मिकन्

ऑक्टोबरची नुकतीच सुरुवात झाली होती. सकाळचे १० वाजले होते आणि बाहेर ऊन मी म्हणायला लागलं होतं. नुसता तप्त उकाडा होता सगळीकडे! अवघं जग ग्लानीत असल्यासारखं आपली नेहमीच कामं ओढायला लागलं होतं. सगळे जण हाssश्श हुssश्श करत ऊन्हावर चरफडत होते. मग या माणसांची दशा न पाहवून कुठूनतरी एक वा-याची झुळूक सुरु होते. झाडा-फांद्यावरुन, रस्त्यावरच्या सुकलेल्या, कुरकुरीत क्रॅकजॅकसारख्या पानांना स्वतःभोवती गिरक्या मारायला लावत, माणसांचे कपडे फडफडवत मिकनच्या घरापर्यंत पोहोचते. अरे! हे काय? मिकनचं घर आज बंद? मिकनच्या घरावरुन वाळ्याचे पडदे ओढून घेतलेले असतात. वा-याची झुळूक पडद्याच्या भोकांमधून आत पाहाते तर मिकन् व-हांड्यातही नसतो. एरव्ही घरात पाय न ठरणारा मिकन् आज गेला तरी कुठे असं स्वतःशीच नवल करत ती झुळूक आत शिरते आणि मिकनच्या घराचं दार धाडधाड वाजवते.

आत चाकाच्या घोड्याला पायाने रेटत गरागरा फे-या घालणारा मिकन् दचकून थांबतो आणि दाराकडे पाहातो.  त्याला सकाळपासून घरात बसून नुस्ता कंटाळा आलेला असतो. आ‌ईने बाहेर जायचं नाही सांगीतल्याबरोबर त्यानेही कपडे घालायला धडधडीत नकार दिलेला असतो. पाच मिनीटं हातात चड्डी घे‌उन मिकनच्या मागे इकडे धाव-तिकडे धाव केल्यानंतर आ‌ईही कंटाळते आणि त्याला तसाच सोडून आपल्या कामाला लागते. मग का कोणास ठा‌ऊक, मिकनला आ‌ईची प्रचंड दया येते. तो हळूहळू चालत सोफ्यापाशी जातो आणि सोफ्यावरची चड्डी हातात घे‌ऊन तिला कुतूहलाने न्याहाळतो. ही नेमकी काय वस्तू आहे? असा विचार करत मिकन् तिला वरुन-खालून, उलटं-सुलटं करुन पाहातो. ती बंडी असावीशी वाटून तो चड्डी डोक्यावरुन घालायचा प्रयत्न करतो, पण ती त्याच्या डोक्यावरच अडकते! आता बंडीलाही दोन हात असतात आणि चड्डीलाही दोन भोकं असतात यात मिकनचा दोष काय म्हणा! एक दोन मिनीटं आपलं डोकं या भोकातून, नंतर त्या भोकातून खुपसायचा प्रयत्न केल्यानंतर मिकन् प्रचंड वैतागतो आणि चड्डी रागारागाने फेकून देतो. त्याचे गोबरे गाल रागाने अजूनच पुट्कन फुगतात. मग डोक्यात काहीसं ये‌ऊन तो पुन्हा दुडदुडत जा‌ऊन जमिनीवरची चड्डी उचलून घेतो आणि त्यात पाय घालायला सुरुवात करतो. मिकन् फक्त तीन वर्षांचा असला तरी भयंकर हुषार आहे यात काही वादच नाही. चड्डीत पाय घालून झाल्यानंतर मिकन् स्वतःवरच भयंकर खूष हो‌ऊन खोलीभर फिरायला लागतो. पण होतं असं की, त्याने एकाच पायातून दोन पाय घातलेले असतात. त्यामुळे, त्याला दोन पावलंही धड चालता येत नाहीत आणि तो एक-दोन क्षण एक मनोरंजक नृत्य करुन, हेलकावे खात बदाक्कन खाली पडतो. अंsss! तो तक्रारीचा बारीक स्वर काढतो आणि त्याचा आवाज ऐकून आलेली आ‌ई संधी साधून त्याला चड्डी आणि बंडी घालून घेते.

सकाळचा गुणफलक आ‌ई 1- मिकन् 0

"शहाण्यासारखा खेळत बस पाहू इथे!" असं सांगून आ‌ई पुन्हा एकदा गायब होते. मिकन् आ‌ईच्या पाठोपाठ स्वयंपाकघरापर्यंत जातो. पण, आ‌ईने स्वयंपाकघराकडे जाणारं गजाचं दार लावून घेतलं आहे. मिकन् तिथल्या भिंतीला ओळंबून उभा राहातो. उभं राहून पाय दुखल्यावर थोडावेळ दारापाशीच बसतो आणि आ‌ई येते का हे पाहातो. खेळायला सोबत आ‌ई नाही तरी काय मजा? मिकन् इतका वेळ दाराचे गज धरुन दिनवाणेपणे उभा आहे पण, आ‌ईचं मिकनकडे मुळी लक्षच नाही. गजांमध्ये तोंड खुपसून बसलेला मिकन् हिरमुसतो आणि पुन्हा एकदा दिवाणखान्यात येतो. दिवाणखान्याच्या एक कोप-यात खिडकीपाशी आ‌ईचं टेबल आहे आणि आ‌ईच्या टेबलावर खूप खूप काय काय भयंकर मजेशीर गोष्टी असतात,  पण, मिकनचा हात टेबलाच्या वरपर्यंत पोहोचत नाही. तो टेबलाच्या कडेला धरुन टाचा उंचावतो आणि डोळे मोठ्ठे मोठ्ठे करत टेबलावर काये ते पाहातो. रंगबिरंगी पेन्सिली, शार्पनर, तरत-हेची पेनं, पांढरे-रंगीत कागद, शा‌ईची दौत, आ‌ई-बाबा-एका छोट्या बाळाचा एक फोटो..अशा मिकनला आवडणा-या गोष्टी तिथे गळ्यात गळे घालून नांदत असतात. फोटोतलं ते छोटं बाळ कोण आहे आणि ते का रडतंय याबद्दल मिकनला कोण कुतूहल! आ‌ई मला ओरडते तशी त्यालाही ओरडली असणार, दुसरं काय! पण, फोटोतलं ते बाळ म्हणजे तो स्वतः तर खास नसणार, कारण फोटोतलं बाळ टकलू होतं आणि मिकनच्या डोक्यावर कुरळ्या केसांचं घनदाट जावळ होतं. मिकनची आ‌ई सांगते की, फोटोतलं बाळ म्हणजे तूच आहेस, पण, तो मी नव्हेच असा मिकनचा हेका आहे. ह्यॅट् काहीतरीच काय! मिकन्  निषेधाने जोरजोरात मुंडी हलवतो.

टाचा उंचावून पाय दुखल्यानंतर मिकन् आ‌ईच्या टेबलाचा नाद सोडतो. आईच्या टेबलाशी जास्त खेळ केला की धपाटे खायला लागतात हे त्याला माहित आहे. मग तो आजूबाजूला पाहातो. स्वयंपाकघरापाशी जाणा-या बोळापाशीच बाबाची आरामखुर्ची आहे आणि तिच्या हातावर एक पुस्तक चष्मा घालून ठेवलं आहे. मिकन् जरा जपूनच खुर्चीपाशी जातो. बाबा दिसला रे दिसला की त्याला धूम ठोकायची असते. मिकनची आ‌ई मिकनला मिकन् म्हणते, ते मिकनला फार फार आवडतं, पण त्याचा बाबा त्याला हल्लीहल्लीच त्याला मिक्या म्हणत त्याचा जोरात गालगुच्चा घ्यायला लागलाय, ते मिकनला मुळीसुद्धा आवडत नाही. पण, बाबा आज सकाळपासून कुठे दिसलेला नाही. मिकन् बोळात वाकून आ‌ई काय करतेय हे पाहातो. आ‌ई कामात गढलेली पाहून त्याचं छोटं स्टूल घेतो, आणि स्टूलावर चढून बाबाच्या खुर्चीवर चढून बसतो. कापडाच्या खुर्चीत मांडी घालून बसलेल्या मिकनच्या वजनाने एव्हाना त्या खुर्चीचं बूड दोन फूट खाली गेलेलं आहे. हे काय भलतंच! स्वतःच्याच वजनाने तोल जाणारा मिकन् स्वतःला सावरत पुन्हा बसतं करतो आणि बाजूच्या पुस्तकातून बाबाचा चष्मा काढून घेतो. बाबाचा चष्मा लावणं ही मिकनची सर्वात मोठी महत्वाकांक्षा असते. चष्मा कसा लावायचा हे मिकनला सांगायची गरज भासत नाही, तो रोज पाहातोच की बाबाला चष्मा लावताना! चष्म्याच्या काड्या एकदोनदा डोळ्याच्या आजूबाजूला टोचल्यानंतर, एकदा नाकात जा‌ऊन शिंकांची एक फैर झडल्यानंतर एकदाचा तो चष्मा मिकनच्या डोळ्यांवर विराजमान होतो. आपणही बाबासारखे छान दिसत असू का? असा विचार ये‌ऊन तो खांदे मजेशीरपणे उडवतो. मग मिकन् बाबासारखा पायावर पाय टाकून बसायचा प्रयत्न करतो, पण त्याचे जाडजूड गोबरे पाय काय एकमेकांवर यायला तयार नसतात. शिवाय, त्याच्या वजनाने खुर्चीचं कापड खाली गेल्याने मिकन् जवळजवळ खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत असतो. छे! यात काही मजा नाही. मग मिकन् आपला तोल सावरत खुर्चीत उभा राहातो आणि खुर्चीच्या पाठीकडे तोंड करतो. सोफ्यावरुन उतरताना सोफ्याच्या पाठीकडे तोंड करायचं, मग घसरत पहिले जमिनीला पाय टेकवायचे आणि मग खाली उतरायचं, नाहीतर तोंडावर आपटायला होतं ही आ‌ईची शिकवण इथेही कामी येते आणि खुर्चीच्या सैलसर कापडामुळे त्याचा तोल जात असूनही खुर्चीचे दोन्ही हात घट्ट धरत मिकन् एकदाचा खाली उतरतो. मग तो आरशासमोर जा‌ऊन पावडरचा एक पफ चेह-यावरुन ओढतो आणि मोठ्या अपेक्षेने आरशात पाहातो. पण, आरशातून एक चष्मा लावलेलं भूत त्याच्याकडे पाहात असलेलं पाहून आपला आपणच घाबरतो आणि चष्मा ओढून खुर्चीत टाकून देतो.

मग थोडा व्यायाम करावासा वाटून की काय, तो एकदोनदा हात-पाय उडवतो, कंबर हलवतो आणि दीड पायावर नाचतच त्याच्या चाकाच्या घोड्यापर्यंत जातो. त्या घोड्याचं नाव चांदोबा! आपण घोड्याचं नाव काय ठेवूयात असं बाबाने त्याला विचारलं तेव्हा मिकनने डोक्यात आलं ते पहिलं नाव सांगीतलेलं- चांदोबा! घोड्याचं नाव चांदोबा का ठेवायचं? याचं उत्तर मिकन्ला देता आलेलं नसतं. का? साठी कारण असलं तर बरं असतं हे मिकनला अजून कळायचं आहे.

मिकन् चांदोबावर बसून त्याला पायाने रेटा दे‌ऊन फिरवायला सुरुवात करतो. आ‌ईच्या टेबलाभोवती गरागरा फे-या मारणारा मिकन् प्रत्येक फेरीसरशी 1, 2 असे आकडे मोजत असतो, पण सध्या त्याला 1,2, 5 आणि 10 इतकेच आकडे येतात, त्यामुळे त्याचा ना‌ईलाज असतो. चांदोबावर बसून आ‌ईच्या टेबलाला 1,2, 5, 10 असं घोकत प्रदक्षिणा घालत असताना मिकनच्या घराचं दार वा-याने खडखड वाजतं.

मिकन् दचकतो आणि चांदोबावरुन उडी मारुन आ‌ईच्या टेबलाखालच्या पोकळीत जा‌उन लपतो. दाराच्या बाहेर वा-याची झुळूक मिकनची वाट पाहात थांबलेली असते, पण, अजून मिकन् कसा येत नाही म्हणून ती घराभोवती एक फेरी घालते आणि खिडकीतून आत शिरत टेबलाखाली खुडूक करुन बसलेल्या मिकनच्या मानेला गुदगुल्या करते. वा-याच्या झुळूकीचं हे धार्ष्ट्य पाहून मिकन् म्हणतो, अगं वा गं वा!

मग मिकनला बाहेर जायचे वेध लागतात. नाही म्हटलं तरी एव्हाना मिकनला आ‌ईचा राग आलाय आणि आ‌ईने केलेल्या उपेक्षेने त्याचं नाक लालमलाल झालंय. मग मिकन् टेबलाखालून हळूच बाहेर येतो आणि स्टूल सरकवत दारापाशी आणतो. आ‌ईचं काम झालंय का हे शेवटचं पाहावं म्हणून मिकन् पुन्हा एकदा स्वयंपाकघराच्या दाराशी ये‌ऊन पाहातो. पण आ‌ई गुणगुणत आपल्याच नादात आहेशी पाहून मान हलवतो. मिकन् हळूहळू चालत, पुन्हा पुन्हा पाठी पाहात दारापाशी येतो, स्टुलावर चढून दाराची कडी काढतो आणि उंब-याच्या बाहेर पा‌ऊल ठेवतो.

सध्याचा गुणफलक आ‌ई १- मिकन् १

बाहेर कडक ऊन आहे म्हणून आ‌ईने व-हांड्यात पाणी ओतून ठेवलंय. मिकन् थोडा वेळ उंब-यावरच झुलत राहातो. मिकनला बाहेर आलेलं पाहून सूर्यकिरण भस्सकन पडद्याच्या भोकांमधून आत येतात आणि मिकनच्या चेह-यावर जाळी करतात. मिकन् डोळ्यांवर हात ठेवून वर सूर्याकडे रागाने पाहातो आणि मिकनच्या नाकावरचा राग पाहून सूर्य डोळे मिचकावत हसतो! व-हांड्यात सगळीकडे पाणीच पाणी असतं. मिकन् डोलकाठीसारखा डोलत पाण्यात थप्प-थप्प करत चालायला सुरुवात करतो. त्याच्या प्रत्येक पावलानिशी पाण्याचा मजेशीर आवाज होत असतो आणि आतापर्यंत स्थिर असलेल्या पाण्यातलं चित्रही बदलत असतं, बाबा त्याला डोळ्याला लावून पाहायला देतो त्या यंत्रातल्या चित्रासारखं!. हे मस्तंय की! मिकनला हा खेळ प्रचंड आवडतो. त्या पाण्याचा थंडावा त्याच्या पायांमधून शिरुन त्याच्या कानापर्यंत पोहोचतो आणि मिकनच्या अंगातून सरसरत शिरशिरी जाते. मिकन् अंग झडझडवून शहारतो आणि तेवढ्यात एक चिमणी कुठूनतरी उडत ये‌ऊन मिकनच्या पुढ्यात ये‌ऊन उतरते.

मिकन् खाली वाकून, डोळे बारीक करुन आपल्या घरात आलेल्या त्या आगंतुक पाहुण्याकडे पाहात असतो आणि हे गालांमध्ये डोळे बुडालेलं गोबरं ध्यान कोण आहे हे चिमणी लक्षपूर्वक पाहात असते. मिकन् तिथे आहे याची अजिबात पर्वा न करता त्या चिमणीबा‌ई इथे तिथे टणाटण उड्या मारतात. मिकन् अगदी लक्ष दे‌ऊन चिमणीचे हे उद्योग पाहात असतो. मग मिकनही वेड्या वाकड्या उड्या मारतो आणि आपणही चिमणीसारखे फुदकलो करुन स्वतःवरच खूष हो‌ऊन मोठमोठ्याने हसतो. मग मनात काहीतरी ये‌ऊन तो दोन तीन पावलं दुडकत धावत येतो आणि बदाक् कन उडी मारुन जोरात हात हलवतो, "ह्यॅट्, जा इथून!" पण चिमणी ढिम्म असते. मग तो हात हलवून "एsss" असं ओरडतो देखील! पण, चिमणीवर त्याचा काही‌एक परिणाम होत नाही, उलट तीच मान वाकडी करुन टुणटुणत पुढे येते. मिकनने इतकी धिटुकली चिमणी कधी पाहिलेली नसते, त्यामुळे मिकन् घाबरुन एक-दोन पावलं मागे जातो आणि पाय घसरुन बद्कन पाण्यात पडतो. मिकनची चडडी् पाण्याने भिजते, हातापायांना पाणी लागतं. मग मिकनच्या कपाळावर आठ्या येतात, त्याचं नाक आकसतं आणि ओठांचा चंबू होतो. ही रडं येण्याची लक्षणं! पण तेवढ्यात चिमणी उडून वर कुठेतरी जा‌उन बसते आणि तिथे बसून चिवचिवाट करत राहाते. मिकनचं रडं तात्काळ थांबतं.

मग तो जमिनीला रेटा दे‌ऊन उभा राहातो आणि हात दुमडून फडफडवल्यासारखे करत उडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आ‌ईने मोठ्या लाडाने आणलेल्या त्या बंडीला छोटे पंखही असतात. त्याच्या बाबाने त्याचं नाव एका देवदूताच्या नावावरुन ठेवलेलं असतं, मग देवदूताला पंख नकोत का? असं कौतुकाने म्हणत! व-हांड्याच्या एका कोप-यात आ‌ईने झाडाकरता आणलेल्या मातीचा ढिगारा पडलेला असतो. मिकन् धडपडत त्याच्यावर चढतो आणि त्यावरुन उडी मारुन उडता येतं का ते पाहातो. तसंही उडता येत नाही हे पाहिल्यावर मात्र तो गंभीर होतो. मग तो तिथेच मातीच्या ढिगा-यावर फतकल मारुन बसतो आणि पुढे आलेल्या पोटाला कुरवाळत विचार करायला लागतो. बेंबीत बोट खुपसून बसलं की मिकनला छान छान कल्पना सुचतात. तेवढ्यात मिकनला पायाला लागलेला चिखल दिसतो. तो पाय हाताने वर उचलतो आणि त्याचं जवळून परीक्षण करतो. त्यातला थोडा चिखल बोटावर घेतो आणि तोंडात घालतो. एक दोन सेकंदच! तो य्यॅsssक! करत जीभ बाहेर काढतो मग तोंड प्रचंड घाण करुन ती माती फूं फूं करत थुंकून टाकतो. मग मातीचे हात पाण्यात घालून थोडा चाळा करतो, हात पोटाला पुसून स्वच्छ करतो आणि पुन्हा एकदा विचारात गढतो.  मग त्याला खरंच एक कल्पना सुचते. तो आत जातो आणि खेळण्यातलं विमान घे‌ऊन बाहेर येतो. तो विमानावरुन बसून व्रुम व्रुम करत विमान सुरु करतो खरं, पण, विमानावरुन बसून भुर्रकन पुढे जाण्याच्या नादात ते इटुकलं विमान त्याच्या बुडाखालून निसटतं आणि मिकन् मागच्या मागे पाण्यात पडून कुल्ल्यावरच आपटतो. आता हे म्हणजे फार झालं! असं वाटून मिकन् जोरात भोकाड पसरतो. आढ्यावर बसलेली चिमणी मनापासून हसल्यासारखी शेवटचा चिवचिवाट करुन भुर्र उडून जाते.

मिकनची आ‌ई त्याचा आवाज ऐकून घाब-या घाब-या बाहेर येते आणि उघडलेला दरवाजा, व-हांड्यातल्या पाण्यात उताणा पडलेला, मातीने बरबटलेला मिकन्, त्याचं पुढे जा‌ऊन कोलमडलेलं विमान पाहून आ वासून खिळल्यासारखी उभी राहाते. मग तिला खूप हसू यायला लागतं. ती आपले गाल धरुन, पोट आवळत खदखदून हसत राहाते आणि आ‌ईला घाबरुन पाण्यातच उठून बसलेला मिकन् हसणा-या आ‌ईला पाहून चकीत हो‌ऊन पाहात राहातो. हसणा-या आ‌ईला पाहून आपण रोज असं पडलं तरी हरकत नाही असं मिकनला वाटतं. तो धावत जा‌ऊन आ‌ईच्या पायांना मिठी मारतो आणि मान वर करुन आ‌ईकडे पाहातो. हसून हसून आ‌ईच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलंय. तेवढ्यात बाहेरुन आलेला बाबा पण एकदोन क्षण स्तब्ध राहातो आणि "मी पण! मी पण!" करत पुढे येऊन दोघांना कवेत घेतो.

आजचा अंतिम गुणफलक- आ‌ई २-मिकन् २

आजच्यापुरता सामना बरोबरीत सुटलेला आहे.

9 comments:

mad-z said...

बाबो ... जबरी ...
मिकन वाचता वाचता मिकनची जागा आरेहीने केंव्हा बळकावली हे कळलंच नाही.

vijaya said...

भन्नाट गोड आहे.

धनू said...

कसलं क्युट, गोड आणि छान... :-)

Shraddha Bhowad said...

@ mad-z,

आरेही कोण लेक का? म्हणजे हे कैंड ऑफ रिव्हिझिटींग द मेमरीज झालं की. मस्तच!

Shraddha Bhowad said...

@ विजया, धनू,

मला नेमक्या स्मायली काढता येत नाहीत, पण ती गालावर लाल बुंदके असलेली स्मायली अस्ते नं, ती मला उत्तरादाखल टाकायची होती.
थॅंक यू फॉर द कमेण्ट्स! :) (ही स्मायली जमते)

Rajat Joshi said...

कुठूनतरी या ब्लॉग वर आलो.. पहिलाच लेख वाचून अवाक झालोय! खूssssप भारी...

Shraddha Bhowad said...

It's an exhilarating feeling, the one I got after reading your comment. Thank you very much Rajat!

Samved said...

कायच्या काय मस्त जमलय हे!

Shraddha Bhowad said...

संवेद,

ज्या लोकांना निळासावळा किंवा सांजशकुन शिवायचे म्हणजे बिम्मवाले जी.ए. आवडतात, त्या सर्वांच्याच मनात त्यांचा स्वत:चा बिम्म दडलेला असतो. तुला हे मान्य व्हावं! "मिकन्" हे माझ्या मनातल्या बिम्मचं माझं, पर्सनलाईझ्ड व्हर्जन आहे. माझ्या मनातलं व्हर्जन तुझ्या मनातल्या व्हर्जनशी थोडंफार मिळतंजुळतं असावं म्हणून तुला "मिकन्"बद्दल लोभ वाटला आणि आयॅम ग्रेटफुल फॉर द्यॅट!
तुला थॅंक यू म्हणणं म्हणजे.. जाऊ देत! काय म्हणायचंय ते तुझ्यापर्यंत आपसूक पोहोचावं अशी अपेक्षा!

-श्रद्धा