ओव्हर-सेंटिमेंटली युअर्स..

स्वत:चं घर वीटेवीटेने चढताना पाहणं म्हणजे मुलाला पोटात मायेने वाढवण्यासारखंच असतं.

म्हणजे असावं.

समोरच्या होऊ घातलेल्या बंगल्याचं प्लॅस्टरिंग चाल्लंय आणि घराच्या समोर प्लॅस्टरकरता सिमेंटच्या गोण्या येऊन पडल्यात. त्याचा एक पिरॅमिडसारखा डोंगर करून घेतलाय. त्यावर फतकल मारून बसणं आणि पिठाच्या गिरणीतल्या भैय्याचे जुळे भाऊ असावेत अशा मजूरांचे काम पाहात बसणं हा माझा फावल्या वेळातला विरंगुळा बनलाय आताशा.

त्याच्या एका तालात होणाऱ्या हालचाली, काळ्यासावळ्या दंडातल्या घडीव स्नायूंची लयबद्ध उठबस पाहताना मंत्रावल्यासारखं होतं.
मार्चला हे काम संपेल तेव्हा या सगळ्याची जाम आठवण होत राहणार आहे.

या मजूरांची मुलंही त्यांसोबत असतात पण त्यांचा बिलकुल त्रास नसतो. नखशिखांत दिगंभर बटूमूर्तींपासून ते शहण्या भावंडापर्यंत सर्व वयोगटातली मुलं असतात तिथं.

त्यातलंच एक बुटकं बंगल्यांना घातलेल्या कुंपणातून, झाडा-फुला-पानांमधून बेदरकार फिरत असतं.

आज त्याचा मूड नसावा. त्याने त्या बंगल्याच्याच जास्वंदीच्या झाडाला हात घातला आणि कुंपणातल्या जास्वंदाचं फुल तोडलं. तोडलं म्हणजे आजूबाजूच्या चार-पाच पाना-काटक्यांसह अतिशय धसमुसळेपणाने तोडलं.

मी ताठ झाले कारण मला काहीतरी ऐकायला आलं.

मग त्या मुलाने त्या फुलाला चारी बाजूने न्याहाळलं. बोटभर देठासह झाडापासून तुटून आलेलं ते फुल अतिशय रसरशीत लाल रंगाचं अतिशय देखणं फुल होतं. त्यावर रक्तवर्णी रेषा होत्या. देठाचा वरचा फुलाचा भार तोलणारा असलेला मुकूट अतिशय साजिऱ्या पोपटी रंगाचा होता.

आणि नंतर त्या मुलाने जे काही केलं ते अनपेक्षित होतं.

त्याने त्या फुलाची एक पाकळी उचकटली, फुलावेगळी केली. आणि तो तिथेच थांबला नाही. त्याने त्या पाकळीच्या घड्या घालायला सुरूवात केली. प्रत्येक घडी घातली की तो त्या घडीवरून नख फिरवायचा, आपण कागदाची होडी करताना कागदाच्या कडांवरून फिरवतो तसा.

फुलाला आवाज असता तर ते कशा प्रकारे किंचाळलं असतं याचा मला अंदाज लावतच मी बसल्या जागी हादरून गेले.

त्यानी अतिशय थंडपणे प्रत्येक पाकळी उलून काढली, आणि तिच्या इतक्या बारीक घड्या घातल्या की प्रत्येक घडीसरशी कच्च असा आवाज येत होता. रस्त्यावर बिनघोर पडलेल्या बुचाच्या फुलांवरून मोटरसायकली निघून जातात तेव्हा कच्च आवाज येतो तसा.

मग त्याने त्या हिरव्या मुकूटाकडे आपला मोर्चा वळवला, तो देठावेगळा केला, तो जमिनीवर टाकला आणि त्यावर पायाची टाच कचकचून  घासली. आणि मग तो चहा-पाव खायला गेला.

माझ्या डोक्यातल्या ऑडिटरी हल्युसिनेशन्सनी माझे पाय एव्हाना शेणामेणाचे झालेले, पण मी जाऊन त्या फुलाचं कलेवर उचललं. पाकळ्यांची दुमड काढली, बोटांनी ती पाकळी सारखी करायचा प्रयत्न केला पण ती पाकळीच्या अक्षरश: धांदोट्या झाल्या होत्या आणि त्या विचित्र कोनात लोंबत होत्या.

आधी नितळ, मऊसूत पाकळ्यांवर आता काळ्या, कुरूप रेषा उठल्या होत्या आणि त्यातून चिकट पाणी गळत होतं.

देठाचा पत्ता नव्हता. कूटातला धागा न धागा सुटा झाला होता.

मी पाहिलंय भीषण आपघातात सापडलेल्यांचे असे निरनिराळे अवयव गोळा करून घेऊन जाताना.

तो तरी अपघात होता. हे तर निव्वळ क्रौर्य. फावल्या वेळातलं, वेळ जात नाही म्हणून घडलेलं.

आणि त्यात त्या फुलाचा हकनाक बळी गेला.

फुलाच्या किंचाळ्याचे पडसाद रक्ताच्या थारोळ्यासारखे सबंध आसमंतभर पसरलेले होते. त्या फुलाइतकेच रक्तवर्णी, कानाचे पडदे जाळ्णारे.

गोष्टी बोलतात. आपण ऐकायला शिकलं पाहिजे. आपण कधी ऐकून घेत नाही.
हे कोणीतरी दुसऱ्याने लिहिलेलं वाक्य असेल, तर वाचताना वाटतं, काय डीप बोलतोय. पण का शिकलं पाहिजे? हा मला कालांतराने पडायला लागलेला प्रश्न.
तुम्ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुमच्या वेदनांमधलं गांभीर्य, कळकळ कोणालाच कळत नाही. ते फक्त आपल्यालाच कळतं. मग जे आपल्यालाच कळतं, ते आपल्यापाशीच राहू द्यावं.

लोकांपासून दूरदूर करण्याची, प्रेम न जडवायची सवय होऊन गेलीये आपल्याला. ती मरणं आता काहीशी मॅनेजेबल झालियेत. मग ही अशी नस्ती लफडी आपण आपल्या डोक्याला का लावून घेतो? अशी  शंभर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट मरणं पुन्हा पुन्हा का मरतो?

मुराकामी म्हणतो की, वेदना क्षणिक असते पण तिचे भोग भोगायचे की नाहीत हे आपल्या हातात असतं. (हे अशा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट टॉर्चरलाही लागू आहे) माझ्याही हातात आहेच की, मला काय वाटतं माहितिये? माझ्यातून वेदना आणि तिच्या भोगांमधून वाटणारं ते अतिविचित्र सुख काढून घेतलं तर मी मातीच्या गडग्यासारखीच बनेन. लोक त्याला फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स का म्हणेनात, मला ते प्रिय आहेत.

वेदनांना वळसा घालून कसं जायचं हे शहाण्यांना उत्तम कळतं म्हणे. निदान ते अशा मार्गांच्या शोधात असतात.
इथे सालं शहाणं कोण आहे?

आपण आहोत?

नसलो तरी आपल्याला बनायचं आहे का?

आणि तसंही, हे भोग बिग भोगणं सरावातून अंगवळणी पडतं असं वाटतं, कारण मग जग का उलथेना का तिथे - मला भूकही तेव्हढीच आणि एरव्हीसारखीच लागते आणि झोपही बिनघोर लागते.

--

कुठल्यातरी एका पुस्तकात बाल गणेश एका राक्षस ढेरीवर बसलाय असं चित्र पाहिलं होतं. मला त्या राक्षसाचं खूप वाईट वाटलं होतं.

सगळ्या राक्षसांना डार्क सर्कल्स का असतात? पाताळलोकात त्यांच्या व्यथा ऐकून घेणारं अ‍ॅगनी आण्टसारखं कोणी नसतं का? 'डेव्हिल मे केअर' नावाची हेल्पलाइनही नाही? मेल्यानंतरच्या करीअर अपॉर्च्युनिटी शोधणारं माझ्यासारखं भैताड कोणी आहे का?

ऑन दॅट नोट-
आता माझ्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी व्हायला लागली आहेत.

ही चांगली बातमी आहे. वाटलं, कळवावं.
 
Designed by Lena