न न..?

दुनिया अणूच्या एका सर्व बाजूंनी बंद असलेल्या, ज्यावर "लीव्ह होप बीहाईंद, ऑल हू एण्टर हीयर" लिहीलंय अशा फ़ाईलकडे बोट दाखवून म्हणते," मी बघू का?"
अणू चटकन ’हो’ म्हणत नाही. थोड्या वेळाने म्हणतो,"मनाची तयारी असेल तर बघ."
"म्हणजे काय? कसली तयारी?"
"आपल्यासारख्यांच्या आयुष्यात कधी न येणारया आणि आलीच तर ज्यांच्याकडे आपण डोळेझाक करायला शिकलोय त्या माणसांची चित्रं आहेत ती. तुरुंगातली माणसं, फ़ुटपाथवरचे भिकारी, अपंग, कुणाला नको असलेली म्हातारीकोतारी अशांची चित्रं आहेत ती"
दुनिया सुस्कारा सोडून म्हणते, "अणू, मी अनेक वेळा डोळे मिटून घेतले आहेत हे खरंय; पण जगात ते नाहीतच, अशी स्वत:ची समजूत घालण्याइतकी मी मूर्खपण नाही, आणि मठ्ठ पण नाही"
--

हे आपल्या सगळ्यांना लागू होतं अशी माझी समजूत.
-------

दहशतवादाची व्याख्या:
कोणत्यातरी धार्मिक, राजकीय, तात्विक हेतु साध्य करण्यासाठी, भीती पसरवण्याकरता हिंसक कारवाया करणे.
नक्षलवादी यात कुठे बसतो?
धार्मिक हेतु: काहीच नाही.
राजकीय: नाहीच नाही. स्वतंत्र बोडोलॅंड, खलिस्तान सारखी त्यांची वेगळ्या प्रदेशाची मागणी नाही.
तात्विक: त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तात्विक बैठक वगैरे ऐश त्यांना कशी परवडेल?
मग गेली दोन वर्ष बरयाच वेळा बातम्यांत राहिलेले, आपले विद्यमान पंतप्रधान ज्यांना ’Biggest Internal threat' असं संबोधतात, असे हे नक्षलवादी कोण आहेत? हा ’नक्षलवाद’ काय आहे? हे ’वाद’ वाले elements नेहमीच उर्वरीत समाजापेक्षा वेगळे, पीडीत असल्याचा दावा करतात. नक्षलवाद्यांचं वेगळेपण कशात आहे?

काही सत्यं: माहीत असलेली-नसलेली.
CRPFच्या जवानांवर झालेले हल्ले, नक्षलवाद्यांनी भूसुरुंग उडवून दिल्यामुळे झालेले जखमी-बळी, जंगलांचा आडोसा घेऊन लढण्यायची नक्षलांची guerrilla tactics मुळे प्रकाशझोतात आलेल्या दांतेवाडा, लालगढ, दंडकारण्य भागाची काही विदारक सत्य माहीत आहेत का? Here they are:
दांतेवाडा हा जिल्हा गेली दोन दशकं भारतामधल्या सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षं झाली पण या भागात शाळा तर सोडा, रस्ते-आरोग्यविषयक सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीत. या विभागाविषयीच्या इतक्या टोकाच्या अनास्थेमुळे इथे बालमृत्यू-दर खूप आहे-universally acclaimed अविकसित सहारन देशापेक्षा कितीतरी अधिक. ’गरिबी हटाओ’ योजनेखाली किती योजना आजवर बनल्या, त्याचे फ़ायदेही देशातल्या अनेक भगात दिसून आले पण पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम, NREGA, इंदिरा आवास योजना यासारख्या मूलभूत योजनांचा लाभही या लोकांना आजवर मिळालेला नाही. अठरा विश्वे दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव आणि याच्या वरताण लॅंड-माफ़ियांची शिरजोरी, बेघर झाल्यामुळे करावी लागणारी वणवण, भूक यांची भर पडली. हीच परिस्थिती थोड्याफ़ार फ़रकाने नक्षलग्रस्त भागातील प्रत्येक गावाला लागू आहे.

आपण सकाळी घराबाहेर निघताना काहीतरी खाऊन निघतो. बाहेरही खातो. पोटात भूक असली की डोक्यात कलकल सुरु होते, चिडचिड होते. पण पोटात काही घातलं की डोकं आपोआप ताळ्यावर येतं. मी स्वत: पोटात भूक असताना अजिबात अभ्यास करु शकत नाही.या माणसांना तर एक वेळचं मिळायची भ्रांत आहे.
पोटातली भूक माणसाला पशू बनवू शकते, वाटेल ते करायला भाग पाडू शकते, दुसरयाचा जीव घ्यायला सुद्धा. हे कटू असले तरी सत्य आहे. It might sound too cliche, पण हिंसा करणं हे जर पाप असेल तर दुसरयाला उपाशी मरायला सोडून देणे हे देखील पापच आहे आणि त्यांच्या उपासमारीस कारणीभूत होणे हे देखील.
कधी विचार केला आहात? की नक्षल चळवळ मुंबई-पुणे-बंगलुरु-दिल्ली सारख्या शहरी भागात नाही तर झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, महाराष्ट्राच्या च्या दुर्गम भागात, जिथे गरीबातले गरीब लोकं राहतात अशा ठिकाणीच का जोरात आहे?

नक्षलवादयांना आजच्या घडीला ’हिंसाप्रिय’ अशी प्रसिद्धी देण्यात आलेली आहे.आणि त्यात तथ्य आहेच, नाकारून चालणार नाही. पण आरोपीच्या कठड्यात उभं करताना त्यांनी किती सोसलं आहे याचाही विचार व्हायला हवा. आपल्याच देशांच्या नागरीकांवर ते असं का करतायेत? याचा साधा विचारही न करता CRPFचे जवान घातले जातात, असं का? याचा विचारही व्हायला हवाय. हिंसा समर्थनीय मुळीच नाही आणि हिंसेने प्रश्न सुटत नाही, चिघळतात. पण एकाने गोळी घातली म्हणून दुसरयाने ती हसत हसत झेलावी हे सांगायला गांधींइतका समर्थ नेताही आता नाही आणि त्याच्यासाठी ती हसत हसत झेलणारे समर्थकही आता नाहीत. आता आहे ते फ़क्त स्ट्राईक आणि काऊंटर-स्ट्राईक! निषेधाचे, हक्क मिळवण्याचे याहूनही कमी रक्तलांछीत, अहिंसक प्रकार असतात, अलबत! दशकानुदशकं पिचलेली, असंतोषाने धगधगत असलेला हा आदिवासी आणखी किती काळ शांततापूर्ण मार्गाने निदर्शनं करेल, उपोषण्ण करेल, मोर्चा काढेल? आणि त्याकडे सरकारचे लक्ष जाईल? गेली ५० वर्ष नाही गेलं, आज काय जाणार? कदाचित सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता याखेरीज दुसरा मार्ग त्यांना मिळाला नसेल. पण नक्षलवाद्यांच्या उदाहरणावरुन मागण्या मान्य करण्यासाठी ’उचला शस्त्रं, मारा त्यांन” असाच मार्ग अवलंबण्याचा नवीन पायंडा पडला तर ते घातक आहे. आजच्या घडीला प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचं उत्तर शोधणं आणि त्यावर उपाययोजना करणं हाच पर्याय सरकारकडे शिल्लक आहे. किंबहुना सरकारने तेच करणे अपेक्षित आहे.
या समस्येला ’कायदा आणि सुव्यवस्थे’चा प्रश्न म्हणून बघणं ही सरकारची आणखी एक घोडचूक. मला एक कळत नाही, परिस्थिती इतकी चिघळेपर्यंत सरकार काय करत होतं? ’चालतंय तर चालू द्यात’ म्हणत नजरेआड केलेला प्रश्न आता अक्राळविक्राळ रुप धारण करुन पुढ्यात दत्त म्हणून उभा राहिल्यावर सरकारने त्यांना दडपायचा प्रयत्न करणं म्हणजे चोर तो चोर, वर शिरजोर सारखी गत झाली. ही चळवळ अर्भकावस्थेत असताना त्या लोकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना झाल्या असत्या तर कदाचित आज ही वेळ आली नसती.CRPF च्या जवानांना नक्षलांना मारण्याच्या ऑर्डर्स असतात. ते फ़क्त ऑर्डर्स जाणतात. मग का? कशाला? याबद्दल विचार करण्याची मुभा त्यांना नसते. आपलंच सरकार आपल्यावर गोळ्या घालतंय म्हटल्यावर नक्षलवादी त्यांना गोळ्या घालतातच. कोणाच्याही गोळीने कोणीही मरो, मरतो एक भारतीयच. कोणीही जन्मताच नक्षल नसतो, तो बनतो, परिस्थितीने बनवला जातो. त्याआधी तो सामान्यच असतो.

नक्षलवादाची राजकीय पार्श्वभूमी:
नक्षलवादी चळवळीचं नाव ’नक्षलवादी चळवळ’ का आहे?
पश्चिम बंगालमधल्या ’नक्षलबारी’ गावात चारु मजुमदार आणि कनू सन्याल या तरुणांनी शेतकरयांचा उठाव घडवून आणला होता जो या नक्षलवादी चळवळीचा पाया मानला जातो, त्या ’नक्षलबारी’ गावावरून या चळवळीचे नाव ’नक्षलवादी’ असे पडले. कार्ल मार्क्स, फ़्रेडरीक एंगल्स प्रभृतींच्या समाजवादी विचारसरणीने ६०’च्या दशकात अनेक तरूणांवर गारुड केले. चारु आणि कनू ही त्यातले. नक्षलबारीच्या आदिवासी शेतकारयांच्या समस्यांना तोंड फ़ोडण्याकरता त्यांनी जोरदार उठाव केला होता. त्याच काळात Communist Party of India (CPI) हा पक्ष स्थापन झाला. पुढे या चळवळीने हिंसक स्वरुप घेतलं आणि ’War can only be abolished through wars and in order to get rid of the gun, it is necessary to take up the gun’ या माओ’च्या विचारांचा पगडा असलेल्या चारूच्या नेतृत्वाविषयी शंका उत्पन्न झाली. पक्षात दुफ़ळी माजून सत्यनारायण सिंहच्या नेतृत्वाखाली AICCCR स्थापन केली. मग या पक्षात अनेक विचारप्रवाह निर्माण होऊन नंतर CPI ( Marxist-Leninist) उदयास आली. सरकार थंड पडले असेल तर त्यांना कानठळ्या बसायलाच हव्या, सशस्त्र क्रांतीशिवाय बदल नाही अशा विचारसरणीचे PWG आणि MCI हे घटक चळवळीला येऊन मिळाले. मग त्यांनी एकत्र येऊन CPI(Maoist) स्थापन केला. CPI(Maoist) चळवळीच्या मुख्य प्रवाहात आल्यावर नक्षलवाद्यांच्या आतापर्यंतच्या छुप्या कारवायांना उघड आणि हिंसक स्वरूप आले. ’ह्जार ख्वाहीशें ऐसी’ मध्ये दाखवलेले या आदिवासी लोकांत जाऊन काम करणारे तरुण एव्हढंच या नक्षलवादी चळवळीचं स्वरूप नाही राहिलेलं. आज त्यांच्यकडे रॉकेट-लॉंचर्स आलियेत. सरकार या प्रश्नाचं उत्तर काढायला जितका वेळ लावेल तेव्हढं ते नक्षलवाद्यांचा विश्वास गमावणार आणि याचा फ़ायदा भारतातील आणि भारताबाहेरील फ़ुटीरतावादी घटक घेणार आहेत.

नक्षलवादी आणि सरकार यांच्या लढईत भरडला जातोय तो मात्र सामान्य माणूस., नक्षलवादी त्याला पोलिसांचा खबरया समजून मारतात तर पोलिस नक्षलवाद्यांशी संधान असल्याच्या आरोपावरुन आत घेतात.डॉ.विनायक सेन यांच्या बाबतीत वेगळं काय झालं?मानवाधिकार कार्यकर्ते असलेले डॉ. विनायक सेन यांची सहानुभूती नक्षलवाद्यांना आहे. तब्बल दोन वर्षे नक्षल कारवायांमध्ये भाग घेतल्याच्या अरोपावरून त्यांना डांबून ठेवलं होतं.पण जनतेच्या आंदोलनं आणि प्रक्षोभ यांच्या दबावाखाली सोडावं लागलं. अजूनही त्यांचा नक्षलवाद्यांशीच नाही तर ISI शी संधान आहे हे सिद्ध करायचा सरकारचा खुळचट प्रयत्न अद्याप चालू आहे.

का?
आदिवासींची चळवळ चालवणारे तरुण -तरुणी सुशिक्षित तर काही उच्चशिक्षित आहेत. जागतिक मंदीनंतर नक्षलवाद्यांना जाऊन मिळालेले बहुतेक तरुण तरुणी हे डॉक्टर आणि इंजिनीअर आहेत. नक्षल चळवळीचे जनक चारु अणि कनू हे ही विज्ञान शाखेचे पदवीधर होते. याच वर्षी पकडला गेलेला कोबाद घंदी हा लंडनहून शिकून आलेला सी.ए आहे. बांद्रा उच्चमध्यमवर्गीय पारशी घरात वाढलेला, सेंट झेविअर मध्ये शिकलेला हा तरूण स्वखुशीने नक्षल चळवळीला का वाहून घेतो? कोडेश्वर राव ( M.Tech), कमला सोनटक्के (M.A), मिलिंद तेलतुंबडे( IT Engineer), आणि असे कित्येक अनेक. करीयरीझ्म च्या रॅट रेस मध्ये सहज तरून जाऊ शकतील असे हे तरुण या चळ्वळीत का उतरले? बंडखोरीबद्दलच अनाम आकर्षण त्यांना भुरळ घालतं? का हे अविचारी धाडस आहे? की आपली संपन्न घरं आणि सभोवतालचं दैन्य यातला विरोधाभास त्यांना सहन झाला नाही? जागतिक मंदीनंतर या मुलांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. आत्मविश्वासाची जागा नैराश्याने घेतली. या नैराश्यातून बाहेर येण्याकरता शॉर्टकट्स शोधले गेले. careerism ची वाट चोखाळणारी ही मुलं अशारितीने स्वयंस्फ़ूर्तीने indivisual heroism कडे वळली. आपण ’काहीतरी’ करतोय यापेक्षा ’कोणासाठी तरी’ काहीतरी करतोय या कल्पनेने त्यांना भुरळ पडली नसती तरच नवल. अर्थात नक्षलवाद्यांमध्ये राहून आपापल्या घरांकडे परतलेली मुलं सुद्धा आहेत. काहींनी नंतर परदेशी शिक्षणाकरता जाणं पसंत केलं. पलायनवाद असा काय आणि तसा काय-त्या काळात अशारितीने दिसून आला.

नक्षलवाद: आज आहे तसा, कारणीभूत घटक.
नक्षलवादी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेली झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा ही राज्यं खनिजसंपन्न, नैसगिक साधनसंपत्ती मुबलक असलेली अशी आहेत. साहजिकच आहे, मोठे मोठे खाणमालक, उद्योगपती तिथे कारखाने काढण्यास उत्सुक असतात. सरकारही त्यातून होणारया उलाढालीकडे लक्ष ठेवून त्यांना ते करु देते पण त्यातून उद्भवणारया प्रश्नांकडे पूर्णतया दुर्लक्ष करुन. औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगतीच्या नावाखाली पुर्वापार तिथे राहात असलेल्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार सरकार आताआतापर्यंत करत होतं. तिथली लोक विस्थापित झाली, सरकारने त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष पुरवले नाही. नक्षलग्रस्त भागांमध्ये ५० अधिक आदिवासी जाती-जमाती आहेत. संथाल, मुंडा, पहारिया, कोरवा, गोंड, अभुज मारिया, माडिया गोंड हे त्यातलेच काही. आदिवासी हे निसर्गाला देव मानतात, झाडांची पूजा करतात. आपल्या देशात आता विरळाच बघायला मिळणारा घनदाट जंगलांचा पट्टा याच आदिवासींमुळे टिकून आहे. पण खाण-माफ़िया येतात, बेसुमार वृक्षतोड करतात. उद्योगपती येतात, नद्यांचं पाणी दूषित करतात, हवा काजळवून टाकतात. अवाजवी वृक्षतोड आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी यामुळे या आदिवासींचे पिढीजात कलाकारीचे व्यवसाय, शेतीव्यवसाय बंद झाले. रोजगार सुटला. एका ठिकाणाहून हाकलवल्यानंतर दुसरया ठिकाणी जावं तर हपापलेलं सरकार तिथे दुसरा प्रोजेक्ट जाहीर करतं. आणि मग हे आदिवासी पुन्हा बेघर होतात. सुरु झालेल्या कारखान्यांमध्ये काम देऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न सरकार सोडवू शकत होतं. पण असं फ़ारच थोड्या प्रमाणावर झालं. आणइ झालं त्यातही कंत्राटी कामं, कमी रोजगारावर राबराब राबवून घेणं, असह्य पिळवणुक , याला वाचा कोडणारयांचे सर्रास पडलेले खून, आदिवासी कामगार स्त्रियांवर बलात्कार अशा अनेक भयानक घटनांना मानवाधिकार संघटनांनी वाचा फ़ोडलेली आहे. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत गेली. त्यांच्या प्रश्नांकडे ना कोणी लक्ष पुरवले ना मिडीयाने दखल घेतली. सरकारने तर कायम बघ्याची भूमिका घेतली. जिथे पिळवणुकीची, हिंसेची पार्श्वभूमी आहे तिथे बंडाला तोंड फ़ुटतेच, इतिहास साक्ष आहे. पण फ़रक एव्हढाच त्यावेळी ही पिळवणुक परकीयांकडून झाली आणि आता आपल्याच माणसांकडून. आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली आणि काहीतरी करणं भाग पडलं तेव्हा त्यांच्या समस्यांचं निराकारण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. आदिवासींमधूनच भरती केलेल्या तरुणांना घेऊन ’Salwa Jadum’ ची स्थापना केली. आदिवासींमध्ये फ़ूट पाडून नक्षलवादास आळ घालण्याचा प्रयत्न केला. हा वार खूपच कमरेखालचा होता. त्यामुळे नक्षलवादी खूपच बिथरले. नंतर नंतर ’ Salwa Jadum’ मध्ये झालेल्या छोट्य़ा मुलांच्या सैनिकपदी नेमणुका, महिला कॅडेट्स वर बलात्कार असे गुन्हे प्रकाशात आल्यावर सरकारला ’Salwa Jadum' चा पाठिंबा काढून घेणे भाग पडले.
आदिवासी लोकांसाठी आपल्या संविधानात खरंतर खूप तरतुदी आहेत पण त्या प्रत्यक्षात आलेल्या दिसत नाहीत. १९९६ मधल्या ’पेसा’ कायद्याने काही करक पडला असता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी या लोकांचं दैनंदिन जीवन थोडंतरी सुखकर करु शकणारा हा ’पेसा’ कायदा अद्यापही कागदावरच आहे.

नक्षलवाद इतका हिंसक होण्याला मिडीयाही कारणीभूत आहेच. ’पत्रकार’ हा ’एन्टर्टेनर’ झाला आणि लोक- त्यांचे प्रश्न यांना फ़ारच कमी लक्ष मिळू लागलं. नक्षलवाद्यांना हे कळून चुकले आहे की राष्ट्रीय स्तरावर आपल्या समस्या नेऊन पोहोचवण्याकरता वृत्तपत्रं आणि बातम्यांचे मथळे काबीज करणं आवश्यक आहे. ’सेन्सेशनल’ बातम्यांचेच मथळे बनतात हे सत्य त्यांनी पचवून घेतलं. तुरुंगातून पळ काढणं, माणसांना ओलीस ठेवणं, खंडणी मागणं, वनाधिकारयाला पळवून नेणं आणि नाट्यमयरित्या त्याची सुटका करणं ही सगळी मुख्य बातम्या काबीज करायची धडपड आहे. आणि त्यात थोडं फ़ार तथ्य आहेच तसं म्हट्लं तर. कारण २००९ मध्ये लालगढ ला झालेल्या हिंसाचारानंतरच ’नक्षलवाद’ नावाचं प्रकरण आहे हे सर्वसामान्य भारतीय जनतेला कळलं. नाहीतर आधी ठाऊक होतं?
ही लोकं अशीच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत अनुल्लेखित राहिली असती तर?

आपली बेरोजगारी, उपासमार, वणवण याला सरकार काही दाद देत नाही असं बघून त्यांनी त्यांचा मार्ग शोधला- खंडणी गोळा करणे. Mining Mafiaवर नक्षलवाद्यांचा दात असला तरी एकाही कारखान्यावर हल्ला झालेला दिसत नाहीये, कॉंट्रॅक्टर काहीही अडचण न होता जगतायेत. कारण सरळ आहे, ते नक्षलवाद्यांना protection money देतात. मध्य-प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तर म्हणतात की तिथे पोस्टींग झालेल्या प्रत्येक सरकारी अधिकारयाला आपल्या पगाराचा काही हिस्सा नक्षलवाद्यांना द्यावा लागतो.

आशादायक चित्र:
आपल्या महेश भागवत (IPS) यांनी आंध्रप्रदेशमधलं नक्षलग्रस्त गाव ’गंगापूर’ पूर्णपणे नक्षलमुक्त केलं. ना त्यांनी नक्षलवाद्यांपेक्षा आधुनिक शस्त्रं वापरली, ना त्यांची कोंडी करुन त्यांना वेचून वेचून ठार केलं. या समस्येच्या मुळांशी जायची गरज आहे हे त्यांनी जाणले. आणि ती आहेत गरीबी, बेरोजगारी, आवश्यक सोयीसुविधांचा अभाव.त्यांनी त्या गावात आणि आसपासच्या गावांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, रस्ते बांधले, लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. बास्स! लोकांच्या किमान अपेक्षा असतात. तुम्ही आम्हाला राजवाडाच बांधून द्या किंवा पाच आकडी पगारच द्या अशी त्यांची अपेक्षा कधीच नव्हती. भागवतांनी फ़क्त त्या दिशेने पावलं टाकली. गावकरयांनी स्वत: नक्षलवाद्यांना विरोध करायला सुरुवात केली, ”नक्षलवाद्यांना गावबंदी’च्या पाट्या गावोगाव झळकू लागल्या. नक्षलवादी शरण आले, काहींना गावकर्यांनी भाग पाडले. भागवतांना पुढाकार घेऊन त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलली. याच धरतीवर आंध्र सरकारने लोकाभिमुख प्रकल्प राबवून , आदिवासींच्या समस्या समजून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न चालवलाय, त्यामुळे नक्षलांच्या कारवाया बरयाच आटोक्यात आहेत. भागवत आणि आंध्र सरकार जे काही गावांत शक्य करून दाखवतात ते इतर गावांत, जिल्ह्यात, राज्यांत करणं खरंच एव्हढं कठीण आहे?

नक्षलांचं पुनर्वसन हा ही कळीचा मुद्दा आहे. नुकताच सरकारने नक्षलग्रस्त भगात विकासविषयक कामासाठी ४०० कोटीची मदत जाहीर केली. त्याआधी ३४ जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्रे उघडून औद्योगिक प्रशिक्षण देण्याचा मनसुबा जाहीर केला. आता हे मनसुबे फ़क्त मनसुबेच न राहता प्रत्यक्षात किती लवकर आणले जातात यावरच पुढछे चित्र अवलंबून आहे. ’मुक्ता’मध्ये मक्या म्हणतो तसं ’मारी बिस्कीट’वाली ट्रीक सरकारने बदलण्याची गरज आहे.

--

इथे नक्षलवाद्यांचं कुठल्याही उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नाही. पण नक्षलवादी म्हणजे ज्यांना खून-खराबा करण्यात, सरकारी मालमत्तेची नासधूस करण्यात आनंद होतोय, ज्यांना अक्कल नाही, कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या त्या कळसूत्री बाहुल्या आहेत असा जो काही समज सरकार्धार्जिण्या लोकांनी पसरवून दिला आहे तो किती असत्य आहे हे दाखवून द्यायचा प्रयत्न आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. आणि एक बाजू पुन्हापुन्हा ऐकवली गेली असेल तर दुसरी बाजूही असेलच हे कसं विसरता येईल? ती कोण ऐकणार? या चळवळीचे हिंसक स्वरूप उल्लेखनीय नाही आणि पुन्हा एकदा, समर्थनीय नाही. आपले आदरणीय पंतप्रधान त्यांना ’कोल्ड ब्लडेड मर्डरर ’ठरवून मोकळे झाले. हे आहे हे असं का आहे? उगीचच आहे का? या प्रश्नांच्या मुळापाशी कोणी गेलेले दिसत नाहीत. नक्षलवादाच्या या चळवळीत नंतर माओवादी, त्रूणमूल कॉंग्रेस ही भेसळ नंतर झाली. पण त्यांना चळवळीतून वेगळं करून चळवळीच्या मुळाशी काय आहे हा विचार करून त्या दिशेने देशाच्या नेत्यांना सुधारणा करता येत नसेल, ’आमी नाही ज्यॅ!’ असा आडमुठा
पवित्रा घ्यायचाच असेल तर मग राह्यलंच, नाही का?

ट्रेन एकामागोमाग एक उशिरा आल्या की सामान्य चाकरमानी ट्रेन्स बंद पाडतात, मालमत्तेची नासधूस करतात, एकेक तास बस आल्या नाहीत की लोकांचा जमाव एस.टी स्टॅंड जाळतो, याला आपण संतापाचा कडेलोट होणं असं म्हणतो. आपली सहानुभूती त्यांच्या बाजूने असते. ५० वर्षं पिचत असलेल्या आपल्यासारख्याच माणसांना संताप येण्याचा पण हक्क नाही असं आपण म्हणत असू तर ते कितीसं योग्य आहे. या चळवळीचं हिंसक रुप, राजकीय खेळ्या-स्वार्थ यावर बरेच तर्क-कुतर्क लढवले जाऊ शकतात, चर्चांच्या फ़ैरी झाडल्या जाऊ शकतात, आजही होतंय, उद्याही चर्वितचर्वण होईलच. पण या सगळ्यांच्या मुळापाशी जो सामान्य माणूस आहे त्याला विसरता कामा नये. शेवटी लोकशाही ही लोकांनी लोकांकरताच चालवायची असते.

लांजीगढच्या डोंग्रिया कोंढ आदिवासीच्या हितरक्षणासाठी वेदांतचा नियामगिरी पर्वतरांगांमधल्या बॉक्साईटच्या खाणींचा प्रस्ताव नाकारण्यात आला. अशाच कारणाकरता ’पॉस्को’चा स्टील प्रकल्प थांबवला. औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगती होतानाच लोकांचाही विचार होऊ लागलाय ही सुचिन्हे आहेत! हा विचार फ़ार्फ़ार वर्षांपूर्वी झारखंड, छत्तीसगढ मध्ये झाला असता तर? आज चित्र खूप वेगळे असते.

सरकारवरचा , प्रस्थापितांवरचा विश्वास उडालेली , वेगवेगळ्या मत-प्रवाहांच्या भोवरयात सापडून वाट भटकलेली आपल्याचसारखी , आपल्याच देशातली माणसं आहेत. ’तू माझी माणसं मारलीस, मी तुझी मारतो’ असा खाक्या उपयोगाचा नाही हे सरकारला एव्हाना पटलेलं आहे. त्यांच्या वाटाघाटींच्या तयारीवरून तरी हेच दिसतंय. आता नक्षलांनी सुद्धा हिंसा, संताप सग्गळं बाजूला ठेवून फ़क्त एकदाच सरकारवर विश्वास ठेवावा. आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवाव्यात.ही समस्या बोलून, वाटाघाटी करुन सोडवावी. असं झालं तर ’न’ केवळ नक्षलवादाचा न राहता नवनिर्माणाचाही होऊ शकेल.

जागेपणीच्या कविता नं-२

काल..आज..

आज फ़ारा दिवसांनी पाऊस पडला,
जसा काय श्रावणातलाच होता..
पण आज-आता श्रावण नाही.

खिडकीतून दिसणारया आकाशाची बोटभर चिंधी
कालच्यासारखी आरस्पानी निळी दिसतेय,
आजची झाडं कालच्यासारखीच दिसतायेत,
पण ती कालची नाहीत.

माणसंही तीच, काल होती ती.
आज कालच्यापेक्षा नव्याने कळतायेत.

शब्द कालचेच वाटतायेत..
पण अर्थ नव्याने उगवून आलेत.
स्पर्शही तसेच पण,
नव्याने आंदुळत जातायेत.

आरशातली ’मी’ सुद्धा कालच्यासारखीच,
पण कालची नाही.
नव्याने उमटलेली.

कालचे ’मी’पण आज नाही तरी,
आजचं ’मी’पणही ’मी’पणच..
पण कालच्यासारखे उनाड नाही.
आजचे उद्याला असेल?

रोज संध्याकाळ होताना..

क्लॉद इस्तेबान.
फ़्रेंच कवी आणि निबंधकार. म्हणजे ७०% निबंधकार आणि ३०% कवी.
कवी म्हणून अगदीच आडूमाडू नाही पण तरीही बरयाच जणांना माहीत नसलेला.
’फ़्रेंच पोएट्स’ अशी क्वेरी टाकली की गूगलचं सर्च इंजिनसुद्धा याचं नाव घ्यायला नकार देते इतका अविख्यात.
आतापर्यंत झॅक प्रीव्हेरच्या साध्यासुध्या, अर्थप्रवाही कवितांच्या अंमलाखालून मला कोणी बाहेर काढेल याची शक्यता दिसत नव्हती. पण काल क्लॉदची ही कविता वाचली आणि गर्र-गर्र झालं.

Ce sera le soir (रोज संध्याकाळ होताना..)
-क्लॉद इस्तेबान

स सेरा ल स्वार
ला मेम अर
द्यु स्वार
ले कॉलोंब
कॉमोसेरॉ आ स पोझे स्युर ले ब्रॉशेझ
संध्याकाळ होतेय,
रोजच्यासारखीच.
रोजच्याच वेळी
पक्षी येतायेत, झाडांवर बसतायेत,
रोजच्यासारखेच.
केल्क दिरा कॉम्म
लेर्ब ए ऑत
अलॉ नू अस्वार
रकॉंता नू पूर पासे ल तॉंप
यून इस्तवार अ प फ़ॉल्ल,
सेल द्यु रवा
की क्र्वाये तू सव्हार ए
क पेर्दी तू.
कोणीतरी म्हणतं,
"अरेच्चा! हे गवत बघ किती वाढलंय!"
"चल! इथेच बसूयात, आम्हाला नेहमीपेक्षा वेगळी अशी गोष्ट सांग पाहू!"
मी ही वेळ घालवायला
एका राजाची गोष्ट सांगते,
ज्याला सगळं माहीत होतें, सगळं येत होतं.
पण ज्याने सगळं गमावलं.
केल्क दिरा,
सँ ए फ़िनी
दे फ़ाब्ल त्रिस्त,
उब्लिऑ ले
क~म ल सोलेल
स कूश लॉंतमॉ
कोणीतरी म्हणतं,
बस्स झाल्या या बोधकथा,
दु:खाबरोबरच संपणारया.
चल सोड,
मावळतीच्या सूर्यासारखंच, आजचं
सग्गळं सग्गळं विसरून जाऊयात..

(मग दुसरया दिवशी
पुन्हा एकदा
रोजच्यासारखीच
संध्याकाळ होईल.
रोजच्याच वेळी
पक्षी येतील, झाडावर बसतील
रोजच्यासारखे.
.
.
.
)
--

कवितेला ’संध्याकाळच्या शेवटी’ असं नाव मुक्रर केलं होतं. पण नंतर ’शेवट’ हा शब्द एकदम गिळगिळीत वाटायला लागला.
शेवट- चिवट, त्रिवट.. छे! कुठल्याही स्वाभिमानी शब्दाशी याचं यमकसुद्धा जुळत नाही.
त्यामुळे या शब्दाला स्वत:च काही व्यक्तिमत्व नाही, जोरकसपणा नाही असं डोक्यात घेऊन शेवटी ’रोज संध्याकाळ होताना..’ हे नाव धारण करून कविता संपन्न जाहली.

कालिब

आपण एखादं चित्र कसं बघतो?
कोणी चित्रं कशी बघावीत?
मी चित्र कशी बघते?
चित्र बघताना आपण वाचताना करतो तशी चित्राच्या डाव्या कोपरयाकडून सुरुवात करते. मग चित्राच्या फ़्रेमवरुन माझी नजर मजेत फ़िरुन येते. चित्राचा आकार मनात भरला की पुन्हा डावा कोपरा पकडते. मग चित्राचा अवकाश, चित्रातली रंगसंगती, एकंदर पोत डोळ्यांनीच (क्वचित हात लावून) चाचपते. मग त्यातल्या रेषा, कोन, भौमितिक आकार..
एव्हढं झालं की त्या दृश्य चित्राचा आणि माझा संबंध संपतो आणि सुरु होतो माझा आणि माझ्या डोक्यात उमटलेल्या चित्राचा संवाद.
मग नंतर चित्रकार काय सांगू पाहतोय? काय लपवतोय? त्याला जे सांगायचेय तेच मला कळलंय का? जर असं नसेल तर त्याला काय सांगायचं असेल बरं? इत्यादी प्रश्नांचा काथ्याकूट.
पण समजा, माझी चित्र बघायची सवयीची पद्धत सोडून मी भस्सकन चित्राच्या मध्यभागीच नजर खुपसली तर काय होईल?
चित्राच्या कडेकडेने प्रवास करून मध्यभागी येण्यापेक्षा मी मध्यभागापाशी सुरुवात करुन कॉन्सेंट्रीक सर्कल्स मध्ये चित्र बघत गेले तर कसं? किंवा वरुन खाली चित्र बघत येंण्यापेक्षा खालून वर बघत गेले तर?
दुसरया पद्धतींनी बघितल्यावर उमटलेलं चित्र पहिल्या पद्धतीने बघितल्यावर डोक्यात उमटलेल्या चित्रापेक्षा वेगळं असेल?
छे!
दुसरया पद्धतीने मला पहिल्या पद्धतीने जेव्हढं कळलं तेव्हढं चित्र कळेल?
न कळायला काय झालं? चित्रातले इथले तिथले तपशील एकत्र करुन ते डोक्यात सुसंगत जुळवायला लागतील एव्हढंच.
मग अनेक पद्धतींनी चित्र पाहिल्यावरही डोक्यात उमटणारं चित्र एकच असेल तर मी तीच पद्धत का वापरते?
सवयीचा भाग- कदाचित?
किंवा सेफ़ प्ले.
तसंच लिखाणाचं पण असतं..नाही?
तुम्ही विषय घेऊन हेतुपुरस्पर लिहा किंवा मनात येईल ते काडीचाही विधिनिषेध न बाळगता धडाधड लिहीत सुटा-तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचायचं तसंच पोहोचता.
मग विषयाचे बंधन तरी कशाला बाळगा?
म्हणून कालिब.

जसं हरिदास म्हणतो,"वैचारीक सुसंगतीसारखी कंटाळवाणी गोष्ट नाही. आपण तोच तोच विचार केला तर तेच तेच करत राहू"
पचायला कठीण फ़ंडा आहे पण मला हरिदास आवडत असल्याने त्याच फ़ंडे प्लंजर मारुन का होईना मी गळ्याखाली उतरवण्याचा प्रयत्न करते.
च्यायला.
मला आवडणारया सर्व पात्रांची नावं चार अक्षरी का असावीत?
हरिदास
विश्वनाथ
भगीरथ
सॉलोमन
सॅटियागो
जगदीश
तीर्थकर
अकिलीज
.
.
.
नाही.
पण असंच काही नाही.
मला तीन अक्षरी नावं असलेली पात्रंही आवडतात.
दयाल
अर्णव
विशाल
रायन
दिमित्री
ऍलन
माधव
.
.
.
आता हे अति होतंय!
मला आवडणारया काही पात्रांची नावं दोन अक्षरी सुद्धा आहेत.
विसू
बापू
गणू
हॅरी
रॉन
डॉबी
पण यातल्या विसू, बापू, गणू चं नाव गणपती, विश्वेश अशी तीन-चार अक्षरीसुद्धा असू शकतील.
आवरा आता!

मी गेली चार वर्ष डायरी लिहीतेय (रोजनिशी नाही!). म्हणजे लक्षात ठेवावं असं काही घडलं, कशाच्यातरी अनुषंगाने काही्तरी ग्रेट वाचण्यात आलं तर ते तारीखवार टिपून ठेवते.
मागच्या आठवड्यात गम्मत म्हणून त्या चाळत होते.
कधीतरी कुठंतरी वाचण्यात आलं असेल की ’सॅम्युअल पेपिस’ सांकेतिक लिपीत डायरी लिहायचा.
झाsssलं.
मी उत्साहात तीन-चार पानं अगम्य लिपीत लिहून काढलेली दिसतायेत. पण त्या कोडची की कुठे लिहून ठेवलिये हे आता आठवत नाहीये. उत्साहात ती पण सांकेतिक ठिकाणी लिहून ठेवलेली नसली म्हणजे मिळवलं.
असंच मजेत वाचताना मी एका नोंदीपाशी थबकले.

२०-०१-२००६


"प्रत्येक नात्याचा अर्थ लावू पाहू नये. जग फ़क्त शरीरसंबंधांनी, चालीरितींनी जोडलेली नाती जाणतं. जसं आई, वडील, पती. पण काही नाती केवळ जाणिवांची असतात, मनांची असतात. अशा नात्यांना जगाने नाव दिलेलं नाही. ती केवळ मनानेच ओळखायची. असूनही नसणारी , नसूनही असणारी! या नात्याचे कितीही पापुद्रे काढून गाभ्यापर्यंत जाऊ पाहिलं तरी तो गाभा तुला गवसणार नाही. कळतंय का तुला? कदाचित सूर्याला पाहून फ़ुलणारया सूर्यफ़ुलालाच तो अर्थ कळेल. जे केवळ फ़ुलणं जाणतं आणि फ़ुलणं जपतं"

Gosh!
हे वाक्य ’लिहून’ काढण्याइतपत मी भाबडी होते? त्यावेळी असं कुठलं पापुद्रे काढावंसं वाटणारं नातं ON होतं?
ओह येस्स!
आपल्या प्रोफ़ेसरच्या प्रेमात पडायचा गाढवपणा बरयाच कॉलेजकन्यका करतात.
मी ही केला होता.
हे पापुद्रे, सूर्यफ़ुलं त्यातूनच आलीयेत.
पण मग माझ्या लक्षात येतं की ही आठवण, याच्याशी निगडीत प्रसंग आपल्या आठवणींमध्ये अजूनही तपशिलवार जिवंत आहेत. गोठवलेले आहेत. कदाचित मरेपर्यंत माझी सोबत करणार आहेत.
मग डायरीतल्या त्या पानाची आवश्यकता संपते.
टर्र र्र र्र..
ते पान टरकाऊन मी त्याचं रॉकेट करते. बसल्या जागेवरून बाहेर भिरकावते.
भेंssडी..समोरच्या गुलमोहराच्या बेचक्यात जाऊन अडकलं.
त्या ’अडकेश’ ला पाहून ’माझ्या डायरीचं भूत’ असं पोस्टचं फ़ंडू टायटल डोक्यात येतं आणि मी वेळ न दवडता ते लिहून काढते.
डायरीतल्या अशा बरयाच पानांची गरज आता मला नाही भासणार.

अ श क्य पा ऊ स..
आणि एव्हढा बदाबद कोसळूनही आकाश अजून पोटात पाऊस वाढवतंच आहे.
बेचक्यात अडकलेल्या त्या पानाचा पार लगदा होऊन गेलाय.
गेल्या महिन्यात आमच्या सोसायटीच्या हरामखोरांनी कापून काढलेल्या सुरुच्या झाडाची दुखरी, बोडकी खोडं ओळीने उभी आहेत. त्यातल्या सर्वात जवळच्या बुडख्यातला चकचकीत लालसर रंग अजून नाही गेलेला. म्हणजे अजून तग धरून आहे बेटं.
येतील.
यांनाही धुमारे येतील.

आषाढालाss पाणकळाss
सृष्टी लाssवssण्याssचा मळा
दु:ख भिर्कावूssन शब्द
येती माssहेरपणाला


शब्दांना सासुरवास?? I know what you mean.
मला हल्ली या गाण्याने पिसं लागलीयेत.
ळाss वर तब्येतीत ढुम्म करुन सम दिली तर एकमेकांच्या मानेत मान खुपसून बसलेल्या कबुतरांचं जोडपं फ़डफ़डफ़डफ़ड करत निघून गेलं.
रूटीनच्या बाहेर काढून कोणाला काही करायला लावलं की दिन अच्छा जाता हय म्हणे!
आता जाईल.

हल्ली मला वारंवार एकच स्वप्न पडतं.
मी एका लांबलचक बोगद्यातून चाललिये.रादर तरंगतेय. अर्ध्यात आल्यानंतर बोगदा दोन्ही बाजूंनी बंद होतो. आणि कोणीतरी घुसळून काढल्यासारखा अंधार खदखदायला लागतो. आणि जेलीसारखा थबथबत माझ्या अंगावर पडून मला वाळवीसारखा खाऊन टाकतो..
मी रोज खच्चून बोंबलत जागी होते.
सॅमी जेन्कीन्स सारखी माझीही त्या त्याच अनुभवाला तीच तीच रिऍक्शन का असते?
अनुभव (मग तो स्वप्नात का असेना!) जुना झाल्यावर रिऍक्शनची तीव्रता पण कमी कमी होत जाणे अपेक्षित आहे...तरी?
मला वाटतं, माझ्या स्वप्नात मला डिमेंशिया झालेला असावा.

कधीकधी मला खूप थ्रिलिंग गोष्टी कराव्याशा वाटतात.
म्हणजे फ़ेक नावाने एक फ़ेक ब्लॉग काढावा. त्यावर लोकांना उचकवणारं काय काय लिहावं. अनॉनिमस कमेंट्स ऑन ठेवून पब्लिकला मला शिव्या घालायला प्रवृत्त करावं. मग मी उलटून त्यांना दुप्पट शिव्या घालाव्यात. मग त्या तुंबळ युद्धाच्या कहाण्या सगळीकडे पसरून ब्लॉग-हिट्स वाढाव्यात वगैरे वगैरे.
पण मी तसं करत नाही.
मला ते झेपणारच नाही.
एकतर मी अजिबात खोटं बोलत नाही.
म्हणजे खोटं बोलावं की बोलू नये असा चॉईस असतो असं नाही पण मी बाय चॉईस सुद्धा खरंच बोलते.
पाहायला तर बनवाबनवी करणारे मॅनिप्युलेशनचे बाप पाहिलेले आहेत. पण त्यांची भंबेरी, कोलांट्याउडया पाहून आपण हरिश्चंद्राची कितवीतरी अवलाद आहोत याचं बरंच वाटतं.
असो.

एका देवळाच्या बाहेर लिहीलेलं असतं,
"आपण देवावर विश्वास का ठेवला पाहिजे?"
"कारण जगात असेही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं गूगल देऊ शकत नाही"
हा हा हा!
माझी एक मैत्रीण अशीच गूगलभक्त आहे.
"I broke up. How to get back to him."
किंवा
"What men like"
किंवा
"I fought with my parents. What to do to patch up with them without saying 'I am sorry!?"
तिला अशा प्रकारची सर्चेस मारताना मी या या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
तर..
तिला तिच्या कितव्यातरी ब्रेक-अप नंतर आत्महत्या करायची होती आणि पहिल्यांदाच गूगलने तिला निराश केलं होतं कारण तिला धडाक्याने ’स्टाईल’मध्ये मरायचं होतं.
मला आपलं ’रेखाने शिळा उपमा खाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता’. एव्हढंच काय ते या विषयातलं ’स्टायलिश’ ठाऊक.
सर्वसाधारण असे बरेच पर्याय मी सुचवले. उदा. सायनाईड, पंख्याला लटकणे वगैरे. पण तिला आत्महत्या करताना वेदना झालेल्या नको होत्या.
चेहरा विदृप झालेला नको होता.
इत्या्दी बरेच ऍस्टेरीक मार्क्स तिच्या ’आत्महत्या’ या विषयावर होते. थोडक्यात तिला फ़ाईव्ह स्टार आत्महत्या हवी होती.
ऑबव्हियसली तिने आत्महत्या केली नाही. खरं म्हणजे तिला करता आली नाही.
कारण स्वच्छ होतं- तिला जगायचं होतं.
किंवा तिला तिच्याभोवती असलेल्या इतर प्रेमांची जाणीव झाली.
खरंच.
आयुष्यभर कोणाचं ना कोणाचंतरी प्रेम आपल्यासभोवती असतं. पण आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, जे नाही त्याच्या शोधात दूर-दूरवर जातो.
नचिकेत नाही का? समीरचं, आप्तांचं भोवती उबदार शालीसारखं लपेटलेलं प्रेम सोडून मृत्यूला शोधत त्या विहीरी्त जातो?
जायते यस्मात च, लीयते यस्मिन इति जल:
ज्यातून जन्म घेतो आणि ज्यात लय पावतो ते पंचमहाभूत म्हणजे पाणी..
आपण एखादी गोष्ट नाकारतो.
ती नाकारण्याचा निर्णय घेणं खूप सोप्पं.
पण तो अंमलात आणण्यासाठी लागणारी आयुष्याची उलथापालथ करण्यासाठीची श्रद्धा, विश्वास आपल्याकडे आहे का? याचाही विचार झाला पाहिजे.
माझ्याकडे आहे??
तर हो!
आहे!

कधीकधी आपण एखादी कविता वाचतो त्यातल्या एक-दोन ओळी खूपच आवडून जातात.
गुलजार, गालिब हे तर irresistible!
मग त्या ओळींचा उल्लेख कुठल्यातरी पोस्टमध्ये कधीतरी करायचाच असं आपण ठरवतो.
पण नुसतंच - "मला हे आवडलं-देत आहे" असं लिहीलं तर लै बोराड वाटतं. त्याला साजेशी सिच्युएशन असेल तर त्या ओळींना वेगळाच रंग चढतो.
नसेलच सिच्युएशन तर आपण कधीकधी ती ’बनवतो’. आणि नाहीच बनवता आली तर वैतागून स्वस्थ बसतो.
दिवसांमागून दिवस जातात.
आपली चिडचिड चिडचिड होत राहते.
माझीही नाही आता अशीच चिडचिड होतेय?
मला एलियट्ची ही कविता कधीची ब्लॉगवर लिहायचिये पण बोंबलायला सिच्युएशनच नाही.

"आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना
मागचा रस्ता लाटांनी रुंदावलेला बघताना
तुम्ही म्हणणार नाही की हा
टाकला मागे मी माझा भूतकाळ
आणि हा मी सामोरा भविष्याला"

अरे! पण सिच्युएशन नसल्याचं भांडवल करून मी सिच्युएशन निर्माण केलीच की नाही?
वा!

मी संध्याकाळची फ़िरायला जाते तेव्हा दोन मध्यमवयीन माणसं पिंपळाच्या पारावर बसून बुद्धीबळ खेळत असतात.
ती लोकं एकाच प्रकारच्या चाली खेळतात, त्यांचा खेळही नेहमी एकाच प्रकारे संपतो. ’स्टेल-मेट’ने.
त्यांच्या लक्षात येतं का नाही? हे तर मला माहीत नाही.
नसावं बहुतेक!
पण उत्साहाने प्यादी मांडून तोच तोच खेळ खेळण्यातल्या त्यांच्या उत्साहाची लागण मलाही होते आणि मी ही ताटकळत चांगले तीन चार गेम्स त्यांच्या तोंडाकडे टकमक बघत उभी असते.
आपलं काय वेगळं असतं नाहीतरी?
काल केलं तेच आज.
आज केलं तेच उद्या.
त्यांनी केलं म्हणून मी.
मी केलं म्हणून तू.
सवयीने आपणही चाकोरीतच फ़िरतोय ना?
असं फ़िरत राहायचं आणि पोकळी वगैरे जाणवलीच कधी तर त्यात कविता, ब्लॉग, सिगरेट्स, गझल कोंबून बसवायची.
फ़ाजलींनी कसलं ग्रेट लिहून ठेवलंय याबाबतीत.

"रात के बाद नये दिन की सहेर आयेगी
दिन नहीं बदलेंगे, तारीख बदल जायेगी"

------

अगदीच ब्रशने मन मानेल तसे फ़टकारे मारलेल्या चित्रासारखं झालंय का लिखाण?
बट माईंड यू, त्यालाही ’ऍबस्ट्रॅक्ट’ म्हणतात.
खालून, वरुन, उलट, सुलट
कसंही पहा.
आहे तसंच दिसणार!

आणि
येस्स्स!
कालिब म्हणजे ’काहीही’ लिहून घूयात.
हे वाचून ’काहीही बरं का!’ असं वाटलं तर हेतु सफ़ल!

डॉ. सिंग, तुम्हारा कुछ भी नही चुक्या!

प्रिय पंतप्रधान,

मला हे कळून घेताना अत्यंत आनंद झाला होता की सुप्रीम कोर्टाला (आदराने!) झटकून टाकून तुम्ही म्हणालात की "धान्य, धान्याचे सडणे वगैरे-ह्याबद्दल ’धोरणांतर्गत’ विचार करणं हे सरकारचं काम आहे". आणि हे खरंच कोणीतरी बोलून दाखवायची गरज होती. असं करून यूपीए सरकाराकडे अभावानेच असलेला प्रामाणिकपणा तुम्ही दाखवलात.

लाखोंच्या राशीने सडत पडलेल्या धान्याचं काय करायचं हे तुमचं सरकार ठरवेल, सुप्रीम कोर्ट नाही. जर याबद्दलचं धोरण ’पडून असलेले धान्य गरीब भुकेल्यांच्या मुखी घालण्यापेक्षा ते सडू द्या’ असं सांगत असेल, तर त्यात कोर्टाला ढवळाढवळ करायचे काहीच काम नाही.
"धोरणं बनवणं हे सरकारचं काम आहे"- तुम्ही म्हणता.
राष्ट्राचा नेता - वाढती भूक, कुपोषण, धान्य साठवण्याच्या जागांची अभाव हे सगळं सरकारच्या धोरणांचंच फ़लित आहे- हे मान्य करतोय हे पाहून बरं वाटलं. दुसरं कोणी असतं तर हे सगळ्याचं खापर विरोधी पक्ष, हवामान आणि (सारवासारव करायला उपयोगी पडणारी) बेभरवशाची बाजारयंत्रणा यावर फ़ोडून मोकळा झाला असता.. पण तुम्ही तसं केलं नाहीत. तुम्ही धोरणांकडे स्वच्छ निर्देश केलात. आणि धोरणं ही हेतुपुरस्पर असतात आणि मार्केटपेक्षाही जास्त मूर्त आणि थेट असतात.

धान्यसाठयाचा प्रश्न:
नवी शहरं, मॉल्स, आणि मल्टीप्लेक्सेस बांधायसाठी खाजगी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना सवलती देण्याइतका पैसा सरकारकडे असताना राष्ट्राचे धान्य साठवण्याच्या जागेसाठी सरकारी तिजोरीतून काहीच खर्च होऊ नये हाही धोरणांचाच भाग असेल असं मानायला हरकत नाही. तुमच्या नव्याच धोरणाअंतर्गत खाजगी जागा भाडेतत्वावर घ्यायची नवी ’कल्पना’ पुढे आलीये.यातून एक प्रश्न उद्भवतो की की २००४ ते २००६ मध्ये सरकारने भाडेतत्वाबर घेतलेली जागा (१० वर्षांचा कालावधी हातात असताना) मध्येच का सोडली?आता पुन्हा भाडेतत्वावर घेणं हे साहजिकच खर्चिक काम आहे. सरकारच्या मालकीच्या जागांवर धान्य साठयासाठी बांधकाम करण्याचाही पर्याय आहेच- जे आता छत्तीसगढ सरकार करतेय. दूरगामी परीणामांचा विचार करता ते कमी खर्चाचं आणि जास्त फ़ायद्याचं ठरेल (आपल्या!). पण अर्थात हे संपूर्णपणे तुमच्या धोरणांवर अवलंबून असल्याने फ़क्त सुचवतोय.

देशाचा एक महत्वाचा अर्थशास्त्राचा प्रोफ़ेसर म्हणून तुम्ही मोकळ्या जागेवर, वाईट गोडाऊन्समध्ये सडत असलेल्या, सडू घातलेल्या धान्याचं काय करायचं ठरवलेय यावरच्या धोरणांचा नकीच विचार केला असेल याची मला खात्री आहे. नाही-काय आहे, की तुमची धोरणं त्या दिवसेंदिवस जास्त आक्रमक होत चाललेल्या उंदरांना समजत नाहीयेत. त्यांना वाटतंय की ते त्या धान्याचं काहीही करू शकतात. आणि भरीस भर त्यांना सुप्रीम कोर्टाचीही भीती वाटत नाही. (बहुतेक, त्या धान्यापसून त्यांना दूर ठेवण्याकरता काही सवलती जाहीर करायची गरज आहे)

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याने नुकताच मान्य केले की त्यांना याच मुद्द्यावर २००४ च्या निवडणुकांमध्ये सपशेल आपटी खायला लागून सरकारवरून पाय उतार व्हायला लागले होते. चुकवण्यासाठी खूप मोठी किंमत! तुमच्या लक्षात काही येतेय का?

नऊ वर्षांपूर्वी सध्याच्याच,या ’अन्नाचा हक्क’ संबंधी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते," गरीब, कमजोर, विपन्नावस्थेत असलेल्या लोकांना भूक आणि उपासमार यांचा सामना करायला लागू नये. आणि ही सरकारची जबाबदारी आहे-मग ते राज्य सरकार असो वा केंद्र सरकार. आणि ह्या सर्वांकरता काय काय धोरणं आखायची हे सरकारने बघावं. धान्याची नासाडी होऊ नये, ते उंदीर-घुशींना बळी पडू नये, ते धान्य भुकेल्यांपर्यंत पोहोचलं-तरी सुप्रीम कोर्ट समाधानी असेल."

हजारोंच्या संख्येने जे शेतकरी आत्महत्या करतायेत ते पण तुमच्याशी सहमत आहेत. त्यांना पण हे माहीत आहे की कायदे करणारया कोर्टाने नव्हे तर तुमच्या धोरणांनी त्यांना स्वत:चा जीव घ्यायला भाग पाडलं.त्यामुळेच ज्यांनी आत्महत्येपूर्वी पत्रं लिहून ठेवलियेत ती तुम्हाला,आपल्या अर्थमंत्र्यांना आणि आमच्या प्रिय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून आहेत.
ती पत्रं तुम्ही वाचली आहेत डॉ.सिंग?
तुमच्याच पक्षाच्या महाराष्ट्रातील सरकारने त्यातलं एकतरी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे का?
त्यातून कर्जं, कोसळणारया किंमती, वाढलेला गुंतवणूकीचा दर, त्यांच्या समस्या बिलकून समजून न घेणारं सरकार-याच्याच कहाण्या ऐकायला मिळतात.ती पत्रं त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना पण नाही लिहीलेयत तर तुम्हाला आणि तुमच्या सहकारयांना उद्देशून लिहीलेली आहेत. त्यांच्या विपन्नावस्थेला धोरणं किती जबाबदार आहेत हे ते समजून चुकले होते-म्हणूनच ती पत्रं धोरणांच्या जनकांना उद्देशून होती.

शेतकरयांमधला असंतोष:
वर्ध्याचे रामकृष्ण लोणकर यांनी लिहून ठेवले आहे, की तुमच्या २००६च्या ऐतिहासिक विदर्भ-भेटीनंतर आणि धान्य-कर्जाच्या घोषणेमुळे मला वाटले होते की मी पुन्हा जगू शकेन" पण "मला बॅंकेत काडीचीही किंमत मिळाली नाही. काहीच बदललेलं नाहीये". वाशिमच्या रामचंद्र राऊत यांनी आपलं पत्रं (जे तुम्हाला -राष्ट्राध्यक्षांना-आणि तुमच्या सहकारयांना उद्देशून आहे) १०० रुपयाच्या स्टॅंप-पेपरवर लिहून ठेवलेलं आहे. निषेध ’कायदेशीर’ व्हाहा याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसते. अशा कित्येक कहाण्या आहेत. सगळ्या तुमच्या धोरणांकडे बोट दाखवणारया..आणि ते बरोबरच आहे. नाही? नुकतंच बाहेर आलेल्या बातमीनुसार संपूर्ण ’Agriculture Credit ’च्या अर्ध्याहीपेक्षा जास्त वाटा हा ग्रामीण बॅंकांमध्ये नव्हे तर नागरी आणि शहरी बॅकांमध्ये वाटण्यात आला.त्यातला जवळजवळ ४२% -मुंबईला (इथेही शेती होते- पण वेगळया प्रकारची..इथे कॉंट्रॅक्ट्सचं पीक घेतलं जातं). लोणकर राऊत यांच्यापर्यंत Agriculture Credit कसं पोहोचेलच कसं?

आजची महागाई ही नि:संशय तुमच्या धोरणांचंच फ़लित आहे.
तुम्ही टोरोंटोला जागतिक नेत्यांना सर्वसमावेशक विकासाबद्दल लेक्चर देत असताना तुमचं सरकार अनियंत्रित पेट्रोल दर-वाढ, केरोसिनच्या दरात वाढ जाहीर करते, याने मी अवाक झालो आहे.
जेव्हा आपल्या धोरणांमुळे लाखो लोकांचा आधीच अल्प असलेला आहार अत्यल्प होतो,तेव्हा त्यावर नुसती चर्चा करण्यात काय हशील?
जेव्हा धोरणांमुळे लोकांच्या अधिकाराची पायमल्ली होतेय आणि लोक सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतायेत तेव्हा सुप्रीम कोर्टाने काय करावं?
सुप्रीम कोर्टाने धोरणं बनवायचा प्रयत्न करु नये -बरोबरच म्हणत आहात तुम्ही. पण मग तुमच्या धोरणांचे परीणाम त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिल्यावर त्यांनी काय करावं?
हे तुम्हालाही माहितेय आणि मलाही की -धोरणं लोकंच बनवतात. आणि तुमच्याबाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या ताफ़्यात तुम्ही बाळगून असलेले प्रतिथयश अर्थतज्ञ.. ज्यांच्यापैकी अनेकांनी ’बालमजुरी बंदी’च्या विरोधात कंबर कसली होती. एकाने तर थे्ट ’New York Times' मध्ये "The Poor Need Child labour" (November 29, 1994) हा लेख प्रकाशित केला होता. आपल्य घरी १३ वर्षाचा मुलगा कामाला आहे हे ही त्याने मान्य केले होते.

सरकार ११वी पंचवार्षिक योजना सुरु व्हायच्या आधी नवी BPL (Below Poverty Lie) तयार करायचे २००६ ला दिलेले वचन पाळत नाही, नवी BPL प्रत्यक्षात येतच नाही तेव्हा सुप्रीम कोर्ट काय करेल?
१९९१च्या censusवरुन २०००च्या गरीबीचा अंदाज लावला जातो आणि त्यानुसार धान्याचा वाटा राज्यांमध्ये वितरीत केला जातो तेव्हा सुप्रीम कोर्ट काय कुणीच काही करू शकत नाही.
या २० वर्ष जुन्या माहीतीमुळे जेवढ्या लोकांना आज आताच्या वर्षी BPL/’अंत्योदय अन्न योजनेच’ लाभ मिळायला हवा होता त्यापेक्षा सुमारे ७० लाख कमी लोकांना मिळतो आहे. आणि याबद्दलची धोरणं तुम्हीच राबवत असल्याने हे तुम्हाला माहीत नसण्याचे काहीच कारण नाही.

सुप्रीम कोर्ट या धोरणांसंबंधीच्या द्विधा मन:स्थितीतून बाहेर येईपर्यंत आम्ही तुमच्या धोरणांवर पुनर्विचार करतो आहोत.या पत्राची एक प्रत तुमच्या अन्न आणि कृषी मंत्र्यांकडे पाठवलीत तर मी उपकृत होईन-अर्थात तो कोण आहे आणि कुठे आहे, हे तुम्हाला माहीत असेल तर.

आपला,
पी. साईनाथ

-----

(स्वैर अनुवाद: ’द हिंदू’ वरून)

उपरती.

एरव्ही मी नाकासमोर बघून चालणारी मुलगी!
चालतानाही बाजूने कोणी ओळखीचं जरी गेलं तरी माझ्या लक्षात येणार नाही इतकी मी स्वत:तच गुंग असते.
आज नेहमीच्याच भागात फ़िरताना जरा मान वर करुन पाह्यलं तर तर तलावपाळीवर तीन ताडाची झाडं दिसली. सगळ्या झाडांच्या वर उत्तुंग अशी उभी होती. मला भयानक आश्चर्य वाटलं. वर्षाचे ३६५ दिवस मी तलावपाळीवर फ़िरायला येते इतकी मोठी झाडं माझ्या नजरेतून कशी सुटली?
घरी येऊन विचारणा केली तर बहीण म्हणाली,"अगं ती पहिल्यापासूनच तिथे होती..तुझ्या कसं नाही लक्षात आलं एवढ्या वर्षात?"
तिच्या चेहरयावर आश्चर्य होते. ती नक्कीच माझी थटटा करत नव्हती.
मला हे गंभीर वाटलं.
मी ’प्रिय’ला फ़ोन करुन हे सांगीतलं तर तो मला म्हणाला "थोडा विचार कर. तुझ्या आजूबाजूला बघ. तुझं तुलाच कळेल."
आणि मी खरंच तसं केलं.
मला दिसला न बघता कोपरयात भिरकावलेल्या ग्रीटींग कार्डसचा गठ्ठा, मोबाईलवर कधीकधी इग्नोर करत असूनही नियमीतपणे येत असलेले कॉल्स, कंटाळा आला म्हणून कट केलेले कॉल्स, आजही न उचललेले चार-पाच मिस्ड कॉल्स.
मेलबॉक्स उघडला तर आतापर्यंत उघडूनही न पाहिलेल्या, उत्तरं न देता तशाच पडलेल्या मेल्स दिसल्या.
सगळी जिव्हाळ्याची माणसं. मी कितीही माज करो माझी नियमीत विचारपूस करतात, काळजी करतात.
And suddenly, it dawned on me.
आणि ही सगळी मंडळी विचारत असल्यासारखी वाटली,
"आम्ही नेहमीच तुझ्यासोबत असतो...होतो, तुझं लक्ष नव्हतं का?"

’आवरण’

"बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यानंतरच्या काळात अल्पसंख्यांकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी सरकार काही धोरणे आखते. बुद्धीवादी, मार्क्सवादी, जातीनिरपेक्षवाद्यांना हाताशी धरून इतिहासातल्या काही विवक्षित सत्यांना दडपायचा प्रयत्न करते. इतिहास पुनर्लेखनाचे संकेत मिळायला लागतात. या धडधडीत खोटेपणाविरुद्ध नायिका आपल्या परीने कशी उभी राहते, तिचे विचारमंथन, मानसिक द्वंद्व, स्वत:च्या निष्ठांशी अविचल राहण्याचा तिचा बाणेदारपणा, सत्याचा अटटाहास, यात तिच्या संसाराची झालेली वाताहत, सरकारचा शहाजोगपणा, लाळघोटेपणा करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकरता वाटेल ते करायची तयारी असलेले लुब्रे सोशालिस्ट्स, प्रत्यक्षात पुराणमतवादी असलेले आणि वरून पुरोगामी असल्याचा आव आणणारे बुद्धीजिवी..." म्हणजे अवघ्या २ वर्षात २० आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी एस.एल.भैरप्पांची कादंबरी ’आवरण’..!

असत्य बिंबवणारया कार्याला ’विक्षेप’असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणारया या क्रियेला ’अविद्या’ तर सामूहीक आणि जागतिक पातळीवर चालणारया या क्रियेला ’माया’ असे म्हटले जाते. आणि विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारया मायेला ’आवरण’ म्हणतात.

’आवरण’ मध्ये वेगवेगळी माणसं आहेत, त्यांची स्वत:ची अशी वेगळी विचार-बैठक आहे. कादंबरीची Protagonist रझिया (जी पुर्वाश्रमीची लक्ष्मी असते. आमीर नावाच्या वर्ग-मित्राबरोबर लग्न केल्यानंतर तिने धर्म बदललेला असतो). तिच्या आयुष्यातला एक कालखंड कोणीतरी लिहून ठेवलेला असावा आणि त्या अनुषंगाने तिच्या परिघात आलेल्या इतरांचाही पंचनामा व्हावा अशा रितीने कादंबरी लिहिली गेलेली आहे. संपूर्ण पुस्तकात ’ हा बघ पुरावा, आहे की नाही सत्य??’ असा रोकडा सवाल आणि जवाब (जर पुरावा असेल तर अर्थात! नाहीतर आक्रस्ताळेपणा) अशा अभिनिवेषातले जाबसाल आहेत.

’आवरण’ची कथा उलगडते कर्नाटकमधल्या हंपीमध्ये. भग्नावषेशांवर डॉक्युमेंटरी करायला आलेली रझिया तिथली भग्न नरसिंहाची मूर्ती पाहून विषण्ण होते. त्या भग्नावषेशांचं कारण वैष्णव-शैव यांच्यामधला वाद सांगीतला गेलेला असला तरी हिंदु संस्कारात वाढलेल्या रझियाला हिंदु लोकांकडून असे कदापिही होणे शक्य नाही याची मनात कुठेतरी खात्री असते, त्यामुळेच काहीतरी चुकत असल्याची जाणीव तिला होते. त्याला पुष्टी मिळते तिच्या स्वर्गवासी वडीलांनी ’इस्लाम’वर केलेल्या अभ्यासाच्या टिपणांनी. त्या वाचनातून बाहेर आलेल्या सत्याने ती हादरुन जाते. ’आवरणा’ची सर्वात प्रथम जाणीव रझियाला तेव्हाच होते. मग झाकोळ दुर झाल्यावर ती आपलं ज्ञान इतरांबरोबर वाटायचा प्रयत्न करते तेव्हा डोळ्यांवर झापडं ओढून बसलेल्या लोकांपर्यंत तिला काय सांगायचेय ते कसं पोहोचत नाही, पोहोचत असलं ते स्वीकारायला नाखूष कसे असतात, त्यातून तिची निर्भत्सनाच कशी होते हे सर्व त्या ’आवरणा’च्या जाणीवेबरोबर आलेले आहे.

’आवरण’ मधली सर्वात प्रभावित करणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे रझियाने देऊ केलेली थोडक्यात भैरप्पांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेली दिड-एकशे पुस्तकांची संदर्भसूची. ’आवरण’मध्ये रझिया तिच्या पुस्तकावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर म्हणते, "माझ्या कादंबरीला या सर्व पुस्तकांचा आधार आहे. जर माझ्या पुस्तकांवर बंदी घालायची असेल तर त्याआधी या प्रत्येक ग्रंथावर बंदी घातली पाहिजे." या माणसाचा व्यासंग पाहून चकीत व्हायला झालं आणि त्यांच्याबद्दलचा आदरही दुणावला. त्यांच्या ’पर्व’ बद्दल कुठेतरी वाचलं होतं की ती कादंबरी लिहीण्याच्या आधी सहा-साडेसहा वर्षं ते फ़क्त महाभारतावरच्या पुस्तकांचं वाचन करत होते. ’लई भारी’ म्हणून संदर्भसूची चाळायला लागतो आणि थबकायला होतं...
इथं एक मेख आहे.
सीताराम गोयल- हिंदुत्ववादी लेखक, राम स्वरूप-हिंदुत्ववादी, व्ही.एस.नायपॉल-Anti-Islamic लेखक, अरूण शौरी-इस्लामचे टिकाकार. या सर्वांची पन्नासेक पुस्तकं आहेत.
’आवरण’ मध्ये कुठेतरी भैरप्पा म्हणतात की "ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता, थेट त्याच्याकडे बघण्याचा प्रामाणिकपणा हवा". विशिष्ठ वर्गाचा कैवार घेऊन लिहीणारया या सर्व लेखकांच्या लिखाणाचे दाखले देऊन भैरप्पा काय सुचवू पाहतायेत??
अल्बेरूनी, जदुनाथ सरकार, प्रियोळकर, स्टॅनली-पूल ही सर्वसमावेशक नावं संदर्भसूचीकरता आणि पुस्तकात दाखले देताना मात्र सीतराम गोयल बियल प्रभृती असा प्रकार झालाय असं वाटायला लागतं. मागचे पुढचे सर्व संदर्भ वगळून आपल्याला सोयिस्कर तेव्हढीच सत्यं उचलायची आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायचं. म्हणजे अंगावर शेकलंच तर "बघा बघा, मी याच पुस्तकातून संदर्भ घेतलाय. माझ्या पुस्तकावर बंदी आणायचिये तर या पुस्तकावर पण आणा" असा कांगावा सहज करता येतो. असं बरेच लेखक करतात. असो, मी ही सर्व पुस्तकं वाचलेली नाहीएत त्यामुळे भैरप्पांच्या लिखाणावर याहून जास्त शंका घ्यायचा मला हक्क पोहचत नाही.

’आवरण’च्या कथेमध्ये आणखी एक समांतर कथाप्रवाह आहे तो म्हणजे मूळ राजपुत असलेल्या पण नंतर खोजा (तृतीयपंथी) बनवल्या गेलेल्या ख्वाजाजहानचा. रझिया ’औरंगजेबाच्या’ काळावर एक कादंबरी लिहीते आहे त्यातले हे मुख्य पात्र. शेवटच्या क्षणी कच खाऊन इस्लाम स्वीकारलेला नंतर समलिंगी संभोग, जबरदस्तीने नपुंसक करणे इ. नी अपमानित केलेला ख्वाजाजहान. रझियाचा मनात चाललेले द्वंद्व, तर्ककुतर्क, भरकटलेपण या ख्वाजाजहानच्या कहाणीत सहीसही प्रतिबिंबीत झालेले आहे. या लिखाणाला तिच्या वडीलांच्या मॄत्यूची पार्श्वभूमी आहे. तिने धर्मांतर केल्याने कायम दुरावलेल्या वडीलांचं आपण क्रियाकर्मही करु शकलो नाही ही खंत तिला खाते आहे. आपण मुळातच धर्म बदलला ते चूक की बरोबर, मग मूळत: ज्या धर्मात होतो तो धर्म आपण आहोत त्या धर्माहून किती सहिष्णू आहे याबद्दल तिला वारंवार येत असलेली प्रचिती, त्यासाठी तिच्या वडीलांनी इस्लामवर केलेल्या गाढया अभ्यासाची टिपणं आदीची मदत होते, मग तिचे होणारे मतपरिवर्तन हे सर्व सर्व ख्वाजाजहानच्या कहाणीतही आहे. म्हणजे थोडक्यात ती कुठेतरी रझियाचीच कहाणी आहे. ख्वाजाजहान आणि एका तपस्व्याची गंगेच्या काठावर पडलेली गाठ आणि त्यांच्यामधला धर्मावरचा संवाद केवळ वाचावा असाच आहे.

छोट्याछोट्या वाक्यातून किंवा प्रतीकांमधून वाचकाला सुन्न करण्याची भैरप्पांची हातोटी विलक्षण आहे. रझिया आणि तिच्या वडीलांमधल्या संवादाची या ३०० पानी पुस्तकात फ़क्त सहा-एक वाक्यं आहेत. त्यातलं एक वाक्य असं आहे- "तू एकटीने आपल्या आयुष्याचं काय करून घेतलंस हा प्रश्न नाही. तुझ्या पोटी जन्मणारं मूल किंवा त्याचं मूल, कुठल्या ना कुठल्या पिढीत आपल्या देवालयाचा नाश करेल. ते पाप तुझ्या डोक्यावर राहील, लक्षात ठेव!"
हे वाचून आपण दुसरया वाक्याकडे वळतो न वळतो तोच त्यातल्या गंभीर शक्यता ध्यानात यायला लागतात आणि आपण गडबडून जातो. मग तो ख्वाजा-जहानच्या Castrationचा प्रसंग. तो इतका भीषण आहे की वाचक "स्स.." केल्याशिवाय राहत नाही. किती लोकांना तृतीयपंथी बनवले गेले, किती स्त्रियांना जनान्याची वाट दाखवण्यात आली, किती हिंदु मंदिरं तोडून मशिदी बनवल्या गेल्या इ. औरंगजेबांच्या जनतेवरच्या अत्याचाराचा लेखाजोखा वाचून आपण मूळ रझियाच्या कहाणीत येतो तेव्हा तिच्याशी इतके समरस झालेलो असतो की राजधानीच्या शहरातल्या एका रस्त्याला या कॄर, असहिष्णु राजाचे नाव दिलेले बघून रझियाबरोबर आपणही उद्विग्न होऊन जातो.

’आवरण’ मधलं एकही पात्र विना-प्रयोजन नाही.
लक्ष्मी उर्फ़ रझिया, तिचा नवरा आमीर-त्याचे कटटर मुसलमान आई-बाप, लक्ष्मीचे वडील, प्रोफ़ेसर शास्त्री (हे पात्र भैरप्पांचे वैचारीक प्रतिस्पर्धी यु.एन.अनंतमुर्तींवर बेतल्याचे म्हटले जाते, त्यावर अनंतमुर्तींनी सडकून टिका केल्याने ’आवरण’वर वाचकांच्या आणखी उडया पडल्या), रझियाचा सौदीमध्ये असलेला कटटर मुसलमान मुलगा नझीर-आजच्या आधुनिक जगातही कटटरपणाची कास पकडून चालणारया मुलांचे प्रतिनिधीत्व करणारा, शास्त्रींचे आई-वडील-मुलगा-सुन-बायको, केंचप्पा आणि इतर सर्व. धर्मांतराच्या मुद्द्यावरून, Post-धर्मांतर परिस्थितीवर रझियाचे बरेच मोनोलॉग्ज आहेत.(इथे मला भैरप्पांनी RSSच्या व्यासपीठावरुन धर्मांतराविरुद्ध चळवळी चालवल्या होत्या त्याची आठवण झाली), टिपू हा प्रत्यक्षात क्रूर राजा आणि कटटर मुसलमान असला तरी त्याला सहिष्णु रंगवण्यात हात असलेल्या लेखकांचा संदर्भ आहे. इथे गिरीश कर्नाडांनी ’टिपु हा आतापर्यंतचा थोर कन्नडीगा आहे’ असे उद्गार काढल्याचा आणि त्यांच्या टिपुवरच्या ’The Dreams of Tipu Sultan’ किंवा ’बळी’या नाटकाचा आणि त्यातून कर्नाडांनी टिपूच्या केलेल्या उदात्तीकरणाचाही अप्रत्यक्ष उल्लेख येतो.. मात्र.. प्रोफ़ेसर शास्त्रींच्या कॅथलिक बायकोने आई-वडीलांच्या मर्जीविरुद्ध शास्त्रींशी लग्न केलेले असताना तिच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला तिचा कडवा विरोध का असावा किंवा रझियाचे वडील मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करताना फ़क्त देवस्थानांच्या विध्वंसांबद्दल आणि मुस्लिम राजांनी ओलीस ठेवुन घेतलेल्या राजपुत्रांबद्दलच टिपणं का काढून ठेवतात याचा उलगडा होत नाही. आपल्या सोयीची तेव्हढी सत्यं इतिहासातून उचलण्याचा आणखी एक प्रकार इथे जाणवला. ह्या छोट्या गोष्टी सोडल्या तर कादंबरी आपल्याला बरयाच ठिकाणी अंतर्मुख करून जाते, विचार करायला भाग पाडते.

ही कादंबरी वाचताना काही वर्षांपूर्वी ’शिक्षणाचे भगवीकरण’ झाले होते त्याची आठवण येणे साहजिक आहे. पाय-उतार झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या सो कॉल्ड मुस्लिमधाजिर्ण्या धोरणाला सणसणीत प्रत्युत्तर म्हणून NDA सरकारने ही खेळी केली होती. पाठ्यपुस्तकं बदलली, मध्ययुगीन काळात( म्हणजे दिल्ली सल्तनतीच्या, मोघल काळात थोडक्यात ’मुस्लिम’ कारकिर्दीत) भारताची किती आणि कशी वाताहत झाली (जे तद्दन खोटं आहे असंही मी म्हणणार नाही, पण जे तद्दन खरंही नाहीये) याची रसभरीत वर्णनं घुसडली. पण सुदैवाने त्या सरकाराला पाय-उतार व्हायला लागले आणि आपल्यासकट आपल्या पुढच्या पिढ्यांना adulterated इतिहास वाचावा लागण्याची आफ़त टळली. I wonder, RSSप्रणित ’या’ आवरणावर भैरप्पांनी लिहीलं असतं का?

कोणाच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवणं ही शिकवण हिंदु धर्म देत नाही. (मला आठवत असलेले) पुष्यमित्र शुंगाने बौद्ध स्तूपांची तोडफ़ोड केल्याचे उदाहरण वगळता हिंदू राजांनी इतर धर्माच्या लोकांना त्रास दिलेला नाही, ना त्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवला. उलट त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा होती. हिंदु राजांनी अरब व्यापारयांना मशिदी बांधण्यास परवानगी दिल्याचे( जरी त्यामागे त्यांचा आर्थिक हेतु होता तरी)दाखले इतिहासात आहेत. हा हिंदु धर्माचा मोठेपणा आहे. देवळात जायचं की नाही हे ठरवायचं स्वातंत्र्य हिंदु धर्मातल्या लोकांना आहे, वेळप्रसंगी आपण आपल्या दैवतांची चेष्ठाही करु शकतो. पण.....हिंदु धर्माचे दाखले देऊन इस्लाम कसा क्रूर हे दाखले देण्यात काहीच हशील नाही. प्रत्येक धर्म आपपल्या परीने वेगळा आहे, प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबरांनाच ’अल्लाह’ असे म्हटले जाते, मूर्तीपूजा त्यांच्यात वर्ज्य आहे, कुठल्याही ’दार-उल-हरब’(अमुस्लिम) प्रांताला ’दार-उल-इस्लाम’ बनवणे म्हणजे मेल्यानंतर पैगंबरांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही शिकवण त्यांना दिली जाते. काफ़ीर (अमुस्लिम) माणसापुढे दोनच उपाय- मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. मग पुढे दिल्ली सल्तनतीच्या राजांनी मांडवली करून त्यात ’जिझिया’ वगैरे घातला. असं सगळं असताना इथे राज्य करायचं स्वप्न घेऊन आलेल्या या ’गाझी’ लोकांनी त्यांचा धर्म सांगेल ते केलं. ते समर्थनीय मुळीच नाही. कोणाचा धर्म काहीही सांगो, माणसाने माणसांविरुद्ध जे काही केलं ते निंदनीयच आहे. राजेशाहीत, एकाधिकारशाहीत राजवटींकडून जनतेवर बरेच जुलूम होत आले आहेत. त्याला हिंदु राजेही अपवाद नाहीत. वैदीक काळात मनुवाद्यांनी जे केलं ते तिरस्करणीयच आहे. पण हिंदू धर्माने मनुच्या चुकांची जबाबदारी प्रांजळपणे घेऊन त्यत सुधारणा घडवण्याची तयारी दाखवली (असं भैरप्पा म्हणतात) आणि तेच इस्लामकडून अपेक्षित आहे. झाला तो इतिहास आहे. आपण त्याबद्दल ’आज’ काही करु शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्याकडे तटस्थपणे पाहायची वृत्ती जोपासणं, त्यातल्या चुकांमधून धडे मिळवणं अपेक्षित आहे. पण त्याकाळात तू माझी देवळं फ़ोडली म्हणून आज मी तुझ्या मशिदी फ़ोडतो असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्याने प्रश्न अजून धगधगत राहणार आणि चुकांमधून शिकण्यापेक्षा त्यांचं समर्थन करण्याची, जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढीस लागेल. भैरप्पा म्हणतात, "इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती, आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही." दुर्दैवाने ही गोष्ट आज कोणी ध्यानात घेताना दिसत नाही.

कादंबरीचा रागरंग काहीही असला तरी पण कादंबरीचा शेवट आमीरच्या किंवा लक्ष्मीच्या धर्मांतराने झालेला नाही. परस्पर-सामंजस्य हे सत्यावर टिकून राहतं, दिशाभूल करुन नाही. आपला धर्म अजूनही सनातन आहे, आपल्या धर्मात स्त्रियांना शिक्षण नाही, इतिहासातल्या आपल्या धर्माकडून घडलेल्या चुकांना बेमालूम झाकून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या चुकांची पुनरावृत्ती घडता कामा नये, "आमच्या पुर्वजांच्या चुकांना आम्ही जबाबदार नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत" हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे , हे आमीरने प्रांजळपणे स्वीकारणं यात भैरप्पांना कादंबरीचा शेवट आशादायक करायचा आहे हे आलंच. आणि इथेच भैरप्पा इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

"आवरण शक्तिस्तावदल्पोsपि मेघोsनेकयोजनायत्मादित्यमंडलमवलोकयितृ नयनपथपिधायकतया्सच्छादयतीव..."

एखाद्या लहानशा ढगानेमध्ये येऊन अनेक योजने विस्तार असलेल्या सूर्यमंडळाला दृष्टीआड करावं , त्याप्रमाणे आवरण शक्ती सत्याला झाकोळून टाकते.

’आवरण’ वाचून आपल्या बुद्धी-विचारांवरची झापडं काही प्रमाणात दूर झाली आणि आपण असत्यापासून मुक्त होऊ शकलो तर ते ’आवरण’चे आणि पर्यायाने ’एस.एल.भैरप्पा’सारख्या सिद्दहस्त लेखकाचे यश मानले जाईल.

कैखुश्रु दुबाश मार्ग.

’इ.स.पूर्व ५३० मध्ये पर्शियाचा अखमनोशिय सम्राट कैखुश्रु याने हिंदुकुश पर्वत ओलांडून गांधार व कांबोज प्रदेशांतील लोकांकडून खंडणी वसूल केली होती.’

कामा हॉलचा पत्ता विचारत मी पहिल्यांदा त्या रस्त्यावरुन गेले तेव्हा त्याच्या ’कैखुश्रु दुबाश मार्ग, फ़ोर्ट, ४०० ००१’ मधल्या ’कैखुश्रु’ नावापाशी उचकी लागल्यासारखी अडकले होते. त्यावर सव्यापसव्य करून कैखुश्रु हे नक्की काय प्रकरण आहे?? याचा शोध घेण्यासाठी मी थेट पुराणैतिहासिक काळात डोकावून आले. त्यावरून कळलेली माहिती वरीलप्रमाणे.
आता ही कैखुश्रु दुबाश असामी कोण आहे? हे तर माहीत नाही, त्याचा शोधही मी घेतला नाही, पण या काहीशा विचित्र नावामुळे हा रस्ता कायम लक्षात राहिला.

’काळा घोडा’ भागातला हा रस्ता मी पाहिलेल्या अतिशय सुंदर रस्त्यांपैकी एक आहे.

रस्त्याच्या सुरुवातीला डाव्या बाजूला रिदम हा‌ऊसची देखणी इमारत, उजव्या बाजूला जहांगिर आर्ट गॅलरी, मॅक्स म्युलर भवन, नजर पोहोचेल तिथपर्यंत दोन्ही बाजूने रस्त्यावर कमान टाकणारी झाडं, देखणं ऍम्फी थेटर, समोर कलकत्ता एम्पोरियम, कॉपर चिमनी, बाजूला शायना एन. सीचं बुटीक, पुढे मोठ्ठं स्पा सेंटर, पुढे एक चिमुकलं चर्च, झाडांच्या गर्दीतून डोकावणारे कळस, चर्चमधून बाहेर पडणारी गोरी-देखणी माणसं, रस्त्याच्या शेवटाला लायन गेट, डाव्या बाजूने कामा हॉल तर उजव्या बाजूने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, त्यावरचा तो ग्रेट हॉर्नबिल, पुढे पोलिस मुख्यालय आणि गेट वे ऑफ़ इंडिया.

प्रचंड शांतता आणि बराचसा निर्मनुष्य भाग!

रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायम चिरनिद्रेत असल्यासारख्या वाटणारया आलिशान गाडया कायम उभ्या असतात. या रस्त्यावरून माणसं केवळ गाड्यांनीच फ़िरतात, त्यामुळे माणसांचे पाय या रस्त्याला क्वचितच लागतात.
कोणी फ़ेफ़रं ये‌ऊन टाच घासत मेला तरी कोणाला कळणार नाही इतकी सामसूम.
एखादं जहागिरदाराचं कार्ट हायबुझा दामटत जायचं किंवा एखाद्या उमरावाची पोरगी बेबी फ़ोर्ड शिकायला यायची तेव्हा धुरळा उडायचा, पाला-पाचोळा सैरावैरा धावायचा.. त्या रस्त्यावर हालचाल फ़क्त तेव्हढीच.
एव्ह्ढीही हालचाल झालेली त्या रस्त्याला बघवत नसावी, कारण असा धुरळा उडून गेल्यानंतर पाचच मिनीटांनी शंकर-काका हजर व्हायचा.
त्या रस्त्यावर माझ्याशी नातं आहे वाटणारया दोनच गोष्टी..
रस्ता कायम चकचकीत ठेवायचं असिधाराव्रत घेतलेला शंकर जांभरे आणि महापलिकेची ’इथे कचरा टाकू नये’ ची मराठी पाटी! बस्स!

या रस्त्यावर झाडांची एव्हढी गच्च दाटी आहे की सूर्याचे किरणही धडपडत खाली आलेसे वाटतात, आणि मग पानांच्या जाळ्यांमधून रस्त्यावर चमकदार मोझेकची नक्षी उठते.
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूप झाडं आहेत, सगळी ओळखीची.
पण हे ओळखीचे पिंपळ, गुलमोहर, फ़णस या रस्त्यावर मात्र माझं नाव आर्टोकार्पस हेटेरोफायलस किंवा डेलोनिक्स रेजिया किंवा फ़ायकस रेलिजि‌ओसा आहे पण ही दुष्ट कार्टी मला जाणूनबुजून पिंपळ/फ़णस म्हणतेय अशा आविर्भावात उभे.
आमच्या गावचा पिंपळ जरासा वारा सुटला तरी शीळ वाजवतो, पण हा पिंपळ...छे!
सगळी झाडं कायम राम..लक्ष्मण ...सीता खेळत असल्यासारखी स्तब्ध!
इकडे वारा वाजत नाही, तर पडतो. आजूबाजूला वादळ का चालेना तिथे, इथल्या झाडांची पानं मंद सळसळच करणार. तेव्हढीच आणि तितकीच.
या सळसळीच्या वरचं आणि खालचं ऑक्टेव्ह मी अपवाद म्हणून सुद्धा कधी ऐकलेलं नाही.
रिदम हा‌ऊसच्या दारातला सोनमोहोर मात्र फ़ार खट्याळ आहे. मी आले की माझ्या डोक्यावर भसाभसा फ़ुलं ओतायची आणि मी ती कामा हॉल ये‌ईपर्यंत डोक्यातून उपसत रहायची, जवळजवळ एक वर्ष हा उद्योग हो‌ऊन बसला होता. सदा गंभीर आजीच्या पुढ्यात अखंड नाचरी छोटी पोर किलबिलत असावी त्याप्रमाणे कायम स्थितप्रज्ञपणे आडव्या असणारया रस्त्याच्या सुरुवातीलाच हा सोनमोहोर चवरया ढाळत हसतमुख उभा आहे.

पण या रस्त्यावरची ही सामसूम रस्त्या’वरच्या’ गोंगाटाने व्यवस्थित भरुन निघते. बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जवळ असल्याने पक्ष्यांना ’अप-डा‌ऊन’ करायला सोप्पं जात असावं बहुतेक, कारण बरेच देखणे आणि दुर्मिळ पक्षी या झाडांवर ’Rental’ने राहतायेत. कुठे पोपटांमध्ये जोड्यांसाठी भांडाभांड चालू आहे, कुठे फ़ांद्यांची बेचकी घरट्यांसाठी कोणी वापरायची यावर मारामारी सुरु आहे, या सगळ्या गोंगाटाच्या वर गळा काढून दयाळ गाणं गातोय, टुणटुण उड्या मारत साळुंक्यांचा ’अलीगडी लप्पीयो’चा डाव रंगात आलाय, कुठे ढेरपोट्या चिमण्या पिंपळावर उच्छाद घालतायेत, या गदारोळात आपण काहून मागे राह्यचे म्हणून कावळे कोकलत असतात, असंख्य बारीक मुरकुटे हवेत उडत असतात...हीsss धमाल चालू असते.
ती देखणी पाखरं या धुश्मचक्रीत आपली पिसं गाळायची. ती गोळा करायचा नाद लागला होता मला त्या काळात.

हा रस्ता मला कायम फ़ोटोसाठी सज्ज वाटतो. फ़ूटपाथवर झोपलेला भिकारी नाही, फ़ेरीवाले नाहीत, शेंबूड ओढत येणारी पोरं नाहीत..सगळं परफ़ेक्ट!!
पण या परफ़ेक्टपणापायी हा रस्ता कमालीचा एककल्ली वाटतो.
दादरचा गोखले रोड, बोरीवलीचा एस.व्ही.रोड, पुण्याचा लक्ष्मी रोड कसे आजूबाजूला पोरं, सुना, नातवंडं-पतवंडांच्या गराडयात बसलेल्या गरत्या बा‌ईसारखे वाटतात..हा रस्ता अतिश्रीमंत घटस्फ़ोटीत बा‌ईसारखा वाटतो.

अजूनही मला ऍम्फी थेटरच्या पायरयांवर बसून काढलेले तास आठवतात. मनाने मी केव्हाच समोरच्या ’कॉपर चिमनी’त जा‌ऊन पोहोचलेले असायचे. तिथला मंद प्रकाश, वेटर्सची आदबशीर लगबग, चमचा-पेल्यांचा नाजूक किणकिणाट मला बाहेर बसूनही ऐकायला यायचा. पारश्यांच्या त्या पोर्सेलीनसारखी कांती असणारया मुली, त्यांचे हात तोंडावर घे‌ऊन किणकिण हसणे, तृप्ती ओसंडून चालल्यासारखी त्यांची सुस्त, जडावलेली चाल बघून मी किती जंगली आहे ह्याची जाणीव दर दिवशी नव्याने व्हायची. एकदा बाजूला येऊन बसलेल्या हिप्पीने ’लायटर’ची विचारणा केल्यावर त्याला ’नाही’ म्हणताना भयंकर ओशाळल्यासारखे झाले होते मला. त्या आठवणीने अजूनही तोंड कडू होतं.
याच पायरयांवर ’फ़िल्दी रिच’ व्हायचं ठरवलं होतं मी. ’कॉपर चिमनी’त जेवायला कचकावून पैसे मोजायला लागतात असा माझा त्यावेळचा समज.
समोरच्या खांबाची सावली पायात घुटमळायला लागली की मी निघायचे.
कामा हॉलला मी दररोज ६-३० पर्यंत पोहोचायचे. त्याचवेळेस लायन गेटला विरुद्ध दिशेने नेव्ही ऑफ़िसर्सची बस यायची. त्यातल्या एकाशी तर हसून मान डोलवेपर्यंत ओळख झाली होती. कुणास ठा‌ऊक मैत्रीही झाली असती पण..
माझा क्लास अर्ध्यावरच सुटला आणि ही ओळखही तेवढ्यावरच थांबली.
त्या रस्त्यावर निदान माझ्याबाबतीत तरी सगळ्या गोष्टी अशाच अर्धवट हजामत केल्यासारख्या झाल्या. याच काळात गाणी अर्धवट ऐकून सोडून द्यायची घाणेरडी सवय मला लागली होती. माझं दीर्घकाळ टिकून राहिलेलं (एकमेव) एकतर्फ़ी प्रेम-प्रकरण पण ऍम्फी थेटरच्या पायरयांवरच संपलं.

आज या गोष्टींना तब्बल आठ वर्षं उलटून गेलीत पण अजूनही ’कैखुश्रु दुबाश मार्ग’ म्हट्ला की मला पिसं गोळा करायला इकडेतिकडे धावणारी, पायरयांवर खुरमांडी घालून दात-ओठ खात mp3ची बटनं खटॅक-खटॅक दाबत बसलेली ८ वर्षांपूर्वीची मीच आठवते.. त्यावेळच्या इच्छांना आज संदर्भ उरलेला नाही, मला त्या आज मिडीयॉकर वाटतात, तपशीलही फ़ार धूसर झालेत. तेव्हाचा भाबडेपणाही नाही राहिलेला आता. पण मनाच्या सांदीकपारीत कुठेतरी या रस्त्याची आठवण तग धरून आहे. नाहीतर ८ वर्षांपूर्वी माझ्यासाठी पीलक पक्ष्याने गाळलेलं रेशमी पीस मी आताही डायरीत् खूण म्हणून जपून का ठेवलं असतं?

मुक्त जालों माझेपणें.

आपल्याशिवाय जराही न करमणारे लोक आपल्याशिवाय राहायला शिकलेत, तुम्ही नसलात तरी त्यांना चालण्यासारखं आहे, नव्हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचं हद्दपार करून टाकलेय ही जाणीव फ़ार त्रासदायक असते. आणि ती थोबाडीत मारल्यासारखी अचानक होते तेव्हा पायाखालची जमीन सरकते..

पायाखालची जमीन सरकते ते आपण त्यांच्याशिवाय कसे जगणार या चिंतेने नव्हे तर कोणाला आपली लागलेली सवय तुटू शकते या नव्यानेच झालेल्या साक्षात्काराने आणि त्यापाठोपाठच्या आत्मवंचनेने. आपण त्यांना आधीन करून घ्यायला कुठे कुठे कमी पडलो की आपल्यावर ही वेळ आली याचा मागोवा घेत, जर-तर च्या भेंडोळ्यात गुरफ़टून श्रांत-क्लांत होऊन जातो, विचार करकरून डोकं फ़ुटायची वेळ येते.

अशी वेळ अनेकांवर येते तशीच एकदा माझ्यावरही आली.

अशा वेळी माणसं साधारणपणे स्वत:ला कामात गळ्यापर्यंत बुडवून घेतात किंवा चित्त थारयावर येईपर्यंत स्वत:ला कडीकुलपात बंदीस्त करतात. कामात बुडवून घेतलं तर ’अहं’ ला लागलेली ठेच मध्येच नागासारखी फ़णा काढून उभी राहायची मग त्यानंतरचे तासनतात सूडाच्या अभिनव कल्पना, त्या माणसावर वाया गेलेला वेळ, रिसोर्सेस यांच्या निरर्थक आणि वेळकाढू आकडेवारयांमध्ये मी रममाण व्हायचे. काम राहिलं बाजूला.
मग मी माणसं नाकारली, जगाशी संपर्क तोडला, स्वत:ला बंदीस्त करून घेतलं. तर मला पश्चातापाचे उमाळेच्या उमाळे यायला लागले. आता जर त्या व्यक्तीबरोबर असतो तर कसं आणि तसं या दिवास्वप्नांमध्ये मी रमायला लागले. आणि झाल्या प्रकाराबद्दल स्वत:ला दोषी करार देऊन झुरत गेले.

मग झाले तेव्हढे बस म्हणुन मी निसर्गाला शरण जायचे ठरवले. एका ग्रुपने काही गडकिल्ले ओळीने करायची मोहीम आखली होती, त्यात नाव नोंदवलं आणि निघून आले.

आता मी कुठल्यातरी गडावर आहे.
झाल्या गोष्टींचा पुन्हापुन्हा आढावा घेऊन मन:स्थिती चिघळते हे माहीत असूनही आपण तेच करतो. मी पण तेच करते आहे. आतापर्य़ंतचा बराच वेळ रेट्रोस्पेक्शन मध्ये घालवलाय; इतका, की आताही मी कुठल्या गडावर आहे ह्याची मला जराही कल्पना नाही. आताही ग्रुपला मागे सोडून एकटीच तटावर आले आहे. खाली सह्याद्रीच्या कुठल्याही घाटमाथ्यावरून दिसतं तसंच दृश्य आहे.

मावळतीचा प्रकाश सर्वदूर पसरला होता. खाली गावात पेरणी चालू असावी बहुतेक, बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण अस्पष्ट ऐकायला येत होती. सह्याद्री पर्वताच्या वळ्याच वळ्या नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरल्या होत्या. दोन रांगांमधून एक नदी लाजत, मुरकत गेली होती. खालचं गाव हिरव्या-काळ्या रंगात रंगवलेल्या बुद्धीबळाच्या पटासारखं दिसत होतं. पिंजलेल्या कापसासारखे दिसणारे विरळ ढग माथ्याशी रेंगाळले होते.हे सारं पाहून डोक्यातली बजबज कमी झाल्यासारखी वाटली. मी आता दरीत पाय सोडून तटावर बसते.

सूर्य मावळतीला आलेला आहे. बाहेरून उन्हातून आल्यावर पायावर थंड पाणी घेतल्यावर कसं वाटेल तशी शांतता मनात आहे.

मी बटव्यातून बचकभर दाणे काढते. संध्याकाळची वेळ असूनही ते खायला गर्दी केलेल्या पक्ष्यांकडे बघत बसते. तेवढ्यात एखादा चिंट्या मॅगपाय रॉबिन हाताशी सलगी करून जातो. त्या धिटाईने मी अवाक तर होतेच पण त्याच्या लालूस स्पर्शाने रडू येईल का काय असं वाटायला लागतं. दरीतल्या झुडुपांमध्ये एकच कुरुंदाचं झाड दिमाखात उभं असतं, बाजूला काकडशिंगी आपली लालसर जवान पानं मिरवीत असते. मावळतीची किरणं या सर्वांवर अशा काही कोनात पडलेली असतात की ती सर्व एखाद्या वेगळ्याच मितीत उभी असल्यासारखी वाटायला लागतात. मी आपली नजरबंदी झाल्यासारखी त्यांच्याकडे पाहात असते. मग आऊट ऑफ़ ब्लू, मला प्रश्न पडतो, ही झाडं, हे पर्वत, इथला वारयाचा वावर हे माझ्यासारख्या किती मेस्ड अप आयुष्यांचे साक्षीदार असतील?

मग तो शहाण्या उपरतीचा क्षण येतो.

माझ्यासारखे बरेच जण अमूर्त स्वरूपात त्या तटावर रेंगाळताना दिसायला लागतात. पूर्वी विझलेले डोळे, गमावलेला विश्वास, जहरी कडवटपणाने काठोकाठ भरलेले, पण.. आता जे खंबीर असतील, ताठ कण्याने वावरत असतील, नव्या उमेदीने चालायला लागली असतील, विश्वास टाकत असतील, विश्वासाला पात्र ठरत असतील, जगाच्या पाठीवर कुठेतरी ते असतीलच.

आताच्या या अंत पाहणारया क्षणांचा शेवट होणार आहे, दु:खाचा निचरा होऊन जाणार आहे, मग आपण नवी सुरुवात करणार असतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं पण, तोपर्यंतचा तो ’काही वेळ’ कुठलंही दृश्य डॅमेज न होऊन देता, श्रद्धा, विश्वास यांची तोडफ़ोड न होऊ न देता डोकं ताळ्यावर ठेऊन निभावणं गरजेचं असतं. नंतर हे क्षण आठवताना डंख होणार नाही असं नाही पण ते बाजूला सारता येईल. त्यातली निरर्थकता लक्षात येईल. यालाच कदाचित प्रगल्भ होणं म्हणत असावेत किंवा शहाणा स्वीकार! सुटकेचा आणि उपरतीचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण त्याच्यासाठी आपण तयार राहीलं पाहीजे. So, Keep looking for it. तेव्हा नाही सावरलात तर कधीच नाही. मग त्याच खातेरयात इफ़्स ऍन्ड बट्स ची उजळणी करत भोवंडत रहायचं.

आपण एकटे असलो तर काय झालं? त्या एकटेपणातही एकटं म्हणुन आपल्याबरोबर अनेकजण असतात हे मला उमगलं आणि..

मी सुटले.

पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी..

मेघना, साधारण दोनेक वर्षापूर्वी ह्या खेळात घेत नाहीत म्हणून गळा काढला होता त्याची आठवण झाली.
:))))

------

आपल्या मातृभाषेशिवाय जी भाषा आपल्याला कळते, जवळची वाटते तिचा अनुवाद जास्त सोपा असतो. त्यामुळे डोक्याला अजिबात त्रास होऊ न देता मी निवडली फ़्रेंच आणि माझा लाडका फ़्रेंच कवी झॅक प्रीव्हेर. मराठी कवितेला मात्रा, छंद, वृतांच्या जोखडातून सोडवणारया केशवसुत, मर्ढेकर यांना जितके मानले जाते तितकाच मान फ़्रेंच साहित्यात झॅक प्रीव्हेरला आहे. त्याने यमक, व्याकरणाच्या सगळ्या प्रचलित संकेतांना धुडकवून लावत फ़्रेंच नवकाव्याचा पाया घातला.त्यामुळे फ़्रेंच कविता-विश्वात झॅक ला एक अनन्यसाधारण असे स्थान आहे.

सर्वसाधारणपणे कविता वाचायला सुरुवात करतानाच ’मला ही कळेल का?’ हा गंड आपल्या मनात असतो. पण झॅकची कविता जसजशी वाचत जाऊ तशी अधिकाधिक सोप्पी होत जाते. शब्दांच्या साध्यासुध्या मांडणीतली आशयघनता हा झॅक च्या कवितांचा फ़ॉटे.

बंडखोरी मला तशीही आवडतेच आणि साधेपणा त्याहून जास्त भावतो. त्यामुळे झॅक आवडायला वेळ लागलाच नाही. शब्दबंबाळ करण्यापेक्षा आशयाने कविता मनात रुतली तर ती जास्त काळ स्मरणात राहते हा बरयाच जणांचा अनुभव. माझाही अनुभव फ़ारसा वेगळा नाही. तस्मात झॅक प्रीव्हेर.

------

Pour Faire le portrait d'un oiseau (पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी)
-झॅक प्रीव्हेर



पेद्र दाबोर यून काज.
अवेक युन पोर्त उवेर्त
पेद्र ओंस्वीत;
केल्क शो द जोली,
केल्क शो द सॉंप्ल,
केल्क शो द बो,
केल्क शो द्युतील,

पूर लुझो..


पहिले एक पिंजरा रंगव
ज्याला दारच नसेल.
मग रंगव त्यावर काहीतरी त्या पक्ष्यासाठी
जे देखणं असेल,
सरळ साधं भुरळ पाडणारं असेल,
दिमाखदार असेल
किंवा असेल त्या पक्ष्यासाठी आत्यंतिक गरजेचं.

प्लासे ओंस्वीत ला त्वाल कॉंत्र अ आर्ब्र.

दों अ जार्दा,
दों अ ब्वा,
आ दों यून फ़ॉरेत,
स काशे देरीयेर लार्ब्र.
सॉं रेया दीर,
सॉं बुजे.

मग तो कॅन्वास एखाद्या झाडाला टेकून ठेव.
कुठल्याही अशा ठिकाणी,
जिथे पक्षी येणारच याची खात्री असेल.
एखाद्या बागेत,
एखाद्या राईत,
किंवा एखाद्या जंगलात.
तिथल्याच एखाद्या झाडापाठी लपून बस.
निशब्द..
निस्तब्ध..
बघत रहा काय होते ते.

पाफ़्वा लुझो अरिव्हे व्हिते,

मे इल प ऑसी मेत्र द लॉग आने,
अव्हॉंत द स देसिदे.
न पा स दिकूरिजे.
अतॉंद्र..
अतॉम्द्र सिल ल फ़ो पॉदॉ देझाने..
ल वितेस ओ ला लॅंतर द लॉरिव्हे द लूझो
न्यॅंत ओका रापो
अवेक ला रेयुझिते द्यु ताब्लो,
क्वांद लूझो आरिव्हे.

कधीकधी पक्षी लवकर चालून येतो त्या पिंजरयात..
तर कधी त्या पिंजरयात शिरावं का नाही याचाच विचार वर्षानुवर्षे करत राहतो.
पण..
निराश होऊ नकोस.
वाट पाहा.
वाट पाहत राहा कित्येक वर्षं, जर लागलीच तर.
त्या पिंजरयातलं पक्ष्याचं आगमन किती लवकर किंवा किती उशीरा,
याचा चित्र किती यशस्वी याचा तसा काहीही संबंध नसतो.
(कारण लवकर किंवा उशीरा..
पक्षी तिथे येणारच असतो.)

सिल आरेव्हे,

ऑब्सर्व्हे ल प्लू प्रोफ़ॉं सिलॅंस.
अतॉम्द्र क लुझो ऑंत्र दो ला काज,
ए क्वांद इल ए ऑंत्र.
फ़ेर्मे दुझमॉं ला पोर्त अवेक ल पेसो.
प्युई,
इफ़ासे अ आ अ तू ले बारो.
ऍं अयान्त स्वे द न तूशे आकून द प्लूम द लूझो.

तो येईपर्यंत चूपचाप बसून रहा.
आणि एकदा का तो पिंजरयात शिरला की,
त्या पिंजरयाला एक दार रंगवून टाक.
एकामागून एक जाडजूड गज पण रंगवून टाकायला विसरून नकोस.
आणि हो..
पण हे सर्व करताना पक्ष्याच्या पिसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घे.
(तो पक्षी ज्या कशात मग्न आहे
त्याला मग्न राहू दे तसाच.)


फ़ेयर ओंस्वीत ल पोर्त द लार्ब्र,
ओं श्वाझीझॉं ल प्लू बेल द स ब्रॅशे,
पूर लूझो..
पेद्र ऑसी ल वेर्त फ़्युलाज ए ला फ़्रेशर द्यु वेंत,
ला पूझियेर द्यु सोलेल,
ए ल ब्रुई दे बेत द लेर्ब दों ला शालर द लेते.
ए प्युई अतॉंद्र क लूझो स देसिदे आ शॉंत.

त्या मग्न पक्ष्यासाठी मग सुंदर डहाळ्यांचं झाडही रंगव.
मग रंगव पानगळ, स्वच्छ भिरभिरता वारा आणि पानांमधून येणारे कवडसे,
आणि लख्ख उन्हातली किडयांची किरकिर, भुंग्यांचा गुंजारव.
(काय बेटा भाग्यवान आहे.)
आता..
तो पक्षी कधी गातोय ह्याची वाट बघ.
(गायलाच पाहिजे तो )

सि लूझो न शॉंत पा,

से मूव्हे सिन्य.
सिन्य क ल ताब्लो ए मुव्हे.
मे सिल शॉंत चे बों सिन्य,
सिन्य क वू पूव्हे सिन्ये.
अलॉ वू अराशे तू दुसमों
यून दे प्लूम द लूझो,
ए वू एक्रिव्हे वोत्र नॉम दों अ क्वे द्यु ताब्लो.

गायलाच नाही तो तर..
अरेरे...काय दुर्दैव!
चित्र खराब आहे. आता काय करणार?
पण जर तो गायलाच ..
तर वाहवा.
तुमचं चित्र किती सुंदर यावर शिक्कामोर्तब झालंय.
आता हळूच काढून घ्या त्या पक्ष्याचं एक पीस.
आणि त्या पिसानेच त्या सुंदर चित्रावर तुमची लफ़्फ़ेदार सही ठोकून द्या.

------

माझा खो कोहम आणि जास्वंदी ला.

’प्रिय’,..

’प्रिय’,

माझी अर्ध्याहून अधिक पत्रं या मायन्यावरच अडलियेत.
म्हणजे तू ऑलरेडी ’प्रिय’ असताना तुला उद्देशून आणखी एकदा प्रिय म्हणावे तरी कसे? यावर मग नकोच लिहायला म्हणुन मी पुढे लिहायला लागते.
मराठीत या क्षणी तुला उद्देशून वापरावे असे एकही संबोधन नाही.
तुला एव्हढ्या भाषा येतात. एकातलं तरी सांग ना.

-----------

तर..
आज संध्याकाळी ’संध्याकाळच्या कविता’ काढल्या. मग तुझी अशी सरसरून आठवण झाली की काय म्हणतोस.
मग मला वाटलं की अशाच एखाद्या संध्याकाळी तू सुद्धा ग्रेसची कोडी सोडवत असताना तुला माझी आठवण येत असेल का?
मग मी न राहवून तुला फ़ोन करते. तर तू विचारतोस, ’ग्रेस का?’ मी म्हणते, ’हं’ . मग पुढचे अनेक क्षण ग्रेसची ती कविता जगल्यासारखे.

तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे,
ती ही अशा कातर वेळी
उदाच्या नादलहरी सारख्या संधीप्रकाशात..

माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत जमा होतात,

अशा वेळी वाटेकडे पाहणे
सर्व आयुष्य पाठीशी बांधून
एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे,
जसे काळोखातही ऐकू यावे
दूरच्या झरयाचे वाहणे.
मी पाहतो झाडांकडे, पहाडांकडे.

तू येशील म्हणून अज्ञानाच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो
आणि आई नसलेल्या पोरासारखे,
हे माझे शहाणे डोळे हलकेच सोडून देतो,
नदीच्या प्रवाहात.

तू येशील म्हणून मी वाट बघत आहे..


मी विसरणार नाही. कधीच.

-----------

न कळणारया, क्लिष्ट गोष्टींबद्दलचं माझं वेड कधीपासुनचं?
आधी ग्रेस, मग तू का आधी तू मग ग्रेस?
तुझ्यामुळे ग्रेस का ग्रेसमुळे तू?
आता तर आठवत सुद्धा नाही.

-----------

मी तुला लिहीलेली बहुतेक पत्रं ही संध्याकाळी लिहीली आहेत. थोडा थोडा दिवस असताना, थोडी थोडी रात्र असताना.
थोडी थोडी ’मी’ माझ्यात आणि थोडी तुझ्यात असताना.
रात्री???
बोलूच नकोस.
मी तुला रात्रीची पत्रं लिहायला बसणारच नाही. काय काय येतं मनात. आवर घालायला लागतो, शब्द परतवावे लागतात, विचार थोपवावे लागतात.
हसू नकोस.
किती खोलवर गेलेल्या आठवणी असतात. साचलेलं सगळंच कागदावर भिरकावुन नये रे देऊ.
वाळूचा एक कण गेला असताना डोळ्याला लावायला दिलेला तुझा रूमाल, त्याचा गंध मला आज आत्ताही येतोय.
एका रात्री पत्र लिहीतानाही आला होता.
त्या क्षणी जर तू मला हवा झालास तर मी तुला कुठून आणि कसा बोलवू?
आणि हे सारं तुझ्यापर्यंत कशा आणि कुठल्या शब्दात पोहचवू?
नकोच..ती रात्रच मुळी वाईट असते.

शब्दांनी हरवून जावे
क्षितीजांची मिटता ओळ
मी सांजफ़ुलांची वेळ


पुन्हा ग्रेसच!

-----------

’ग्रेस’च्या कविता. मोठे विलक्षण गर्भितार्थ.
वाचतोस खरं पण तुला कधी ’ग्रेस’ कळला का रे?
मला नाही कळत कधी. पण त्या नकळतेपणात जो तुझा गर्द भास असतो तो कळतो.
जसं तू मला लिहीलेलं पत्र. एका वाक्यात अनेक अर्थ. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर असं, म्हटलं तर तसं.
तू सांगू पाहिलं तसं. मला उमगलं तसं!

कळला नाही तरी मला ग्रेस आवडतो कारण ’ग्रेस’ वाचताना मला तू हाताच्या अंतरावर असल्यासारखा वाटतोस.

-----------

तुला हे कळत असतं का?
की तुला उद्देशून दोन ओळी लिहीतानासुद्धा माझं काळीज सशाचं होऊन जातं.
दर दोन वाक्यांमध्ये केलेला आठवणींमधला हजार योजने प्रवास, खोल खोल श्वास घेऊन पुन्हा गुदमरावं लागणं..
प्रत्येक पत्रानंतर एक हल्लखपणा.
एव्हढं करुनही आलेला हताशपण..
न जाणो तुला हे समजेल न समजेल. उत्तर येईल न येईल.
काय करु? कसे लिहू? म्हणजे तुझ्यापर्यन्त लख्ख पोहोचेल?

-----------

परवा आपण टेप करून घेतलेल्या कॅसेट्स काढल्या होत्या.
तुझा खर्ज आणि माझी किणकिण.
आपण काय बोलत होतो हे ही कळलं नाही मला.
कारण..
तुझी ती गुरगुर ऐकताना पोटात तुटलं उगीचच.
का? काही कळत नाही.

-----------

माझी पत्रं तू कशी वाचतोस?
वाचताना काम करत असतोस की निवांत असतानाच वाचतोस?
एखादा संदर्भ नाही कळला तर केस खसाखसा विस्कटून टाकतोस का? कपाळावरच्या आठयांची खाच अंगठयाने दाबत डोळे मिटून खोलवर श्वास घेतोस का? अजूनही..?
मी बह्यताडासारखं लिहीलेलं काहीतरी वाचून कपाळाला हात लावत, मान हलवत हनुवटीत खळी रुतवत गदगदत तसंच हसतोस का?
पत्र वाचताना डेस्क वरच्या फ़ोटोकडे डोळे वारंवार वळतात का?
कितीदा???

-----------

माझ्या पत्रातल्या काही मुद्दामहून सोडलेल्या खाचाखोचा तुला कळतात का? म्हणजे हेतुपुरस्पर अवतरणात घातलेला एखादा शब्द, एखादी ओळ, तिच्यामागचं प्रयोजन वगैरे?
खोडलेला ’तो’ शब्द कोणता? हे न कळल्याचं वैषम्य वाटते का रे?
कधीकधी मुद्दाम खोडते आणि तू विचारशील याची वाट बघते.
विचारले नाहीस आतापर्यंत.
कधीतरी विचारशील?
आवडेल मला सांगायला.

-----------

असतात तरी काय माझी तुला लिहीलेली पत्रं? तु मला किती हवा आहेस हेच आळवून आळवून सांगीतलेले.
तुझ्या नुसत्या आठवणीने आलेले आवंढे गिळत.
मला पत्रं लिहीत असताना तुझं असं होतं का?

-----------

कधी कधी तुझी बेफ़ाम आठवण येते. ’तू आत्ताच्या आत्ता इथे ये!’ असं तुला सांगावंसं वाटायला लागतं. पण त्याच्या पुढचाच विचार ’ते केव्हढं अशक्य आहे’ हा असतो.
अशफ़ाकचं ’मोरा सैय्या’ लावते. आणि त्याच्या गाण्यातली ’तू जो नहीं तो यंव, तू नहीं तो त्यंव’ करत विरहाचं सॉलिड रिझनिंग देणारी समंजस उत्तर भारतीय नायिका दिसण्याच्या प्रयत्न करत तुफ़ान रडून घेते.
रडण्याचा भर ओसरला की डोक्यावर उशी घेऊन झोपून जाते.
तू इतका जुना होऊन गेलास तरी तुझ्या आठवणीने येणारं डोळ्यातलं पाणी तेव्हढंच खारट आणि कोमट कसं?
कसं..? सांग.

-----------

छे! एव्हढं सगळं लिहून पण जे समजवायचं आहे, पोहोचवायचं ते ही शेवटी अपूर्ण, तोकडंच आहे.
विश्वातले यच्चयावत शब्द मला वश झाले तरी मला ते पोहोचवता येईल का?
न कळे!

-----------

दारातला कॅशिया गच्च फ़ुललाय. आणखी वांड झालाय. तुझं पत्र आल्यावर मी त्याच्याच बुंध्याशी बसते वाचायला तेव्हा भसाभसा फ़ुलं ओतत असतो माझ्यावर.
मी लावलेल्या गुलाबाला मोठी फ़ूट आलीये.
रातराणी दिमाखात वाढतेय.
सगळं आहे, फ़क्त तू इथे नाहीयेस.

-----------

मी इथं आणि तू तिथं.
तुझ्या माझ्यामधल्या एव्हढ्या अंतराने कधी कधी माझा जीव दडपतो.
पुन्हा मी आणि आपला कॅशिया.
तुला पत्र लिहीते.
कधी फ़िरवशील प्रेमाने हात त्या पत्रावर तर कदाचित त्याचे सुकलेले तुरे मिळतील तुला.
मिळाले आहेत?
.
.
.
आणि मग आपल्यातल्या अंतरावर मी ते पत्र पसरुन देते.

-----------

आपल्या पत्रांची पण एक गोष्ट होऊन जायला नको रे. जी आपण लिहीली खरी पण एकमेकापर्यंत पोहोचलीच नाहीत.
पुन्हा एकदा ग्रेस सारखीच.

लवकर पत्र लिही. वाट पाहतेय.

तुझीच,
माऊ

जागेपणीच्या कविता-नंबर १

२८ मार्च.रात्रीचे ३-११
मी भुतासारखी टक्क जागी आहे. गाढ झोपेतून फ़ोन करून उठवल्याबद्दल, थँक्स टू दिमीत्री, ऍलन, निषाद ऑर व्हॉटेव्हर..तुम्हाला आवडेल ते नाव घ्या. जांभई आणि उचकी आली तशी ही नावं आठवली म्हणून लिहीली.
तर जागीच आहे तर बराहा खोललं आणि खरडलं काहीतरी.
ही कविता तरी आहे का नाही शंकाच आहे. पण तरीही...
नाव मात्र रोखठोक..जागेपणीच्या कविता-नंबर १

तिने त्याला दुरून पाहिले होते.
प्रथमदर्शी एकच भावना.
बेरड, बेरकी.
कायम लोकोपवादाने वेढलेला.
अहंमन्य नक्की कशासारखा
काही कळले नाही तिला,
तिने बघितले इतरांना
त्याच्या नुसत्या असण्याने आक्रसून जाताना

काहीतरी ओळखीचे वाटले तिला.
ती त्याच्या दिशेने चालायला लागली.

तर..
’मी कसा वाईट’,
’माझ्यापासून दूर व्हा’
हा भिववणारा आवेश,
जवळ कोणी येऊ नये म्हणून
परजलेली अस्त्रे..शब्दांची.
कसली इंटुक माणसं तुम्ही
करत केलेला प्रच्छन्न उपहास
कूट प्रश्नासारखं स्वत:ला
अधिकाधिक अवघड भासवत.

काहीतरी ओळखीचे आहे खासच..तीव्र भावना.
ती आणखी जवळ गेली.
अगदी हाताच्या अंतरावर राहिला तो..

दिसले..
स्वत:ला कैद करत लावून घेतलेले कित्येक दरवाजे,
त्यांच्या कपारयांतून डोकावणारी स्वप्नं,
फ़िरून पुन्हा त्यांना दडवताना कसनुसा होणारा जीव,
’काही हललेच नाही आत’ करत चेहरा कोरा ठेवयची धडपड,
गर्दीत जपलेलं एकटेपण..कधी भिववणारं,
स्वत:शीच चाललेली भांडणं,
जगरहाटीत स्वत:ला बसवण्याच्या प्रयत्नात
खुडलेले काही लसलशीत कोंब,
गतायुष्याचे कापून टाकलेले दोर.
तरीही कुठेतरी जपलेलं पोरपण.
कधी दाटून येणारी काजळी
नंतर एक गझल, दारू आणि पुस्तक!!

निकट जाऊन पोहोचली त्याच्या
अन तिला दिसले काही
मग ती नुसतीच हासली..
तिला कळून चुकले तिला काय ओळखीचे वाटले..


कारण तिला त्याच्यात तिचेच प्रतिबिंब दिसले.

- श्रद्धा

.......

थँक्स दिमीत्री, ऍलन, निषाद ऑर व्हॉटेव्हर!

(Disclaimer- ब्लॉगवरच्या कविता ह्या माझ्या असून त्या ’कोणाविषयी’ नाहीत. कोणाचा तसा समज झाल्यास विचारून खात्री करून घेण्याचा चोंबडेपणा करू नये)

’पुरुष’मय स्वप्न!

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

------------------------


परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
अब मेरा क्या होगा कालिया?

शोध.

सांताक्रूज स्टेशन. मुंबईचा मुसळधार पाऊस.मी आणि मिठू पुटकन एका टपरीच्या आडोशाला पळालो.पाऊस वेड लागल्यासारखा कोसळतोय आपला. छतावरून कोसळणारया पागोळ्या ओंजळीत घेऊन पिण्याचा मोह क्षणभर झाला. पण टपरीचा एकंदरच नीटनेटकेपणा बघून तो आवरला. त्या पागोळ्या क्षण दोन क्षण बांधून ठेवतात हे खरं. कसा जीव एकवटून खाली पडायला बघतात.आपल्या पोटात पलीकडच्या विश्वाचं एक प्रतिंबिंब वाढवत. ओळंबून पडल्याच हातावर तर..त्याच प्रतिंबिंबाची छोटी छोटी प्रतिरूपं विखरून आणि पडल्याच खाली तर.. ओहळाबरोबर वाहून जाऊन..अस्तित्वाची पुसतशीही शंका येऊ नये इतक्या तादात्म्य पावून..
आणि तो प्रश्न माझ्या तोंडातून अक्षरश: पागोळीसारखा घरंगळला...
"मिठू, या पागोळ्या कशा तयार होतात गं?"
मिठूने दचकून एकदा माझ्याकडे निरखून पाहिले पण माझा चेहरा कोराच बघून ती म्हणाली
"अगं पावसातून नाही का?"
"मग पाऊस कसा तयार होतो?"
"ढगातून"
"ढग?"
"आकाशात."
"मग हे आकाश कोण तयार करतं गं?"
"........."

..........

ज्याच्याबरोबर असताना प्रश्नही आसपास फ़िरकण्यास भ्यावे असा अजेय माझ्याबरोबर.
मी त्याला विचारले
"अजेय, तू कसा निर्माण झालास?"
"Dunno"
"म्हणजे?"
"म्हणजे I came from my mother's womb, dimwit"
"ok, मग तुझी आई कशी निर्माण झाली?
"ofcourse from her mother's womb, stupido!"
आता यातून अनेक आयांची गाडी निघणार आणि अजेय पण न थकता मदरची मदरची मदर करत rest to infinity करणार हे मला ठाऊक. ते मला टाळायचं होतं.मी विचारलं,
"अरे पण या सगळ्यांची एक primitive मदर असेलच ना? ती कशी निर्माण झाली?"
यावर अनेक मुलींचा कलेजा खलास करणारया ती मान तिरकी करून मागे वळायच्या स्टाईलने माझ्याकडे वळला. मी थंड. माझ्यावर याचा परीणाम होत नाही म्हटल्यावर इतर वेळी चिडतो तसा आजही चिडला.
"काय होतंय तुला?"
"उत्तर दे ना"
"मे बी, माकडापासून मानव उत्क्रांत झाला ते माकड असेल"
"मग ते माकड कोणी निर्माण केले?"
"oh, fuck you!"
"......."
या शेवटाल्या प्रश्नांचं उत्तर काय? यानं अस्वस्थ नाही व्हायला होत?

..........

काही एक वर्षांपूर्वी मी माझ्या आईला हेच प्रश्न विचारले तर तो संवाद हा काही अशा प्रकारचा होता.
".."
"अगं, देव नाही का बनवत हे सगळं?"
"देव?"
"मग काय तर!
"मग देवाला कोणी बनवलं?"
"देवाला कोणी कशाला बनवायला पाहीजे? तो असतोच."
"असा कसा असतो? कोणती ना कोणती गोष्ट कशा न कशातून निर्माण झालीये.मग देवाचाही निर्माताही कोणतरी असायलाच हवा ना गं"
"फ़ारच प्रश्न विचारते बाई ही!"
"अगं, चुकीचं बोलतेय का मी?"
"गप्प बस्स कार्टे, छळवादी मेली!"
"...."

..........

ही देवभोळी माणसं खरंच सुखी असतात. एकदा का सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पना स्वीकारली की सगळं जग आणि आयुष्य सोपं होऊन जातं. सगळं सगळं परमेश्वरावर सोपवून द्यायचं की झालं, पुढचे प्रश्न विचारण्याची गरजच नाही. विचाराला निश्चिंती येते, सुरक्षित वाटतं.
जगातल्या सगळ्या गोष्टींचं, अन्यायाचं, क्रौर्याचं, दु:खाचं नव्हे तर प्रत्येक बाबीचं स्पष्टीकरण परमेश्वराच्या माध्यमातून करता येतं.

एकेकाळी मलाही ’देव’ या संकल्पनेचं प्रचंड fascination होतं. पूजापाठ, स्तोत्र सारं काही मुखोद्गत होतं मला. गणपती हे माझं आद्य दैवत होतं. सगळी कर्मकांडं मी यथास्थित करत होते.

पण नंतर सर्वमान्य मूल्यांपुढे प्रश्नचिन्ह डकवण्याची सवय जडली.हे आहे हे असं का आहे? हे असं असण्याला काही पर्याय होता का? हे असं नसतं तर कसं असतं? कसं असायला हवं होतं? हे असं असण्याला जबाबदार कोण? असे प्रश्न माझ्या डोक्यात फ़ेर धरून नाचायला लागले.नैवेद्य उजव्या हाताऐवजी डाव्या हातात घेतला तर देव कोपतो? उपास मोडला, उपासाच्या वेळी चुकून काही खाल्लं गेलं , स्तुतीपर आरती नाही आळवली तर त्याला राग यावा इतका का हा चंद्र, सूर्य, तारे निर्माण करणारा देव क्षुद्र आहे? असे विचार यायला लागले. थोडक्यात आईच्या भाषेत मला ’शिंगं फ़ुटली’.
मग मी अल्पमतीप्रमाणे या शंकांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीच्या निर्मीतीला देवाच्या खात्यात घालून लहान मुलांची बोळवण न करणारी काही मंडळी माझ्या सुदैवाने मला लाभली होती. त्यांच्याशी बोलले आणि माझ्या लक्षात आलं की वर देणारा, पूजेने संतुष्ट होणारा, चार हात असणारा, चमत्कार करणारा आणी माणसासारखा देव अस्तित्वातच नाही. मग चालू झाली तडफ़ड! उत्तरं मिळवायची जबाबदारी माझी होती. मी प्रयत्न करत राहीले आणि एक दिवस मला उत्तर सापडल्यासारखं वाटलं.

दहावीच्या रिझल्ट्च्या आधी आम्ही हिमाचलला गेलो होतो. आणि आज जे मला माझं सुदैव वाटतं ते म्हणजे schedule मध्ये नसताना आमची ’मणिकरण’ ट्रीप ठरली. कारण आजतागायत तो योग पुन्हा नाही आलेला. अगदी कुलूला जाऊन सुद्धा. ७०-८० फ़ूट खाली रोरावत, फ़ेसाळत जाणारी बियास मी भयचकीत नजरेने पाहीली. त्या पाण्याच्या प्रपाताने उभाच्या उभा फ़त्तर कडाकड कोसळताना पाहिला. यावर मलमपट्टी म्हणून की काय भुरभुरणारं बर्फ़ही पाहीलं. देवदार आणि पाईन वृक्षांच्या दाट राईतून घुमणारी वारयाची शीळ ऐकली, दूरवर दिसणारया हिमालयाच्या नाममात्र दर्शनानेसुद्धा माझे हात आपोआप जोडले गेले. आणि मला श्रीकाका आठवला. "ज्यापुढे तुला नतमस्तक व्हावंसं वाटेल तो तुझा देव!" आणि मला माझं उत्तर सापडल्यासारखं वाटलं, श्वास मोकळा झाल्यासारखा वाटला. yess, देव म्हणजे निसर्ग असावा.

पुढे अभ्यासात गळ्यापर्यंत रुतले, schedule गच्च झालं आणि हे प्रश्न कुठेतरी गाडल्यासारखे झाले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नाटकांतून, स्पर्धांतून बुवांचे बुरखे टरकवताना मला आसुरी आनंद व्हायला लागला.थोडक्यात, मी कट्टर विज्ञाननिष्ठ बनले. घडणारया प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक कारण असतंच , शोधल्यावर ते मिळतंच यावर माझा ठाम विश्वास बसला. पण कुठेतरी काहीतरी ठसठसायचं आणि माझे ते जुने प्रश्नमित्र उफ़ाळून वर यायचे. विज्ञानाने फ़क्त एखादी गोष्ट कशी घडते यामागचं logic दिलंय, process दिलीये पण.. मुळातच ती गोष्ट घडावी हे प्रयोजन कुणाचं? आकाशात ग्रहगोल नियमीतपणे संचार करत असताते, पण हे नियम मुळात तयार कसे झाले? हे मात्र समजणं कठीण आहे. सजीव सृष्टीची निर्मिती ही रासायनिक आणि आधिभौतिक प्रक्रीयांमधून होत असते तर मग आपल्यामधला हा ’मी’पणा किंवा जिव्हाळा कुठल्या रासायनिक प्रक्रीयेने define करता येईल? मी आणि रेणू एकमेकांची असह्य आठवण येऊन एकमेकींना एकाचवेळी फ़ोन लावतो हे कुठल्या आधिभौतिक आणि रासायनिक प्रक्रीयेत बसतं? Crisis च्या वेळी फ़क्त एकाचंच स्मरण का व्हावं? साधी स्त्री अवघ्या काही महिन्यात अतिशय गुंतागुंतीचा पूर्ण वाढलेला देह जन्माला घालते, अशा कितीतरी गोष्टी. बरं! या ’कवी-कल्पना’ या खात्यात मोडीत काढल्या तर मग ’कल्पना’ तरी काय आहे? जसा विचार करावा, जेवढा अभ्यास वाढवत न्यावा तेवढी स्वत:च्या क्षुद्रपणाची जाणीव अधिक होतेय. आपण कोण आहोत? या विश्वाच्या पसारयात आपलं स्थान किती नगण्य आहे. आपल्या असण्याला अर्थ काय? आपण असलो तर फ़रक पडतो का? फ़रक पडत नसला तर मग असण्याची गरज काय? एखाद्या सवयीच्या अंधारया बोळकांड्यातून जात असताना अचानक एका खांबामागून एखादा गर्दुल्ला अंगावर यावा तसे हे प्रश्न ’व्हॉव’ करून अंगावर येतात.मग ती ठुसठुस वाढायला लागते, आणि मग खडा ठाकतो तो आदिम प्रश्न, "या निसर्गाचा निर्माता कोण?" "मी कोण?" "या प्रचंड , अफ़ाट, अथांग विश्वाच्या संदर्भात हे धडपडणं, स्वत:ला प्रूव्ह करणे, हेवेदावे, कपट, दुरावणं, जवळ येणं या सगळ्याला काय अर्थ आहे?" पण..
पण विश्वाच्या या पसारयात माझं स्थान कितीही नगण्य असलं तरी मी ’आहे’! याचा अर्थ माझ्याही आयुष्याला काहीतरी अर्थ असायलाच हवा, प्रयोजन असायलाच हवं. मग ते काय आहे? कोsहम?

उपनिषदांमध्ये फ़ार सुंदर सांगितलंय, ’अहं ब्रह्मास्मि!’ आपण सारे या परमात्म्याचाच भाग आहोत. मी म्हणजे आकाशगंगा, मी म्हणजे सुपरनोव्हा, मी म्हणजे आभाळ, मी म्हणजे हे नदी, नाले, पर्वत ,पक्षी, मी म्हणजे अगदी तू सुद्धा.
टॅं टॅंडॅं! म्हणजे ’मी कोण’ हा प्रश्न आपसूकच मिटला, भानगडच नाही. पण या कल्पनेने मानवी व्यवहारांचं समर्थन कसं करता येईल?जगातला असमतोल कसा समजून घेता येईल? जगात चाललेली भयंकर पिळवळूक, गरीब-श्रीमंत दरी , शोषण, विषमता यांचं आकलन कसं होईल? या सर्वांचं प्रयोजन कसं justify करता येईल?

मोठ्ठं झालो असं वाटण्याच्या, आपण आपल्यातच राहायला लागतो, ’प्रेम’ म्हणजे exploitation आणि ’मृत्यू ’ म्हणजे काहीतरी भयंकर रोमॅंटीक आहे असं वाटण्याच्या काळात मी कृष्णमूर्ती, ओशो वाचले. या माणसांनी पण similar प्रश्नांचा काथ्याकूट केलेला पाहून मला जरा आशा वाटली. उदा. कृष्णमूर्ती म्हणतात..

"There is immediate conflict beytween the fear and the 'me' that is overcomiung thaty fear. There is the watcher and the watched. The watched being fear and the watcher being the 'me' that wants to ge rid of that fear. So, the problem consists of this conflict betwenn the 'not me' of fear anf the 'me' who thinks it is different from it and resists fear; or who tries to overcome it, escape it, suppress it, or control it."

एकदम मान्य! काय मनकी बोल्या तुम! यावर उत्तर सुचवताना ते म्हणतात,

"Accept things as they come. To take things as they come,actually, not theorautically, one must be free from 'me, the 'I', the emptying of the mind of the 'me' and 'you', and the 'we and 'they'. Then you can live from moment to moment without struggle, without conflict"

?????
पण म्हणजे नक्की काय करायचं?

कृष्णमूर्तींचं english फ़ारच ओघवतं आहे, आपण काहीतरी ग्रेट ऐकतोय अस वाटत राहतं. पण problem हा आहे की ते समजतं पण उमगत नाही.अर्थ कळतोय पण उमगत नाही मनोमन असं काहीसं. एखाद्याने ice-cream चा नवा flavour खाल्ल्याचं सांगावं आणि ते न चाखताही आपण ’काय मस्त रे!’ म्हणून मुंडी हलवावी...असंच काहीतरी! म्हणजे ते म्हणतात "Look at yourself with complete quiteness" म्हणजे नक्की कसं? हे कृष्णमूर्ती सांगतच नाही्त. आत्मशोधाच्या प्रयत्नात खोल जायचं , स्वत:ला समजून घ्याचचं म्हणजे नक्की काय करायचं? ’मी’चा विलय करून टाका असं सर्वजण सांगतात, पण तो कसा करायचा हे मात्र कोणी सांगत नाही. मी आज ठरवलं , की नाही, आजपासून ’मी’ ला थारा नाही. शक्य आहे का ते? म्हणजे असेल. त्याशिवाय गीतेमधला तो सर्वश्रेष्ठ निष्काम कर्मयोग कसा लिहीला गेला असेल?

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥


पण त्यासाठी योग्य तो मार्गदर्शकच हवा. कृष्णमूर्तींचं सांगणं म्हणजे जंगलाच्या थेट मध्यावर आणून सोडायचं आणि सांगायचं "शोधा पुढचा रस्ता!"

आयुष्याची आपण आपल्या मर्जीने केलेली उभारणी, खाल्लेल्या खस्ता, वाचलेले ग्रंथ, मिळवलेले ज्ञान , स्वत:शी चाललेला झगडा, मूल्यांवरची निष्ठा, माझे लढे या सगळ्या सगळ्याला या विश्वाच्या संदर्भात काय अर्थ आहे? संदर्भ बदलला, संकुचित केला तर आपलं आपल्यालाच पटायला लागतं. पण हे पटणं म्हणजे आपण आपल्यालाच फ़सवणं आहे हे ही तितक्याच लवकर कळतं. मग तरीही मी संदर्भ बदलते. भोवतालच्या समाजाचच्या संदर्भात स्वत:ला पाहायला लागते. या समाजाच्या संदर्भात ’मी’ आहे. मग या समाजात माझ्या ’असण्याला ’ काहीतरी अर्थ आहे. या समाजाला मी देणं लागते. आणि भवतालचा समाज आणि परिस्थिती चांगल्या दिशेने बदलण्यासाठी जगणं हेच माझ्या जगण्याचं प्रयोजन असेल. मग ते आदिम प्रश्न गाडले जातील. भोवताली एव्हढे प्रश्न ’आ’ वासून उभे असताना "मी कोण?" "निसर्गाचा निर्माता कोण?" "वैश्विक पसारयातलं आपल्या आयुष्याचं प्रयोजन" शोधण्यात काय point आहे? असं वाटायला लागेल. प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत म्हटल्यावर मी अशीच त्यांच्यापासून दूर पळायला बघेन. पळत राहीन, छाती फ़ुटेपर्यंत. स्वत:ला कामात गळ्यापर्यंत बुडवून घेईन. पण या सर्वांमुळे मला हे प्रश्न पडायचे किंवा पडू शकतात हे सत्य कसं काय बदलेल?

कोणीतरी म्हटलेय की समाधानी माणूस म्हणजे ज्याला असमाधानाशी तडजोड करण्यात यश मिळालंय असा माणूस. तसंच काहीसं. आपणच आपली समजूत घातल्यासारखं.

म्हणून श्रद्धाळू माणसांचा मला हेवा वाटतो. आपले सर्व प्रश्न त्या ’देव’ नावाच्या जगप्रसिद्ध कल्पनेवर सोपवून द्यावेत आणि निश्चिंत व्हावे असं वाटतं. पण नाही. श्रद्धा हवीशी झाली तरी बिनदिक्कतपणे स्वीकारावी इतकीही मी desperate नाहीये. मी वाचू शकते, अभ्यास करू शकते, जाणून घेऊ शकते नव्हे जाणून घेण्याची अपार इच्छा आहे. पण असं वाटतं की काहीतरी सापडावं ज्यामुळे आपल्या शंकांचं निरसन होऊन जाईल. सगळ्या-सगळ्याचं एका सूत्रात स्पष्टीकरण मिळेल असं काहीतरी.
आणि म्हणूनच..

मी श्रद्धेच्या शोधात आहे!
 
Designed by Lena