झाडाझडती.

माझं तीस वर्षांचं आयुष्य दोन बॅगांमध्ये कोंबून बंगलोरला आले त्याला आता अडीच वर्षं होतील.

मी तीस वर्षांत एव्हढं काय काय जमा केलं होतं हावऱ्यासारखं, (अर्थात पाचशे-सहाशे पुस्तकं सोडून) ते सगळं फक्त दोन बॅगांमध्ये बसलं तेव्हा किती नवल वाटलेलं. मला आणि "कुठे घेऊन जाणारेस एव्हढं सर्व" असं म्हणून सदैव कटकटणाऱ्या आईलाही.

आपण किती सहजपणे बॅगा उचलून चालू पडलेलो आणि बिनदिक्कत या नवीन, सर्वस्वी परक्या शहरात येऊन स्थिरावलो याचं खूप कौतुक वाटतं.

आज मागे वळून पाहते आणि तेव्हाची मी-आत्ताची मी असं तुलनात्मक विश्लेषण करते, तेव्हा त्या निर्णयाचा यत्किंचीतही पश्चाताप वाटत नाही. दोन-अडीच वर्षं म्हणता म्हणता टिन फॅक्टरी, के आर पुरमच्या ट्रॅफिकच्या ग्लानीत, गोतिल्ला, इल्ला, हौदा, इष्ट, स्वल्प, बरथायदिनीच्या पारायणांमध्येच गेली. मग एके दिवशी आपल्याला (ज्यात बस, रिक्षा किंवा उबरचा प्रवास नसेल असं) काहीतरी करायला हवंय असा साक्षात्कार झाला. लग्न, पोरंबाळं यांच्या फंदात कधी पडायचं झालंच, तर एक झाड आणि एक पाळीव प्राणी जगवून दाखवायचा हा पण देखील आठवला आणि मी एके दुपारी नर्सरीकडे मोर्चा वळवला.

मी यापूर्वी झाडं वाढवलियेत, नाही असं नाही, पण ते घरी असताना. तिथे सगळा को-पॅरेंटिंगचा प्रकार होता. मी घरी नसले तर आई किंवा पप्पा पाणी घालून जातील, भाऊ किंवा बहिण नजर टाकून जाईल असा सीन असल्याने त्या रोपांची काळजी करण्याची, त्यांचं निगुतीने करत बसण्याची, त्यांच्या बरं असण्या-नसण्याने घाबरुन जाण्याची वेळ कधी आलीच नाही.

पण इथे मात्र मी सिंगल पेरेंट असणार होते.
आता गंमत अशी आहे की, नर्सरीमध्ये एकदम फ्रेश दिसणारी झाडं आपण आपल्या बाल्कनीत आणून ठेवली की माना टाकतात. नर्सरीत छान तासेक घालवून छान तरुण रोपं आणावीत आणि ती आठवड्याच जख्ख म्हातारी असावीत अशी दिसायला लागावीत हे कित्येक महिने चाललं. हा प्रकार मला आजतागायत कळलेला नाही, का? ते देखील नीटसं कळलेलं नाही. पण नर्सरीतून आणलेलं एक झेंडू, एक जुई आणि एका ओव्याच्या रोपाचा दफनविधी केल्यानंतर मी शहाणी झाले आणि मी बिया पेरायला सुरुवात केली. आता तिथेही काहीतरी झकडम लफडं आहेच. बियांमध्ये सकस बिया आणि पंडु बिया अशी प्रकरणं असतात, माणसांसारखीच. सगळ्याच अंकुरतात असं नाही. अंकुरल्याच तरी त्यांच्यामध्ये तुफान स्पर्धा चालते. मी एकाच वेळी पेरलेल्या एकाच गुलबक्षीच्या झाडाच्या सहा बियांपैकी फक्त दोन रोपं ताडमाड वाढलियेत. बाकीच्या बिया अंकुरल्यात खऱ्या, पण त्यांची वाढ खुरटी आहे. ती दीनवाणी होऊन या धिप्पाड झाडांच्या पायाशी तग धरून आहेत. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तंतोतंत माणसांसारखं.

'शेफ' सिनेमामध्ये कार्ल हा मॉलीसाठी पास्ता आग्लिओ इ ओलियो  बनवतो आहे असा एक प्रसंग आहे. अचानक मॉलीचा श्वास जड व्हायला लागतो आणि ती धापा टाकायला लागते. कोणाचाही असा समज व्हावा की, तिथे व्हेंटिलेशनचा काहीतरी लोच्या आहे आणि तिचा श्वास कोंडलाय. पण खरं होत हे असतं की, ती त्याच्या पास्ता बनवण्याच्या पॅशनने, त्याच्या एकंदरच चटचटीतपणाने अराउझ झालेली असते. हे त्या सीनच्या शेवटी तुम्हाला कळतं, आणि तुम्ही "हात्तीच्या मारी.. असं होतं व्हय!", असं काहीतरी वाटून घेऊन सिनेमा पुढे पाहायला लागता. झाडांच्या बाबतीतही हे असंच. त्यांना काय होतंय हे शिंचं काही कळत नाही. त्यांना होत एक असतं आणि आपल्याला काहीतरी भलतंच वाटत असतं. आपण खूप काही करतो.. इंटरनेटवर व्हिडिओ पाहतो, गोमूत्र, इप्सम सॉल्ट, इनो, कंपोस्ट नीम स्प्रे सगळं सगळं करून पाहतो. अत्यंत इमोशनल असताना त्याला शपथाही घालतो, त्यानेही काही परिणाम होत नाही हे पाहिल्यावर आसवं गाळतो, पण ते त्यातून खऱ्या अर्थाने सावरतच नाही. ते सुकत जातं, मरत जातं, आणि एके दिवशी आपण ते मरणारच आहे हे सत्य पचवतो आणि आपल्या मनाची तयारी करतो. कारण, शेवटी आपणच सगळे प्रयत्न करुन चालत नाही, त्या झाडातही तितका जीव, इच्छाशक्ती असावी लागते. ते झाडही जगायचा प्रयत्न करत असणारच, मरण कोणाला आवडतं? पण त्याचे प्रयत्नच तोकडे पडत असणार, दुसरं काय! ज्याची इच्छाशक्ती जास्त प्रखर, ज्याचं बीज अधिक निकं तेच जगणार, ज्यात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वाढण्याची ताकद आहे तेच जिवंत राहणार. किंवा दुसरा सिनारियो. नशिबावर हवाला ठेवून सगळंकाही चांगलं होईल अशी आशा करत राहायचं. मग एके दिवशी त्या झाडाच्या बुंध्याला हिरवट झाक यायला लागते, पानं फुटायला लागतात, आणि आपल्याला प्रचंड इरॉटिक वगैरे वाटतं, आपण त्यानंतरचे कित्येक दिवस हाय असतो. (ओह! मॉलीच्या भावना पोहोचल्या)

मग पुढे जाऊन असंही होतं, की झाड खूप छान जगतं, तरारतं, त्याला छानशी चकचकीत हिरव्या रंगाची पानं येतात, पण ते झाड फुलं मात्र काही देत नाही. 
मी जेव्हा झाडं लावायला सुरुवात केली होती, तेव्हा मला त्याला लगेचच फुलं यावी असं वाटायचं. एखादं बीज रोवलं, एखादी फांदी लावली, की फांदी फुटायला, बीज अंकुरायला किती वेळ लागतो याची माहिती सहज उपलब्ध असते. तो तितका कालावधी निघून गेला की माझी घालमेल सुरु व्हायची. फूल येत का नाही? का येत नाही फूल?..माझं काही चुकतंय का?.. हे असं करायला हवं होतं का? कदाचित ते तसं केलं ते चुकलं असावं. हजार पण-परंतु.. त्यात प्रचंड उर्जा वाया जायची. गाण्याचे फक्त मुखडे पाठ असण्याचा तो काळ. अस्ताई आवडली की गाणं आवडलं..अंतरा ऐकून मत बनवण्याइतका धीर नसायचा, किंवा तितका वेळ कळ काढता यायची नाही. तो उतावीळपणा नंतर कमी झाला, पण या झाडांनी जणूकाही मला संयम शिकवायचा विडाच उचलला होता. हद्द झाली जेव्हा माझा जीव की प्राण असणाऱ्या, डोळ्यात तेल घालून जपलेल्या-वाढवलेल्या माझ्या उंचीच्या एका झाडाला शेवटपर्यंत फूल आलंच नाही, पण मी मात्र आज येईल फूल, उद्या येईल..म्हणून तब्बल दीड वर्षं काढलं. 
पण शेवटी ते असंच असायचं असतं. तुम्हाला मान्य नाही..टफ! बसा बोंबलत.

यात चुका नसतात. मी याला चुका मानत नाही. हे फक्त प्रयोग असतात. तुम्ही दुसऱ्यामार्फत स्वत:वर करून घेतलेले. हे प्रयोग तुम्हाला तुम्हाला तुमच्या मर्यादांची तीव्र जाणीव करून देतात, कुठे थांबायचं, कुठे सीमारेषा आखून घ्यायची, कशाने किती फरक पाडून घ्यायचा, की घ्यायचा नाही हे नीटच शिकवतात. आपण खूप प्रेमाने लावलेल्या, लळा लावलेल्या झाडांना पुरताना काहीही शाश्वत नाही हे सत्य कडूजहर हलाहलासारखं गळी उतरत राहतं, आणि आपण ते पहिल्यांदा..दुसऱ्यांदा करत कित्येकदा पचवतो. पण त्याने तुम्ही झाडं लावायचं सोडत नाही, त्यांचं निगुतीने सर्व करण्यात काही कसूर सोडत नाही. हे जगेल, वाचेल, बहरेल या आशेने तुम्ही बिया, रोपं लावत राहता, जगत राहता, जीव लावत राहता. कदाचित यालाच शहाणा आशावाद म्हणतात.

कुठलाही आवाज न करता, शांतपणे मोठ्या होत जाणाऱ्या, तुम्हाला बक्कळ शिकवणाऱ्या आणि सदैव साथ देणाऱ्या अशा गोष्टी हव्या आहेत खरंच.. गरज आहे.

--

आता माझ्या त्या 'पणा'तील दुसरा टप्पा - पाळीव प्राणी जगवून दाखवणं. आणि मी हे प्रकरण घरी आणायचा विचार करतेय.

Image may contain: cat
चित्र जालावरून साभार
पर्शियन मांजर आणि माझ्यात काही लाक्षणिक साम्यस्थळं आहेत असं मला सांगण्यात आलंय. आय डोण्ट रिअली सी दॅट; पण, ते घरी आणल्यानंतर आम्ही नाक कपाळावर नेऊन एकमेकांना किती, किती वेळ आणि कसे इग्नोअर मारतो हे पाहण्याची जाम म्हणजे जाम इच्छा आहे.

त्याने त्याच्या मांजरपणात आणि माझ्या 'यू-नो-व्हॉट'पणात काही फरक पडणार नाही,
पण बहुतेक मजा येईल!!

वाटतंय खरं. पाहू.

 
Designed by Lena