लॉकडाउन ब्लूज - ३

कोणे एके काळी एक मुलगी बंगलुरु नामक कोणे एके काळी 'गार्डन सिटी' म्हणवल्या जाणाऱ्या शहरात एकटी राहत होती.
ती कामाला वाघ होती, टापटीप होती, वाळत घातलेल्या फडक्याची टोकं जुळवून ते एकसारखं दांडीवर पडलं आहे ना याची खात्री करणाऱ्या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह लोकांपैकी एक होती.

पण तिला भांडी घासायचा अतोनात कंटाळा होता. 
बाकी कोणतंही काम चालेल, पण भांडी? नो थॅंक यू.
त्यामुळे तिने खाल्लं काही, की ठेव भांडं घासून असं धोरण स्वीकारलं होतं. काहीही करून भांडी जमा होऊ द्यायची नाहीत, तिथल्यातिथे त्यांचा फडशा उडवायचा.

पण, लवकरच ग्रहदशा बदलली आणि मुलीचं काम, कामातले व्याप वाढले.
घरूनच काम असल्याने कंपनीच्या कामाच्या तासाबद्दलच्या अपेक्षाही वाढल्या.
कामाचा डोंगर उपसता उपसता अतिश्रमाने डोळ्यांमधून वाफा यायला लागल्या.

मग एका आठवड्यातल्या अशाच एका प्रचंड मनस्तापवाल्या सोमवारी तिने ग्लानीतच त्या दिवशीची भांडी घासायची नाहीत असं ठरवलं. उद्या पाहू.
मग उद्याही भाराभार काम असतं, बिझनेस डेव्हलपमेंट यंव न त्यंव.. अर्थातच भांड्यांना हात लागत नाही.
जेवण करायला लागतो एक तास, खायला अवघी पंधरा मिनिटं, पण भांडी तिन्हीत्रिकाळ.
कामं संपत नाहीत, भांडी साठायची राहत नाहीत.
पाच दिवस तीन वेळा म्हणजे  १५ जेवणांची भांडी, मधल्या खाण्याची भांडी..चमचे, पेले.. 
परवाही गेला
तेरवाही आला.
 
मुलगी एकटीच राहत असल्याने तिच्याकडे काही दहा दहा ताटं/वाट्या असा संसार नव्हता. चार ताटं/वाट्या पुरून पुरून किती दिवस पुरणार?
मग तिने केव्हातरी कोपऱ्यात खुपसून ठेवलेल्या पेपर प्लेट्स काढल्या.

जेवण करायला भांडी उरली नाहीत तेव्हा स्विगीच्या कुबड्या घेऊन एक दिवस काढला.

बेसिनमधली भांडी तशीच पडून होती. त्यांच्यावर एक नारिंगी पण नाही, पिवळा पण नाही अशा थोर रंगाचा थर वाढत होता. पण ती अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळु या स्थितीला आल्यावर मात्र आपण काही केलं पाहिजे असं तिला प्रकर्षाने वाटलं आणि ती बाह्या सावरून बेसिनपाशी उभी राहिली. पण तितक्यात हॅंगआउट्सवर एका पी झीरो असाइनमेंटचा पिंग आला आणि तिने बेसिनवर एक टॉवेल अंथरून भांडी डोळ्याआड केली. No See, No Fee.
मृत शरीरं कुजू नयेत म्हणून म्हणून बर्फावर ठेवतात, मग भांडी कुजू नयेत म्हणून फ्रिजमध्ये ठेवावीत का? अर्थात तो पर्यायही उपलब्ध नव्हता, कारण फ्रिज बप्पी लाहिरीच्या गळ्यासारखा पूर्ण भरला होता.
"खोबऱ्याची चटणी खोबऱ्याच्या पेस्टसारखी झाली तर तुझा मस्तकशूळ उठतो आणि याने तुझा OCD ट्रिगर होत नाही? " - तिचे डॉक्टर स्नेही
याचं उत्तर तिलाही माहीत नाही डॉक, खरंच. शप्पथ. 

मग सरतेशेवटी शुक्रवार आला. पेपरप्लेट्स संपल्या, स्विगीचा कंटाळा आला. ताटं, वाट्या, पातेली, काटे चमचे..घरातलं एकूण एक भांडं घासायला पडलं. आपल्या घरात त्रेचाळीस भांडी आहेत याचा साक्षात्कार तिला तेव्हाच झाला.
जेवायचे वांधे झाले, पण काम काही संपत नव्हतं. पाच दिवसांचा थकवा शरीरात नुस्ता साचला होता. हालचालीदेखील नुस्त्या इच्छाशक्तीच्या बळावर होत होत्या. एका मित्राने दया येऊन दोन वेळचं जेवण घरी पाठवलं, पण मग घासायच्या भांड्यांमध्ये त्या भांड्यांचीही भर पडली.
भांडी..भांडी...खूप सारी भांडी....

बेसिनमध्ये भांड्यांचा नुस्ता जेंगा झाला होता. टेट्रिसमध्ये आपण जागा शोधून त्या विटा 'लावतो', तशी भांडी बेसिनमध्ये जागा शोधून लावायला लागत होती. पण, 'हे आता नाही, पण उद्या नक्की आटपू' हा विचार डोक्यात यायला आणि हाताच्या कोपराचं जजमेंट चुकायला एकच गाठ पडली आणि हाताचं कोपर लागून तो जेंगा सॉरॉनच्या टॉवरसारखा धडाधड कोसळला. प्रचंड ठणठणाट करत ताटं, वाट्या, चमचे जमिनीवर सांडले.
तिला टोमणे मारत, तिच्याकडे तुसड्यासारखं पाहात रिकामटेकड्यासारखी खिडकीत बसलेली मांजर जोरात फिस्कारत पळून गेली. शेजारी घाबरून काय झालं पाहायला आले आणि जमिनीवर पडलेल्या भांड्यांच्या राशीमध्ये तिला हतोत्साहासारखी उभी पाहून आल्यापावली चुकचुकत निघून गेले.

"मुली, मी तुझी भांडी घासून देऊ का?" असं मला आजपर्यंत एकाही शेजाऱ्याने विचारलेलं नाही. का ते? खरकटी भांडी इंटिमेट असतात म्हणून, की खरकट्या भांड्यांची घाण वाटते म्हणून?

तिला वाटायचं, की "काही खाल्लंस का?" हा जगातला सर्वात रोमॅंटिक प्रश्न असावा, पण नाही मिलॉर्ड. "मी येऊन भांडी घासून टाकू का?" हा सर्वात रोमॅंटिक प्रश्न असेल, ज्याला ती कुचकटपणा करूनही कधीच नाही म्हणू शकणार नाही. 
पण हेही तिला अजून कोणी विचारलेलं नाही. 

कित्येक युगं, कित्येक पळं सरली.
मग तिला परिस्थितीचं भान आलं. ती चिकट, पचपचीत भांडी जमिनीवर पडून देण्यात अर्थ नव्हता. अतिश्रमाने पेंग येत होती, झोक जात होता, पण हे निस्तरायला लागणार होतं. जमिनीवर फतकल मारून टाळा दाखवत रडायची कितीही इच्छा झाली तरी.. कारण जमीनही चिकट होत चालली होती. 

ओके, हे काही रॉकेट सायन्स नाही. तुला फक्त उभं राहायचं आहे, भांडी घासायची आहेत आणि बाजूला ठेवायची आहेत. 
हो, पण काही नॉनस्टिक भांडी आहेत.. काही किशीने घासायची आहेत, काही प्लॅस्टिकच्या स्क्रबरने, तर काही स्पंजने. (अर्धवट झोपेतही तिचा OCD सोयिस्करपणे कोकलतो)

आपल्या ऑल्टर इगोंशी अशाप्रकारे संभाषण झाल्यानंतर मात्र ती हलते. ताटावर ताटं, वाट्यांमध्ये वाट्या, काचेची भांडी एकीकडे, नॉनस्टिक एकीकडे अशी रास रचून ठेवते, साबणाचं पाणी सर्व भांड्यांमध्ये टाकते आणि भांडी त्यात दोन मिनिटं छान भिजवत ठेवते. पाण्यात हात घालायच्या आधी मोबाइलवर मोठ्यांदा गाणी लावून प्लेलिस्ट शफलवर ठेवते आणि हातात तिचे पिवळ्या रंगाचे ग्लव्ह्ज चढवते. त्या परिस्थितीतही फार फॅशनेबल असल्यासारखं वाटतं.. रोझलिन रोझेनफिल्डसारखं.
जस्ट गो टू हेल.. दिल
सुनिधी दिलाला फटकारायला लागते. बरोबरच आहे तुझं सुनिधी. फार नखरे असतात साल्या दिलाचे.

आणि मग एकेक करून भांडं घासायला घेते.
पहिल्यापहिल्यांदा तो राडा पाहून थकून जायला होतं. हे कधी संपायचंच नाही असं वाटायला लागतं. पण मग एकेक भांडं हातात घेताना ताटातल्या सुकलेल्या वरणामध्ये विमनस्कपणे गिरवलेली अक्षरं, केचपची ग्राफिटी, घाईघाईत चपातीवर भाजी वाढून रोल करून खाल्ल्याने तेलाचा टिपूसही न लागलेलं ताट यांतून आठवडाभराचा मनस्ताप तिला कडकडून भिडतो, पण ती अक्षरं, ती ग्राफिटी खूप सारा फेस करून स्वच्छ घासून काढताना तो तळतळाटही मग कमी कमी होत जातो. स्वत:विषयी प्रेम, माया, सहानुभूती असं खूप काही दाटून येतं. एकेक भांडं स्वच्छ धुवून हातावेगळं करताना काहीतरी कमावल्याची भावना होत जाते. काहीतरी नवं सुचतं, प्रसवतं.. प्रायॉरिटीज चुकल्या, आपण चुकलो हे नकळतपणे कळतं आणि मान्य केलं जातं.

आणि शेवटचं भांडं हातावेगळं होईस्तो सृष्टीचा समतोल नीट झालेला असतो, अंगातली ती तापासारखी भावना कमी व्हायला लागलेली असते. आत काहीतरी बिनसलेलं असतं, ते बरं व्हायला लागलेलं असतं. बेसिनभोवतालची ती जागा आता अजिबात नेगेटिव्ह एनर्जीवाली जागा राहिलेली नसते. स्वच्छ, चकचकीत भांड्यांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाने हुशारल्यासारखं वाटतं. उद्या स्वच्छ भांड्यामध्ये कॉफी करून पिता येणार आहे या विचारानेच  नवी उमेद आल्यासारखी होते. 

अर्थात, तिने हे आधीच केलं असतं, तर ही वेळ आली नसती. पाच सेकंदांमध्ये आपल्या हाताला स्वच्छ भांडं येणार असेल, तर ते आधीच करून टाकायला काही हरकत नव्हती. पण, ते म्हणतात तसं - करता आलं तर केलं असतंच.
पण केलं नाही याचा अर्थ झालं नाही.
ती पुढे ते करण्याचा प्रयत्न करेलच. 
पण टेट्रिस किंवा जेंगा खेळायची इच्छा झाली तर न करण्याचाही पर्याय खुला आहेच.
लॉकडाउनमधल्या घरबशांना कसला आलाय डर.

--

 
Designed by Lena