लॉकडाउन ब्लूज - २

 आपण खूपदा खूप साऱ्या गोष्टी गृहित धरतो.

उदाहरणार्थ - उद्या इंडक्शन कुकर सुरू होणारच आहे, मी उद्या आयवा मारू पुन्हा वाचायला घेतलं तर ते मला आवडणारच आहे, चारशे रिव्ह्यूज वाचून घेतलेले चार आकडी किमतीचे हेडफोन्स उद्या चालतीलच इ.

आणि या गोष्टींमधली एखादी गोष्ट जशी घडायला हवी होती तशी नाही घडली किंवा जशी असायला हवी तशी नसली तर, पायरी निसटून धाड्कन पडल्यासारखं वाटतं. मला स्वप्नही बऱ्याचदा असंच पडतं..मी आपली भेडकांडत, कोलांट्या उड्या मारत सत्राशे साठ पायऱ्यांवरून गडगडत खाली येते आहे, माझं शरीर ठेचकाळतं आहे, विचित्र कोनात आपटतं आहे..पण मला - म्हणजे स्वप्न पाहणाऱ्या मला - त्याबद्दल काही करता येईल असा स्कोप नसतो. माझं ते दुर्दैवी लॅंडिंग झोपेतल्या स्वप्नात हताशपणे पाहात बसण्यापलीकडे माझ्या हातात काही नसतं. मला त्याबद्दल काही करता येईल का - असं मी खूपदा वाटून घेतलं आहे. मला स्वप्नातही स्वत:वर कंट्रोल मिळावा, माझी स्वप्नं मला वाटेल त्या पद्धतीनेच पडावी, अमक्या ठमक्या रितीनेच घडावीत असंही मला खूप वाटतं आणि मी यासाठी खूप प्रयत्नही केलेले आहेत. पण स्वप्नात नेमका तो उपरतीचा, कलाटणीचा क्षण येतो आणि माझी झोप खाड्कन उघडते... 

आणि मग मला त्या अधमुऱ्या झोपेतही पायरी निसटून धाड्कन पडल्यासारखं वाटतं.

तर अशी ही गृहितकं.

काही विचित्रकं असतात जी खास आपली असतात, प्रोप्रायटरी असतात.. ती एकाची दुसऱ्यासारखी नसतात. एखाद्याचा एखादा पेन असतो जो काहीतरी खास लिहायलाच वापरला जातो, एखादीचा एखादा विशिष्ट टॉप असतो जो ती प्रत्येक व्हिडिओ इंटरव्ह्यूला घालते..

तसा माझा एक मग होता. कॉफी मग. पांढऱ्याशुभ्र हिमासारखा आणि त्यावर काळ्या नाजूक फुलांची कलाकुसर असलेला. हा काळा रंगसुद्धा पूर्वी कॅम्लिनची काळी शाई यायची त्या रंगाचा. त्या मगमध्ये काळी कॉफी घेऊन गॅलरीत येणं, सूर्याला हेल्लो म्हणणं, घोट घोट करत मिटक्या मारत ती कॉफी संपवणं, कॉफी पिता पिता घरी आईला एक कॉल करणं आणि मग कामाचा रगडा आवरायला लागणं..तसं पाहायला गेलं तर सुरळीत दिनक्रम वाटतो.

पण त्या दिवशी माझ्या हातून तो मग पडला आणि खळ्ळकन् फुटला. फुटला म्हणजे अगदी तुकडे तुकडेच झाले त्याचे..

पुन्हा ती पायरी आणि मी..

काही क्षण मी त्या फुटक्या कपच्यांकडे पाहात तशीच उभी होते, आणि त्यानंतर माझ्या डोक्यात प्रश्नांची जंत्रीच तयार झाली.

मी आता आजची कॉफी कशी पिणार? मला असा मग पुन्हा मिळेल का? उद्या माझ्या मैत्रीणीला या मगविषयी सांगायचं झालं तर माझ्याकडे त्या मगचा एखादा फोटो आहे का? ज्या मगने मला वर्षं - दोन वर्षं साथ दिली, त्याचा एकही फोटो माझ्याकडे कसा नाही? त्याचं वर्णन करायचं झालं तर तो जसा होता तसा मला शब्दांमध्ये मला मांडता येणार आहे का? मला असा असा मग हवा आहे असं दुकानदाराला सांगताना माझ्या डोक्यात आहे तसंच चित्र त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसणार आहे का?

नाही म्हणायला माझ्याकडे आणखी एक मग आहे, पण त्यांच्यातून कॉफी प्यायची कल्पना करवेना. त्यातून फार फार तर चहा पिता आला असता, उकाळावाला.. पण ब्लॅक कॉफी?..ह्यॅट्

बरं आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, त्या एकदम वेगळ्या असतात, युनिक असतात, म्हणजे अ‍ॅटलीस्ट आपण तसा स्वत:चा समज करून घेतो..त्यामुळे आपण एकाच वस्तूचे दोन-दोन नग घेतले आहेत असं होत नाही. कारण, या गोष्टी तुटणार-फुटणार आहेत (जरी त्या तुटणार फुटणार असल्या तरी) अशी समजूत आपण ती वस्तू विकत घेताना तरी करून घेत नाही. यामध्ये जो एक अपरंपार आणि अत्यंत अरागस ऑप्टिमिझम असतो तो मला फार आवडतो. आपण प्रत्येक नव्या गोष्टीला आपलंसं करून घ्यायची स्वत:ला आणि त्या वस्तूलाही एक संधी देत असतो. म्हणूनच हॅरी बर्न्स कोणालाही कितीही आवडो, मला मात्र सॅली ऑलब्राइटच अधिक आपलीशी वाटली होती.

पण, हे सगळं करताना ती वस्तू जेव्हा फुटणार आहे त्या दिवसासाठी आपण स्वत:ची मानसिक तयारी कधीच करत नाही. त्या वस्तूशी तुमचे लागेबांधे नसतील, ती वस्तू तुम्हाला जीवापाड आवडत नसेल तर ठीकच.. पण ती तुम्हाला प्रिय असेल तर मात्र पोटात गप्पकन खड्डा पडतो, तुमच्या कानशीलाच्या इथे मुंग्या मुंग्या येतात, जग आपल्याभोवती गर्र्कन फिरतं. अशा वेळेसाठी एखादा ग्रिफ मॅनेजमेंटचा कोर्स असतो का? त्या कोर्समध्ये अशा गोष्टींबद्दलच्या शोकाचा, त्या गोष्टींच्या विरहाचा सिलॅबस कव्हर केलेला असतो का? 

काल रात्री झोपताना उद्या आपले कॉफी प्यायचे वांधे होणार आहेत असं कळायची सोय का नाही? रात्री झोपताना पुढच्या  पूर्ण दिवसाचा नाही, पण किमान तुकड्या तुकड्यांमध्ये प्रीव्ह्यू दिसला असता तर खूप बरं झालं असतं..अशा प्रश्नांच्या गुंतवळीत आणि फुटक्या कपच्यांमध्ये उभं असताना मला एकदम होपलेस वाटलं. 

रोलिंग्जने अ‍ॅस्ट्रोनॉमी टॉवरवर डंबलडोरला मारून टाकलेलं, तेव्हा वाटलेलं तसं..

आणि तिचा खून करायचा झाला तर माझ्याकडे इंग्लंडला जाण्यासाठी लागणारे पैसे नाहीत हे कळून वाटलेलं तसं..

स्वप्नांवरही कंट्रोल ठेवायची मनीषा बाळगणारे आपण एका क्षुल्लक सवयीच्या इतक्या आहारी कसे गेलो?  एका मगशी इतकी अटॅचमेंट असायचं काय कारण आहे? असलीच अटॅचमेंट, तर ती चूक की बरोबर? चूक की बरोबर या तागडीत प्रत्येक गोष्ट तोलायलाच हवी आहे का? अशा विमनस्क अवस्थेत विचार करताना पाऊल नकळत पुढे पडतं आणि एक फुटकी कपची पायात कच्चकन रुतते...

स्स.... 

टोकाची वेदना सण्णकन् टाळूपर्यंत जाते तोपर्यंत पायातून रक्ताची धार सुरू झालेली असते. पायाला बोटाइतका खोचा पडलेला असतो. तो रक्तमाखला पाय घेऊन मी बाथरूमपर्यंत नाचत जाते. त्यानंतर पायाला बांधायला कपडा हवा म्हणून लंगडी घालत पुन्हा बेडरूमपर्यंत जाते. ती लालबुंद लक्ष्मीची पावलं पूर्ण घरभर होतात आणि कानशीलावरची शीर टरटर फुगत जाते. तोच लंगडा पाय घेऊन मी ती फरशी साफ करायला घेते तोपर्यंत कामाची वेळ झालेली असते. मेसेजेसवर मेसेज यायला सुरुवात झालेली असते. कपच्या गोळा करून, त्या कागदी पिशवीत टाकून आणि ती कागदी पिशवी कोपऱ्यात हलवून हुश्श करणार इतक्यात आधीच ओल धरलेली ती कागदी पिशवी कपच्यांच्या वजनाने मान टाकते आणि आतला सगळा ओला सुका कचरा कपच्यांसकट भसभस खाली येतो.

आता मात्र हद्द झाली असं वाटतं.

सकाळपासून कॉफी नाही, पोटात अन्नाचा एक कण नाही, टंपासभर रक्त गेलेलं..

मग मी बदाक् करून जमिनीवरच पाय पसरून बसते आणि मला एकदम रडायलाच येतं. एक दहा मिनिटं तरी मी टाळा दाखवत छान रडून घेते. तोपर्यंत कंपनीचे मेसेज येत असतात, फोन वाजत असतो - त्यातला एक फोन आईचा असतो, पायातून अजूनही रक्त ठिबकत असतं, जमिनीवर पडलेल्या कचऱ्यावर ते छोटे छोटे पांढुरके-पिवळसर किटक घोंगावायला लागलेले असतात..

मग कधीतरी माझं रडं संपतं. हमसणं चालू राहतं पण अश्रूंचा कोटा संपतो. मग एक वेळ अशी येते की मी पूर्ण स्तब्ध होते, दोन तीन दीर्घ श्वास घेते आणि नाक-तोंड पुसून उभी राहते. कंपनीला "इमर्जन्सी आहे" असं कळवून टाकते, छान आल्याचा चहा टाकते आणि तो मेलामाइनच्या मगमध्ये घेऊन पिते. मग कानशीलावरची शीर तडतडायची थांबल्यावर जमिनीवर पडलेला कचरा हातानेच साफ करते, डॉक्टरकडे जाऊन पायाला टाके घालून येते आणि आल्यावर एक झोप काढते. आणि... मग टीमची धुरा सांभाळायला टीम लीडचं अवसान आणून लॉग इन करते.

मग मी पुढचे दोन दिवस कॉफी पित नाही, चहाच पिते. सुतक असावं तसं. 

तो पूर्ण आठवडाही मन होत नाही..

त्यापुढचा आठवडाही कदाचित..

पण एक दिवस असा येतोच की, मला माझ्या त्या एक्स-मगविषयी तितकंसं प्रेम राहिलेलं नाही असं प्रकर्षाने जाणवतं..राहिलीच तर ती असते जिभेवर रेंगाळत राहिलेली एक कडवट चव..आणि असल्याच, तर काही धूसर धूसर ओशट आठवणी.

आणि मग एक दिवस असा येतो की मी त्या मगला मिस करत नाही, मला त्या मगची आठवणही येत नाही.

आणि मग मला निकोबार नावाच्या साइटवर एक सुंदर मग मिळतो.

आताशा त्या मगतून एकदा नाही तर दोनदा कॉफी पिणं होतं सकाळी. टील रंगाच्या त्या मगवर...


--


याआधीचे: लॉकडाउन ब्लूज - १

 
Designed by Lena