मिकन् आणि पायपर

मिकनला जाग आली.

जाग आल्याआल्या त्याला पहिले काय दिसलं असेल तर त्याचे पाय आणि समोरच्या सीटची काळी पाठ. मिकनने बाहेर पाहिलं तर बाहेरची ऊन्हं त्याला टाटा करत उतरणीला लागली होती, कावळ्यांची शाळा सुटली होती आणि बाहेर जिथे नजर जाईल तिथे झाडंच झाडं होती.
मिकन् मामाच्या, आजीच्या, त्याच्या आईच्या गावी चालला होता.

त्या बसमधल्या सीट इतक्या मोठ्या होत्या की पाय पसरून बसूनही मिकनचे पाय त्याच्या सीटच्या कडेपर्यंतच येत होते. सीटच इतकी मोठी आहे की आपणच इतके छोटे आहोत की सीट मोठी वाटते आहे? हो, असंच असावं, मिकनने मान डोलावली. झोपून उठल्यानंतर मिकनला असे छान विचार करता येत असत. मिकनने वाकून बाजूच्या सीटवर आईकडे पाहिलं. आई अजूनही त्याच्याकडे पाठ करून तिच्या बाजूला बसलेल्या मामाशी बोलत होती. मिकनशी बोलते तशीच - डोळे मोठ्ठे करून, हातवारे करत. दुपारपासून तिने मिकनकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. मिकनच्या गळ्यात दुखलं एकदम. ही इतकी काय बोलतेय? मिकनने बाजूच्या सीटवर तोंड उघडं टाकून बेशुद्ध पडलेल्या बाबाकडे पाहिलं. एकदा त्याच्या उघड्या तोंडात कृष्णासारखं विश्वरूप दिस्तं का हे पाहायला मिकन त्याच्या तोंडावर वाकवाकून पाहात होता आणि तेवढ्यात बाबाला जाग आली होती. बाबाची असली भीतीने बोबडी वळली होती की बस रे बस! आईची सॉलिड बोलणी खाल्ली होती मिकनने.

किती झोपतो हा? मिकनने मान हलवत च्यक् केलं. मिकनने बाबाच्या शर्टची बाही ओढून पाहिली, पण बाबा ढिम्म हलला नाही. मिकनने सीटच्या बाजूला असलेली हॅंडल धरली आणि धडपडत सीटवर उभा राहिला. बस खूप हलत होती आणि मिकन् सीटवर उभ्या उभ्या हेलकावे खात होता. मिकनला एकदम सिंदबाद असल्यासारखं वाटलं. प्रत्येक बेटावर सिंदबादला खजिन्यासोबत ताजी फळं आणि गोड पाणी मिळायचं तेव्हा मिकनला त्याचंच पोट भरल्यासारखं वाटायचं. मिकन् आता सिंदबादसारखा डोलणाऱ्या लाटांवर सफर करत बेटाच्या दिशेने चालला होता. आईने मध्येच मान वळवून डोलकाठीसारख्या डोलणाऱ्या मिकनकडे एकवार पाहिलं आणि बॅगेतून एक सफरचंद काढून मिकनसमोर धरलं.

"घ्या सिंदबादराव, ताजी फळं खा आणि या बाटलीतलं गोड पाणी प्या."

एकदम खुषीत सफरचंद खाताना मिकनला वाटलं की, आईला सगळ्ळंच्या सगळं कसं कळतं?

--

मिकनला जाग आली.

त्याला कशानेतरी जाग आली होती खरी पण कशाने ते काही कळेना. त्याच्या डोक्यावर कौलांचं छप्पर होतं आणि त्यात एक काच बसवली होती. त्या काचेतून येणारं लख्ख ऊन मिकनच्या तोंडावर आलं होतं आणि त्यानेच मिकनला जाग आली होती.

कौलात काच का बसवली?
झोपून उठल्यानंतर मिकनच्या डोक्यात आलेला पहिला विचार.
आणि आपण कुठे आहोत? हा दुसरा.

मग त्याला सगळं आठवलं. तो गावी होता. कालच तो, आई, बाबा आणि मामा गावाला येऊन पोहोचले होते.

मिकन् आईला शोधत बाहेर आला तेव्हा आई चटईवर आजीशी बोलत बसली होती. मिकन् तिच्या मांडीवर जाऊन बसला पण तिला मिकन् तिथे असल्याचं कळलं असं काही मिकनला वाटलं नाही. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं पण ती गप्पांमध्ये गुंगली होती. मिकन् तिच्या मांडीवरून उठला आणि हळूहळू चालत बाहेर आला. बाहेर बाबा आणि मामा खुर्च्या टाकून चहा पीत बसले होते.

"ह्हे मिकन्, माय बॉय!"

त्याच्या मामाने गडगडाट करत त्याला हाक दिली.

"एक मिनीट थांब, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी."

काय? गिफ्ट? खेळणी? पुस्तकं? काय असेल. मिकनची दु:खी चर्या पालटली आणि दु:खाची जागा उत्सुकतेने घेतली.

मामाने त्याच्यासमोर छान छान कागदांमध्ये गुंडाळलेल्या वस्तूंचा ढीग आणून ओतला. पुस्तकं, लेगो, बॅटरीवर चालणारं, सात गिरक्या घेऊन खाली उतरणारं हेलिकॉप्टर, रिमोटवर पुढे-मागे होणारी मोटार. मिकन एकदम हरखला. त्याला त्याचा मामा एकदम जास्तच आवडायला लागला.

मग मामा एकदम लाडात येऊन म्हणाला,

"मिकन्, एक सांग, तुला सर्वात जास्त कोण आवडतं? आई, बाबा, आजी की मी?"

मिकन् खेळण्यांचं निरीक्षण करण्यात गढला होता. त्याने मान वर न करताच उत्तर दिलं.

"आई"

"ओके, फेअर इनफ. मग मला सांग, सर्वात जास्त कोण आवडतं? बाबा, आजी की मी?"

मिकनकडून प्रतिक्षिप्त क्रियेसारखं उत्तर आलं.

"आई"

"अरे? पण, मी तुला आईबद्दल नाही विचारलं मिकन्. बाबा, आजी की मी?"

"आई"

मग बाबाच म्हणाला,

"कशाला रक्त आटवतो आहेस मीना? १०० टक्के आई पार्टी आहे ती. काहीही करा, ती नाही बदलायची. आता बघ हां, मी विचारतो.  मिक्या, तुला कोण आवडतं, मी की आई??"

"आई"

"पाहिलंस???"

"ह्होss कळलं."

---


"मिकन् बाहेर ये. बघ, तुला कोण भेटायला आलंय."

मिकनला आईची हाक ऐकू आली, पण, मामाने दिलेलं छान गुळगुळीत पानांचं पुस्तक हातातून सोडवत नव्हतं.

एरव्ही घरात तो, आई आणि बाबाच असण्याची सवय असलेल्या मिकनला इतक्या साऱ्या माणसांमध्ये बुजल्यासारखं होत होतं. इथे सगळंच वेगळं होतं. आजी बाबाला काहीतरी बापू म्हणून हाक मारत होती, आईला सगळे राणी म्हणत होते. मिकनला मिक्या, मिकू अशी कायकाय नावाने हाका मारल्या जात होत्या, सारखे सारखे गालगुच्चे घेतले जात होते, मामाचा त्याला कधीही पकडून "तुला कोण आवडतं?" विचारण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याला बाहेर जायचा कंटाळा आला, पण त्याने कान टवकारले.

त्याच्या कानावर आईचा आवाज येत होता.

"श्रीधर, अरे किती मोठी झाली ही! मिकनपेक्षा एक वर्ष मोठी, नाही का?"

मग मात्र मिकनचं कुतूहल त्याला एका जागेवर बसू देईना. तो हातात पुस्तक घेऊनच बाहेर आला तेव्हा आई म्हणाली.

"मिकन्, ही कुसुम."

कुसुम?? मिकनला एकदम हसूच फुटलं. कुसुमसारखा एकच शब्द त्याला आठवला तो म्हणजे ढिश्शूम.

त्याच्या समोर एक फ्रॉक घाललेली, कुरळ्या केसांची मुलगी उभी होती. तिचे केस इतके कुरळे होते, इतके कुरळे होते की तिच्या डोक्यावर स्प्रिंगांचं जंगल माजल्यासारखं दिसत होतं. तिचे डोळे बाहुल्यांचे डोळे कसे मोठेमोठे असतात तसे बटाट्यासारखे, कायमस्वरूपी विस्फारल्यासारखे दिसत होते. तिच्या हातापायाला माती होती आणि तिने पाठी लपवलेल्या मुठींमध्ये काहीतरी लपवलं होतं. इतका सारा वेळ ती तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांनी मिकनकडे टकटका पाहात होती.

"कुसुम, अगं जा, दे त्याला तू काय आणलयंस ते."

ती कुसुम नामक मुलगी मुठी पुढे करून मिकनजवळ आली आणि मिकनच्या हातांची आपसूक ओंजळ झाली.

कुसुमने त्याच्या ओंजळीत टकटकीत हिरव्या रंगाची गोलगोल फळं ओतली.

"आवळे म्हणतात त्याला मिकन्. बघ एक खाऊन."

राणीचं आवडतं फळ हो! - इति आजी.

मिकन् जरा संशयानेच त्या फळाकडे पाहात होता, त्याचा वास घेऊन पाहात होता. पण आईला आवडतं म्हटल्यानंतर त्याचा संशय फिटला आणि त्याने पुटकन एक गरगरीत आवळा तोंडात टाकला.

पहिल्यांदा त्याला काहीच चव जाणवली नाही पण काही सेकंदांतच झण्णsss करून ती आंबट-तुरट चव त्याच्या जिभेवर पसरली आणि कपाळ आक्रसून, मुठी वळून तोंड आंबट करून कचकच आवळा खाणाऱ्या मिकनकडे पाहून कुसुमसकट सगळेच हसले.


--


आवळे, आवळे, आवळेsssss

ती आवळ्याची चव काही मिकनची पाठ सोडेना. कुसुमने दिलेले सगळे आवळे मटकमटक करत संपवूनही त्याचं समाधान झालं नव्हतं. बाहेर कुसुम असेल तर तिच्याकडेच आणखी मागू म्हणून तो बाहेर ओसरीवर आला आणि त्याला घराच्या गेटजवळच पोपटी, हिरव्या-पिवळ्या फळांचा खच पडलेला दिसला. त्याच्या जीभेला पाणी सुटलं.

"काय मिकन्, काय हवंय?"

"मामा, तो आवळा आहे ना?"

"हो. ताईचा मुलगा शोभतोस खरा. जेवणासारखी आवळे खाते ती. जा, उचलून आण ते."

मिकन् आनंदातच पुढे सरसावला पण, मध्येच कच्चकन ब्रेक लागल्यासारखा थांबला. अंगणातली जमीन ओली होती आणि तिच्यातून वेगळाच वास येत होता.

मिकनने जरा संशयानेच पाण्यात पाय बुडवून पाहावा तसा त्या जमिनीवर अलगद पाय टेकून पाहीला तर त्याच्या पायाला काहीतरी ओलं ओलं लागलं. मिकनला एकदम कसंसच झालं. तो ओसरीतल्या खांबाला टेकून बसला आणि हाताने पाय नाकाजवळ आणून त्याचा वास घेतला.

"मिकन, तुला माहितीये ते काये ते?"

नाक आक्रसून ओठ काढून आधीच रडायच्या तयारीत असलेल्या मिकनने त्याच्याकडे पाहिलं.

"शेण आहे ते. गाईची पॉट्टी."

मामा सिंदबादच्या गोष्टीतल्या राक्षसासारखा गडागडा हसला आणि मिकनने हात-पाय झाडत जोरात भोकाड पसरलं.


--


मिकनला शांत करायला आईला बराच वेळ लागला.

मिकनचं मुसमुसणं अखेरीस थांबलं तेव्हा आई त्याला कडेवर घेऊन बाहेर ओसरीवर आली. बाहेरची जमीन पाहून मिकनला पुन्हा एकदा रडण्याचा उमाळा आला.

"मिकन्, श्शू, उगीच रडायचं नाही. काये त्यात रडण्यासारखं?"

"ऊंss"

"हे बघ, आपण दोघे चालून पाहूयात त्या जमिनीवरून, चालेल?"

मिकनने नाही, नाही करत जोरजोरात मान हलवली.

"बरं मग मी चालते, तू नुसता बघ, मग तर झालं."

मिकन् काहीच बोलला नाही.

आईने अंगणातल्या जमिनीवर पाऊल टाकलं आणि मिकनने शहारत झडझडून अंग हलवलं.

"इथे बघ मिकन्, किती थंड आहे ही जमीन. किती छान वाटतंय बघ."

मिकन् मख्ख.

"मी तुला उचलून घेते, तू वरून बघ जमीन, चालेल?"

मिकनची मुद्रा जरा संशयाचीच राहिली, पण आई सांगतेय तर करून पाहू हाही विचार होता.

आईने मिकनला उचलून घेतलं आणि ती अंगणात फेऱ्या घालायला लागली.

"ताई, काय करतेस अगं? दे ठेवून त्याला खाली. सवय नाहिये त्याला म्हणून घाबरतोय तो इतकंच."

आईने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि मामा गप्प बसला.

थोडा वेळ फेऱ्या मारल्यानंतर मिकन आईच्या खांद्यावर सुस्तावला. त्याचे डोळे गपागप मिटायला लागले. आई मिकनला म्हणाली,

"मिकन्, उतरतोस का? पाठ दुखली."

मिकन् खाली उतरेपर्यंत तो ती शेणाची जमीन विसरलाही होता, पण, त्याच्या पायाला काही सेकंदच त्या रवाळ जमिनीचा स्पर्श झाला आणि मिकनने पाय झटकन वर उचलून घेतले.

तेवढ्यात ओसरीवर आलेल्या बाबाला पाय वर करून आईच्या हाताला लोंबकळणारा मिकन् दिसला आणि बाबाने कपाळावर हात मारून घेतला.


--


आवळे, आ व ळे, आवळेss.

मिकनला दुसरं काही सुचतच नव्हतं. त्याला त्याच्या डोळ्यांसमोर आवळ्यांनी लगडलेलं झाड दिसत होतं, पण तिथवर जायचं म्हणजे ते शेणाचं अंगण ओलांडायला लागणार होतं. त्याला चप्पल घालून जाता आलं असतं पण आईने त्याला स्पष्टच सांगीतलं होतं.

मिकन्, नाही त्या गोष्टींची भीती वाटून चालणार नाही. चप्पल पण तूच आणायचीस आणि आवळे हवे तर तेही तूच आणायचेस, समजलं?

मिकन् एकदम हिरसुमला आणि बाहेर अंगणात येऊन एकटाच बसला. कोणी त्याची समजूत काढायला आलं नाही तेव्हा तर त्याला एकदमच वाईट वाटलं.

तितक्यात त्याला जाणवलं की ओसरीवर तो एकटाच नाही. त्याच्या शेजारीच खांबाच्या पलीकडे कोणीतरी बसलं होतं. त्याने डोळे बारीक करून पाहिलं तर ती कुसुम होती. अंधारातही दिसणाऱ्या तिच्या केसांच्या जंगलावरून मिकनला ते कळलं.

कुसुम त्याच्या शेजारी येऊन बसली आणि तिने मिकनच्या हातात एक बाटली दिली.

मिकनने बाटली डोळ्यांच्या जवळ नेऊन पाहिली, उलटी-पालटी करून पाहिली, कानाजवळ नेऊन हलवून पाहिली, पण त्यात काही नव्हतं. तो कंटाळून बाटली कुसुमकडे परत देणार इतक्यात त्याला ते दिसलं.

त्या बाटलीत एक प्रकाशाचा बिंदू दिसायला लागला होता.

मिकनने बाटली पुन्हा निरखून पाहिली आणि एक, दोन, तीन, चार असं करत वीसेक प्रकाशाचे बिंदू त्यात दिसायला लागले.

मिकन् एकदम हरखला.

काजवे. कुसुम म्हणाली.

काजवे.. मिकन् स्वत:शीच म्हणाला.

इतक्यात मिकनची नजर वर गेली आणि त्याचं तोंड उघडं ते उघडंच राहिलं.

त्याच्या समोर ते प्रकाशाचे अनेक बिंदू हवेत तरंगत होते, कुठेकुठे एकाच जागी असल्यासारखे वाटत होते. अंगणातल्या झाडांवर, मामाच्या गाडीवर, पाळण्यावर सगळीकडे ते टिमटिमत होते. मिकनने खाली पाहिलं तर तो काजवा नामक प्रकाशाचा बिंदू त्याच्या पायावरही होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मिकनला त्याची अजिबात भीती वाटली नाही.

कुसुमने ती बाटली उघडून मिकनच्या हातात दिली आणि त्याला हात धरून उभं केलं. काय करायचं हे मिकनला सांगायची गरज भासली नाही. तो आणि कुसुम हात धरून काजव्यांना बाटलीत आणत राहिले आणि बाटलीतला प्रकाश वाढत गेला. सरतेशेवटी त्या बाटलीत इतके काजवे झाले की ती बाटलीच एका भल्यामोठ्या टॉर्चसारखी झगमगायला लागली. काजवे गोळा करायच्या नादात कधीतरी कुसुमचा हात सुटला होता, पण मिकनला त्याचं भान नव्हतं. त्या बाटलीच्या आकाराच्या प्रकाशाकडे मन भरेस्तोवर पाहिल्यानंतर केव्हातरी मिकनला थंडी वाजायला लागली तेव्हा त्याला कुसुम त्याच्या शेजारी नाही याचं भान आलं आणि आपण कुठे आहेत याचंही.

तो अंगणाच्या मधोमध उभा होता.

पण, हातात ती काजव्यांची बॅटरी घेऊन उभा असताला त्याला का कोणास ठाऊक, त्या जमिनीचं विशेष काही वाटलं नाही. त्याने पायाचे तळवे चाळवले आणि जमिनीची ऊब त्याच्या तळव्यात शिरली. त्याला एकदम पायपर असल्यासारखं वाटलं. पाण्याला प्रचंड घाबरणारं ते सॅंडपायपर पक्ष्याचं पिल्लू आपल्या भीतीवर कसं मात करतं हे आईने मिकनला कितीतरा वेळा दाखवलं होतं. आईची आठवण येऊन त्याला एकदम छान, मऊमऊ वाटलं. खाली पाहात ती ऊबदार, रवाळ जमीन पायाने अनुभवत तो किती वेळ उभा होता कोण जाणे! अचानक त्याच्या खांद्यावर टकटक झाली.

हातात त्याच्या चपला घेऊन कुसुम उभी होती.

मिकनने एकवार कुसुमकडे पाहिलं, एकवार त्या चपलांकडे पाहिलं आणि मान हलवली.

आणि मग तो एकदम हसला.

त्याला हसताना पाहून कुसुमही हसली.

तिने मिकनच्या चपला खाली ठेवल्या, पुन्हा एकदा मिकनचा हात धरला आणि तो दोघे पुम्हा एकदा अंगणात काजवे गोळा करण्यात गढले.

किलकिल्या दारातून हे सर्व पाहणाऱ्या आईने गालातल्या गालात हसत दार उघडलं आणि मिकनला जेवणासाठी हाक मारली.

--

दुसऱ्या दिवशी सकाळी मिकनने आईसाठी आपली छोटी ओंजळ भरून आवळे आणले, तेव्हा आई मिकनसमोर पाण्याची बाटली धरून म्हणाली,

"चला पायपरराव, ताजी फळं खा आणि या बाटलीतलं गोड पाणी प्या."

डोळे मिचकत, नाक आक्रसत ती रसाळ फळं खाताला मिकनला न राहवून वाटलं की,

आईला सगळ्ळंच्या सगळं कसं कळतं?


--


याआधीचे: मिकन् | मिकन् आणि गुऱ्या
 
Designed by Lena