मिकन् आणि मिकनचा पाऊस

मिकनला तो पुढे पारदर्शक प्लॅस्टिकचा व्हायझर असलेला पिवळा रेनकोट खूप आवडायचा.

तो त्याला खूप मोठा व्हायचा, पण मिकनला त्यात घुसून गुरगुटी मारुन बसायला आवडायचं. तो रेनकोटही इतका मोठा होता की मिकन् टोपीच्या आतून त्यात घुसला की तो रेनकोट पिवळं पोतं उभं केल्यासारखा उभ्याचा उभाच राहायचा. त्यात खुडूक करून बसलं की प्लॅस्टिकच्या ओल्यादमट उबदार वासाने मिकनला झोप यायला लागायची. कानावर हात गच्च दाबले की आजूबाजूचे आवाज कसे दबून जातात, तसा बाहेरच्या पावसाचा आवाज  त्या रेनकोटमध्ये गाळून यायचा. बाहेर आईच्या आवाजासारखा किनरा वाटणारा पाऊस रेनकोटच्या आत मात्र बाबाच्या आवाजासारखा व्हायचा. तसं पाहिलं तर पिंपात बसून मोठ्यांदा ओरडलं की मिकनचा आवाज देखील बाबासारखा भासे आणि त्याला ऐट असल्यासारखी वाटे; पण आईने पिंपात उतरायची बंदी घातली आणि पिंपात उतरण्यासाठी लागणारं स्टूलही माळ्यावर नेऊन ठेवलं, तेव्हापासून मिकन् आणि रेनकोट यांचं सख्य जरा जास्तच वाढलं.

-

मिकन् सकाळपासूनच रेनकोट घालून बसला होता.
सकाळपासून किती तो पाऊस पडतोय. बदाबदा कोसळतोय नुसता.
हा थकून कसा जात नाही? आपण कितीही रडायचं ठरवलं तरी दहा मिनिटांनंतर डोळ्यातलं पाणी संपतं, आणि बाबा फिस्सकन हसतो. मग हा तासनतास कसा पाणी गाळत असेल? नाकाच्याही पुढे येणारा व्हायझर सावरत मिकन् दारात खुरमांडी घालून बसला होता आणि विचारमग्न चेहऱ्याने आभाळाकडे पाहात होता. आणि त्याच्यापाठी खुर्चीत बसलेली आई त्याच्याकडे टक लावून पाहात होती.

छपरावरून पडणारी पानगळ त्याला मोत्यांच्या सरीसारखी वाटत होती. त्यातल्या प्रत्येक मोत्याच्या आत एक वेगळं जग होतं, गोटीच्या आत असतं तसं.
पावसाचे थेंब हातावर घेतले की सगळंकाही छान छान बरं होतं, हाताची खाज पुरळ जाते असं आईने त्याला सांगीतलेलं.

मिकन् उठला आणि स्वैपाकघरात गेला.
तो काय करतोय हे आई डोळे बारीक करून बघत होती.
तर मिकन् त्याच्यापुढे घमेलं भासावं इतकं मोठं पातेलं घेऊन दीड पायावर तोल सांभाळत येताना दिसला. गुडघे वाकवून पोट आत ओढून एकेक पाऊल टाकत येणाऱ्या मिकनला पाहून बाबाही दारातच थबकला. आईने ओठावर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याची खूण केली.

मिकन् ते जड पातेलं उचलून दाराच्या बाहेर पडला, अंगणाच्या पायऱ्या उतरून खाली उतरला आणि त्याने ते पातेलं छपरारून पडणाऱ्या पानगळीच्या धारेखाली ठेवलं.

पावसाचा जोर एव्हाना कमी झालेला, त्यामुळे पानगळही थेंब थेंबच होती, पण मिकन् ते भरण्याची वाट पाहात तिथेच उभा राहिला.
तो काय करतोय हे पाहायला आई आणि बाबाही दारात येऊन उभे राहिले.
किती वेळ गेला काय माहीत, पण मिकन् त्या पातेल्याकडे एकटक पाहात उभा होता आणि आई बाबा त्याच्याकडे एकटक पाहात उभे होते.

मिकनच्या गोबऱ्या चेहऱ्यामुळे त्या रेनकोटच्या टोपीची बकलं काय त्याच्या कानावरून हनुवटीच्या खाली यायला तयार नव्हती, त्यामुळे झालं काय की, टोपीवर साठलेले पावसाचे एक दोन थेंब मिकनच्या गळ्यावरून शर्टाच्या आत गेले आणि मिकनने शहारत कान खांद्याला खसखसून पुसले. ते करण्याच्या नादात व्हायझरवरून एक चुकार थेंब मिकनच्या नाकावर उतरला आणि मिकनने नाक आक्रसलं. ही सगळी सर्कस चालू असेपर्यंत ते पातेलं अर्धं पण भरलं नव्हतं.
आईचे पण पाय दुखायला लागून ती दीड पायांवर उभी होती. बाबा तर केव्हाचाच आत गेला होता.

शेवटी एकदाचं ते पातेलं भरलं.

मिकनने ते आधीच जड असलेलं आणि पाण्यामुळे आणखी जड झालेलं पातेलं उचललं आणि हळूहळू चालत अंगणातल्या एका झाडाच्या दिशेने निघाला.
हा पावसात कुठे चाललाय हे पाहायला आई काळजीने अंगणाच्या पायऱ्या उतरुन खाली आली.

अंगणात एक जंगली बदामाचं झाड होतं. मिकनच्या जन्मापासून उभं असलेले, वर्षानुवर्षं राजवर्खी, सोनवर्खी पानांचा सडा घालून अंगण सजवणारं ते झाड कोणीतरी कुऱ्हाडीचे घाव घालून तोडण्याचा प्रयत्न केल्यापासून वठून गेलं होतं. त्याच्यावरचे सगळे बदाम गळून पडले होते. हिरवं-पिवळं तेज मिरवणारं खोड आता काळंठिक्कर पडलं होतं.
मिकन् हातातलं पातेलं सावरत झाडाजवळ पोहोचला आणि अंगातली सारी ताकद एकवटून ते पातेलं त्याने झाडावर पडलेल्या कुऱ्हाडीच्या घावांवर उपडं केलं.
मग पातेलं खाली ठेवन मिकनने झाडाच्या खोडाभोवती हात वेढले आणि खोडावर त्याचे गाल घासत बारक्या थरथरत्या आवाजात म्हणला, "लवकर बरा हो"

आई येऊन मिकनच्या मागेच उभी होती. तिने एक आवंढा गिळला आणि चेहऱ्यावरचे पावसाचे थेंब पुसून ती म्हणाली,
"मिकन्, चला घरी जाऊ या?"
त्यावर मिकनने व्हायझर उचलून मान वर करून आईकडे पाहिलं आणि मान डोलावली. झाडाच्या खोडावर शेवटचं थपथपवून त्याने आईचा हात धरला.

ही दोघं नेमकं करतायेत तरी काय हे पाहायला दारात आलेल्या बाबाने पावसात भिजत येणाऱ्या आईला पाहिलं आणि काळजीने विचारलं,
"अगं छत्री नाही का न्यायची?"
त्यावर आईने मिकनकडे पाहिलं आणि म्हटलं,
"मग मी बरी कशी होणार, नाही का?"
मिकनने ते पटून जोरजोरात मान हरवली आणि बाबा काही न समजून नुस्ता पाहातच राहिला.
आईने दुसऱ्या हाताने बाबाचा हात धरला आणि हळूवार आवाजात म्हणाली, "थॅंक यू!" आणि मिकनचा हात बाबाकडे देऊन आत निघून गेली.

मिकन आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहातच पाहिले. मध्येच थॅंक यू?
तेव्हा पाठी आईचं आवडतं गाणं वाजत होतं.

टेल मी समथिंग गर्ल,
आर यू हॅप्पी इन दिस मॉडर्न वर्ल्ड?
ऑर यू नीड मोअर
इझ देअर समथिंग एल्स यू आर सर्चिंग फॉर?

आई अशीच थोडी वेडी आहे.
त्या पिवळ्या रेनकोटसारखी.

--

No comments:

 
Designed by Lena