उत्तररात्र-६

उत्तररात्री-४

रात्रीचे ११ वाजलेत. बाहेर सर्व सामसूम आहे. ती डायनिंग टेबलपाशी बसलिये, समोर ताटं झाकलियेत. तिने काहीतरी बेत केलाय हे स्पष्ट दिसतंय
ती उठते आणि बाल्कनीत जाऊन गेटकडे आणि गेटपासून पुढे नजर जाईल तिथवर पसरलेल्या रस्त्याकडे पाहते. तिथे दूरदूरपर्यंत कोणतीही कार येताना दिसत नाहिये
हा फोन का उचलत नाहिये? एरव्ही उशीर झाला तर फोन करतो
ती पुन्हा बाल्कनीत एक फेरी टाकते
अजून त्याच्या येण्याची काहीच खबर नाही
अजून त्याच्या येण्याचं काहीच चिन्ह नाही.

--

तिला डायनिंग टेबलपाशी बसल्या बसल्याच झोप लागलिये आणि ती हातांची उशी करून झोपी गेलिये. 
कधीतरी कीहोलमध्ये चावी खडखडते, तशी ती दचकून जागी होते. ती घड्याळ पाहते. रात्रीचे १२:३० वाजतायेत.
तो आत येतो आणि तिच्या झोपाळलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतो

-सॉssरी

-अरे किती फोन केले. 

-हो का? 
तो बॅगेत खुडबूड करून फोन बाहेर काढतो आणि पाहतो..१५ मिस्ड कॉल्स

-सॉssरी.. (त्याची मुद्रा अपराधी आहे)
पाऊस होता म्हणून आत टाकून दिला आणि मग घरी परतायच्या घाईत होतो, मग काढलाच नाही

-प्यायलाएस?

-एक पेग फक्त..तो पण मराठेने घशात ओतला म्हणून.

-अोके..खाऊन आलाएस की जेवणारेस?

-जेवण..शुक्रवारी?

-हो, आज माझे काही प्लॅन्स नव्हते..सो, मी घरी लवकर आले. म्हटलं, एकत्र जेऊ.

तो तोंड उघडं टाकून तिच्याकडे पाहतो आहे.

-तू जेवायची थांबलियेस? माझ्यासाठी?

-हो, आय मीन, तुझ्यासाठी असं नाही. पण, वाट पाहात राहिले आणि मग जेवण राहूनच गेलं.

-च्यायला, तू जेवण केलंस आणि मी जेवणार नाही असं होईल का यार? आलोच मी.

(तो चवीने जेवतो आहे. ती तिचं ताट वाढून घेते आहे)

-काय केलंस आज मग? पार्टी?

-अरे हो,सांगायलाच विसरलो.  माझा दिवस अत्यंत इंट्रेस्टिंग होता. गेस, आज कोण भेटलं होतं

-कोण

-सोनाली. तुझी मैत्रीण.

(कोशिंबीर वाढून घेताना तिचा हात एकदम थांबतो)

-सोनाली?

-हं

-कुरळे केस, उंच, गालावर तीळ?

-तो तीळ बीळ काय बघितला नाही मी. (ती हसते) पण हो, कुरळे केस होते खरे.

-मग तीच. 

-तू मला कधी तिच्याबद्दल सांगीतलंच नाहीस.

-सांगण्यासारखं काही नव्हतं.

-पण ती तर खूप बोलत होती तुझ्याबद्दल. 

-(ती एकदम उसळते) माझा प्रॉब्लेम आहे का तो मग?

-(तो एकदम गडबडतो) हे.चिल्ल..तुला काय झालं एकदम

(ती गप्पच बसते आणि ताटातला भात चिवडायला लागते)

-ओये...काही सांगशील का? काही प्रॉब्लेम आहे का या सोनाली पर्सनमध्ये? 

- (ती काहीच बोलत नाही)

-काही वाजलं होतं का तुमच्यामध्ये? शी सीम्ड लाइक अ फाइन लेडी. 

-हे.. हेच.. इथूनच सर्व सुरू होतं. सर्वांना ती छान छान वाटते. मग ती सर्वांना एसएमएस करायला लागते. मग कॉल्स सुरू होतात, आणि मग अचानक तुमचं अफेअर सुरू होतं...मग अचानक एके दिवशी तिला तुमचा कंटाळा येतो आणि अचानक एके दिवशी ती तुम्हाला बी थुंकून टाकावी तशी थुंकून टाकते आणि मग तो माणूस कामातून जातो. मग तुझ्यामुळे तुझ्या मैत्रिणीची आठवण होते म्हणून तो माझ्याशी संबंध तोडतो. 
(ती घडाघडा बोलून थांबते. ती थरथर कापते आहे. ती टेबलावरचा पेला उचलते आणि घटघट पाणी पिते)

(तो अजूनही न कळल्यासारखा तिच्याकडे पाहतो आहे)
-आयॅम सॉरी. पण इतक्या वर्षांनी मला तिच्याशी डील करावं लागेल असं वाटलं नव्हतं.

-काय झालं होतं नक्की?

-कॅन वी नॉट टॉक अबाउट इट?

तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. ट्रूकॉलरवर सोनालीचं नाव आणि चेहरा झळकतो. तिचा शांत चेहरा संतापाने फुलतो. त्याची फोन घ्यायची छाती होत नाही. फोन वाजून थांबतो

-तुम्ही फोन नंबर शेअर केलात?

-अं..हो

-का? तू तिला ओळखतोस का?

-आय डोण्ट नो. मी इतका विचार नाही केला. ती म्हणाली, तिला बोलायचं होतं तुझ्याशी, मी नंबर दिला. 

-तिचा नंबर घ्यायचास आणि मला द्यायचा.

-ए..तुला झालंय काय? तू अशी का बोलते आहेस? तू मला नीट सांगशील का काये ते? तू बस पहिले. 

-तुला जिमिन माहितिये राइट?

-येस, आर्किटेक्ट. बेस्ट फ्रेंड दॅट टाइम. मूव्हड टू स्टेट्स. लॉस्ट कॉंटॅक्ट..येस..आय रिमेंबर.

-तू स्टेट्सला गेला नाही, त्याने तिथली असाइनमेंट मागून घेतली. 

-का?

-हिच्यामुळे. इथल्या सगळ्यापासून दूर जाण्यासाठी.

-का? काय झालं.

-ती दिसायला खूप सुंदर होती आणि पुरूष तिच्यापाठी पागल व्हायचे. तिचे नखरेही खूप असायचे. पण तो आपला विषय नाही. तिला चस्का होता आपल्यापाठी किती पुरूष गोंडा घोळतात हे सांगायचा. तो आकडा म्हणजे तिच्यासाठी प्रेस्टिज इश्यू होता. डेट्सवर, व्हेकेशनवर जायचं, आणि एके दिवशी न सांगता सवरता त्याच्याशी कॉंटॅक्टच तोडायचा. कंटाळा आला सांगत. तो पुरूष वेडा व्हायचा. मी काय केलं असतं म्हणजे तिला कंटाळा आला नसता हे शोधण्याच्या मागे लागायचा. मग त्या प्रोसेसमध्ये कडवट होत जायचा. मग तिची नजर जिमिनवर गेली

-पण जिमिन सॉर्टेड होता, राइट? He must have seen right through her.

-मलाही असंच वाटलं होतं, पण तिचं बाई आणि त्याचं पुरूष असणंच खरं ठरलं शेवटी.

-हं..

-जिमिनला नाही सहन झालं ते सगळं. संतापाने तो सारासार विवेकच गमावून बसला होता. एकदा तर त्याने ‘ती अशी आहे हे तू मला का सांगीतलं नाहिस, तुझीच चूक आहे या सगळ्यात’ म्हणून माझ्यावरच राग काढला..कायकाय बोलला मला. मला त्याचा राग कळत होता, नाही असं नाही, पण तो त्या दोघांचा इश्यू होता, त्यात मी काय करणार होते? आणि जिमिन इतका छान प्राणी होता की त्याच्यासोबत तरी ती असलं काही करणार नाही अशी आशा वाटत होती. तिच्या पूर्वेतिहासावरून तिच्याबद्दल सरसकट कन्क्लूजन काढून मोकळं होणं थोडंसं अनफेअरच, नाही का?

-(तो सुस्कारतो) यप, तू आणि तुझी सब्जेक्टिव्हिटी..

-त्याने नंतर फोन केलेला मला..सॉरी म्हणायला..पण त्याला अचानक त्या प्रकरणाची आठवण करून देणारं काहीच डोळ्यासमोर नको झालं. त्याने थेट देशच सोडला. 

-आय सी.

-बट यू सी. मग मलाही सगळं नको झालं. ती, तिचे अॅंटिक्स, मला जिमिननंतर आणखी कोणाचा नंबर आलेला पाहायचा नव्हता आणि कोणी तिच्या फंदात पडलंच तर त्याची वाट लागलेली पाहायची नव्हती. सुदैवाने, मला शहर बदलण्याची संधी चालून आली.

-पण, तुझं तिच्याशी वैयक्तिक भांडण नव्हतं, राइट?

-अं?

-आय मीन, तिनं तुझं असं काही नुकसान केलं नव्हतं, बरोबर?

-मी माझा मित्र गमावला ते बस्स नाही का?

-हे बघ, आणि प्लीज डोण्ट टेक इट पर्सनली..पण जिमिनचं वागणं मला इरॅशनल वाटतं आणि म्हणूनच, तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेणंही. त्यांना काही तू इंट्रोड्यूस केलं नव्हतंस. त्यांच्यामध्ये जे काही झालं, घडलं त्याच तुझा सहभाग कुठेच नव्हता, मग तुला ब्लेम करण्याचा प्रश्न येतोच कुठे?

-तू तिची बाजू का घेतोयेस?

-अईंग, कमाल करतेयेस तू. मी तिची बाजू कुठे घेतोयय़ मी फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की तुला तिचा इतका राग का आहे?

-यू नो व्हॉट, लेट्स नॉट टॉक अबाउट दिस एनीमोअर. 

-व्हाय नॉट? तू एरव्ही दोन्ही बाजू ऐकून मत बित बनवणारी..यावेळी तू.

-एनु बेकादरू माडी कोळ्ळी
(पहिले त्याला काही समजतच नाही, पण नंतर त्याचा चेहरा कठीण होतो)

-तुझ्याकडे बोलायला काही पॉइंट नसेल तर ठीकेय, पण असं काहीतरी न समजणारं थोबाडावर फेकू नकोस.

(ती वरमते. मग..) 
-मी स्पष्टच बोलते. अॅंड प्लीज डोण्ट कन्सिडर इट अॅझ माय वीकनेस. किंवा मी ..

(तो गप्पच आहे)

-एनीवे.. जिमिनसोबत जे झालं ते झालं, तिने ते तसलं काही तुझ्यासोबत केलं, तर इट विल बी टू मच फॉर मी टू हॅंडल.
(ती भरभर बोलून गप्प बसते) 

-तुझी कमाल आहे अगं. तुझं डोकं असंही चालतं ही न्यूज आहे माझ्यासाठी..

- ..

-आणि..
(त्याला लागलेला धक्का अजून ओसरलेला नाहिये. त्याला एक-दोन मिनिटं काय बोलावं ते सुचत नाही. मग कधीतरी त्याला कंठ फुटतो)

-सॉरी. आय वॉझ नॉट रेडी फॉर दॅट. 
(ती त्याच्याकडे नुस्ती पाहते आहे)


-..

-बरं..आपण एक मिनीट हे धरून चालूकी तिचा हेतू खरंच असा आहेपण त्याचा अर्थ असा होतो काकी त्यात ती यशस्वी होईलमी ते घडू देईन?

(ती गप्पच बसते)

-आपण थोडीथोडकी नाही..सहा वर्षं एकत्र काढलियेत.. मला थोडंतरी क्रेडिट दे अगं..

-..

-तुझी जुनी मैत्रीण भेटेलया शहरात तुला पूर्वीपासून ओळखणारं कोणीतरी मिळेल इतकाच हेतू होता माझा..हे असलं काहीतरी तुझ्या मनात असेल तर मात्र अवघड आहे. आणि या सर्वात तू स्वत:ला किती कमी लेखते आहेस हे ही माझ्या लक्षात आलं.

-काय म्हणायचंय काय तुला?

-हेचकी तू सोबत असताना मला तिच्याकडे जावंसं वाटेल असं तुला वाटणं यातून.

- ...

-एनीवेमला काही तुझ्या इन्सिक्युरिटींवर प्रश्न उठवायचे नाहीत आणि मला तिच्याशीही काही घेणं-देणं नाही. तुला नाही भेटायचंयमर्जी तुझी. मी काही तुला फोर्स करणार नाही.

- ..

- ..

-थॅंक्स!

(तो खांदे उचकतो आणि आत जायला निघतो)

-आणि तू ते मघाशी बोललीस त्याचा अर्थ कायबकार्डी की काय ते?

-..

-अं?

-कन्नड. जाकाय वाटेल ते कर.

(तो सुस्कारतो आणि हताशपणे मान हलवत आत निघून जातो.)

(ती थोडी घुटमळते आणि बाहेरून आवाज देते)
-तिचा नंबर तेव्हढा डीलीट कर.

(आतून कपाळावर जोरात हात मारल्याचा आवाज येतो)

-अं??

- ..

-काय म्हणतोयेस?

-काही नाही कपाळावर हात मारून घेतोय. ये इथं अशी.

(त्यांच्या बोलण्यात प्रहर उलटत चालले आहेत आणि रात्र उतरणीला लागलिये. त्या भरात तिच्या तिच्याबद्दलच्या विश्वासाला लागलेली गळतीही कमी होईल का? उत्तररात्रीतल्या प्रश्नांना उत्तरं मिळायला किती उत्तररात्री उलटाव्या लागतात?)



 
Designed by Lena