मो.मोडॉनेय-पुन्हा एकदा.

वेंडीला वाटतं, की बंगलोरसारख्या शहरामध्ये राहणं, तेही सिंगल मुलगी म्हणून - कधीकधी डोकं कचकचवणारं असतं.

एकतर इथे सर्व जोडीने चालतं.

मुलगा-मुलगी, मुलगा-मुलगा, मुलगी-मुलगी. रस्ते, शॉपिंग मॉल्स, थेटर्स .. कुठे म्हणून एकटीच मुलगी, एकटाच मुलगा आनंदात फिरतायेत, विंडो शॉपिंग करतायेत - असं फार क्वचित दिसतं. अतिशय पादऱ्याफुसक्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठीही कोणीतरी सोबतीला लागतं. 

तुम्हाला बॉयफ्रेंड असला म्हणजे शनिवार-रविवार, सुट्ट्यांच्या दिवशी बाहेर जायला हक्काचा जोडीदार मिळतो. तुमची मैत्रीण असून भागत नाही, कारण त्या मैत्रिणीलाही नियमपरत्वे एक बॉयफ्रेंड असतो. आणि सर्वजण जोडीनेच आल्याने एकट्याने आलेला मुलगा/मुलगी म्हणजे गैरसोयीचं मानलं जातं. 

चांगलंचुंगलं खायला प्रचंड आवडणाऱ्या वेंडीचे मात्र यात मधल्यामध्ये हाल होतात. रेस्टॉरंट्समध्ये हल्ली हल्ली दोन सीट्सवालं सीटिंग आलंय, नाहीतर आधी चार सीट्सवाल्या सीटवर एकटीनेच बसलं, की वेंडीमागे खोळंबलेलं एक प्रेमाळू जोडपं वेंडीला "हिला कळत कसं नाही?" वाला लुक देतं. जोडीने आलं की तुम्हाला सर्व माफ असतं. एकतर रेस्टॉंरंट्सना एकटीचं खाणं बनवणं जमत नसावं किंवा ते ज्या रेसिपी वापरतात, त्या दोघांसाठी असाव्यात. कारण काहीही असो, पण कोणतीही डिश एकटीने संपवणं हे महाकठीण काम असतं, आणि उरलेलं अन्न पार्सल करायला लावून अन्नाची ती शिळी कलेवरं दुसऱ्या दिवशी खाण्यातही काही आनंद नसतो. बरं, दोघांचं जेवण संपवेल वेंडी, पण नंतर वाढलेल्या वजनावर डोकेफोड करत बसण्यातही काही अर्थ नसतो. अतिविचार करून कॅलरीज जळल्या असत्या तर किती छान झालं असतं!

तर,  या सर्वांवर उपाय काय - तर कंपनी असणं. 

सिंगल सर्व्हिंग तुम्हाला फक्त फाइन डायनिंगमध्ये मिळतं, पण त्यासाठी तितक्याच पटीत पैसे मोजावे लागतात. सिंगल आहात तर त्याचा भुर्दंडही भरा असं काहीसं तोंडावर फेकून मारल्यासारखं. कोल्हापुरात महालक्ष्मी भक्तनिवासवाल्यांनी वेंडीला "आम्ही एकट्या मुलीला खोली देत नाही" बोलल्यावर वाटलेलं तसं. क्विनाइन फ्लेव्हरवालं.

सिंगल म्हणजे मराठीत नेमकं काय? वेंडीला नाही वाटत मराठीत तितका विचार झालाय. 

अविवाहित? नाही 

एकटी? अजिबात नाही.

मुक्त? अं.. बहुतेक. बाय चॉइस असू तर.. पण त्या शक्यता खूप कमी.

लेबल्स खूप अजब असतात.

मुलींच्या मानाने वेंडीचं मुलांशी फार चांगलं पटतं. मुलींशी मैत्री करण्यामध्ये जी बारीक प्रतवाऱ्या काढून घेतलेली पॉलिटिक्स असतात, डायनॅमिक्स असतात, ती मुलांसोबतच्या मैत्रीत कमी असतात. तिथं तुलनेत सरळसोट कारभार असतो. आहे तर आहे..नाही तर नाही. त्यामुळे मला कधी कंपॅनियन हवा झालाच, तर पुरुषच असेल.

राहता राहिली गोष्ट बॉयफ्रेंडची. तर तिथेही काम सोपं नाही.

एखादा मुलगा खूप लाडात येतो म्हणून नकोसा वाटतो आणि एखादा मुलगा स्वत:हून काहीच बोलत नाही म्हणून त्रास होतो. एखादा मुलगा आपल्याला न विचारता मित्रांशी भेट घालून देतो म्हणून डोक्यात भक्कन् जातो, तर एखादा त्याच्या मित्रांना भेटवत नाही तेव्हा त्याला आपली लाज वाटते का असा विचार करून आपण त्रास करून घेतो.  बाष्कळ बोलणारा गहन बोलत नाही म्हणून, गहन बोलणारा सबटायल्सशिवाय समजत नाही म्हणून, सलगी करणारा ठरकी आहे म्हणून, दूरदूर राहणारा रोमॅंटिकच नाही म्हणून, झोपलीस का? जेवलीस का? असं शंभरदा विचारून पीडतो म्हणून न आवडणारा, रात्री-अपरात्री घरी एकटी आलो तर 'पोहोचलीस का?' इतकं पण विचारत नाही म्हणून त्रास करून घ्यायला लावणारा..

आपल्याला नेमकं हवंय कोण? 

हवंय की नकोय? 

कधीकधी वेंडी बसून विचार करते तेव्हा तिला वाटतं, की खूप चॉइस असल्याचा हा परिणाम आहे का? तिने एखाद्या मुलाशी स्वत:ला बांधून घेतलं, तर त्यानंतर तिला भेटणाऱ्या प्रत्येक ग्रेट मुलासोबत नातं जोडण्याच्या शक्यता आपसूकच नाहीश्या होतात. तसं खरं व्हायला नको, पण कशात काही नाही..फक्त डेटिंग सुरू आहे, पण दुसऱ्या मुलाकडे नुस्तं पाहण्यालाही प्रतारणा वगैरे समजायचा जमाना आहे. आणि हा/ही दुसऱ्याच्या गळाला लागला/लागली, तर आपल्याला आणखी एक मुलगा/मुलगी गाठायला लागेल, दाढी/वॅक्स करायला लागेल, ग्रूमिंग करायला लागेल, त्यांच्यासोबत चार-पाच रेस्टॉरंट्सचं बिल, सिनेमा.. पुढच्या सात-आठ महिन्यांचं बजेट कोलमडायला लागलं, की मग आपल्याला त्या 'करंट' मुला/मुलीशी बांधून घेण्यातला सोयिस्करपणा पटायला लागतो, त्याने/तिनेही आपल्याला सोयीखातर पत्करलं आहे ही वस्तुस्थिती मनाशी ठेवून.

बंगलोर हे इंस्टंटनेसवर चालणारं महानगर आहे. सगळ्या गोष्टी फटाफट. वाट पहायला लागत नाही, ताटकळावं लागत नाही. १५ मिनिटांमध्ये डिलिव्हरी. १५ मिनिटांमध्ये तू नाही दिलीस, तर दुसरा आहेच. इथे सगळ्या गोष्टींसाठी अ‍ॅप्स असतात. स्वाइप, स्वाइप..डन!

तुलनेत लॉंग टर्म काहीतरी शोधणाऱ्या वेंडीसारख्या मुलीचं मग जे काही व्हायचं ते होतंच.

वेंडीला वाटतं, आपल्याला जशा प्रकारचे पुरुष हवे आहेत तसे पुरुष आपणच बनलो, तर आपली ही कंपॅनियनची गरज नाहीशी होईल का?

माझ्यासारख्या मुलीला माझ्यासारखी मुलगी आवडेल का?

आपल्याला कंपॅनियन हवाच असेल तर तो का? की मी ज्या संस्कृतीत वाढले त्या संस्कृतीने मला पार्टनर असायलाच हवा असं वाटायला लावलंय त्यामुळे? 'माझेपण' त्याशिवाय पूर्ण होणारच नाही जणू काही.

अधूनमधून येणारे एकटेपणाचे उमाळे सोडता मी आनंदी आहे. ही गोष्ट कोणाला समजेल का?

बरं, त्या अधूनमधून येणाऱ्या एकटेपणाच्या फेफऱ्यामध्ये वेंडी डेटिंगच्या फंदात पडलीच, तर डेटिंगचे नियम खूप अजब असतात.

स्वत:हून फोन नंबर मागायचा नाही. 

स्वत:हून पहिले मेसेज करायचा नाही. 

स्वत:हून कॉल करायचा नाही. 

पुन्हा भेटायचं का हे आपणाहून विचारायचं नाही.

पुढे भेटण्याचे वायदे होतात, येऊन भेटण्याचं आमंत्रण दिलं जातं, पण फोन नंबर कोणीच शेअर करत नाही, हे कसं काय?

मग असं फक्त तोंडदेखलं म्हटलं जातं का? याचं उत्तर 'हो' असेल, तर तसं का आहे?

कोण बनवतं हे भैताड नियम?

'He's just not that into you' नावाचा छपरी चित्रपटही मग अशा सिच्युएशन्समध्ये गर्भितार्थ वगैरे सांगणारा चित्रपट वाटायला लागतो.

डेटिंगमधलं तुमचं तुमच्याबद्दलचं मत हे तुमचं नसतं मुळी. ते तुमच्यावतीने इतरांनी तुमच्याबद्दल बनवून घेतलेलं मत असतं. 

मला अमुक ठमुक करायला आवडेल का? यावर I would 'love' to असं म्हटलं की मुलगी गळ्यात पडतेय असं वाटण्याइतपत भाषेचं इंटरप्रीटेशन सवंग कधीपासून व्हायला लागलं? एखादी मुलगी पॅशनेटली, इन्टेन्सली बोलते आहे याचा अर्थ ती आपल्या प्रेमात पडलिये असा समज करून घेणं हे आताचंच आहे की पूर्वापार चालत आलेलं आहे? एकदा तर असं झालेलं, की वेंडीला बोलायला आवडत होतं अशा एका मुलाने तिला परतून मेसेज केलाच नाही, तेव्हा त्याच्यामागचं कारण तिने टाकलेलं एक जास्तीचं उद्गगारवाचक चिन्ह असावं का? याचाही विचार वेंडीने केला होता. रात्री ३ ला वेंडीला बोलावंसं वाटलंच, तर ते फक्त मैत्रीखात्यातलं असू शकतं, त्यात फक्त vulnerability असते, तुमच्याबद्दल वाटणारा विश्वास असतो, हे इतक्यावरच नाही का थांबू शकत? I listened to your rant, so I can get into you pants हे मिसइंटरप्रीटेशन नंतर का निस्तरावं लागतं? त्यातून येणारा मनस्ताप भोगणं हे क्रमप्राप्त असतं का?

न कळे.

हे फक्त वेंडीचंच आहे, की इतरांचंही - हेही न कळे.

विचार म्हणजे वस्तुस्थिती नव्हे हे कळत असलं, तरी या अशा खूप वाटण्याचं काय करावं?

मोनोलॉग मोड ऑफ.

---

याआधीचे : मो.मोडॉनेय. | मो.मोडॉनेय-पुन्हा. 

2 comments:

Aniruddha Jadhav said...

मस्त लिहिलंय.

Shraddha Bhowad said...

थॅंक यू अनिरुद्ध!
पटतं तेच आवडतं असं मानायचं का? 😊

 
Designed by Lena