बेखयाली का खयाल अच्छा है!

उचकायचंच म्हटलं तर छोटंसं कारणही पुरतं.
कधीकधी तुम्ही नुस्ते बसलेले असता आणि पुढच्याच सेकंदाला तुमचा मूड खराब होतो.
काही काही दिवशी असं वाटतं की, आपल्याला येत असलेल्या शिव्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड फारकत आहे.
मग तुम्ही स्वत:वर चरफडण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. तुमचा राग, तुमची चिडचिड आत साठत जाते आणि तुम्ही नुस्ते धुमसत राहता.
पण मग एका उपरतीच्या क्षणी तुम्हाला स्वत:ला दिलेले स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे आठवतात. उद्या आपण मरुनच गेलो, तर आपण केलेली शेवटची गोष्ट काय असेल? ही? हे जाणवून शरमता.
मग तुम्ही असंख्य मूव्हीमध्ये हिरोने हिरॉइनीला शिकवलेली गोष्ट करता. जी 'लाइफ इन मेट्रो'मध्ये इरफानने कोंकोणाला शिकवली होती.
तुम्ही गच्चीवर जाता, गच्चीच्या कठड्यावर हात गच्च रोवता आणि..
किंचाळून विचारता की-
सचेत टंडनने इतकं जीव ओतून गायलेलं #बेखयाली अरिजीतने गायची गरज काय?

--

माझ्या घराच्या बाजूला एक तमिळ कुटुंब राहतं. त्यांचं २-३ वर्षांचं कार्टं पाहावं तेव्हा त्याची सायकल दामटत पायात येत असतं. लहान मुलांच्या सायकलच्या हॅंडलला नाही का त्या चकचकीत रंगाच्या झिरमिळ्या असतात, तशा त्याच्याही सायकललाही आहेत, पण ते कार्टून झिरमिळ्यांच्या जागी त्याची चड्डी टांगून वेडबागडं हिंडत असतं. त्याला वाटतं असं केलं की आपण काय हुश्शार, इतरांहून वेगळे! पण खालून ती सायकल लागत असणारच. आणखी तीन-चार वर्षांमध्ये त्याला हे कळेलच.

अरिजीतला अजून कळू नये?

अरिजीतचं बेखयाली हे सचेतच्या थोड्याशा वेडसर, युयुत्सु आणि पोरगेल्याशा ते तरणाबांड याच्यामध्ये कुठेतरी असलेल्या आवाजातल्या 'बेखयाली'पुढे किती पुचाट वाटतं याची त्याला कल्पना तरी आहे का?

--

मला सचेत टंडन आवडतो अशातला भाग नाही. (मी त्याचं नाव सवयीने 'सॅशे' असं वाचलेलं) 'बेखयाली' हे मी त्याचं ऐकलेलं पहिलंवाहिलं गाणं. त्याच्या तुलनेत मला अरिजीतची कितीतरी जास्त गाणी आवडतात, पण एक बाब मात्र खरीये की,
'बेखयाली' हा अरिजीतचा प्रांत नोहे!

तुम्हाला आरशात पाहून हातवारे करत प्रेमगीतं म्हणायचियेत, तर अरिजीत हवा.
तुम्हाला समुद्रकिनारी बसून थंड नि:श्वास सोडाचये झालेत, तरीही अरिजीतच हवा.
93.5 रेड एफएमवर गाणं कोणातरी 'स्पेशल समवन'ला गाणं डेडिकेट करायचंय, तर ते शंभरातल्या नव्वद वेळा अरिजीतचंच असणार.
पूर्वीच्या काळी जगजित सिंग, पंकज उधास बागेतल्या बेंचवर किंवा परदेशातल्या एक्झॉटिक कॅफेमध्ये बसून प्रेमाची गाणी गायचे, तशी गाणी आजच्या जमान्यात गायलाही अरिजीतच हवा.
मला स्वत:ला अरिजीतचं रंगूनमधलं 'ये इश्क है', कलंकचा टायटल ट्रॅक, रामलीलामधलं 'लाल इश्क', 'फितूर मेरा', हैदरमधलं 'खुल कभी तो' ही गाणी प्रचंड आवडतात. ही गाणी अजूनही माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत. पण सुदैव म्हणा किंवा दुर्दैव, आपल्याला जेव्हा गायक आणि त्याची गाणी आवडत जातात तेव्हा त्याचा पॅटर्न आणि त्याच्या सीमाही कळत जातात.
माझ्या मते अरिजीत जीव ओतून गातो, अगदी पोटातून गातो..
तो कलंकच्या टायटल ट्रॅकमध्ये 'पिया रे..' असं म्हणत आळवणी करतोय, ते ऐकून पोटात तुटल्याशिवाय राहत नाही. त्याला इंग्रजीमध्ये 'He croaked' असा चपखल शब्द आहे. पण,
त्याच्या आवाजात उन्माद नाही.
तो बालिश नाही, वात्रट नाही
तो हट्टी नाही
तो क्युट्सी पण नाही
आणि तो रांगडा तर मुळीच नाही.
तो मच्युअर प्रेमाचा पुरस्कर्ता आहे.
झिंज्या उपटायची किंवा कानाच्या खाली जाळ काढायची इच्छा झाली तरी, अजिबात राग न येता शांतपणे उर्दूमिश्रित सुंदर सुंदर शब्द, सुंदर आवाजात फेकून समोरच्याला गळाला लावायचं आणि ते नाही जमलंच तर पुन्हा मच्युअर विरहाची, मच्युअर प्रेमभंगाची गाणी गायला आहेतच साहेब.
त्यात काही वाईट नाही, बऱ्याचदा ते भावतंही..
पण ते पुष्कळदा मचूळ वाटतं.
आणि पुष्कळदा अपुरं.

उदाहरणार्थ - मी एखाद्याला एखादी गोष्ट बोलून जाते आणि मग नंतर का बोललीस, तोंड उटकटायची काय गरज होती का.. असं म्हणत मी डोक्यावर उशी दाबून पलंगावर कपाळ बडवून घेत असते, तेव्हा मला काय वाटतंय हे सांगायला अरिजीतचं एकही गाणं मिळत नाही. तेव्हा माझ्या मदतीला मोहित चौहान धावून येतो. जेव्हा मला प्रचंड रोमॅंटिक स्वप्न पडत असतं, तेव्हा स्वप्नात पापोनच गात असतो. समोरच्याला कळेल न कळेलशा पद्धतीने फ्लर्ट करायचंय, आणि नंतर 'मी नाही ब्वा' म्हणून हात वर करायचेत, तर सुनिधी हवी. एकंदरच मानवी भावभावनांचा स्कोप असेल, तर कैलाश खेर, राहत फतेह अली खान मस्ट!

अरिजीतची गाणी अतोनात कर्णमधुर, सुश्राव्य आहेत. तुमचा मूड चांगला असेल आणि चांगल्या मूडमध्ये ऐकायला तुम्हाला चांगली गाणी हवियेत, तर अरिजीत इझ युअर मॅन! पण टाळा दाखवत भोकाड पसरुन रडायचंय, धान्याचं भरलेलं पोतं फाटून भळभळावं तसे अश्रू गाळत बेवफा सनमला उद्देशून गाणी गायचियेत, तर हरिहरन किंवा सोनू निगमच आठवतो.

हे जे भावनांमधले पदर आहेत, हा जो भावनांचा पट आहे तो अरिजीतच्या गाण्यामध्ये नाही. त्याचं गाणं आटोपशीर आहे, मोजूनमापून, चापूनचोपून नीटस चौकटीत बसवलेलं आहे, ते देखणं आहे आणि नोट्स दिल्यात त्याच्याशी प्रामाणिक राहून आवाजाचे चमत्कार दाखवणारं आहे. त्याच्या गाण्यात आर्तता असलीच तर ती देखील काटेकोर आहे, ती एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाही.
आणि म्हणूनच त्याचं गाणं भिडतं, पण आरपार जात नाही.

पण, आपलं ज्यावर प्रेम आहे त्या माणसांच्या सगळ्याच मर्यादा, उणीवा आपण समजून घेतो..
तशा अरिजीतच्या उणीवाही पोटात घालतो.

--

मी थोड्याशा साशंक मनानेच 'बेखयाली' ऐकलं होतं, पण सचेतने थोडासा हट्टी, थोडासा मुजोर, थोडासा हळवा, नकाराची, दुराव्याची हिरवी जखम घेऊन भळभळणारा कबिर सिंग इर्शाद कामिलच्या शब्दांमधून माझ्या डोळ्यांसमोर उभा केला होता. अकॉस्टिक आणि बेस गिटारवर तोललेलं, इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा भरणा असलेलं ते रॉक गाणं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि माहीत नाही किती वेळा ऐकलं, तेव्हा प्रत्येक वेळी कसलं जिव्हारी लागत गेलं होतं. माझी विकेट तिथेच पडली. तुम्हाला आवंढे गिळायला लावायला सतार, चेलो किंवा व्हायोलिनच लागतं अशातला भाग नसतो हे 'रॉकस्टार'ने फार पूर्वीच सिद्ध केलं, नाही का?  बेखयालीने फक्त "मी टू" म्हटलंय. पंडितजींच्या क्लिनिकमधल्या अॅक्युप्रेशर मशीनवर दहा मिनिटं उभं राहिलं की, नंतरची पंधरा-वीस मिनिटं पूर्ण शरीरातून करंट झणझणत जातात. सचेतचं 'बेखयाली' ऐकून अगदी तशीच भावना झाली होती; पण अरिजीतचं 'बेखयाली' ऐकून मलाच धाप लागली. तो कबिर सिंग दम्याचा दुखणाईत असेल आणि भरल्या संसारातून उठून जायला लागत असल्यामुळे असा निरिच्छ, निर्मम आवाजात गात असेल, असं वाटायला लावलं त्या गाण्याने.
अरिजीतने अक्षरश: ओढगस्तीला आल्यासारखं ते गाणं म्हटलंय. 

असो,
लॉंग स्टोरी कट शॉर्ट- मोहित चौहानचं 'साड्डा हक' अरिजीतने गायलं असतं तर कसं वाटलं असतं,  तसंच मला सचेतचं 'बेखयाली' अरिजीतच्या आवाजात ऐकून वाटलं.
सचेतच्या गाण्यात 'ये जो लोग-बाग हैं, जंगलकी आग है'च्या वेळी मागे करताल वाजतं, ते प्रचंड इरॉटिक, उद्दाम आणि रहस्यमय वाटतं. तेच करताल अरिजीतच्या व्हर्जनमध्येही वाजतं, पण त्यात ते जाम केविलवाणं वाटतं. पॉलो कोएलो म्हणतो तसं, "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने मे जुट जाती है". सचेतच्या गाण्यातलं सर्वकाही, अगदी 'फासला मिटा..'च्यावेळी या कानातून त्या कानात जाणारा वाऱ्याचा झंझावात- हे सर्वकाही एकत्र येऊन त्या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. 
अरिजीतच्या गाण्याचं कंपोझिशन तेच आहे, हा वाऱ्याचा झंझावात तिथेही आहे, पण तिथे-
बेखयालीचा खयाल मात्र नाही.

--

मला काहीतरी सांगायचं असेल, तर शंभरातल्या नव्वद वेळा मी गाण्याचा आधार घेते. संगीत हे शॉर्टहॅंडमधलं कन्फेशन असतं म्हणे! (हाण तिच्या...)  
माझ्या मनातले लोकांचे बुकमार्क हे गाण्यांनी बनलेले असतात. मी जेव्हा नव्या माणसाला भेटते आणि मला ते माणूस आवडतं, तेव्हा त्याला/तिला एखाद्या गाण्याचं बॅकग्राउंड जोडलं जातं.
आणि मला आवडणाऱ्या एकाही व्यक्तीला अरिजीतच्या गाण्याचं बॅकग्राउंड नाही.
मी ऐकलेल्या प्रत्येक गाण्यामध्ये माणसांचे तुकडे तुकडे शोधणारी पोरगी आहे. मी पुन्हा पुन्हा ऐकलेल्या त्याच गाण्याने, त्याच शब्दांनी हवी तीच व्यक्ती डोक्यात आली नाही की, माझ्यासमोर एक्झिस्टेन्शियल क्रायसिस निर्माण होतो.
आणि त्यामुळेच अरिजीतचं 'बेखयाली' ऐकून मी बिथरले.

अरिजीतच्या गाण्यांनी मला याआधी आनंद दिलाय आणि त्या काही क्षणांच्या भांडवलावर हे सगळं विसरुन पुढे जाता येऊ शकेल, नव्हे मी जाईनच.
पण,
अरिजीतने असं करायला नको होतं.
हे बरं नाही.

--

आजचा शब्द
मेलोमानी
(नाम)
संगीत आणि सुरांबद्दल नको तितकं आणि निरातिशय प्रेम व आकर्षण.

न बोलू मैं तो कलेजा फूँके..

कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं.
आपल्याला कोणातरी भेटतं..
आपल्या आयुष्यात कोणाचातरी शिरकाव होतो हे म्हणायला गेलं तर किती अद्भुत आहे..

ही माणसं येतातच मुळी त्यांचं पूर्ण आयुष्य घेऊन..
आणि आपल्या आयुष्यात येताना त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही घेऊन येतात.
त्यांचं थकलेलं, मोडकळीला आलेलं, अस्वस्थ, अनिश्चिंत, कावरंबावरं मन (मन असतंच तसं म्हणा..)
ते ही घेऊन येतात सोबत.

मला कुतूहल या गोष्टीचं आहे की, तुझ्या मनाची अवस्था कशी आहे.
त्याला कायकाय पाहावं लागलंय, त्याचा प्रवास कुठून कुठवर झालाय..

माणसांना जीव लावणं काय असतं हे एकदा का माहीत झालं की माणूस जीव लावायला घाबरतो..सतरांदा विचार करतो
मला ते माहीत आहे..आणि म्हणूनच मी घाबरते आहे.
तुम्हाला एखादी गोष्ट माहीत झाली की, ती तितक्या सहजपणे पुन्हा करावीशी वाटत नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात
तुला ते बहुतेक माहीत असेल, अथवा नसेल
माहीत नसेल, तर ते बरंच आहे
काहीकाही वेळी गोष्टी माहीत नसल्या तरी फार काही बिघडत नाही
त्यामुळे ते फार मनाला लावून घेऊ नकोस!!

परवाच घरी गेलेले तेव्हा समुद्रावर गेले.
मी अजूनही एखाद्या पुरुषासोबत बसून समुद्र पाहिलेला नाही
जी गोष्ट बरीच लोकं फारसा विचार न करता, फार प्रयत्न न करता करतात, ती गोष्ट मी अजूनही केलेली नाही
मी न केलेल्या गोष्टींमध्ये खूप गोष्टी आहेत...जगता जगता, पाण्याच्या वर डोकं ठेवायचा प्रयत्न करता करता राहून गेलेल्या..
हावरेपणाने जगून घेतलेली वर्षंही आहेतच, पण लेखाजोखाच मांडायचा झाला, केलेल्या गोष्टींपेक्षा करुन घ्यायच्या राहिलेल्या गोष्टीच फार आहेत
ली जक म्हणतो तसं- ते तसंच असायचं असतं..
तेव्हा, फार जीवाला लावून घेऊ नकोस!!

मी समुद्र पाहिलाय, असं कधी म्हणू नये
तू आधी पाहिलेला समुद्र तू नंतर पाहशील त्या समुद्रापेक्षा वेगळा असणारेय..
नव्या माणसासोबत पाहशील तेव्हा त्या माणसासोबत पाहण्याची पहिली वेळ असेल.
हे पहिलेपण या केल्या-नकेल्या गोष्टींचंही असतं बहुतेक.
तुम्हाला त्या कितीही चांगल्या माहीत असल्या-नसल्या, तुम्ही हे आधी केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असलं,
तरी..
तुम्हाला ज्या व्यक्तीच्या असण्या-नसण्याने फरक पडतो तिच्यासोबत केलेली गोष्टदेखील पहिल्यासारखीच असेल.

माणसामाणसांमधले क्षण, ते लम्हे..त्यानंतर घडणारं सर्वकाही यात कोणाचाही दोष नसतो
ते तसंच घडणार असतं
काही लाटा लपलपत राहतात आणि काही किनाऱ्यावर येऊन फुटतात
ते तसं का झालं याबद्दलच्या विचाराला तसा काही अर्थ नसतो.
कारण, ते तसंच होणार असतं..
तसं नसतं झालं, तर आणखी कोणत्यातरी पद्धतीने झालं असतं..
पण झालं असतंच.
सो डोण्ट थिंक अबाउट इट सो मच.

आणखी एक गोष्ट-
तू कालचा दिवस जगून घेतला म्हणजे तुला आजच्या दिवसाबद्दल सगळं काही कळलं असं नसतं
त्यामुळे, फार विचार करु नकोस
लेट इट बी.
होतंय ते होऊ देत.
घडतंय ते घडू देत.
 
Designed by Lena