उत्तररात्र-८

निरु एक आठवडयापासून पोक काढूनच चालत होती. प्रचंड मोठ्या पंच मशिनने भोकच पडलं होतं जणू काही तिच्यामध्ये. एका आठवड्यापासून खोलीभर झालेल्या उखीरवाखीर पसाऱ्यात बसून निरू विचार करत होती, की आपल्याला आता होतंय ते नक्की दु:खच आहे की अति ताणामुळे आलेला सुन्नपणा? सगळ्या गोष्टींचे अर्थ एकदा मुळापासून तपासून पाहिले पाहिजेत. आपल्यात नुकतंच कोणीतरी मोठं भोक पाडून गेलंय असं का वाटतंय मग? जे काही घडलं त्यानंतर आपल्याला कसं वाटणं अपेक्षित आहे? झिनी म्हणत होती, "ओह निरु, इट मस्ट बी सो पेनफ़ुल फॉर यू"

पेन? वेदना? खरंच की. आपल्याला वेदना होत असणारच पण कुठे?
कुठे?
तिने गाल, घसा, छाती चाचपून बघितली.

घशात खूप काहीतरी दाटून येतं ते थ्रोट इन्फेक्शन नसावं, वेड्या पेशंट्सना शॉक द्यायला लावतात तिथे सगळं दुखरं दुखरं झालंय, विचार दाटसर वाटणासारखे घर्र घर्र फ़िरतायेत. त्याला वेदना म्हणतात? ’विद’ म्हणजे जाणून घेणे या धातूपासून वेदना बनलाय, थॅंक्स टू यू सातर्डेकर मास्तर! २० वर्षांनीही मला हे आठवतंय, नो डाऊट तुम्ही ग्रेट आहात. गेल्या शनिवारी रात्री दहा वाजून सात मिनिटांनी सत्तू दार आपटून गेला तेव्हापासून ते आजच्या बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत काय जाणून घेतलं आपण? तो "जा गं! तुझ्याशिवाय काही फरक पडत नाही मला" म्हणाला तेव्हा आपल्याला आणि आपण "बरं झालं पिडा गेली!" असं तळतळून बोललो तेव्हा त्याला, काय कळायचं ते कळलेलं असणारच.
तोच तो अश्मयुगीन झगडा.
मी कायम त्याचा विचार केला आणि तो मुळीसुद्धा माझा विचार करत नाही. आपण ज्या माणसांचा कायम विचार करतो ती माणसं आपला इन फॅक्ट किती कमी विचार करतात. असं नेहमीच का होतं? फक्त माझ्याच बाबतीत होतं की खूप जणांच्या?
तिला यावर कोणाशी तरी बोलायला हवंय. कोणाशी पण?
हं हं हं...
सत्तू बसायचा त्या खुर्चीला मध्यभागी ठेऊन हलकेच गुणगुणत खोलीत फिरायला लागली.

मौ मौ अंग तुझं
उन्हात सारखं जाऊ नये
ट्रेक करु नै
तू हे करायचं नै
हे घालायचं नै
असं चालायचं नै
असं बघायचं नै
हं हं हं
लाइफ वाझ लाइक अ ड्रेअरी स्लिपरी जेल
लाइक अ मंडुक इन अ शॅबी मॉसी वेल
ती बद्द आवाजात गातच होती.झिनी तिच्याकडच्या चावीने दरवाजा उघडून आत आली आणि गाणाऱ्या निरुला बघून तशीच परत फिरली.

ही घे दोरी, घाल तुझ्या गळ्यात
नाच चल. ह्याईक sss
टांग टिंग टिंगाक.. टांग टिंग टिंगाक.. टांग टिंग टिंगाक टुंsss..
आपण नाचलोच...नाही का?
Warum ? का?
ती बंधनं अचानक हवीहवीशी वाटली होती. का नाही ती जोखडं तेव्हाच भिरकावून लावली?
Warum nisht? का नाही?

ती आरशाकडे न समजलेपणाने बघतेय. आता या आरशाकडे बघून स्वत:ची नव्याने ओळख करुन घेतली पाहिजे. ही मीच बरं. सत्तूशिवायची. निरुतून सत्तू वजा जाता उरतं काय? निरु उणे सत्तू शून्य मुळीच नाही.

आपली प्रतिबिंब या आरशात अडकत असतील? ती प्रतिबिंब एकत्र करुन एखादी सीडी करता येईल का? माझ्या चुका पुराव्याने शाबित करायचा सत्तूला फार सोस, आणि त्या चुकांची शिक्षा मन नाहीतर शरीर दुखवणारी. स्लीव्हलेस टॉप घातल्याची शिक्षा दंडावर नखांनी जखमा करुन, वारंवार त्या खरवडत राहून. निरुने दंडाच्या आतला भाग कुरवाळला, जखमा अद्याप ओलसर होत्या, कॉटनच्या कुर्त्याला चिकटत होत्या. टॅटू करुन घ्यायचा नुसता विचार बोलून दाखवला तर वाढदिवसाचा संपूर्ण दिवस तमाशे करत स्पॉइल करुन. नंतर नंतर तमाशे नकोत म्हणून खूप गोष्टी टाळल्याच आपण, "चलता है" म्हणत राहिलो, "मी हे केलं नाही तर बरंच" अशी स्वत:ची समजूत घालायला शिकलो.  तो सांगतोय ते करण्यात आपलं भलंच आहे किंवा त्यातून काही चांगलंच निष्पन्न होणार आहे, आपल्याला ते आवडून घ्यावंच लागेल असं म्हणत आपलं केलंसुद्धा. या सीडीने सत्तू कसाकसा आणि कुठे चुकला हे पुराव्याने दाखवता आलं तर? त्याच्याकडेही मी कशी चुकले हे दाखवणारा आरसा असेल तर?

किंवा जीते जाना है चा ऑप्शन सोडून त्याच प्रतिबिंबावर जगायचं ठरवलं तर? मिस हॅविशॅमसारखं?

तिने अचानक स्वत:च्या गालावर सणसणीत चपराक मारली.
निरुबाई! एका पुरुषापायी असं पोचे आलेल्या बाहुलीसारखं चुरमडत जाणं शोभतं का तुम्हाला?

आपण कायम एकाच माणसाशी बांधून घेतो. त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, त्याचे वीकनेस, त्याचे टर्न ऑन्स, टर्न ऑफ्स. आपल्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला त्याचेच संदर्भ चिकटवल्यासारखे होतात. आणि मग जेव्हा तो माणूसच राहत नही तेव्हा एकप्रकारचा व्हॉइड, पोकळी येते आपल्या आयुष्यात, मग तो व्हॉइड करीयर, पैसा, एस्थेटीक्सने भरायला बघतो आपण.

हां! शांत हो. ते घशातलं वाटण पुन्हा सुरू होतंय.

तिने मनातल्या मनात मेंढ्या मोजायला सुरुवात केली.
एक मेंढी आली..कुंपणावरून पलीकडे गेली
दुसरी आली..तिला सत्तूचा चेहरा होता.
अं?
?
निरुने डोळे उघडले, फडफडवले, तोंड वाकडं केलं आणि पुन्हा डोळे गच्च मिटले.
तिसरी मेंढी आली..तिचं नाक लांबलचक, केस खरबरीत, वेडेवाकडे..सत्तूसारखेच.
चौथी मेंढी आलीच नाही..आला तो सत्तूच.
श्शूsssssssssssssss पुरे! नाकावर तर्जनी दाबून वैतागत स्वत:लाच म्हटलं
छे! मेंढ्या पण काही कामाच्या नाहीत.

मग जालीम उपाय.
तिने झोमॅटो उघडलं आणि रात्री १ ला आइस्क्रीम्स कोण डिलिव्हर करतं हे पाहायला लागली. एरव्ही सत्तूने ती मिंट आइस्क्रीम्स मागवली असती. टूथपेस्टच्या फ्लेव्हरचं आइस्क्रीम खाणारा माणूस आपल्याला कसाकाय आवडला हे तिने आठवण्याचा प्रयत्न केला, मग डोक्याच्या मागे केस संपतात तिथे दुखरं वाटायला लागलं, तसा सोडून दिला. पुढच्या वेळी एखादा माणूस आवडला, तर त्याला त्याचा आवडता फ्लेव्हर पहिले विचारून घ्यायचा अशी तिने मनातल्या मनात नोंद केली. क्वालिटी वॉल्सची ६, मॅग्नमची ६, लंडन डेअरीची ६ असा छान १८ वस्तूंचा आकडा करून तिने समाधानाने तिच्या वजनदार कार्टकडे पाहिलं. काय वाढायचं ते वाढू देत वजन. कूपॉन्स आहेत का पाहिलं, तर अजून २ गोष्टी टाकल्या तर ५० रुपयांचं डिस्काउंट मिळेल असं दिसलं. मग अजून काय ख्खावं बरं, काय ख्खावंस वाटतंय बरं असं करत तिने पुन्हा मेनू स्क्रोल करायला सुरुवात केली. चांगली १५ मिनिटे विचार करून तिने आणखी २ आइस्क्रीम्स कार्टमध्ये टाकली तोवर ते दुकानच बंद झालं.
निरू तिच्या मोबाइल स्क्रीनकडे दोन क्षण पाहातच राहिली आणि मग तिला हसूच फुटलं. 
त्यानंतरची ५ मिनिटं ती फसफसून अनावर हसत राहिली.
च्यायला आपल्या संपूर्ण आयुष्य म्हणजेच झोमॅटो आहे. निवडीमध्ये वेळ चाल्लाय, खाणं-जगणं तर होतच नाहीये.
मग तिने स्विगी उघडलं, त्यानंतर झेप्टो, त्यानंतर ब्लिंकइट. सगळं जग आपापलं कामधंदे बंद करून झोपायच्या तयारीला लागलं होतं आणि निरुबाई इंटरनेटवर आइस्क्रीम कुठे मिळतंय हे शोधत होत्या. 

रात्री दोन-अडीच पर्यंत सुरू असणारी, अनवट जागांवरची आइस्क्रीम पार्लर्स सत्तूला माहीत असायची. 
आठवणी..आउच!

विसरायचंय.. विसरायचंय..
पण कसं?
व्होडकामध्ये तिला तिचं दु:ख बुडवता आलं असतं, पण तो काही लॉंगटर्म उपाय नव्हे हे कळण्याइतपत ती शहाणी होणी.
तिला सलग ३६ तास झोपता आलं असतं, बरं वाटेपर्यंत उठायचंच नाही असं ठरवता आलं असतं, ते शक्यंही होतं. पण ज्याला विसरायचंय त्याचा वास येणाऱ्या उशीवर, चादरीवर ते शक्य होईल? 
ती तरातरा चालत गेली आणि तिने बेडशीट उपसून काढली. उशांचे अभ्रे ओरबाडून काढले आणि चांगलं टंपासभर एरीयल टाकून वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले.
मग बेसिनमध्ये पडलेली भांडी धुवून टाकली. 
केर काढला.
लादी पुसली. 
नवीन बेडशीट घातली.
सणकून भूक लागली, तेव्हा आपण पाच दिवसांपासून काही खाल्लेलं नाहीये हे तिच्या लक्षात आलं. मग तिने उभ्याउभ्याच कोरडे कॉर्नफ्सेक्स खाल्ले.
एक मोठा खोका काढला, त्यात घरातला उरलासुरला सत्तू भरून टाकला आणि खोक्याला लाथ मारून घराबाहेर काढलं.

खोका तर घराबाहेर गेला, पण डोक्यातून सत्तू जात नाहीये. 
तिला रडूच यायला लागतं. एका माणसापायी इतकं विद्ध व्हावं इतकं कसं काय आपण गुंतवून घेतलं? हे असं किती दिवस चालणार? यातून वाचलोच, तर वाचू ते आपण असू का?

मग ती हळूहळू चालत तिच्या टेबलपाशी गेली. कॉंप्युटर उघडला. दोन खोल श्वास घेतले आणि टाइप करायला सुरूवात केली.
टाइप करत राहिली. 
अर्धा तास झाला. 
एक तास.
दोन तास.
.
.
आणि मग समोरच्या स्क्रीनवरच्या वाहणाऱ्या शब्दांमध्ये तिच्या दु:खाचा निचरा होऊन गेला.

सकाळच्या पहिल्या प्रहरी लिहून संपतं, तेव्हा मनात आधीपेक्षा कमी दु:ख असतं, आणि जास्त शहाणा विचार असतो.
निरूला अशा अनेक उत्तररात्री जागून काढायला लागतील, तेव्हा कुठे तिचं दु:ख संपण्याची शक्यता असेल.
तिच्याआतलं तुटलेलं काहीतरी सांधलं जाईल याची शक्यता असेल.
तिचं आयुष्य पूर्वपदाला येईल, ती आनंदी राहायला लागेल याची शक्यता असेल.
पण,
शक्यता असेल, हे ही नसे थोडके.

'गेट दॅट बॉय बॅक' च्या निमित्ताने

एक प्रश्न आहे.

मध्यंतरी आम्ही मुली मिळून "हिशोब चुकता करणं" या विषयावर बोलत होतो आणि तेव्हा त्यांना ज्या लोकांनी मनस्ताप दिला, रडवलं - मग तो माजी प्रियकर असो, अथवा एखादी मैत्रीण, मित्र किंवा ओळखीतली व्यक्ती असो - त्यांना धडा कसा शिकवला जावा याबद्दल त्यांच्याकडून दोन टोकांची मतं ऐकण्यात आली.

एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास, मनस्ताप दिला असेल तर तुमची त्या व्यक्तीबाबतची भूमिका काय असते? तुम्ही त्या व्यक्तीला मनोमन शिव्याशाप देता, कोसता - फार फार तर, तिचं कध्धीकध्धी बरं होणार नाही असं तळतळून बोलता. पण, त्याने त्या व्यक्तीला फरक पडतो का?  त्यांच्या एखाद्या कृतीमुळे तुम्हाला मनस्ताप (हेतुपुरस्सर किंवा अजाणतेपणी) झाला आहे हे तुम्ही न सांगता त्या व्यक्तीला कळतं का? हे त्यांना कळलं आहे, हे तुम्हाला कळतं का? आणि त्यांना ते कळत नसेल, तर तुम्ही ज्या कर्दमात आहात, त्याचं काय होतं? तुम्हाला क्लोझर कसं मिळतं? "जाऊ दे ना", "झालं ते झालं" असं म्हणून तुम्ही ते प्रकरण बंद करून टाकता का बहुतेक वेळा? 

आणि बहुतेक माणसं ही अशीच निष्पाप, चांगल्या मनाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, निर्णय घेण्यात चालढकल करणारी सशाच्या काळजाची माणसं असल्याने हे मनस्ताप देणारे हातातून अलगद, त्यांना स्वत:ला काहीही त्रास न होता निसटून जातात. 

पण मग तुमच्या मन:शांतीबद्दल काय? तुम्ही त्या माणसाचं प्रकरण निकाली काढलं, डोक्यामधून उपसून काढलंत, एका कागदावर लिहून त्याचे तुकडेतुकडे करून फिल्मी क्लोझर मिळवलंत, आणि त्या व्यक्तीने तुमच्यासोबत जे केलं, ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबतही केलं, तर त्याला थोडेफार का होईना, तुम्ही कारणीभूत आहात असं तुम्हाला वाटेल का? कोणीही यावं आणि तुम्हाला मनस्ताप देऊन जावं.. तुम्ही पायपुसणं आहात का? कोणाही ऐऱ्या-गैऱ्या-नथ्थू खैऱ्यामुळे तुम्ही त्रास करून घ्यावात, इतके तुम्ही भाबडे आहात का? तुम्हाला स्वत:बद्दल थोडाही आदर वाटत नाही का? तुम्हाला मनस्ताप देणाऱ्या माणसांना सहजासहजी जाऊ देऊ नये असं किती लोकांना वाटतं? 

पण,

असा सूड, बदला घेणं, धडा शिकवणं या गोष्टी करणं म्हणजे त्या व्यक्तीकडे आपण नको तितकं लक्ष देतो आहोत, असा पण नाही का होत? आपल्या कृतींनी त्या व्यक्तीला नको तितकं महत्त्व नाही का मिळत? तिला धडा शिकवण्याचा हट्ट धरून आपण ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास झाला त्या गोष्टी पुन्हा नाही का जगत? विसरायचंय, विसरायचंय करत पुन:पुन्हा नाही का आठवत? मग यामध्ये पुन्हा त्रास आपल्यालाच नाही का?

बरं, तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी तुमच्या पद्धतीने जे करत आहात, त्याने त्या व्यक्तीला तुम्हाला वाटत होता त्यापेक्षा कमी फरक पडतो आहे किंवा पडतच नाहीये, मग तुम्ही काय करता? झेंगटच नाही का मग ते?

आणि जर शोडाउन दोन नार्सिसिस्ट लोकांमधला असेल, तर हे प्रकरण आणखीनच चिघळतं. या आत्मप्रीतीवाल्या माणसांना एम्पथी कळत नसली, तरी इतरांनी त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी वापरलेल्या कोणत्या गोष्टींनी त्यांना फरक पडणार नाही, हे माहीत असण्याइतपत हुशार असतात. त्यामुळे  त्या गोष्टी ते दुसऱ्या नार्सिसिस्टवर वापरतच नाही. त्या गोष्टींचे भांडवल होऊन तेच व्हिलन म्हणून गणले जाण्याची आणि डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यताच फार असेल हे त्यांना ठाऊक असतं. कारण स्पष्टच आहे - दुसऱ्याच्या जागी ते असते, तर त्यांनीही तेच केलं असतं. मग अशावेळी ते दबा धरून बसतात, योग्य वेळ यायची वाट पाहात, सावजाची वाट पाहत लपून बसलेल्या चित्त्यासारखं.. मग त्याला वर्षानुवर्षं का लागेनात. मग, त्यांच्या सुडाच्या कथा-कादंबऱ्या बनतात.

नाना लोक, त्यांच्या सुडाच्या (होय, सूड या शब्दाचं सामान्यरूप सुडाच्या असंच होतं) नाना परी.

अशा विचारांमध्ये असताना एसएनएलचं "गेट दॅट बॉय बॅक" हे नाटुकलं पाहण्यात आलं. 

अगदी स्पष्टच सांगायचं झालं, तर हे काही "लिखाण कसं असावं" याचा नमुना वगैरे नाही. लहानपणी नाट्यशिबिरामध्ये विलास सर वेगवेगळ्या गटांना वेगवेगळे विषय देऊन आणि १० मिनिटे तयारीचा वेळ देऊन नाटुकली बसवायला सांगायचे, तसंच हे नाटुकलं आहे. तीन पोरी आणि त्यांच्याशी प्रतारणा करणाऱ्या त्यांच्या बॉयफ्रेंड्सना त्या कशा धडा शिकवतील आणि त्यांना परत कशा मिळवतील, हा विषय. प्रतारणा करणारे बॉयफ्रेंड्स त्यांना परत का हवे आहेत, त्यापाठी असलेला गंड हा वेगळाच मुद्दा आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

तर,

कथानक असं आहे, या तीनही मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंड्सनी (त्यांची कारणं जी काही असतील ती असतील) डच्चू दिलाय आणि त्या बीयर पीत पीत त्यांच्या त्या बॉयफ्रेंड्सना धडा शिकवण्याचा ("वुई डोण्ट गेट मॅड, वुई गेट इव्हन") मानस बोलून दाखवतायेत.


त्यातली एक तिच्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी त्याच्या कारच्या बॉनेटवर तिचं नाव लिहिते, ते पण XOXO अशा मायन्यासह. XOXO म्हणजे अमेरिकन स्लॅंगनुसार हग्ज ॲंड किसेस. आता पप्पी आणि झप्पी देऊन बाई सूड कसा उगवणार आहेत हे काही मला कळलं नाही. दुसऱ्या बाई त्यांच्या बॉयफ्रेंडच्या (बहुधा किडन्या विकायला लागतील इतक्या महागड्या) गाडीच्या पत्र्यावरून चावीने खोल चरे पाडतायेत. आता यामुळे त्या बाईंना त्यांच्या बॉयफ्रेंड परत कसा मिळणार हे एक तो कन्फ्यूशसच जाणे. आणि तिसऱ्या बाई म्हणजे क्लोई ट्रोस्ट. यांनी मात्र हे धडा शिकवणं प्रकरण फार म्हणजे फार मनावर घेतलंय. त्या त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत (खरंतर, मॅनफ्रेंड. ख्रिस स्टेपलटनला बॉय म्हणणं म्हणजे ही अतिशयोक्ती आहे) माइंडगेम्स खेळतायेत. त्याच्या आईच्या घरातल्या भिंतीसारखा रंग लेवून भिंती "घराच्या बाहेर जा" असं कुजबुजतायेत असं त्याच्या आईला वाटायला लावणं, त्याच्या आईला त्याच्या घरी राहायला जायला लावणं, पर्यायाने त्याच्या नव्या गर्लफ्रेंड्सचं घरातलं येणं-जाणं कमी होणं.. तिच्या एक्स-सीआयए भावाच्या (सर्वगुणसंपन्न श्री. रायन गॉस्लिंग उर्फ "द श्रेडर") तालमीत तयार झाल्याने तिच्या पोतडीत याहून भन्नाट कल्पना आहेत. तिचा भाऊ त्या बॉयफ्रेंडचं सुडोकू बदलतो, ते सुटणारच नाही अशी व्यवस्था करून त्याचं डोकं फिरवतो. त्याचं केस कापून केस गळून आपल्याला टक्कल पडेल की काय, अशी भीती वाटायला लावतो, स्वत:च्या बहिणीचा म्हणजे क्लोई ट्रोस्टचा अवतार संपूर्ण बदलून तिला अचानक रोमेनियन भाषेत बोलायला लावून त्या बॉयफ्रेंडच्या डोक्याचं भजं करतो. यातली बूट बदलून त्रास देण्याची कल्पना आमेलीने मि. कोलिंन्योनवर केलेली आधीच पाहिली होती, पण बाकीच्याही कल्पना काही वाईट नाहीत.

बाकी ,नाटुकलं कसंही का असेना, पण त्यातल्या दोन ओळी म्हणजे सुडाचा ज्वलंत नारा आहेत आणि केवळ त्यासाठीच हा लेखप्रपंच आहे.

"यू हॅड अ होल ॲस मील, बट यू लेफ्ट मी फॉर अ स्नॅक

यू बेटर मार्क माय वर्ड्स, आयॅम गॉन्ना गेट दॅट बॉय बॅक"

किती तो गहन विचार आणि किती ते काळीजभेदी शब्द!

याचं अस्सल मराठी भाषांतर करायचंच झालं, तर 

"पुढ्यात भरलं ताट असताना तुला बाहेर शेण खायची इच्छा झालीच कशी, दळभद्री लेकाचा.

नाही तुला झक्कत घरी परत आणलं, तर नाव नाही लावणार"

--

क्लोई ट्रोस्टने नाना परी करून तिचा सूड उगवला असेल, अगदी "सूड दुर्गे, सूड" सारखा हार्डकोअर नाही, पण तिला वाटेल किंवा जमेल त्या पद्धतीने. तिला तिचा मॅनफ्रेंड परत मिळालाही असेल, कोणी सांगावं.

सायकोपॅथिक आहे? नक्कीच. पण, कोणाला पडलिये? त्याने तिला ढीगभर सुख मिळत असेल तर? 

कोणी कितीही तत्त्वज्ञान झाडलं, तरी शेवटी तेच महत्त्वाचं नाही का? तुमचं सुख, तुमची मन:शांती, तुमच्या पद्धतीने? तेवढ्यापुरता आणि क्षणिक असली तरी? बाकी दुनिया गेली तेल लावत.

व्हॉट से यू?

मो.मोडॉनेय-पुन्हा एकदा.

वेंडीला वाटतं, की बंगलोरसारख्या शहरामध्ये राहणं, तेही सिंगल मुलगी म्हणून - कधीकधी डोकं कचकचवणारं असतं.

एकतर इथे सर्व जोडीने चालतं.

मुलगा-मुलगी, मुलगा-मुलगा, मुलगी-मुलगी. रस्ते, शॉपिंग मॉल्स, थेटर्स .. कुठे म्हणून एकटीच मुलगी, एकटाच मुलगा आनंदात फिरतायेत, विंडो शॉपिंग करतायेत - असं फार क्वचित दिसतं. अतिशय पादऱ्याफुसक्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठीही कोणीतरी सोबतीला लागतं. 

तुम्हाला बॉयफ्रेंड असला म्हणजे शनिवार-रविवार, सुट्ट्यांच्या दिवशी बाहेर जायला हक्काचा जोडीदार मिळतो. तुमची मैत्रीण असून भागत नाही, कारण त्या मैत्रिणीलाही नियमपरत्वे एक बॉयफ्रेंड असतो. आणि सर्वजण जोडीनेच आल्याने एकट्याने आलेला मुलगा/मुलगी म्हणजे गैरसोयीचं मानलं जातं. 

चांगलंचुंगलं खायला प्रचंड आवडणाऱ्या वेंडीचे मात्र यात मधल्यामध्ये हाल होतात. रेस्टॉरंट्समध्ये हल्ली हल्ली दोन सीट्सवालं सीटिंग आलंय, नाहीतर आधी चार सीट्सवाल्या सीटवर एकटीनेच बसलं, की वेंडीमागे खोळंबलेलं एक प्रेमाळू जोडपं वेंडीला "हिला कळत कसं नाही?" वाला लुक देतं. जोडीने आलं की तुम्हाला सर्व माफ असतं. एकतर रेस्टॉंरंट्सना एकटीचं खाणं बनवणं जमत नसावं किंवा ते ज्या रेसिपी वापरतात, त्या दोघांसाठी असाव्यात. कारण काहीही असो, पण कोणतीही डिश एकटीने संपवणं हे महाकठीण काम असतं, आणि उरलेलं अन्न पार्सल करायला लावून अन्नाची ती शिळी कलेवरं दुसऱ्या दिवशी खाण्यातही काही आनंद नसतो. बरं, दोघांचं जेवण संपवेल वेंडी, पण नंतर वाढलेल्या वजनावर डोकेफोड करत बसण्यातही काही अर्थ नसतो. अतिविचार करून कॅलरीज जळल्या असत्या तर किती छान झालं असतं!

तर,  या सर्वांवर उपाय काय - तर कंपनी असणं. 

सिंगल सर्व्हिंग तुम्हाला फक्त फाइन डायनिंगमध्ये मिळतं, पण त्यासाठी तितक्याच पटीत पैसे मोजावे लागतात. सिंगल आहात तर त्याचा भुर्दंडही भरा असं काहीसं तोंडावर फेकून मारल्यासारखं. कोल्हापुरात महालक्ष्मी भक्तनिवासवाल्यांनी वेंडीला "आम्ही एकट्या मुलीला खोली देत नाही" बोलल्यावर वाटलेलं तसं. क्विनाइन फ्लेव्हरवालं.

सिंगल म्हणजे मराठीत नेमकं काय? वेंडीला नाही वाटत मराठीत तितका विचार झालाय. 

अविवाहित? नाही 

एकटी? अजिबात नाही.

मुक्त? अं.. बहुतेक. बाय चॉइस असू तर.. पण त्या शक्यता खूप कमी.

लेबल्स खूप अजब असतात.

मुलींच्या मानाने वेंडीचं मुलांशी फार चांगलं पटतं. मुलींशी मैत्री करण्यामध्ये जी बारीक प्रतवाऱ्या काढून घेतलेली पॉलिटिक्स असतात, डायनॅमिक्स असतात, ती मुलांसोबतच्या मैत्रीत कमी असतात. तिथं तुलनेत सरळसोट कारभार असतो. आहे तर आहे..नाही तर नाही. त्यामुळे मला कधी कंपॅनियन हवा झालाच, तर पुरुषच असेल.

राहता राहिली गोष्ट बॉयफ्रेंडची. तर तिथेही काम सोपं नाही.

एखादा मुलगा खूप लाडात येतो म्हणून नकोसा वाटतो आणि एखादा मुलगा स्वत:हून काहीच बोलत नाही म्हणून त्रास होतो. एखादा मुलगा आपल्याला न विचारता मित्रांशी भेट घालून देतो म्हणून डोक्यात भक्कन् जातो, तर एखादा त्याच्या मित्रांना भेटवत नाही तेव्हा त्याला आपली लाज वाटते का असा विचार करून आपण त्रास करून घेतो.  बाष्कळ बोलणारा गहन बोलत नाही म्हणून, गहन बोलणारा सबटायल्सशिवाय समजत नाही म्हणून, सलगी करणारा ठरकी आहे म्हणून, दूरदूर राहणारा रोमॅंटिकच नाही म्हणून, झोपलीस का? जेवलीस का? असं शंभरदा विचारून पीडतो म्हणून न आवडणारा, रात्री-अपरात्री घरी एकटी आलो तर 'पोहोचलीस का?' इतकं पण विचारत नाही म्हणून त्रास करून घ्यायला लावणारा..

आपल्याला नेमकं हवंय कोण? 

हवंय की नकोय? 

कधीकधी वेंडी बसून विचार करते तेव्हा तिला वाटतं, की खूप चॉइस असल्याचा हा परिणाम आहे का? तिने एखाद्या मुलाशी स्वत:ला बांधून घेतलं, तर त्यानंतर तिला भेटणाऱ्या प्रत्येक ग्रेट मुलासोबत नातं जोडण्याच्या शक्यता आपसूकच नाहीश्या होतात. तसं खरं व्हायला नको, पण कशात काही नाही..फक्त डेटिंग सुरू आहे, पण दुसऱ्या मुलाकडे नुस्तं पाहण्यालाही प्रतारणा वगैरे समजायचा जमाना आहे. आणि हा/ही दुसऱ्याच्या गळाला लागला/लागली, तर आपल्याला आणखी एक मुलगा/मुलगी गाठायला लागेल, दाढी/वॅक्स करायला लागेल, ग्रूमिंग करायला लागेल, त्यांच्यासोबत चार-पाच रेस्टॉरंट्सचं बिल, सिनेमा.. पुढच्या सात-आठ महिन्यांचं बजेट कोलमडायला लागलं, की मग आपल्याला त्या 'करंट' मुला/मुलीशी बांधून घेण्यातला सोयिस्करपणा पटायला लागतो, त्याने/तिनेही आपल्याला सोयीखातर पत्करलं आहे ही वस्तुस्थिती मनाशी ठेवून.

बंगलोर हे इंस्टंटनेसवर चालणारं महानगर आहे. सगळ्या गोष्टी फटाफट. वाट पहायला लागत नाही, ताटकळावं लागत नाही. १५ मिनिटांमध्ये डिलिव्हरी. १५ मिनिटांमध्ये तू नाही दिलीस, तर दुसरा आहेच. इथे सगळ्या गोष्टींसाठी अ‍ॅप्स असतात. स्वाइप, स्वाइप..डन!

तुलनेत लॉंग टर्म काहीतरी शोधणाऱ्या वेंडीसारख्या मुलीचं मग जे काही व्हायचं ते होतंच.

वेंडीला वाटतं, आपल्याला जशा प्रकारचे पुरुष हवे आहेत तसे पुरुष आपणच बनलो, तर आपली ही कंपॅनियनची गरज नाहीशी होईल का?

माझ्यासारख्या मुलीला माझ्यासारखी मुलगी आवडेल का?

आपल्याला कंपॅनियन हवाच असेल तर तो का? की मी ज्या संस्कृतीत वाढले त्या संस्कृतीने मला पार्टनर असायलाच हवा असं वाटायला लावलंय त्यामुळे? 'माझेपण' त्याशिवाय पूर्ण होणारच नाही जणू काही.

अधूनमधून येणारे एकटेपणाचे उमाळे सोडता मी आनंदी आहे. ही गोष्ट कोणाला समजेल का?

बरं, त्या अधूनमधून येणाऱ्या एकटेपणाच्या फेफऱ्यामध्ये वेंडी डेटिंगच्या फंदात पडलीच, तर डेटिंगचे नियम खूप अजब असतात.

स्वत:हून फोन नंबर मागायचा नाही. 

स्वत:हून पहिले मेसेज करायचा नाही. 

स्वत:हून कॉल करायचा नाही. 

पुन्हा भेटायचं का हे आपणाहून विचारायचं नाही.

पुढे भेटण्याचे वायदे होतात, येऊन भेटण्याचं आमंत्रण दिलं जातं, पण फोन नंबर कोणीच शेअर करत नाही, हे कसं काय?

मग असं फक्त तोंडदेखलं म्हटलं जातं का? याचं उत्तर 'हो' असेल, तर तसं का आहे?

कोण बनवतं हे भैताड नियम?

'He's just not that into you' नावाचा छपरी चित्रपटही मग अशा सिच्युएशन्समध्ये गर्भितार्थ वगैरे सांगणारा चित्रपट वाटायला लागतो.

डेटिंगमधलं तुमचं तुमच्याबद्दलचं मत हे तुमचं नसतं मुळी. ते तुमच्यावतीने इतरांनी तुमच्याबद्दल बनवून घेतलेलं मत असतं. 

मला अमुक ठमुक करायला आवडेल का? यावर I would 'love' to असं म्हटलं की मुलगी गळ्यात पडतेय असं वाटण्याइतपत भाषेचं इंटरप्रीटेशन सवंग कधीपासून व्हायला लागलं? एखादी मुलगी पॅशनेटली, इन्टेन्सली बोलते आहे याचा अर्थ ती आपल्या प्रेमात पडलिये असा समज करून घेणं हे आताचंच आहे की पूर्वापार चालत आलेलं आहे? एकदा तर असं झालेलं, की वेंडीला बोलायला आवडत होतं अशा एका मुलाने तिला परतून मेसेज केलाच नाही, तेव्हा त्याच्यामागचं कारण तिने टाकलेलं एक जास्तीचं उद्गगारवाचक चिन्ह असावं का? याचाही विचार वेंडीने केला होता. रात्री ३ ला वेंडीला बोलावंसं वाटलंच, तर ते फक्त मैत्रीखात्यातलं असू शकतं, त्यात फक्त vulnerability असते, तुमच्याबद्दल वाटणारा विश्वास असतो, हे इतक्यावरच नाही का थांबू शकत? I listened to your rant, so I can get into you pants हे मिसइंटरप्रीटेशन नंतर का निस्तरावं लागतं? त्यातून येणारा मनस्ताप भोगणं हे क्रमप्राप्त असतं का?

न कळे.

हे फक्त वेंडीचंच आहे, की इतरांचंही - हेही न कळे.

विचार म्हणजे वस्तुस्थिती नव्हे हे कळत असलं, तरी या अशा खूप वाटण्याचं काय करावं?

मोनोलॉग मोड ऑफ.

---

याआधीचे : मो.मोडॉनेय. | मो.मोडॉनेय-पुन्हा. 

 
Designed by Lena