या सा-या जखमी आयुष्याचं..

दर वर्षी 13 जुलैला मलिका अमरशेखांची ही ओळ आठवते आणि कोणीतरी अणकुचीदार सु‌ई छाताडात खुपसते आहे अशी वेदना होते. मला खूप दुःख झालं, वा‌ईट वाटलं तर कसं वाटेल याची मी ब-याचदा कल्पना करून पाहिलेली आहे, पण, प्रत्येक वेळी माझी कल्पना तोकडी पडते. काही माणसं आज आपल्यासोबत नसण्याचं दुःख मी नेहमी माझ्यासोबतच वागवत असते. कमल देसा‌ई असो, अॅन रँड असो वा मरणाच्या भीतीने आत्महत्या करणारी व्हर्जिनिया असो. आपली आवडती माणसं आपल्यापासून दूर गेली, आपल्यापासून तुटली तो काळ-वेळ-दिवस आपल्या नेहमी लक्षात असतो. लक्षात ठेवायचा नाही म्हटला तरी राहतो.

बरोब्बर साठ वर्षांपूर्वी याच दिवशीद फ्रिदाने या जगाचा दिमाखात, शांतपणे निरोप घेतला होता.

--

काही माणसं जात्याच सुंदर असतात.

ज्या लोकांनी पराभव पाहिला आहे, वेदना, भोग भो्गले आहेत, अविरत संघर्ष केला आहे, खूप काही गमावले आहे आणि त्या खोल खोल गर्तेतूनही त्या माणसांनी जगत राहण्याचा मार्ग शोधून काढला आहे ती माणसं अतिशय सुंदर असतात.

आणि फ्रिदा का‌अलो अतिशय सुंदर होती.

--

आपलं असणं, आपल्याला जे काही वाटतं त्यात छान छान काहीच नसतं. त्याने अतोनात त्रास होतो. प्रेम म्हणजे किती छान असं काहीतरी लोकांच्या मनात भरवून दिलं गेलेलं असतं. पण नाही. प्रेम छानछान मुळीच नसतं आणि काहीतरी वाटणं तर खूप अस्वस्थ करणारं असतं. पण ही अस्वस्थता, हे दुखरंपण म्हणजे काहीतरी भयंकर, घातक आहे असं लोकांना वाटतं, त्यामुळे काही लोकांना स्वतःची भीती वाटते, त्यांच्या असण्याची, त्यांच्या वास्तवाची, त्यांच्या वाटण्याची भीती वाटते.  फ्रिदाला ती कधीच वाटली नाही. उलट, हे वाटणं, असणं, तिचं ढळढळीत वास्तव हेच तिचं सर्वकाही होतं. तिने म्हटलंच आहे, "नुन्का पिन्तो सु‌एन्योज ओ पासाडीयाज, पिन्तो मि प्रोपिया रि‌अॅलिदाद!" पाब्लो पिकासो त्यांच्या पेन्टींग्जबद्दल बोलताना म्हणतो की, मला माझी पेन्टींग्ज स्वप्नात दिसतात आणि मग मी ती स्वप्नं पेन्ट करतो. फ्रिदाने तिची स्वप्नं किंवा दुःस्वप्नं कधीच पेण्ट केली नाहीत तिने कॅन्व्हासवर उतरवलं ते तिचं शुद्ध वास्तव, जसं आहे तसं तसं, त्यात काहीही फेरफार न करता. चित्रं काढणं ही तिची गरज होती, जशी लिहीणं ही माझी गरज आहे.

--

फ्रिदाबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल खूप प्रवाद आहेत. ती वादळी आयुष्य जगली. तिच्यासारखे आपलेही आपल्याशी, इतरांशी आणि एकंदर ब-दयाच गोष्टींशी जे झगडे चालू असतात त्यातून आपण तदनुभूती म्हणजे एम्पथी शिकतो. तिची पेन्टींग्ज पाहिल्यानंतर, तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यानंतर मला तिची वेदना थोडीफार का हो‌ईना कळू शकते, कोणीतरी टाकून देणं मला कळू शकतं, माझ्यावर कोणीच प्रेम न करणंही मला कळू शकतं. पण त्याहूनही मी जगत राहते. मला हे बळ फ्रिदाने दिलेलं आहे.

फ्रिदाने तिची स्वतःचीच बरीच पोर्टेट्स काढली आहेत. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, मी खूपदा एकटीच असते. आणि तिला मी अगदी चांगली ओळखते अशी व्यक्ती मीच आहे.
तिची पेन्टीग्ज ही तिची डायरी होती.

कोणी इतकं आपल्यासारखं कसं काय असू शकतं? हं?

--

मला कधीतरी असं लिहायचंय की जे वाचताना लोकं ते समोरच्या क्रीनवर, पानावर लिहीलं गेलं आहे हे विसरून ते शब्दशः जगतील. जसा एखादा संगीताचा तुकडा तुमच्या ह्रदयाला भेदून जातो, तिथे रुतून बसतो, तिथेच हुळहुळत राहतो.द फ्रिदाला तशी चित्रं काढणं जमलं. मी अद्याप जमवतेय.

--

प्रत्येकाच्या आयुष्यात न-परतीचा एक क्षण असतो. परतायचं असतं असं नाही पण येतानाच आपण सर्व दरवाजे बंद करून त्यांची किल्ली कुठेतरी अज्ञात स्थळी फेकून आलेलो असतो. असा क्षण प्रत्येक उत्कट माणसाच्या आयुष्यात येतो. आणि कधीकधी असंही होतं की आपण आहे त्याहून पुढे जा‌ऊ शकत नाही. जायचं असतं असं नाही, पण आता पुरे असं वाटतं. आपण त्या क्षणाप्रत पोहोचतो तेव्हा आपण झालं-गेलं,  घडलं-न घडलं ते सगळं शांतपणे मान्य करून टाकतो. जगत राहण्याकरिता ते गरजेचं असतं.

मी काय, फ्रिदा काय, आपल्यासारखी बरेच जण उत्कट असण्याचे हे भोग भोगत असतात आणि आम्ही ते जहरी भोग भोगण्याचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा आवंढे गिळत त्यांचे रेकॉर्ड बनवून ठेवतो. पेण्ट करतो, कविता करतो, लिहीतो. कदाचित आमच्याकडून कोणाला काही मिळू शकेल, कोणाला काहीतरी शिकता ये‌ऊ शकेल. पण, हे काही शिक्षण नव्हे. हा आमचा इतिहास असतो.

फ्रिदाच्या किंवा कोणाही उत्कट व्यक्तीच्या इतिहासातून काही शिकायचे असेल तर हे शिकता येईल-जे मी शिकले- की तुमच्या वाटण्याची, तुमच्या वास्तवाची भीती वाटू दे‌ऊ नका. तुम्हाला काही वाटण्याचीच भीती वाटली, तर तुम्ही कोणावरही, कशावरही निव्वळशंख प्रेम करू शकणार नाही. तुमच्या जगण्यावर नाही, तुमच्या स्वतःवर नाही आणि दुस-द्याद कोणावर तर नाहीच नाही. या वाटण्यातून दुखतं, पण त्यातून आपल्याला अविरत बळ मिळत जातं. वाटण्याला-असण्याला सरळ छाताडावर घे‌ऊन भिडा किंवा त्याच्यापासून भेकडासारखे लपून बसा, वेदना ही असतेच. फक्त ती आयुष्याला भिडून भोगायची की डिनायलमध्ये जगायची हा आपला चॉ‌ईस असतो. आणि ती भोगायची कशी, ती आपल्याबरोबर पुढे कशी न्यायची याचा मार्गदेखील मात्र आपला आपल्यालाच शोधून काढायचा असतो.

--

फ्रिदाने द डायरी ऑफ फ्रिदा का‌अलोमध्ये म्हटलंय, "मला वाटायचं की मी जगातलं सर्वात विचित्र माणूस आहे. पण नंतर विचार केला की, जगात इतकी सारी लोकं आहेत तर माझ्यासारखंच विचित्र असणारं, माझ्यासारखंच चुकणारं-पडणारं एकतरी माणूस असेलच. मी त्या व्यक्तीची कल्पना करून पाहते. ती व्यक्ती देखील जगातल्या कुठल्यातरी कोप-यात असेल आणि माझा विचार करत असेल. तू जर खरोखरीच या जगात कुठेतरी असलीस आणि हे वाचलंसच तर निश्चिंत हो. मी खरोखरीच आहे आणि मी पण तुझ्या‌इतकीच विचित्र आहे."

मला आजतागायत कोणत्याही ओळींनी इतकं निश्चिंत, आश्वासक वाटलेलं नाहीये... कधीच.

"अनाघ्रात असं नस्तंय काहीही
हे ठीकच आहे
पण मात्र या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय? "

हा प्रश्न मलापण पडलाय फ्रिदा.

फक्त हे तुला कळवता आलं असतं तर फार फार बरं झालं असतं. पण सगळ्या गोष्टी जमवता येत नाही, काळाचं, पिढीचं, ब-याचशा गोष्टीचं गणित चुकतं.

मग पुन्हा एक वर्ष सरेल, पुन्हा गळ्यात आवंढा दाटून ये‌ईल, तेव्हाही "या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय?" ्द हा प्रश्न कदाचित तितकाच व्हॅलिड असेल. तेव्हा तू असतीस तर कसं या विचाराने माझं कानशील दुखरं दुखरं हो‌ऊन जा‌ईल.

पण चालायचंच.

काही बोलू नये तिशी.

गेल्या वर्षी नेमक्या याच वेळी आमचं घर दिसामासाने वाढत असताना मला ते कडीपत्त्याचं झाड भेटलं.

सहज नजरेस पडावं असं नव्हतंच ते! जास्वंद, लिंबू, आणखी दोन एक्झॉटिक जास्वंदींच्या जाळ्यांमध्ये लपून गेलं होतं.
इतर झाडांच्या पानांसारखी पानं. त्याला ना शोभेचं फूल येतं, ना रसरशीत फळं धरतात.

तर, मागच्या वर्षी याच वेळी त्याची ती तारकांसारखी दिसणारी पांढरी, गंधाळलेली फुलं गुच्छागुच्छाने फुलली होती. मी माझ्या बाल्कनीतल्या सिमेंट, फळ्या, शीगा, पत्रे यांच्या पसा-यात उभी राहून समोरच्या वाडीकडे पाहात असताना माझ्या नाकपुड्यांमध्ये तो दरवळ घुसला आणि माझी मान आपसूक त्याच्याकडे वळली.  तेव्हा ते झाड मला पहिल्यांदा दिसलं. समोरच्या सोसायटीच्या आवारात उभं होतं.

घर बांधून व्हायचं असलं की त्यात एक शांत शांतता असते आणि ते बांधून झाल्यावर त्यात राहायला आलं की घरातली माणसं एकमेकांशी बोलत नसली तरी त्यात एक विचित्र गहबज असतो, असं का असतं?
पण ठिक आहे. वैचित्र्य नसणं हीच वैचित्र्याची हद्द आहे.

तर, त्यावेळी पावसाळ्यात मी नेमाने तिथे जायचे, बाल्कनीत बसायचे. ते झाडही अर्थात तिथे असायचंच. त्या सोसायटीतली लोकं रोज त्याची पानं ओरबाडून पोह्याला फोडणी टाकायला घे‌ऊन जायची. झाडावरून देठ खुडून घ्यावा आणि मग त्याची पानं वेगळी करावीत इतका वेळ त्यांच्याकडे नसावा बहुतेक. पानंच्या पानं ओरबाडून नेल्यानंतर नागडी देठं वागवणारं ते झाड मोठं केविलवाणं दिसायचं. सोसायटीतल्या लोकांना त्यांचे गुलाब, मोगरे, गेला बाजार तुळस जास्त प्रिय असल्याने पाण्याचा नैवेद्य फक्त त्यांनाच जायचा. हे जगलं काय-मेलं काय, कुणाला काय त्याचे? पानं मात्र हवीत. रास्कल्स! ते झाड कसं तगलं होतं कुणास ठा‌उक?

पण ते झाड झालं गेलं सगळं विसरून लोकांनी पुन्हा ओरबाडण्याकरिता हाताला सहज लागतील इतक्या उंचीवर नव्या फांद्या उगवायचं.

या झाडाने माणसांवर इतका विश्वास टाकू नये असं फार वाटायचं पण सांगणार कोण?

त्यानंतर काही तिथे जाणं, त्या झाडाला पाहाणं झालंच नाही.

--

त्यानंतर आम्ही थेट उन्हाळ्यात तिथे राहायला गेलो तेव्हा ते झाड पूर्ण वठून गेलं होतं. त्याच्यावर एक पान शिल्लक नव्हतं. तळपणारं ऊन बाधून रस्त्याच्या कडेला उलट्या करत असलेल्या हातगाडीवाल्याचे हात पाहिले होते मी मागे एकदा. याचंही खोड तसंच सुरकुतून, कोमेजून गेलं होतं.

खरं सांगायचं तर आश्चर्य मुळीच वाटलं नाही. ही हॅड इट कमिंग! पण जबर वा‌ईट वाटलं.

पण नीट पाहिलं तेव्हा त्या झाडाच्या फांद्यांच्या टोकाकडचा हिरवेपणा अजून शिल्लक होता असं दिसलं.

मग, सोसायटीवाले गेले भो*%‍॑ म्हणून मी माझ्या बाल्कनीतून रोज एकेक तांब्या पाणी टाकायला सुरूवात केली.

सकाळी उठलं की माझ्या बाल्कनीतल्या झाडांसोबत त्याला पाणी टाकायचा नेमच झाला. तब्बल एक महिना हा अभिषेक सुरू होता.

मग ते झाडं जगलं, हिरवंगार झालं. आता तर त्याला फुलंही आलीयेत आणि मागच्या वर्षीसारखा दरवळ मला आज आत्ताही येतोय.

आणि अगदी आताआताच मला एकच बा‌ई गेली सहा वर्षं माझे केस कापतेय, मला सबवेच्या सबमध्ये हनी-मस्टर्ड, मिंट, ओनियन, चिली अशाच क्रमाने सॉसेस लागतात आणि त्यात गल्लत झाली तर माझी प्रचंड चिडचिड होते असा साक्षात्कार झाल्याने हाच मागच्या वेळसारखाच वाटणारा दरवळ मला अजूनच आवडतोय.

गंमत फक्त इतकी झालिये की त्या झाडाला आता हाताला लागतील अशा फांद्याच नाहीत. ते झाड  आता डोक्यावर आंबाडा घातलेल्या बा‌ईसारखं दिसतं. फांद्यांचा आहे तो सगळा पसारा फक्त वरच- माझ्या बाल्कनीला लागून. ल्येको! साल्यांनो! तुम्ही गेलात गाढवाच्या *%‍॓त असं म्हणत असल्यासारखा. आता ना त्याला कोणी ओरबाडू शकत. आणि ना कोणी दुखवू शकत.

--

मी जेव्हा माझ्या मित्रमंडळींना ही गोष्ट सांगते तेव्हा त्यांना मी कडीपत्याच्या झाडाचं नाव पुढे करून माझ्या ओळखीतल्या कोणाचीतरी किंवा बहुतेक वेळा माझीच गोष्ट सांगतेय असं वाटतं.

अरे?  माणसांखेरिज इतर कोणाच्या कथा नसूच शकतात का?

बरं, मला माझीच कथा सांगायची असती तर मी त्या बिचा-या झाडाला कशाला मध्ये आणलं असतं?  मी मी आहे, झाड झाड आहे, तुम्ही तुम्ही आहात, माणसं माणसं आहेत-बरी वा‌ईट कशीही! ते सगळं आहे-ते सगळं तेच असतं-दुसरं काही नसतं आणि त्याला दुसरं काही बनवायला जा‌ऊही नये.

आपण प्रतीकांमधून आपली कथा पोहोचवू पाहात असतो, अगदी मान्य आहे! पण ती ज्याच्यापर्यंत पोहोचवायची त्याची तितकी पात्रताच नसेल तर मग काय?

दुस-यावर इतक्या अवलंबून असलेल्या गोष्टीला काय अर्थ उरतो मग?

मला इतके प्रश्न का पडतात?

टा‌ईम मशिनचा शोध लागलाच मी काय करेन माहितीये? मी  भूतकाळात जा‌ऊन माझ्या आ‌ई-बाबांचा जन्मच होणार नाही अशी पूरेपूर व्यवस्था करेन. मग मी जन्माला येण्याची, माझ्या असण्याची शक्यताच नाहिशी हो‌ईल. पण, मग (अपरिहार्यपणे) विचार केल्यावर कळतं की, मीच नसेन तर मी माझ्या भूतकाळात कशी काय जा‌ऊ शकेन?
उफ्फ!

आपण असे अनेक प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरे देखील मिळवतो. पण मग त्या उत्तरांना प्रश्न विचारल्यावर मूळ प्रश्न मिळायला हवेत की नाही? पण असं कधीच होत नाही. मिळतात ते कुठलेतरी भलतेच प्रश्न असतात. हे ही आणखी एक.

असं म्हणतात, की झाडांना स्मृती, आठवणी नसतात. आजच्यापुरता जे, ते त्यांचं. त्यामुळे त्यांना स्वतःमध्ये सहज बदल करून घेता येतात. आपल्यात किती बदल झाले आहेत, य वर्षांपूर्वी आपण कसे होतो हे तपासून पाहण्याकरता त्यांच्याकडे प्रोटोटा‌ईप नसतो. माणसाकडे मात्र असतो. त्यामुळे माणसाकरता बदल लाजिरवाणा असू शकतो. आपण कशापासून तरी पळ काढतोय असं वाटायला लावणारा, आपण पराभूत झालोय अशी भावना करून देणारा. मग बदल करावे लागलेच तर स्वतःमधला हा तो बदल असं स्वतःला बजावून सांगत, मूळच्या आपल्याला दोरीला बांधून त्या दोरीचं टोक हातात धरूनच बदल करून घेता आला तर पाहावा अशी आपली धडपड असते. बदल ही आपल्याला जगता यावं म्हणून म्हणून आपण (अति)विचारपूर्वक केलेली निवड असते.

झाडांना स्मृती नसतात, अँडीच्या म्हणण्याप्रमाणे पॅसिफीकलाही आठवणी नाहीत, म्हणून तो असा नितळ, गूढ, आठवणशून्य पहुडलेला आहे.

माझ्या आवडत्या सर्व गोष्टींना स्मृती नाहीत असं कसं?
की त्यांना स्मृती नाहीत म्हणून त्या माझ्या आवडत्या आहेत?

झाडांना त्याचे लचके तोडले गेल्याच्या स्मृती नसतील कदाचित, पण मला आहेत.  पण, माझ्यातला एक लचका तोडला तरी मी संपत नाही. पण असे लचके वारंवार तुटत गेले तर एके दिवशी मी नाहीशी हो‌ईन. त्यामुळे त्या एका लचक्याला महत्व द्यावं की न द्यावं? तो एक लचका मी आणि न-मी यांच्यात फरक करू शकेल काय?

आपल्यामधल्या प्रत्येकाचंच काही ना काही तरी, कधी ना कधी तरी हरवत असतं, आपल्या स्वप्नांची धूळधाण होत असते, शक्यतांचा चक्काचूर होत असतो. आतून तुटत-खचत जाताना आपलं एककाळचं वाटणंही आपण हरवून बसतो, आणि ते आपल्याला पुन्हा कधीही परत मिळणार नसतं. हे जगण्याचा भाग आहे असं मला कोणी सांगतं तेव्हा मला ’शिप ऑफ थिसस’चा पॅराडॉक्स आठवतो.

आपण वर्षानुवर्षे वापरत असलेलं घड्याळ हरवलं/दुरूस्तीच्याही पलीकडे गेलं आणि आपल्याकडे नवं घड्याळ घ्यायला पैसे नसले की आपण आपल्याही नकळत रोज विवक्षित वेळी हात उचलून मनगटाकडे पाहात असतो, तिथल्या पांढ-या पडलेल्या पट्याला कुरवाळत असतो. तो पांढरा पट्टा आज ना उद्या निघून जाईल.
त्या झाडावरच्या सुकून, गळून पडलेल्या फांद्यांचे व्रण, कुरूप, काळ्या रेषा काही दिवसांनी इतर व्रणांत लपून जातील.
कदाचित काही काळाने त्या झाडाला पुन्हा हाताला लागतील अशा फांद्या येतील.
असं घडेल? कुणास ठा‌ऊक, घडेलही.

असू घडू शकतं हे मला समजतंय पण मला ते समजून घ्यायचं नाहीये. हे समजून घेतलं तर मी झालं-गेलं सगळं माफ करून टाकेन जे मला करायचं नाही. माफच करून टाकायचं तर जे घडलं त्याला अर्थ काय उरतो? त्याने कन्झ्युम व्हायचं नाही पण ते विसरायचंही नाही. मेबी, तेच बरोबर असेल. त्याने जीवाला जास्त शांतता लाभेल.

फक्त त्या झाडासारखं शांतपणे, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता "फक यू" म्हणता आलं पाहिजे.

प्रयत्न करतेय. जमेल.

 
Designed by Lena