जायते यस्मात्..

संध्याकाळचं कलतं उन्ह खिमटीसारखं कोमट झालं, की सूर्यास्तापर्यंतची पन्नास मिनिटं हातात उरतात. यावेळी घरात बसवत नाही. काहीतरी निसटून जाण्याच्या आधी ते पकडून ठेवलं पाहिजे असा वेडसर विचार (रोज!) येतो. 'काय' निसटून चाललंय ते मात्र बोट ठेवून सांगता येत नाही. त्या सरत्या उन्हात उभं राहिलं तर प्रकाशासारखे आपणही विरघळून जाऊ, पुरते दिसेनासे होऊ असं वाटतं. मनाची घालमेल होत राहते. 

मग मी बाहेर पडते.

एका तलावाला मध्ये धरून चालण्यासाठी केलेली एक गोलाकार जागा आहे वसईत. या तलावाचं नाव तामतलाव.  ताम्रतलावाचं नामकरण झालं तामतलाव. माझ्याही आधीपासून असलेला तामतलाव आता पुरता आधुनिक झालाय. पूर्वी किर्र अंधारात पोटात रहस्य वागवत शांत पहुडलेला काळाकभिन्न तलाव आता रोषणाईने सजलाय, पुरता माणसाळलाय. पण मनातून - पावसाळा आला की ऊतू जाऊन तामतलावच्या रस्त्यांवर सांडणारा, हिवाळा आला की जलपर्णीच्या नाजूक जांभळ्या फुलांनी सजणारा तो तलाव मला त्याच्या अस्तावस्त्य वाढलेल्या नैसर्गिक रूपातच खूप आवडायचा. त्याच्या चारही बाजूंनी उंचचउंच वाढलेली झाडं होती, तलावात कासवं होती, मासे होते, माशांच्या पोटात दुसरे मासे होते. एकदा तर तिथे मगर आली होती अशी आवई उठली होती. चारही बाजूंनी बंद असलेल्या तलावात मगर येऊच कशी शकते? पण त्या तलावाविषयी लोकोपवादच इतके होते, की त्यावेळी त्या तलावाविषयी सर्वकाही खरं वाटायचं. सपना टॉकीजला आम्ही 'ज्युरासिक पार्क' पाहिला त्यानंतरचे कित्येक दिवस त्या तलावातून एक डायनोसॉर हॉव्व करत बाहेर येईल असंही वाटायचं. 

त्या तलावाच्या बाजूला पालिकेचं एक छोटंसं खेळघर होतं पूर्वी. मोबाइल, गेम्स काहीही नव्हतं तेव्हा आमच्याकडे. घसरगुंड्या, सी-सॉ, पाळणा हे इतकंच मुद्दल असलेल्या खेळघरात तासनतास खेळता येतं हे आजच्या पिढीला सांगून खरं वाटेल का? त्या घसरगुंडीच्या पायथ्याशी असताना साधासुधा, नेहमीसारखा दिसणारा तलाव घसरगुंडीच्या सर्वात वर असताना वेगळा भासायचा. काळाभोर, शांत. त्या शांततेत काही डचमळलं की घाबरगुंडी उडायची आणि भंबेरी उडून घसरगुंडीवरून खाली यायची घाई लागायची.

आताही मी त्या तलावाला गरगर फेऱ्या मारतेय तेव्हा गजांमधून कारंजं पिऊन घेणारी छोटी पोरं दिसताएत. सारखे-सारखे फ्रॉक घातलेल्या जुळ्या पोरी आहेत. "कारंज्यातलं पाणी लाल नाई काही, मरून आहे" असं मोठ्या बहिणीने म्हटल्यावर तिच्याकडे भक्तिभावाने पाहणारी लहान बहिण आहे. शतक बदललं, पण काही गोष्टी अजूनही तशाच आहेत, 'देजा वू' वाटावं इतक्या. 

कारंजावरून आठवलं-

आम्ही काही फार श्रीमंत नव्हतो, पण आमच्या आईबाबांनी आम्हाला खूप ठिकाणी फिरवलं. महाराष्ट्र तर जवळपासच सगळाच फिरलो. पण त्या प्रवासातल्या आता अधमुऱ्या होत चाललेल्या आठवणींमधली एक आठवण कालच पाहिली असावी इतकी ताजी आहे. पैठणचं ज्ञानेश्वर उद्यान आणि तिथल्या कारंज्यांचा एक शो. माझं वय अवघं सहा-सात. त्यावेळी 'मोगरा फुलला' हे गाणं ऐकलेलं देखील नव्हतं, पण कारंज्याभोवतीच्या गजांमध्ये तोंड खुपसून 'आs' वासून पाहिलेलं, 'फुले वेचिता बहरु' मधल्या 'रु' वर खाली येऊन कळीयासी वर चारदा थुयथुयणारं कारंजं माझ्या मनात कसं कच्चकन् रुतून बसलंय. लताबाईंच्या आवाजाच्या सप्तकांनुसार ते कारंजंही वरखाली होत होतं. त्यावेळी 'इवलेसे रोप' वर खरंच गगनावेरि गेलेलं ते कारंजं आठवून मन गलबलतं, त्यावेळी त्या आठवणी जमवणारं मन किती कोवळं, अनाघ्रात होतं हे आठवून. मनाचं मैत्र कधी कशाशी जुळेल काही सांगता येत नाही. त्यानंतर बाटत गेलेल्या बोडक्या मनातल्या अपडेट, अपग्रेड केलेल्या, कधी गरजेनुसार ऑल्टर केलेल्या आठवणींमध्ये ही आठवण काहीही फेरफार न होता तशीच्या तशी आहे अजून. दहा-पंधरा वर्षांपासूनचे दोनचारच मैतर प्रचंड मोलाचे वाटावेत, तशी ही आठवण मला खूप श्रीमंत वाटते.

समुद्राकाठी जगल्या-वाढलेल्या लोकांसाठी वाहते पाणी हा जीवनाचा संदर्भ होऊन बसतो. समुद्राकाठी, नदीकाठी न वाढलेल्या लोकांना मी इमारतींनी बरबटलेल्या बंगळुरुमध्ये दोन मेट्रो बदलून फक्त एक तळं पाहायला का जाते हे कदाचित म्हणूनच समजणार नाही, फक्त तिथेच गेल्यावर शांत का वाटतं, 'अ‍ॅट होम' का वाटतं, हे पटणार नाही. माझ्या जवळपास सर्वच आठवणींमध्ये समुद्र किंवा नदी आहे. माझ्या जवळपास सर्वच आठवणींना पाण्याचा संदर्भ आहे. मला आवडू शकतील अशा सर्वच माणसांना मी समुद्र बाजूला ठेवून भेटलेले आहे. दुबई मॉलमधला बुर्ज खलिफाच्या पायथ्याशी चालणारा फाउंटन शो पाहिला नव्हता, एन्रिकेच्या 'हिरो'वर एकत्र डोलणारी कारंजी पाहिली नव्हती, तोपर्यंत आईशप्पथ मला एन्रिके छपरी वाटायचा, बीबर अजूनही वाटतो तसा. पण त्या कारंजाने त्या गाण्याची परिमाणं बदलून टाकली. गाण्यांना विवक्षित संदर्भ मिळाले, की ती गाणी मनात रुतून बसतात, तसंच या आठवणींचं झालंय.

जायते यस्मात् लीयते यस्मिन इति जल:

पाण्यातून यायचं, पाण्यातच जायचं आणि अध्येमध्ये मग हे असं आठवणींचं तर्पण वाहत बसायचं.

No comments:

 
Designed by Lena