उत्तररात्र-७

(रात्रीचे ११.०० वाजलेले. आजूबाजूच्या बिल्डिंग्जमधून गाण्याचे आवाज-बिवाज येत आहेत..पण त्यांच्या घरात शांतता आहे.
एरव्ही यावेळी त्यांच्यात काहीनाकाही लटके वाद सुरू असतात, पण आज वातावरण तंग आहे. तो नेहमीसारखे यी...हॉ.. करत विचित्र आवाज काढत घरभर फिरत नाहीये आणि ती आज कोणतंही गाणं गुणगुणत नाहीये.
काही वेळाने ती बाहेर हॉलमध्ये येऊन डायनिंग टेबलपाशी बसते)

ती - इथे बसतोस का जरा. बोलायचंय.

(आतापर्यंत कोप-यात मॅगझिन वाचत पडलेला तो कोणतेही आढेवेढे न घेता डायनिंग टेबलपाशी येऊन बसतो)

तो - मलाही अ‍ॅक्चुअली

ती - ओके, पहिले तू बोलतोस की मी बोलू?

तो - यू कॅन गो अहेड

ती - बरं..प्लीज नीट ऐकून घे. आक्रस्ताळेपणा नको आणि आरडाओरडा तर मुळीच नको.

तो - ओके

(त्याच्या निर्मम आज्ञाधारकपणाने ती गडबडते..पण तिच्या स्वभावानुसार लगेच सावरतेदेखील)

ती - यू ओके?

तो - आयॅम ओके, थॅंक्स!

ती - बरं, तर ऐक..

तो - बरं आय चेंज्ड माय माइंड.. मी पहिले बोलतो.

ती - ..

तो - कॅन आय?

ती - ओके, बोल

तो - मला मीनूचा फोन आलेला. मला सगळं सांगीतलं तिने.

(तिचा चेहऱ्यावर राग फुलतो, पण लागलीच शांत होतो.  ती काही बोलत नाही)

तो - किती वर्षं?

ती - ..

तो - हं?

ती - चार वर्षं.

तो - आपण एकत्र राहिलो तितकी वर्षं.. (तो हसतो..)

(पण लागलीच त्याचा चेहरा पडतो. ती त्याच्याकडे बारकाईने पाहते आहे. त्याचा चेहरा ओढल्यासारखा वाटतो आहे..हाताची सारखी चाळवाचाळव चालली आहे..विनाकरण हसणं सुरू आहे. तिला त्याचं कारण कळत नाहीये, पण तेवढ्यात तो विचारतो)

तो - तू काय ठरवलं आहेस?

ती - मी..

तो - नाही, तू नको बोलूस. तू बोललीस की कसं शिक्का मारल्यासारखं पर्मनंट होईल ते. मला नाही सहन होणार. अ‍ॅटलीस्ट हे तरी मला माझ्या पद्धतीने हॅंडल करू देत. नेहमी नेहमी प्रत्येक गोष्टीत तुझा फायनल से नको.

ती - (थकल्या सुरात) बरं..

तो - तू जा. माझी काळजी करू नकोस. मी काही तुझ्या आनंदाच्या आड येणार नाही..

(ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आहे)

तो - आपला काही करार झाला नव्हता एकमेकांसोबत कायम राहायचा.. त्यामुळे तू काही मला बांधील नाहीस. तू सुटी आहेस आणि मी सुटा..

ती - ..

तू - तू परत येशील अशी आशा ठेवायची का मी?

(आश्चर्य सरलं आहे. आता ती गप्प आहे..)
(तो हताशपणे हसतो)

तो - ऑफ कोर्स नॉट..शुड हॅव्ह नोन बेटर.. डोण्ट माइंड मी..

(तिने आता मान खाली घातली आहे)

तो - नाही, नाही..तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला काही तितका धक्का बसलेला नाहीये. आय विल बी फाइन..

(तिची मान अजून खालीच)

तो - चेंज इझ गुड.. यू नो व्हॉट..तू नाहीस इथे तर मला राहावणार नाही..बॉस कधीचा मागे लागला होता.. कोची ऑफिसचा चार्ज घे म्हणून..मग मी पण कोचीला हो म्हणून टाकलं.

ती - ..

तो - ऑफकोर्स मी काही तुझ्यासारखा इतका दूर चाललेलो नाही..पण स्टिल..इट काउंट्स

(तो कसनुसं हसतो)

ती - ..

(ती काही बोलत नाहीसं पाहून तो सुस्कारतो आणि उठायला लागतो)
(ती अजून मान खालीच घालून बसली आहे)

ती - बरं..आता मला बोलायचं होतं ते बोलू का?

(तो उठत असतो तो बसता होतो आणि विचारतो..)

तो - अजून काही राहिलं आहे का सांगण्यासारखं?

(ती मान वर उचलते आणि त्याच्या नजरेला नजर भिडवते)

ती - पण मी नाही सांगीतलं त्यांना.

(त्याला काही कळत नाही)

तो - काय नाही सांगीतलं त्यांना?

ती - व्हॉट आय मीन टू से इझ.. 'मी तोक्योला नाही जाणार' असं सांगीतलं त्यांना..

(त्या वाक्याचा अर्थ डोक्यात घुसून तो एव्हाना थंडगार पडलेला आणि त्याच्या तोंडाचा आ वासलेला..
अशा विचित्र शांततेत तब्बल एक मिनिट निघून जातं तेव्हा त्याच्या तोंडून शब्द फुटतात..)

तो - पण का? तुझं स्वप्न आहे ते..

(ती मान हलवते. तिचं तिलाच उमगत नसावं काहीतरी..)

ती - वेल... मला वाटलं की..

(पण मग ती त्याच्याकडे पाहते आणि तिचा चेहरा कठीण होतो..)

ती - यू नो व्हॉट.. नेव्हर माइंड..

(आणि ती उठून आत निघून जाते)

(तो अजूनही डायनिंग टेबलपाशीच पुतळ्यासारखा बसलेला. त्याला खूप काही बोलायचं आहे, पण काही बोलायला सुचत नाहीये..ती गेली त्या दिशेने पाहात मग महत्प्रयासाने त्याच्या तोंडून शब्द फुटतात..)

तो - पण, मला वाटलं की...

आपापल्या परीने गणित बरोबर सोडवल्यासारखं वाटूनही उत्तर कुठेतरी चुकलंय.. दोघांचंही.
आणि मग त्याच्या-तिच्या डोक्यातल्या तिच्या-त्याच्या समीकरणांच्या गुंताड्यात उत्तररात्र अधिकाधिक नकळेशी होत जाते.
आजची रात्र लांबलचक असणारेय.

--

याआधीचेउत्तररात्र-१ । उत्तररात्र-२ । उत्तररात्र-३ | उत्तररात्र-४ उत्तररात्र- | उत्तररात्र-६



 
Designed by Lena