बेकरीवरच्या दुसऱ्या हल्ल्याची गोष्ट.

मी माझ्या बायकोला बेकरीवरच्या हल्ल्याविषयी सांगीतलं, ते बरोबर केलं की चूक, हे मला आजही सांगता येत नाहीये. पण तसंही, एखादी गोष्ट चूक की बरोबर याला तितकासा अर्थ नसतो. कधी कधी चुकीच्या निवडीतूनही रसाळ गोमटी फळे हाती येतात, तर कधी चांगल्या निवडीतूनही वा‌ईट गोष्टी घडत जातात. मला तर हल्ली वाटायला लागलंय, की आपण निवड करतच नाही मुळी! गोष्टी आपसूक घडतात.. किंवा घडत नाहीत.

तर, सांगायची गोष्ट म्हणजे, मी माझ्या बायकोला बेकरीवरच्या हल्ल्याविषयी सांगणं ही देखील अशीच आपसूक घडलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट! मी काही तिला हे सांगायचंच, असा हिय्या वगैरे करुन सांगीतलेली ही गोष्ट नव्हे. अगदीच खरं सांगायचं झालं, तर मी त्या घटनेबद्दल विसरुनही गेलो होतो; त्यामुळे, आता विषय निघालाच आहे तर सांगतो अशा थाटाचाही हा प्रकार नव्हता.

मला बेकरीवरच्या हल्ल्याची आठवण व्हायचं कारण म्हणजे मला भयंकर भूक लागली होती. पहाटे पहाटे दोन वाजायच्या थोड्याशा आधी मला या भुकेची जाणीव झाली. आम्ही संध्याकाळी सहाला थोडंसं काहीतरी खाल्लं होतं आणि साडेनवाच्या सुमारास झोपूनही गेलो होतो. का ते मला माहित नाही, पण, आम्हा दोघांनाही एकाच वेळी जाग आली. काही मिनीटांच्या आत तर पोटातून विझर्ड्स ऑफ ओझमधल्या चक्रीवादळासारखा गुरगुराट ऐकायला यायला लागला. आम्हाला अगदी कळवळून भूक लागली होती.

आमच्या फ्रिजमध्ये ज्याला ’खाणं’ म्हणावं असं काहीही नव्हतं. फ्रेंच ड्रेसिंगची एक बाटली होती, बीयरचे सहा कॅन होते, थंडीने गारठलेले दोन कांदे, बटरची एक कांडी आणि डि‌ओडरायझरचा एक डब्बा - बस्स! आमचं लग्न हो‌ऊन दोनच आठवडे होत होते, त्यामुळे एकमेकांच्या भुका, भुकेचं खाणं या गोष्टी डोक्यात दूरदूरवर नव्हत्या, बाकी गोष्टींची तर बातच सोडायची.

मी त्यावेळी एका लॉ फर्ममध्ये कामाला होतो आणि माझी बायको एका डिझा‌ईन स्कूलमध्ये सेक्रेटरी होती. मी तेव्हा अठ्ठावीसचा असेन, का एकूणतीसचा? अरे! मला माझ्या लग्नाचं नेमकं वर्ष का आठवत नाहीये?  हां..ती माझ्याहून दोन वर्षं आणि आठ महिन्यांनी लहान होती इतकं आठवतंय. आणि, लग्न झाल्याझाल्या वाणसामान बिणसामानाच्या बाता करतं का कुणी?

इतकी भूक लागली होती, की झोपही ये‌ईना. नुसतं पडू म्हटलं, तर पोटातून कळा येत होत्या. पण त्याबद्दल काही करावं अशीही परिस्थिती नव्हती इतके आम्ही भुकजलेले होतो. मग आम्ही उठून किचनमध्ये गेलो आणि कसे कुणास ठा‌ऊक, पण टेबलाच्या दोन बाजूंनी एकमेकांकडे तोंड करुन बसलो. आम्हाला इतकी कळवळून भूक लागायचं काय कारण होतं?

आम्ही दोघांनी आळीपाळीने फ्रिज उघडून बघितला, पण, आम्ही कितीही वेळा फ्रिज उघडला तरी आतल्या वस्तू काही बदलत नव्हत्या. बीयर, कांदे, बटर, ड्रेसिंग आणि डि‌ओडरायझर. कांदे कापून बटरमध्ये परतून खाता आले असते पण, ते दोन मरगळलेले कांदे आमची पोटं कशी काय भरणार होते? आणि, कांदा हा इतर गोष्टींसोबत खायचा असतो, ती काही भुकेला खाण्याची गोष्ट नव्हे.

"बा‌ईसाहेबांकरिता डि‌ओडरायझरमध्ये परतलेले फ्रेंच ड्रेसिंग पेश करु काय?" मी त्याही परिस्थितीत विनोद करण्याचा प्रयत्न करुन पाहिला. तो प्रयत्न साफ वाया जाणार याची मला कल्पना होतीच, आणि तसंच घडलं.

"चल, बाहेर पडूयात. रात्रभर चालू असलेलं एखादं तरी रेस्टॉरण्ट असेलच." मी सुचवून पाहिलं. "हायवेवर एकतरी असेलच."

पण तिने माझी सूचना साफ धुडकावून लावली. "अजिबात नाही, मध्यरात्रीनंतर बाहेर पडू नये असं म्हणतात." माझी बायको थोडीशी पुराने खयालातवालीच होती. मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि म्हटलं, "बरं, तू म्हणतेस तर नको जायला."

माझी बायको असं काही तरी म्हणायची नं, तेव्हा ते एखाद्या आकाशवाणीसारखं माझ्या कानावर ये‌ऊन आदळायचं, मोठ्ठा साक्षात्कार झाल्यासारखं व्हायचं.  बहुधा सगळ्याच नवपरिणित जोडप्यांचं असंच होत असावं, खरं-खोटं माहित नाही. पण, तिने ते म्हटलं, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, ही एक खास प्रकारची भूक आहे. ती अशी हायवेवरच्या रेस्टॉरण्टमध्ये खायला जा‌ऊन शमणारी नव्हे.

काय पण विचार! खास प्रकारची भूक म्हणे. म्हणजे कशी?

मी हे एका सिनेमॅटिक इमेजच्या रुपात मांडू शकेन.

एक. मी एका छोट्या बोटीवर आहे आणि ती बोट समुद्राच्या शांत पाण्यावर तरंगते आहे. दोन. मी बोटीतून वाकून खाली पाण्यात पाहातो आणि एका ज्वालामुखीचं तोंड समुद्राखालून वर येताना दिसतं. तीन. ते तोंड पाण्याच्या पृष्ठभागाच्या खूप जवळ आलंय, पण ते किती जवळ हे सांगता येत नाहीये. चार. हे सर्व पाण्याच्या अतिपारदर्शकतेमुळे घडतंय. अंतराचा जाम अंदाज येत नाहीये.

माझ्या बायकोने खायला बाहेर जाण्याची माझी सूचना धुडकावून लावली आणि मी त्यावर "तू म्हणतेस तर नको जायला" असं म्हटलं त्या दोन-तीन सेकंदांच्या काळात माझ्या डोक्यात जे चित्र उमटलं ते तंतोतंत असंच होतं. मी सिग्मंड फ्रॉ‌ईड नव्हे, त्यामुळे अर्थातच त्या इमेजचा नेमका अर्थ काय हे मला समजलं नाही, पण तो एक साक्षात्कारच होता इतकं मात्र कळलं. त्यामुळे पोटात भुकेचं थैमान सुरु असतानाही मी आपसूकपणे माझ्या बायकोच्या बोलण्यावर (आकाशवाणी म्हणूयात का?) मान डोलावली.

आता करण्यासारखी एकच गोष्ट उरली होती आणि आम्ही तीच केली, आम्ही बीयरच्या बाटल्या उघडल्या. ते परतलेले कांदे खाण्यापेक्षा हे शतपटीने बरं होतं. तिला बीयर फार आवडायची नाही, त्यामुळे आमच्यात चार मला आणि दोन तिला अशी वाटणी झाली. मी माझ्या पहिल्या बीयरवर होतो तेव्हा तिची नोव्हेंबरमधल्या, इकडे बघ-तिकडे बघ असं करत लुटूलुटू मान हलवणाऱ्या खारीसारखी फडताळातून काही खायला मिळतंय का, हे पाहण्यासाठी शोधाशोध चालली होती. सरतेशेवटी तिला एक पुडा मिळाला, त्यात तळाशी चार बटर बिस्कीटं होती. ती ब-याच दिवसापासून पडून होती वाटतं, कारण म‌ऊ पडली होती. आम्ही दोघांत दोन दोन बिस्कीटं वाटून घेतली आणि चवीचवीने खाल्ली.

पण त्याने भुकेत काहीही फरक पडला नाही. सिना‌ई पेन्सिसुलासारखी ही जी भूक आमच्या पोटात अव्याहत, अमर्याद पसरली होती, त्यात ती बी‌अर आणि ती बिस्कीटं कुठल्याकुठे गायब झाली.

वेळ नुसती माशाच्या पोटात जडशीळ हो‌ऊन एकवटलेल्या शिसासारखी ठिबकत होती. मी बीयरच्या कॅनवरची प्रिण्ट वाचून काढली, मग घड्याळाकडे पाहात बसलो, मग फ्रिजकडे पाहिलं, आदल्या दिवसाचा पेपर चाळला आणि मग पोस्टकार्डाने टेबलावरचा बिस्कीटांचा चुरा गोळा करत बसलो.

"मला सबंध आयुष्यात इतकी भूक कधीच लागली नव्हती." ती म्हणाली. "काय रे, याचा संबंध आपल्या लग्न होण्याशी तर नसेल?"

"असेल", मी उत्तरलो, "किंवा नसेलही."

तिची खाण्याच्या शोधार्थ फडताळांमध्ये खुडबूड सुरुच होती, तेवढ्यात मी माझ्या बोटीतून वाकून खालच्या ज्वालामुखीच्या तोंडाकडे पाहून घेतलं. माझ्या बोटीच्या आजूबाजूला पसरलेलं समुद्राचं पाणी इतकं पारदर्शक नितळ होतं, की त्याने मला कसंतरीच होत होतं. आपल्या पोटात सोलर प्लेक्सस नावाचा जो भाग असतो नं, त्याच्या पलीकडे एक हवाबंद, निर्वात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. एक गुहा असावी, त्यात कोणाला जाता ये‌ऊ नये आणि बाहेर पडता ये‌ऊ नये अशी. न-अस्तित्वाच्या अस्तित्वाची जाणीव. एखाद्या उंचच उंच इमारतीच्या सर्वात वरच्या टोकावर पोहोचल्यावर हातपाय थंडबधिर हो‌ऊन जातात त्या भीतीसारखी. भूक आणि उंचीची भीती यांच्यातला हा संबंध म्हणजे माझ्याकरता एक शोधच होता.

आणि, तेव्हाच मला आठवलं की मला असाच, तंतोतंत असाच अनुभव यापूर्वीही आला होता, माझं पोट तेव्हाही इतकंच रिकामं होतं. पण केव्हा??? अरे हो! आठवलं. "बेकरीवरच्या हल्ल्याच्या वेळी", मी स्वतःशीच बरळलो.

"बेकरीवरच्या हल्ल्याच्या वेळी?? काय बडबडतोयेस तू?"

तर, सुरुवात झाली ती अशी.

--

"मी एकदा बेकरीवर हल्ला केला होता. खूप वर्षांपूर्वी. फार मोठी बेकरी नव्हती ती. फार प्रसिद्धही नव्हती. हे सगळं सोड, तिथला ब्रेडही खास नव्हता, याचा अर्थ वा‌ईट होता असंही नव्हे. एखाद्या वस्तीत खूपशा गाळ्यांमध्ये एकच असते, अशी ती साधीसुधी बेकरी होती. एक म्हातारा माणूस ती बेकरी चालवायचा. तिथली सगळी कामं तोच करायचा. सकाळी ब्रेड भाजायचा आणि सगळा माल विकला गेला की बेकरी बंद करायची असा शिरस्ता."

"जर तुला एखाद्या बेकरीवर हल्ला करायचा होता, तर त्याच बेकरीवर का?"

"कारण, हल्लाच करायचा तर मोठ्या बेकरीवर करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला ब्रेड हवा होता, पैसे नव्हे. आम्ही हल्लेखोर होतो, दरोडेखोर नव्हे."

"आम्ही? हे "आम्ही" कोण?"

"मी आणि त्यावेळचा माझा जिवलग मित्र. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे गं! आमच्याकडे टूथपेस्ट घ्यायलाही पैसे नव्हते इतके आम्ही भणंग होतो. खायला कधीच पुरेसं अन्न नसायचं आमच्याकडे. त्या काळी खायला मिळवण्याकरता आम्ही किती किती आणि काय काय म्हणून उचापती केल्या होत्या, बेकरीवरचा हल्ला ही त्यातलीच एक."

"मला एक कळत नाहिये", ती माझ्याकडे रोखून पाहात होती. पहाटेच्या आकाशात लुप्त होणाऱ्या ताऱ्याकडे तिने असंच पाहिलं असतं. "तू एखादी नोकरी का धरली नाहीस? तुला स्कूलनंतर काम करता आलं असतं. बेकऱ्यांवर हल्ले करण्यापेक्षा ते कितीतरी सोपं पडलं असतं."

"आम्हाला काम करायचं नव्हतं, आणि आम्ही त्या निर्णयावर ठाम होतो."

"पण तू आता काम करतोयेस, नाही का?"

मी मान डोलावली आणि बीयरचा एक घोट घेतला. मग खसाखसा डोळे चोळले. बीयरचा काळसर द्रव आता माझ्या मेंदूत झिरपून भुकेशी सलगी करायला लागला होता.

"काळ बदलतो, लोकं बदलतात." मी म्हणालो. "चल, आपण झोपूयात आता का आता? सकाळी लवकर उठायचंय."

"मला अजिबात झोप आलेली नाहिये. मला बेकरीवरच्या त्या हल्ल्याविषयी सांग." इति ती.

"त्यात सांगण्यासारखं काही नाही. एक्सा‌इटमेण्ट तर मुळीच नाही. अगदी मिळमिळीत गोष्ट आहे."

"पण तो हल्ला यशस्वी तरी झाला का?

आता मी झोपेचा नाद सोडला आणि दुसरी बीयर उघडली. तिला एखादी गोष्ट ऐकायची असेल तर ती पूर्ण गोष्ट ऐकून हो‌ईपर्यंत खनपटीस बसते. तशीच आहे ती.

"झालाही आणि नाहीही. आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं, पण ते ज्या पद्धतीने हवं होतं, त्या पद्धतीने नाही मिळालं. आम्ही बेकरीवाल्याकडून ब्रेड घेण्याच्या आधी त्यानेच आम्हाला ब्रेड दे‌ऊन टाकला."

"असाच?"

"नाही, तसं नाही म्हणता येणार, तिथेच जरा मेख आहे." मी डोकं हलवलं. "त्या बेकरीवाल्याला क्लासिकल म्युझिकचं वेड होतं आणि आम्ही तिथे जा‌ऊन थडकलो तेव्हा तो वाग्नेर ओव्हर्चरचा अल्बम ऐकत होता. त्याने आमच्यासोबत एक सौदा केला. त्या सौद्यानुसार आम्ही त्याच्यासोबत बसून पूर्ण अल्बम ऐकला, तर आम्ही कितीही ब्रेड घे‌ऊन जावा असा वायदा झाला. मी माझ्या मित्राशी बोललो आणि आम्ही म्हटलं, की ठिकेय. आम्हाला काम करायचं नव्हतं, पण हे काही काम नव्हतं आणि त्याने कोणाला फारसा फरक पडत नव्हता. आम्ही आमचे सुरे बॅगेत ठेवून दिले आणि खुर्च्या घे‌ऊन बसलो. आम्ही टानहा‌ऊझर आणि द फ्ला‌ईंग डचमॅनपर्यंतची ओव्हर्चर ऐकली."

"मग? त्यानंतर ब्रेड मिळाला?"

"हो. बेकरीतला जवळपास सगळाच. बेकरीत जे जे काही होतं त्यातलं बरंचसं त्याने आम्हाला दे‌ऊन टाकलं. आम्ही ते बॅगेत भरलं आणि घरी आलो. ते आम्हाला पुढचे चार-पाच दिवस पुरलं. "

मी बीयरचा अजून एक घोट घेतला.  पाण्याखाली खूप आत‌आत भूकंप हो‌ऊन त्याच्या ध्वनिविरहित लहरींनी द्यावा तसा माझ्या झोपेने माझ्या बोटीला हळूवार झोका दिला. माझ्यावरचा झोपेचा अंमल वाढत होता आणि माझी बोट हळूहळू डोलायला लागली होती.

"त्यामुळे, तो हल्ला यशस्वी झाला असंच म्हणायला लागेल. कारण, आम्हाला ब्रेड मिळाला होता आणि आम्ही गुन्हा केलाय असं कोणाला बोट ठेवून म्हणता आलं नसतं. ती एकप्रकारची देवाण-घेवाण होती असं म्हण. आम्ही त्याच्यासोबत वाग्नेर ऐकला आणि त्याबदल्यात आम्हाला ब्रेड मिळाला. कायद्याच्या भाषेत तो एक व्यवहारच होता."

"पण, वाग्नेर ऐकणं हे काही काम नव्हे", ती म्हणाली.

"नाही, नक्कीच नाही. पण, त्या बाबाने आम्हाला भांडी घासायला लावली असती किंवा खिडक्या वगैरे पुसायला लावल्या असत्या तर आम्ही सपशेल नकार दिला असता. पण, त्याने आम्हाला तसं काही करायला सांगीतलं नाही. आम्ही वाग्नेरची एलपी अथपासून इतिपर्यंत ऐकावी इतकंच त्याचं मागणं होतं. कोणी असा विचार देखील केला नसता. कोण तर म्हणे- वाग्नेर. हे म्हणजे त्या म्हाताऱ्याने आम्हाला शाप दिल्यागतच होतं. आता मी जेव्हा त्याबद्दल विचार करतो, तेव्हा त्याला 'नाही!' म्हणायला हवं होतं असं वाटतं. आम्ही सुऱ्याचा धाक दाखवूनच त्याच्याकडून ब्रेड काढून घ्यायला हवा होता. मग काही झालं नसतं."

"का? त्यानंतर काही झालं का?"

मी पुन्हा खसाखसा डोळे चोळले.

"हो, तसंच काहीतरी. म्हणजे नेमकं बोट ठेवून हे-हे असं-असं घडलं असं सांगता आलं नसतं, पण त्यानंतर पुष्कळ गोष्टी बदलत गेल्या. बेकरीवरचा तो हल्ला आमच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट ठरली. त्यानंतर मी युनिव्हर्सिटीत शिकायला गेलो, ग्रॅज्यु‌एट झालो. त्यानंतर मी एका लॉ फर्ममध्ये काम करायला लागलो, बार एक्झॅमसाठी अभ्यास केला, तुला भेटलो, लग्न केलं. मी पुन्हा तसलं काही केलं नाही, बेकरीवर हल्ला तर नाहीच नाही."

"बस्स, इतकंच?"

"हो. सांगण्यासारखं फक्त इतकंच आहे." मी शेवटची बीयर संपवली. आता बीयरचे सहाही कॅन खल्लास झाले होते. सहा बीयरचे सहा पुल टॅब्स माझ्यासमोरच्या अॅशट्रेमध्ये एखाद्या जलपरीच्या खवल्यांसारखे पडले होते.

अर्थात, बेकरीवरच्या हल्ल्यानंतर काहीच घडलं नाही हे काही खरं नव्हे. बोट ठेवून सांगता येव्यात अशा पुष्कळ गोष्टी होत्या, पण मला मला त्यावर तिच्याशी बोलायचं नव्हतं.

"हा जो तुझा मित्र होता. तो काय करतो सध्या?"

"काही कल्पना नाही. काहीतरी झालं, काहीच नसावं अशाच प्रकारचं काहीतरी आणि आम्ही एकमेकांसोबत फारसे राहिनासे झालो. मी त्यानंतर त्याला पाहिलेलं नाही. त्याचं सध्या काय चाललंय याबद्दल मला काहीही माहित नाही."

त्यानंतर ती थोडा वेळ गप्पच बसली. मी तिला संपूर्ण गोष्ट सांगत नाहिये हे तिच्या लक्षात आलं असावं, पण तिनंही ते फार ताणून धरलं नाही.

"पण तरीही, तुमच्यात दुरावा येण्याचं कारण तेच होतं ना? बेकरीवरचा हल्ला?"

"बहुतेक हो. त्या घटनेने आमच्या आयुष्यांवर आम्हाला वाटले  होते त्यापेक्षा जास्त परिणाम झाले. त्यानंतरचे कित्येक दिवस आम्ही ब्रेडशी वाग्नेरचं नातं काय असावं याबद्दल बोलत होतो. आम्ही ब्रेडच्या बदल्यात वाग्नेर ऐकला, हे चूक केलं की बरोबर याबद्दल आमचा ठाम निर्णय होत नव्हता. डोकं शांत ठेवून शहाणपणाने विचार केला, तर तो निर्णय योग्यच होता. कोणालाही दुखापत झाली नाही, सर्वांना हवं ते सर्व मिळालं. तो बेकरीवाला -त्याने आम्हाला वाग्नेर का ऐकायला लावला हे मला आजही कळून घेता येत नाहीये- तो वाग्नेर आमच्या गळी उतरवण्यात यशस्वी झाला आणि आम्ही आमच्या घशाखाली ब्रेड उतरवण्यात."

"हे सगळं खरं असलं, तरी आपण काहीतरी भयंकर चूक करुन बसलो आहोत असं आम्हाला राहून राहून वाटत होतं. ती न समजलेली चूक आम्हाला सुधारता आली नाही, ती तशीच राहिली, आमच्या आयुष्यांना घेरुन बसलेल्या काळ्याकुट्ट छायेसारखी. म्हणूनच, मघाशी मी शाप हा शब्द वापरला. खोटं नाही बोलत, त्यावेळी आपण शाप घे‌ऊन जगतोय असंच वाटत होतं."

"आणि तो शाप अजूनही तुझ्यावर आहे असं तुला वाटतंय?"

मी अॅशट्रेमधून ते सहा पुल-टॅब्स टेबलावर ओतले आणि ब्रेसलेटच्या आकारात वर्तुळाकार रचले.

"कुणास ठा‌ऊक? नाही माहित. जगात इथे-तिथे, जो-तो शाप घे‌ऊन जगतोच आहे. त्यातला कोणता शाप काय घडवून आणेल, कोणाला काय करायला भाग पाडेल कोणी सांगावं? "

"यात काही तथ्य नाही." ती माझ्याकडे रोखून पाहात म्हणाली. "तू थोडा विचार केलास तर तुलापण कळेल ते. तू, म्हणजे तू स्वतः हं.. पुढे ये‌ऊन त्या शापातून सुटायचा प्रयत्न करत नाहीस तोवर तो असाच दातदुखीसारखा तुला चिकटून राहिल, मरेपर्यंत तुला छळत राहिल, फक्त तुलाच नव्हे, मलाही..."

"तुला?"

"तर? आता मी तुझी जिवलग मित्र आहे नं? तुला काय वाटतं, आपल्या दोघांनाही इतकी भूक का लागली असेल? तुझ्याशी लग्न करेपर्यंत सबंध आयुष्यात मला इतकी भूक कधीही लागली नव्हती. हे नेहमीसारखं नाही असं नाही वाटत तुला? तुझा शाप आता माझ्यावरही काम करायला लागलाय." मी मान डोलावली. मी पुल-टॅब्सचं रिंगण मोडलं आणि ते टॅब्स पुन्हा एकदा अॅश-ट्रेमध्ये ठेवून दिले. ती बोलत होती ते बरोबर की चूक हे मला माहित नव्हतं, पण तिच्या डोक्यात काहीतरी चाललं असावं असं मात्र जाणवलं.

भूकेची जाणीव पुन्हा एकदा परतली होती, आणि यावेळी तिचा भडका वाढला होता. त्याने माझं डोकं कलकलायला लागलं होतं. माझ्या डोक्याला माझ्या भुकेशी क्लच केबलने जोडलं असावं असं काहीसं वाटत होतं. भुकेच्या प्रत्येक कळीसरशी माझ्या टाळूला चिमटा बसत होता.

मी पुन्हा एकदा त्या पाण्याखालच्या ज्वालामुखीकडे नजर टाकली. पाणी आता कितीतरी नितळ दिसत होतं, आधी दिसत होतं त्याहून कितीतरी जास्त. नीट निरखून पाहिलं नसतं तर तिथे पाणी आहे हे कळलं देखील नसतं. माझी बोट जणूकाही कोणत्याही आधाराविना हवेतल्या हवेत तरंगते आहे असं वाटत होतं. मला तळातले बारीकसारीक दगड गोटेही स्पष्ट दिसत होते. मी हात लांब करायचा अवकाश, मला त्यांना स्पर्श करता आला असता.

"फक्त दोन आठवडे होतायेत", ती म्हणाली, "आपण एकत्र राहायला सुरुवात केल्यापासून, पण मला सतत, सर्वकाळ कसलातरी विचित्र वावर जाणवत होता इथे." आता तिने माझ्या डोळ्यांमध्ये थेट रोखून पाहिलं आणि दोन्ही हात टेबलावर ठेवून बोटं एकमेकांत गुंतवली. "अर्थात तो हा शाप आहे हे माझ्या आतापर्यंत माहित नव्हतं, पण आता सर्वकाही स्पष्ट झालंय. तू अजूनही त्या शापाच्या प्रभावाखाली आहेस."

"कसला वावर म्हणालीस?"

"कित्येक वर्षं न धुतलेला, धुळमटलेला पडदा छतावरुन खाली लोंबतोय तसं जडशीळ काहीतरी."

"छे गं, तो शाप वगैरे नसेल. हे सगळे माझ्या मनाचे खेळ असावेत बहुधा!" मी हसलो.

पण ती हसली नाही.

"नाही, हे तुझ्या मनाचे खेळ नाहीत", ती.

"बरं, तू म्हणतेस ते बरोबर आहे असं समजूयात. आपण एक क्षण हे मान्य करुयात, की तो शाप आहे. त्याबद्दल मी काय करावं असं म्हणतेस?:

"दुसऱ्या एखाद्या बेकरीवर हल्ला कर. अगदी लगेच, आताच्या आता! मला हाच एक मार्ग दिसतोय."

"आत्ता?"

"हो, आत्ता. तुला भूक लागली आहे तोवरच. तू जे काम अर्धवट सोडलंस ते तू पूर्ण करायला हवंस."

"पण आता मध्यरात्र उलटून गेलिये, आता कोणती बेकरी उघडी असेल?"

"आपण शोधू. टोकियो किती मोठं शहर आहे. इतक्या मोठ्या शहरात रात्रभर सुरु असणारी किमान एकतरी बेकरी असेलच. चल!"

-

मी माझी जुनी कोरोला काढली, आणि भर रात्री २:३० वाजता आम्ही टोकियोच्या रस्त्यांवरुन बेकरी शोधत हिंडायला लागलो. मी गाडी चालवत होतो आणि ती नेव्हिगेटर सीटवर होती. आमची दोघांचीही नजर एखाद्या घारीसारखी बेकरीचा शोध घेत होती. मागच्या सीटवर एक लांबलचक, कडक माशासारखी दिसणारी एक जुनी रेमिंग्टन ऑटोमॅटिक शॉटगन पडली होती. तिच्या गोळ्या माझ्या बायकोच्या विंडब्रेकरच्या खिशात खुळखुळत होत्या. तिने ग्लोव्ह कंपार्टमेण्टमध्ये दोन काळे स्की-मास्क टाकले होते. माझ्या बायकोकडे शॉटगन का होती, हे मला कळत नव्हतं; ते सोडा, तिच्याकडे ते स्की मास्क तरी का होते, हे ही मला समजत नव्हतं. आमच्यापैकी कोणीही कधीही स्की करायला गेलं नव्हतं. पण, तिने काही सांगीतलं नाही, आणि मी काही विचारलं नाही. वैवाहिक आयुष्य विचित्र असतं, माझ्या डोक्यात विचार ये‌ऊन गेला.

अशा तऱ्हेने आम्ही पूर्ण सज्ज हो‌ऊन बेकरीच्या शोधार्थ निघालो होतो, पण एकही उघडी बेकरी मिळायला तयार नव्हती. रिकामे, ओस पडलेले रस्ते भराभर मागे पडत होते. योयोगीपासून शिनजुकू, तिथून पुढे अाकासाका, मग पुढे आ‌ओयामा, हि-रु, रोप्पोंगी, दा‌ईकान्यामा, शिबुया...रात्री उशीराने दिसणाऱ्या टोकियोमध्ये सर्व प्रकारची लोकं, सर्व प्रकारची दुकानं दिसत होती, फक्त बेकरी दिसत नव्हती.

आम्हाला दोनदा पेट्रोल कार दिसल्या. एक आपण त्या गावचेच नाही असं भासवत रस्त्याच्या कडेला उभी होती आणि दुसरी आम्हाला ओव्हरटेक करुन निघून गेली. दोन्हीही वेळा मला दरदरुन घाम फुटला होता, पण माझ्या बायकोची एकाग्रता काही ढळली नाही, ती आपली बेकरी शोधतच होती. प्रत्येक वेळी तिची सीटमध्ये चाळवाचाळव होत असताना तिच्या खिशातल्या शॉटगनच्या गोळ्या खुळखुळ वाजत होत्या. जुन्या काळातल्या उशांमधले बकव्हीट खुळखुळायचे तशा.

"जा‌ऊ देत." मी म्हटलं. "यावेळी कोणती बेकरी सुरु असणार? अशा प्रकारच्या गोष्टी नीट बेत आखून करायच्या असतात, नाहीतर.."

"कार थांबव."

मी कच्चकन ब्रेक दाबले.

"हीच ती जागा." ती म्हणाली.

रस्त्याच्या बाजूने पसरलेल्या सर्व दुकानांची शटर्स खाली होती, त्यामुळे त्यांची एक गडद काळोखी, मूक भिंत उभी राहिल्यासारखी वाटत होती. न्हाव्याच्या दुकानासमोरचं सा‌ईन आमच्यावर पाळत ठेवणाऱ्या काचेच्या डोळ्यासारखं वाटत होतं. एक दोनशे यार्डापलीकडे एक मॅकडॉनल्ड्सचं साइन चमकत होतं, त्याव्यतिरिक्त दुसरं काहीही दिसत नव्हतं.

"कुठेय बेकरी?" मी विचारलं.

तिने एक शब्दही न बोलता ग्लोव्ह कंपार्टमेण्टमधून कापडात गुंडाळलेला टेपचा रोल काढला आणि तो घे‌ऊन ती कारच्या बाहेर पडली. ती काय करतेय ते पाहायला मीही बाहेर पडलो, तर ती गाडीच्या समोर उकीडवी बसून टेपने लायसन्स प्लेट झाकत होती. मग ती मागच्या बाजूला गेली आणि मागची लायसन्स प्लेटही टेपने झाकली. तिच्या हालचाली सरा‌ईतासारख्या होत होत्या. मी एकटक तिच्याकडे पाहात उभा होतो.

"आपण त्या मॅकडॉनल्ड्सवर हल्ला करणार आहोत." ती थंडपणे म्हणाली. जणू काही ती रात्रीच्या जेवणाचा मेन्यूच सांगत होती.

"पण मॅकडॉनल्ड्स ही काही बेकरी नाही." मी माझा मुद्दा मांडला.

"पण बेकरीसारखंच आहे." ती म्हणे. "कधीकधी थोड्याफार तडजोडी कराव्या लागतात, आता चल."

मी कार मॅकडॉनल्ड्सच्या पार्किंग लॉटमध्ये ने‌ऊन लावली. तिने माझ्या हातात ब्लँकेटनध्ये गुंडाळलेली शॉटगन दिली.

"मी आतापर्यंत कधीही बंदूक चालवलेली नाही", मी थोड्याशा नाखुषीनेच म्हटलं.

"तुला बंदूक चालवायची नाहीये, फक्त धरायचिये, ओके? मी सांगतेय तसं कर. आपण असंच आत जायचं आणि त्यांनी "वेलकम टू मॅकडॉनल्ड्स!" म्हटलं की आपले मास्क चढवायचे, कळलं?"

"हो, ठिक आहे, पण..."

"मग तू त्यांच्यावर बंदूक रोखायचीस आणि तिथल्या खाणाऱ्यांना, काम करणाऱ्यांना, सगळ्यांना एकत्र करायचंस, ताबडतोब. बाकी सगळं मी बघेन."

"अगं, पण-"

"आपल्याला किती हँबर्गर पुरतील असं वाटतं तुला? तीस पुरेत?"

"हो, पुरेत." मी सगळे पण... गिळले आणि शॉटगन ब्लँकेटमध्ये नीट गुंडाळून घेतली. कसली जड होती! एका सँडबॅग‌इतकी सहज जड असेल, आणि एखाद्या अतिशय काळोख्या रात्री‌इतकी काळीकुट्ट.

"आपल्याला हे करायलाच हवंय का?" मी थोडंसं तिला उद्देशून, थोडं स्वतःशीच पुटपुटलो.

"अर्थात!" ती.

का‌ऊंटरपलीकडच्या मॅकडॉनल्ड्सची हॅट घातलेल्या मुलीने मला मॅकडॉनल्ड्स छापाचं हसून दाखवलं आणि "वेलकम टू मॅकडॉनल्ड्स!" म्हणून आमचं स्वागत केलं. इतक्या रात्री मॅकडॉनल्ड्समध्ये मुली काम करत असतील असं मला मुळीसुद्धा वाटलं नव्हतं, त्यामुळे मी थोडा गांगरुन गेलो, पण काही सेकंदच! मी स्वतःला सावरलं आणि मास्क चढवला. अचानक मास्क घातलेली एक जोडगोळी आपल्यासमोर अवतीर्ण झाल्याचं पाहून ती मुलगी आ वासून पाहात राहिली.

असा प्रसंग ओढवलाच तर काय करायचं हे मॅकडोनाल्ड्सच्या हॉस्पिटॅलिटी मॅन्यु‌अलमध्ये दिलेलं नसणार, त्यामुळे ती "वेलकम" बोलून झाल्यानंतर बोलायच्या वाक्याची जुळवाजुळव करत होती, पण तिच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. पण, अशाही परिस्थितीत तिच्या जिवणीवरचं ते चंद्रकोरीसारखं मॅकडोनाल्ड्स छापाचं हसू काही पुसलं गेलं नव्हतं.

मी चपळ हालचाली करत शॉटगन ब्लॅकेटमधून बाहेर काढली आणि टेबलांच्या दिशेने रोखली, पण तिथे फारसं कोणी नव्हतंच. एक तरुण जोडपं होतं - बहुधा विद्यार्थी असावेत- पण तेही प्लॅस्टिकच्या टेबलांवर डोकी ठेवून गाढ झोपी गेले होते. त्यांच्या डोक्यांचा आणि त्यांनी संपवलेल्या स्ट्रॉबेरी मिल्क शेकच्या कप्सचा असा काही कोन तयार झाला होता की ते पाहून एखाद्या अव्हॉन्त गार्द शिल्पाचीच आठवण यावी. ते मेल्यागत झोपले होते, त्यामुळे आमच्या कामात त्यांचा व्यत्यय यायची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे मी ती शॉटगन पुन्हा एकदा का‌ऊंटरच्या दिशेने रोखली.

तिथे एकूण तीन माणसं कामाला होती. का‌ऊंटरवरची मुलगी, फिकुटलेल्या, निमुळत्या चेह-याचा ,बहुधा विशीतला एक मॅनेजर, आणि किचनमध्ये काम करणारा, मख्ख, कोऱ्या चेहऱ्याचा एक पोरगेलासा तरुण. ते सगळे कॅश रजिस्टरच्या मागे उभे होते आणि माझ्या शॉटगनच्या नळीकडे भयमिश्रित कुतूहलाने पाहात होते. इंकन विहिरींमध्ये डोकावणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यांवर असेच भाव असतात. कोणीही किंचाळलं नाही, कोणीही संशयास्पद हालचाली केल्या नाहीत. मी त्यांच्यावर रोखलेली शॉटगन इतकी जड होती, की शेवटी मी तिचं बॅरल कॅश रजिस्टरवर टेकवून बोट ट्रिगरवर ठेवलं.

"मी तुम्हाला पैसे देतो", मॅनेजरने घोगरट आवाजात म्हटलं. "अकराला कलेक्शन झालं, त्यामुळे जास्त पैसे नाहीयेत. आहेत ते सर्व तुम्ही ने‌ऊ शकता, दुकानाचा इन्शुरन्स आहे."

"शटर खाली कर आणि सा‌इन बंद करुन टाक." बायकोने आज्ञा केली.

"एक मिनीट..." मॅनेजर म्हणाला, "मला असं नाही करता येणार. मी परवानगीशिवाय शटर बंद केलं तर जबाबदारी माझ्यावर ये‌ईल."

बायकोने शांतपणे एकेक शब्द उच्चारत पुन्हा तिचा हुकूम सोडला आणि त्याची परिस्थिती द्विधा झाली.

"ती म्हणतेय तसं कर, तुझ्या भल्याचं सांगतोय", मी त्याला इशारेवजा सल्ला दिला.

त्याने रजिस्टरवर टेकलेल्या बंदूकीच्या नळीकडे पाहिलं, मग बायकोकडे पाहिलं आणि मग पुन्हा एकदा बंदूकीच्या नळीकडे पाहिलं. आपल्याला काय करायला हवंय हे त्याला कळलं असावं, कारण त्याने सा‌इन बंद केलं आणि इलेक्ट्रिक पॅनल सुरु करुन शटर खाली केलं. त्याने आमच्या नकळत बर्गलर अलार्म सुरु नये म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो, पण मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गलर अलार्म नसावाच बहुधा! मॅकडॉनल्ड्सवर हल्ला करायचा विचारच कधी कोणाच्या मनात आला नसणार.

पुढचं शटर बंद होताना केवढा तो खडखडाट! रिकाम्या पत्र्याच्या डब्यावर बेसबॉल बॅट दणादण मारताना ये‌ईल तसा. पण त्या इतक्या आवाजानेही त्या कुंभकर्णांची झोप चाळवली नव्हती. अशी गाढ झोप हवी! कोणाला असं गाढ झोपलेलं पाहिल्याला कितीतरी वर्षं झाली असतील.

"तीस बिग मॅक. टेक‌आ‌ऊट", माझी बायको बोलली.

"प्लीज पैसे घ्या नं", मॅनेजर अगदी कळवळून बोलत होता, "तुम्हाला पाहिजेत त्यापेक्षा जास्त पैसे देतो, तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जा‌ऊन खा, पण याने माझ्या अका‌ऊंट्समध्ये गडबड हो‌ईल आणि-"

"ती म्हणतेय तस कर, तुझ्या भल्याचं सांगतोय", पुनश्च मी.

ते तिघे गुपचूप किचनमध्ये गेले आणि तीस मॅक बनवायला सुरुवात केली. तो पोरगेलासा तरुण बर्गर ग्रिल करत होता, मॅनेजर ते बन्समध्ये भरत होता आणि मुलगी ते पॅकमध्ये गुंडाळत होती. कोणाच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता.

मी बंदूक ग्रिडलकडे रोखून एका मोठ्या फ्रिजला टेकलो. ग्रिडलवर खरपूस भाजल्या जाणाऱ्या बर्गरच्या पॅटींची
रांग तपकिरी पोलका डॉट्ससारखी दिसत होती. त्या भाजल्या जाणाऱ्या मांसाचा गोडसर वास माझ्या शरीराच्या रंध्रारंध्रातून आत शिरुन, रक्तात विरघळून, शरीराच्या अणू-रेणूत पोहोचून भूकेच्या त्या निर्वात, सीलबंद गुहेच्या गुलाबी भिंतींना धडका देत होता.

एव्हाना पांढऱ्या कागदात गुंडाळलेल्या बर्गर्सची थप्पी तयार झाली होती. मला आताच त्यातला एक बर्गर उचलून मटकावून टाकावासा वाटत होता, पण तसं करणं या हल्ल्यामागच्या कारणमीमांसेत बसणारं नव्हतं. मी स्वत:ला आवरलं. एव्हाना किचनमधल्या गरम हवेने माझ्या स्की मास्कच्या आडून घामाचे ओघळ वाहायला लागले होते.

मॅकडॉनल्ड्सची ती तीन लोकं अधूनमधून माझ्या बंदूकीच्या नळीकडे चोरटी नजर टाकत होती. मी ताणाखाली असलो, की माझ्या कानात खाज सुटते. मी डाव्या हाताच्या करंगळीने कानात खाजवत असताना बंदूकीची नळी वरखाली होत होती, आणि त्याने त्यांची भीतीने गाळण उडत होती. बंदूकीचं सेफ्टी लॅच ऑन होतं त्यामुळे चुकून बंदूक चालली असं होणार नव्हतं, पण ते त्यांना माहित नव्हतं, आणि मी काही ते सांगायला जाणार नव्हतो.

बायकोने बर्गर घेतले आणि एका पिशवीत पंधरा असे दोन पिशव्यांमध्ये भरले.

"तुम्ही हे का करताय?" त्या मुलीने मला विचारलं. "तुम्ही पैसे का नाही घेत? पैसे घे‌ऊन तुम्हाला आवडेल ते खाता ये‌ईल. तीस बिग मॅक घे‌ऊन काय मिळणार आहे?"

मी समजूतीने मान हलवली.

मग बायकोच बोलली, "मनापासून सॉरी, पण एकही बेकरी सुरु नव्हती. एखादी बेकरी सुरु असती तर आम्ही बेकरीवरच हल्ला केला असता."

या उत्तराने त्यांचं समाधान झालं असावं, नसेल झालं तरी त्यांनी त्यानंतर कोणते प्रश्न विचारले नाहीत. माझ्या बायकोने दोन लार्ज कोक घेतले आणि त्याचे पैसे दिले.

"आम्हाला फक्त ब्रेड चोरायचा होता, बाकी काही नाही." बायको म्हणाली. त्या मुलीने डोकं हलवलं. ती ’हो’ म्हणत होती की नुसतीच मान हलवत होती, तिचं तिलाच माहित! तिला बहुधा दोन्ही एकाच वेळी करायचं असावं. तिला काय वाटत असेल याची कल्पना मी करु शकत होतो.

बायकोने खिशातून दोरीचं बंडल काढलं- ती पूर्ण तयारीनिशी आली होती-आणि बटण शिवावं इतक्या सहजतेने त्या तिघांना एका खांबाशी बांधलं. तिने दोरी जास्त घट्ट आहे का, कोणाला टॉयलेटला जायचं आहे का विचारलं, तेव्हा कोणी तोंडून चकार शब्द काढला नाही. मी शॉटगन ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेतली, बायकोने कोक आणि बर्गर्सच्या पिशव्या उचलल्या आणि आम्ही बाहेर पडलो. ते झोपलेलं जोडपं अजूनही गाढ झोपेत होतं. खोल खोल समुद्राच्या तळाशी राहाणाऱ्या माशांसारखं. काय केलं असतं म्हणजे ती दोघं गाढ झोपेतून जागी झाली असती?

त्यानंतरचा अर्धा तास मी गाडी चालवत होतो. एका बिल्डिंगसमोर मोकळा पार्किंग लॉट पाहून आम्ही गाडी लावली आणि तिथंच बसून बर्गर खाल्ले, कोक प्यायलो. सहा बिग मॅक माझ्या पोटात गडप झाले आणि तिने चार फस्त केले. अजून वीस बिग मॅक मागच्या सीटवर पडले होते. कधीही शमणार नाही अशी वाटणारी ती भूक पहाटेच्या सुमारास कुठल्याकुठे गायब झाली. सूर्याचा पहिला किरण इमारतीच्या मळकट जांभळ्या भिंतीवर ये‌ऊन पडला आणि त्यावरचा सोनी बीटाचा अॅड टॉवर अक्षरशः झळाळू लागला. थोड्या वेळाने त्या रस्त्यावर ट्रक्सची घरघर, पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला.अमेरिकन आर्म्ड फोर्सेसच्या रेडियोवर का‌ऊबॉय म्युझिक लागलं होतं. मी एक सिगरेट शिलगावली आणि आम्ही आळीपाळीने झुरके घेतले. तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं.

"आपण हे सगळं करण खरंच गरजेचं होतं का?" मी तिला विचारलं.

"अर्थात!" तिने एक खोल सुस्कारा सोडला आणि ती झोपी गेली. ती मांजरीच्या पिल्लासारखी म‌ऊ आणि हलकी वाटत होती.

आता मी एकटाच. मी बोटीवरुन वाकून समुद्राच्या तळाशी पाहिलं. तो ज्वालामुखी गडप झाला होता. त्या शांत पाण्यात वरचं निळंभोर आकाश दिसत होतं. हलक्याशा वाऱ्याने फडफडणाऱ्या सिल्कच्या पायजम्यासारख्या छोट्या छोट्या लाटा बोटीपाशी ये‌ऊन लपलपत होत्या. हे सोडलं तर, बाकी तिथं काहीच नव्हतं.

मी बोटीच्या तळाशी पसरलो, डोळे मिटले आणि त्या लाटांनी मला माझ्या घरी ने‌ऊन सोडण्याची वाट पाहात पडून राहिलो.

--

पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

 
Designed by Lena