खिडकी

हाय!

दिवसेंगणिक थंडी सरत चाललिये. सूर्यप्रकाशात वसंताची चाहूल लागायला सुरुवात झालिये. तुलाही जाणवतं का ते? तुझं कसं चाललंय?

तुझं नुकतंच आलेलं पत्र वाचणं म्हणजे निव्वळ सुख होतं. हॅम्बर्गर आणि नटमेगमधील संबंधांवर केवळ तूच लिहू जाणे! नाही, मस्करी नाही करत! तुझं पत्र वाचून मला काय वाटलं सांगू? मला वाटलं, की एखाद्याला दररोजच्या जगण्याचा इतका निर्भेळ आनंद कसा काय घेता ये‌ऊ शकतो? तुझ्या किचनमधला तो खमंग दरवळ तुझ्या पत्रातून इथे माझ्यापर्यंत ये‌ऊन पोहोचला, तू कांदा कापताना कटींग बोर्डवर होणारा सुरीचा टक् टक् आवाज माझ्या कानात भरुन राहिला होता.

तुझं ते पत्र वाचत असताना हॅम्बर्गर स्टेक खायची इतकी तीव्र इच्छा झाली, की तो खायला भर रात्रीचा बाहेर पडलो आणि जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जा‌ऊन पोहोचलो. तर सांगी का, या रेस्टॉरंटमध्ये आठ प्रकारचे हॅम्बर्गर स्टेक्स आहेत- टेक्सस स्टा‌इल, हवा‌ईयन स्टा‌इल, जॅपनीज स्टा‌इल, आणखीनही बरेच. टेक्सास स्टा‌इलचा हॅम्बर्गर भलामोठा असतो, वादच नाही. खुद्द टेक्ससमधला कोणी या रेस्टॉरंटमध्ये आला, तर त्यालाही त्या हॅम्बर्गरचा आकार पाहून धक्काच बसेल. हवा‌ईयन स्टा‌इलच्या हॅम्बर्गरला अननसाच्या पातळ फोडीने सजवलेलं असतं. कॅलिफोर्नियन स्टा‌इलच्या हॅम्बर्गरबद्दल मला तेव्हढंसं आठवत नाही. जॅपनीज स्टा‌इलमध्ये मुळा किसून टाकतात इत्यादी बऱ्या गोष्टी आहेत. त्या रेस्टॉरंटची सजावट अत्यंत आकर्षक पद्धतीने केलेली आहे आणि तिथल्या वेट्रेसही फारच सुरेख आहेत. सगळ्याच लांडे स्कर्ट घालतात.

पण, मी तिथे रेस्टॉरंटचं इंटिरीयर किंवा वेट्रेसेसचे लांडे स्कर्ट पाहायला गेलो नव्हतो. मी तिथे फक्त आणि फक्त हॅम्बर्गर स्टेक खाण्यासाठी गेलो होतो. टेक्सस स्टा‌इलचा नव्हे किंवा कॅलिफोर्नियन स्टा‌इलचा नव्हे, तर साधासुधा हॅम्बर्गर स्टेक. मी वेट्रेसला साधासुधा हॅम्बर्गर स्टेक आणायला सांगीतलं, तर ती म्हणते कशी, "साधासुधा म्हणजे नक्की काय? अमुक ठमुक स्टा‌इलचा स्टेक आण असं सांगीतलंत, तरच मी तुम्हाला काहीतरी आणून दे‌ऊ शकते."

तिचंही बरोबरच होतं म्हणा! मेन्यू काही तिने बनवला नव्हता. टेबलवरुन डिश उचलताना मांड्या उघड्या पाडणारा गणवेश परिधान करण्याची कल्पना तिच्या डोक्यातून निघाली नव्हती. मग शेवटी मी तिला हवा‌ईयन स्टा‌इलचा हॅम्बर्गर स्टेक आणायला सांगीतला. त्यावर तिने अननसाची फोड बाजूला काढून स्टेक खाण्याची टिप दिली. झाला साधासुधा हॅम्बर्गर स्टेक. हाय काय, नाय काय!

तू काय, मी काय, किती विचित्र जगात राहतो नाही का! मला एक साधासुधा हॅम्बर्गर स्टेक हवाय आणि तो यावेळेला, याठिकाणी खायचा असेल तर तो हवा‌ईयन स्टा‌इल हॅम्बर्गर स्टेक वजा अननसासारखा खावा लागणार आहे.

मला वाटतं, तू तुझ्या पत्रात ज्याबद्दल लिहीलं आहेस, तो हॅम्बर्गर स्टेक  मला खायचा होता तसा साधासुधा स्टेक असावा. ही तुझ्या पत्राची किमया की काय कोण जाणे; पण, ते पत्र वाचल्याक्षणी मला सर्वप्रथम आणि अतिशय मनापासून खावीशी वाटलेली गोष्ट म्हणजे हॅम्बर्गर स्टेक होती.

पण, तुझा नॅशनल रेल्वेच्या ऑटोमेटीक तिकीट मशिन्सवरचा उतारा हॅम्बर्गरच्या वर्णनाच्या पूर्णपणे उलट होता. मला तो एकदम वरवरचा वाटला. त्या समस्येवर तू मांडलेला मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, नक्कीच! पण तू ज्या प्रसंगाविषयी लिहिलं आहेस ,त्या  प्रसंगाशी वाचकाला एकरुप होता येत नाही. कायम सखोल निरीक्षक बनण्याचा आटापिटा करु नकोस. लिहीणं ही शेवटी तेव्हापुरतीची भावना असते हे कायम लक्षात ठेव.

तुझं ते पत्र माझ्या डोक्यात अजून ताजं आहे आणि मी त्याला 70 गुण दिले आहेत. तुझ्या शैलीत सावकाश का हो‌ईना पण सुधारणा होते आहे. उतावीळपणा करु नकोस. आतापर्यंत तू जशी मेहनत घेत आलीस तशीच मेहनत घेत राहा. मी तुझ्या पत्राची वाट पाहतो आहे.

एवढ्यातच वसंत ये‌ईल. तो आता याक्षणी आला तर काय बहार ये‌ईल नाही?

ता.क -  बिस्कीटांच्या बॉक्सबद्दल धन्यवाद. बिस्कीटं अत्यंत खमंग होती. पण पत्रव्यवहाराशिवाय इतर कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक संपर्क ठेवला जा‌ऊ नये असा सोसायटीचा सक्त नियम आहे. त्यामुळे, यापुढे तुला काही पाठवावंसं वाटलं तर तुला तुझ्या इच्छेला आवर घालावा लागणार आहे.

पण तरीही, पुन्हा एकदा, थॅंक्स!

--

ही अर्धवेळ नोकरी मी जवळपास एक वर्ष करत होतो. मी त्यावेळी २२ वर्षाचा होतो आणि आयदाबाशी भागातील, स्वत:ला "द पेन सोसायटी" म्हणवणाऱ्या एका विचित्र कंपनीत प्रत्येक पत्राला दोन हजार येन या दराने प्रत्येक महिन्याला अशा तीस-बत्तीस पत्रांचा रतीब घालत होतो.

कंपनीच्या जाहिरातीत "तुम्हीसुद्धा दुस-याला खिळवून ठेवणारी पत्रं लिहू शकता!" असा दावा केला गेला होता. या सोसायटीत सामील होणारे नवीन "सदस्य" प्रवेश शुल्क व मासिक शुल्क भरायचे आणि त्या बदल्यात त्यांना द पेन सोसायटीला महिन्याला चार पत्रं लिहिता यायची. आम्ही, म्हणजे "पेन मास्टर्स" त्या पत्रांना जातीने उत्तर पाठवायचो. वर लिहिलं आहे त्या पत्रासारखीच पत्रं - लिखाणात सुधारणा सुचवणारी, टिप्पणी करणारी आणि पुढे अधिक सुधारणा व्हाव्यात याकरता मार्गदर्शन करणारी. मी या कंपनीची जाहिरात आमच्या कॉलेजच्या साहित्य विभागात डकवलेली पाहिली आणि नोकरीकरता मुलाखत द्यायला गेलो होतो. त्यावेळी, काही विशिष्ट घडामोडींमुळे माझी पदवी एक वर्षाने लांबली होती आणि त्यामुळे माझ्या पालकांकडून मला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ आटला होता. आयुष्यात पहिल्यांदाच मला पोटापाण्यापुरता पैसा कमवणं भाग पडलं होतं.

मुलाखतीनंतर मला बरेच निबंध लिहायला सांगीतले गेले. तब्बल एक आठवड्यानंतर मला ती नोकरी मिळाल्याचं कळवण्यात आले. त्यानंतरच्या एका आठवड्याच्या प्रशिक्षणात पत्रांमध्ये दुरुस्त्या कशा कराव्यात, मार्गदर्शन कसं करावं आणि व्यवसायातील एक-दोन क्लृप्त्यांबद्दल सांगण्यात आलं. ते काही फार कठीण नव्हतं.

सोसायटीच्या सर्व सदस्यांना भिन्नलिंगी पेन मास्टर नेमून दिलेला होता. माझ्याकडे चोवीस स्त्री-सदस्या सोपवण्यात आल्या होत्या. त्या सर्व चौदा ते त्रेपन्न वर्षे या वयोगटातल्या होत्या. याचाच अर्थ असा, की त्यातल्या बहुतेक स्त्रियांपेक्षा मी कितीतरी तरुण होतो. माझी नोकरी सुरू झाली खरी; पण, पहिल्या महिन्यातच माझा धीर सुटला. त्या स्त्रिया माझ्यापेक्षा कितीतरी सुरेख लिहित होत्या आणि अशी पत्रं लिहीण्याचा बराच अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मी माझ्या तोपर्यंतच्या आयुष्यात हाताच्या बोटांवर मोजता येण्या‌इतकी पत्रं लिहिली होती आणि त्यात गंभीर प्रकृतीची पत्रं तर जवळजवळ नव्हतीच. मी एक महिना कसा तगलो, हे माझं मलाच माहित. मला कायम भीतीने घाम फुटलेला असायचा. मला नेमून दिलेल्या सदस्या नव्या पेनमास्टरची मागणी करणार याबद्दल तर माझी खात्रीच पटली होती कारण, त्यांना तशी मागणी करण्याचे अधिकार दिले गेले होते. सोसायटीचा नियमच होता तो!

एक महिना सरला. कुठल्याही सदस्याने माझ्या लिखाणाबद्दल तक्रार तर केली नाहीच, वर माझ्या मालकाकडून मला कळलं की, मी बराच लोकप्रिय होतो म्हणे! दोन महिने गेले तशी माझ्या मानधनातही सुधारणा झाल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या "मार्गदर्शना"ची किमया, दुसरं काय! विचित्रच प्रकार होता सगळा. त्या स्त्रियांनी मला त्यांचा गुरु मानून माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होता हे माझ्या ध्यानात आलं आणि माझी भीड चेपली. त्यांच्या पत्रांवर टिका करताना कचरणं कमी झालं.

त्या स्त्रिया एकाकी होत्या (सोसायटीच्या पुरुषांनाही हे लागू होत होतं) हे मला त्यावेळी समजत नव्हतं. त्यांना व्यक्त व्हायचं होतं, लिहायचं होतं; पण लिहून पाठवावं असं कोणीही नव्हतं. डीजेला फॅन लेटर्स पाठवावीत असा त्यांचा पिंडच नव्हता. सुधारणा किंवा समीक्षेच्या स्वरुपात का असेना, त्यांच्या पत्रात कोणीतरी वैयक्तिक लक्ष घातलेलं त्यांना हवं होतं.

आणि अशाप्रकारे, विशीतल्या उमेदीच्या वर्षांमध्ये मी या पत्रांच्या गुंतवळीत अडकून पडलो होतो.
ती पत्रं किती विविध स्वरुपाची होती-किती आशयाची, किती विविध विषयांवर बोलणारी! कंटाळवाणी पत्रं, मजेदार पत्रं, दुःखाने ओतप्रोत भरलेली पत्र. दुर्दैवाने, त्यातलं एकही पत्र मला माझ्याकडे ठेवून घेता येणार नव्हतं.(सोसायटीच्या नियमांनुसार मला सर्व पत्रं कंपनीला परत करावी लागायची) ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे मला त्यातले तपशील आठवत नाहियेत; पण, त्या पत्रांमध्ये जीवनाविषयीची उत्कटता कशी शिगोशीग भरलेली होती एव्हढं मात्र लख्ख आठवतं. गहन प्रश्न असोत किंवा थातुरमातुर चौकशा, त्यात आयुष्य समरसून जगण्याचा उत्साह जाणवायचा. पण त्या पत्रांतून माझ्यासारख्या 22 वर्षाच्या महाविद्यालयीन युवकाला जे काही कळे, ते अवास्तव, कधीकधी असंबंद्ध वाटणारं असे. पण, त्याचं कारण माझा जीवनानुभवाचा तुटवडा हे असेल असंही नाही वाटत. पण, त्याबद्दल विचार करता करता आता कुठे मला कळायला लागलं आहे की- गोष्टींचा खरेखोटेपणा हा लोकांपर्यंत जसा पोहोचतो, त्यांना ज्या रितीने कळतो, तसा नसतो; तर, तो आपण लावू-समजू तसा असतो. कोणतीही गोष्ट आपल्यालेखी अर्थपूर्ण असते, कारण त्या गोष्टीच्या अर्थपूर्णपणाला जन्म देणारेही आपणच असतो. मला हे तेव्हा कळत नव्हतं; आणि त्या स्त्रियांनाही ते कळत नसावं. आणि, याच कारणापायी मला त्या पत्रांतील सर्वकाही अद्भुतरित्या द्विमितीय वाटायचं - खोलीचा अभाव असलेलं.

मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला, तेव्हा मला नेमून दिलेल्या सर्वच स्त्री-सदस्यांना वा‌ईट वाटलं. पण मी अगदी मोकळेपणीच सांगतोः ती पत्रं कधी लिहून संपायचीच नाही असं मला वाटायला लागलं होतं आणि मला त्यातून स्वत:ची सुटका करुन घ्यायची होती. खेद मलाही वाटत होता, नाही असं नाही. आपलं अंत:करण इतक्या प्रामाणिकपणे माझ्याकडे उघडं करुन सांगणारी इतकी सारी मंडळी मला पुन्हा भेटणार नव्हती आणि हे मला पक्कं माहित होतं.

--

तर, हॅम्बर्गर स्टेक. वर दिलंय ते पत्र ज्या स्त्रीला उद्देशून लिहीलं होतं त्या स्त्रीच्या हातचा हॅम्बर्गर स्टेक खाण्याची संधी लवकरच चालून आली.

ती स्त्री बत्तीस वर्षाची होती. मूलबाळ नाही. नवरा एका ख्यातनाम कंपनीत कामाला होता आणि ती कंपनी देशातील पहिल्या 5 कंपन्यांपैकी एक होती म्हणे! मी महिन्या‌अखेरीस नोकरी सोडणार असल्याचं तिला पत्रातून कळवलं, तेव्हा तिने मला जेवणाचं आमंत्रण दिलं. "मी तुला हवा तसा साधासुधा हॅम्बर्गर करुन खायला घालते" तिने लिहिलं होतं.

सोसायटीचे नियम धाब्यावर बसवून मी तिला भेटायचं ठरवलं. बावीस वर्षाच्या मुलाची उतू जाणारी उत्सुकता ती, कितपत बांधून घालता येणार होती?

तिची अपार्टमेंट ओदाक्यू ला‌ईनच्या रुळांकडे तोंड करुन होती. मूल नसलेल्या घरात असतो तसा नीटनेटकेपणा, शिस्त त्या घरात होती. फर्निचर म्हणा, दिवे-सजावट म्हणा किंवा त्या स्त्रीचे स्वेटरही, म्हणावे इतके महागडे नव्हते, पण सुरेख होते. आमची सुरुवातच एकमेकांना पाहून आश्चर्याने बुचकळ्यात पडण्यात झाली - मी तिच्या तरुण, प्रसन्न व्यक्तिमत्वाला पाहून स्तिमित झालो, तर ती माझ्या वयाकडे पाहून आश्चर्यचकीत झाली. तिला वाटलं होतं,की मी तिच्याहून वयाने मोठा असेन. तिला माझे वय माहित असणे शक्य नव्हते, कारण सोसायटी आपल्या पेन मास्टरचे वय उघड करत नसे.

एकमेकांना आश्चर्याचे धक्के दे‌ऊन संपले, तसं पहिल्या भेटीत पहिल्यांदा असतं ते तणावाचं वातावरणही निवळलं. मग आम्ही हॅम्बर्गर खाल्ला, कॉफी प्यायलो. एकच ट्रेन चुकल्यावर एकमेकांसोबत वेळ काढणाऱ्या प्रवाशांना कसं वाटत असेल- अगदी तसंच वाटत होतं. ट्रेनवरुन आठवण झाली - तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या अपार्टमेण्टच्या खिडकीमधून खालून जाणारी इलेक्ट्रिक ट्रेनची ला‌ईन दिसत होती. त्यादिवशी हवाही मोठी सुरेख पडली होती. समोरच्या इमारतीच्या रेलिंग्जवर वाळत घातलेल्या चादरी आणि फुटॉन्स दिसत होते. दर पाच मिनीटांनी वाऱ्याची शीळ वाजायची आणि त्या चादरी फडफडायच्या, फुटॉन्स हवेने फुगायचे. मला तो आवाज आताही ऐकू येतोय; असं वाटतंय, की इतका काळ मध्ये निघून गेलेलाच नाहीये. काही गोष्टींना काळाचं परिमाण लागू होत नाही ते असंच.

तो हॅम्बर्गर जसा मला हवा होता तसाच होता. स्वाद - जसा असायला हवा तसा, स्टेकच्या बाहेरचा भाग ग्रिल करुन खमंग कुरकुरीत केलेला गर्द तपकिरी, आतमध्ये रस नुसता ठासून भरलेलं मांस आणि चविष्ठ सॉस. मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका स्वादिष्ट हॅम्बर्गर खात होतो अशातला भाग नव्हता, पण मी बऱ्याच काळानंतर इतका उत्तम हॅम्बर्गर खात होतो असं मात्र नक्की म्हणू शकत होतो. मी तसं तिला सांगीतलं, तेव्हा तिची कळी खुलली.

कॉफी प्यायल्यावर आम्ही दोघांनाही एकमेकांना आपापल्या आयुष्याच्या कहाण्या ऐकवल्या. आम्ही बोलत असताना मागे बर्ट बाखाराखची रेकॉर्ड वाजत होती. माझी अद्याप आयुष्यकथा वगैरे बनायची होती, त्यामुळे बहुतेक वेळ तीच बडबड करत होती. कॉलेजमध्ये असताना तिला लेखिका बनायचं होतं. तिच्या लाडक्या फ्रँक्वा सागानबद्दल ती भरभरुन बोलली. 'एमे व्हू ब्राह्मस?'  हे तिचं विशेष लाडकं पुस्तक होतं. मला स्वत:ला सागान आवडत नव्हती असे नव्हे; किमान, इतरांना ती जितकी थिल्लर वाटायची, तितकी मला वाटायची नाही. आणि तसंही, सर्वांनीच हेन्री मिलर, जीन जेनेटसारख्या कादंबऱ्या लिहाव्यात असं थोडीच आहे?

"पण मला नाही लिहिता येत" ती म्हणे

"आतापासून सुरूवात कर, काय हरकत आहे" मी म्हणालो

"नाही. मला माहित आहे, की मी लिहू शकत नाही. तूच मला तसं कळवलं होतंस. " ती स्मितहास्य करत म्हणाली, "तुला पत्र लिहित असताना मला ते अखेरीस कळून चुकलं, की माझ्याकडे ती देणगीच नाही."
मी लाजून लालबुंद झालो. आता मी लाजण्या-बिजण्याची शक्यता फारच कमी; पण, बावीस वर्षाचा असताना मी अतिशय लाजरा होतो.

"पण मी खरंच सांगतो- तुझ्या लिखाणात जीवाला भिडणारं, प्रामाणिक असं बरंच काही होतं. "

यावर काही उत्तर देण्या‌ऐवजी ती फक्त हसली - इवलंसं हसू.

"पण बघ ना, किमान एका पत्रामुळे मला बाहेर पडून हॅम्बर्गर खावासा वाटला."

"चल, काहीतरीच! तुला त्यावेळी भूक लागली असेल. "

आणि खरं सांगायचं झालं तर ते खरंच खरं असावं.

त्यानंतर खिडकीखालून गेलेल्या ट्रेनचा खडखडाट बराच वेळ रेंगाळत राहिला.

--

पाच वाजले तशी मी तिला निघतो असं सांगीतलं. "शिवाय तुला तुझ्या नवऱ्यासाठी रात्रीचं जेवण देखील बनवायचं असेल."

"ते घरी खूप उशीराने परततात" तिचा गाल तळहातावर ठेवून ती बोलत होती. "ते काही बारा वाजायच्या आत यायचे नाहीत."

"खूप कामात असतात का ते?"

"असतात खरं" ती म्हणाली आणि थांबली. पुढे काही बोलायच्या आधी तिने एक पूर्ण क्षण जा‌ऊ दिला. "मला वाटतं, मी तुला माझ्या या समस्येबद्दल लिहून पाठवलं होतं. काही गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल मी त्याच्याशी अजिबात बोलू शकत नाही. मला काय म्हणायचंय हे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. बऱ्याचदा मला असं वाटतं, की आम्ही दोघे न समजणाऱ्या दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतोय. "

यावर काय म्हणावं हे मला कळलं नाही. आपल्या भावना ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत अशा व्यक्तीबरोबर आतापर्यंत कोणी कसं राहू शकलं असेल किंवा यापुढे राहू शकेल?

"पण त्याचं एव्हढं काही नाही" ती मृदू आवाजात म्हणाली. तिच्या आवाजावरुन खरंच एव्हढं काही नसावं असं वाटू देण्याचा तिचा प्रयत्न होता.

"पण खरंच, आतापर्यंत मला पत्रं लिहित राहिल्याबद्दल मनापासून थॅंक्स. मला तुझी पत्रं मनापासून आवडायची. तुझ्या पत्राला उत्तर लिहिताना मी मोकळी होतेय हे माझं मलाच जाणवायचं. "

"मलाही तुझी पत्रं वाचताना खूप आनंद व्हायचा" मी असं म्हटलं खरं; पण खरं तर, तिने लिहीिलेल्या पत्रातल्या फारच थोड्या गोष्टी मला आठवत होत्या.

मग थोडा वेळ काहीच न बोलता ती भिंतीवरच्या घड्याळ्याकडे पाहात बसली- वेळ कसा भराभरा सरतोय हे तपासत असल्यासारखी.

"शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करायचं ठरवलं आहेस? " तिने विचारलं

मी काहीच ठरवलं नव्हतं आणि मी तसं तिला सांगीतलं देखील. तिने पुन्हा स्मितहास्य केलं आणि म्हणाली, "ज्यात लिहावं लागेल अशा कुठल्यातरी कामाचा विचार करुन बघायला हरकत नाही तुला. तू अत्यंत सुंदर समीक्षा लिहितोस. मी तुझ्या पत्राची अत्यंत आतुरतेने वाट पाहायचे.. नाही खरंच, तुला खूष करण्याचा माझा मुळीच हेतू नाही. मला हे देखील माहिती आहे, की तू फक्त तुझ्या वाट्याला आलेली पत्र संपवण्याचं काम करत होतास . पण, त्यात खरीखुरी, जिवंत भावना होती. मी ती सर्व पत्रं जपून ठेवली आहेत. अधूनमधून मी ती काढते आणि पुन्हा वाचत बसते. "

"थॅंक्स" मी म्हणालो "आणि हॅम्बर्गरसाठीसुद्धा! "

--

या गोष्टीला दहा वर्षे उलटून गेली आहेत; पण, आजही ओदाक्यू ला‌ईनवरुन तिच्या घराजवळून गेलो, की माझ्या मनात तिचा विचार येतोच येतो आणि तिच्या ग्रिल केलेल्या, कुरकुरीत हॅम्बर्गरचा विचार तर अपरिहार्यच. मी ट्रॅकच्या बाजूला असलेल्या इमारतींकडे पाहतो आणि त्यातली कुठली खिडकी तिची असावी हे माझं मलाच विचारतो. मी खिडकीतून दिसणारा नजारा आठवायचा प्रयत्न करतो आणि कोणती खिडकी तिची असायला पाहिजे हे शोधायचा प्रयत्न करतो; पण, मला ते कधीच जमत नाही.

असेही असू शकेल, की ती आता तिथे राहात नसेल किंवा अजून तिथेच राहात असेल, तर कदाचित ती अजूनही बार्ट बाखाराखची रेकॉर्ड ऐकत असेल.

मी तिच्याबरोबर झोपायला हवं होतं का?

हे सर्व विचार, हा सर्व काथ्याकूट या एका प्रश्नापाशी ये‌ऊन थांबतो.

याचं उत्तर मला माहित नाही. मला आजही त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडच्या असतात. कितीही वर्षं उलटली, तुम्ही कितीही अनुभवसमृद्ध झालात, तरी त्या तुम्हाला उमगत नाहीत. मग मी काय करतो- तर तिची असावी असं वायणाऱ्या इमारतीच्या खिडक्या पाहतो. कधी कधी वाटतं, त्यातली प्रत्येक खिडकी तिची आहे, तर कधी वाटतं, कुठलीच खिडकी तिची नसावी.

जरा जास्तच खिडक्या आहेत त्या इमारतीला..

--
पुस्तकः द एलिफंट व्हॅनिशेस
हारुकी मुराकामी
अनुवादः श्रद्धा भोवड

 
Designed by Lena