'एय्या'

00:00 >> 00:17

एलीला वाटतं, की

अनोळखी शहरामध्ये अनोळखी नावाच्या जागेत आपल्या शरीराची वळणं माहित नसलेल्या गादीवर बिनवासाच्या उशीच्या सोबतीने जाग येण्यात काय विलक्षण सुख आहे.

आपल्या एकटेपणाची क्रूर आठवण करून देणारा सिंगल बेड नाही इथे.  झोपेत तिरकं घड्याळासारखं गोल गोल फिरता येतंय इतका मोठा बेड आहे.


00:18 >> 00:30

एली इथे आलीये कारण तिला एका संपूर्ण वेगळ्या जगात जायचं आहे आणि एक संपूर्ण वेगळी व्यक्ती बनायचं आहे.

ती तिच्या कल्पनेत बरीच काय काय असते तशी .ती तिला जशी व्हावीशी वाटते तशी

हो, तिला तसं बनता येतं, पण त्यासाठी धीर एकवटावा लागतो, मन मुर्दाड करावं लागतं, पोटाच्या आतआतून कुठून कुठून काहीतरी तुटल्याचे,फुटल्याचे अावाज ऐकू आले तर त्याकडे दुर्लक्ष करावं लागतं

तिची काळजी करणारी माणसं भोवताली असली की तिला असा माज करता येत नाही.

  
00:31 >> 00:42

नव्या शहरातली नवी सकाळ, लोकांची अनोळखी भाषेतली लगबग, बाजारातल्या स्टॉलची  वाऱ्यात फडफडत असलेली ताडपत्री..

हे पाहत असताना अचानक तापलेल्या गच्चीवर गरम झळांमध्ये फडफडत असलेल्या शर्टाची आठवण मनातून उसळी मारून वर का येते?

एलीला वाटतं, कुठेही जा, काहीही करा, आपल्याला जे पाहायचं तेच पाहतो का आपण?

कशाचा कशाला संबंध नसतो.

की असतो?

त्या तापलेल्या गच्चीवर आपण काय करत होतो? त्याचं काय? पॅरापेटला टेकून रडत होतो बहुतेक कळवळून.

अाता आठवताना मूर्खासारखं वाटतं खूप. पण तसं घडलं खरं. काय करणार.

का रडत होतो? कारण नाही आठवत.

तिला एकदम पिक्चरमधल्या हातात क्लू असलेल्या पण स्मरणशक्ती हरवलेल्या हिरॉइनसारखं वाटतं.

हे आणि असं बरंच काही अवघ्या काही सेकंदांमध्ये घडून गेलेलं असतं, पण असं आयुष्यभरासाठी आठवणीत कायमचं रुतून बसलेलं..

एलीला एकदम होपलेस वाटतं..

कोरीयन मीडीयामध्ये बातमीचा विषय असलेला व्यक्ती सोडून इतर व्यक्तींचे चेहरे ब्लर केले जातात. एलीच्या आठवणींमध्ये ही सेन्सॉरशिप नसते, त्यामध्ये सोयीनुसार चेहरे धूसर करण्याची आणि कालांतराने विसरण्याची  मुभा  नसते. जे आहे ते सर्व काही सर्वच्या सर्व डीटेलसह जिवंत लसलसत राहतं..

एलीचा श्वास कोंडतो, तिला धाप लागते.

मग ती सवयीने एक दीर्घ श्वास घेते. मग मोजायला लागते.

एक मेंढी,

दोन मेंढ्या..

  
00:43 >> 1:00

विसरायचंय, विसरायचंय..पण कसं?

एकदा एका झुरळावर झाडू उगारताना त्या झुरळाने हात जोडल्यासारख्या अॅंटेना जोडल्या होत्या हे देखील आठवतं तिला.

हेलो मिस, टाइम काय झालाय?”

ती आवाजाच्या दिशेने पाहते. एक माणूस तिला काहीतरी विचारतोय.

हनुवटी थोडी निमुळती असती, डोळे जरा बारीक असते तर तंतोतंत तोच.

ओळखीच्या चेहऱ्यांना विसरायला दुऱ्या शहरात येऊन हे असं अनोळखी चेहऱ्यामध्ये ओळखीचे चेहरे शोधत हिंडणं

अं?”

टाइम काय झाला सांगणार का?”

आयॅम सॉरी, माझं घड्याळ बंद आहे.

ती उठून उलट्या दिशेने चालायला लागते.

पुढे जाऊन ती घड्याळ कानाला लावून पाहते. त्यात तिच्या भ्याडपणाची आणि हट्टीपणाची अाठवण करून देणारी नकोशी सेकंदं टकटकत राहतात.


 1:01 >> 01:12

नेहमी आपल्या डोळ्यासमोर 180अंशात पसरलेला समुद्र असा आडवा पडून ९० अंशात पाहताना मितीची, आहे-नाहीची सगळी गणितं डोक्यात उलटीपालटी होतात. आपली रळ नजर समुद्राला 90 अंशात छेद देऊन जाते तेव्हा या वाळूच्या, आपल्या अंगाखालीही अथांग पसरलेल्या समुद्राची नकोशी अस्वस्थ करणारी जाणीव होते.

हेलो मिस, तुम्ही असं इथं झोपणं धोक्याचं आहे. लवकरच भरती सुरू होईल

पुन्हा तोच. आवाज न विसरण्याचाही शाप आहे एलीला.

ती पडल्या पडल्या त्याच्याकडे आणि मग मान कलती करून किनाऱ्यावर नजर फिरवते. पूर्ण समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्याशिवाय कोणीच नाही.

तो तिला वर्म्स आय व्ह्यू मधून दिसतो. त्याने कानाला कॉर्ड्स लावलेत. कोणतं गाणं ऐकतोय तो? कोणतं गाणं ऐकताना तो माझा विचार करतोय?

दुसऱ्याच्या विचारात अापण असण्याची कल्पना तिला अचानक नकोशी वाटते.

टाइम काय झाला सांगणार का?”

आयॅम सॉरी, माझं घड्याळ बंद आहे.

ती त्याच्याकडे निरखून पाहते. त्याला सेक्समध्ये इंटरेस्ट आहे काय?

आता आमच्यात सेक्स झालाच तर काय? आपण कोणती अंडरपॅंट घातलिये? की अाळसाने घातलीच नाहीये?

एलीला वाटतं की, आपल्याला ठाऊक नसतं त्यापेक्षा जे नेमकं ठाऊक असतं त्याचीच भीती जास्त वाटते.

किती वेळ झाला आपण असे ऊन्हात पडलोय?

हे असं रवाळ ऊन अापल्या अंगावरून चटके देत ओघळत असतं तेव्हा आपण जगात एकटे एकटेच आहोत असं का वाटत राहतं?

एकटेपणात वेळ असा संथ, कासवाच्या गतीने का सरतो?

याला माहित असेल का?

हनुवटी थोडीssशी, अगदी थोडीशी निमुळती असती आणि डोळे जरा बारीक असते तर..

तर काय?

तर काss?

मूर्ख कुठली.

ती उठून बसते तोवर तो निघून गेलाय.

तो तिथे खरंच होता की आपल्याला भास झाला?

तिने पडल्या पडल्याच वाळूत काहीतरी काढलंय.

ती पाहते तर, वाळूत तिच्याही नकळत चितारला गेलेला चेहरा पण अोळखीचाच आहे.

अनोळखी लोकांच्या शहरात येऊन, अनोळखी रस्त्यांवर चालतानाही ओळखीच्या लोकांपासून सुटका नाहीच शेवटी तर..

ती सुस्कारते.


 1:13 >> 1:41

वास्तवाला टाळता येईल, काही झालंच नाही असं भासवता येईल पण वास्तवाला टाळण्याचे परीणाम कसे टाळता येतील. त्यांच्यापासून सुटका नाहीच

व्हर्जिनिया लिओनर्डला म्हणते, की मान ताठ, छाती पुढे करून आयुष्याच्या डोळ्यात डोळे घालून जगता आलं पाहिजे. मगच ते कसंय ते कळेल. ते आहे तसं आपलं करून घेता आलं पाहिजे.. आणि ते कसं करायचं हे एकदा का कळलं की त्याला असं निर्ममपणे बाजूला ठेवून त्याकडे पाहता आलं पाहिजे.

कसं जमायचं? कोणीतरी आपल्यासोबत चालत चालत आपल्याला घनदाट जंगलाच्या मध्यभागी आणून पसार व्हावं आणि आपलं आपणंच रस्ता शोधून बाहेर यावं अशी अपेक्षा बाळगावी तसलंच काहीतरी. व्हर्जिनिया, बाय, काहीतरी जमेल असं सांग गं..

एली  मान हलवत केसांमध्ये अडकलेली, गालाला लागलेली, ड्रेसला लागलेली वाळू झटकत चालतेय. आपल्याला चिकटलेले असे अनेक संदर्भ देखील असे अंगावेगळे करता आले असते तर?

एका माणसाने म्हणे वाळूचे हजार दाणे एकत्र केले होते आणि तपश्चर्येने त्याचे तांदूळ करून दाखवले होते.

एली अंगाला लागलेल्या वाळूचे काही कण कागदाच्या पुडीत बांधून घेते.

अरे, तो घड्याळवाला मनुष्यच पुन्हा..तिसऱ्यांदा समोर येतोय. चला..म्हणजे तो माझा भास नव्हता.

आणि यात योगायोग तर नक्कीच नाही.

आता आपणच वेळ विचारावी का, मघाशी किती वाजले होते म्हणून?

तिला हसू येतं. एकच क्षण.

पुढच्याच क्षणी ती ताठ होते.

नाही, नकोच. अनोळखी लोकांना अोळखीचं करून घेणं..It leads to disappointment. It ALWAYS leads to disappointment.

आणि,

ती वळून उलट्या दिशेने चालायला लागते.



त्याचवेळी त्यानेही केलेला अबाउट टर्न तिला दिसला नाही का?

दिसला असता तर ही गोष्ट आहे त्यापेक्षा वेगळी असती का?

एखादी गोष्ट नाही मिळतेय म्हटल्यावर ती मिळवण्यासाठी, होणार नव्हतं ते खरं करून दाखवण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करतो ना आपण? एलीने केली असती का?

त्याच्या पर्स्पेक्टिव्हमधून गोष्ट नेमकी कशी होती?

दोनदा स्वत:हून तिच्याकडे गेलेला तो तिसऱ्या वेळी पाठ दाखवून का चालता झाला?

तो ही तिच्यामध्ये कोणालातरी शोधत होता का?



एक प्रश्न आपल्या पोटा किती प्रश्नांना वाढवत असतो,नाही का?

पण तरीही, त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह डकवायची सवय काही जात नाही.



याची उत्तरं काहीही असली तरी -

ती एय्याम्हणजे तिचीगोष्ट होती. सो...



--

'कामिनो डायरीज' मधील याआधीची पानं -  व्हामोसआल्मा
 
Designed by Lena