’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ७

"पण तिला माझ्यासारखं ड्रॉइंग कुठे येतं?"

दुपारपासून मनूच्या तोंडून सतरांदा हे वाक्य ऐकल्यानंतर श्रद्धाने अनूला धरून "चहे चयका चहेआ" विचारलं आणि अनूने खांदे उचकून डोळे कपाळात नेले. कुकरमधली वाफ बाहेर पडायला फुसफुसत असते तशी घडलेलं काहीही दुसऱ्याच क्षणी श्रद्धाला सांगायला फुसफुसणाऱ्या अनूलाही काय घडलंय ते नेमकं सांगता येईना, तशी श्रद्धाला मनूला धरून तिच्या तोंडून ते वदवून घ्यायला लागलं. फणकाऱ्याने उडवलेलं नाक, डोळे मोठ्ठाले करून हातवाऱ्यांचं मीठ घालून, तीनचारदा इथेतिथे भरकटून शेवटी तुकड्यातुकड्याने बाहेर पडलेली गोष्ट अशी होती-

मनूच्या वर्गातल्या अन्वीला 'बेस्ट स्टूडंट' बक्षिस मिळालं होतं.

बस्स! चष्टगो चक्तफ चतकीचइ चतीहो.

--

"मनू, चल ना. उशीर होतोय."

"मी नाही येत. माझा ड्रॉइंगचा क्लास आहे. तू जा"

"मनू, मी सांगते सरांना आज तू नाही येत म्हणून"

"नाही"

"अगं मनू.."

"नाही सांगितलं ना...मला नाही जायचं अन्वीच्या घरी पार्टीला. अनू जाईल."

"मनू, ती स्वत: आली होती बोलवायला. तिला वाईट वाटेल. असं करू नाही"

"मला काय वाटतंय याचा कोणी विचारच करत नाही. तिला वाईट वाटेल म्हणे"

मनू बॅग काखोटीला मारून पाय आपटत निघून जाते.

अनू श्रद्धाकडे पाहते. आता खांदे उचकून डोळे कपाळात नेण्याची पाळी श्रद्धाची आहे.

--

मनू खिडकीच्या काचेला नाक लावून बाहेर पाहते आहे. समोरचा कडुनिंब आता खिडकीच्या गजाशी येऊन टेकला होता.

"काय पाहते आहेस मनू?

"उं??"

"कधीचा भुंकतो आहे नाही कुकुटकुंभा?"

"श्शी! कुकुटकुंभा काय म्हणतेस? भारद्वाज नाव आहे त्याचं"

"आम्हाला तर ब्वा कुकुटकुंभाच माहीत. तुझा बाबा त्याला वेडा कुकुटकुंभा म्हणतो"

"का ते?"

"एकटाच फिरत असतो फांद्याफांद्यांमधून..काहीतरी शोधत असल्यासारखा, काहीतरी हरवल्यासारखा"

"काहीतरीच.."

"राहिलं तर मग.."

"किती सुंदर आहे तो मात्र.. लाल मण्यांसारखे डोळे.. लेदरचं जॅकेट घातलेला, निळा वर्ख असलेली मान असलेला.."

"त्याला सुलक्षणी पण म्हणतात माहीतेय? सुलक्षणी म्हणजे the one who brings out luck"

"आहेच तो तसा.."

"तुला त्याची गोष्ट माहीत असेल नाही? बाबाने सांगीतली असेलच"

"नाही.. कोणती?"

"बाबाला त्याच्या बाबाने, म्हणजे तुझ्या ग्रॅंप्सनी ही गोष्ट सांगीतलेली.. तेव्हापासून तो त्याला वेडा म्हणायला लागला"

(मनू साशंक स्वरात) "ओके?"

"ऐकायचीये?"

"ह्हो!"

(मागून अनू)

"मी पण.. मी पण"

"हातपाय धुवून घ्या.. मी ब्राउनीज बनवल्या आहेत"

"य्ये!"

--

एकदा एक पक्षी नव्या जंगलात राहायला गेला होता. त्या पक्ष्याचं नाव होतं भारद्वाज. 

त्याला स्वत:च्या रुपाविषयी अभिमान होता. तपकिरी, मुलायम लेदर जॅकेटसारखे पंख, मानेवर कोणीतरी निगुतीने द्यावा असा निळ्या रंगाचा वर्ख, सॅटिनसारखं काळं शरीर आणि या सर्वांवर वरताण म्हणजे त्याचे लाल रत्नांसारखे डोळे.

तो तासनतास जंगलातल्या तळ्यापाशीच असे. आता काय पंखच धू, नंतर काय मानच पाण्यात बुडव.. तो स्वत:मध्येच इतका मग्न होता की जंगलातल्या इतर पक्ष्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलंय हे त्याला कळलंच नाही.

पहिले काही महिने तो स्वत:हून कोणाशी बोलायला गेला नाही. त्याचा स्वभाव मूळचाच एकलकोंडा होता, त्यात पुन्हा ते जंगल नवीन.. पण जंगलातल्या इतर पक्ष्यांचं या कलंदर पक्ष्याविषयीचं कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देई ना..

मग एके दिवशी त्याला भेटायला आला खंड्या.

"हाय"

भारद्वाज पक्ष्याने नव्या पाहुण्याकडे पाहिलं. वेगवेगळ्या रंगांची उधळणच झाली होती जशी त्याच्या शरीरावर. इतका सुंदर पक्षी त्याने आजतागायत पाहिला नव्हता.

"आमच्या जंगलामध्ये तुमचं स्वागत आहे."

".."

"तुम्ही इथे येऊन बराच वेळ झाला, पण आपली ओळख नाही झाली."

".."

"आज जंगलातल्या तळ्याकाठी जंगलातले सर्व पक्षी भेटणार आहेत. तुम्हीही या. आमंत्रण करायला आलो होतो"

हं..याच्याशी मैत्री करायची? रंगीबेरंगी असला म्हणून काय झालं, विदूषकच दिसतो तसं पाहिलं तर. माझ्यासारखे मुलायम तपकिरी पंख कुठेत त्याचे? छे!

भारद्वाज मग त्या पक्षी संमेलनाला जातच नाही.

-

मग त्याला भेटायला येते कोकिळा. त्या जंगलाची गायिका.

पण भारद्वाजाच्या डोक्यात काय, तर..

हं..हिच्याशी मैत्री करायची? छान गाते म्हणून काय झालं, तिला गाणं सुचायला उन्हाळात आंबा बहरायला लागतो. माझ्यासारखे मुलायम तपकिरी पंख कुठेत तिचे? छे!

भारद्वाज मग तिच्या घरी जातच नाही.

-

सुंदर पिसारा असणारा मोर, डोक्यावर तुर्रेदार मुकूट असणारा बुलबुल, मनमिळावू मैना.. सर्वजण येऊन त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात, पण भारद्वाज एकाच गोष्टीवर अडलेला-

माझ्यासारखे मुलायम तपकिरी पंख कुठेत त्यांचे? छे!

-

शेवटी सर्व पक्षी त्याच्याशी मैत्री करायचे प्रयत्न सोडून देतात. भारद्वाज त्या झाडावर एकटाच राहतो, कंटाळला की फांद्यावर उड्या मारत राहतो, कुप् कुप् करून भुंकत राहतो, तळ्यातल्या पाण्यात स्वत:चं प्रतिबिंब निरखत राहतो आणि स्वत:च्या जास्तच प्रेमात पडत राहतो.

दिवसांमागून दिवस असेच जात राहतात. 

जंगलात नवे पक्षी येतात.

भारद्वाजाला मात्र त्यातलं कोणीही मैत्री करण्यायोग्य वाटत नाही.

शेवटी त्याच्या झाडावर खूप सारे पक्षी राहायला येतात, तेव्हा तो ते जंगल सोडून दुसऱ्या जंगल्याच्या दिशेने उड्डाण करतो, सर्व पक्ष्यांनी त्याला बहाल केलेलं टोपणनाव मागे ठेवून.

वेडा भारद्वाज.

त्याने आजतागायत अशी अनेक जंगलं बदललेली आहेत.

--

"दी एण्ड"

"बाबाचं बरोबरच आहे. वेडाच आहे तो..इतक्या साऱ्या फ्रेंड्सना कोणी "नाही" म्हणतं का?"

"अनू..मित्र बनवणं, न बनवणं हा आपला चॉइस असतो. ते किती असावेत आणि कोण असावेत हा पण"

मनू कान देऊन ऐकत होती.

"मग?"

"पण, तो स्वत:च्या इतक्या प्रेमात होता, की त्याला दुसऱ्यातल्या चांगल्या गोष्टी दिसतच नव्हत्या हा आपल्या गोष्टीचा पॉइंट नाही का? तुला नाही का असं वाटलं?"

"हा.. खरंय. त्याला ते दिसलं असतं तर त्याची आपोआप मैत्री झाली असती, किंवा तू म्हणतेयेस झालीही नसती.."

"गो ऑन.."

"पण त्याने दुसऱ्या पक्ष्यांच्या चांगल्या गोष्टी बघायला, मान्य करायलाच 'नो' म्हटलं.. त्यामुळे त्या चॉइसला जागाच नाही उरली.

"दॅट्स माय गर्ल.. ही घे तुला जाडजूड ब्राउनी"

अनूने खुशीत येऊन अख्खीच्या अख्खी ब्राउनी तोंडात कोंबली.

"मनू, ब्राउनी?"

मनूच्या हातातली ब्राउनी अजून तशीच होती आणि तिची नजर खिडकीच्या पलीकडे कुठेतरी लागली होती.

बाहेर कुकुटकुंभा वेड लागल्यागत भुंकत होता.. कुप् कुप् कुप् करून..एकटाच.

--

शनिवारची निवांत सकाळ. नुकताच पावसाची एक सर पडून गेलेली.. सगळीकडे नि:स्तब्ध शांतता आणि तेवढ्यात..

"वॉव्व मन्नूउउउउउssss!"

अनूच्या ऑपेरा गायिकेसारख्या तारस्वरातली आरोळीने सोसायटीतली शांतता खळ्ळकन् फुटली.

"काय मस्त पेंटींग आहे! श्रद्धा.. ए श्रद्धा.."

"आहे.. येतेय.. कान नाही फुटलेत माझे."

"बघ ना.."

आणि खरंच.. काय सुंदर पेंटींग होतं. हिरव्यागार पानांच्या एका झाडावर (खिडकीच्या बाहेरचं कडुनिंबाचं?) पक्ष्यांचं संमेलन भरलं होतं जसं. खऱ्याखुऱ्या फांद्या वाटाव्यात इतक्या सुंदर रंगवलेल्या काळसर तपकिरी फांद्यांवर कावळा, चिमणी, रॉबिन, किंगफिशर, बुलबुल, मैना असे पक्षी एकमेकांशी गप्पा मारत असावेत असे बसले होते. आणि, त्या सर्वांमध्ये उठून दिसत होता मनूचा चरद्वारभा!

"मनू?"

"उं?"

"प्रोजेक्ट आहे का क्लासमधला?"

"अं..नाही."

" मग? सहज?"

"मी अन्वीला देणारेय हे पेंटींग."

"हं?"

"अन्वीला.. बीलेटेड बर्थडे गिफ्ट म्हणून"

आणि मनू तिथून घाईघाईने पळ काढते.

नीट निरखून पाहिलं, तर त्या चित्रामधला भारद्वाज वरच्या फांदीवर बसून समाधानाने हसत होता. सगळ्यांमध्ये असल्यासारखा आणि असून नसल्यासारखा.

..आणि खाली चित्रकाराची सही होती.

प्रिय अन्वीला.. वेड्या मनस्विनीकडून.

--

याआधीचे: ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ५ | ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ६

3 comments:

Prashant Pimpalnerkar said...

खूप छान आणि हळवी कथा झाली.

Shraddha Bhowad said...

प्रशांत,
आपल्याला जसं वाटत असतं, तशीच आपली कथा होते
तुम्हाला जसं वाटत असतं, तशीच तुमच्यापर्यंतही पोहोचते :)
म्हणून तुम्हाला ती कळली. :)
आकळणारे लोक असेच कुठून-कुठून भेटत राहोत. वाचत रहा आणि कळवत रहा!

-श्रद्धा

Chandrakant Talele said...

खूप दिवसांनी वाचायचा योग आला. छान जमलं आहे. तुझ्या मांडणीला तोड नाही. आवडली गोष्ट. मनापासून धन्यवाद.

 
Designed by Lena