ननुभव

'सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ *क' चा अनुवाद आला, तेव्हा सेल्फ-हेल्प जॉनरमधल्या पुस्तकांची भाषांतरं करावी म्हणून काही ऑफर्स आल्या होत्या, तेव्हाचा हा अनुभव.

मला मनापासून असं वाटतं की, आपण एखादं वाड्मय भाषांतरित करतो कारण, त्यातलं साहित्यिक मूल्य ,मग ते कथेच्या स्वरुपात असेल, अनुभवाच्या स्वरुपात असेल किंवा लेखनाच्या नवनवीन प्रयोगाच्या स्वरुपात असेल, अतिशय उच्च असतं, किंवा किमान रोचक तरी असतं आणि ते आपल्याला आपल्या भाषेत भाषांतरित करण्याची आत्यंतिक गरज वाटते. 
काही पुस्तकं वाचल्यानंतर असंही वाटतं की, हे पुस्तक भाषांतरित नाही झालं तर काहीही फरक पडणार नाही, आपण चांगल्या साहित्याला मुकलो असं होणार नाही. अशा वेळी मी संपादकाला इतरांकडूनही त्या पुस्तकाबद्दलचं मत जाणून घ्यावं अशी विनंती करते. 
काहीकाही पुस्तकांमध्ये भाषांतर मूल्य असतं, पण त्यातून जाणारा मेसेज खूप अलार्मिंग असतो. आणि त्यातलं एक पुस्तक होतं - जेन सिन्सेरोचं 'यू आर अ बॅडअ‍ॅस'. तुम्ही फार विचार केला नाहीत, तर ते फार खुसखुशीत, उपरोधिक असं पुस्तक आहे, पण ती काय सांगायचा प्रयत्न करतेय हे कळून घेण्याचा प्रयत्न केलात तर विचारात पाडणारं पुस्तक आहे.

मी 'सटल आर्ट..' चा अनुवाद काही कारणास्तव केला असला तरी, 'सेल्फ-हेल्फ' हा माझा जॉनर नाही; कारण, प्रत्येकजण आपापले धडे घेत जगत असतो. तुम्ही ज्या सिच्युएशनमधून जो धडा घेतला, त्या सिच्युएशनमधून मी तोच धडा घेईन असं नाही, किंबहुना घेईन का? याचीही शाश्वती नाही. त्यामुळे तुम्ही xyz सिच्युएशनमध्ये असं वागा, असं वागू नका, असे ठोकताळे लागू करता येतच नाहीत. ते वाचायला ग्रेट वाटतं, पण प्रॅक्टिकल असेलच असं नाही, किंवा तसं वागलं जाईलच असं नाही. किंवा तसं वागून मला दुसऱ्याला झाला तसा आणि तितकाच फायदा होईल असं नाही, किंबहुना फायदा तरी होईल का, की तोटाच होईल? हे पण माहीत नाही.
त्या लेखकाने अनेक लोकांचे अनुभव बघून त्याची प्रमेयं बनवली असतीलही, पण ती स्वत:च्या चष्म्यातून पाहून, स्वत:च्या अनुभवांतून आलेल्या शहाणपणाची फूटपट्टी लावून. त्यामुळेच लेखकाने त्याच्या अनुभवांमधून घेतलेले प्रोप्रायटरी धडे युनिव्हर्सल करावेत, हा मला प्रचंड आगाऊपणा वाटतो; पण, ते माझं वैयक्तिक मत आहे. ही पुस्तकं खपताएत, याचा अर्थ लोकं ती वाचताएत, किंवा किमान शेल्फवर तरी ठेवताएत. याचाच अर्थ मनुष्यजमात प्रचंड गंडलेली आहे आणि अशा प्रकारच्या पुस्तकांमधून त्यांचं मॅनिप्युलेशन चालू आहे असाही होतो. 
असो.

हे पुस्तक वाचताना माझ्या डोक्यात 'सटल आर्ट'शी सतत तुलना चालू होती. सेल्फ-हेल्प जॉनरमधलं ते एकच पुस्तक माहीत म्हणून, आणि मॅन्सन व सिन्सेरो या लेखकांच्या लेखनाची जातकुळी एकच म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सिन्सेरो वाचून मला मॅन्सन 'डाउनप्ले'वाला वाटायला लागला.
या दोन पुस्तकांमधला ठळक फरक म्हणजे,
मॅन्सन तुम्हाला सांगतो की, 'तुम्ही सामान्य असलात तरी काही हरकत नाही. प्रत्येकजण ग्रेट होऊ शकत नाही. प्रत्येकाची त्याच दिशेने धडपड चालू असते, but that's ok. त्याने जास्त लोड घेऊ नका.'
जेन सिन्सेरो तुम्हाला सांगते की, 'तुम्ही सामान्य असलात, मीडिऑकर असलात, तरी तुम्ही ग्रेट आहात यात शंकाच नाही.'
फ्रॅंकली स्पीकिंग, याला 'भ्रम' असं म्हणतात. मला तिचा हा अ‍ॅटिट्यूड वाचून सोशल मीडियावरचे कवी/लेखक आठवले. त्यांचं लेखन कितीही सामान्य असलं, तरी त्यांना मिळणाऱ्या लाइक्सनी, त्यांचे कंपू/ग्रुप्स यातून मिळणाऱ्या कमेण्ट्सनी आपण किती ग्रेट असं वाटायला लागतं. त्याने त्या माणसाला छान वाटतं, शंकाच नाही, पण असं प्रत्येकालाच छान छान वाटायला लावण्यासाठी प्रत्येकाला ग्रेट म्हणायला लागलो, तर हलकल्लोळ माजेल. ग्रेटनेस काय आहे हे महान लोकांनी करुन ठेवलेल्या कामाने, त्या कामाने किती लोकांची आयुष्य बदलली, त्यांचं काम चिरंतन आहे आहे का, काळाला पुरुन उरणारं आहे का, यावरून ठरत असतं. त्यामुळे ग्रेट कोण आणि काय हे देखील आपोआप ठरत जातं. प्रत्येकजण ग्रेट होऊ शकत नाही..पीरीयड! त्यासाठी अभ्यास लागतो, मनन/चिंतन लागतं, धडाडी लागते, शांतपणे काम करत राहायची वृत्ती लागते..तुमचा ग्रेटनेस त्यावरून ठरतो. घाम, रक्त शिंपून, अनुभवांच्या आगीत होरपळत जगताना ग्रेटनेस अंगात भिनत जातो. आणि जेन सिन्सेरो याचा पर्फेक्ट अ‍ॅंटिथीसिस आहे. ती म्हणते की, तुम्ही यातलं काही नाहीत जरी केलंत, तरी बाय डिफॉल्ट ग्रेटच आहात.

विशेषणं फार फसवी असतात. तुम्ही कोणालाही 'ग्रेट' असं विशेषण लावलंत की, त्याच्या मनात नसतानाही त्याच्या मनात तो ग्रेटनेसचा भ्रम तयार होतो. आणि लोकांना प्रयत्न करायला लावणं, त्यातून येणाऱ्या फ्रस्ट्रेशनशी डील करायला लावणं, यापेक्षा त्यांना भ्रमात जगायला लावणं कधीही सोपं असतं असं सिन्सेरोला वाटतं मला फार वाटलं.

तुम्ही 'मि. इंक्रेडिबल' पाहिलाएत का? त्यात बडी नावाचं एक पात्र आहे. तो म्हणतो की, "नाऊ, एव्हरीबडी कॅन बी सुपर.. अ‍ॅंड व्हेन एव्हरीबडी इझ सुपर, नो वन विल बी"
या सिनेरिओमध्ये जेन सिन्सेरो ही बडी आहे.

बाकी, तिची भाषा मॅन्सनसारखीच ठोक, थोडीशी उपरोधिक आहे. अनुभव, दाखले खचाखच भरलेत. हे पुस्तक मजा म्हणून वाचायला छान आहे, पण what it stands for, is very dangerous. पण, हे अर्थात माझं मत होतं.  मला सेल्फ-हेल्प पुस्तकांकडे क्रिटिकल नजरेने पाहायची सवय असल्याचा भाग म्हणूनही असेल ते. ते पुस्तक पुढे भाषांतरित झालं की नाही, हे माहीत नाही.

त्याआधी माझ्याकडे 'क्लोझ, टू क्लोझ' हे पुस्तक आलेलं. विषय धाडसी आहे असं संपादकांकडून कळलेलं. पण पुस्तक वाचनाचा अनुभव तितका काही बरा नव्हता. वर्णनानुसार आणि पुस्तकाच्या माहितीनुसार बोलायला गेलं तर, हे पुस्तक म्हणजे एक 'इरॉटिका' होती. पण मला या पुस्तकाबद्दल म्हणावीशी वाटलेली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, ज्याला इरॉटिका म्हटले गेले आहे आहेत, त्या सेक्स कथा होत्या. मराठीत म्हणायचं झालं तर संभोग कथा. फक्त एरव्हीच्या नर-मादी ऐवजी नर-नर, मादी-मादी अशा जोड्या होत्या, तेव्हढंच वेगळंपण. पण आवर्जून, मिळवून, रस घेऊन वाचावं असं काही नाही.

सेक्शुआलिटीत साहित्यिक मूल्य आहे-नक्कीच. आपल्या मेघना पेठे, खुशवंत सिंग सेक्शुआलिटी बद्दल लिहितात. सेक्स किंवा संभोग हा सेक्शुआलिटीचा एक भाग आहे. सेक्शुआलिटीची परिणिती सेक्स किंवा संभोगात होते किंवा होत नाही. सेक्शुआलिटीमध्ये अनेक कंगोरे असतात, भावनांचे खेळ असतात, कपट असतं, संघर्ष असतात, थोडक्यात म्हणायचं झालं तर साहित्यिक मूल्य बरंच असतं; कारण, तिथे आपण काहीतरी सरधोपट करू पाहण्यापेक्षा काहीतरी ’म्हणू’ पाहात असतो, विचार करत असतो.
त्या पुस्तकात सेक्स होता, सेक्शुआलिटी नाही.
त्या पुस्तकातल्या साऱ्याच कथा सेक्स-सेंट्रिक होत्या, सेक्शुआलिटी-सेंट्रिक नाही. 'पॉर्न' हे साहित्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. एखाद्या गटासाठी ते साहित्य असू शकेलही, त्याची साहित्यविषयक गरज द्विमितीय असू शकेलही(खोलीचा अभाव असलेली) म्हणूनच त्याला क्वियर ’लिटरेचर’ म्हटलं गेलं असावं; पण या पुस्तकात फेलाशिओ, बॉंडेज असे सर्व प्रयोग केलेले होते. क्वियर ’लिटरेचर’ची ही गरज मला कळू शकली नाही.

त्यामुळे हे पुस्तक करावं की न करावं हा प्रश्न पडल्यावर मी न करावं असाच निर्णय घेतला. 
करावं की करू नये हा प्रश्न नसतोच खरं तर.. 'का करावं' हे स्वत:ला माहीत असलं म्हणजे पुरे..ते काही रॉकेट सायन्स नव्हे. 
अशा आणखी काही ननुभवांविषयी पुन्हा कधीतरी..
 
Designed by Lena