उत्तररात्र-५

(मुंबईच्या झगमगत्या भागातलं एक रेस्टॉरंट)
(ती दोघं बाहेर पडतात. तिच्या चेहऱ्यावर हरवल्यासारखे भाव आहेत आणि तो तिच्याकडे काळजीने पाहतो आहे. ती चावीवरचं बटण दाबते आणि कुठेतरी जवळच गाडीचं बीssप ऐकू येतं. ती जाऊन गाडीचं हॅंडल फिरवते, पण गाडीचं दार जाम उघडत नाही. ती जोर लावून पुन्हा एकदा हॅंडल पिरगाळते)

- ए..

(ती अजून दाराशीच झटते आहे)

- शिट्..या दाराला काय धाड भरलिये आता. (ती जोराने हॅंडल खडखडवते आणि मग सॉलिड वैतागून दाराला लाथ घालते)

- अगं.. काय करतेयेस??

- दीस डोअर वोsण्ट फs कींss ग ओपनsss.. (हाताने हॅंडलचा खडखडाट चालूच)

- अगं. ही आपली कार नाहिये. आपली कार बघ ही बाजूचीये.

(ती गप्पकन थांबते. एकदा त्याच्याकडे पाहते, एकदा बाजूच्या गाडीकडे पाहते आणि सुस्कारते)

- काय झालंय तुला?

- व्हॉट डू यू मीन?

- कोण होता तो?

- कोण?

- मी पाहिलं तुला त्याच्याशी बोलताना. माझी ओळख का नाही करून दिलीस?

- ….

- मी बिल पे करेपर्यंत निघाली देखील होतीस

(ती दार उघडून आत बसते, तोही तिच्या पाठोपाठ गाडीत जाऊन बसतो)

- ए..सांग ना कोण होता तो?

(तिने बॅकरेस्टला टेकून डोळे मिटून घेतलेत)

- माझ्या आधीच्या कंपनीत काम करायचा.

- आणि..??

- सोड यार.. आपण घरी जाऊ या

(ती गाडी सुरू करते, तो वाकून इग्निशन बंद करतो आणि चावी काढून घेतो)

- वेल..?

- बिलिव्ह मी, ऑफ ऑल द पीपल, तुला हे ऐकायला आवडणार नाही.

- का? का? का?

- लीव्ह इट प्लीज.

- अक्कल आहे मला. थोडीफार कल्पना करू शकतो मी.

- असं? काय कल्पना केलीस तू?

- त्याला आवडत असशील तू.

(ती डोळे उघडून त्याच्याकडे एकवार पाहते आणि थेट त्याच्या डोळ्यांत बघून बोलते)

- कंपलीट अपोझिट. मला प्रचंड आवडायचा तो.

(त्याचा चेहरा खर्रकन उतरतो)

- टोल्ड यू.

- नो.. आय अॅम फाइन. गो अहेड.

- आर यू शुअर?

- शट अप. सांगतेस का आता.

- नव्याने लागले कंपनीत तेव्हा ओरिएंटेशनला माझ्यासोबत होता. मला तर तो त्याला भेटले त्या पहिल्या दिवसापासूनच आवडलेला. त्यानंतर मी बरेच कल्पोकल्पित सीनारीयो तयार करुन त्याला आपणाहून भेटले, त्याच्याशी बोलले. मग त्यानेही स्वत:हून बोलायला सुरुवात केली.

- दॅट्स सो अनलाइक यू. तू स्वत:हून कोणाशीच बोलत नाहीस.

- आय नो.

- इतका चांगला होता का तो?

- अरे, साधा होता रे एकदम. एकदम मस्त.

(तिच्या प्रत्येक कॉंप्लीमेंटनिशी त्याचा चेहरा बदलत चाललाय याकडे तिचं लक्ष नाहीये)

- तेव्हा माझी के
सांचा क्रू कट असणारे, फॉर्मल्स घालणारे पुरुष आवडण्याची फेज सुरू होती. तो एकदम शाय आणि मी आडमुठी. कोणी शेवटपर्यंत मुद्द्याचं काही बोललंच नाही. सकाळी ब्रेकफास्टला बोलणं व्हायचं तितकंच आणि त्यानंतर दिवसभरात समोरासमोर आलो तर. आमचा प्रोडक्शन एरीया आणि कॅफेला जोडणारा एक चिंचोळा कॉरिडॉर होता, तिथेच भेटायचो आणि बोलायचो बहुधा. आमच्यामुळे माझे मित्र त्या कॉरिडॉरला ‘व्हिस्परिंग कॉरिडॉर’ म्हणायचे.

- हा! (तो कुचकटासारखा म्हणतो) तो तर हॉरर मूव्ही होता. तुमची लव्हस्टोरी हॉरर स्टोरी झाली का मग?

(ती रिकाम्या नजरेने त्याच्याकडे बघते आणि तो वरमतो)

- सॉरी! प्लीज कंटिन्यू!

- माझ्या मित्रांची लाख इच्छा होती मध्यस्त म्हणून मध्ये पडण्याची, पण माझ्या धाकाने कोणी काहीच केलं नाही. मला माझ्या खाजगी आयुष्यात कोणीच लुडबुड केलेली चालायची नाही..हो, तेव्हाही नाही चालायची. त्यामुळे कोणीच काहीच केलं नाही. आम्ही तसंच, तितकंच बोलत राहिलो. त्याहून जास्त काही करण्याचे ना मी प्रयत्न केले, ना त्याने.

- हम्म

- मग मला मुंबईतला हा जॉब मिळाला. मनासारखा. मी खूप वर्षांपासून वाट पाहात होते असा. पण निघायची वेळ आली तशी मात्र पाय निघेना.

- ...

- मला त्याचा निरोप घ्यायचा होता, झालंच तर तो किती छान मनुष्य आहे हे त्याला सांगायचं होतं, पुढे कधीतरी भेटायच्या, बोलायच्या शक्यता तयार करायच्या होत्या. पण, कशाच्या जोरावर? तसं बघायला गेलं तर आमच्यात काहीही नव्हतं, पण त्याचवेळी खूप काही होतं. तुला माहितिये? मी टेकपार्कच्या बसने यायचे-जायचे. ट्रॅफिकने माझं डोकं जाम फिरलेलं असायचं. पण एकदा का ते ट्रॅफिकवालं एक्स्टेंशन अोलांडलं की टेकपार्क दिसायला लागायचं आणि त्या टेकपार्कमध्ये हा असणार आहे या विचारानेच माझी अॅंक्झायटी गायब व्हायची. विचार कर, मला बरं वाटायला लावण्याइतपत ते लोभस होतं. त्यामुळेच मला वाटतं मी घाबरले. मला त्यावेळी माझ्यात आणि त्या संधीच्या मध्ये कोणी आलेलं नको होतं.

- ए प्लीज.. प्लीज टेल मी, तू जाते आहेस इतकं तरी सांगीतलंस ना?

(ती आतापर्यंत मख्खपणे बोलतेय पण आता तिचे डोळे तिला दगा देतायेत. तो गाडीतून बाहेर पडतो आणि बाजूच्या टपरीवरून २ कप चहा आणतो. तोपर्यंत तिचं रडून झालंय आणि शेवटचं सूं सूं सुरू आहे)

- घे.

(ती चहाचा कप घेते)

- टू आन्सर युअर क्वेश्चन, मी जाते आहे कायमची हे पण नाही सांगीतलं त्याला. मी राजीनामा दिलाय हे त्याला कळायची सुतराम शक्यता नव्हती. तसं पाहायला गेलं तर फोन, इंटरनेटने जग किती जवळ आलंय. संपर्क ठेवता आला असता.. पण, मी मुंबईला येऊन फोन नंबर बदलला, ईमेल आयडी सुद्धा बदलला आणि त्याच्या-माझ्यामधला शेवटचा दोरही कापून टाकला. खूप खूप हलकटपणे वागले मी.

- का एक्झॅक्टली?

- नाही माहित. ठाम उत्तरं मिळण्याची, नव्या शक्यतांनी पाय अडकून पडण्याची भीती वाटली बहुतेक. तेव्हा माझी तयारी नसावी.

- आय सी.

- पण, आज त्याला इतकं खूष पाहून पोटात तुटलं माझ्या. खूप दुखलं आत कुठेतरी. आय नो, मला असं वाटायला नकोय, असं वाटणं चूक आहे. मला तो खरंच आवडत असेल तर त्याच्या खूष असण्याने मला आनंद व्हायला हवा. पण, मला वाटलेलं की त्याने मला खूप मिस केलं असेल, मला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं असेल. आणि आज शेवटी एकमेकांसमोर आल्यावर तो मला जाब विचारेल, ताडताड बोलेल.. मला शिव्या घालेल..पण, तो काहीही न झाल्यासारखाच बोलला. फक्त २ मिनीटं.

(तिला पुन्हा रडण्याचा उमाळा येतो. पण यावेळी तो बाहेर जात नाही. तिचा हात हातात धरुन बसून राहतो)

- माझ्या एका फुलपाखरी वर्षाची २ मिनीटांत वासलात लागली. त्याला काही फरक पडलाच नाही मेबी. मेबी आमच्याच खरंच काही नव्हतं. माझ्या कल्पनेचे खेळ सगळे. व्हॉट द फक आय एक्स्पेक्टेड? शिट्.. दिस इझ सो सिक!

- एss यार..

- मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, संसार थाटायचा होता असंही नव्हे अरे, पण, होय-नाहीचे उत्तर माहित नसलेल्या प्रश्नाचं उत्तर इतकं मुस्काटात बसल्यासारखं मिळेल याचीही मनाची तयारी नव्हती.

- चलो यार, कोई नही. आपण त्याचं घर उन्हात बांधू.

(ती हसत चुकचुकते)

- चलो, अब अपने बिगर-ऊनवाले घर चलते है.

- जरुर! पर, गाडी हम चलाएंगे.

(तो ड्राइव्ह करतोय, तिला डुलकी लागलिये आणि तो मनाशीच विचार करतोय)

"न बोललेल्या गोष्टींमध्येच कितीतरी गर्भितार्थ लपलेले असतात हे तूच मला शिकवलंस, मग ही शक्यता तुझ्या डोक्यातून कशी निसटली? त्याला फरक पडला असं नाही अगं. कदाचित त्याला नको तितका फरक पडला असेल."

कारण,

रेस्टॉरंटमध्ये तिची पाठ वळल्यावर बेदरकारपणे हसणाऱ्या त्याचा विद्ध झालेला चेहरा त्याने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला होता.

"सांगावं का तिला? की नको, असंच तडफडत ठेवावं?"

"सांगूनच टाकावं? पण त्यानंतर व्हॉट इफ शी लव्ह्ज मी लेस? मी तिच्या आयुष्यातून बाहेर गेलो तर??

"व्हॉट आर यू सेईंग मॅन?"

"शी विल बी हॅप्पी अगेन. नो, शी 'इझ 'हॅप्पी विथ मी.. पण ती त्याला विसरलेली नाही आणि कधीच विसरणार नाही. ती माझ्यासोबत का आहे मग? माझ्यामध्येही तिला तोच दिसतो का?"

"शिट यार, यू आर सिक्. सिक् सिक् सिक्."


(मग तो स्वत:चीच निर्भत्सना करत असताना, त्याच्या इनसिक्युरिटिजच्या दलदलीत, स्वत:विषयीच्या अविश्वासाच्या गचपणात रुतत चाललेला असताना त्याच्या स्वत:च्या कस्टममेड नरकात बाहेरची रात्र आणखीनच काळीकुट्ट होत जाते.)

--

याआधीचे: उत्तररात्र-१ उत्तररात्र-२उत्तररात्र-३ | उत्तररात्र-४
 
Designed by Lena