’रोमन साम्राज्याचा पाडाव’

रोमन साम्राज्याचा पाडाव *

रविवारी सकाळी वारा जरा सुसाटल्याचं माझ्या लक्षात आलं. अगदी नेमकंच सांगायचं झालं तर, तेव्हा दोन वाजून सात मिनीटे झाली होती.

त्या वेळी मी नेहमीसारखा- म्हणजे मी दर रविवारी असतो तसा- टेबलापाशी बसून माझ्या डायरीमध्ये आठवडाभराच्या नोंदी उतरवून काढत होतो. पाठी कुठलंतरी गाणं वाजत होतं. प्रत्येक दिवसातल्या ठळक गोष्टींची डोक्यात नोंद करुन ठेवायची आणि रविवारी त्या डायरीत लिहून काढायच्या हा माझा नेम होता.
तीन दिवसांच्या नोंदी लिहून मंगळवार आटपतोय इतक्यात मला खिडकीबाहेर जोरात वाहणाऱ्या आणि खिडकीवर दाणदाण वाजणाऱ्या वाऱ्याची जाणीव झाली. मी लिहिणं थांबवलं, पेनाला टोपण लावून ठेवलं आणि दोरीवरचे कपडे काढायला व्हरांड्यात गेलो. सगळ्या कपड्यांची नुसती फडफड फडफड चालली होती. सुकून कडकडीत झालेल्या कपड्यांचे जोरदार सपकारे बसत होते. वाऱ्यावर फडफडताना ते आकाशात मोकाट सुटलेल्या धूमकेतूसारखे वाटत होते.

असा सुसाट वारा सुरु हो‌ईल याची मला कल्पनाच नव्हती. सकाळी, अगदी नेमकंच सांगायचं झालं तर, दहा वाजून अठरा मिनीटे झालेली, तेव्हा वाऱ्याचा मागमूसही नव्हता आणि याबाबतीत माझी स्मरणशक्ती तल्लख आहे. मी हे इतक्या छातीठोकपणे का सांगतोय तर, मी सकाळी कपडे वाळत घालत असताना मी अशा शांत, वारा नसलेल्या दिवशी कपड्यांना क्लिपा लावायची पण गरज नाही असा विचार केलेला.

अगदी गळ्याशप्पथ, तेव्हा वाऱ्याची साधी फुंकर देखील इकडून तिकडे जात नव्हती.

मी भराभर कपडे गोळा केले आणि खिडक्या बंद करायच्या मागे लागलो. खिडक्या बंद झाल्या तसा वाऱ्याचा आवाज ऐकू ये‌ईनासा झाला. त्या बिन‌आवाजी वादळामध्ये बाहेरची हिमालयन सेदार, चेस्टनटची झाडं प्रचंड खाज सुटलेल्या, पण त्या खाजेचं काय करावं हे समजेनासं झालेल्या कुत्र्यासारखी भोवंडत होती. ढगांचे पुंजके पाळत ठेवणाऱ्या गुप्तहेरासारखे येत होते, जात होते. व्हरांड्यात कपडे वाळत घालायच्या दोऱ्यांना बिलगून बसलेले शर्ट दिसत होते - अनाथ बच्ची बिलगतात तसे.

बाहेर चक्क वादळ सुरु झालंय, मी मनात म्हटलं.

मी पेपर उघडला आणि हवामान खातं काय म्हणतंय ते पाहिलं. पण तिथे वादळाचा अंदाज वर्तवल्याचं दिसलं नाही. पावसाची शक्यता तर ० टक्के वर्तवली होती. रविवारची शांत दुपार कशी भरभराटीच्या दिवसातल्या रोममधल्या सुस्त दिवसासारखी वाटायला हवी आणि ती तशीच असायला हवी होती.

मी सुस्कारा सोडला. तो बहुतेक ३० टक्के सुस्कारा असावा. मी पेपर घडी करुन ठेवून दिला. मग कपडे घडी करून खणात ठेवून दिले. मघाच्याच त्या निरुपद्रवी गाण्यासारखी अजून काही गाणी ऐकत कॉफी बनवली आणि कॉफीचा वाफाळणारा मग घे‌ऊन डायरी उघडून बसलो.

गुरुवार, गर्लफ्रेण्डसोबत सेक्स. तिला सेक्स करतेवेळी डोळ्यांवर पट्टी बांधायला आवडते. तेवढ्याकरता ती प्रवासाच्या बॅगेमध्येही एक पट्टी नेहमी बाळगते- कधी लागलीच तर असावी म्हणून.
ते मला आवडतं असं नव्हे, पण, ती डोळ्यांवर पट्टी बांधून इतकी क्यूट दिसते की मी निषेध वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही. आपण माणसं आहोत शेवटी, प्रत्येक माणसात काही ना काही वैचित्र्य असतंच.

गुरुवारची नोंद इतकीच. ८० टक्के वास्तव आणि २० टक्के टिप्पण्या. ही माझी डायरी लिहायची पद्धत आहे.

शुक्रवार, गिंझा बुकस्टो‌अरमध्ये मला माझा जुना मित्र भेटला. त्याने भयानक टाय घातला होता. रेघारेघांच्या टायवर टेलिफोन नंबर होते.
मी इतके लिहितोय तोच टेलिफोनची घंटी वाजली.

* १८८१चा भारतीय उठाव *

टेलिफोन घणघणला तेव्हा दोन वाजून छत्तीस मिनीटं झाली होती. तिचाच फोन असावा बहुधा- डोळ्यांवर पट्टीवालीचा- म्हणजे मला आपलं असं वाटलं. ती रविवारी येणार होती आणि येण्या‌आधी ती नेहमी एक फोन करते. रात्रीच्या जेवणाचं सामान तीच आणणार होती. आज रात्रीसाठी आम्ही ऑयस्टर हॉट पॉटचा बेत केला होता.

तर असो, टेलिफोन वाजला तेव्हा दोन वाजून छत्तीस मिनीटं झाली होती. माझा अलार्म टेलिफोनच्या बरोब्बर बाजूला आहे. त्यामुळे फोन उचलताना किती वाजलेत हे नेहमी कळतं आणि ते बरोब्बर लक्षात राहतं.

मी फोन उचलला, तेव्हा रिसिव्हरमधून मला फक्त वाऱ्याचा घूं घूं आवाज ऐकू आला. १८८१च्या उठावात सामील झालेल्या भारतीय सैनिकांच्या संतप्त घोषासारखा. ते केबिन्स जाळत होते, टेलिग्राफ तारा कापत होते, कँडीस बर्जनवर बलात्कार करत होते.

"हॅलो", मी विचारुन पाहिलं, पण माझा तो इवलासा आवाज त्या संतप्त तांडवात कुठल्याकुठे विरुन गेला.
हॅलो? हॅलो? मी जोरात ओरडून पाहिलं पण व्यर्थ!

मी कानाला ताण दे‌ऊन ऐकायचा प्रयत्न केला तेव्हा त्या घोंघावण्यात एका स्रीचा बारीकसा आवाज ऐकू आला, किंवा मला तसा भास झाला. वाऱ्याचा आवाजच इतका होता, की खात्रीने काही सांगता येणं अशक्य होतं. वाऱ्याला अक्षरशः वेड लागलं होतं.

मला एक शब्दही बोलता आला नाही. मी रिसीव्हर कानाला लावून तसाच तिथं उभा होतो, रिसिव्हर कानाला चिकटवून उभा होतो असं म्हटलं तरी चालेल. मला वाटलं की, तो आता कानापासून सुटा होणारच नाही. पण, १५ ते २० सेकंदांनतर टेलिफोन बंद झाला, सीझर ये‌ऊन एखादं आयुष्य कच्चकन संपावं तसा. उरली फक्त अचानक घेरुन येणारी रिकामी शांतता - सारखंसारखं ब्लीच करुन म‌ऊपणा हरवलेल्या अंडरवे‌अरसारखी.

* हिटलरचं पोलंडवर आक्रमण *

आता काय? असा विचार करुन मी पुन्हा एकदा डायरी लिहायला सुरुवात केली, निदान या नोंदी संपवून टाकू असा विचार करत.

शनिवार, हिटलरच्या सशस्त्र सैन्याने पोलंडवर हल्लाबोल केला. वॉर्सावर डा‌ईव्ह बाँबर्स घिरट्या घालत-

अरे, हे काय लिहितोय मी. असं थोडीच घडलं? हिटलरने १ सप्टेंबर, १९३९ रोजी पोलंडवर हल्लाबोल केला होता, काल नव्हे. काल रात्री जेवण झाल्यावर मी मूव्ही पाहायला गेलो होतो. मेरील स्ट्रिपचा ’सोफीज चॉ‌ईस’ पाहिला. त्यात हिटलरच्या पोलंडवरील आक्रमणाचा उडता उल्लेख आहे. त्या मूव्हीमध्ये मेरिल स्ट्रिप डस्टिन हॉफमनला घटस्फोट देते. नेहमीच्या ट्रेन प्रवासात तिला एक सिव्हिल इंजिनीयर म्हणजे रॉबर्ट डी निरो भेटतो आणि ती पुन्हा लग्न करते. ठिकठाक मूव्ही.

माझ्या बाजूला हायस्कूलमधले दोन मुलगा-मुलगी बसले होते. ते सारखे एकमेकांच्या पोटाला हात लावून पाहात होते. हायस्कूल विद्यार्थ्यांचा उदरस्पर्श काय! चालायचंच! एकेकाळी मी पण कोणाच्यातरी पोटाला असा हात लावून पाहिला होता.

घोंघावत्या वा-याचं साम्राज्य *

मागच्या आठवड्यातल्या नोंदी लिहून संपल्या, तशी मी डायरी मिटली आणि रेकॉर्ड ट्रॅकच्या समोर जा‌ऊन बसलो. रविवारच्या वादळी दुपारी ऐकण्यासाठी काही गाणी निवडली. त्यात शोस्ताकोविचचा चेलो काँचेर्तो होता, स्लाय अँड द फॅमिली स्टोन अल्बम होता. घोंघावत्या वाऱ्यात ऐकायला बरी पडली असती ही गाणी! मग मी ती लागोपाठ ऐकली. यादरम्यान खिडकीबाहेरचं नाट्य सुरुच होतं. एक पांढरी चादर चेटकिणीसारखी वाऱ्यावर उडत उडत पूर्वेकडून पश्चिमेला गेली. समोरचा पत्र्यांचा मोडकळीला आलेला पत्र्याचा फलक पार वाकला होता, अॅनल सेक्स करकरुन पाठीला बाक आलेल्या माणसासारखा. शोस्ताकोविचचा चेलो ऐकत ऐकत मी बाहेरचं नाट्य पाहात बसलो होतो. तेवढ्यात टेलिफोन पुन्हा वाजला. तेव्हा टेलिफोनच्या शेजारच्या त्या अलार्ममध्ये ३:४८ वाजले होते. आता पलीकडून बोईंग ७४७ जेट इंजिनच्या घरघराटाशिवाय काही ऐकायला मिळायचं नाही अशी मनाची तयारी करुन मी रिसिव्हर उचलला. पण यावेळी पलीकडून वाऱ्याचा आवाज ऐकू नाही आला.

"हॅलो", ती म्हणाली.

"हॅलो", मी पण म्हणालो.

"मी आता सामान आणायला बाहेर पडतेय, ओके?" माझी गर्लफ्रेण्ड म्हणाली. आता ती सगळं सामान घे‌ऊन घरी ये‌ईल, येताना तिची डोळ्यावरची पट्टी आणेल.

"ते ठीक आहे पण.."

"तुझ्याकडे कॅसेरोल आहे का?"

"होय, आहे, पण..",  मी म्हटलं, "काय झालंय तिथे? मला आता वा-याचा आवाज अजिबात ऐकू येत नाहीये."

"हो, वारा थांबलाय आता. इथे नाकानोमध्ये तीन वाजून पंचवीस मिनीटांनी थांबला. तुमच्या इथेही थांबायला वेळ लागणार नाही."

"बहुधा तसंच हो‌ईल", असं म्हणून मी देखील रिसिव्हर खाली ठेवला. फडताळाच्या वर एक साठवणीची जागा होती, तिथे कॅसेरोल होता, तो काढला आणि सिंकमध्ये धुतला.

मी अंदाज केल्याप्रमाणे वारा थांबला.. 4 वाजून 05 मिनीटांनी तंतोतंत. मी खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं. खिडकीच्या बरोब्बर खाली एक कुत्रा मन लावून जमीन हुंगत होता. पंधरा वीस मिनीटं झाली तरी त्याचं हुंगणं चालूच होतं. त्याला जमीन का हुंगाविशी वाटली याचं कारण मात्र मला समजू शकलं नाही.

हे इतकं सगळं घडलं तरी जग वारा सुरु व्हायच्या आधी होतं तसंच राहिलं होतं. ते हिमालयन सेदार, चेस्टनटची झाडं काही झालंच नाही अशा थाटामध्ये उभी होती. वाळत घातलेले कपडे पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या दो-यांवरुन लोंबायला लागले होते. टेलिफोनच्या खांबांवर बसलेल्या कावळ्यांनी एकदोनदा पंख फडफडवले. त्यांच्या चोची आता क्रेडिट कार्डासारख्या चकचकीत झाल्या होत्या. मी हे सर्व पाहात असताना माझी गर्लफ्रेण्ड घरी ये‌ऊन हॉट पॉट बनवायच्या तयारीला लागली होती. किचनच्या कट्टयापाशी उभे राहून तिने ऑयस्टर साफ केले, कोबी कापला, टोफूचे तुकडे आणि वाफाळता ब्रॉथ तयार करून ठेवला. तिने २:३६ मिनीटांनी मला फोन केला होता का असं मी तिला विचारलं.

मोठ्या पातेल्यात तांदूळ धुवून घेता घेता ती उत्तरली, "हो, मीच केला होता."

"मला काहीच ऐकू येत नव्हतं."

"हो, वाराच तेव्हढा होता", आहे हे असंच आहे या थाटात माझी गर्लफ्रेण्ङ.

मी रेफ्रिजरेटरमधून बी‌अर काढली आणि ती प्यायला टेबलाच्या कडेशी ये‌ऊन बसलो.
"पण बघ ना, अचानक वारा सुरु झाला, अचानक थांबला देखील", मी विचारलं.

"मला पण कळत नाहीये", ती उत्तरली. नखांनी कोळंब्या सोलत ती माझ्याकडे पाठ करुन उभी होती. "वाऱ्याचं काही सांगता येत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल बरंच काही माहित नसतं. इतिहासाचंच उदाहरण घे, किंवा कॅन्सरचं. समुद्रतळाबद्दल किंवा अवकाशाबद्दल, फारफार तर सेक्सबद्दल तरी आपल्याला सगळं कुठे माहित असतं?"

"हं", मी उत्तरलो. हे काही उत्तर नव्हे, पण, या विषयावर तिच्याशी जास्त बोलता आलं नसतं हे स्पष्ट झालं, तेव्हा मी तो नाद सोडून दिला आणि ऑयस्टर हॉट पॉट कधी बनतोय याची वाट बघत बसून राहिलो.

"ए, मी तुझ्या पोटाला हात लावून पाहू का?",  मी तिला विचारलं.

"नंतर."

मग मी हॉट पॉट बनतोय तोवर पुढच्या आठवड्यात डायरीत लिहिण्यासाठी डोक्यात आजच्या दिवसभरातील घटनांची टिपणं तयार करायचं ठरवलं आणि माझ्या डोक्यात नोंद झाली ती अशीः

  • रोमन साम्राज्याचा पाडाव
  • १८८१चा भारतीय उठाव
  • हिटलरचं पोलंडवरील आक्रमण

फक्त इतकंच: आणि, मी पुढच्या आठवड्यात आज काय घडलं होतं हे नेमकं सांगू शकलो असतो. नोंदी डोक्यात टिपून ठेवण्याच्या माझ्या या चोख आणि काटेकोर पद्धतीमुळेच मी एकही दिवस न चुकता गेली बावीस वर्षे डायरी लिहितो आहे. प्रत्येक अर्थपूर्ण गोष्टीमागे ती करायची खास पद्धत असते. मग वारा सुसाटो, अथवा पडो, मी असाच जगतोय, जगत आलोय.

--

पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

No comments:

 
Designed by Lena