मो.मोडॉनेय.

माझं आयुष्य या घडीला प्रचंड एकसुरी आहे. म्हणजे माझ्या आयुष्याला आवाज असता तर एकसुरात दळणा-या जात्याचा आवाजच आला असता..घर्र घर्र करुन!

काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात ’प्रियकर’ नावाचा विरंगुळा होता तेव्हा वेळ जरा बरा जायचा.
जोएलच्या शब्दांत सांगायचं झालं तर He was nice. Nice is good!
म्हणजे सगळं कसं कच्चकन दचकवायला लावणारं असायचं. दर दिवशी उठून काहीतरी नवीन कुडकूड. त्यामुळे एकसुरीपणाचा प्रश्नच नाही . प्रत्येक दिवशी  "त्याच्या टूथब्रशचा रंग लाल तर मी टूथब्रश निळा घे‌ऊ की लालच?" असे माय गॉड सो डिफिकल्ट डिसीजन्स घेताना दिवसांमागून दिवस कसे उलटायचे कळायचंच नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांना एकमेकांच्या सवयी लावून घेतल्या होत्या आणि मग आम्ही दोघे कित्ती कित्ती एकमेकांसारखे आहोत असं म्हणत उगीच भारी वाटून घेत बसलो होतो. आणि कसं असतं ही ’प्रियकर’ नावाची सा‌ईडकार आपल्या गाडीला असली की तिला जमेस धरुनच सगळ्या गोष्टीचा विचार होतो. मुलीचं आयुष्य ती त्या एका पुरुषाशी बांधून घेते, मग ती फक्त आणि फक्त त्याचा आनंद, दु:ख, वीकनेसे याबद्दलच्या स्ट्रॅटेजी बनवण्यात गढते. सोप्पं नाहिये काम आणि म्हणूनच एकसुरी नसलेलं.
आता सगळं हंबग वाटतं पण तेव्हा जात्यात असताना त्यात ल‌ई रस वाटायचा.
पण तेव्हाही हे माझ्या लक्षात न यावं की, मी आणि माझा तो प्रियकर, दोघेही आपापल्या आयुष्याच्या एकसुरीपणाला कंटाळलो होतो आणि बसलो होतो भाग देत एकमेकाच्या एकसुरीपणाला -बाकी शून्य ये‌ईपर्यंत!
बाकी शून्य कधी यायचीच नव्हती..ती नसतेच..
हौस फ़िटली, झालो बाजूला.
"मी काय तुला आज ओळखतो/ते होय?" असे डायल्वॉक एकमेकांवर टाकत.

मुळात ’ओळख’ म्हणजे काय?
मला एखाद्याचं नाव, त्याचा कौटुंबिक इतिहास, रक्तगट, त्याची सांप्रत प्रकरणं (निस्तरलेली त्यातच आली) हे सगळं ठा‌ऊक असेल तरी याचा अर्थ मी त्या माणसाला ओळखते असा हो‌ऊ शकतो का?
राखुंड्या पॉर्न बघतो, तेव्हा तो  कुठल्या मुलीचा विचार करत असतो हे मला ठा‌ऊक आहे म्हणून मी त्याला ओळखते असा त्याचा अर्थ होतो का?
केस मानेवर जिथे संपतात त्या भागाकडे नुसतं पाहून मला देव खूप दमलाय हे कळतं, म्हणजे मी त्याला ओळखते का?
याला तरी ’ओळख’ म्हणावं का?

माझं इथं काहीतरी बिनसलंय हे माझ्या मित्राला ४०० किलोमीटर्सवर बसून जाणवतं याचा अर्थ तो मला ओळखतो असा होतो का?
अंदाज करणं आणि ते हमखास खरे ठरणे-ह्याला काय म्हणतात मग?

’मी तुला ओळखते/तो’ हे विधान मला अतिशयोक्त आणि धाडसी वाटतं. हे वाक्य कोणी माझ्यावर फेकण्या‌आधीच  मी अशी रि‌ऍक्ट झालेली असते  की त्या व्यक्तीचे माझ्याविषयीचे सगळे तर्क-कुतर्क, अंदाज, आडाख्यांचे इमले धडाधड खाली आलेले असतात.
खरं सांगू का? आपण कोणाला ओळखत नाही आणि कोणीसुद्धा आपल्याला ओळखत नाही-आपल्याभोवतालच्या चार भिंतींना सोडून.
तर..
आदर्श ब्रेक-अप नव्हता तो. प्लॅन्ड नव्हता. ठरवल्यासारखं कॅफे कॉफी डे मध्ये भेटून एकमेकांच्या आवडीच्या कॉफी मागवून ’इट वूड  नेव्हर हॅव वर्क्ड," बोललो- असं काहीच झालं नाही.

माझ्या आयुष्यात इतरांसारखं काहीच का होत नसावं??
आता तो फ़क्त एक झकडम इतिहास आहे खरं..डायरीमधल्या काही नोंदीमधून जिवंत असलेला..

डायरी-

मी ’यू टर्न’ पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हा वाटलेलं की, ती रमा गोखले कसली भारी डायरी लिहिते. कातळाला फ़ुटलेला पाझर काय, पानगळ काय. वॉव! मला माझी डायरी आठवली. कातळ, पानगळ दूरदूरपर्यंत नाही. मी ४ लॅप जास्त मारले, आज मी जलालुद्दीन खिल्जी संपवला, अला‌ऊद्दीन सुरु केला अशा पाद-याफुसक्या नोंदीच जास्त, त्या पण नमनाला घडाभर तेल घालण्या-या! माझ्या डायरीत हे सुद्धा बघायला मिळतं-

"इतिहास’ हा माझा विषय असला तरी ती मानव्यशास्त्राची अत्यंत संदिग्ध अशी शाखा आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणजे लिखित पुराव्यांची चैन असली ते ’कितपत’ खरं आहे हे कळण्याचा काहीच मार्ग नसतो कारण अर्थात ते इतिहासकार आज जिवंत नाहीत. कोणत्यातरी इतिहासकाराने राजाची प्रशस्ती इतकी वारेमाप केलेली असते की तो वास्तवतेपासून अंमळ दूरच गेलेला असतो. (निकोलो कॉंटी विजयनगरचं वर्णन करताना), एखादा बर्नी सारखा इतिहासकार अकबराचा दुस्वास करायचा म्हणून खोट्यानाट्या गोष्टी घुसडण्यास मागेपुढे पाहत नाही. अल्बेरूनी आपल्या मायभूमीच्या अनुषंगाने भारताचं अवलोकन करतो त्यामुळे तो त्याच्या नजरेतून काही गोष्टी सुटतात. (भारतातली त्यावेळची गुलामगिरी) इ. त्यामुळे इतिहास वाकवू तसा वाकतो. सत्य किवा फॅक्टसना फारच सहजतेने डिस्टॉर्ट करता येतं. त्यामुळे दुर्दैवाने Authoritiesने प्रमाणित केलेल्या आणि तज्ञांनी प्रमाणित केलेल्या इतिहासाला प्रमाण मानून चालायला लागतं."


डायरी हा आपण कसले भारी आहोत याची लख्ख जाणीव करुन देणारा हा प्रकार आहे. हा हा!
पण नंतर वाटलं, आय वंडर, रमा गोखले माणसांबद्दल काही का लिहीत नाही?
हं...माणसं मुळातच कमी असली आणि शेयर करायला कोणी नसलं कीच डायरी लिहायचं सुचतं?
मग मी डायरी का लिहिते?
मला खूप बोलायला हवं असतं पण कुणाशी ते माहित नसतं. माणसं भरपूर असतात. त्यांच्याशी बोलणं पण भरपूर होतं. पण बोलून झाल्यानंतर कोणी कुणाचं ऐकून घेतलंय असं वाटत नाही. मी काहीतरी एक म्हणत असते आणि ऐकणारा काहीतरी दुसरंच ऐकत असतो. एखाद्या साध्या वाक्याला ’मला खरंच असं म्हणायचंय, त्यात "तू इतर कसले अर्थ बघू नकोस.." इत्यादी पुस्त्या जोडाव्या लागतात.
या पुस्त्यांचा मला कंटाळा असावा कदाचित- म्हणून मी डायरीत बोलते.
माझ्या समोरुन येणारी मुलगी कोणतं गाणं ऐकत असावी किंवा ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या एका पुरुषाला पाहून याने रात्री काय काय बरं केलं असेल? असे प्रश्न उगीचच पडणं, हे सग्गळं सग्गळं मी डायरीत लिहीते. मला हे प्रश्न का पडतात याची उत्तरं मला जाणून घ्यावीशी वाटतात. पण कधीकधी उत्तरं मिळालीच तर मुदलातले प्रश्नच विसरायला हो‌ऊ नयेत म्हणून डायरीत लिहून ठेवायचे.
म्हटलं ना, उत्तरंच कठीण असतात असं नसतं नसतं, प्रश्नही कठीण असतात ब-याचदा.

ये भेजा गार्डन है, और टे्न्शन माली है  - हेच खरं.
(रुपक अलंकाराला आणखी तेजस्वी भावंडं बहाल केल्याबद्दल, अमिताभ भट्टाचार्य, आपल्याला शिरसाष्टांग. श्रीयुत गुलजार यांचा ’गोली मार भेजे में’ चा मोड ऑन होता तेव्हा आपण त्यांच्याकडे क्रॅश कोर्स करत होतात काय?)

आपल्याला कुठलीही कल्पना सुचते तेव्हा ती नेमकी कुठे उगम पावलेली असते? म्हणजे ऍमेझॉन नदी ऍंडीज पर्वतरांगांमध्ये उगम पावते,आपण खातो ती तूरडाळ मराठवाडा-विदर्भातून येते तशी ही कल्पना कुठून येते? ’मन’ नावाच्या ऍनॉनिमस प्रदेशातून की मेंदुतुन?
मला जेव्हा काहीतरी सुचतं तेव्हा ते अमृतांजन चोळायच्या ठिकाणी उगम पावलेलं असतं. सोप्पंच करुन सांगायचं झालं तर वेड्या माणसांना शॉक्स देण्यासाठी म्हणून नोडस जिथे लावतात तिथे.
तिथे काहीतरी रटरटतंय हे जाणवतंसुद्धा.
मग ती कल्पना जसजशी बाळसं धरायला लागते तशी या कानशिलापासून ते त्या कानशिलापर्यंत गच्च बसते. उठता-बसता, लिहीता-वाचता तिची खदखद जाणवते. तिला नुकताच सॅंडपेपरने घासुन काढलेल्या लोखंडाचा कडवट, उग्र वास असतो. ती मग भिनते, तापासारखी मुरते, रात्रींमधून डोळ्यात ठसठसत राहते आणि मग पुढे केव्हातरी शब्दांमधून रुजून येते. तेव्हा ती नुकत्याच बनवलेल्या कवळ्या कवळ्या आरशासारखी वाटते. मग सुरु होतो तो सनातन झगडा-
आधी भाषा मग अर्थ की आधी अर्थ मग भाषा?
ह्या सनातन झगड्याच्या त्या दिवसांमध्ये माझ्या डायरीत हटकून नोंद असते ती -असह्य डोकेदुखीची.
कानशीलं थडाथड उडवणा-या या डोकेदुखीशी एकच नातं शक्य आहे ते म्हणजे स्वीकाराचं. तिला माझ्या आयुष्यात सामा्वून घेतलं तरच जगणं शक्य आहे.
मला जर अजिबातच व्यक्त व्हायला जमलं नाही तर माझं काय हो‌ईल? कदाचित माझी विचारशक्ती चुरमडत जा‌ईल, तिला सतरांदा आपटलेल्या भांड्यासारखे पोचे येतील.यथावकाश काहीतरी थातुरमातुर खरडलं जा‌ईलच पण त्याला जरतारी शब्दांची सूज आलेली असेल.

माझ्या कल्पनांचं किंवा विचारांचं असं सेप्टीक हो‌ऊ नये, त्या कायम भळभळत राहाव्यात. हे दरवेळी काहीतरी नवं सुचणं, लिहावंसं वाटणं यात दमणूक झाली तरी !

बरेच सुटे धागे असल्यावर त्यांची गुंतवळ न हो‌ऊ देता, त्यात पाय न फसवता ते एकत्र करुन त्याचा सुंदर गोफ करुन घ्यावा आणि त्यात आपण झोके घेत रहावं..असंच काहीतरी .

मो.मोडॉफ़.

22 comments:

Serendipity said...

It's wonderful....
-Pooja Prabhukhot

Shraddha Bhowad said...

Thanks Pooja.
Man, You are among the very very few persons who would find this junk wonderful, I am dead serious when I'm talking this.
Monologues are like throwing up, bit artistically though. Who likes them? see? I can't think of anybody.

bindhast said...

this is written amazingly well...call it junk or otherwise :)

Shraddha Bhowad said...

Neeta,
Merci et Bienvenue!
Ha! Then you are among very very few persons who would find this junk wonderful too! Just like our Pooja.
But,
Appreciation (still!) tickles, why lie about it? :D So, thanks for that!

Anand Kale said...

Vakya rachna chaan
Kachra post pan bhari jamaliy ;)

Shraddha Bhowad said...

काळेभौ,
जंक=कचरा असं रुपांतर केलंत काय? नाही हो, तसं नाहीये ते. :)
आणि
कौतुकाबद्दल थॅंक्स!

smruti said...

tu kharach khup khup chan lihites.......

Shraddha Bhowad said...

स्मृती, तुझी अगदी मनापासून आलेली कमेंटही खूप खूप आवडली. :)(मी खरंतर ’प्रतिक्रिया’ लिहीणार होते पण मला का कुणास ठाऊक ती मेडीकल टर्म वाटते)

Shailesh Kalamkar said...

खूप छान ! अचानक एका फ्रेंड कडून chat विंडोमध्ये मला हि लिंक मिळाली.मी सहसा ब्लोग वाचत नाही (फक्त लिहितो :P ) खरच! छान लिखाण आणि लिखाणाची मांडणी आहे.

Shraddha Bhowad said...

हलो शैलेश,
धन्यवाद.
कोण तो फ़्रेंड, कोण तो फ़्रेंड अशी कुचकूच आहे खरी पण ठिकाय-सेकंडरी आहे ती :D

लिना said...

अंदाज करणं आणि ते हमखास खरे ठरणे-ह्याला काय म्हणतात मग ... +१११११....
समोरचा आपल्याला ओळखतोय ही जाणीव भारी असते पण हे अंदाज करणं प्रकरणं कळलं की सगळाच भ्रमनिरास होतो .. especially तुम्ही जर अंदाज करणारे असलं तर ..हा हा हा ...
बाकी खूप दिवस वाचतेय पण कधी कमेंट केली नाही आज राहवत नाहीये ...
मनापासून दाद ... लिहिते रहो..

Shraddha Bhowad said...

लीना,
तो पॅरा तुला एकदम भिडलेला दिसतोय. :)
पण कसंय, आपण अंदाज करत असू तरी ते अंदाज आहेत हे स्वत:शी मान्य करायची आपली तयारी नसते बहुतेकदा. ते अंदाज आपल्यासाठी त्या व्यक्तीची पक्की ओळख ठरुन जातात. किंवा आपण तसं वाटून घेतो आणि नंतर आपल्याला तेच खरं वाटायला लागतं.
पण दुसरयाचे अंदाज करणं मात्र नंतर कधीतरी कळलं की कसला तिळपापड होतो. तेव्हापर्यंतचं सगळं झूठ वाटायला लागतं. मग आपण ड्रामा करतो.
सगळी हिपोक्रसी असते गं! या सगळ्यात हिपोक्रसी असते हे एकदा स्वत:शी, एकमेकाशी स्वच्छ मान्य करता आलं नं, तर त्याला वळसा घालून छान नाती जपता येतात. आपण ’ओळख’ हा प्रेस्टीज इश्यू करुन टाकतो तिथेच चुकतो. आपण ओळख ही सुरुवात मानतो तिथेच चुकतो. ओळख ही भैरवी असावी, सलामी नाही.
फ़ेसबुकवर हा पॅरा टाकला होता नं, तेव्हा फ़क्त एकानेच मला हवं ते उत्तर दिलं होतं."बाह्यगोष्टींची माहिती ती `ओळख', अंतरंगाची ती `जाण!" आणि आपण नेमकं ओळखीवरच थांबतो. जाणणं तर दूरच राहिलं.
असो, मी तर एकदम पुराण्च लावलं.
तुझ्या मनापासून आलेल्या प्रतिक्रिया सॉरी कमेंटकरता खूप थॅंक्स! काही भिडलं तर अशीच कळवत रहा. आपल्याला वाटतं तसंच चार-चौघांनाही वाटत असतं हे खरंय.

Eat & Burpp said...

तुझं आत्तापर्यंतच लिखाण वाचून अस वाटतच नाही मुळात कि तू तुझ्या कल्पनांना किंवा विचारांना डोक्यात बरेच दिवस साठू देत असशील!! 'मनात आलं कि ओकलं' अशी काहीशी तू वाटतेस मला! आणि कल्पना मांडण्याचा तर काही प्रश्नच नाही...इतका भरपूर शब्द साठा असताना! हे झालं तुझ्याबद्दल! लेखाबद्दल सांगायचं तर हा गुंता पण छान सोडवला आहेस. पण हे वाचून तुझं आयुष्य एकसुरी चाललंय अस मात्र नाही वाटत!! ;)

Shraddha Bhowad said...

गीता,
आईशप्पत, तुझी कमेंट वाचून माझ्या डोक्यात फ़क्त आणि फ़क्त एकच उद्गार उमटला- "खरंच की काय?

संपादक मंडळ said...

श्रद्धा, तुला खो (http://reshakshare.blogspot.in/2012/04/blog-post_02.html) दिलाय... :)

मयुरा.. said...

तु कित्ती बोलतेस ग...:D :D पण तरीही ब्लॉग मस्तच आहे तुझा..खूप दिवस वाचते आहे..मला आवडला. आणि कधी कधी ओळख म्हणजे अंदाजच असतात..सवयीने बांधलेले ठोकताळे..अशीच लिहित रहा..

मयुरा.. said...
This comment has been removed by the author.
मयुरा.. said...

तु कित्ती बोलतेस ग...:D :D पण तरीही ब्लॉग मस्तच आहे तुझा..खूप दिवस वाचते आहे..मला आवडला. आणि कधी कधी ओळख म्हणजे अंदाजच असतात..सवयीने बांधलेले ठोकताळे..अशीच लिहित रहा..

Shraddha Bhowad said...

मयुरा,
बाई, मी कित्ती-कित्तीतरी बोलते ’तरीही’ तुला माझा ब्लॉग आवडला याबद्दल धन्यू. :D
खरंय, ओळख म्हणजे कधीकधी एफ़्स आणि एल्सेस च्या कंडीशन्स असतात, असं नसेल तर तसं आणि तसं नसेल तर असं-तसं तरी असेलच टाईप्स, पण कसं-कसं तरी असण्याची गरज किंवा अट्टाहास.

मी लिहीनच सुचेल तसं, तू कळवत रहा.

Unique Poet ! said...

तू जर याला जंक म्हणत असशील तर माझ्याकडे काही सुविचार आहेत....

टाकाऊतून टिकाऊ ..........

चिखलातच कमळ उगवते ..... टाईप ..

त्या ओळखतो/ते च्या संपूर्ण पॅरावर आणि ’ आपण कसले भारी आहोत - डायरी ’ च्या पॉईंटवर आपले एकमत...!
सुंदरच लिहीले आहेस...

बाकी लिहीते रहो.... हम पढते रहेंगे.. ! :)

Shraddha Bhowad said...

समीर,
हा हा! चिखलातून कमळ..बाकी खूप वर्षांनी ऐकला हा सुविचार. कोळशाच्या खाणीतून हिरा टाईप्स. मी खूप खूप हसायचे ते वाचून. परिसर अभ्यास, मूल्यशिक्षण नामक विषयांच्या दर दोन धड्यांमागे पाव किलोने पडायचे हे सु(?)विचार! :) त्यावेळी खूप बोअर व्हायचं. दर आठ-दहा वर्षांनी एकदा कानावर पडले तर हरकत नसावी असं वाटतंय आता मात्र.

archana said...

भारी लिहितेस .....

 
Designed by Lena