उपरती.

एरव्ही मी नाकासमोर बघून चालणारी मुलगी!
चालतानाही बाजूने कोणी ओळखीचं जरी गेलं तरी माझ्या लक्षात येणार नाही इतकी मी स्वत:तच गुंग असते.
आज नेहमीच्याच भागात फ़िरताना जरा मान वर करुन पाह्यलं तर तर तलावपाळीवर तीन ताडाची झाडं दिसली. सगळ्या झाडांच्या वर उत्तुंग अशी उभी होती. मला भयानक आश्चर्य वाटलं. वर्षाचे ३६५ दिवस मी तलावपाळीवर फ़िरायला येते इतकी मोठी झाडं माझ्या नजरेतून कशी सुटली?
घरी येऊन विचारणा केली तर बहीण म्हणाली,"अगं ती पहिल्यापासूनच तिथे होती..तुझ्या कसं नाही लक्षात आलं एवढ्या वर्षात?"
तिच्या चेहरयावर आश्चर्य होते. ती नक्कीच माझी थटटा करत नव्हती.
मला हे गंभीर वाटलं.
मी ’प्रिय’ला फ़ोन करुन हे सांगीतलं तर तो मला म्हणाला "थोडा विचार कर. तुझ्या आजूबाजूला बघ. तुझं तुलाच कळेल."
आणि मी खरंच तसं केलं.
मला दिसला न बघता कोपरयात भिरकावलेल्या ग्रीटींग कार्डसचा गठ्ठा, मोबाईलवर कधीकधी इग्नोर करत असूनही नियमीतपणे येत असलेले कॉल्स, कंटाळा आला म्हणून कट केलेले कॉल्स, आजही न उचललेले चार-पाच मिस्ड कॉल्स.
मेलबॉक्स उघडला तर आतापर्यंत उघडूनही न पाहिलेल्या, उत्तरं न देता तशाच पडलेल्या मेल्स दिसल्या.
सगळी जिव्हाळ्याची माणसं. मी कितीही माज करो माझी नियमीत विचारपूस करतात, काळजी करतात.
And suddenly, it dawned on me.
आणि ही सगळी मंडळी विचारत असल्यासारखी वाटली,
"आम्ही नेहमीच तुझ्यासोबत असतो...होतो, तुझं लक्ष नव्हतं का?"

’आवरण’

"बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यानंतरच्या काळात अल्पसंख्यांकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी सरकार काही धोरणे आखते. बुद्धीवादी, मार्क्सवादी, जातीनिरपेक्षवाद्यांना हाताशी धरून इतिहासातल्या काही विवक्षित सत्यांना दडपायचा प्रयत्न करते. इतिहास पुनर्लेखनाचे संकेत मिळायला लागतात. या धडधडीत खोटेपणाविरुद्ध नायिका आपल्या परीने कशी उभी राहते, तिचे विचारमंथन, मानसिक द्वंद्व, स्वत:च्या निष्ठांशी अविचल राहण्याचा तिचा बाणेदारपणा, सत्याचा अटटाहास, यात तिच्या संसाराची झालेली वाताहत, सरकारचा शहाजोगपणा, लाळघोटेपणा करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकरता वाटेल ते करायची तयारी असलेले लुब्रे सोशालिस्ट्स, प्रत्यक्षात पुराणमतवादी असलेले आणि वरून पुरोगामी असल्याचा आव आणणारे बुद्धीजिवी..." म्हणजे अवघ्या २ वर्षात २० आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी एस.एल.भैरप्पांची कादंबरी ’आवरण’..!

असत्य बिंबवणारया कार्याला ’विक्षेप’असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणारया या क्रियेला ’अविद्या’ तर सामूहीक आणि जागतिक पातळीवर चालणारया या क्रियेला ’माया’ असे म्हटले जाते. आणि विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारया मायेला ’आवरण’ म्हणतात.

’आवरण’ मध्ये वेगवेगळी माणसं आहेत, त्यांची स्वत:ची अशी वेगळी विचार-बैठक आहे. कादंबरीची Protagonist रझिया (जी पुर्वाश्रमीची लक्ष्मी असते. आमीर नावाच्या वर्ग-मित्राबरोबर लग्न केल्यानंतर तिने धर्म बदललेला असतो). तिच्या आयुष्यातला एक कालखंड कोणीतरी लिहून ठेवलेला असावा आणि त्या अनुषंगाने तिच्या परिघात आलेल्या इतरांचाही पंचनामा व्हावा अशा रितीने कादंबरी लिहिली गेलेली आहे. संपूर्ण पुस्तकात ’ हा बघ पुरावा, आहे की नाही सत्य??’ असा रोकडा सवाल आणि जवाब (जर पुरावा असेल तर अर्थात! नाहीतर आक्रस्ताळेपणा) अशा अभिनिवेषातले जाबसाल आहेत.

’आवरण’ची कथा उलगडते कर्नाटकमधल्या हंपीमध्ये. भग्नावषेशांवर डॉक्युमेंटरी करायला आलेली रझिया तिथली भग्न नरसिंहाची मूर्ती पाहून विषण्ण होते. त्या भग्नावषेशांचं कारण वैष्णव-शैव यांच्यामधला वाद सांगीतला गेलेला असला तरी हिंदु संस्कारात वाढलेल्या रझियाला हिंदु लोकांकडून असे कदापिही होणे शक्य नाही याची मनात कुठेतरी खात्री असते, त्यामुळेच काहीतरी चुकत असल्याची जाणीव तिला होते. त्याला पुष्टी मिळते तिच्या स्वर्गवासी वडीलांनी ’इस्लाम’वर केलेल्या अभ्यासाच्या टिपणांनी. त्या वाचनातून बाहेर आलेल्या सत्याने ती हादरुन जाते. ’आवरणा’ची सर्वात प्रथम जाणीव रझियाला तेव्हाच होते. मग झाकोळ दुर झाल्यावर ती आपलं ज्ञान इतरांबरोबर वाटायचा प्रयत्न करते तेव्हा डोळ्यांवर झापडं ओढून बसलेल्या लोकांपर्यंत तिला काय सांगायचेय ते कसं पोहोचत नाही, पोहोचत असलं ते स्वीकारायला नाखूष कसे असतात, त्यातून तिची निर्भत्सनाच कशी होते हे सर्व त्या ’आवरणा’च्या जाणीवेबरोबर आलेले आहे.

’आवरण’ मधली सर्वात प्रभावित करणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे रझियाने देऊ केलेली थोडक्यात भैरप्पांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेली दिड-एकशे पुस्तकांची संदर्भसूची. ’आवरण’मध्ये रझिया तिच्या पुस्तकावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर म्हणते, "माझ्या कादंबरीला या सर्व पुस्तकांचा आधार आहे. जर माझ्या पुस्तकांवर बंदी घालायची असेल तर त्याआधी या प्रत्येक ग्रंथावर बंदी घातली पाहिजे." या माणसाचा व्यासंग पाहून चकीत व्हायला झालं आणि त्यांच्याबद्दलचा आदरही दुणावला. त्यांच्या ’पर्व’ बद्दल कुठेतरी वाचलं होतं की ती कादंबरी लिहीण्याच्या आधी सहा-साडेसहा वर्षं ते फ़क्त महाभारतावरच्या पुस्तकांचं वाचन करत होते. ’लई भारी’ म्हणून संदर्भसूची चाळायला लागतो आणि थबकायला होतं...
इथं एक मेख आहे.
सीताराम गोयल- हिंदुत्ववादी लेखक, राम स्वरूप-हिंदुत्ववादी, व्ही.एस.नायपॉल-Anti-Islamic लेखक, अरूण शौरी-इस्लामचे टिकाकार. या सर्वांची पन्नासेक पुस्तकं आहेत.
’आवरण’ मध्ये कुठेतरी भैरप्पा म्हणतात की "ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता, थेट त्याच्याकडे बघण्याचा प्रामाणिकपणा हवा". विशिष्ठ वर्गाचा कैवार घेऊन लिहीणारया या सर्व लेखकांच्या लिखाणाचे दाखले देऊन भैरप्पा काय सुचवू पाहतायेत??
अल्बेरूनी, जदुनाथ सरकार, प्रियोळकर, स्टॅनली-पूल ही सर्वसमावेशक नावं संदर्भसूचीकरता आणि पुस्तकात दाखले देताना मात्र सीतराम गोयल बियल प्रभृती असा प्रकार झालाय असं वाटायला लागतं. मागचे पुढचे सर्व संदर्भ वगळून आपल्याला सोयिस्कर तेव्हढीच सत्यं उचलायची आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायचं. म्हणजे अंगावर शेकलंच तर "बघा बघा, मी याच पुस्तकातून संदर्भ घेतलाय. माझ्या पुस्तकावर बंदी आणायचिये तर या पुस्तकावर पण आणा" असा कांगावा सहज करता येतो. असं बरेच लेखक करतात. असो, मी ही सर्व पुस्तकं वाचलेली नाहीएत त्यामुळे भैरप्पांच्या लिखाणावर याहून जास्त शंका घ्यायचा मला हक्क पोहचत नाही.

’आवरण’च्या कथेमध्ये आणखी एक समांतर कथाप्रवाह आहे तो म्हणजे मूळ राजपुत असलेल्या पण नंतर खोजा (तृतीयपंथी) बनवल्या गेलेल्या ख्वाजाजहानचा. रझिया ’औरंगजेबाच्या’ काळावर एक कादंबरी लिहीते आहे त्यातले हे मुख्य पात्र. शेवटच्या क्षणी कच खाऊन इस्लाम स्वीकारलेला नंतर समलिंगी संभोग, जबरदस्तीने नपुंसक करणे इ. नी अपमानित केलेला ख्वाजाजहान. रझियाचा मनात चाललेले द्वंद्व, तर्ककुतर्क, भरकटलेपण या ख्वाजाजहानच्या कहाणीत सहीसही प्रतिबिंबीत झालेले आहे. या लिखाणाला तिच्या वडीलांच्या मॄत्यूची पार्श्वभूमी आहे. तिने धर्मांतर केल्याने कायम दुरावलेल्या वडीलांचं आपण क्रियाकर्मही करु शकलो नाही ही खंत तिला खाते आहे. आपण मुळातच धर्म बदलला ते चूक की बरोबर, मग मूळत: ज्या धर्मात होतो तो धर्म आपण आहोत त्या धर्माहून किती सहिष्णू आहे याबद्दल तिला वारंवार येत असलेली प्रचिती, त्यासाठी तिच्या वडीलांनी इस्लामवर केलेल्या गाढया अभ्यासाची टिपणं आदीची मदत होते, मग तिचे होणारे मतपरिवर्तन हे सर्व सर्व ख्वाजाजहानच्या कहाणीतही आहे. म्हणजे थोडक्यात ती कुठेतरी रझियाचीच कहाणी आहे. ख्वाजाजहान आणि एका तपस्व्याची गंगेच्या काठावर पडलेली गाठ आणि त्यांच्यामधला धर्मावरचा संवाद केवळ वाचावा असाच आहे.

छोट्याछोट्या वाक्यातून किंवा प्रतीकांमधून वाचकाला सुन्न करण्याची भैरप्पांची हातोटी विलक्षण आहे. रझिया आणि तिच्या वडीलांमधल्या संवादाची या ३०० पानी पुस्तकात फ़क्त सहा-एक वाक्यं आहेत. त्यातलं एक वाक्य असं आहे- "तू एकटीने आपल्या आयुष्याचं काय करून घेतलंस हा प्रश्न नाही. तुझ्या पोटी जन्मणारं मूल किंवा त्याचं मूल, कुठल्या ना कुठल्या पिढीत आपल्या देवालयाचा नाश करेल. ते पाप तुझ्या डोक्यावर राहील, लक्षात ठेव!"
हे वाचून आपण दुसरया वाक्याकडे वळतो न वळतो तोच त्यातल्या गंभीर शक्यता ध्यानात यायला लागतात आणि आपण गडबडून जातो. मग तो ख्वाजा-जहानच्या Castrationचा प्रसंग. तो इतका भीषण आहे की वाचक "स्स.." केल्याशिवाय राहत नाही. किती लोकांना तृतीयपंथी बनवले गेले, किती स्त्रियांना जनान्याची वाट दाखवण्यात आली, किती हिंदु मंदिरं तोडून मशिदी बनवल्या गेल्या इ. औरंगजेबांच्या जनतेवरच्या अत्याचाराचा लेखाजोखा वाचून आपण मूळ रझियाच्या कहाणीत येतो तेव्हा तिच्याशी इतके समरस झालेलो असतो की राजधानीच्या शहरातल्या एका रस्त्याला या कॄर, असहिष्णु राजाचे नाव दिलेले बघून रझियाबरोबर आपणही उद्विग्न होऊन जातो.

’आवरण’ मधलं एकही पात्र विना-प्रयोजन नाही.
लक्ष्मी उर्फ़ रझिया, तिचा नवरा आमीर-त्याचे कटटर मुसलमान आई-बाप, लक्ष्मीचे वडील, प्रोफ़ेसर शास्त्री (हे पात्र भैरप्पांचे वैचारीक प्रतिस्पर्धी यु.एन.अनंतमुर्तींवर बेतल्याचे म्हटले जाते, त्यावर अनंतमुर्तींनी सडकून टिका केल्याने ’आवरण’वर वाचकांच्या आणखी उडया पडल्या), रझियाचा सौदीमध्ये असलेला कटटर मुसलमान मुलगा नझीर-आजच्या आधुनिक जगातही कटटरपणाची कास पकडून चालणारया मुलांचे प्रतिनिधीत्व करणारा, शास्त्रींचे आई-वडील-मुलगा-सुन-बायको, केंचप्पा आणि इतर सर्व. धर्मांतराच्या मुद्द्यावरून, Post-धर्मांतर परिस्थितीवर रझियाचे बरेच मोनोलॉग्ज आहेत.(इथे मला भैरप्पांनी RSSच्या व्यासपीठावरुन धर्मांतराविरुद्ध चळवळी चालवल्या होत्या त्याची आठवण झाली), टिपू हा प्रत्यक्षात क्रूर राजा आणि कटटर मुसलमान असला तरी त्याला सहिष्णु रंगवण्यात हात असलेल्या लेखकांचा संदर्भ आहे. इथे गिरीश कर्नाडांनी ’टिपु हा आतापर्यंतचा थोर कन्नडीगा आहे’ असे उद्गार काढल्याचा आणि त्यांच्या टिपुवरच्या ’The Dreams of Tipu Sultan’ किंवा ’बळी’या नाटकाचा आणि त्यातून कर्नाडांनी टिपूच्या केलेल्या उदात्तीकरणाचाही अप्रत्यक्ष उल्लेख येतो.. मात्र.. प्रोफ़ेसर शास्त्रींच्या कॅथलिक बायकोने आई-वडीलांच्या मर्जीविरुद्ध शास्त्रींशी लग्न केलेले असताना तिच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला तिचा कडवा विरोध का असावा किंवा रझियाचे वडील मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करताना फ़क्त देवस्थानांच्या विध्वंसांबद्दल आणि मुस्लिम राजांनी ओलीस ठेवुन घेतलेल्या राजपुत्रांबद्दलच टिपणं का काढून ठेवतात याचा उलगडा होत नाही. आपल्या सोयीची तेव्हढी सत्यं इतिहासातून उचलण्याचा आणखी एक प्रकार इथे जाणवला. ह्या छोट्या गोष्टी सोडल्या तर कादंबरी आपल्याला बरयाच ठिकाणी अंतर्मुख करून जाते, विचार करायला भाग पाडते.

ही कादंबरी वाचताना काही वर्षांपूर्वी ’शिक्षणाचे भगवीकरण’ झाले होते त्याची आठवण येणे साहजिक आहे. पाय-उतार झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या सो कॉल्ड मुस्लिमधाजिर्ण्या धोरणाला सणसणीत प्रत्युत्तर म्हणून NDA सरकारने ही खेळी केली होती. पाठ्यपुस्तकं बदलली, मध्ययुगीन काळात( म्हणजे दिल्ली सल्तनतीच्या, मोघल काळात थोडक्यात ’मुस्लिम’ कारकिर्दीत) भारताची किती आणि कशी वाताहत झाली (जे तद्दन खोटं आहे असंही मी म्हणणार नाही, पण जे तद्दन खरंही नाहीये) याची रसभरीत वर्णनं घुसडली. पण सुदैवाने त्या सरकाराला पाय-उतार व्हायला लागले आणि आपल्यासकट आपल्या पुढच्या पिढ्यांना adulterated इतिहास वाचावा लागण्याची आफ़त टळली. I wonder, RSSप्रणित ’या’ आवरणावर भैरप्पांनी लिहीलं असतं का?

कोणाच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवणं ही शिकवण हिंदु धर्म देत नाही. (मला आठवत असलेले) पुष्यमित्र शुंगाने बौद्ध स्तूपांची तोडफ़ोड केल्याचे उदाहरण वगळता हिंदू राजांनी इतर धर्माच्या लोकांना त्रास दिलेला नाही, ना त्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवला. उलट त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा होती. हिंदु राजांनी अरब व्यापारयांना मशिदी बांधण्यास परवानगी दिल्याचे( जरी त्यामागे त्यांचा आर्थिक हेतु होता तरी)दाखले इतिहासात आहेत. हा हिंदु धर्माचा मोठेपणा आहे. देवळात जायचं की नाही हे ठरवायचं स्वातंत्र्य हिंदु धर्मातल्या लोकांना आहे, वेळप्रसंगी आपण आपल्या दैवतांची चेष्ठाही करु शकतो. पण.....हिंदु धर्माचे दाखले देऊन इस्लाम कसा क्रूर हे दाखले देण्यात काहीच हशील नाही. प्रत्येक धर्म आपपल्या परीने वेगळा आहे, प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबरांनाच ’अल्लाह’ असे म्हटले जाते, मूर्तीपूजा त्यांच्यात वर्ज्य आहे, कुठल्याही ’दार-उल-हरब’(अमुस्लिम) प्रांताला ’दार-उल-इस्लाम’ बनवणे म्हणजे मेल्यानंतर पैगंबरांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही शिकवण त्यांना दिली जाते. काफ़ीर (अमुस्लिम) माणसापुढे दोनच उपाय- मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. मग पुढे दिल्ली सल्तनतीच्या राजांनी मांडवली करून त्यात ’जिझिया’ वगैरे घातला. असं सगळं असताना इथे राज्य करायचं स्वप्न घेऊन आलेल्या या ’गाझी’ लोकांनी त्यांचा धर्म सांगेल ते केलं. ते समर्थनीय मुळीच नाही. कोणाचा धर्म काहीही सांगो, माणसाने माणसांविरुद्ध जे काही केलं ते निंदनीयच आहे. राजेशाहीत, एकाधिकारशाहीत राजवटींकडून जनतेवर बरेच जुलूम होत आले आहेत. त्याला हिंदु राजेही अपवाद नाहीत. वैदीक काळात मनुवाद्यांनी जे केलं ते तिरस्करणीयच आहे. पण हिंदू धर्माने मनुच्या चुकांची जबाबदारी प्रांजळपणे घेऊन त्यत सुधारणा घडवण्याची तयारी दाखवली (असं भैरप्पा म्हणतात) आणि तेच इस्लामकडून अपेक्षित आहे. झाला तो इतिहास आहे. आपण त्याबद्दल ’आज’ काही करु शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्याकडे तटस्थपणे पाहायची वृत्ती जोपासणं, त्यातल्या चुकांमधून धडे मिळवणं अपेक्षित आहे. पण त्याकाळात तू माझी देवळं फ़ोडली म्हणून आज मी तुझ्या मशिदी फ़ोडतो असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्याने प्रश्न अजून धगधगत राहणार आणि चुकांमधून शिकण्यापेक्षा त्यांचं समर्थन करण्याची, जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढीस लागेल. भैरप्पा म्हणतात, "इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती, आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही." दुर्दैवाने ही गोष्ट आज कोणी ध्यानात घेताना दिसत नाही.

कादंबरीचा रागरंग काहीही असला तरी पण कादंबरीचा शेवट आमीरच्या किंवा लक्ष्मीच्या धर्मांतराने झालेला नाही. परस्पर-सामंजस्य हे सत्यावर टिकून राहतं, दिशाभूल करुन नाही. आपला धर्म अजूनही सनातन आहे, आपल्या धर्मात स्त्रियांना शिक्षण नाही, इतिहासातल्या आपल्या धर्माकडून घडलेल्या चुकांना बेमालूम झाकून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या चुकांची पुनरावृत्ती घडता कामा नये, "आमच्या पुर्वजांच्या चुकांना आम्ही जबाबदार नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत" हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे , हे आमीरने प्रांजळपणे स्वीकारणं यात भैरप्पांना कादंबरीचा शेवट आशादायक करायचा आहे हे आलंच. आणि इथेच भैरप्पा इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

"आवरण शक्तिस्तावदल्पोsपि मेघोsनेकयोजनायत्मादित्यमंडलमवलोकयितृ नयनपथपिधायकतया्सच्छादयतीव..."

एखाद्या लहानशा ढगानेमध्ये येऊन अनेक योजने विस्तार असलेल्या सूर्यमंडळाला दृष्टीआड करावं , त्याप्रमाणे आवरण शक्ती सत्याला झाकोळून टाकते.

’आवरण’ वाचून आपल्या बुद्धी-विचारांवरची झापडं काही प्रमाणात दूर झाली आणि आपण असत्यापासून मुक्त होऊ शकलो तर ते ’आवरण’चे आणि पर्यायाने ’एस.एल.भैरप्पा’सारख्या सिद्दहस्त लेखकाचे यश मानले जाईल.

 
Designed by Lena