मोनाकॉप्सिस

'V for Vendetta' ची क्रेडिट्स रोल व्हायला लागतात. सव्वादोन तास पडद्यावर चाललेलं नाट्य संपलं तरी आपण काहीही करायच्या, ऐकायच्या, विचार करायच्या मन:स्थितीत नसतो. काही वेळ सुन्न बसलेलो असतो आणि.. ते आक्रित घडतं. वाचोस्कींचं प्रोडक्शन आणि स्क्रीनप्ले असलेल्या, नॅटली पोर्टमन आणि ह्युगो व्हिव्हींग अशी स्टारकास्ट असलेल्या 'V for Vendetta' च्या क्रेडिट्समध्ये 02:06:55 नंतर 'परदेसी परदेसी जाना नही' आणि 'चुरा के दिल मेरा' ची मेडली लागते.

त्यानंतर तीन गोष्टी होतात.
पहिले होते ती आपली ऐकण्यात काहीतरी गल्लत होतेय ही भावना आणि त्यानंतर आपण ऐकतोय ते खरंच आपल्याला ऐकायला येतंय हे वाटून प्रचंड घाबरून जाणं ही दुसरी भावना. मळमळीची भावना होते तशी. वाचोस्कींच्या चित्रपटात अनू मलिक, नदीम-श्रवणची गाणी ऐकायला येण्याइतपत ऑडिटरी हॅल्युसिनेशन्सपर्यंत येऊन पोहोचलोच आपण असे वाटेपर्यंत 'नाही नाही ते खरंच तसं आहे' हे कळून हुश्श देखील वाटतं.

वाचोस्कींना हे करून काय साध्य करायचं आहे/होतं हे पहिल्यांदा खरंच कळत नाही. कदाचित इतक्या अड्रेनलिन रश देणाऱ्या चित्रपटानंतर मूड हलका करायचा असेल किंवा काहीही असो, पण ही गाणी अतिशय आउट ऑफ प्लेस वाटतात.
पण यानंतर पडणारा अपरिहार्य प्रश्न.. का? असंच का? याच प्रकारे का? त्यांना बिहाइण्ड द सीन्सदेखील दाखवता आले असते.
विचार केल्यानंतर वाटतं की, हे कदाचित जनसामान्यांच्या मनात काय चाल्लंय हे दाखवण्यासाठी असावं. 


ग्लोरीया स्टायनेम, माल्कम एक्स आणि दस्तुरखुद्द व्ही अशा प्रभृतींच्या क्रांतिकारी उद्घोषांमध्ये गोरीया चली, मुझे छोडके या ओळी कोंबल्या आहेत.
एकावर एक रेकॉर्ड झालेल्या, ओव्हरलॅप्ड आठवणींसारखा वाटतो हा प्रकार.

असं म्हणतात की, तुम्ही कोण आहात हे तुमच्या प्लेलिस्टवरून कळतं. कोणीतरी असंही म्हणालं होतं की, एखाद्या देशातील तरुणाई कोणती गाणी गुणगुणते हे मला सांगा आणि मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. गाणी/संगीत तुमच्या आठवणींमध्ये बुकमार्कसारखं काम करतं. तुम्हाला काय म्हणायचंय, समोरच्यापर्यंत काय पोहोचवायचंय हे संगीतातून पोहोचवता येतं. नाहीतर 'व्ही'नं चायकॉफस्कीचं 'नॅशनल अॅंदम' नावाचं ओव्हर्चर का वाजवलं असतं? अॅंडी डुफ्रीनने शॉशॅंकमध्ये मोझार्ट का वाजवला असता? उगीच?

या दोन गाण्यांबद्दलच (गोरीया, परदेसी) म्हणायचं झालं तर ही गाणी त्यांच्या त्यांच्या काळात जनता गाणी म्हणून प्रसिद्ध होती. ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, ट्रकमध्ये सगळीकडे तीच वाजायची. तीच ती गाणी ऐकून कधीकधी वाटायचं की आपल्या समोरचा प्रत्येक माणूस, बाजूने जाणाऱ्या ट्रेममधला प्रत्येक प्रवासी, अवघी मुंबई तीच गाणी ऐकतेय. आणि मला वाटतं इथंही त्यांचं प्रयोजन त्याचसाठी आहे. त्या चित्रपटात हाउस ऑफ पार्लामेंटच्या रस्त्यावर जमलेल्या जमावाच्या मनातदेखील असंच काहीसं असू शकेल.

प्रत्येक क्रियेला जशी विरुद्ध जिशेने तितकीच प्रतिक्रिया असते, त्याचप्रमाणे प्रत्येक विचारामागे, प्रत्येक इच्छेपाठी उलट प्रश्न विचारणारं एक गाणं असतं. त्या परिस्थितीला आणि त्या परिस्थितीतल्या तुम्हाला उलट प्रश्न विचारणारं. तुम्ही आकंठ प्रेमात आहात...साथिया तुने क्या किया, कहॉं मै चली, दिल मेरा चुराया क्यूं एटसेट्रा. जनता काय विचार करते ते मुळात याच विषयांभोवती फिरणारं असावं, तस्मात्..

कहॉं मै चली..
मुझे छोड के..
जाना नही..
हे परत परत लूप मोडमध्ये वाजत राहातं. विखुरलेले विचार, स्वत:शीच स्वत:सोबत चाललेली प्रश्नमंजुषा असावी आणि ते सर्व काही एकाच टेपवर पुन्हा पुन्हा रेकॉर्ड केलेलं असावं तसं..

अतिशय वाह्यात सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा नाही का 'ये क्या हुआ हे गाणं' वाजतं.. मेबी तसंच. वर म्हटल्याप्रमाणे आपण ऐकतोय ते खरंच आपल्याला ऐकायला येतंय हे वाटून प्रचंड घाबरून जाणं ही दुसरी भावना झाल्यावर 'भय इथले संपत नाही' हे डोक्यात वाजायचं ते वाजलंच.
गोरीया चली म्हणे..

पण, ते इतकंही आउट ऑफ प्लेस नाही वाटत आता.

2 comments:

Nitishgr8 said...

मी आताच netflix वर जाऊन या सिनेमाचे पुन्हा एंड क्रेडिट्स बघितले,तुम्ही जे पण आता लिहिले आता सर्व पटलं

Shraddha Bhowad said...

आनंद वाटला.:)
Thanks!

 
Designed by Lena