उत्तररात्र- ३

(रात्रीचे 11. दोघेही सर्व आटपून फ्रेश हो‌ऊन पुस्तक घे‌ऊन बसलेले, पण दोघांच्या पुस्तक वाचण्यात फरक. ती पुस्तकात गढून गेलेली आणि तो केवळ डोळ्यांसमोर पुस्तक आहे म्हणून वाचतोय असं म्हणायचं. ती पुस्तकावरची नजर न हटवता विचारते,)

: काय चावतंय डोक्यात?

: ...

: उं?

: काही नाही गं, वाच तू.

: तू ’गं’ जोडलास इथेच तुझी कम्युनिकेशनची इच्छा दिसते.

: अं?

: नुस्तंच "काही नाही!" म्हणून प्रकरण रफादफा करुन टाकलं अस्तंस तर मी कदाचित सोडूनही दिलं असतं.

: पुरेय! तू मला माझ्याहून चांगली ओळखतेस असं म्हणायचंय का तुला?

: हे काय मधूनच? आणि आता हा मुद्दा उपस्थित झाला आहेच, तर हो, मी तुला तुझ्याहून चांगली ओळखते असं मला वाटतं.

: डोण्ट स्ट्रट!

: तूच उकरुन काढलंस, मी चांगली पुस्तक वाचत होते.

: बरं, जा मग, पुस्तक वाच.

(ती खांदे उचकून पुन्हा पुस्तक वाचण्यात गढते)
(तो वैतागून तिचं पुस्तक खेचतो)

: तू मला काहीतरी विचारलंस ना?

: हो मग?

: मी उत्तर कुठे दिलं?

: मग मी तुला उत्तर द्यायचा मूड कधी लागेल याची वाट पाहात बसू का?

:..

: काय रे?

: नाही, तू म्हणतेयेस ते खरंय. तू कशाला माझ्या उत्तराची वाट पाहात ताटकळशील?

(त्याच्या या पवित्र्याने ती बावचळते, पण नंतर त्याची प्रचंड दया ये‌ऊन पुस्तक बाजूला ठेवते)

: बरं, सांग आता. काय खुपतंय तुला?

:(विचारांमध्ये प्रचंड मग्न आणि मग मोठा सुस्कारा टाकून) आंघोळ केल्यानंतर ओला टॉवेल तसाच बिछान्यावर टाकणे या इश्यूवरुन ब्रेक-अप हो‌ऊ शकतो का?

: अं?(तिला अजूनही काहीही क्लू लागलेला नाही)

: धवल शंभरदा सांगूनही ओला टॉवेल बिछान्यावर तसाच टाकून जातो म्हणून रुपाली आणि धवलचा ब्रेक-अप झाला.

: काय सांगतोस?

: हो, मला आजच कळलं.

: आयॅम शु‌अर, रुपालीकडे याहून काही व्हॅलिड कारणं असतील, टॉवेल फक्त निमित्त झाला असेल. कारण, एरव्ही ती खूप समंजस मुलगी आहे.

: तू काही बोलत नाहीस, पण, मी पण असाच टॉवेल टाकून जातो तेव्हा तुलाही माझा वीट येत असेल नाही?

:(मख्ख चेह-याने) नाही.

: मी फुर्र फुर्र करत चहा पितो तेव्हा? मला माहित आहे तुला ते बिल्कुल आवडत नाही.

:(छोटंसं हसून)नाही.

: मी बाहेरुन आल्यावर शूज तसेच पायातून काढून भिरकवतो तेव्हाही नाही?

:(त्याल्या स्वत:च्याच खोड्यांची इत्यंभूत माहिती आहे हे कळून आलेली हसण्याची उबळ रोखत) नाही. खरंच नाही.

: मला खरंच कधीकधी प्रश्न पडतो की तुला माझ्या बोलण्यावरुन, माझ्या टोनवरुन मला काय वाटतंय हे समजतं, मला तसं तुझ्याबद्दल काहीच माहित नाही.

: छे रे! काहीच माहित नाही असं कसं? एक दोन गोष्टी तरी माहित असतीलच.

: नाही. टू थिंक ऑफ इट, तू काहीतरी वेड्यासारखं करुन बसलीस, आणि तुला ओशाळवाणं वाटलं तर उगाचच टाळ्या वाजवत हसत सुटतेस, हे सोडून मला काहीही माहित नाही.

:(हसून) खूप झालं की!

: तुला हा जोक वाटतोय का?

: नाही, तसंच काही नाही. पण, तुला तुझ्या डोक्यात आधीच असलेल्या प्रश्नांमध्ये आणखी एका प्रश्नाची भर घालायची आहे का?

: नो.

: मग? पहिले हातात असलेले प्रश्न सोडव ना.

: खरंय. ए! आपण एकमेकांना एकमेकांच्या खुपणा-या तीन गोष्टी सांगूयात का? या महिन्यात तीन, आणखी असतील तर त्या पुढच्या महिन्यात कव्हर करु.

: ..

: ए?

: मला नाही वाटत की हे काही तुझ्या-माझ्या भल्याचं ठरेल.

: का?

: कारण, आपण एकमेकांच्या गोष्टींमध्ये लुडबूड करायची नाही हे आपलं आधीपासूनच ठरलंय.

: हो ते आहेच, पण आपल्याला एकमेकांच्या काही सवयींचा असह्य त्रास होत असेल तर त्या कळलेल्या ब-या, नाही का?

: हो, त्रास तर होतो. तुझ्या काही सवयींचा मला खूप त्रास व्हायचा, अगदी तुझं डोकं धरुन तुझ्या झिंज्या उपटाव्यात अशी अनिवार इच्छा होईल इतपत! पण मी नेहमीप्रमाणे त्यावरही उपाय शोधून काढला.

: तो काय?

: तू ओलाकंच टॉवेल बिछान्यावर तसाच टाकून जातोस, त्यामुळे बिछाना दमट होतो. त्या दमट बाजूला मी तुलाच झोपायला लावते. फोडणीचा भात केला की तू लसणाची सालं काढून कचरापेटीत टाकायचेही कष्ट घेत नाहीस. त्यामुळे बेसिन चोक अप झालं की मी तुलाच साफ करायला लावते. शूजच्या रॅककडे मी सवयीने दुर्लक्ष करायला शिकलेय. तुला कळतंय का, की मी सगळं तुझं तुलाच कळायची वाट पाहातेय!

: हैला! बरीच आहेस तू... मला..

: माझं बोलणं संपलेलं नाही अजून..

: सॉरी! बोल..

: खुपणा-या तीनच गोष्टी सांगायच्या आहेत ना..मग ऐक..तू वापरलेल्या अंडरवे‌अर्स सोफ्याच्या कडेला खुपसून ठेवण्यामागचं गौडबंगाल काय आहे हा गहन प्रश्न मला कधीपासून पडलाय, पण मी तो वारंवार जिभेवरुन मागे ढकलत आलेय. त्या अंडरवे‌अर्स वाळून इतक्या कडक झाल्यायेत आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये वळल्यात की त्या एकावर एक ठेवून मी त्यांच जहांगिरमध्ये अल्ट्रा-मॉडर्न इन्स्टॉलेशन लावू शकेन.

(तो घा‌ईघा‌ईने उठून हॉलमध्ये पळतो. काही सेकंदांनी तिची नजर चुकवत परत येतो)

: ..

: पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरायच्या झाल्या की तू जांभळ्या बाटल्यांना हिरवी झाकणं लावून ठेवतोस. तू रंगांधळा नाहीस हे मला पक्कं माहित आहे, मग हे असं करण्यामागचं कारण काय, निव्वळ आळस की आणखी काही, हे मला अजून कळलेलं नाही. तू बाटल्या भरल्यानंतर मला ती झाकणं बदलायचं काम करत बसायला लागतं. हो. हो..लेट मी कम्प्लीट! जांभळ्या बाटल्यांना हिरवी झाकणं लावली तर इतकं काय त्याचं? हा तुझा प्रश्न असेल आणि हा मुद्दा वादाचा आहे, पण, जांभळ्या बाटल्यांना जांभळीच बुचं लावली की जरा बरं असतं. तितकं झालं तर माझ्याकरता ती एकाची दोन कामं हो‌ऊन बसणार नाहीत.

: ..

: आंघोळ करताना तू साबण फेसाने इतका माखवून ठेवतोस आणि तो पाण्याने स्वच्छ करुन देखील ठेवत नाहीस. त्या साबणाकडे पाहाणं देखील किळसवाणं असतं. त्यामुळेच मी दुसरा साबण वापरायला सुरुवात केली. तेव्हढी एक सवय बदललीस तर खूप बरं हो‌ईल.

: (विचारमग्न)...

: बरं..आता तुझी पाळी!

: ओके. मला तुझी एकच गोष्ट खुपते ती म्हणजे तू मला एखादं काम करायला सांगीतलंस की, तू माझ्यावर कायम नजर ठेवून असतेस, कायम माझ्या मागेमागे फिरत असतेस. त्यादिवशी माझा टॉवेल बिछान्यावर पडला होता, तो उचलून मी खुर्चीवर वाळत टाकला, तर तू लगेच ये‌ऊन तो उचललास आणि बाहेर गॅलरीत घे‌ऊन गेलीस.

: मंद मुला, ओला टॉवेल लाकडाच्या खुर्चीवर वाळत टाकलास तर लाकूड फुगेल आणि खराब नाही का हो‌ईल?

: अच्छा! म्हणजे तू करतेस त्या प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं आणि मी करतो ती प्रत्येक गोष्ट विनाकारण असते असं म्हणायचंय का तुला?

: कारण असतं का? मला माहितंच नव्हतं, जरा कळू तरी देत, आयॅम ऑल ईयर्स!

: अं..अं...(नुसताच धुसफुसतो आणि गप्प बसतो)..

: दॅट्स व्हॉट आय थॉट! (कूलली पुन्हा एकदा पुस्तक वाचायला सुरुवात करते)

: (पुन्हा एकदा पुस्तक खेचून) बरं, आता एकच सांग. मला इतक्या सा-या वा‌ईट सवयी आहेत, मी वा‌ईट आहे, मग तू का नाही मला रुपालीसारखी सोडून जात?

: पहिली गोष्ट, तू वा‌ईट नाहीस, तुझ्या सवयी वा‌ईट आहेत, उगाच पराचा कावळा करु नकोस.

: प्रश्नाला बगल दे‌ऊ नकोस, आयॅम सिरीयस! तुला मला सोडून जायची इच्छा आहे का?

: मी तुला सोडून जावं अशी तुझी इच्छा आहे का? तू फार पिक्चर पाहातोस बुवा आजकाल!

: उत्तर दे!

: अरे! तुला सोडून जायची इच्छा असती तर मी कधीच नसते का गेले? तुझ्या परवानगीची वाट पाहात बसले असते का?

: मग?

: अशावेळी मी संत्र्याची बर्फी डोळ्यांसमोर आणते.

: अॅ?

: बघ तुला समजतंय का! मला संत्र्याची बर्फी खूप आवडते हे तर तुला माहितच आहे. संत्र्याची बर्फी केवळ नागपूरात मिळते आणि ती ही हल्दीरामचीच चांगली मिळते. मी नागपूरला गेल्यावर हल्दीराममध्ये जाते तेव्हा माझ्या चिकीत्सक नजरेसमोर अनेक गोष्टी येतात. त्यांच्या केशर पेढ्याचा आकार पूर्ण गोलाकार नसतो, मल‌ई बर्फी अगदीच अनाकर्षक असते, मिठायांवरची पिस्त्यांची पखरण अगदी कशीतरीच असते, रसमला‌ईवर कसला तरी तवंग असतो ज्याने मला ढवळून येतं, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते कारण, मी हल्दीराममध्ये संत्रा बर्फी घ्यायला आलेले असते, आणि मला केवळ आणि केवळ संत्रा बर्फीमध्येच रस असतो. काही कळतंय का डंबो?

:(आढ्याकडे पाहात विचारात पडलेला)

: तू बस विचार करत..मी झोपते.

:(अचानक काहीतरी कळल्यासारखा)होल्ड ऑन अ मिनीट! या सिनारीयोमध्ये मी संत्रा बर्फी आहे का?

: (ती चादर डोक्यावरुन ओढून घेते)

: ए सांग ना, सांग ना, सांग ना, मी संत्रा बर्फी आहे?

: (चादरीखालून रागाने) शट अप!

:(अतिशय आनंदात बिछान्यावर उभा राहून थयाथया नाचत) येय्य! मी संत्रा बर्फी आहे.

: (ती चादरीखालून धुसफुसत) आय न्यू इट! मी तुला सांगायलाच नको होतं.

:..मी संत्रा बर्फी आहे!

(हा घोष नंतर कितीतरी वेळ चालू असतो. नंतर डोक्यावरचं टेन्शन उतरुन स्वस्थ पडलेला तो आणि चादर डोक्यावर ओढून गालातल्या गालात हसत झोपी गेलेली ती.. )
(उत्तररात्र मग ख-या अर्थाने ’स्वीट' ड्रीम्सवाली रात्र ठरते)

--

उत्तररात्र- १ उत्तररात्र- २


 
Designed by Lena