..
"मजआ मळेतशा चहीका चरीत चलझा"
मनूला अनूबद्दल काही टेन्शन असेल तर ती थेट ’म’च्या भाषेत सुरू होते हे श्रद्धासकट अख्ख्या सोसायटीला, शाळेला, क्लबला आणि त्या सर्वसाक्षी, सर्वव्यापी स्पंजबॉब स्क्वेअरपॅंट्सला देखील  माहिती. त्यामुळे ते गुपित - गुपित नव्हतंच.
"मयका मलझा?"
त्यातून कळली ती गोष्ट काहीशी अशी होती-

अनू-मनूला दर सोमवारी आणि शुक्रवारी वाचनाचा तास असायचा. त्यांच्या बाई शुक्रवारी त्यांना एकेक पुस्तक घरी घेऊन जायला द्यायच्या आणि ते वाचून काय वाटलं, तुम्हाला ते आवडलं तर का आवडलं, नाही आवडलं तर का नाही आवडलं? हे ’इन ओन वर्ड्स’ लिहून आणायला सांगायच्या. अनूने लिहून आणलेलं राईट-अप वाचून त्यांनी अनूला "पेरेण्टकडून लिहून घेतलंस का?" "कशात पाहून लिहीलंस का?" असं विचारलं होतं. तिने नाही म्हटल्यावर तिला तिथेच बसवून पुन्हा लिहून काढायला सांगीतलं होतं.
आणि अनूला ते लिहीता आलं नव्हतं.

श्रद्धा थेट फ़्लॅशबॅकमध्ये. लायब्ररीचा तास, लायब्ररीचे पाटिल सर, आपण ’श्रीमान योगी’ बद्दल लिहीलं होतं.
त्यावेळी किती अपमान झाल्यासारखं वाटलेलं आपल्याला. पहिले भोकाड पसरून रडायला आलेलं आणि त्यानंतर दोन दिवस अश्रूंना खळ नव्ह्ता.
पण, अनू रडलेली दिसत नव्हती.

अनूची हिच गोष्ट श्रद्धाला खूप आवडायची. तिला फ़ार रडायला यायचं नाही. तिच्यावाटचा अश्रूंचा सगळा लॉट त्या दोघी जन्मताक्षणीच मनूकडे गेला होता. ती आणि मनू म्हणजे लहानपणीचे निरू आणि श्रद्धा.

"पण अनूने माझ्यासमोर लिहीलेलं ते. तिने कशातही बघून लिहीलं नाही ते. बाबाची शप्पथ."
मनू बोलत होती.
"मनस्विनी, अशा खुळ्यासारख्या शपथा घ्यायच्या नाहीत. आणि अनू म्हणतेय तर ते तिनं स्वत:च लिहीलं असणार हे मला माहितीये."
"अनू बाबाला कॉल करत होती. त्याचा फ़ोन पण लागत नाहीये"
आहे त्या सिच्युएशनबद्दल आपल्याला काही करता येत नाहीये हे कळून मनू किती गरीब बिचारी झाली होती.
"काय करतिये अनू?"
"कधीची झोपलिये."
"झोपू देत. ती उठेल तेव्हा पाहू आपण काय करायचं ते"

--

अनू थेट संध्याकाळी उठली. त्यानंतर ती होमवर्क करत बसली. खेळायला गेली नाही, टीव्ही लावला नाही, मनूच्या शेंड्या ओढून तिला घरभर पळायला लावून त्रास दिला नाही. फ़िशटॅंकमधल्या बोझोशी गप्पा केल्या नाहीत. एरव्ही श्रद्धाला घसा बसेपर्यंत ओरडत त्यांच्या पाठी धावावं लागायचं; आणि, आज तसं झालं नाही तर, चुकचुकल्यासारखं वाटत होतं.
मनू डोळ्याच्या कोप-यातून कधी तिच्याकडे आणि कधी माझ्याकडे "बघ, मी तुला सांगीतलं नव्ह्तं?" अशा अर्थाने बघत होती.
अशाच शांततेमध्ये संध्याकाळ सरली, उरलेल्या कामांच्या रगड्यात रात्र झाली. झोपायची वेळ झाली.

श्रद्धा मुलींच्या खोलीत आली तेव्हा अनू झोपी गेलेली होती आणि मनू तिच्याकडे बघत टक्क जागी.
मनूने अनू जागीच असल्याची खूण केली आणि खुसपुसत म्हटलं,
"तिने मला विचारलं, पुस्तक वाचून मला वाटलं ते मी  राईट-अपमध्ये लिहीलं; तर, बाईंनी सांगीतल्यावर मला का लिहीता आलं नाही?"
"मग, तू काय म्हणालीस?"
"मला नाई माहित. मी काय सांगू?"
स्वत:बद्दल संशय निर्माण होण्याची, आपलं काहीतरी चुकतंय, आपल्यातच काहीतरी कमी आहे असं वाटायची आणि त्याने झुरत बसायची हीच ती वेळ. मला त्यातून बाहेर काढायला माझी आई होती, झालंच तर निरू होता. अनूला कोणेय? तिचा बाबा, मनू आणि मी?
श्रद्धाने अस्वस्थपणे एक आवंढा गिळला.
"कळेल ते. तिलाही आणि तुलाही. कळतं ते आपोआप"
 मनूला किती बरं वाटल्याचं तिच्या चेह-यावर साफ़ दिसलं.
"खरंच? कसं?"
"त्यासाठी एक गोष्ट सांगते तुला."
अनूने कान टवकारल्याचं मनू आणि श्रद्धा दोघींनीही पाहिलं आणि त्या दोघी अनूच्या जवळ सरकल्या. श्रद्धाने गोष्ट सुरू केली.

"खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माणसांची आणि झाडांची घट्ट मैत्री होती. त्या काळात माणूस बिल्डींग बांधायची म्हणून जुनी, मोठी झाडं तर सोडाच, पण छोटी झाडंही तोडायचा नाही. अशाच एका पुराणवृक्षांनी सजलेल्या सुंदर वनात सर्व प्राणी-पक्षी-सर्व जीवजंतू गुण्यागोवि़ंद्याने.. म्हणजे हॅप्पिली राहायचे. त्या वनाचा राजा होता?-"
"सिंव्ह?"
"नाही."
"वाघ?"
"नाही"
"मग?"
"त्या वनाचा राजा होता एक सेंटिपेड. आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये दिसतो कधीमधी."
मनूने लागलीच त्यांच्या आयपॅडवर गूगल उघडलं आणि सेंटिपेड सर्च करून त्यांच्या कथानायकाला स्क्रीनवर आणलं.
"हो हो, मला माहितेय. त्याला शंभर पाय असतात नं?"
"हो. तर, हा सेंटिपेड, त्याचं नाव-मि. फ़ूट्सी. हा मि. फ़ूट्सी सर्वांचा लाडका होता. सगळ्या माणसांना दोनच पाय असतात, काही प्राण्यांना दोन किंवा चार पाय असतात, पण याला सहा नव्हे, आठ नव्हे, तर शंभर पाय म्हणून सगळ्यांना त्याचं कोण कौतुक. त्याच्या शंभर पायांचं सगळ्यांना आकर्षणही वाटायचं आणि हेवाही वाटायचा. स्वत:ला "लेग्ज" म्हणवणारा आठ पायांचा टॅरॅण्टुला काय जळायचा त्याच्यावर.."
"खुक्क"- अर्थात मनू

"तो त्याच्या शंभर पायांनी तो खूप सुंदर डान्स करायचा. फ़ुलांचा मोसम आला की सगळं वन त्याचा तो पानाफ़ुलांवरचा डान्स बघायला यायचं. सगळ्यांनाच नाही येत असा डान्स करता. आपल्या अनूसारखं. आपल्या अनूसारखे हायकू करता येतात का कोणाला? "
"मांजर ठसे
शोधताना मातीत
होते मांजर"

किंवा तो बेडूकवाला कोणता?
"बेडूक म्हणे
नवी भाषा शिकलो-
डर डरॉंssssव!"

दोघीही खळखळून हसल्या, अनूचेही गाल वर झाल्याचं मागून दिसलं.

"तर, स्पंजबॉबमध्ये पॅट्रिक स्टार आहे, सॅंडी चीक्स आहे तसा स्क्विडवार्ड पण आहे नं? तसं त्या वनात बिली-बॉब नावाचा एक बेडूक होता. त्याला मि. फ़ूट्सी बिलकुल आवडायचा नाही. त्याच्याकडून राजाचं पद कसं काढून घेता येईल यावर त्याचा सारखा विचार सुरू असायचा आणि एके दिवशी त्याला तो मार्ग सापडला"

एके दिवशी आपला मि. फ़ूट्सी जंगलातून फ़ेरी मारत असताना बिलि-बॉब त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याने मि. फ़ूट्सीला वाकून नमस्कार केला आणि खोटं-खोटं हसून म्हणाला,
"मि. फ़ूट्सी, मी बिलि-बॉब.  मी तुमचा खूप मोठा फ़ॅन आहे. तुमच्या शंभर पायांनी केलेल्या नृत्याची चर्चा तर आजूबाजूच्या जंगलातही होत असते. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, तुमची परवानगी असेल तर विचारीन म्हणतो.."

मि. फ़ूट्सीने ’हो’ म्हणताच बिलि-बॉब म्हणाला, "मि. फ़ूट्सी, तुम्ही तर पाहातच आहात की मला चारच पाय आहेत. तरी, मी उडी मारतो तेव्हा माझ्या मागच्या दोन पायांपैकी कोणत्यातरी एका पायावर जास्त भार देतो की दोन्ही पायांवर समान भार देतो, उडी मारताना पुढच्या दोन पायांपैकी कोणतातरी एक पाय पुढे असणार आहे की दोन्ही पाय समान रेषेत असणार आहे हे माझं मलाच माहित नसतं. मी खूप प्रयत्न केला, पण मला काही ते कळून घेता आलं नाही.  मला जे चार पायांनी जमत नाही ते तुम्ही शंभर पायांनी कसं करता बुवा? तुम्ही इतके थोर आहात; तर, नृत्य करताना तुमचा त्रेसष्ठावा आणि चव्वेचाळीसावा पाय करत असतो हे तुम्हाला आधीच माहित असेल ना? तुमच शहाण्णवावा पाय पुढे असताना चौथा पाय पुढे असतो का मागे? तुम्ही सम पायांनी पुढे जाता की विषम पायांनी? मला इतकं सांगीतलंत तरी मी तुमचा आभारी राहिन. मला आलेलं अपयश विसरायला मदत होईल महाराज."

मि. फ़ूट्सीने यावर मान डोलावली आणि डान्सची एक स्टेप करायला सरसावला, पण..
मनूचा आणि पलीकडून अनूचा श्वास स्स्स्स करून आत..
"तो कोलमडून पडला..इतका.. की थेट उताणाच झाला. त्याला सावरायला इतरांची मदत घ्यायला लागली. त्याने पुन्हा एकदा एक साधी सुधी स्टेप करायचा प्रयत्न केला, पण तो सारखा अडखळून पडायला लागला. त्याला समजेच ना आपल्याला काय होतंय ते. बिलि-बॉब हे पाहून मनातल्या मनात हसत होता"

"दुष्ट बिलि-बॉब" मनू फ़िस्कारली.

"मग मि. फ़ूट्सीने उत्तर देण्याकरता बिलि-बॉबकडून दोन दिवस मागून घेतले. ते दोन दिवस मि. फ़ूट्सीच्या डोक्यात सारखा सारखा तोच हिशोब सुरु होता. आपला दुसरा पाय पुढे असताना चोपन्नावा पाय काय करतोय, आपण चालताना कोणता पाय पुढे आणि कोणता पाय मागे यावर. त्यामुळे मग त्याला त्याचा नेहमीसारखा डान्सही करता येईना. डान्स तर सोडाच त्याला साधं चालताही येईना. जो डान्स पूर्वी इतका छान जमायचा, तो आपल्याला आता का जमत नाही याचा विचार करकरुन त्याचं डोकं दुखायला लागलं. "

एव्हाना अनू झोपेचं सोंग सोडून थेट उठूनच बसली होती.
"मग? त्याला कळलं का त्याच्या पायांचं गणित?"
"काय माहित! पण अनू.. गोष्टीचा पॉंईंट तो नाहीच मुळी. आपला पॉईंट हा आहे की त्या अति-विचार करण्याने तो नृत्यकलाही विसरला. आपण चालताना हा पाय पुढे... हा पाय मागे असा सारखा डोक्यात विचार करुन बघ.. एका पॉईंटनंतर आपल्याला अडखळायला होतं. ते नॅचरलीच येऊन द्यावं. त्यावर डोकं शिणवू नये. मि. फ़ूट्सी बघ- त्यानंतर वेडवाकडंच, फ़ेंगाडंच चालायला लागला, ते आजपर्यंत तसंच चालतो आहे. अनू, तुझं लिखाण, मनूचं ड्रॉंईंग ही मि. फ़ूट्सीच्या डान्ससारखी गिफ़्ट्स आहेत. तुम्हाला मिळालेली. कोणी प्रश्न विचारला म्हणून आपल्या गिफ़्ट्सवर संशय घेऊ नये, त्याचा फ़ार विचार करू नये.. नाहीतर ती कायमची हरवतात. मि. फ़ूट्सीच्या डान्ससारखी.."

दोघींना गुडनाईट किस देऊन श्रद्धा जायला निघाली तेव्हा अनू-मनू दोघीही विचारात मग्न होत्या.

--

या गोष्टीतून अनूला काय कळलं, कितपत कळलं, कळलं ते तिच्या डोक्यातला विचारांचा भुंगा थांबवण्याकरता पुरेसं होतं का? श्रद्धाला यातलं काहीच ठाऊक नव्हतं.
पण,
पुढच्याच सकाळी तिच्या टेबलवर सहलीच्या परमिशनचा फ़ॉर्म आणि पेन पाहिलं, तेव्हा-
ते व्यवस्थित पोहोचलंय हे तिला नीटच कळलं.

--

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ | इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३
 
Designed by Lena