येवा..आपलाच आसा

गणपतीपुळ्याला गेलो, की आपण गाऱ्हाणं सांगतो, नवस बोलतो किंवा साकडं घालतो. यावेळी "बाप्पा, मन:शांतीसाठी काही कर देवा, हा कोलाहल नको वाटतो आता" असं गाऱ्हाणं घातलं आणि ही आमची आर्त साद बहुधा पुळ्याच्या गणपतीने ऐकली; कारण, पुळ्यापासून दोन किलोमीटर्सच्या आतच आम्हाला आमच्या उबगलेल्या अस्वस्थ, प्रक्षुब्ध मनांसाठी एक उतारा मिळाला - मालगुंडमधील 'कवी केशवसुत स्मारक' नामक कवितास्मारकाच्या रूपाने.

साधारण २५ वर्षांपूर्वी कोकण मराठी साहित्य परिषद आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रयत्नाने  केशवसुतांचे जन्मघर आणि त्या घराच्या आसपासचा एक एकरचा परिसर हा कवितांना वाहिलेला परिसर म्हणून घडवण्यात आला, तेच हे ‘कवी केशवसुत स्मारक’. स्मारकाच्या पुढच्याच अंगाला केशवसुतांचे छोटेखानी घर उभे आहे. मातीच्या त्या घराला बिलकुल धक्का न लावता मागील अंगाला स्मारकाचा विस्तार करण्यात आला आहे. नवकवितेची नांदी म्हणून तुतारी वाजवणाऱ्या कवीचे नवशिल्प उभे करण्यात आले आहे. शिल्पाच्या बरोब्बर मागे केशवसुतांच्या पाषाणात कोरलेल्या कविता आहेत. ही पाषाणातली काव्यशिल्पे पाहिली, की नवकवितेचे प्रवर्तक शिलेदार शिस्तबद्ध पद्धतीने केशवसुतांना सलामी देत असावेत असे वाटते, त्यांच्या 'नवा शिपाई' कवितेसारखे. स्मारकात सुरेख वाचनालय आहे आणि १९५० सालापासून ते २००० पर्यंतच्या कवींच्या हस्तलिखित/टंकलेल्या कवितांचे दालनसुद्धा आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्या कवितांमधून बहरणारा चाफा इथेही कानाकोपऱ्यातून डोकावतो. वनश्रीने नटलेला हा परिसर कोकणातल्या रणरणत्या उन्हाने कावलेल्या जीवांना आपसूकच शांत करतो, आत्ममग्न करत जातो. या वास्तूची योजनाच तशी असावी. नॉस्टॅल्जियामध्ये, तुमच्या भूतकाळातल्या आठवणींच्या ओढीने तुमच्या मेंदूमध्ये स्रवलेल्या डोपामाईनमध्येही तशीही तुम्हाला शांतवण्याची अभूतपूर्व ताकद असतेच.



कोणीही वृत्तबद्ध, छंदबद्ध कवितांना कितीही नाकं मुरडू देत, इथे आल्यावर आठवतात त्या बालपणी, शाळेत चालीवर म्हटलेल्या कविताच. मंदाक्रांता मभनततगा, शार्दूलविक्रिडित नावाचे जिभेला गाठी घालणारं वृत्त, मात्रा, गण..काय बहार! आठवणीतल्या सांदीकपारीत कुठेकुठे लपून बसलेल्या या आठवणींनी अचंबा वाटला आणि हेलावून गेल्यासारखेही वाटले. मुक्तछंदातली फक्त एकच आठवली - ढसाळांची 'अगणित सूर्यांनो', तेही ती नारकरांनी त्यांच्या रांगड्या आवाजात बोलून मेंदूवर कोरल्याने. याच वृत्तबद्ध कविता अनेकांसाठी डोकेदुखी होत्या हा सूरही तिथे खूपजणांकडून ऐकायला मिळाला. कविता म्हणजे अभ्यासक्रमातला केवळ परीक्षेत गुण मिळवण्याकरिता केलेला खटाटोप. पण, ही कुरकूर करणारी बाप्ये आणि बाईलोकंही मोठ्या उत्साहात मोठाल्या आवाजात कविता म्हणत आहेत आणि 'बाबा, इझ दिस मराट्टी पोएट्री?' विचारणारी त्यांची ज्युनियर पार्टी त्यांच्याकडे डोळे मोठमोठाले करून कौतुकाने पाहात आहे हे चित्र मोठं लोभस होतं. यापेक्षा प्रेरणादायी दुसरं काय असू शकेल? 

या कवींच्या कविता आवडत नसणारा किंवा त्या कालबाह्य आहेत असे वाटणारा एक वर्ग आहे. त्यांचा विचार त्याज्य नाही. केशवसुतांनीही त्यावेळच्या प्रस्थापित कवितेला आवाहन दिलंच होतं. पण काहीही असो, तुमच्यालेखी तुमच्या कवितेमध्ये काय नसावं, तुमची कविता कशी नसावी हेदेखील तुम्हाला याच कवींनी शिकवलं; तेव्हा, तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण काही अंशी त्यांचं देणं लागतोच. या कवितांमधील शब्दबाहुल्य, आशयघनता, शब्दसंपदा, अर्थगर्भ विषय, त्यांची लयबद्धता, नादबद्धता आणि त्यांचे साहित्यिक मूल्य वादातीत आहे.

कोमसापतर्फे मालगुंड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये विविध साहित्यिक कार्यक्रम होत असतात, शिवाय स्मारकामधील वाचनालयाचे सदस्यही वाढत आहेत असे वाचण्यात आले. स्मारकाच्या पाठीमागे एक अतिशय भव्य अ‍ॅंफीथेटर आहे, पण अ‍ॅंफीथेटरमध्ये लोकं असली की ते अधिक साजिरं दिसतं, नाहीतरी भयाण भुताळी ओसाड वाटतं. आम्ही गेलेलो तेव्हा असंच वाटलं ते - नोकरीधंद्यापायी पोरंबाळं म्हमईला पांगल्याने ओस पडलेल्या कोकणी घरासारखं. हौशी कवींनी, फेसबुकवरच्या कवितांच्या ग्रुप्सनी इथे कविता मेळावे भरवावेत, या कवींच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावं. कवितालेखनाच्या कार्यशाळा घेतल्या जाव्यात आणि 'पहिले कविता संदर्भ ग्रंथालय' म्हणवल्या जाणाऱ्या या ग्रंथालयात दिवसच्या दिवस वाचन व्हावे. आजच्या मिंग्लिश पिढीला इथे आणून बाकीबाब यांच्या कवितांचं देखणेपण उलगडून सांगावे, त्यांच्यासाठी कवितावाचनाच्या स्पर्धा भरवाव्यात. केशवसुतांचं माल्यकूट अर्थात मालगुंड हे कवितांचे गाव व्हावे. हे केले, तरच हे निव्वळ स्मारक न राहता नांदते कविताघर बनेल आणि या कवींचे ऋण काही अंशी फेडल्यासारखे होईल.

--

व्हेनी, व्हिदी, सेपी - मी आले, मी पाहिले आणि मी फोटो काढला

स्मार्टफोनच्या जमान्यातला हा अलिखित नियम आहे. शिवाय इतक्या सुंदर वास्तूत आल्यावर फोटो काढण्याचा मोह होणे साहजिकच आहे. इथे फोटो काढल्यास कोणी तुम्हाला हटकत नाही, पण जागोजागी लागलेली ती 'छायाचित्रे काढू नये' ची पाटी सलत राहते. आपल्याला जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे काम पोहचवायचं आहे, पण जे आवर्जून तिथे येत आहेत त्यांना फोटोही काढू द्यायचे नाही आहेत, हे कसे काय? व्हिडिओ घेण्यास परवानगी नसणे समजण्यासारखे आहे आणि ती अपेक्षा रास्तही आहे, पण फोटो काढण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा असे मनापासून वाटते. या ठिकाणाचे माहात्म्य, त्याचे महत्त्व शब्दांमधून पोहोचवता येईलही कदाचित, पण शब्दांनाही मर्यादा असतात. शब्द तोकडे पडतात, तिथे छायाचित्रे मदतीला धावतात. 'आम्ही इथे येऊन गेलो' हे सांगण्याचा सगळ्यात सोप्पा आणि प्रभावी मार्ग कोणता असेल, तर हा. आयुष्यभर पुरणारी आठवण म्हणजे फोटो.

एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं

फोटोमधून 'दास्तां' नाही पोहोचणार कदाचित, पण 'लम्हा' तर नक्कीच पोहोचेल?  

आपण लंडनला गेलो, की लायस्टर स्क्वेअरला जाऊन शेक्सपिअरचा पुतळा पाहतो, शेक्सपिअर वाचलेला नसलेला तरी 'टू बी ऑर नॉट टू बी' किंवा 'ब्रुटस यू टू?' ही माहीत असलेली वाक्यं टाकून अभिमानाने जगाला सांगतोच, नाही का? तसं इथेही व्हावं. भूगोल वेगळा असला, तरी विचार तोच आहे. रत्नागिरीला गेलं की पुळे, वेळणेश्वर, गुहागर, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग, मासे खाणं तुमच्या यादीत असेलच, पण केशवसुत स्मारकही त्यात जरूर असू द्या. कोकणची 'तुतारी एक्प्रेस' केशवसुतांच्या तुतारीची ललकार कोकणभर फिरवत असते, ती आता कोकणाच्या बाहेरही ऐकू यावी. कोकण पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करत असेलच, पण ते प्रयत्न वृद्धिंगत व्हावेत अशी अपेक्षा.

तर थोडक्यात सांगायची गोष्ट अशी, की पुळ्याचा गणपती आम्हाला अशा रितीने पावला.

---

थोडी माहिती:

Google Maps मधले लोकेशन - कवी केशवसुत स्मारक (https://maps.app.goo.gl/frJtZx6zfUpo92YH6)
कसे जाल?
जवळचे विमानतळ - मोपा किंवा दाबोलिम
गणपतीपुळ्याला येणाऱ्या-जाणाऱ्या खूप बसेस आहेत. एस.टी महामंडळाच्या तर आहेतच आहेत. पुळ्यापासून हे ठिकाण अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे. 
जवळचे रेल्वे स्थानक - रत्नागिरी
स्मारकात किती वेळ जातो - ते तुमच्यावर आहे. कोणी तुम्हाला एक तासानंतर 'जा' असं म्हणणार नाही
प्रवेशमूल्य - १० रुपये प्रत्येकी. लहान मंडळींसाठी ५ रुपये प्रत्येकी.

4 comments:

मिलिंद कोलटकर said...

व्वा! मजा आली. डिसेंबर २०१६ साली भर नोटाबंदीकाळात गेलोतो आम्ही. कोल्हापूरहून पुळ्याला पोहोचल्यावर सामान टाकून रिक्षाने प्रथम मालगुंडला पोहोचलो. भारावल्यागत. मजा आली. काही थोडेसे ‘प्रवेश शुल्क’ आहे, त्याबरोबर माहितीपत्रक मिळते, तिकीट जपून ठेवावे असे असते! :-) आधी तो परिसर, रेखाटलेली कवितांच्या ओळी, कडवी अनुभवली. शेजारच्या शाळेच्या मुलांचा निष्पाप गडबड गोंधळ जाळीदार पडवीतून पाहिला, ऐकला. आणि मग मागे गेलो. मागे लागुनच ग्रंथालय सुद्धा आहे. तिथेच खालील पुस्तक मिळालं. इथं राहण्याची सोय सुद्धा आहे. अभ्यासक येतात, रहातात, म्हणून सांगत होत्या तेथील बाई.
परतीच्या बोलीवर आलेला ‘तो’ही निवांतपणे थांबला होता. असे रसिक क्वचितच येतात. मग थांबायला काही वाटत नाही असे काहीसे म्हणाला.
या साऱ्याची आपण आठवण करून दिलीत. यानिमीत्तानी त्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद!
मधु मंगेश कर्णिक, (संपादक) , २००८. आधुनिक मराठी काव्यसंपदा, कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी. दुसरी: २०१४ २००/-

Shraddha Bhowad said...

नमस्कार मिलिंद कोलटकर,
एखादा चित्रपट आपल्याला आवडतो तशाच पद्धतीने दुसऱ्याला आवडेल असं नसतं. मला डे-लुईस आवडतो, पण तो इतरांना अगम्य वाटण्याची शक्यता असतेच, नव्हे - आहेच; पण म्हणून मी डे-लुईस कसा थोर आहे हे सांगायचं सोडत नाही.
ही वास्तू, त्यातली लेगसी, तिचा वारसा, तिच्यातली सकारात्मक ऊर्जा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी असे खूप मनापासून वाटले, आणि म्हणूनच अगदी हमसाहमशी ही पोस्ट लिहिली गेली. मला या जागेविषयी जे वाटलं, जसं आणि जेव्हढं वाटलं, ते इतरांनाही वाटत असेल अशी अपेक्षा नव्हती; पण, आशा मात्र जरूर होती. तुमच्या कमेंटमुळे त्या आशेला खतपाणी मिळालं.
वेळ काढून तुमची प्रतिक्रिया पोहोचल्याबद्दल धन्यवाद!

-श्रद्धा

Ravi said...

कवितांच्या museum मध्ये भारावल्यागत झालं. एकेक दिग्गज कवी, त्यांची कविता, माझ्या 10 वर्षांच्या मुलीला किती सांगू आणि किती नको. दुर्दैवाने इंग्रजी medium मुळे तिला एकही जण ओळखीचा नव्हता. K-pop to केशवसुत हा फारच लांबचा पल्ला आहे, मी आशा सोडलेली नाही. "तुतारी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे बाबा" हा प्रश्न त्या शांत almost निर्जन स्मारकामध्ये अंतर्मुख करून गेला.

Shraddha Bhowad said...

नमस्कार रवी,

एक गंमत म्हणून-
मी जेव्हा या ठिकाणी गेले होते, तेव्हा माझ्यासोबत एक बाई होत्या. त्यांची मुलगी CBSE ला इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलगी आहे. तिला बऱ्याचशा कविता माहीत होत्या, काही पाठ होत्या. देवा तुझे किती सुंदर आकाश.. टपटप पडती... गवतफुला रे गवतफुला.. आणि अशा बऱ्याचशा कविता ती म्हणून दाखवते. १२ वर्षांची लहान मुलगी आहे ती. त्यामुळे तिथे त्यांना 'इंग्रजी मीडियम' ही समस्या भेडसावली असावी असं वाटलं नाही. त्यांच्या उदाहरणावरून मला वाटलं, की आपल्या मुलांकडे काय संचित असावं हे आपल्यालेखी 'संचित' काय असतं यावर ठरतं. आणि आपल्यालेखी ते जपण्याजोगं असेल आणि त्याचा आपण पाठपुरावा करत असू, तर ते आपसूकच मुलांपर्यंत पोहोचतं.
तुम्हाला हे सांगावंसं वाटलं.

-श्रद्धा

 
Designed by Lena