’रोमन साम्राज्याचा पाडाव’

रोमन साम्राज्याचा पाडाव *

रविवारी सकाळी वारा जरा सुसाटल्याचं माझ्या लक्षात आलं. अगदी नेमकंच सांगायचं झालं तर, तेव्हा दोन वाजून सात मिनीटे झाली होती.

त्या वेळी मी नेहमीसारखा- म्हणजे मी दर रविवारी असतो तसा- टेबलापाशी बसून माझ्या डायरीमध्ये आठवडाभराच्या नोंदी उतरवून काढत होतो. पाठी कुठलंतरी गाणं वाजत होतं. प्रत्येक दिवसातल्या ठळक गोष्टींची डोक्यात नोंद करुन ठेवायची आणि रविवारी त्या डायरीत लिहून काढायच्या हा माझा नेम होता.
तीन दिवसांच्या नोंदी लिहून मंगळवार आटपतोय इतक्यात मला खिडकीबाहेर जोरात वाहणाऱ्या आणि खिडकीवर दाणदाण वाजणाऱ्या वाऱ्याची जाणीव झाली. मी लिहिणं थांबवलं, पेनाला टोपण लावून ठेवलं आणि दोरीवरचे कपडे काढायला व्हरांड्यात गेलो. सगळ्या कपड्यांची नुसती फडफड फडफड चालली होती. सुकून कडकडीत झालेल्या कपड्यांचे जोरदार सपकारे बसत होते. वाऱ्यावर फडफडताना ते आकाशात मोकाट सुटलेल्या धूमकेतूसारखे वाटत होते.

असा सुसाट वारा सुरु हो‌ईल याची मला कल्पनाच नव्हती. सकाळी, अगदी नेमकंच सांगायचं झालं तर, दहा वाजून अठरा मिनीटे झालेली, तेव्हा वाऱ्याचा मागमूसही नव्हता आणि याबाबतीत माझी स्मरणशक्ती तल्लख आहे. मी हे इतक्या छातीठोकपणे का सांगतोय तर, मी सकाळी कपडे वाळत घालत असताना मी अशा शांत, वारा नसलेल्या दिवशी कपड्यांना क्लिपा लावायची पण गरज नाही असा विचार केलेला.

अगदी गळ्याशप्पथ, तेव्हा वाऱ्याची साधी फुंकर देखील इकडून तिकडे जात नव्हती.

मी भराभर कपडे गोळा केले आणि खिडक्या बंद करायच्या मागे लागलो. खिडक्या बंद झाल्या तसा वाऱ्याचा आवाज ऐकू ये‌ईनासा झाला. त्या बिन‌आवाजी वादळामध्ये बाहेरची हिमालयन सेदार, चेस्टनटची झाडं प्रचंड खाज सुटलेल्या, पण त्या खाजेचं काय करावं हे समजेनासं झालेल्या कुत्र्यासारखी भोवंडत होती. ढगांचे पुंजके पाळत ठेवणाऱ्या गुप्तहेरासारखे येत होते, जात होते. व्हरांड्यात कपडे वाळत घालायच्या दोऱ्यांना बिलगून बसलेले शर्ट दिसत होते - अनाथ बच्ची बिलगतात तसे.

बाहेर चक्क वादळ सुरु झालंय, मी मनात म्हटलं.

मी पेपर उघडला आणि हवामान खातं काय म्हणतंय ते पाहिलं. पण तिथे वादळाचा अंदाज वर्तवल्याचं दिसलं नाही. पावसाची शक्यता तर ० टक्के वर्तवली होती. रविवारची शांत दुपार कशी भरभराटीच्या दिवसातल्या रोममधल्या सुस्त दिवसासारखी वाटायला हवी आणि ती तशीच असायला हवी होती.

मी सुस्कारा सोडला. तो बहुतेक ३० टक्के सुस्कारा असावा. मी पेपर घडी करुन ठेवून दिला. मग कपडे घडी करून खणात ठेवून दिले. मघाच्याच त्या निरुपद्रवी गाण्यासारखी अजून काही गाणी ऐकत कॉफी बनवली आणि कॉफीचा वाफाळणारा मग घे‌ऊन डायरी उघडून बसलो.

गुरुवार, गर्लफ्रेण्डसोबत सेक्स. तिला सेक्स करतेवेळी डोळ्यांवर पट्टी बांधायला आवडते. तेवढ्याकरता ती प्रवासाच्या बॅगेमध्येही एक पट्टी नेहमी बाळगते- कधी लागलीच तर असावी म्हणून.
ते मला आवडतं असं नव्हे, पण, ती डोळ्यांवर पट्टी बांधून इतकी क्यूट दिसते की मी निषेध वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही. आपण माणसं आहोत शेवटी, प्रत्येक माणसात काही ना काही वैचित्र्य असतंच.

गुरुवारची नोंद इतकीच. ८० टक्के वास्तव आणि २० टक्के टिप्पण्या. ही माझी डायरी लिहायची पद्धत आहे.

शुक्रवार, गिंझा बुकस्टो‌अरमध्ये मला माझा जुना मित्र भेटला. त्याने भयानक टाय घातला होता. रेघारेघांच्या टायवर टेलिफोन नंबर होते.
मी इतके लिहितोय तोच टेलिफोनची घंटी वाजली.

* १८८१चा भारतीय उठाव *

टेलिफोन घणघणला तेव्हा दोन वाजून छत्तीस मिनीटं झाली होती. तिचाच फोन असावा बहुधा- डोळ्यांवर पट्टीवालीचा- म्हणजे मला आपलं असं वाटलं. ती रविवारी येणार होती आणि येण्या‌आधी ती नेहमी एक फोन करते. रात्रीच्या जेवणाचं सामान तीच आणणार होती. आज रात्रीसाठी आम्ही ऑयस्टर हॉट पॉटचा बेत केला होता.

तर असो, टेलिफोन वाजला तेव्हा दोन वाजून छत्तीस मिनीटं झाली होती. माझा अलार्म टेलिफोनच्या बरोब्बर बाजूला आहे. त्यामुळे फोन उचलताना किती वाजलेत हे नेहमी कळतं आणि ते बरोब्बर लक्षात राहतं.

मी फोन उचलला, तेव्हा रिसिव्हरमधून मला फक्त वाऱ्याचा घूं घूं आवाज ऐकू आला. १८८१च्या उठावात सामील झालेल्या भारतीय सैनिकांच्या संतप्त घोषासारखा. ते केबिन्स जाळत होते, टेलिग्राफ तारा कापत होते, कँडीस बर्जनवर बलात्कार करत होते.

"हॅलो", मी विचारुन पाहिलं, पण माझा तो इवलासा आवाज त्या संतप्त तांडवात कुठल्याकुठे विरुन गेला.
हॅलो? हॅलो? मी जोरात ओरडून पाहिलं पण व्यर्थ!

मी कानाला ताण दे‌ऊन ऐकायचा प्रयत्न केला तेव्हा त्या घोंघावण्यात एका स्रीचा बारीकसा आवाज ऐकू आला, किंवा मला तसा भास झाला. वाऱ्याचा आवाजच इतका होता, की खात्रीने काही सांगता येणं अशक्य होतं. वाऱ्याला अक्षरशः वेड लागलं होतं.

मला एक शब्दही बोलता आला नाही. मी रिसीव्हर कानाला लावून तसाच तिथं उभा होतो, रिसिव्हर कानाला चिकटवून उभा होतो असं म्हटलं तरी चालेल. मला वाटलं की, तो आता कानापासून सुटा होणारच नाही. पण, १५ ते २० सेकंदांनतर टेलिफोन बंद झाला, सीझर ये‌ऊन एखादं आयुष्य कच्चकन संपावं तसा. उरली फक्त अचानक घेरुन येणारी रिकामी शांतता - सारखंसारखं ब्लीच करुन म‌ऊपणा हरवलेल्या अंडरवे‌अरसारखी.

* हिटलरचं पोलंडवर आक्रमण *

आता काय? असा विचार करुन मी पुन्हा एकदा डायरी लिहायला सुरुवात केली, निदान या नोंदी संपवून टाकू असा विचार करत.

शनिवार, हिटलरच्या सशस्त्र सैन्याने पोलंडवर हल्लाबोल केला. वॉर्सावर डा‌ईव्ह बाँबर्स घिरट्या घालत-

अरे, हे काय लिहितोय मी. असं थोडीच घडलं? हिटलरने १ सप्टेंबर, १९३९ रोजी पोलंडवर हल्लाबोल केला होता, काल नव्हे. काल रात्री जेवण झाल्यावर मी मूव्ही पाहायला गेलो होतो. मेरील स्ट्रिपचा ’सोफीज चॉ‌ईस’ पाहिला. त्यात हिटलरच्या पोलंडवरील आक्रमणाचा उडता उल्लेख आहे. त्या मूव्हीमध्ये मेरिल स्ट्रिप डस्टिन हॉफमनला घटस्फोट देते. नेहमीच्या ट्रेन प्रवासात तिला एक सिव्हिल इंजिनीयर म्हणजे रॉबर्ट डी निरो भेटतो आणि ती पुन्हा लग्न करते. ठिकठाक मूव्ही.

माझ्या बाजूला हायस्कूलमधले दोन मुलगा-मुलगी बसले होते. ते सारखे एकमेकांच्या पोटाला हात लावून पाहात होते. हायस्कूल विद्यार्थ्यांचा उदरस्पर्श काय! चालायचंच! एकेकाळी मी पण कोणाच्यातरी पोटाला असा हात लावून पाहिला होता.

घोंघावत्या वा-याचं साम्राज्य *

मागच्या आठवड्यातल्या नोंदी लिहून संपल्या, तशी मी डायरी मिटली आणि रेकॉर्ड ट्रॅकच्या समोर जा‌ऊन बसलो. रविवारच्या वादळी दुपारी ऐकण्यासाठी काही गाणी निवडली. त्यात शोस्ताकोविचचा चेलो काँचेर्तो होता, स्लाय अँड द फॅमिली स्टोन अल्बम होता. घोंघावत्या वाऱ्यात ऐकायला बरी पडली असती ही गाणी! मग मी ती लागोपाठ ऐकली. यादरम्यान खिडकीबाहेरचं नाट्य सुरुच होतं. एक पांढरी चादर चेटकिणीसारखी वाऱ्यावर उडत उडत पूर्वेकडून पश्चिमेला गेली. समोरचा पत्र्यांचा मोडकळीला आलेला पत्र्याचा फलक पार वाकला होता, अॅनल सेक्स करकरुन पाठीला बाक आलेल्या माणसासारखा. शोस्ताकोविचचा चेलो ऐकत ऐकत मी बाहेरचं नाट्य पाहात बसलो होतो. तेवढ्यात टेलिफोन पुन्हा वाजला. तेव्हा टेलिफोनच्या शेजारच्या त्या अलार्ममध्ये ३:४८ वाजले होते. आता पलीकडून बोईंग ७४७ जेट इंजिनच्या घरघराटाशिवाय काही ऐकायला मिळायचं नाही अशी मनाची तयारी करुन मी रिसिव्हर उचलला. पण यावेळी पलीकडून वाऱ्याचा आवाज ऐकू नाही आला.

"हॅलो", ती म्हणाली.

"हॅलो", मी पण म्हणालो.

"मी आता सामान आणायला बाहेर पडतेय, ओके?" माझी गर्लफ्रेण्ड म्हणाली. आता ती सगळं सामान घे‌ऊन घरी ये‌ईल, येताना तिची डोळ्यावरची पट्टी आणेल.

"ते ठीक आहे पण.."

"तुझ्याकडे कॅसेरोल आहे का?"

"होय, आहे, पण..",  मी म्हटलं, "काय झालंय तिथे? मला आता वा-याचा आवाज अजिबात ऐकू येत नाहीये."

"हो, वारा थांबलाय आता. इथे नाकानोमध्ये तीन वाजून पंचवीस मिनीटांनी थांबला. तुमच्या इथेही थांबायला वेळ लागणार नाही."

"बहुधा तसंच हो‌ईल", असं म्हणून मी देखील रिसिव्हर खाली ठेवला. फडताळाच्या वर एक साठवणीची जागा होती, तिथे कॅसेरोल होता, तो काढला आणि सिंकमध्ये धुतला.

मी अंदाज केल्याप्रमाणे वारा थांबला.. 4 वाजून 05 मिनीटांनी तंतोतंत. मी खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं. खिडकीच्या बरोब्बर खाली एक कुत्रा मन लावून जमीन हुंगत होता. पंधरा वीस मिनीटं झाली तरी त्याचं हुंगणं चालूच होतं. त्याला जमीन का हुंगाविशी वाटली याचं कारण मात्र मला समजू शकलं नाही.

हे इतकं सगळं घडलं तरी जग वारा सुरु व्हायच्या आधी होतं तसंच राहिलं होतं. ते हिमालयन सेदार, चेस्टनटची झाडं काही झालंच नाही अशा थाटामध्ये उभी होती. वाळत घातलेले कपडे पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या दो-यांवरुन लोंबायला लागले होते. टेलिफोनच्या खांबांवर बसलेल्या कावळ्यांनी एकदोनदा पंख फडफडवले. त्यांच्या चोची आता क्रेडिट कार्डासारख्या चकचकीत झाल्या होत्या. मी हे सर्व पाहात असताना माझी गर्लफ्रेण्ड घरी ये‌ऊन हॉट पॉट बनवायच्या तयारीला लागली होती. किचनच्या कट्टयापाशी उभे राहून तिने ऑयस्टर साफ केले, कोबी कापला, टोफूचे तुकडे आणि वाफाळता ब्रॉथ तयार करून ठेवला. तिने २:३६ मिनीटांनी मला फोन केला होता का असं मी तिला विचारलं.

मोठ्या पातेल्यात तांदूळ धुवून घेता घेता ती उत्तरली, "हो, मीच केला होता."

"मला काहीच ऐकू येत नव्हतं."

"हो, वाराच तेव्हढा होता", आहे हे असंच आहे या थाटात माझी गर्लफ्रेण्ङ.

मी रेफ्रिजरेटरमधून बी‌अर काढली आणि ती प्यायला टेबलाच्या कडेशी ये‌ऊन बसलो.
"पण बघ ना, अचानक वारा सुरु झाला, अचानक थांबला देखील", मी विचारलं.

"मला पण कळत नाहीये", ती उत्तरली. नखांनी कोळंब्या सोलत ती माझ्याकडे पाठ करुन उभी होती. "वाऱ्याचं काही सांगता येत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल बरंच काही माहित नसतं. इतिहासाचंच उदाहरण घे, किंवा कॅन्सरचं. समुद्रतळाबद्दल किंवा अवकाशाबद्दल, फारफार तर सेक्सबद्दल तरी आपल्याला सगळं कुठे माहित असतं?"

"हं", मी उत्तरलो. हे काही उत्तर नव्हे, पण, या विषयावर तिच्याशी जास्त बोलता आलं नसतं हे स्पष्ट झालं, तेव्हा मी तो नाद सोडून दिला आणि ऑयस्टर हॉट पॉट कधी बनतोय याची वाट बघत बसून राहिलो.

"ए, मी तुझ्या पोटाला हात लावून पाहू का?",  मी तिला विचारलं.

"नंतर."

मग मी हॉट पॉट बनतोय तोवर पुढच्या आठवड्यात डायरीत लिहिण्यासाठी डोक्यात आजच्या दिवसभरातील घटनांची टिपणं तयार करायचं ठरवलं आणि माझ्या डोक्यात नोंद झाली ती अशीः

  • रोमन साम्राज्याचा पाडाव
  • १८८१चा भारतीय उठाव
  • हिटलरचं पोलंडवरील आक्रमण

फक्त इतकंच: आणि, मी पुढच्या आठवड्यात आज काय घडलं होतं हे नेमकं सांगू शकलो असतो. नोंदी डोक्यात टिपून ठेवण्याच्या माझ्या या चोख आणि काटेकोर पद्धतीमुळेच मी एकही दिवस न चुकता गेली बावीस वर्षे डायरी लिहितो आहे. प्रत्येक अर्थपूर्ण गोष्टीमागे ती करायची खास पद्धत असते. मग वारा सुसाटो, अथवा पडो, मी असाच जगतोय, जगत आलोय.

--

पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

एक व्हिल, दोन व्हिल, डॉगव्हिल!

तसं बघायला गेलं तर हे काही मोठं गहन सत्य वगैरे नाही. आपल्या सर्वांकडे चॉ‌ईस असतो. एखादी परिस्थिती आहे तशी स्वीकारायची किंवा नाही, लोकांना स्वीकारायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. हा निर्णय बहुतेक वेळा प्रचंड क्रूरपणे घ्यावा लागतो. त्यामुळेच आपण बरेचदा एखाद्या परिस्थितीचं, लोकांच्या अशा-तशा असण्याचं-नसण्याचं खापर कोणत्यातरी दुस-या परिस्थितीवर, दुस-या लोकांवर फोडून, आहे त्या परिस्थितीची अनेक स्पष्टीकरणे देत निर्णय घेणं लांबणीवर टाकत असतो. अशा निवड करण्यातून-न करण्यातून, स्पष्टीकरणं देण्यातून उद्भवलेलं द्वंद्व म्हणजे डॉगव्हिल. क्रूर होण्याविषयी वाटणा-या भीतीतून डॉगव्हिल घडतो. कुब्रिक, तार्कोव्हस्कीच्या जातकुळीतल्या लार्स व्हॉन ट्रि‌एरने देखील मोजके सिनेमे केले. ’डॉगव्हिल’ हा त्याच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक.

डॉगव्हिल हा चित्रपट ग्रेस नावाच्या मुलीभोवती फिरतो. गँगस्टर्स मागावर असलेली ही ग्रेस जीव वाचवून पळ काढताना डॉगव्हिलमध्ये ये‌ऊन पोहोचते. ग्रेसला गावात लपायला जागा हवी असते, पण, गावकरी या अनोळखी मुलीला गावात ठेवून घ्यायला नाखूष आहेत. पण, प्रत्येक गावात (किंवा गावांच्या पाहिल्या-वाचलेल्या कथांमध्ये) एक स्वघोषित उदारमतवादी, चिंतनशील उमदा पुरुष असतोच, तसा इथे थॉमस एडिसन ज्युनियर आहे. तो गावक-यांना राजी करतो. कृतज्ञ ग्रेस या उपकारांच्या बदल्यात गावातल्या लोकांना कामात मदत करण्याची इच्छा बोलून दाखवते. आपल्याकडे तिला देण्यासारखं काही काम नाहीच आहे असं निक्षून सांगणा-या गावक-यांकडे ग्रेस कामं शोधून काढते. गावक-यांना आपलंसं करते.
ग्रेसफ़ुल ग्रेस
तिला आपल्या परीने त्यांची मदत करायची आहे बस्स. काही दिवसांनंतर ते गँगस्टर्स तिचा शोध घेत घेत डॉगव्हिलमध्ये ये‌ऊन पोहोचतात आणि ग्रेसला गावात ठेवणं किती जोखीमीचं आहे हे गावक-यांना कळतं. आपण पत्करत असलेल्या जोखीमीची परतफेड म्हणून ग्रेसने गावक-यांकडे अधिक वेळ काम करावं असं ठरतं. उपकारांची परतफेड म्हणून ग्रेस त्यालाही राजी होते; आणि, मग ग्रेसला द्यायला अजिबात कामं नसलेल्या गावक-यांकडे पुष्कळ कामं निघायला लागतात, ग्रेसवर ताण यायला लागतो. लैंगिक भूक भागवण्याच्या कामाकरिता देखील तिचा वापर करून घेतला जा‌ऊ लागतो. गावातील प्रत्येक पुरुष तिच्यावर बलात्कार करुन आपली लैंगिक भूक शमवून घेतो. आपण डॉगव्हिलचे गुलाम हो‌ऊन चुकलो आहोत हे ग्रेसला कळून चुकतं. ती पळायचा एक अयशस्वी प्रयत्नही करून पाहते. त्यानंतर मात्र तिच्या गळ्यात एक पट्टा अडकवण्यात येतो (हो! पूर्वी गुलामांच्या गळ्यात असायचा तसा) आणि त्या पट्याला सिमेण्टचं एक चक्र जोडण्यात येतं.
कामाने, छळाने पिचलेली ग्रेस खंगत जाते, पण, ग्रेसच्या नावातच ग्रेस आहे, क्षमाशीलता आहे. तिच्या मनात गावक-यांविषयी किल्मिष नाही. त्या डोंगराळ भागातल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीने, खडतर आयुष्याने या लोकांना तसं बनवलं आहे , त्यात त्या लोकांचा दोष नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि मग एके दिवशी, ते गँगस्टर्स गावात ये‌ऊन ठेपतात आणि आपल्याला कळतं की त्या गँगस्टर्सचा म्होरक्या ग्रेसचा बाप आहे. मग त्यांच्यात काय चूक, काय बरोबर, काय नैतिक, काय अनैतिक यावर शाब्दिक द्वंद्व होतं. ग्रेससमोर दोन पर्याय उरतात. तिने डॉगव्हिलमध्येच राहावं आणि गावक-यांना तिचा फायदा घे‌ऊ द्यावा किंवा तिथून निघून जावं आणि तिच्यासारखी अजून कोणी ग्रेस तिथे ये‌ऊन तिची गत आपल्यासारखी हो‌ऊ नये याची खबरदारी म्हणून डॉगव्हिलला नष्ट करून टाकणं.

आणि ग्रेस डॉगव्हिलला नष्ट करण्याचा निर्णय घेते.

लार्स वॉन ट्रि‌एरचे सर्व चित्रपट पाहिलेल्या माणसाला त्याच्या चित्रपटाचा शेवट काय असणार आहे हे आपसूक सांगता येतं. ’निम्फोमेनियाक’मधली जो अधोगतीच्या सर्व पाय-यांवरुन गडगडत तळाला जा‌ऊन स्वतःची वाट लावून घेते, ’अँटीक्रा‌ईस्ट’मधली ’ती’ वेडाच्या थराला जाते, ’मेलॅन्कोलिया’मध्ये तर पृथ्वीच नष्ट होते, ’डान्सर इन डार्क’मध्ये ’सेल्मा’ला फाशी देतात, ’ब्रेकींग द वेव्ह्ज’मध्ये ’जॅन’ स्वतःहून मृत्यूच्या दारात चालत जाते. त्याच्या चित्रपटांचा शेवट बहुतेक वेळा, नव्हे, नेहमीच- विध्वंसाने, सेल्फ डिस्ट्रक्शननेच होतो. हे माहित नसते तरी या चित्रपटाचा शेवट वेगळा हो‌ऊ शकला नसता, व्हायला नको असं आतून वाटलं. चित्रपटाची शेवटची वीसेक मिनीटं डोक्याला हात लावून, कोरड पडलेल्या जिभेने पाहिल्यावर शेवट निराशा करत नाही. ते गाव नेस्तनाबूत झाल्याबद्दल अजिबात वा‌ईट वाटत नाही, झालं ते बरंच असं वाटतं. पण, ग्रेसच्या जागी आपण असतो तर हेच केलं असतं असं वाटतंय न वाटतंय तोच त्या विचारातलं वैयर्थ कळतं. एखाद्या परिस्थितीतून गेल्याशिवाय आपण काय करू शकतो हे आता कसं काय सांगता ये‌ऊ शकतं आपल्याला? ग्रेसच्या भूमिकेत जा‌ऊन देखील आपण ग्रेससारखा विचार करु शकणार नाहीच, आपण आपल्यासारखाच विचार करणार, आपल्याच कुवतीने निर्णय घेणार. ग्रेसला काय वाटत असेल हे देखील अनुभवू शकत नाही कारण, एम्पथी, तदनुभूती ही सब्जेक्टीव्ह कल्पना आहे. आपण दुस-याच्या वतीने, दुस-याच्या भूमिकेत जा‌ऊन बोलतानाही तिच्याबद्दलचे आपले विचार आपल्या वकुबाने, आपल्याच साच्यातून करत असतो. दुस-याची वेदना अनुभवता येते अलबत! पण त्या व्यक्तीची वेदना अनुभवण्याची पद्धत, त्याने उमटलेले काच वेगळे असतात. त्या व्यक्तीच्या इन्टेन्सिटीने आपण ती वेदना कधीच अनुभवू शकत नाही, आपल्याला झालेल्या कमाल वेदनांच्या वेळी अनुभवाला आलेल्या इन्टेन्सिटीने आपण ती अनुभवू शकतो. ग्रेस आणि तिच्या बापामध्ये झालेल्या चिंतनामध्ये ग्रेसचा बाप ग्रेसला समजावताना म्हणतो, "तू जी कारणं पुढे करून त्यांना माफ करते आहेस, त्या कारणांकरिता तू स्वतःला माफ केलं नसतंस." कशावरुन? ग्रेस गावक-यांच्या भूमिकेत असती, त्यांच्या परिस्थितीतून गेली असती तर कदाचित त्यांच्यासारखीच बनली असती.. किंवा बनली नसतीही. पण ती एखाद्या परिस्थितीत असती तर काय करु शकली असती आणि काय नाही याचे ठोकताळे बसल्या जागी कसे लढवता येतील? पण, ट्रि‌एर काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्यापुरता शोधण्याची जबाबदारी आपल्यावरच सोडून देतो.

ग्रेसच्या जागी एखादा ग्रॅहम असता तर डॉगव्हिल कसा असता हा अजून एक प्रश्न! शोषण शोषणच असेल आणि त्यात स्त्री-पुरुष असा भेद नसेल तर ट्रि‌एरने ग्रॅहम‌ऐवजी ग्रेसवर डॉगव्हिल का बनवला? नाट्य हा चित्रपटाचा आत्मा असेल तर पुरुषाच्या शोषणात आणि त्यातून त्याने घेतलेल्या सूडात नाट्य नसतं का?  डॉगव्हिलच नव्हे तर ट्रिएरची ’डिप्रेशन ट्रिलॉजी’देखील नायिकेभोवती फिरणारी आहे. निम्फोमेनियात ’जो’च्या निम्फोमेनियाबद्दल बोललं गेलंय आणि त्याच्या कडेकडेने गरज पडलीच किंवा कथेच्या ओघाने येतेच आहे म्हणून पुरुषी सेक्स ड्राईव्हवर भाष्य आहे. पुरुष निम्फोमेनियाक नसतात? की त्यांच्यात निम्फोमेनिया असतो हे अध्याह्रतच धरण्यात आलंय? अँटीक्रा‌ईस्टमध्ये ’ती’ आत्यंतिक शोकातून वेडाच्या थराला जाते, ’तो’ जात नाही- असं का? मेलॅन्कोलियामध्ये पृथ्वीचा काळ जवळ आल्याची जाणीव आणि त्यातून येणारी आत्यंतिक विषण्णता केवळ ’जस्टिन’लाच जाणवते. स्त्री ही अत्यंत संवेदनशील असल्यामुळे तिला येणारे अनुभव हे बहु‌आयामी, बहुमितीय असतात आणि त्यामुळे ट्रि‌एरला स्त्री हा एक इंटरेस्टींग विषय वाटते हे तर उघडच दिसतं. आणि हे फक्त ट्रि‌एरच्या सिनेमांमध्ये नाही, तर ब-याचशा सिनेमांमध्ये दिसतं. सूडपटांमध्ये तर हे सर्रास दिसतं. मेमेण्टो, इनग्लोरीयस बास्टर्ड्स, म्युनिक असे सन्माननीय अपवाद सोडले तर बहुतेक सूडपटांमध्ये मुलीवर, प्रेयसीवर बलात्कार करून खून केला, कुटुंबाची खांडोळी केली म्हणून सूडाचा प्रवास सुरु होतो. पुरुषावर अत्याचार झाला, त्याला देशोधडीला लावला म्हणून त्याने सूड घेतला असे चित्रपट कितीसे आहेत? (’गँग्ज ऑफ न्यूयॉर्क’ हा आताच आठवला) असं का असावं? स्त्रियांचे हालहाल, त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांचं/त्यांच्याकरता कोणीतरी, सूडाने पेटून उठणं हे अधिक स्फोटक, अधिक चेतवणारं, अधिक नाट्यमय असतं म्हणून? असं असेल तर ते तसं का वाटतं? पुरुषावर बलात्कार झाला तर त्याचा सूडपट न बनता आतल्या‌आत धुमसणारा ’मिस्टिरीयस स्किन’च का बनतो?

प्रेक्षक कधीही चित्रपटाची कथा ’बनवू’ शकत नाही. चित्रपटात जे ’सांगीतलं’ गेलं आहे, ’बोललं’ गेलं आहे त्यावरुन त्याला कथा उमजते. डॉगव्हिलमधले गँगस्टर्स, चित्रपटाच्या शेवटी दाखवली जाणारी आर्थर रॉथस्टिन, डोरोथिया लान्ज यांची कृष्णधवल चित्रं, महामंदीच्या काळात टिपलेल्या त्या धुळमटलेल्या, विझलेल्या चेह-यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं डेव्हिड बोवीचं ’यंग अमेरीकन्स’ यावरुन डॉगव्हिल घडतो तो मंदीचा - अमेरीकेतला मंदीचा काळ असावा असं दिग्दर्शकाला सूचित करायचं आहे की काय असं वाटतं. ही छायाचित्रं महामंदीच्या काळामध्ये  महामंदीचा भस्मासूर प्रचंड ताकदीने लोकांसमोर आणण्याकरिता आणि त्यांना नव्या धोरणाचा स्वीकार करायला प्रवृत्त करण्यासाठी रूझवेल्ट सरकारद्वारा प्रसिद्ध केली गेली होती. पण,  डॉगव्हिलमधली माणसं कोणत्याही काळात, कोणत्याही देशात दिसतातच. अमेरीका काय, स्वीडन काय आणि भारत काय, विपन्नावस्था कोणत्याही, कुठल्याही माणसाच्या हातून कृष्णकृत्यं घडवते, उद्वेगात हातून नको नको ते घडून जातं; त्यामुळेच, डॉगव्हिल ही जागा कुठेही असू शकते. हा चित्रपट पाहताना काळ आणि जागेचं परिमाण लागू होत नाही. आपण केव्हाच ’यत्र तत्र सर्वत्र’च्या मूडमध्ये गेलेलो असतो.

डॉगव्हिल


लार्स व्हॉन ट्रि‌एरने सुरु केलेल्या ’डॉग्मे मूव्हमेण्ट’च्या ’वा‌ऊज ऑफ चॅस्टिटीं’चं प्रत्यंतर हा चित्रपट पाहताना येतं. हा संपूर्ण चित्रपट एका सा‌ऊंड स्टेजवर घडतो. आपण स्टेजच्या बाहेर जात नाही, त्याच्या पलीकडचं पाहात नाही. पलीकडे पाहण्यासारखं काही नाहीचे तिथे. आपण आटपाट गावाच्या गोष्टी ऐकत वाढलो. पण कधीतरी ती गोष्ट ऐकताना आटपाट नगराच्या बाजूला एक गाव असू शकेल, त्याला नाव असू शकेल, दोन्ही गावांमधली लोकं कशी ये-जा करत असतील, त्यांच्यामध्ये कसे संबंध असतील याचा विचार करतो का? तर, नाही. आपण मनाने केवळ आटपाट गावातच असतो. कथेतील स्थळ-काळाबद्दलचं संकुचितत्त्व कदाचित ट्रि‌एरला असं दाखवायचं असावं. स्टेजवर गाव दर्शवण्याकरिता घरे, प्रॉप्स अजिबात उभारलेले नाहीत, तर सरळ खडूने रेषा मारून गावातल्या घरांचा आभास निर्माण करण्यात आलाय. सर्व कलाकार मंडळी दार उघडण्याचा, बंद करण्याचा फक्त अभिनय करतात. चित्रपटाच्या शेवटी संपूर्ण गावाला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार केल्यानंतर खडूच्या रेषा पुसलेलं कोरं स्टेज दिसतं.
ट्रि‌एर खडूंनी आखलेल्या रेषांमधून त्या जगाचं मिथ्यापण आपल्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करत असतो. खडूंनी आखलेले भिंतींचे, दारांचे आडोसे असले तरी पल्याड काय घडतंय हे आपल्याला दिसत असतं. सगळं काही, सगळ्यांच्या समोर घडत असतं. आणि आपण त्या कथेशी एकजीव होत असताना तितक्याच हट्टाने ते मिथ्या नाही असं म्हणत मनातल्या मनात त्या खडूंच्या रेषांवर काल्पनिक भिंती, छतं चढवायचा खूप, अगदी जीवतोड प्रयत्न करत असतो. एका ठिकाणी घडणारा प्रसंग पाहताना दुस-या ठिकाणी घडणा-या प्रसंगाकडे डोळेझाक करायचा प्रयत्न करतो. भिंती असत्या तर ते आपल्याला कळू शकलं नसतं असं स्वतःला समजावत. पण नंतर, खरंच? आपल्याला कळू शकलं नसतं? असा उत्तर आधीच माहित असलेला प्रश्न स्वतःला विचारतो. ना आपण त्या सेटच्या बाहेर कधी जा‌ऊ शकणार आहोत, ना कॅमेरा- ही जाणीव आपल्याला एक क्लॉस्ट्रोफ़ोबिक भावना करून देते. पण, प्रत्येकजण आपापलं एकटं आयुष्य जगत असला तरी ख-या अर्थाने एकटा कधीच नसतो हे सत्य देखील त्यातून आपसूक उमजतं आणि ट्रि‌एरला काय म्हणायचं आहे हे समजून आपण आपल्याही नकळत तो प्रयत्न सोडून देतो.

डॉगव्हिल हे रॉकी पर्वतात डोंगरभागात वसलेलं गाव आहे हे चित्रपट सुरु होतानाच कळतं. गाव म्हटलं की अठरापगड भाषा बोलणारी माणसं आली, पशु-पक्षी आले, देवळं आली, विहिरी आल्या, झाडं आली. इथल्या माणसांचे जुनाट कपडे, मळलेले चेहरे यांवरून त्यांच्या ओढगस्तीच्या परिस्थितीचा अंदाज यावा. डॉगव्हिलमधील लोकांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे; पण, ती त्यांनी ना‌ईलाज म्हणून असेल-पण स्वीकारली आहे. इथे कृष्णवर्णी, श्वेतवर्णी आहेत, त्यांच्या बोलण्याच्या ढबी वेगवेगळ्या आहेत, तिथे एल्म स्ट्रीट आहे पण त्यावर एकही झाड नाही, विहिरी नाहीत, देवळं नाहीत. या लोकांचा धर्म काय, धारणा काय हे चित्रपटात कुठेही सांगण्यात आलेलं नाही. धर्म या चित्रपटातून पूर्ण वगळण्यात आला आहे.

संपूर्ण चित्रपट एका धीम्या मोनोटोनमध्ये चालतो. कोणीही किंचाळतंय, गुणगुणतंय असं कधी होत नाही. गावातली नित्यकर्म सुरु असतात, सर्व पात्रे एकमेकांशी संथ एकसुरी आवाजात बोलत असतात. नॅरेटर असलेल्या जॉन हर्टचा (आठवा- द वॉण्ड चूझेस द विझर्ड, मि. पॉटर!) आवाज देखील आपल्याला स्क्रीनवर दिसणारी, न‌ऊ प्रकरणांमध्ये घडणारी कथा आवाजातील चढ‌उताराशिवाय, तटस्थपणे सांगतो आहे. या चित्रपटात नॅरेटरचे प्रयोजन काय असावे? शब्दांच्या अभावाने सोडलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी?

इथे खाजगीपण नाही. स्टेजवरच्या पात्रांना नाही, आणि त्या पात्रांना नाही म्हणून आपल्या डोक्यातल्या पात्रांना नाही. दोन पात्रांमधील जवळीक फक्त त्यांच्यावर स्थिरावलेल्या थरथरत्या क्लोझ-अप्समधून दिसते. या चित्रपटात एक डोकं दुखवायला लावणारा चरचरीत प्रसंग आहे. व्हेरा आणि चकच्या घरात त्यांच्या लहान मुलांच्या बेडरुममध्ये चक ग्रेसवर बलात्कार करतो आहे, हे सुरु असताना रस्त्यावर काय चालू आहे, पलीकडच्या घरात काय चालू आहे हे आपल्याला दिसते आहे. कॅमेरा सर्व अदृश्य भिंतींना पार करत आपल्या नित्यकर्मांमध्ये मग्न असलेल्या डॉगव्हिलवर स्थिरावतो आणि आपल्याला कुठेतरी एका कोप-यात चाललेला तोच बलात्कार दिसतो. या आक्रमणाला पण खाजगीपण असू नये म्हणून आपली तगमग सुरु होते, फार भयाण, उघडं पडल्यासारखं वाटतं.

व्हेरा आणि चकच्या घरात काय घडतंय याची कल्पना डॉगव्हिलमधल्या माणसांना असू शकेल का? असू शकेल. पण असं असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नामानिराळं राहायची त्यांची वृत्ती, निरागसतेची झूल पांघरुन सुरु असलेला कातडीबचा‌ऊपणा; या सर्वांनी ती माणसं अधिकाधिक धोकादायक वाटत जातात. ग्रेसने तिथून लवकर सुटलं तर बरं, असं वाटायला लावतात. या माणसांना हिंसेतून प्रचंड सुख मिळतं, मग ती शारिरीक असो, वा मानसिक. त्यांच्या प्रत्येक कृतीला स्पष्टीकरणाचं अस्तर आहे, ठोस कारणं आहेत. ती दुटप्पी तर आहेतच, शिवाय, त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे एकाच जागी, एकाच कळपात राहून येणा-या साचलेपणाचा वृथा अभिमान बाळगण्याची वृत्ती देखील आहे. त्यांना प्रश्नही फार क्वचित पडत असावेत, कारण ती नेहमी वैश्विक सत्य सांगीतल्याच्या आविर्भावात बोलत असतात. संपूर्ण चित्रपटात कोणाच्याही बोलण्यात प्रश्नचिन्ह नाहीच. टॉमचे चांगले हेतू आपल्याला कळतात, पण कथा पुढे जाताना त्याचं प्रेम असलेल्या ग्रेसला सोडवण्याचं वारंवार वचन दे‌ऊनही वचन न पाळता आलेल्या वरकरणी प्रचंड उदारमतवादी, विचारी असलेल्या टॉममधील एक भेकड, कोता आणि सर्वसामान्य पुरुष उघडा पडत जातो. या चित्रपटातला प्रकाशाचा खेळही मोठा अजब आहे. एकाच व्यक्तीवर वेगवेगळ्या कोनातून प्रकाश पडल्यावर व्यक्ती वेगवेगळी दिसते हे आपल्याला माहितच आहे. पहिल्या पहिल्यांदा एका कोनातून प्रकाश पडल्यानंतर साध्या, नीरस दिसणा-या डॉगव्हिलवर घटनांनी वेग घेतल्यावर आणि सगळ्यांनी आपल्या नख्या बाहेर काढल्यावर एका वेगळ्याच कोनातून प्रकाश पडतो आणि त्यात ते गाव खरोखरीचं दुष्ट वाटतं. असे बदलणारे प्रकाश आपल्या कल्पना, दृष्टीकोनातील बदल सुचवतात.

संपूर्ण चित्रपटभर मा‌ईम आणि रेखाकृतींतून आपल्यासमोर साकार होणारं गाव, ऑर्चर्ड पाहिल्यावर मोझेसचा (कुत्र्याचा!) खडूचा आकार खराखुरा आकार घेतो तेव्हा नेहमीचा हाडामांसाचा कुत्रा पाहायची सवय असतानाही दचकायला होतं. पूर्ण चित्रपटात बोलणं, संषर्घ, वाद, शारीरिक, मानसिक हिंसाही अंडरटोन्समध्ये चालू असताना अचानक शेवटी बोवीचं उडतं ’यंग अमेरीकन्स’ लागतं तेव्हा प्रचंड अश्लील वाटतं. या चित्रपटाला पार्श्वसंगीतही नाही, असलेच तर, दारं उघडण्या-बंद होण्यातून, काहीतरी करण्यातून होणारे आवाज आहेत. त्यामुळे संगीत आपली कथेबद्दलची समजूत मॅनिप्युलेट करू शकत नाही.

डॉगव्हिल अॅक्शन आणि रि‌अॅक्शनचा नियम सांगतो, त्याहून जास्त कसलाही बोध होत नाही. फक्त रि‌अॅक्शन न्याय्य की अन्याय्य, याचा निवाडा करणं आपल्या हाती उरतं. त्यामुळे रूढार्थाने डॉगव्हिलला आटपाट नगरांतील कथांप्रमाणे नीतीकथा म्हणता येणार नाही. पण, अनुकूल परिस्थिती असेल तर गुन्हा कुठेही घडू शकतो हे माहित झाल्याने यत्र तत्र सर्वत्र घडणा-या गोष्टीचा वस्तुपाठ देणा-या कथेला नीतीकथा का म्हणू नये असाही प्रश्न पडतो. ट्रि‌एर प्रतिमांमधून कथा सांगता सांगता अशा रितीने साधर्म्यापर्यंत येतो.

--

असोसि‌एशन्स कशी बनतात?

प्रेमातून? गरजेतून? सोयीतून?

थोडक्यात ज्या व्यक्तीसोबत असण्याने आपला स्वार्थ साधला जा‌ऊ शकतो अशा व्यक्तीसोबत आपल्या असोसि‌एशन्स बनतात. अर्थात आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीचाही स्वार्थ साधला जायला हवा. ग्रेसला आधार हवा आहे आणि गावाला बाहेरच्या परक्या माणसाचं स्वागत करण्यातून उदारमतवादीपणा सिद्ध करायचा आहे. परस्परांच्या गरजांतून असोसि‌एशन तयार झाली. आपल्या सभोवतालच्या बहुतेक सर्व व्यवहारांना असोसि‌एशन्सचा पाया असतो. पण, या असोसि‌एशन्स हेल्दी आहेत किंवा नाही हे कोणी ठरवावं? ते कसं ठरतं? ग्रेस आणि गावकरी यांच्यातील देवघेव ही परस्पर समजूतींतून घडत होती. पण देव-घेवीतला समतोल बिघडला, जितकं दिलं-घेतलं जायला हवं, त्याहून कमी-जास्त दिलं-घेतलं गेलं , तर ती असोसि‌एशन हेल्दी असेल का? असोसि‌एशनमधील बॅलन्स ऑफ पॉवर कसा ठरतो? बॅलन्स ऑफ पॉवर नेहमी ज्याची निकड कमी त्याच्याकडे असतो का? तर मग, असोसि‌एशन्समध्ये नेहमी छुपं शोषक आणि शोषिताचंच नातं असतं? असोसि‌एशनमध्ये एकमेकांकडून एकमेकांचा जेवढा आणि जितका स्वार्थ साधला जायला हवा, जितकं दिलं-घेतलं जायला हवं, त्याहून कमी-जास्त दिलं-घेतलं गेलं तर त्याची परिणती कशात होते? ती विध्वंसक आणि विनाशकच असते का?

गरीबीने पीडल्या नाडल्या गेलेल्या मुलाने पाव चोरी करणे, प्रचंड भ्रष्टाचारामुळे नोकरी न मिळू शकलेल्या मुलाने दरोडे घालणे यांत ज्याने गुन्हे केले त्यांच्याकडे पाहायचं, की त्यांना ज्या परिस्थितीने गुन्हे करायला भाग पाडलं त्या परिस्थितीकडे पाहायचं असा प्रश्न आपल्याला हटकून पडतो. तसंच, प्रतिकूल परिस्थितीतून जगताना येणा-या वैफल्यातून एखाद्यावर अन्याय झाला, अत्याचार झाले, तर अन्याय करणा-याला शिक्षा झालीच पाहिजे हा हट्ट देखील धरला जातो. कोणता गुन्हा माफ करण्यालायक असतो आणि कोणता गुन्हा शिक्षेस पात्र असतो?

असे अनेक प्रश्न मला लार्स वॉन ट्रि‌एरचा डॉगव्हिल बघताना पडले. या प्रश्नांची माझ्यापुरता उत्तरं मिळालीशी वाटली, पण थोडा विचार केल्यावर त्यावरही प्रश्न पडतील हे देखील तितकंच खरं. कदाचित मी सेलिगमन म्हणतो तशी नखं कापायला उजव्या हातापासून सुरुवात करणा-या माणसांपैकी एक असेन. असो!
 
Designed by Lena